१) एका खेळियाने - लिएंडर पेस

Primary tabs

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
18 May 2010 - 8:00 pm

१९९६ च्या अटलांटा ऑलिम्पिक्सच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीआधीची गोष्ट. आंद्रे अगासी सारखा दिग्गज आपल्या प्रतिस्पर्ध्याबद्दल बोलत होता. एका पत्रकारानी त्याला विचारलं ‘आता तुला अंतिम फेरीचे वेध लागले असतील’. त्यावर अगासी म्हणाला – "You must be crazy – माझ्या प्रतिस्पर्ध्याचं नाव आहे लिएंडर पेस. त्याच्यासारखे चपळ खेळाडू सर्किटमध्ये फार कमी आहेत. आणि त्यातून हे ऑलिम्पिक्स आहे. मीच काय, इतर कोणीही त्याला कमी लेखण्याची घोडचुक करणार नाही. मला माझा सर्वोत्तम खेळ करावा लागेल. एका वाक्यात अगासीनी लिएंडर पेस काय चीज आहे ते सांगितलं होतं. “आणि त्यातून हे ऑलिम्पिक्स आहे”.... म्हणजे जणू अगासीला म्हणायचं होतं.....लिएंडर त्याच्या देशासाठी खेळणार.....प्रेक्षकातून शेकडो लोकं “इंडिया इंडिया” म्हणून ओरडणार....ह्याला स्फुरण चढणार..... लोकं भारताचा झेंडा नाचवणार....हा माणूस अजून चवताळून खेळणार..... मुठी आवळून आवळून त्याच्या पूर्ण शक्तीनिशी मला झुंज देणार..... मी हमखास म्हणून मारलेले “विनर्स” अशक्यरीत्या परतवणार.....जिवाच्या आकांतानी कोर्ट कव्हर करणार......चित्त्यासारखी झडप घालून त्याच्या "व्हॉलीज" खेळणार.... कारण..... कारण “लिएंडर त्याच्या देशासाठी खेळणार” !

आणि लिएंडरनी अगासीचे बोल खरे ठरवले. पहिल्या सेट मध्ये २ सेटपोईंटस् वाचवून पेसला ७-५, ६-३ असं हरवताना अगासीचं खरंच घामटं निघालं. लिएंडर ती लढत हरला खरा... पण त्यानी फर्नांडो मेलिगेनीला हरवून आपल्या देशाला तब्बल ४४ वर्षांनंतर वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून दिलं. मनगटाला झालेली दुखापत विसरून केवळ देशासाठी पदक मिळवण्याच्या ईर्षेनं पेस झपाटल्यासारखा खेळला होता. १९५२ मध्ये हेलसिंकीमधल्या खाशाबा जाधवांच्या कांस्यपदकानंतर भारत पहिल्यांदा वैयक्तिक पदक मिळवत होता. आणि ते पदक अत्यंत अभिमानानी आपल्या छातीवर मिरवणारं नाव होतं लिएंडर वेस पेस !

“एका खेळियाने” ह्या लेखमालेसाठी लिहितांना पहिला खेळाडू “आपला” असावा असं वाटत होतं. क्रिकेटव्यतिरिक्त कुठल्याही खेळामध्ये खर्‍या अर्थाने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवणारा कोणी खेळाडू हवा. आणि पहिलं नाव मनात आलं अर्थातच लिएंडरचं. हॉकी हा क्रिकेट इतकाच मोजक्या देशांत खेळला जाणारा... बुद्धिबळ हा काही "स्पोर्ट" नाही... आणि इतर खेळांत भारताचं अस्तित्व अगदीच कमी. अश्या परिस्थितीत टेनिससारख्या लोकप्रिय खेळात १-२ नाही, तब्बल २० वर्ष तिरंगा फडकवणारा हा वीर. अटलांटाच्या कांस्यपदकानंतरची ली ची प्रतिक्रिया होती “I can now see my father eye to eye. We both own Olympic medals!”. १९७२ च्या म्युनिक ऑलिंपिक्सच्या कांस्यपदकविजेत्या भारतीय संघात मिडफील्डर म्हणून खेळलेले वेस पेस आणि भारताची एकेकाळची बास्केटबॉल कर्णधार जेनिफर यांचा हा मुलगा अ‍ॅथलीट झाला नसता तरच नवल होतं. १२ वर्षांचा असताना आपल्याकडे मुंज करून गुरुगृही धाडतात तसा पेस घराण्याच्या कुळाचाराप्रमाणे ह्याच्या हातात रॅकेट देऊन ह्याला चेन्नईच्या "ब्रिटानिया अमृतराज टेनिस अ‍ॅकॅडमी"मध्ये धाडण्यात आलं. १७ वर्षांचा असताना त्याने प्रथम १९९० ची विंबल्डन ज्युनिअर चँपियनशिप जिंकली. ५९ मध्ये रामनाथन कृष्णन आणि ७९ मध्ये रमेश कृष्णन यांच्या नंतर हा पराक्रम करणारा तो तिसरा भारतीय ठरला. अमेरिकन ज्युनिअर्स खिताब जिंकून ली ज्युनिअर्स् च्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला. १९९१ मध्ये ली "प्रो" झाला... डेव्हिस कप मध्ये रमेश कृष्णनबरोबर दुहेरी सामने खेळू लागला. ९२च्या बार्सिलोना ऑलिंपिक्समध्ये ही जोडी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोचली. तेव्हा भारतीय टेनिसला कृष्णन - अमृतराज चा वारस मिळाला असंच वाटलं.

