अंजिराचा चिक आणि औषधोपचार

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in काथ्याकूट
27 Mar 2015 - 4:41 am
गाभा: 

आमच्या आवारात अंजिराचं झाड आहे. ते अगदी फाटकाला लागून आहे. त्याचा वाढायचा वेग आणि पसारा प्रचंड आहे. त्यामुळे आम्हाला ते सारखं छाटत राहावं लागतं. नाहीतर ते फाटकातून यायला जायला अडथळा करू लागतं आणि वर त्या झाडाच्या अगदी डोक्यावर विजेच्या तारा आहेत. त्यामुळे ते सरळही वाढू देऊ शकत नाही आणि आडवंही. त्याला भरपूर पाने येतात आणि कसली तरी पांढरी चिलटं भरमसाठ प्रमाणात पानांच्या खालच्या बाजूला गर्दी करतात. जणू उलट्या बाजूने बर्फवृष्टी झाली असावी सगळ्या झाडावर. ती चिलटं संध्याकाळ झाली की घरात घुसायला बघतात. ती चिलटं खूप बारीक आणि पीठासारखी अंगाला चिकटून बसणारी. त्यामुळे ते कितीही हिरवंगार रसरशीत दिसणारं झाड असलं तरी चुकीच्या ठिकाणी उगवल्यामुळे कायम छाटत राहावं लागतं. त्याचा वाढण्याचा वेग आणि दिशा म्हणजे हॉलीवूड चित्रपटात कधी झाडे वेडीपिशी झाल्यावर कशी वेडीवाकडी, सरसर वाढून माणसांना ओढून नेतात तसं काहीसं भीतीदायक पद्धतीने ते झाड वाढतं. अगदी जमीनीला लागून त्याची फांदी समांतर तीन फूट वाढून नंतर भलतीकडूनच कुठेतरी सरळ आकाशाकडे निघते. त्यामुळे इतर फुलझाडांना, वेलींना त्रास होतो.

तर असे हे आमचे अंजिराचे झाड. त्याचा आम्हाला आणि आमचा त्याला विचित्र त्रास. पण एक नवीनच माहिती आम्हाला कळली आणि ह्या आम्ही करत असलेल्या उपद्व्यापाचा कुणालातरी खूपच फायदा झालेला कळून आला.

चार पाच दिवसांपूर्वीची घटना आहे.

एका संध्याकाळी बायको चिमुकल्याला घेऊन आवारात फेरफटका मारत असतांना एक स्त्री त्या झाडाकडे येतांना तीला दिसली. बायकोला अचानक पुढे आल्याचं पाहून ती जरा थबकली. जणू काही ती याच्या आधीसुद्धा नेहमी झाडाजवळ येत असावी असं तिच्या देहबोलीवरून वाटलं. आज घरचं माणूस असं समोर आलेलं पाहून ती चपापली. तरी पुढे येऊन तीने विचारले, 'ताई, या झाडाचा चीक घेऊ का जरासा. माझ्या मुलाला चाई (डोक्यावरच्या त्वचेचा एक रोग ज्यात २-३ इंच पॅच मधे केस पूर्ण झडतात. यापेक्षा अधीक शास्त्रिय माहीती नाही.) झाली आहे. त्यावर हा इलाज सांगितला आहे. मी नेहमी इथून चीक घेऊन त्याच्या चाईवर लावते. त्याला बराच फरक पडला आहे. केस परत उगवायला सुरुवात झाली आहे."

माझ्या बायकोला तो प्रकार काय समजला नाही आणि त्यामुळे ती काय व कशाबद्दल बोलतेय तेही काही कळत नव्हतं. बायकोची प्रश्नार्थक मुद्रा आणि अविश्वास बघून तिने पुढे येऊन ते प्रात्यक्षिक दा़खवले. अंजिराच्या झाडाचं कोवळंसं पान देठापासून तोडून त्यातून निघणारा ताजा ताजा पांढरा चीक तीने सोबत असलेल्या तीच्या दहा वर्षाच्या मुलाच्या डोक्याच्या मागच्या बाजूस जिथे चाई पडली होती तीथे लावला. ती म्हणाली की ती दुसर्‍या गल्लीत चार घरं सोडून राहते. पण त्यांच्याकडे तशी काही झाडे नाहीत. गम्मत म्हणजे आमच्या घरासमोरच दुसरे घर आहे त्यांच्याकडेही असंच अंजिराचं झाड आहे. पण आम्हाला सतावणारे कुठलेच प्रश्न त्यांना सतावत नसल्याने त्यांनी ते झाड कधीच तोडले किंवा छाटले नाही. त्यामुळे त्यांचे झाड जरा राठ झाले आहे, त्यातून असा मुबलक चीक बाहेर येत नाही.

आम्ही आमच्या समस्यांमुळे त्या झाडाची करत असलेली काटछाट नकळत एका कुटूंबाला खूप काही फायदा देऊन गेली हे कळल्यावर आनंदच झाला. मग वाटलं किती साधीशी गोष्ट आहे. तोडा एक पान आणि लावा त्या पॅचवर की आले केस. पण हळूहळू जास्त खोलात जाऊन विचार करता बरेच मुद्दे लक्षात आले. अंजिराचं झाड एवढंही सामान्य नाही की दर चार घर सोडून कुठेही मिळेल. त्यांना नेमका हाच इलाज कुणी सांगीतला आणि ते झाड ताज्या रसरशीत चिकासह शेजारीच मिळावं, त्याचा परिणामही मिळावा हा माझ्यामते तरी भयंकर योगायोग आहे. आमच्याच दारात झाड आहे त्यामुळे आम्हाला त्याचे काही कौतुक नाही पण त्या स्त्रीला तिच्या मुलाच्या उपचारासाठी योग्य सल्ला आणि तो चीक असा मिळणे फारच भाग्याची गोष्ट होती. आमच्या आवारात हीच (पिवळा चाफा, अंजीर, ई.) दोन-तीन औषधी झाडे आहेत पण आम्हाला त्याचे काहीच उपयोग ठाऊक नाहीत. पण असं काही कळलं की बरं वाटतं.

आता मूळ चर्चेचा विषय.
१. असे सल्ले जे इतके साधे आणि सोपे वाटतात ते खरंच तसे असतात का?

२. प्रथमदर्शनी हा सल्ला 'आयुर्वेद' अथवा 'आजीबाईचा बटवा'छाप वाटतो. असे सल्ले फार वाईट पद्धतीने उलटूही शकतात. असे सल्ले उपचारापूर्वीच तपासून बघायची सोय आहे काय किंवा असावी?

