रामराम मंडळी!
अात्मचरित्रांच्या धाग्याला तुम्ही दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!या भागात अापल्या अावडत्या विनोदी पुस्तकांबद्दल बोलुया.
जगण्याची मजा घ्यायची असेल,ताणतणाव विसरायचे असतील तर विनोदी साहित्य वाचण्यासारखा इलाज नाही.सूचक,मार्मिक विनोद,रोजच्या जगण्यातल्या विसंगतींवर बोट ठेवुन स्मितहास्य निर्माण करणा-या विनोदापासुन पोट धरुन हसायला लावणारे विनोद अशा सर्व प्रकारचं विनोदी साहित्य विविध पुस्तकांतुन अापण वाचलं असेल.त्याबद्दल इथे लिहुया!
प्रतिक्रिया
12 Nov 2014 - 4:52 pm | आदूबाळ
धागा इंटेन्शनल विनोदाविषयी आहे असं गृहित धरतो.
अनइंटेन्शनल विनोदासाठी मुक्तपीठ, मोकलाया, मोजी, सनातन प्रभात, असे बरेच ऑप्शन्स असतात.
12 Nov 2014 - 4:56 pm | प्रचेतस
सुहास शिरवळकर यांची जाता..येता... आणि बरसात चांदण्यांची ह्या दोन धमाल विनोदी कादंबर्या प्रचंड आवडतात.
मिरासदार, चिं. वि. जोशी, शंकर पाटील यांचे सर्वच विनोदी साहित्य आवडीचे आहे.
पु. ल. देशपांडे यांचे विनोदी लेखन मात्र आवडत नाही.
12 Nov 2014 - 5:20 pm | संदीप डांगे
वल्लीशेठ
कुणास काय आवडावे न आवडावे हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण बरेचदा विशिष्ट असा उल्लेख करून पु. ल. यांचे लेखन आवडत नाही असे सांगण्यामागे काय कारण असेल? फार प्रांजळपणे विचारतो आहे, गैरसमज करू नये. पण दुसरी बाजू किंवा पुल न आवडणाऱ्यांची बाजू काय असेल हा प्रश्न बरेच दिवस पडलेला आहे. तुम्ही विषय मांडला आहेच तर उत्तर द्याल का?
12 Nov 2014 - 5:32 pm | प्रचेतस
मला मुकुंद टांकसाळे, अशोक पाटोळे, चंद्रकांत महामिने, मंगला गोडबोले यांचेही विनोदी लेखन आवडत नाही पण हे लेखक तुलनेने अदखलपात्र आहेत. तसे पु. लं चे नाही. महाराष्ट्रातील थोर लेखक ते.
मला मात्र त्यांचे लेखन बाळबोध आणि काहीसे एकसुरी वाटते.
मला जे वाटते तसे इतरांनाही वाटायला हवे असा माझा आग्रह नाही.
12 Nov 2014 - 7:11 pm | संदीप डांगे
उत्तराबद्दल धन्यवाद!
कुणास काय आवडते ते त्याचा वैयक्तिक प्रश्न असे तर मी आधीच म्हटले आहे. फक्त ह्या दुसऱ्या दृष्टीकोनाची उत्सुकता होती. अशी एकाच वस्तूबद्दल ची वेगवेगळी मते कळल्याने जाणीवेत भर पडते आणि वाचन अजून प्रगल्भ होते. अजून दुसरा काही हेतू नव्हता ह्या प्रश्नामागे. तुम्ही "बाळबोध व एकसुरी" असे म्हटले आहे, अजून कुणी वेगळे काही मत मांडेल. ह्यातून अजून सकस व उच्च प्रतीचे काय असते ह्याची माहिती मिळत जाते. कुणी जर म्हणेल कि विनोदी लेखन म्हणजे पु ल च फक्त बाकी कोण नाही तर त्यासम मूर्खपणा दुजा नाही.
वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या शैलीतून वेगवेगळ्या लेखकांनी आम्हाला हसवत राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
12 Nov 2014 - 5:05 pm | विजुभाऊ
झकास धागा पुमि.
आत्तापर्यन्त वाचलेल्यात सर्वात इनोदी पुस्तक म्हणजे बुधकौशिक ऋषी यानी लिहीलेले "रामरक्षा" हे.
12 Nov 2014 - 5:16 pm | प्रचेतस
विनोदी का हे पण सांगा ना
12 Nov 2014 - 5:17 pm | विजुभाऊ
तुम्ही वाच्ले असेलच ना ते.!