टेनिस हा खरंतर आपल्या भारतीय जातकुळीचा खेळच नाही. तो खेळावा तर युरोपियन्स, अमेरिकन्स आणि ऑस्ट्रेलियन्सनी. प्रचंड ताकद, अमर्याद दमसास लागणारा हा खेळ. हात-पाय मोडून घ्यायची.. छाती फुटायची कामं ! ती कामं करावी सव्वासहा, साडेसहा फुटी आडव्या अंगाच्या लोकांनी... आपण आपलं क्रिकेट खेळावं, बुद्धिबळाचे डाव मांडावेत, कॅरम चा वर्ल्डकप जिंकावा आणि गणित आणि फिजिक्स ऑलिंपियाडमध्ये पोत्यानी पदकं जिंकावीत. टेनिस, फुटबॉल, अ‍ॅथलेटिक्स वगैरेंच्या वाटेला फारसं जाऊ नये. टेनिसच्या हिशेबात ली ५'१०" म्हणजे बुटकाच! एकेरीत त्यानी मोजून एक एटीपी स्पर्धा जिंकली आहे. केवळ चणच नव्हे तर एकंदरच टेनिसला लागणारी ताकद आणि खरंतर सध्याच्या काळातलं टेनिसचं 'पॉवर' स्वरूप बघून लिएंडरनं दुहेरीवर जास्त लक्ष केंद्रित केलं आणि तो त्याच्या कारकीर्दीचा "टर्निंग पाँईंट" ठरला.

टेनिसमध्ये सिंगल्सचे दिग्गज सहसा डबल्स खेळत नाहीत. अहो साधी गोष्ट आहे.... एका सिंगल्स मॅचमध्ये ३ तास मर मर धावल्यावर डबल्समध्ये जोडीदाराबरोबर नुसतं उभं राहायला तरी दम शिल्लक राहिला पाहिजे ना? हा तुम्ही विल्यम्स भगिनी असलात तर गोष्ट वेगळी ! निवांतपणे ग्रँडस्लॅमचं डबल्स टायटल जिंकतात आणि पुन्हा सिंगल्सच्या फायनल मध्ये बहिणी-बहिणी समोरासमोर उभ्या! आमचा फेडरर बिचारा नाजुक दिसतो दोघींपुढे ! असो... आपण टेनिसपटूंविषयी बोलत होतो. हा तर फक्त हेच कारण नाही.... एकेरी आणि दुहेरीला लागणारे "स्किलसेट्स" देखील बर्‍यापैकी वेगळे असतात. शेवटी individual आणि सांघिक खेळात फरक असायचाच ना? टेनिस दुहेरीत तुमची कोर्ट कव्हर करण्याची क्षमता, जोडीदाराबरोबरचा ताळमेळ, आपली तशीच जोडीदाराचीच नव्हे तर समोरच्या जोडीची सुद्धा बलस्थानं आणि कमकुवत जागा समजून योग्य "फॉर्मेशन" मध्ये खेळणं, समन्वय, जोडीदार चेंडू मारत असताना तुम्ही काय हालचाली करता, योग्य वेळी योग्य जागी असणं... "व्हॉली"चा (टप्पा न पडू देता बॉल मारण्याचा) अचूक अंदाज असणं ह्या सगळ्या गोष्टी अतिमहत्त्वाच्या असतात. आणि पेसनी नेमकी हीच गोष्ट हेरली.

सेबॅस्टियन लॉरोच्या साथीत पेस ९३ च्या यू एस ओपनच्या उपांत्य फेरीत पोचला.... मग ९५ मध्ये केविन उल्येट बरोबर ऑस्ट्रेलियनची उपांत्यपूर्व फेरी गाठली. आणि मग ९६ साली भारतीय टेनिसच्या इतिहासातली सर्वांत शुभंकर गाठ मारली गेली! प्रत्येक स्पर्धेगणिक लिएंडर पेस - महेश भूपति जोडीचा खेळ बहरत होता. भूपतिचा "पॉवर गेम" आणि लिएंडरचा "रिफ्लेक्स गेम" एकमेकांना पूरक होते.