३. आधुनिक वैद्यकीय पद्धतीत काही गोष्टींवर अजिबात उपचार नाही असे सांगितले जाते तेव्हा दुसर्‍या बाजूला त्याच रोगावर खात्रीलायक आणि सिद्ध झालेले उपचार पारंपारिक पद्धतीमधे आढळून येतात. (ऐकीव माहिती. उदा. दम्यावर मासळीतून औषध घेणे, वैगेरे वैगेरे) त्यामुळे सामान्य सुजाण, जबाबदार, विज्ञाननिष्ठ पण रोगाने त्रस्त नागरिकाने नेमकी काय भूमिका घ्यावी?

४. चाई या प्रकारात सर्व वैद्यकीय पद्धतीत खात्रीलायक उपचार आहेत की नाहीत याबाबत मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे. पण चाई प्रकार बराच बघितला आहे. त्याने त्रासलेल्या व्यक्तीही बघितल्या आहेत. त्यामुळे या प्रश्नाच्या उत्तराची जाणकारांकडून माहीती मिळाल्यास उत्तम. (आजारांच्या बाबतीत मी कधीही गुगलत नाही. मनस्ताप टळतो.)

५. अशी उदाहरणे प्रत्यक्षात समोर घडल्याने अशा उपचार पद्धतींवर सामान्य नागरिकांचा विश्वास बसू शकतो. त्यातला धोका कसा ओळखावा? दुसर्‍या शब्दात एखाद्या रोगावर कुठल्याही उपचारपद्धतीतली अधिकारी आणि तज्ञ व्यक्ती कशी शोधावी?

६. अशाच काही पारंपरीक, साध्या, बिनखर्चीक, फुकट उपचारांवर संशोधन करून आधुनिक वैद्यकशास्त्र हे अमूल्य ज्ञान प्रमाणित करून सामान्यांस उपलब्ध करून देतं काय, असल्यास त्याचा काही संदर्भ मिळेल काय? नसल्यास का करत नाही?

अंजिराची फळे:
mm

अंजिराचे झाड:
mm

अंजिराचे झाड :
mm

अंजिराचे पाने (आमच्या घरी असलेली जात) :
mm

चाई (Alopecia Areata ):
mm


जाहीर सूचना: सदर घटना सत्य असली तरी कृपया कुणीही या सल्ल्याचा किंवा उल्लेखीत उपचारांचा वापर या लेखात सांगितला आहे म्हणून करू नये. आपल्या कुठल्याही प्रकारच्या आजारावर सांगोवांगीच्या उपचारांना, वाचलेल्या, ऐकलेल्या किंवा प्रत्यक्ष बघितलेल्या अनुभवांना आधार बनवून स्वतःच उपचार करू नये. तज्ञ व अधिकारी व्यक्तीचा सल्ला पूर्ण खात्री करून अमलात आणावा. या लेखात उल्लेखीत उपचार वाचकाने स्वतःवर केल्यास होणार्‍या बर्‍या-वाईट परिणामास लेखक जबाबदार नाही याची कृपया नोंद घ्यावी.


(सर्व चित्रे आंतरजालावरून साभार)

७. अवांतरः घरच्या देवाला वाहायला म्हणून अख्ख्या गावाची फुले हिंस्त्र पद्धतीने ओरबाडून नेणार्‍या, आमच्या फुलांनी डवरलेल्या लांबच लांब सुंदर गल्लीची सकाळी ७च्या आत वाट लावणार्‍या, आम्ही राबून जणू त्यांच्यासाठीच फुले उगवतो असे बिंदास समजणार्‍या, कितीही ओरडले तरी ढिम्म न बधणार्‍या 'ज्येष्ठ नागरिक' देवभक्तांना गोळ्या घालायचा परवाना कुठे मिळेल?

प्रतिक्रिया

१)अंजिर चित्र १तुमचे वाटतंय आणि झाड चित्र २जालावरचे ?
२)चित्र २ मधले उंबराचे असावे आणि तसले झाड तुमच्या फाटकात असावे कारण हेच वारेमाप वाढते. फांद्या तोडल्यास त्यातून पाणी आणि चीक निघतो. याच्या {आणि पळसाच्या} वाळलेल्या काटक्या होमाकरिता समिधा म्हणून वापरतात.

3)अंजिर आणि उंबर एका वर्गातली FICUS झाडे आहेत.
४)चाई: हा बुरशिजन्य रोग आहे. केसांचे मूळ याने मरत नाही पण वरचा केस मरतो. काही औषधाने ही बुरशि मारता आली तर केस पुन्हा येतात. [टक्कल पडते तेव्हा केसाचे मूळ जाते म्हणून केस येत नाहीत हा टक्कल आणि चाईत फरक आहे]
५)अलोपथिक अॅंटिबॉयटिक जंतू मारतात पण बुरशी नाही
६)तांबे ,पारा यांचे क्षार बुरशी मारतात ,'जमालगोटा' यानेही झटपट काम होते परंतू डोळ्यात गेल्यास कायमचे जातात बंदी आहे.
७)उंबराचा वडाचा चीक विषारी नाही आणि बुरशी प्रत्यक्ष भारत नाही परंतू बुरशीस जखडून ठेवतो आणि औषधासारखा अप्रत्यक्ष indirectly काम करतो।
८)बरीच औषधे आजीबाईचा बटवा छाप गुणकारी असली तरी त्याचे मेडिकल क्लेमचे बिल मिळत नाही म्हणून दुर्लक्षित आहेत .

संदीप डांगे's picture

30 Mar 2015 - 10:46 pm | संदीप डांगे

चित्र क्र. १ मधे दाखवलेलं फळ आमच्या झाडाला येतं. त्यालाच अंजीर म्हणतात. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे चित्र क्र २ मधलेच झाड असावे. फक्त ते आम्ही ६ फूटांवर वाढू देत नाही इतकेच. बाकी त्याची वाढ राक्षसी आहेच.

उर्वरीत प्रतिसादाबद्दल धन्यवाद! माहितीत भर पडली...

तुमच्याकडे अंजिर आहे की उंबर?उंबराच्या चिकाचे प्रयोग ऐकण्यात आहेत.असंच कच्च्या पपईच्या चिकाने त्वचारोग बरे करण्याबाबत वाचले होते.

संदीप डांगे's picture

30 Mar 2015 - 11:06 pm | संदीप डांगे

साधारण चार प्रकारचे अंजीर असतात. उंबर वेगळे की याच चार मधे येतं ते काही माहीत नाही. आमच्याकडे अंजीरच आहे. चित्र क्र. १ मधे दाखवलेलं फळ त्याला येतं. अर्थात चित्रात ते कच्चं आहे. तसंही त्याला पिकायला आणि खाण्यालायक व्ह्यायला खूप वेळ लागतो. आणि आमच्या तोंडी पडण्याआधीच पक्षी त्याचा फडशा उडवतात. त्याचा आम्हाला आनंदच आहे, त्यामुळे खूप सारे पक्षी बघायला मिळतात. अंजीर आम्ही काय बाजारातून विकत आणून खाऊ शकतो.