12 Nov 2014 - 5:18 pm | प्रचेतस
मी वाचलेय पण ते पुस्तक नसून लहानसे स्तोत्र आहे
12 Nov 2014 - 5:25 pm | विजुभाऊ
मी ते एक लहानसे पुस्तक म्हणूनच वाचलेय. त्याचा अर्थ वाचून भलतेच इनोदी वाटले बॉ.
12 Nov 2014 - 5:29 pm | प्रचेतस
पण विनोदी का वाटले ते सांगा ना?
13 Nov 2014 - 3:06 am | वॉल्टर व्हाईट
होय. हे जाणण्याची उत्सुकता मलाही वाटते.
13 Nov 2014 - 11:42 am | असंका
+1
त्यात काय विनोदी आहे सांगा. आम्ही पण मग त्या विनोदांचा आस्वाद घेउ शकू...?
12 Nov 2014 - 5:18 pm | जेपी
मोजी कथा,खरडफळा आणी काही मिपाकरांच्या खरडवह्या सध्या जाम हसवतात.
अवांतर-काहि पुस्तके आहेत पण त्यांची नावे आठवत नाहित.
फक्त वाचन आठवत. दिसल पुस्तक की पाड फडशा अस वाचतो
12 Nov 2014 - 5:32 pm | रंगोजी
दिलीप प्रभावळकरांची 'गुगली' आणि 'नवी गुगली'. ८५ च्या सुमारास ते षटकार साप्ताहिकात क्रिकेटवर लेखन करीत. त्याचा संग्रह. तत्कालीन खेळाडू आणि नियामक मंडळ यांची खुसखुशीत शब्दात फिरकी घेताना वापरलेल्या कल्पनाशक्तीला दाद द्यावीच लगेल.
जयवंत दळवी यांचे 'सारे प्रवासी घडीचे' - कोकणाचे, तिथल्या लोकांचे, आपापसातील भांडणांचे फार सुरेख वर्णन आहे
13 Nov 2014 - 4:45 pm | सौंदाळा
एकदम हेच लिहायला आलो होतो.
दिलीप प्रभावळकर : गुगली, हसगत
जयवंत दळवी : सारे प्रवासी घडीचे
मधु मंगेश कर्णिक : गावाकडच्या गजाली.
द मा मिरासदार : मिरासदारी, भोकरवाडीच्या सगळ्या कथा
12 Nov 2014 - 6:30 pm | अजया
एक लंबरी धागा!
मिरासदारी ____/\____
अजरामर व्यंकुची शिकवण,,भूताचा जन्म,माझ्या बापाची पेंड!
मराठी वाङमयाचा गाळीव इतिहास-पुलं,यावर तर स्वतंत्र धागा येऊन गेलाय.
चिमणरावाचे च-हाट-चिंवि जोशी
त्यांचं१च ओसाडवाडीचे देव,त्यातली गणपती हनुमानाची क्रिकेट मॅच!
गंगाधर गाडगिळांचा बंडु तर अजरामर आहे!त्याची पत्नी स्नेहलता अाणि चावरा मुलगा जकु उर्फ जकरंद!!सर्वच कथा हहपुवा आहेत!!
विंग्रजीमध्ये द वुडहाऊस_/\_
लाफ विथ लिकाॅक पण आवडतं.रस्किन बाॅण्ड कधीकधी हसवुन जातात.
अजून लिहतेच पुढे!!धन्स पुस्तकमित्रा!
12 Nov 2014 - 7:33 pm | विशाखा पाटील
आत्ता एकच आठवतंय - "Surely You're Joking, Mr. Feynman!" हे भौतिकशास्त्रातल्या नोबेल पारितोषिक विजेत्या Richard Feynman ह्यांचं आत्मचरित्र आहे. ह्यात एका भन्नाट व्यक्तिमत्वाचे भन्नाट किस्से आहेत. त्यांची कथनशैली साधीसरळ आणि मस्त विनोदी आहे.
12 Nov 2014 - 7:36 pm | बॅटमॅन
काही असलं तरी ते पुस्तक विनोदी म्हणवत नाही.
13 Nov 2014 - 1:55 am | रामपुरी
अहो त्यांना एकच पुस्तक आठवलंय ते पण इंग्लिश.. तुम्ही कशाला त्यावर पाणी ओतताय
12 Nov 2014 - 7:40 pm | टवाळ कार्टा
संपूर्ण पु.ल.
रामनगरी
अनुदिनी
12 Nov 2014 - 8:51 pm | अजया
राम गणेश गडकरींचं संपूर्ण बाळकराम.त्यातलं ठकीचं लग्न !