ली - हेश ही जोडी भारताचं नाव प्रत्येक मोठ्या स्पर्धेत रोशन करत होती. प्रत्येक सामन्यागणिक त्यांच्यातलं सामंजस्य वाढत होतं. ९७ मध्ये तर चारपैकी ३ ग्रँडस्लॅम्सच्या उपांत्य फेरीत ली - हेश पोचले. ९८ मध्ये तर त्यांनी कहर केला.... प्रत्येक ग्रँड्स्लॅमची अंतिम फेरी गाठली ! पैकी फ्रेंच आणि विंबल्डन जिंकले देखील ! इतिहासात पहिल्यांदाच मुख्य ग्रँड्स्लॅम्सच्या विजेत्यांमध्ये भारतीय नावं झळकत होती. अप्रतीम ताळमेळ आणि जबरदस्त "स्पिरिट"च्या जोरावर ली-हेश दुहेरीचं मैदान गाजवत होते. जगभरातल्या भारतीयांना फ्लशिंग मेडोज, रोलँ गॅरॉ आणि सेंटर कोर्टवर जायला एक कारण... का संधी - मिळाली ! वुडफर्ड - वुडब्रिज ह्या "वूडीज" बरोबर, बॉब-माइक ह्या ब्रायन बंधूंबरोबर त्यांच्या लढती रंगायला लागल्या. "इंडिया - इंडिया" चा जल्लोष.... भूपतिची जोरदार सर्व्हिस..... पेसचा वेगवान खेळ....... अप्रतीम को-ऑर्डिनेशन...... श्वास रोखून धरायला लावणार्‍या रॅलीज..... हल्ले-प्रतिहल्ले.... नवनवीन "फॉर्मेशन्स" ... मती गुंग करणारे डावपेच..... जीवाच्या आकांतानी प्रत्येक पॉइंटसाठी लढणं.... भूपतिच्या ताकदवान फटक्यानी पॉइंट "सेट-अप" करणं.... आलेल्या रिटर्नवर चित्त्यासारखी झेप घालून आपल्या "व्हॉली"नी पेसनं तो गुण मिळवणं.... "कंमॉssssssssssन" ची आरोळी आणि..............

....... आणि प्रत्येक भारतीय क्रीडा षौकीनाच्या मनात घर करून राहिलेली पेस-भूपतिची "चेस्ट-थंप" !!!!

क्रिकेटशिवाय कुठल्याच खेळात भारतीयांना इतका जल्लोष करण्याची संधी मिळाली नसेल जितकी टेनिस मध्ये! आणि ही संधी देणारा होता लिएंडर पेस. पेसनी दुहेरीत आत्तापर्यंत ज्या ४३ स्पर्धा जिंकल्या आहेत त्यातल्या २३ महेश भूपतिच्या जोडीने. त्याने ११ ग्रँड्स्लॅम्समध्ये पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठली आणि त्यापैकी ६ वेळा विजेतेपद मिळवलं. मिश्र दुहेरीत मार्टिन नवरातिलोवा आणि कॅरा ब्लॅक च्या साथीत प्रत्येकी ४ आणि एकूण १० ग्रंडस्लॅम्समध्ये अंतिम फेरी गाठून ५ वेळा विजेतेपद मिळवलं ! मार्टिनासारख्या दिग्गज खेळाडूबरोबर खेळताना जी एक गोष्ट घडली ती खेळाडू म्हणूनच नाही तर माणूस म्हणून पेसची महानता अधोरेखित करणारी आहे. २००३ मध्ये पेस - मार्टिना जोडीनी फ्रेंच आणि विंबल्डन स्पर्धा जिंकल्या. पण त्यानंतर ब्रेन-ट्यूमरच्या शत्रक्रियेसाठी पेसला अ‍ॅडमिट व्हावं लागलं... पुढे ते neurocysticercosis नावाचं इन्फेक्शन असल्याचं निष्पन्न झालं. पण त्यावर्षी लिएंडरला अमेरिकन ओपनला मुकावं लागलं. मार्टिनापुढे दुसर्‍या कोणा जोडीदाराबरोबर खेळण्याचा मार्ग खुला होताच. पण तिनी सांगितलं "वाट पाहिन पण पेसबरोबरच खेळीन" :) ! कारण पेस इतरांसारखा नुसता दुहेरीतला जोडीदार नव्हता... तर जिवाला जीव देणारा भरवशाचा सहकारी होता. मार्टिनानी अमेरिकन ओपन खेळायला नकार दिला आणि ती पुढल्या वर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पेसबरोबर खेळली... आणि ह्या अजब जोडीनी उपविजेतेपद मिळवलं !