पपईच्या चिकाच्या त्वचारोगावरील उपायाबद्दल प्रथमच ऐकलं. आपल्या परसबागेतल्या झाडांपासूनच कित्येक गुणकारक औषधी मिळू शकतात. जुन्या पिढीकढून आदरपुर्वक ज्ञान संकलीत केले तर कदाचित साध्या साध्या आजारपणासाठी उठसूठ डॉक्टरांकडे जायची गरज पडणार नाही. किंवा भविष्यात हेच फुकट ज्ञान आपल्याला पतंजलिसारख्यांकडून दामदुपटीने विकत घ्यायला लागेल.

पिकलेलं फळः
gg

कंजूस's picture

31 Mar 2015 - 12:05 am | कंजूस

दोघांच्या पानांचा आकार पूर्णपणे वेगळा असतो. अंजिर सासवड ,निरा या कमी पावसाच्या प्रदेशात चांगले येते.

साती's picture

27 Mar 2015 - 10:33 am | साती

संदीप, तुम्ही चित्रात दाखविलेला आजार चाई म्हणजे अ‍ॅलोपॅशिया एरिआटा. हा एक आटोइम्यूनो आजार आहे.
म्हणजे आपल्याच पांढर्‍या पेशी आपल्याच एखाद्या दुसर्‍या पेशीला (इथे केसांच्या मूळातल्या पेशी) शत्रू समजून मारत सुटतात.
बर्‍याचदा हेअर फॉलिकबरोबरच इतर कुठल्या अवयवाच्या पेशीही असतात उदा. अ‍ॅलिपेशीया एरियाटा विथ थायरॉडाईटिस.
हा आजार बर्‍याचदा लहान मुलांत दिसतो.
खरे तर हा आजार ९० टक्के वेळा सेल्फ लिमिटींग म्हणजे आपोआप बरा होणारा असतो. पण तीन महिने ते किती वर्षे इतका वेळ लागेल हे प्रेडिक्ट करता येत नाही.

वर कंजूष यांनी म्हटल्याप्रमाणे फंगल(बुरशी) इन्फेक्शन होऊनही केस जातात पण ते असे दिसत नाहीत. तो प्रकार वेगळा.
मॉडर्न मेडिसीनमध्ये एकसोएक अँटीफंगल औषधेही आहेत. ;)

तर या आजारात बर्‍याचदा रिअ‍ॅश्युरंस की काही काळाने तुमचे केस आपोआप परत येतील हीच महत्वाची ट्रीटमेंट. जेव्हा इतर पेशीही इनवॉल्व असतात तेव्हा सिस्टीमिक स्टिरॉईड्स देतात. म्हणजे पूर्ण शरीरावर काम करणारी आणि या अतोशहाण्या पांढर्‍यापेशींचे काम कमी करणारी औषधे.
ज्यावेळी केवळ हेअर फॉलिकलचाच आजार असतो तेव्हा पूर्ण शरीराला या स्टिरॉईडच्या दुष्परीणामाला सामोरं जायला नको म्हणून लोकल (ट्रॉपिकल) स्टिरॉईडस देतात. डायरेक्ट डोक्यावरच्या त्वचेत, स्काल्पमध्ये टोचतात.
किंवा वरून लावायला देतात.

आता तुमच्या प्रश्नाची उत्तरे-
१.असे सल्ले सोपे असतात का?
तर नाही. नक्की काय आजार आहे, इतर पेशी इनॉल्व आहेत का , पेशंटचे वय काय यानुसार औषधे बदलतात.
उदा. ताप आला क्रोसिन घ्या, हे अ‍ॅलोपथिक औषधांच्या इरॅशनल यूजचे उदाहरण झाले. ताप का आला, आणखी काय लक्षणे आहेत, इतर काही उपाययोजना लागणार का , पेशंटच्या लिंग-वया-वजनानुसार पॅरासिटेमॉलचा डोस काय असावा हे रॅशनल युजचे.

२. हा सल्ला आजीबाईचा बटवा छाप वाटतो हे खरंय पण अश्या सल्ल्यांतूनच त्यात्या झाडाच्या औषधातून, किंवा त्या त्या संयुगातील उपयुक्त इलेमेंट सेपरेट करून अनेक अ‍ॅलोपथिक औषधे बनलीत.

३. हा सोप्पा प्रश्न आहे. आजार बरा होणारा नाही यापेक्षा आम्ही या आजारावर सध्या या घडीला इतकी औषधे आहेत आणि भविष्यात ट्राईड अँड टेस्टेड औषधे येऊ शकतात असे सांगतो. उदा. हिपॅटायटिस बी सारखे आजार. पूर्वी फक्त लिवर डॅमेज वाढू नये म्हणून औषधे दिली जात. आता हिपॅटायटिस बीचा व्हायरसच मारू शकेल अशी औषधे उपलब्ध झाली आहेत.

४.याचे उत्तर मी दिलेले आहे वर.
५. सदसदविवेकबुद्धी.
६. अ‍ॅलोपथित असे सतत जून्या ट्रॅडिशनल औषधांपासून उपयुक्त तत्वंवेगळे करणे, त्याच्या मूलधर्माचा अभ्यास करणे, त्याच्या क्लिनिकक ट्रायल करणे, त्याचा डोस आणि साईड इफेक्ट निश्चित करणे हे चालूच असते.
कित्येक औषधे या प्रकारे शोधण्यात होऊन विकसित झाली आहेत.
अंजीत उंबराच्या चिकातील अल्कलॉईड मध्येही स्टिरॉईडस असू शकतात. पण आता केमिकल प्रोसेसने स्वस्तात आणि प्रिसाईज मात्रा असलेली स्टिरॉईडची गोळ्या इंजेक्शने बनवता येतात म्हणून या प्रोसेसकडे फार्मा कंपन्यावाले लोक लक्ष देत नसतील.
७. हे मला माहित नाही. आमची कण्हेर आणि तगर हे जे ना असेच ओरबाडत.
आता सकाळीच सडारांगोळीच्या निमित्ताने आमच्या घरातील तीनपैकी एकजण बाहेर उभी राहते, उन वाढेपर्यंत. त्यामुळे कुणी फुलं ओरबाडायला आलं की आम्ही शब्दं झाडतो, गोळ्या नाही.

संदीप डांगे's picture

31 Mar 2015 - 12:04 am | संदीप डांगे

तुमचा सविस्तर प्रतिसाद खरंच बहुमोल आहे. माझ्या प्रश्नांची समर्पक उत्तरे मिळालीत.

अ‍ॅलोपथित असे सतत जून्या ट्रॅडिशनल औषधांपासून उपयुक्त तत्वंवेगळे करणे, त्याच्या मूलधर्माचा अभ्यास करणे, त्याच्या क्लिनिकक ट्रायल करणे, त्याचा डोस आणि साईड इफेक्ट निश्चित करणे हे चालूच असते.
कित्येक औषधे या प्रकारे शोधण्यात होऊन विकसित झाली आहेत.