12 Nov 2014 - 9:38 pm | आदूबाळ
एखाद्या भाषेतला विनोद समजला याचा अर्थ त्या भाषेची समज चांगली आहे. कारण विनोद हा त्या त्या भाषेचं, संस्कृतीचं लेणं घेऊन येतो. उदा. पुलंच्या "वीट येणं कशाला म्हणतात, ते त्या दिवशी मला समजलं" साठी "वीट येणं" हा वाक्प्रचार माहीत असायला पाहिजे. वुडहाऊसच्या "फुल मून" मधल्या "I thought for a moment of saying “My mate!”, but decided against it because it seemed to me to have too nautical a ring." या वाक्यातला विनोद समजायला आरमाराच्या इंग्रजी परिभाषेत बोटीवरच्या अधिकार्याला mate म्हणतात याची जाणीव हवी.
मला मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा येतात. (आमचं हिंदी म्हणजे..ह्या ह्या ह्या...) इंग्रजी विनोदी साहित्याची ओळख - वरील कारणामुळे - फार उशीरा झाली. तर हा प्रतिसाद इंग्रजीतल्या प्रचंड आवडलेल्या विनोदी पुस्तकांबद्दल आणि लेखकांबद्दल.
१. वुडहाऊस
पेल्हम ग्रेनविल वुडहाऊस हा लेखक इंग्रजीतल्या विनोदी लेखनाचा बादशा. जीव्ज-वूस्टर, ब्लँडिंग्ज कासल, गोल्फ-कथा असं त्याने विपुल लिहिलेलं आहे. कधीही कोणतंही पुस्तक उचलावं आणि रंगून जावं.
२. सू टाउन्सेंडच्या "आद्रियन मोल" कादंबर्या
आद्रियन मोल हा स्वतःला भारी समजतो. आपण मोठे साहित्यिक बुद्धिजीवी वगैरे आहोत असं त्याला उगाचच वाटतं. त्याच्या आसपासचे लोक मात्र त्याला पूर्णपणे ओळखून असतात. (लखू रिसबूडची इंग्रजी आवृत्ती.)
३. हिचहायकर्स गाईड टू गॅलेक्सी (सीरीज)
विज्ञानकथा-कादंबर्यांची उडवलेली रेवडी.
४. फ्लॅशमॅन कादंबर्या
फ्लॅशमॅन हा विक्टोरियन ब्रिटनमधला एक सैनिक असतो. तो अत्यंत भित्रट आणि पेद्रट असतो, पण घटना अश्या घडतात की त्याच्या शौर्याचा बोलबाला सगळीकडे होतो.
इंग्रजीत विनोदी साहित्य लिहिणार्या भारतीय उपखंडातल्या लेखकांमध्ये
- सिदीन वादुकूटने लिहिलेल्या "रॉबिन 'आईन्स्टाईन' वर्गीस" या कथानायकाच्या तीन कादंबर्या
- तार्किन हॉलने लिहिलेल्या "विश पुरी" या प्रायवेट डिटेक्टिवच्या नर्मविनोदी रहस्यकथा
- मोहम्मद हनीफ या पाकिस्तानी लेखकाचं "अ केस ऑफ एक्स्प्लोडिंग मँगोज" नावाचं कमाल पुस्तक. (हे नक्की वाचा अशी आवर्जून शिफारस करतो.)
13 Nov 2014 - 12:23 am | पिवळा डांबिस
आणि त्याच पुलंच्या अपूर्वाईमध्ये श्रीलंकेतल्या एका हॉस्पिटलचं सुरू असलेलं बांधकाम बघतांना, "मी तितक्यात हळूच विटा पाहून घेतल्या. हल्ली लंकेत सोन्याच्या विटा नाहीत!" हे समजायला देखील ती म्हण नेमकी आठवावी लागते.
भाषिक (शब्दजन्य) विनोदाचा आस्वाद घेण्यासाठी (उदा. टिपिकल इंग्लिश ह्यूमर) मुळात ती भाषा चांगली अवगत असणं हे अतिशय आवश्यक असतं.
पुलंच्या बाबतीत म्हणाल तर त्यांचं पुस्तक वाचायला घेऊन चालत्या आगगाडीच्या डब्यात ठो ठो हसून अख्खा डबा डोक्यावर घेणारे आणि त्याचबरोबर पुलंचं पुस्तक वाचताना चेहर्यावरची रेषाही न हलणारे असे दोन्ही प्रकारचे लोक पाहण्यात आलेले आहेत. प्राक्तन आपलं आपलं!! :)
आंबा न आवडणारे लोकही जगात असतीलच की!!!