पेस आणि डेव्हिस कप हे तर एक अशक्य समीकरण. वर म्हटल्याप्रमाणे "पेस देशासाठी खेळतोय" हे एकच कारण त्याला त्याचा खेळ उंचावायला पुरेसं होतं. ३१ मार्च १९९० रोजी झीशान अली बरोबर जपान विरुद्ध पेस पहिल्यांदा डेव्हिस कपचा सामना खेळला. तेव्हापासून आजतागायत अनेक अशक्यप्राय विजय पेसनं मिळवले आहेत. डेव्हिस कपचा सामना म्हटला की वेगळाच पेस लोकांना दिसतो..... प्रतिस्पर्ध्याचं एटीपी क्रमवारीतलं स्थान, त्याचं वय, मिळवलेली विजेतेपदं, त्याची आयुष्यभराची कमाई, उंची, लांबी, रुंदी वजन, मापं... सगळ्या सगळ्या गोष्टी गौण ठरतात ! कारण त्याचा सामना हा फक्त एका टेनिसपटूशी नसतो, तो असतो आयुष्यभर तिरंग्याचा अभिमान आपल्या उरावर अभिमानानं मिरवलेल्या एका झपाटलेल्या देशभक्ताशी ! अतिशयोक्ती वाटत असेल तर गोरान इव्हानिसेविक, हेन्री लेकाँते, अर्नॉड बॉश्च, टिम हेन्मन, ग्रेग रुजेडस्की, अँडी रॉडिक ह्या सबंध कारकीर्द "टॉप २०" मध्ये काढलेल्या लोकांना विचारा ! केवळ आपल्या देशबांधवांच्या आणि सहकार्‍यांच्या पाठिंब्याच्या जोरावर, आपल्या मर्यादित टेनिस कौशल्यानं देखील लिएंडर भल्या-भल्यांना माती चारतो... भल्या भल्यांच्या तोंडाला फेस आणतो डेव्हिस कप मध्ये खेळलेल्या ७० सिंगल्स लढतींपैकी ४८, आणि ४६ डबल्स लढतींपैकी तब्बल ३७ मध्ये विजय असं अचाट रेकॉर्ड लिएंडरचं आहे याचं कारणच त्याची देशासाठी झोकून देऊन खेळण्याची वृत्ती. आज तो ३७ वर्षांचा आहे पण केवळ त्याच दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर तो अजूनही भारताचा ध्वज त्याच्या समर्थ खांद्यांवर पेलतोय. मध्ये सहकार्‍यांबरोबर बेबनावाचे प्रकार घडले ते ह्या प्रेरणादायी कारकीर्दीला नजर लागू नये म्हणून :).

लिएंडर पेस नावाच्या ह्या एका खेळियाने भारताला टेनिसमध्ये नवी ओळख मिळवून दिली. विचारपूर्वक दुहेरी खेळून आपल्या शारीरिक मर्यादांमध्ये सुद्धा आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत यशस्वी ठरू शकतो हे सिद्ध करून दाखवलं. एटीपी टूर वर अनेक स्पर्धा जिंकून देखील ऑलिंपिक्स अथवा एशियन गेम्सच्या वेळी इतर भारतीय खेळाडूंना जोरजोरात टाळ्या वाजवून, घोषणा देऊन प्रोत्साहन देणारा पेस म्हणूनच भारतीय क्रीडाषौकिनाच्या मनात अढळ स्थान प्राप्त करून जातो ! भारताचं प्रतिनिधित्त्व करताना "मी देशासाठी खेळतो आहे" ही एकच भावना त्याला त्याच्या मर्यादा ओलांडून out of his skins खेळायला प्रेरित करते. नुसते तिरंगा हातात असतानांचे त्याचे हे फोटो पहा !

भारताचं प्रतिनिधित्त्व करण्याचा अभिमान, आपण देशाला एक विजय मिळवून दिला ह्याचा आनंद, आपल्यामुळे आपल्या देशवासीयांना आनंद झाला आहे ह्याचं समाधान त्याच्या चेहर्‍यावरून ओसंडत असतं. कुठलाही खेळ खेळण्यासाठी भले जगातलं सर्वोत्तम कौशल्य नसलं तरी बेहेत्तर पण आमच्या लिएंडरसारखी जिगर हवी ! असे ११ लिएंडर मिळाले ना तर आपण केवळ त्यांच्या देशभक्तीच्या आणि इच्छाशक्तीच्या जोरावर फुटबॉलचा वर्ल्डकप देखील जिंकून. मला तर वाटतं की भारतीय क्रिकेट संघात १३वा खेळाडू म्हणून लिएंडरला प्रत्येक दौर्‍यावर घ्यावं.... भारतासाठी खेळणं काय असतं हे बाकीच्यांना त्याच्याकडे बघून समजेल !

क्रीडाप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

18 May 2010 - 8:10 pm | संदीप चित्रे

लिएंडरबद्दल खूप चांगली माहिती मिळाली आणि त्याच्या कारकिर्दीचा आढावाही आवडला.
पुलेशु मॉर्गन
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

नरेश_'s picture

18 May 2010 - 8:15 pm | नरेश_

क्रीडाविषयक लेखनात तुमचा हातखंडा आहे असे दिसते.
पु.ले.शुभेच्छा !

इतरांनी खोटं बोललेलं मला मुळीच खपत नाही ;)

छोटा डॉन's picture

18 May 2010 - 8:22 pm | छोटा डॉन

मॉर्गन , आपल्या किर्तीला जागलात तुम्ही.
एकदम तुफान लेख झाला आहे ...

पुढील लेखनास शुभेच्छा !!!
लवकर येऊद्यात , वाट पहातो आहे ...

अवांतर :
आमच्या काही फर्माईशी :
१. मेस्सी / ड्रोग्बा / रोनाल्डो / जॉन टेरी / पाब्लो माल्दिनी / लिजंडरी बेकहॅम
२. मायकल फेल्प्स
३. शुमाकर / मास्सा / ओलेन्सो
४. विल्यम्स भगिनी
५. टायगर वुड्स
६. हुसैन बोल्ट / मॉरिस ग्रीन

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

अनिल हटेला's picture

19 May 2010 - 11:11 pm | अनिल हटेला

अजुन एक फरमाईश
a

स्टेफी ग्राफ :D

बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D

भिडू's picture

20 May 2010 - 7:27 am | भिडू

+१

Dhananjay Borgaonkar's picture

18 May 2010 - 8:27 pm | Dhananjay Borgaonkar

मॉर्गन साहेब याआधी मे पेस वर एवढा चांगला लेख आजिबात वाचला नव्हता.
केवळ अप्रतिम =D> =D>
पुढील लेखाची वाट बघतो आहे.