हे जर होतंय तर चांगलंय.

पण माझा रोख आजीबाईचा बटवाछाप औषधे जी कुठल्याही गुंतागुंतीशिवाय वापरायला सहज सोपी असणारी जी असतात ज्यात डॉक्टर अथवा वैद्यकीय व्यावसायिकाचा सल्ला घेण्याची गरज नसते अशा औषधांच्या प्रमाणिकरणाकडे होता. उदा. जखम झाल्यावर हळद लावणे. कुठल्या जखमेवर कशी, किती हळद लावावी, लावावी का नको याबद्दल संशोधन करून सामान्य जनतेस खुले केल्यास फार बरे. पण मग बँडेड सारख्या उत्पादनांचा खप बंद होऊन जाईल. मागे एकेठीकाणी एका विदेशी संकेतस्थळावर जखमेसाठी हळदीच्या वापराबद्दल सांगतांना स्वयंपाकघरातली हळद न वापरता शुद्ध केलेली "पेश्शल" हळद वापरण्यासंबंधी सुचवले होते. म्हणजे अशा साध्यासोप्या फुकट उपायांमधे जनजागृती होऊ लागल्यास आपला धंदा चालावा म्हणून पेश्शल टाईप घरगुती औषधे वापरा असे काही उलट प्रचार जनतेला संभ्रमित करू शकतात.

२६ जुलैच्या पावसात माझ्या उजव्या पावलात काचेचा फुटका कप मधोमध घुसला होता. अंदाजे एक ते दिड इंच खोल आणि ३ इंच रूंद जखम झाली. त्यावेळेस होस्टेलवर होतो. गळयापर्यंत पाणी चढले होते. अशा स्थितीत मोठ्यात मोठी उपलब्ध वैद्यकीय मदत म्हणजे होस्टेलचा फस्ट-एड बॉक्स. टींक्चर आयोडिन का काय लावले. ३६ तास पाय हलवता येत नव्हता की जमीनीवर ठेवता आला नाही. मी उभाही राहू शकत नव्हतो कारण पाय सरळ केला की प्रचंड मरणाच्या कळा यायच्या. हो-नाही करता करता ३६ तासांनी जखम स्वच्छ करून त्यात भरगच्च हळद भरली. अर्ध्या तासात मी पायाला फडके गुंडाळून हिंडायला लागलो. माझ्यासाठी हा चमत्कार होता. तिसर्‍या-चौथ्या दिवशी पाणी ओसरल्यावर डॉककडे जाऊन टीटॅनसचे इंजेक्षन घेऊन आलो. कारण मांडीएवढ्या पाण्यातून उघड्या जखमेसह मित्रांनी १००० फूटांवरून होस्टेलपर्यंत उचलून आणले. पाण्यात वजन हलके होते म्हणून हलकटांनी मला पाण्यात ठेवूनच उचलत उचलत आणले. (ते होते म्हणून वाचलो, त्यांचे उपकार आहेतच) एखादी स्कॉर्पीओ भर्रकन गेली की आमची मुंबई अक्खी पाण्याखाली जायची. असो.

१०-१२ दिवसात जखम भरली कुठल्याही इतर मदतीशिवाय. पण माझ्यामते हे लक-बाय-चान्स असू शकते. जखम चिघळली असती तर डॉक्टरांशिवाय पर्याय नव्हताच अर्थात. मात्र असे अनुभव आले की वाटते यात खात्रीलायक संशोधन झाले पाहिजे.

सुबोध खरे's picture

31 Mar 2015 - 10:21 am | सुबोध खरे

डांगे साहेब
हळद हि तुमच्या रोजच्या मसाल्याच्या डब्यातील नको तर हळदीच्या साठवणीच्या डब्यातील हवी.
याचे कारण मसाल्याच्या डब्यातील हळदीत तिखट किंवा इतर मसाल्याचे बारीक प्रमाणात मिश्रण झालेले असते.( बर्याच वेळेस सगळ्याला मिळून चमचा एकच असतो) यामुळे जखमेची आग/ जळजळ होण्याची शक्यता असते.अशा बर्याच घरगुती औषधांचे उपयोग हे अनुभवाने माहित झालेले आहेत. त्याचे शास्त्रीय विश्लेषण आता उपलब्ध होत आहे. अशा सर्व औषधांचे उपयोग आणि त्याचे शास्त्रीय विश्लेषण याचे संकलन करायला पाहिजे. (आळशीपणामुळे ते जमलेले नाही.) एक विचार आला कि असा एक एक पदार्थ घेऊन मिपावर आठवड्याला एक असे त्याचे औषधी गुणधर्म याचे त्रोटक लेख टाकता येईल काय?

संदीप डांगे's picture

31 Mar 2015 - 11:27 am | संदीप डांगे

डॉक्टरसाहेब, तुम्ही म्हणताय तसंच माझ्यामते आपण लोक साठवणीच्या डब्यातलीच हळद वापरतो. पण नविन पिढी काही चुकिच्या प्रचारामुळे संभ्रमित होऊ शकते असं मला वाटतं.

एक एक पदार्थ घेऊन मिपावर आठवड्याला एक असे त्याचे औषधी गुणधर्म याचे त्रोटक लेख टाकता येईल काय?

हे अतिशय उत्तम आणि आवश्यक. खरंच करा तुम्ही. मिपावर तरी एक डेटाबेस तयार होईल यानिमित्ताने. जुन्या पण उपयोगी ज्ञानाची उजळणी होईल. यानिमित्ताने अनेकांना त्यांच्या आजी-आजोबांकडून मिळालेल्या उपयुक्त ज्ञानकणांना इथे मांडता येइल. त्यावर चर्चा करता येइल. तुमच्या प्रस्तावाला आणि उपक्रमाला माझ्याकडून १००% अनुमोदन व शुभेच्छा.

अत्रन्गि पाउस's picture

31 Mar 2015 - 1:57 pm | अत्रन्गि पाउस

हळद निरुपयोगी आहे असे आमचे डॉक्टर म्हणाले ... झाले असे कि मध्यंतरी पायाच्या बोटाचे नख दरवाजाला लागून उचकटले जाऊन अर्धे तुटले ...त्यावर हळद दाबून (साठवणीतील) रक्तस्राव थांबवला व ओळखीच्या सर्जन कडे दाखवले ..त्यावर 'हे असले' उपाय करण्याबद्दल आम्हाला सौम्य समज देण्यात आली

आयुर्हित's picture

31 Mar 2015 - 3:26 pm | आयुर्हित

कदाचित खरे असावे, कारण त्याने त्या (so called) डॉक्टरला पैसे मिळत नाहीत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Mar 2015 - 3:32 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कैच्या कै. हळद जंतुनाशक आहे तर जखमेवर लावायला काय हरकत आहे?