13 Nov 2014 - 12:39 am | अत्रुप्त आत्मा
@आंबा न आवडणारे लोकही जगात असतीलच की!!!>>> *YES* य्ये कही ना बात! *good*
13 Nov 2014 - 12:44 am | पिवळा डांबिस
तेही माझं नही.
पुलंच्याच हसवणूक या पुस्तकातलं आहे!! :)
13 Nov 2014 - 12:11 pm | अजया
अादुबाळ आणि पिडांकाकांशी सहमत.
पुलं कोळुन प्यायलेल्यासमोर पुलं न वाचलेला माणूस समोर येण्यासारखा वैताग नाही.नकळत पुलंनी आपल्या भाषेवर त्यांचं गारुड केलंय.एखादं मुल उगाच कानफटीत मारावेसे वाटणारे कार्टे दिसतं!अमूक मनुष्य एक नंबर गटणे असतो.फुळकवणी चा प्यायल्यावर रत्नांग्रीच्या समस्त म्हैशी आपोआप आठवतात.माझ्या कामात दाताचा अण्णु गोगटे झालेले पेशंट असतात!!
प्रत्येकाला आपले मत असतेच.असो!
13 Nov 2014 - 12:55 pm | बॅटमॅन
आंबा न आवडणार्यांवर लोक इतके खार खाऊन का असतात ते कळत नाही. लहानपणी मलाही आंबा आवडत नसे, पेरू जास्त आवडायचा. असो.
14 Nov 2014 - 1:06 am | पिवळा डांबिस
पण आता आवडतो ना, झालं तर मग!!!
शालेय लहानपणी मलाही पोरी आवडत नसत. पण आता.....
असो.
;)
14 Nov 2014 - 10:46 am | अत्रुप्त आत्मा
@शालेय लहानपणी मलाही पोरी आवडत नसत. पण आता.....>>> =)) चावट्ट पिडाकाका! =))
13 Nov 2014 - 4:06 am | बोबो
हिचहाइकर्सची चार प्रकरणे वाचली, पन इनोद म्हनून काय सापडून न्हाय र्हायला भौ :(
13 Nov 2014 - 11:53 am | पिशी अबोली
वुडहाऊस __/\__
निखळ विनोद..
बाकी
हे एवढंच वाटत नाही मला.. इतकं असंबद्ध पण तरीही सुसूत्र लिहायला काय ताकद पाहिजे(असं आपलं मला वाटतं)
12 Nov 2014 - 10:01 pm | अत्रुप्त आत्मा
पु.ल.
शंकर पाटील
मंगेश पाडगावकर..... वात्रटिका
12 Nov 2014 - 10:17 pm | प्रचेतस
सूर्यकांत खोकले यांनी चंद्रशेखर गोखले ह्यांच्या 'मी माझा' ह्या चारोळी संग्रहाचे ' मी माझा..मग माझा कुणाचा' ह्या नावाने केलेले धमाल विडंबनांचे पुस्तक संग्रही आहे. एकापेक्षा एक जबरदस्त विनोदी चारोळ्य़ा ह्या संग्रहात आहेत. सध्या हे पुस्तक आवृत्ती संपल्यामुळे मिळत नाही पण मजजवळ खुद्द कवीची स्वाक्षरी असलेले हे पुस्तक आहे.
13 Nov 2014 - 1:31 pm | गणेशा
मी माझा..मग माझा कुणाचा'
नावच जबराट आहे
12 Nov 2014 - 11:53 pm | बोबो
रमेश मंत्री यांचे विनोदी लिखाणसुद्धा छान आहे. ते जेम्स बॉन्डचे विडंबन जनू बांडे साठी प्रसिद्ध आहेत.
पण त्यांची बाकीची विनोदी पुस्तके सुद्धा मला आवडली होती.
13 Nov 2014 - 2:01 am | रामपुरी
एक नंबर पु.ल. कधीही कुठलंही पुस्तक काढून वाचत बसावं. नंतर मिरासदार, शंकर पाटील, चिं वि जोशी
13 Nov 2014 - 2:11 am | मुक्त विहारि
पु.भा.भावे
द.मा.मिरासदार
शंकर पाटील
मंगला गोडबोले
प्र.के.अत्रे
मुकुंद टांकसाळे
13 Nov 2014 - 12:02 pm | पिवळा डांबिस
भाव्यांचं जळजळीत लिखाण वाचून मिसळीची तर्री प्याल्यासारखं वाटतं.
पण त्यांचा तो "नसीमबानूने चड्डी चोरली" तो लेख मात्र अप्रतिम!!!! ;)
(अधिक माहितीसाठी पिडांकाकांना मस्का लावण्याची बोली आता सुरू करीत आहोत! बोला एक हजार!!)