गणपा's picture

18 May 2010 - 8:43 pm | गणपा

प्रस्तावनेच्या लेखातच जोखल होत की ही मालीका साधी सुधी असणार नाही.
आणि मॉर्गन आमच्या या विश्वासाला तुम्ही तडा नाही दिलात. एक सर्वांग सुंदर लेख वाचायला मिळाला.
धन्यवाद.

लिएंडर बद्दल वाचलेल्या लेखांवरील आजवरचा उत्कृष्ट लेख.

मेघवेडा's picture

18 May 2010 - 8:44 pm | मेघवेडा

जबरा लेख रे जेपी!! क ड क!!

=D> =D> =D>

९८ साली पायलट पेन इंटरनॅशनल ओपन मध्ये, आयुष्यात पहिल्यांदाच पीट सॅम्प्रसविरुद्ध खेळताना या आपल्या पेसने सॅम्प्रसला ६-३, ६-४ अशी धूळ चारली होती ती घटना आठवली!!

मस्त मस्त मस्तच!! सॅम्प्रस, शूमाकर, रॉसी, आर्मस्ट्राँग या दिग्गजांचा समावेश लेखमालेत असेलच अशी आशा आहे!! येऊ द्या!!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

जे पी , लेख उत्तम झालाय...आवडला.

एक गोष्ट खटकली, ती खेळा खेळातली तुलना.
शारिरीक दृष्ट्या चेस हा च्यालेंजींग नसेल पण तोही एक खेळच आहे, असे माझे मत आहे.आणी माझ्या मते सध्या भारताचे जेवढे अंतरराष्ट्रीय टेनीस खेळाडू (पहिल्या २५० मधे) नसतील तेवढे ग्रँडमास्टर्स आहेत... :)

तुझ्यासारख्या एका सुंदर क्रिडालेखकाने हे Discrimination करू नये असे मला वाटते.
(चु भु दे घे)

छोटा डॉन's picture

18 May 2010 - 9:03 pm | छोटा डॉन

अरे प्रभ्या तुझे म्हणणे आता कळाले आहे ?
पण म्हणुन हा प्रतिसाद किती वेळा एडिट करणार ? ;)

असो, आता लॉक केला आहे, उगाच हुलिगन्ससारखे नको वागुस.

अवांतर : कदाचित 'चेस' आणि 'सॉकर, क्रिकेट, हॉकी' यासारखे खेळ ह्यांची 'स्पोर्ट्स' ह्या एकाच गटात तुलना सुयोग्य नसावी असे मला वैयक्तिकरित्या वाटते.
अर्थात सर्वांनाच पटतील अशी सुयोग्य कारणे देणे माझ्या अवाक्याबाहेरचे काम असले तरी ' शारिरीक क्षमता, क्षणाक्षणाला बदलणारी परिस्थिती, कमालीचे रिफेक्ल्सेस , विचार करायला अतिशय कमी संधी ( फुटबॉलमध्ये जेव्हा एखादा विंगर स्ट्रायकरकडे क्रॉस देतो तेव्हा त्याच्याकडे १ सेकंद सुद्ध नसतो विचार करायला, शिवाय समोर गोली आणि डिफेंडरचे कडे असतेच, ऑफसाईडचा धोका नेहमीचाच .. ) ' आदी बाबींमुळे ह्या इतर प्रकारांमध्ये चेसपेक्षा 'स्पोर्टिव्हनेस' जरा जास्तच असावा असे वाटते.
असो.

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

प्रभो's picture

18 May 2010 - 9:12 pm | प्रभो

>>अरे प्रभ्या तुझे म्हणणे आता कळाले आहे ?
'?' चे प्रायोजन समजले नाही.

>>पण म्हणुन हा प्रतिसाद किती वेळा एडिट करणार ? Wink
माझी वाक्यरचना चुकीची वाटत होती, म्हणून २ वेळा केला..

>>असो, आता लॉक केला आहे, उगाच हुलिगन्ससारखे नको वागुस.
सही जवाब...क्रिकेट नंतर फुटबॉल हा आवडता 'स्पोर्ट' असल्याने थोडा परिणाम होणारच.

>>अवांतर : कदाचित 'चेस' आणि 'सॉकर, क्रिकेट, हॉकी' यासारखे खेळ ह्यांची 'स्पोर्ट्स' ह्या एकाच गटात तुलना सुयोग्य नसावी असे मला वैयक्तिकरित्या वाटते.
अर्थात सर्वांनाच पटतील अशी सुयोग्य कारणे देणे माझ्या अवाक्याबाहेरचे काम असले तरी ' शारिरीक क्षमता, क्षणाक्षणाला बदलणारी परिस्थिती, कमालीचे रिफेक्ल्सेस , विचार करायला अतिशय कमी संधी ( फुटबॉलमध्ये जेव्हा एखादा विंगर स्ट्रायकरकडे क्रॉस देतो तेव्हा त्याच्याकडे १ सेकंद सुद्ध नसतो विचार करायला, शिवाय समोर गोली आणि डिफेंडरचे कडे असतेच, ऑफसाईडचा धोका नेहमीचाच .. ) ' आदी बाबींमुळे ह्या इतर प्रकारांमध्ये चेसपेक्षा 'स्पोर्टिव्हनेस' जरा जास्तच असावा असे वाटते.
असो.>>
डॉनरावांशी बाडीस.