संदीप डांगे's picture

31 Mar 2015 - 6:05 pm | संदीप डांगे

'हे असले' उपाय करण्याबद्दल आम्हाला सौम्य समज देण्यात आली
>>> अशी समज देण्यात येते तेव्हा घरगुती औषधांचा अनुभव खरा का एमडी सांगतो ते खरं असा सामान्य लोकांचा गोंधळ होऊ शकतो. पण मासळी औषधीच्या मागचं लॉजिक तपासणारे अशा एमडींना मात्र कसलंही लॉजिकचं आव्हान देत नाहीत असं निरिक्षण आहे.

शशिका॑त गराडे's picture

27 Mar 2015 - 10:41 am | शशिका॑त गराडे

तुमच्याकडे अंजिर आहे की उंबर?

चाई (Alopecia Areata ) हा आजार कसा उदभवतो ?

सुनील's picture

27 Mar 2015 - 10:46 am | सुनील

चिकूदेखिल देठापासून तोडताना असाच चीक येतो. त्याचेही काही गुण असतील काय?

उंबर अथवा अंजिर त्याच्या चिकाने एखादा रोग जात असेल तर स्टिअरॉइडसपेक्षा नक्कीच बरे. चार दिवस करायला काहीच हरकत नसावी. डोक्यावरचे केस जाणे आणि परत येणे असा जो काही रोग आहे त्यात केसांची मुळे जात नसावीत एवढेच मला म्हणायचे आहे.

घरच्या देवाला वाहायला म्हणून अख्ख्या गावाची फुले हिंस्त्र पद्धतीने ओरबाडून नेणार्‍या, आमच्या फुलांनी डवरलेल्या लांबच लांब सुंदर गल्लीची सकाळी ७च्या आत वाट लावणार्‍या, आम्ही राबून जणू त्यांच्यासाठीच फुले उगवतो असे बिंदास समजणार्‍या, कितीही ओरडले तरी ढिम्म न बधणार्‍या 'ज्येष्ठ नागरिक' देवभक्तांना गोळ्या घालायचा परवाना कुठे मिळेल?

सरकारकडे खरेच जनहित याचिका दाखल करावयास हवी याबद्दल.

तिमा's picture

27 Mar 2015 - 2:31 pm | तिमा

गोळ्या घालण्याची जरुर नाही. जमालगोटा द्या त्यांना!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Mar 2015 - 2:36 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्या एकाच्च कारणासाठी सकाळी अंगणामधे आमचा कुत्रा मोकळा सोडलेला असतो. कॅल्शिअम ला वेगळा खर्च करावा लागत नै आणि फुलं आणि झाडही वाचतात. दुहेरी फायदा. =))

खाजकुली पसरुन ठेवायची झाडांवर.

मग खर्‍याने देव आठवेल!!

संदीप डांगे's picture

31 Mar 2015 - 12:05 am | संदीप डांगे

हे लय भारी... :-)

बॅटमॅन's picture

31 Mar 2015 - 2:06 pm | बॅटमॅन

हाण तेजायला. तसे केल्यास अंगची स्पंदने स्फुंदून स्फुंदून बाहेर पडतील.

अशी चाई झालेली एक स्त्री मी पाहिली होती ! { नक्की तिला कोणता रोग झाला होता ते माहित नाही } पण डोक्याचा पार चमन गोटा झाला होता ! मी पहिल्यांदा पाहिले तेव्हा जरा घाबरलो होतो...कारण टकलु बाई कधीच पाहिली नव्हती !
पण मध्यंतरी त्याच दुकानात { दुकान मालकाची बायडी आहे ती } गेलो होतो तेव्हा घनदाट केश संभार घेउन ती उभी होती ! मला उगाच वाटले कोणी तरी दुसरी असेल, पण ती तीच होती.
असो... या चाईच्या रोगावर जास्वंदाचे फुल आणि पाने मिक्सर मधे ग्राइंड करुन त्याचा रस डोक्याला लावल्यास डोक्यावर केस उगवतात असे ऐकुन आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- लुटा तुम्ही ऐवज इष्काचा... ;) { Bugadi Maazi Sandali Ga }

प्रकाश घाटपांडे's picture

31 Mar 2015 - 10:13 am | प्रकाश घाटपांडे

लहानपणी आमच्या शेतात एक माणुस यायचा व वेली एरंडचा चीक प्यायचा. त्याच्या मते ते पोटासाठी उत्तम असते. आम्ही त्या एरंडाच्या चीकाचा हवेत फुगे सोडण्यासाठी वापर करीत असे. लिंबाच्या काडीने एक गोल बनवायचा व तो चिकात बुडवून फुगे सोडायचे. तो चीक मी चाटून ही पाहिला होता. तुरट चव होती.

तुषार काळभोर's picture

31 Mar 2015 - 4:27 pm | तुषार काळभोर

आम्ही त्या एरंडाच्या चीकाचा हवेत फुगे सोडण्यासाठी वापर करीत असे. लिंबाच्या काडीने एक गोल बनवायचा व तो चिकात बुडवून फुगे सोडायचे. हे अस्सेच्या अस्से आम्ही पण करायचो. आम्ही त्याला "मोगली एरंड" म्हणायचो.

प्रकाश घाटपांडे's picture

31 Mar 2015 - 12:56 pm | प्रकाश घाटपांडे

अवांतरातील जेना. सर्वत्र आढळतात. काठी किंवा छत्रीचा आकडा हा फुल ओरबाडायला उपयोगी येतो. त्यांना म्हटल पाहिजे कि आजोबा तुमच्या देवाला चोरलेली फुल चालतात का?
तरीपण दुर्लक्ष कराव अशा गोष्टींकडे. त्यांच्या मेंदुतील रचनेप्रमाणे ते वागतात. त्यांना यात गैर काहि वाटत नाही. याबात काही ज्येना आपल्या जेष्ठ नागरीकत्वाच भांडवल करतात.

सविता००१'s picture

31 Mar 2015 - 2:17 pm | सविता००१

हे माझी आजीकायम इतरांना विचारायची की तुमच्या देवाला चोरलेली फुल चालतात का?
तर बरेच लोक ती नाहीये अंगणात असं पाहून पहाटेच फुलं चोरून न्यायचे आणि एका बाईंनी आजीला सांगितलं की हो. आम्ही नेतो फुलं इतरांच्या बागेतली कारण तुम्हाला काही रोज तेवढी लागणार नाहीत आणि आपल्या धर्मातच लिहून ठेवलंय की देवासाठी फुलं घेतली तर ती चोरी नाही म्हणून. :(

मला माझ्या आजीचा चेहरा अजून आठवतोय. एवढी चिडली होती की तिला काही बोलता आलं नाही. नंतर माझी आईच म्हणाली की निदान आमची झाडं तरी ओरबाडू नका...