:)
13 Nov 2014 - 12:13 pm | पप्पु अंकल
वर्तमानपत्र व एक विचार मंच वाला तुफान विनोदी ब्लोग
13 Nov 2014 - 1:24 pm | सस्नेह
विशिष्ट लेखकांचे सर्व विनोदी लेखन आवडते. म्ह्णून पुस्तकाचे नाव न देता लेखकांची यादी दिलीय
पु.ल.
जयवंत दळवी
गंगाधर गाडगीळ
द. मा.
रमेश मंत्री
13 Nov 2014 - 1:39 pm | टवाळ कार्टा
ब्रम्हे आणि ज्यु.ब्रम्हे
13 Nov 2014 - 2:27 pm | अत्रुप्त आत्मा
=))
13 Nov 2014 - 3:24 pm | आदूबाळ
ज्यु ब्रह्मे खरोखरच कहर आहेत. मी लैच मोठा पंखा आहे त्यांचा.
13 Nov 2014 - 3:32 pm | बॅटमॅन
मीही!!!! लैच मोठा पंखा आहे, गरगरां गरगरां फुल्ल स्पीड ५ वर फिरणारा.
13 Nov 2014 - 3:46 pm | पिशी अबोली
एका हाताने पेरु खात आणि दुसर्या हातात ब्रह्मेचा लेख घेऊन वाचत गरागरा फिरणारा बॅटमॅन डोळ्यांसमोर दिसला! ;)
13 Nov 2014 - 4:40 pm | बॅटमॅन
गरागरा फिरायला आम्ही आमच्या 'बॅट' नामक उडनपंखी खटोल्यात बसलो होतो ते सांगायचें विसरलांत बरें? नुस्तेच गरगरां फिरावयास आम्ही तें काय शक्तिमान की कवण समजलांत कायें ;)
13 Nov 2014 - 4:41 pm | बॅटमॅन
बादवे शक्तिमान स्वतःभोवती प्रकाशवेगाने प्रदक्षिणा घालत असतानाचा आवाजही अतिशय रोचक आहे.
13 Nov 2014 - 4:12 pm | अजया
ज्यु.ब्रम्हे _/\_
=))
पोपा मॅडम आणि मुक्तपिठावरचे हिरव्या देशाला जाऊन आल्यावर लेख लिहिणारे यांची पण पंखी आहे मी!
13 Nov 2014 - 3:55 pm | असंका
पंधरा सोळा वर्षांपूर्वी मी एक अफाट विनोदी पुस्तक वाचले होते. लेखक नक्कीच वसंत सबनीस होते. पुस्तकाचे नाव बहुतेक 'सबनिशी'. मी 'मसाप'च्या वाचनालयात हे पुस्तक घेतले वाचायला. पण मला इतकं हसणं आवरीना की शेवटी मी टेबलावरून उठून कपाटांच्या आडोशाला जाऊन वाचायला लागलो. इतकी वर्ष झाल्यामुळे त्या पुस्तकात काय होते ते काही आता आठवत नाहिये. फक्त आवाज खाली ठेवून हसण्याची माझी खटपट लक्षात आहे....
सर्वात आवडते मात्र श्री कृ कोल्हटकरांचे 'सुदाम्याचे पोहे'.
14 Nov 2014 - 12:03 pm | पैसा
या अर्थाने आम्ही पक्के टवाळ! बहुतेकांची नावं इथे आलीच आहेत. आचार्य अत्रे यांचा अस्वली विनोद पण कधी कधी आवडतो. तसाच बाळकराम आणि नंतरच्या सगळ्या गंभीरपणे विनोदी साहित्य तयार करणार्यांचाही. गंभीर विनोदी साहित्य मराठीत समजायला सोपे जाते. मात्र इंग्रजी भाषा आणि संस्कृती याचे आकलन जसे जास्त होते तसा तो विनोद समजू लागतो. इतर बरेच इंग्रजी वाचन झाल्यानंतरच विनोदी पुस्तके वाचायला घ्यावीत.
14 Nov 2014 - 10:23 pm | बोबो
हम्म.. पटलं :)
14 Nov 2014 - 5:04 pm | अजया
पूर्विच्या पाटकरांच्या अावाज दिवाळी अंकात छान विनोदी कथा असत. वसंत सबनिसांच्या कथा ,वि अा बुवांच्या कथा प्रथम अावाजमध्येच वाचलेल्या.हल्लीचा अावाज अाणि डुप्लीकेट अावाज यातल्या विनोदाबद्दल न बोललेलेच बरे!