अवांतरः विचार करून खेळ करणारा शत्रू हा समोरासमोर लढणार्‍या पेक्षा जास्त खरतरनाक असतो, असे माझे मत आहे...

छोटा डॉन's picture

18 May 2010 - 9:25 pm | छोटा डॉन

>>'?' चे प्रायोजन समजले नाही.
च्यायला, ते चुकुन पडले रे.
आजकाल माझे जरा 'वय झाले असल्याने' अशा चुका होतात कधीकधी, माफी असावी. असो.

>>अवांतरः विचार करून खेळ करणारा शत्रू हा समोरासमोर लढणार्‍या पेक्षा जास्त खरतरनाक असतो, असे माझे मत आहे...

+१, हे ही मान्य, सहमत !
पण हे पण सापेक्ष आहे, एखादा भयंकर ताकद असलेला बलदंड खेडाळु समोर असेल तर त्याने अविचारानेही बेधडक मारलेली मुसंडीही घातक ठरते म्हणा.

आता हेच पहा ना. अगदी सावध खे़ळ, मेन टु मॅन मार्किंग, सेंटर फॉर्वर्डला लॉक अशी 'विचार करुन खेळणारे' कोरियन्स जरी लै भारी असले तरी समोर धसमुसळा खेळ करणारे अर्जेंटिनावाले आले की कसा गेम होतो ते.
अर्थात हे सर्व त्या त्या परिस्थितीवर अवलंबुन असते म्हणा :)

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

जे.पी.मॉर्गन's picture

19 May 2010 - 10:54 am | जे.पी.मॉर्गन

प्रभो,

अरे मी फक्त बुद्धिबळ हा "स्पोर्ट"च्या डेफिनेशनमध्ये बसत नाही इतकंच म्हटलं. मला व्यक्तिशः चेस मधलं विशेष काही कळत नसलं तरी चेस खेळणार्‍यांबद्दल मला अतीव आदरच आहे. तेव्हा डिस्क्रिमिनेशन चा माझा अजिबात उद्देश नाही. प्रत्येक खेळाची गरज वेगळी असते. अगदी टायसनला सुद्धा स्पिनरला सिक्स मारायला सांगितली तरी खूप प्रॅक्टिस करून देखील त्याला जमेलच असं नाही. खेळा-खेळात भेदभाव करण्यात अर्थ नाही. "क्रिकेट कसला खेळ लेको? फुटबॉलमध्ये बघा कसं दीड तासात घामटं निघतं" म्हणण्यात काही हशील नाही. क्रिकेट तुम्हाला कोणी १.५ तास खेळायला सांगत नाही. पाच दिवस जे काँसन्ट्रेशन आणि जी चिकाटी क्रिकेटमध्ये लागते ती फुटबॉलमध्ये लागते का? अगदी कॅरम किंवा ब्रिज सारखे बैठे खेळ खेळणार्‍यांबद्दल देखील मी हेच म्हणीन. पण माझ्या मनात अजिबात डिस्क्रिमिनेशन नव्हतं. तसं ध्वनित होत असल्यास क्षमस्व! :-)

जे पी

मदनबाण's picture

18 May 2010 - 9:00 pm | मदनबाण

उत्तम माहिती,सुंदर लेख... :)

मदनबाण.....

“control oil and you control nations; control food and you control the people”.
Henry Kissinger

'एका खेळीयाने' चं पहिलं पुष्प आवडलं! सुरूवात करायला भारतीय लिअँडर पेस निवडलात हेही छानच. आता पुढील भागात बिलियर्ड्स मध्ये अशीच देशव्यापी आपलेपणाची भावना निर्माण करणारा, आणि तब्बल आठ world titles जिंकणारा गीत सेठी याच्याविषयीही तुमच्या खास शैलीत वाचायला आवडेल. जाता जाता: गीत सेठी ने लिअँडर पेस च्या 'ऑलिंपिक मोमेन्ट' विषयी इथे केलेली टिप्पणी प्रासंगिक आहे.

http://www.tubaah.com/embed.php?video_id=33916

आणि हो- तुमच्या लिखाणाचं संकलन करून उत्तम पुस्तक होईल हे बर्‍याच जणांनी या आधी सांगितलंच आहे, तेंव्हा प्रकाशनाचं जरा मनावर घ्या!

मुक्तसुनीत's picture

18 May 2010 - 9:21 pm | मुक्तसुनीत

हेच म्हणतो.
प्रेरणादायी लिखाण.

सहज's picture

19 May 2010 - 7:34 am | सहज

आणि हो- तुमच्या लिखाणाचं संकलन करून उत्तम पुस्तक होईल हे बर्‍याच जणांनी या आधी सांगितलंच आहे, तेंव्हा प्रकाशनाचं जरा मनावर घ्या

हेच म्हणतो.
प्रेरणादायी लिखाण.