उपयोग शून्य.
:(

असंका's picture

31 Mar 2015 - 2:47 pm | असंका

:-(

काळा पहाड's picture

31 Mar 2015 - 2:50 pm | काळा पहाड

७. अवांतरः घरच्या देवाला वाहायला म्हणून अख्ख्या गावाची फुले हिंस्त्र पद्धतीने ओरबाडून नेणार्‍या, आमच्या फुलांनी डवरलेल्या लांबच लांब सुंदर गल्लीची सकाळी ७च्या आत वाट लावणार्‍या, आम्ही राबून जणू त्यांच्यासाठीच फुले उगवतो असे बिंदास समजणार्‍या, कितीही ओरडले तरी ढिम्म न बधणार्‍या 'ज्येष्ठ नागरिक' देवभक्तांना गोळ्या घालायचा परवाना कुठे मिळेल?

तिथे एक "कुत्र्यापासून सावध रहा चा बोर्ड आणि त्यावर एका हिंस्त्र कुत्र्याचं चित्र" लावा. एक पिसाळलेल्या कुत्र्याची कॅसेट रेकॉर्ड करून सकाळी पाच पासून लावत जा. बाकीचे सल्ले विकत मिळतील.

दुसर्‍या बाजूला त्याच रोगावर खात्रीलायक आणि सिद्ध झालेले उपचार पारंपारिक पद्धतीमधे आढळून येतात. (ऐकीव माहिती. उदा. दम्यावर मासळीतून औषध घेणे, वैगेरे वैगेरे)

:)

स्वप्नांची राणी's picture

31 Mar 2015 - 4:15 pm | स्वप्नांची राणी

"उदा. दम्यावर मासळीतून औषध घेणे, वैगेरे वैगेरे"

हा एक प्रकार मला कध्धीच कळलेला नाहिये. दमा किंवा अस्थमा म्हणजे फुप्फुसांचे इन्फेक्शन. म्हणजे श्वासनलिकेला सुज. म्हणजेच श्वास घेणे त्रासदायक होते, असा आजार. नॉर्मली कसल्या न कसल्या अ‍ॅलर्जी मुळे. पण जे औषध दिले जाते, म्हण्जे तेच हो, छोटा मासा काहीतरी हळदीसारख दिसणार्‍या पेस्ट मधून पटकन गिळायला देतात. आता हा मासा कितीही फडफडत गेला तरी तो जाणार अन्ननलीकेमधून. मग त्यामुळे श्वासनलीकेचा आजार किंवा सुज कशी काय बरी होणार??

की माझं काहीतरी लॉजिक चुकतय..??

खात्रीलायक आणि सिद्ध झालेल्या उपायांवर तुम्ही कसले प्रश्न करताय? भारतीय औषधांचा अन परंपरांचा अभिमानच नाही. छ्या..!! हज्जारो लोक दुरुन दुरुन येऊन घेतात मासळी. ती पण पौर्णिमेच्या रात्री. सायन्स आहे त्यामागे.

उगीच नस्त्या शंका.

स्वप्नांची राणी's picture

31 Mar 2015 - 4:25 pm | स्वप्नांची राणी

सॉरी सॉरी...कान पकडले बाबा!!

संदीप डांगे's picture

31 Mar 2015 - 7:42 pm | संदीप डांगे

@गवि,
कुत्सित पद्धतीने भारतीय औषधांचा उल्लेख करण्याचे प्रयोजन कळले नाही. जरा विस्तार कराल काय?

असो.

ह्या मासळी उद्योगाबद्दल जेवढे ऐकले, वाचले, पाहिले त्या बातम्यांमधे खालील बाबींवरच जास्त लक्ष दिले आहे.
१. ते कुटूंब ती औषधी 'गुप्त' ठेवते.
२. त्यांना तो फॉरमुला कुणा संताकडून मिळाला.
३. हा प्लासिबो ईफेक्ट आहे. (सगळी पौर्वात्य, मॉडर्न मेडिसीनच्या बाहेरची औषधे प्लासिबोवालीच कशी असतात?)
४. लाखो भारतीय लोक यावर (मूर्खांसारखा) विश्वास ठेवतात.
५. सामान्य नागरिकांचे तोंड वासलेले विचित्र फोटो टाकून एकंदर प्रकाराबद्दल घृणा निर्माण करण्याचा प्रयत्न करणे.

पण कुणी ह्या हजारो रुग्णांवर लक्ष ठेवून काही सांख्यिकी बनवली आहे काय? अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्टाईलने दम्याचे १०० रूग्ण नेऊन ते मासळी औषध बरे करू शकले नाही असे काही सिद्ध केले आहे काय?
अशी सांख्यिकी तयार करणे शक्य नाही असं कुठेतरी वाचलं का तर म्हणे रुग्णांची प्रचंड संख्या वैगेरे.
तो 'गुप्त फॉर्म्युला' मिळवण्यावरच सगळा भर आहे. रुग्णांच्या बरे होण्याच्या प्रमाणावर अधिक संशोधन करण्यावर नाही असेच दिसते. तमाम विरोधी डॉक्टर नकारात्मक पद्धतीने यावर प्रतिक्रिया देतात कारण त्यांचे व्यवसाय चालणार नाहीत म्हणून, असे काही आहे का? मॉडर्न मेडीसिनवाले आपले फॉर्मुले जगजाहीर करतात काय?

यातले खरे खोटे नक्की कशा पद्धतीने बाहेर येइल?

सोबत एक नवीन प्रश्नः कुठल्याही रोगावर कुठल्याही पॅथीअंतर्गत केलेले उपचार सर्व रुग्णांवर १००% परिणाम देतात का? जर तसे नसेल तर त्याला शास्त्र का म्हणावे? इथे पॅथींची भांडणे सुरु करण्याचा उद्देश नाही पण एकंदरीतच सगळ्या पॅथीवाले इतरांना नीम-हकिम म्हणत असतात त्याबद्दल जरा कुतुहल आहे.

आयडीयाची कल्पना: प्लासिबो नावाचीच एखादी पॅथी सुरु करता येइल काय?

प्रकाश घाटपांडे's picture

1 Apr 2015 - 8:03 pm | प्रकाश घाटपांडे

या पुर्वी आंजावर याची भरपूर चर्चा झाली आहे. होमिओपॅथी ला प्लासिबो इफेक्ट असे म्हटले जाते.
http://mr.upakram.org/node/2651 होमिओपॆथी एक थोतांड
http://mr.upakram.org/node/2660 प्लासिबो
http://www.mr.upakram.org/node/820 बाराक्षार पद्धती
http://mr.upakram.org/node/2408 होमिओपॆथी वैयक्तिक अनुभव
http://misalpav.com/node/15374 साखरगोळ्या
http://misalpav.com/node/7514 डॊक्टर
http://www.maayboli.com/node/42681 होमिओपॆथी आणि पेन-किलर्स

माझा प्रवास हे डॉ.शंतनु अभ्यंकर यांचे या विषयावर पुस्तक प्रकाशित झाले आहे.त्यांचा होमिओपॅथी ते अ‍ॅलोपॅथी असा शैक्षणिक प्रवास झाला आहे. लेखक व प्रकाशक डॉ शंतनु अभ्यंकर, मॉडर्न क्लिनिक ब्राह्मणपुरी मु.पो. ता.वाई जि. सातारा फोन नं ९८२२०१०३४९, किंमत- १२० रु. अंनिस वार्तापत्र एप्रिल २०१४ मधे पुस्तकाचा परिचय आला आहे

संदीप डांगे's picture

1 Apr 2015 - 10:17 pm | संदीप डांगे

दुव्यांबद्दल धन्यवाद. होमीपदीची चर्चा रोचक आहे.

अशीच चर्चा मॉडर्न मेडीसीनमधल्या प्लासिबोबद्दल आहे का? कारण आधुनिक पाश्चात्त्य वैद्यकशास्त्र सोडून सगळ्या दुय्यम, अल्टरनेटीव व प्लासिबो थेरेपीज आहेत असे मानलं जातं. भले त्यांचे कितीही लाभधारक रुग्ण असले तरी.

मॉडर्न मेडीसिनमधल्या लांड्यालबाड्यांबद्दल बोलायला लागलं की वैयक्तिकरित्या संबंधित डॉक्टरांवर ढकललं जातं असा अनुभव आहे. म्हणजे मॉडर्न मेडिसिनमधली चूक किंवा बनाव हा संबंधित डॉक्टरच्या प्रामाणिकपणावर किंवा बुद्धीमत्तेवर प्रश्न उठवून त्याला संबंधित डॉक्टर जबाबदार आहे, पॅथी नाही असा ज्योतिषीटाईप बचाव केल्या जातो. अशी मुभा इतर पॅथींना मिळत नाही.

मॉडर्न मेडीसिनवाल्यांना इतर पॅथीज ह्या कायम संशयास्पद, फसवणूक करणार्‍या, खोट्या, नियमबाह्य अशाच का वाटतात? म्हणजे मनुष्याच्या शरीराच्या सगळया क्रियांचं, सगळ्या रोगांच ज्ञान आपल्याला झालं तसंच असतं हा प्रचंड आत्मविश्वास्/अंधश्रद्धा कुठून येते? त्यावर इतरांनाही काही वेगळं जाणवू शकतं, मिळू शकतं असा सहिष्णू विचार का नसतो?

माझं काही चुकत असेल तर मार्गदर्शन करावं.

मराठी_माणूस's picture

6 Apr 2015 - 10:49 am | मराठी_माणूस

मॉडर्न मेडीसिनवाल्यांना इतर पॅथीज ह्या कायम संशयास्पद, फसवणूक करणार्‍या, खोट्या, नियमबाह्य अशाच का वाटतात?

कारण इतर पॅथीज ज्या तुलनेने कमी खर्चिक आहेत , त्या जर लोकप्रिय झाल्या तर ज्यांचे स्टेक्स मॉडर्न मेडीसिन मध्ये आहेत , त्यांची धाबी दणाणतील.

मॉडर्न मेडीसिनवाल्यांना इतर पॅथीज ह्या कायम संशयास्पद, फसवणूक करणार्‍या, खोट्या, नियमबाह्य अशाच का वाटतात? म्हणजे मनुष्याच्या शरीराच्या सगळया क्रियांचं, सगळ्या रोगांच ज्ञान आपल्याला झालं तसंच असतं हा प्रचंड आत्मविश्वास्/अंधश्रद्धा कुठून येते? त्यावर इतरांनाही काही वेगळं जाणवू शकतं, मिळू शकतं असा सहिष्णू विचार का नसतो? >>>>>>
आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये (किंवा कोणत्याही आधुनिक शास्त्राम्ध्ये, फॉर दॅट मॅटर), एखादी गोष्ट कार्यकारणभावासहीत मुळापासून ते एण्ड रिजल्टपर्यंत विश्लेषण केली जाऊ शकते. व हे विश्लेषण दॄश्यात्मक स्वरुपात प्रयोगशाळेत सिद्ध केले जाऊ शकते.

मॉडर्न मेडीसिनवाल्यांना इतर पॅथीज ह्या कायम संशयास्पद, फसवणूक करणार्‍या, खोट्या, नियमबाह्य अशाच का वाटतात?>>>>>
कारण या इतर पॅथीज असे दॄश्यात्मक विश्लेषण बर्‍याचदा दाखवू शकत नाहीत. ते गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्रच्या नियमांत सिद्ध करून दाखवता येत नाही.

म्हणजे मनुष्याच्या शरीराच्या सगळया क्रियांचं, सगळ्या रोगांच ज्ञान आपल्याला झालं तसंच असतं हा प्रचंड आत्मविश्वास्/अंधश्रद्धा कुठून येते?>>>
प्रचंड अभ्यास, संशोधन व त्या संशोधनाचे दॄश्यात्मक स्वरुपात वा गणिती/भौतिकी/रासयनिक सुत्रांवर आधारित दिसणारे रिजल्ट्स यातून.

वरती एका ठिकाणी असं लिहिलंय की मॉडर्न मेडीसीनचा भर 'त्या' औषधातील घटक शोधून काढण्यावर असतो. असू द्या की! त्या बाजरू कंपन्या आहेत, त्यांना नफा कमवायचाय. त्या स्वतः संशोधन करून प्रचंड पैसा व साधनसंपत्ति खर्च करून औषधे तयार करतात व त्यावर नफा कमवता यावा म्हणून पेटंट घेतात. जर पर्यायी उपचार पद्धतीमधील कोणी मोफत उपचार करू इच्छित असेल, तर त्यांना त्यांचा फॉर्म्युला उघड करायला काय प्रॉब्लेम आहे? दुसरे त्या फॉर्म्युलावरून औषध तयार करून नफा कमवतील हा? पण त्यामुळे ते औषध हजारपट अधिक लोकांना उपल्ब्ध होऊ शकेल (फुकट नसले तरी). काही कोटी लोकांना विकत मिळणारे औषध (ज्यावर संशोधन केलं गेलंय ते) जास्त फायदेशीर की काही लाख लोकांना फुकट मिळणारे(ज्याचा स्रोत, वैधता इ कशाचीही खातरजमा झालेली नाही)ते?

<वरील मते ही माझी वैयक्तिक मते असून थोडा कॉमन सेन्स व जनरल नॉलेजवरून बनलेली आहेत. माझा आज भांडायचा अजिबात मूड नसल्याने आज मी प्रति-प्रति-वाद करेलच असे नाही. करणारच नाही, असेही नाही)

संदीप डांगे's picture

6 Apr 2015 - 5:12 pm | संदीप डांगे

आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये (किंवा कोणत्याही आधुनिक शास्त्राम्ध्ये, फॉर दॅट मॅटर), एखादी गोष्ट कार्यकारणभावासहीत मुळापासून ते एण्ड रिजल्टपर्यंत विश्लेषण केली जाऊ शकते. व हे विश्लेषण दॄश्यात्मक स्वरुपात प्रयोगशाळेत सिद्ध केले जाऊ शकते.