भारद्वाज's picture

18 May 2010 - 11:12 pm | भारद्वाज

अहाहा....पुढे अजून काय काय पर्वणी आहे हे या पहिल्या लेखवरूनच लक्षात आले आहे.
मस्त मस्त मस्त मस्त.

बेसनलाडू's picture

18 May 2010 - 11:19 pm | बेसनलाडू

एस पेस सारखाच हा एस लेख लिहून लेखमालेची उत्तम सुरुवात केली आहेत. पुढील लेख वाचण्याची उत्सुकता खूप वाढली आहे.
(क्रीडोत्सुक)बेसनलाडू

ऋषिकेश's picture

18 May 2010 - 11:35 pm | ऋषिकेश

सुरवात उत्तम आता पुढील लेखांत तुलनेने अनोळखी परंतु निष्णात खेळियांची माहिती मिळेल अशी अपेक्षा करतो.

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

राघव's picture

18 May 2010 - 11:37 pm | राघव

खूप आवडले.
पुढल्या लेखाची वाट बघतोय :)

राघव

स्वाती२'s picture

19 May 2010 - 3:49 am | स्वाती२

वाचत आहे.

सनविवि's picture

19 May 2010 - 11:02 am | सनविवि

मस्त झाला आहे लेख. पुढचा भाग भूपती वर लिहावा अशी फर्माईश!

निखिल देशपांडे's picture

19 May 2010 - 11:10 am | निखिल देशपांडे

वा वा मॉर्गन साहेब जोरदार सुरवात
पेस पासुन सुरवात कराल असे वाटलेच नव्हते.
आणि ईतका डीटेल्ल लेख वाचुन जाम मजा आली...
काही काही वाक्ये तर जुन्या आठवणी जागा करुन गेल्या....

....... आणि प्रत्येक भारतीय क्रीडा षौकीनाच्या मनात घर करून राहिलेली पेस-भूपतिची "चेस्ट-थंप" !!!!

येस... हे कसे विसरणार????
बाकी पेस च्या डेविस कप मधल्या खेळा बद्दल तर बोलुच नये... डेविस कप मधे गोरान ईवान्सेविक ला भारतात हरवलेली मॅच आठवली. डेविस कप मधे खेळताना पेस च्या तीनही मॅचेस म्हणसे सिंगल्स, ड्बल्स आणि रिवर्स सिंगल्स असो याकडे नक्कीच नजर लावुन असायचो..

हा तुम्ही विल्यम्स भगिनी असलात तर गोष्ट वेगळी ! निवांतपणे ग्रँडस्लॅमचं डबल्स टायटल जिंकतात आणि पुन्हा सिंगल्सच्या फायनल मध्ये बहिणी-बहिणी समोरासमोर उभ्या! आमचा फेडरर बिचारा नाजुक दिसतो दोघींपुढे !

=)) =)) =)) =)) =))
हे वाक्य जामच आवडले... खरे आहे विल्यम्स भगीनींनी वुमन्स टेनिसचा गेम बदलुन टाकलाय.

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

मनिष's picture

19 May 2010 - 11:24 am | मनिष

विल्यम्स भगीनींना वुमेन्स/मेन्स अशा कॅटॅगरीत टाकण्याऐवजी त्यांच्यासाठी एखादी वेगळी कॅटेगरी निर्माण करावी असे वाटते! ;)

जे.पी.मॉर्गन's picture

19 May 2010 - 12:24 pm | जे.पी.मॉर्गन

बाकीच्या गोर्‍या आणि दिसायला चांगल्या असतात म्हणून... पण त्यांची सुद्धा उंची विल्यम्स भगिनींपेक्षा कमी नसते ! अगदी त्यांच्यासारखे "पिळदार बाहू" नसले तरी अ‍ॅमेली मॉरेस्मो, डिमेंटियेवा वगैरे सुद्धा काही कमी नाहीत :))

जे पी

बेसनलाडू's picture

19 May 2010 - 10:58 pm | बेसनलाडू

अगदी त्यांच्यासारखे "पिळदार बाहू" नसले तरी अ‍ॅमेली मॉरेस्मो, डिमेंटियेवा वगैरे सुद्धा काही कमी नाहीत
झालंच तर लिन्ड्झी डेवनपोर्ट, मेरी पिअर्स, अरांता सॅन्चेझ विकारिओ वगैरे :)
(स्मरणशील)बेसनलाडू

llपुण्याचे पेशवेll's picture

19 May 2010 - 11:34 am | llपुण्याचे पेशवेll

छान लेख. लिअँडरचे डेव्हीसचे रेकॉर्ड मला माहीत नव्हते. खरोखरच नेत्रदीपक आहे रेकॉर्ड.
असे ११ लिएंडर मिळाले ना तर आपण केवळ त्यांच्या देशभक्तीच्या आणि इच्छाशक्तीच्या जोरावर फुटबॉलचा वर्ल्डकप देखील जिंकून
सहमत सहमत सहमत.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

सुमीत भातखंडे's picture

19 May 2010 - 11:57 am | सुमीत भातखंडे

अप्रतिम लेख
=D>

ज्ञानेश...'s picture

19 May 2010 - 1:35 pm | ज्ञानेश...

मॉर्गनराव, "दिल खुश" करणारे लेख असतात तुमचे !