>> माझ्या माहितीप्रमाणे आधुनिक शास्त्रांमधे प्रयोगाधारित 'मान्यता' असतात, ह्या मान्यता म्हणजेच सत्य आहे असा आग्रह नसतो. त्या मान्यता 'इतरांनी आपापल्या पद्धतीने तपासून एकसारखे निष्कर्ष येतात का' या प्रयोगासाठी उपलब्ध असतात. कालांतराने नवीन प्रयोगांतून त्या मान्यतेबद्दल अधिक संशोधन होऊन ती मान्यता कुठले निकष पुर्ण करू शकत नसेल तर मागे पडते आणि नविन मान्यता प्रस्थापित होते. तेव्हा आधुनिक शास्त्र जे म्हणतं ते सार्वकालिक सत्यच असतं असा दावा खुद्द आधुनिक शास्त्रज्ञ करत नाहीत.

समजा उदा. एखादे औषध डोकेदुखीवर रामबाण आहे म्हणून प्रयोगशाळेत सर्वप्रकारे सिद्ध केले. तरी त्या औषधाच्या सर्व प्रकारच्या धोक्याचा अभ्यास झाला आहे असा दावा ती कंपनी कधीच करू शकत नाही. फक्त आंतरराष्ट्रीय संघटना अथवा नियंत्रक समितीने निर्दिष्ट केलेल्या चाचण्या पार पाडून ते औषध मानवी सेवनासाठी योग्य आहे असे प्रमाणपत्र मिळवून बाजारात विकायला येते. आता समजा त्या औषधाच्या वापराने काही नवेच अनाकलनीय दुष्परिणाम (ज्यांच्या चाचण्या अजून उपलब्ध नाहीत) आढळले तर त्यांच्या त्या प्रमाणपत्राला खोटे समजावे काय? तर नाही. कारण ह्या नव्याच दुष्परिणामाचे आकलन करणारी चाचणी नियंत्रक समितीकडे आधीच कशी असेल? ती आता यापुढे सम्मिलीत केल्या जाईल.

उदाहरण देण्यामागे उद्देश एवढाच की आधुनिक असले तरी आम्हालाच सर्व सत्य समजले आहे हा आत्मविश्वास नाही तर अहंकार आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन असणार्‍याला असा अहंकार चटकन अवैज्ञानिक बनवतो. सत्याचा निरंतर शोध हाच विज्ञानाचा पाया आहे असे मला तरी वाटते. त्यामुळे इतर लोक काय करतात त्याच्यावरही सर्व प्रकारे प्रयोग करून त्याचे परिणाम जनतेसमोर आणणे हेही आधुनिक विज्ञानाचेच काम आहे. भौतिक, रासायनिक, जिवशास्त्रीय चाचण्यांपलिकडे जाऊन अजून कुठले शास्त्र असू शकते का ह्याचा शोध घेणे हेही आधुनिक विज्ञानाचेच काम आहे.

असो. १०० डॉक्टरांना एकाच रोग्याच्या लक्षणांबद्दल कळवले तर त्यांचे निदान अचुक एकच येते का? असा काही प्रयोग झाला आहे का? जाणकारांनी प्रकाश टाकावा.

मराठी_माणूस's picture

6 Apr 2015 - 5:28 pm | मराठी_माणूस

सहमत.

आता समजा त्या औषधाच्या वापराने काही नवेच अनाकलनीय दुष्परिणाम (ज्यांच्या चाचण्या अजून उपलब्ध नाहीत) आढळले तर त्यांच्या त्या प्रमाणपत्राला खोटे समजावे काय?

काही औषधे कालांतराने वापरण्यास अयोग्य ठरवली गेली आहेत त्या मागचे हेच कारण आहे आणि जेंव्हा ती प्रीस्क्राईब केली गेली होती त्याचा दोष कोणाला देणार ?

प्रकाश घाटपांडे's picture

6 Apr 2015 - 2:11 pm | प्रकाश घाटपांडे

पर्यायी किंवा पूरक उपचारपद्धतीमधे वस्तुनिष्ठ विश्लेषण करता येत नाही. व्यक्तिगत अनुभूती वा अनुभव हाच काय तो निकष. पुण्याचे धन्वंतरी डॉ ह वि सरदेसाई तर म्हणतात की जवळपास ८० ते ८५ टक्के आजार हे सायकोसोमॅटिक आहेत. इतर वैद्यकशास्त्राचे काही तज्ञ म्हणतात की प्रमाण मोठे आहे पण इतके नाही.
रुग्ण म्हणतो पॅथी कोणती का असेना मला गुण आल्याशी मतलब.जडीबुटी असो कि मॉडर्न मेडिसीन. बरेच सुशिक्षित लोक सुद्धा प्रथम मॉडर्न मेडीसीनचाच पर्याय स्वीकारतात पण जेव्हा त्यात काही इलाज नसतो तेव्हा ते पर्यायी उपचारा कडे वळतात. प्रत्येक पॅथीचे अभिमानी लोक इतर पॅथीला दुय्यम लेखतात.शेवटी प्रत्येक पॅथीच्या काही मर्यादा व काही बलस्थाने आहेत.

मराठी_माणूस's picture

6 Apr 2015 - 3:40 pm | मराठी_माणूस

प्रत्येक पॅथीचे अभिमानी लोक इतर पॅथीला दुय्यम लेखतात

हा अनुभव मॉडर्न मेडिसिन चे लोक इतरांच्या बाबतीत करताना आला. नुसते दुय्यमच नव्हे तर हेटाळणी करताना आढळतात.

स्वप्नांची राणी's picture

31 Mar 2015 - 11:06 pm | स्वप्नांची राणी

या सगळ्या चर्चेच्या अनुषंगाने वाचताना मला एक मस्स्त्त वेबसाईट मिळाली... http://www.quackwatch.org/

हळदीचा उपयोग:चमचाभर पाण्यात तुरटीचा खडा फिरवायचा त्यात थोडी हळद टाका मिश्रण गरम करा. थोडे कोमटच असताना खरचटणे, ,नख निघणे, कापणे यावर लावा सेप्टिक न होता जखम (न चिघळता) बरी होते. या उपायात हळद आणि तुरटी दोघांना अर्धे श्रेय आहे.

संदीप डांगे's picture

31 Mar 2015 - 7:47 pm | संदीप डांगे

अरे वा. हळद + तुरटी.

ह्या धाग्यानिमित्ताने बर्‍याच नविन नविन गोष्टी समजतायत.