मला तर वाटतं की भारतीय क्रिकेट संघात १३वा खेळाडू म्हणून लिएंडरला प्रत्येक दौर्‍यावर घ्यावं.... भारतासाठी खेळणं काय असतं हे बाकीच्यांना त्याच्याकडे बघून समजेल

या वाक्याशी हजार वेळा सहमत !

झकासराव's picture

19 May 2010 - 2:14 pm | झकासराव

अप्रतिम लेख :)

ओलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकल्यानंतर जेव्हा राष्ट्रगीत वाजत होत तेव्हा भावनाविवश झालेला पेस मलाहि धुसर धुसर दिसत होता.

लेखमाला भारी रंगणार :)

टारझन's picture

19 May 2010 - 11:34 pm | टारझन

व्वा !! आता टेणिसपटु दिया मिर्झावर सुद्धा एक विस्ट्रुत लेख येऊन्स द्या साहेब .. :)

- टि पी टार्झन

बेसनलाडू's picture

19 May 2010 - 11:40 pm | बेसनलाडू

दिया ही आमची "वन ऑफ द" लाडकी (अभिनेत्री) आहे. ती टेनिसपटू कधी बरे झाली?
(दिवाप्रेमी)बेसनलाडू

नंदन's picture

20 May 2010 - 7:57 am | नंदन

लेख. पेसच्या 'प्रयत्ने वाळूचे...' अशा जिगरबाज खेळाच्या शैलीचं हे एक छोटेखानी उदाहरण.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

जे.पी.मॉर्गन's picture

20 May 2010 - 10:37 am | जे.पी.मॉर्गन

काय शॉट आहे रे नंदन !!!! दूर जाणारा आणि मागे गेलेला आणि त्यात बॅकहँड. खरं आहे... असे "क्रेझी" फटके पेसच मारू जाणे !

जे पी

टुकुल's picture

20 May 2010 - 12:23 pm | टुकुल

मालक, तुम्ही लिहित रहा आणी आम्ही फक्त मंत्रमुग्ध होवुन वाचत राहतो. पेस बद्दल एवढा चांगला लेख आधी कधी वाचला नव्हता.

--टुकुल

श्रीरंग's picture

15 Jul 2015 - 1:04 am | श्रीरंग

परवा लिएंडर पेस १६व्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकला, आणी या अतीशय सुंदर लेखाची आठवण आली.
१९९० साली जेव्हा फेडरर आणी जोकोविचचे प्रशिक्षक विंबल्डनच्या अंतिम फेरीत खेळत होते, तेव्हा पेसनी आपला पहिला वहिला विंबल्डन किताब (जुनीयर) जिंकला.
खरोखर, भारतातील आजवरचा सर्वश्रेष्ठ खेळाडू.

अमोल मेंढे's picture

15 Jul 2015 - 10:28 am | अमोल मेंढे

भारतीय क्रिकेट संघात १३वा खेळाडू म्हणून लिएंडरला प्रत्येक दौर्‍यावर घ्यावं.... भारतासाठी खेळणं काय असतं हे बाकीच्यांना त्याच्याकडे बघून समजेल !

१००% सहमत

सिरुसेरि's picture

15 Jul 2015 - 3:49 pm | सिरुसेरि

अभ्यासपुर्ण लेख . यावरुन सहज जिम कुरिअर या टेनीसपटूची आठवण झाली . त्याचा टेनीसविश्वात झालेला उदय , अचानक बरीच विजेतेपदे मिळवणे व तसेच लुप्त होणेही अचानक .

अभिजीत अवलिया's picture

15 Jul 2015 - 4:13 pm | अभिजीत अवलिया

माझ्या एका अतिशय आवडत्या खेळाडूची माहिती देणारा इतका उत्तम लेख लिहिल्याबद्दल अतिशय आभार.

मी-सौरभ's picture

15 Jul 2015 - 7:00 pm | मी-सौरभ

आवडेश...

अविनाश पांढरकर's picture

16 Jul 2015 - 4:35 am | अविनाश पांढरकर

पेस बद्दल एवढा चांगला लेख आधी कधी वाचला नव्हता

श्रीरंग_जोशी's picture

16 Jul 2015 - 5:16 am | श्रीरंग_जोशी

मी लिएंडरबाबत मराठीत वाचलेल्या सर्वोत्तम लेखांपैकी एक.
विम्बल्डनच्या नव्या विजेतेपदासाठी लिएंडरचे अभिनंदन.

चतुरंग's picture

16 Jul 2015 - 6:08 am | चतुरंग

हा वाचायचा राहूनच गेला होता. खोदकामाबद्दल धन्यवाद!
जेपी तुम्ही ही मालिका पुढे चालू ठेवा राव, फार उत्कंठावर्धक लिहिता.

(विशीचा डायहार्ड फॅन असल्याने 'चेस हा स्पोर्ट नाही' असे वाचून काळजात कळ उठली पण तुमच्या लेखासाठी तुम्हाला एकडाव माफी! :) )

-चतुरंग