जाणीव

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 7:56 am

दृश्य १

वर्दळीचा रस्ता,
फार गजबज माजलेली, वाहने भरधाव, हळूहळू जसा रस्ता सुचेल तशी वाट काढत पळत होती,
अचानक मोठा आवाज झाला, गर्दी थांबली,
एक म्हातारे साठीतले गृहस्थ अचानक थांबावे लागल्याने स्कूटर वरून तोल जाऊन रस्त्यावर पडले,
इतर लोक बघत होते, एक दोघे पुढे आले, एकाने स्कूटर उचलली, दुसऱ्याने त्यांना हात देऊन उठवले,
आजोबांचे हाड मोडल्यासारखे जाणवत होते, तो मुलगा त्यांची विचारपूस करत होता,

"चल रे विजय, उशीर होतोय आपल्याला, इंटरव्यू आहे आणि काय बसलायस समाजसेवा करत", त्याचा मित्रा त्याच्या वर खेकसला,

"मोठ्या मुश्किलीने कुणीतरी सालं बोलावते आपल्याला, त्यातही उशीर झाला तर बोंबच",

विजय ने त्याच्या कडे मान वळवून बघितले आणि म्हणाला,"ठीक आहे रवी तू हो पुढे मी आलोच."
रवीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहत तिथून काढता पाय घेतला.

विजयने आजोबाना रस्त्याच्या कडेला घेतले, रिक्षात बसवले, "चला काका, मी तुम्हाला हॉस्पिटलला नेतो, तुमच्या घरच्यांना कळवूया."

हे सगळे बघत असलेली एका मर्सिडीज ची काच पुन्हा वर गेली, गर्दी पुन्हा आपल्या वाटेला लागली,

दृश्य २

एक सुसज्ज आणि श्रीमंत वाटणारा स्वागतकक्ष, रवी आपली फाईल घेऊन प्रवेश करतो.
"मी रवी साठे, मला इंटरव्यू साठी बोलावले आहे," रवीने तिथल्या रिसेप्शनिस्ट ला सांगितले.
"ठीक आहे बसा. हे भरा", तिने त्याच्या हाती एक कागद दिला.
तोच तिथे धापा टाकत विजय पोचला, तो घामाने डबडबला होता पण एक समाधान त्याच्या चेहऱ्यावरून ओथांबत होते.

"मी विजय मराठे, श्रीनिवास परांजपेना भेटायचे आहे, मला असिस्टंट मॅनेजर पदासाठी इंटरव्यूला बोलावले आहे," विजय तिला म्हणाला,
'ठीक आहे बसा, मी त्यांना कळवते', ती उत्तरली,
'मिस, इकडे वॉशरूम कुठे आहे सांगाल काय?' विजय ने विचारले,
तिने उजव्या हाताने दिशा दाखवत सांगितले,"डावीकडून पुढे".

विजय लगबगीने जाऊन फ्रेश होऊन आला,
रवीने त्याला आश्चर्याने विचारले, "अरे तू वेळेवर कसा पोचलास? मला वाटले आता तू लटकला, उगाच पोलीस केस होईल आणि तुझा दिवस जाईल तिकडेच."

"सायबा, इच्छा असेल तर सगळे मॅनेज होते. एवढे मॅनेज नाही करता आले तर आपण मॅनेजर काय कामाचे."

"तिथून दोन मिनिटावर हॉस्पिटल होते, आणि आता न्यायालयाच्या आदेशानुसार कुणाही अपघात झालेल्या जखमी व्यक्तीला कुठल्याही जवळच्या हॉस्पिटलात पोलीस केस शिवाय दाखल करता येते. मी रिक्षात बसल्या बसल्या लगेच त्या आजोबांच्या मुलाला फोन लावला. आम्ही पोचेपर्यंत तो तिथे पोचला सुद्धा. मग काय मी सटकलो."

"मिस्टर मराठे, तुम्हाला बोलावलंय, श्रीराम, यांना परांजपे साहेबांकडे घेऊन जा."

"चल येतो मी,"

"मी सर्वात आधी आलो तरी ह्याला कसे बोलावले माझ्या आधी?", रवी खुसफुसला,

रिसेप्शनिस्टने ते ऐकले आणि त्याला म्हणाली, " त्यांनी आपले काम काय आहे आणि कुणासोबत आहे ते स्पष्ट सांगितले, तुमचा फॉर्म अजून भरून झाला नाही, मला कसे कळणार तुम्हाला कुणी बोलावलंय ते,"

"अहो मला सुद्धा परंजापेनीच बोलावलंय" असे म्हणून रवी पटापट फॉर्म लिहु लागला.

दृश्य ३

कॉन्फेरेंस रूम. आत चार आलिशान खुर्च्यावर चार अनुभवी आणि प्रगल्भ दिसणाऱ्या व्यक्ती बसल्या होत्या.
विजय त्यांना आपली प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे दाखवत होता.
चार जणांपैकी एकाने त्याला विचारले, "ते सर्व ठीक आहे, मिस्टर मराठे, या कागदपत्रांशिवाय तुमच्याकडे काय आहे जे आम्हाला उपयोगी पडेल."

"म्हणजे? मला समजले नाही सर."

"ह्या पदव्या ही प्रमाणपत्रे तुम्ही वाचून पाठ करून मिळवली आहेत, त्याचा प्रत्यक्ष आयुष्यात काय उपयोग आहे? प्रत्यक्ष व्यवहारात वापरता येईल असे तुमच्याकडे काय आहे?"

"माफ करा सर मला, जरी मी ही प्रमाणपत्रे वाचून पाठ करून मिळवली असली तरी, ती प्रत्येक गोष्ट लिहिताना वाचताना माझ्या जाणिवा अजून प्रगल्भ करत गेली आहे. आणि प्रत्यक्ष व्यवहारात वापरता येईल असे म्हणाल तर माझ्याकडे माझा आत्मविश्वास आहे, धडाडी आणि चिकाटी आहे, माझ्यावर सोपवलेले प्रत्येक काम मी आव्हान समजून स्वीकारतो आणि जबाबदारी म्हणून पूर्ण करतो."

"धन्यवाद मिस्टर मराठे, तुम्ही रिसेप्शन मध्ये बसा."

"मिस्टर रविकांत विचारे, तुम्हाला बोलावलंय."

रवीची मुलाखत सुरु असते, खुर्चीत बसलेले चौघे त्याची कागदपत्रे नीट बघत असतात.

"मिस्टर विचारे, तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण काय आहे?", एकाने विचारले,

रवी गोंधळला, अचानक इंटरव्यू मध्ये असा कुणी प्रश्न विचारेल असे त्याला कुणी सांगितले नव्हते,

"जीवन जगण्यासाठी कठोर परिश्रमाची नितांत आवश्यकता आहे, आजच्या स्पर्धेच्या युगात तुम्हाला सदैव तत्पर राहणे गरजेचे आहे, काही स्वप्ने पूर्ण करायला काही इच्छांना निरोप द्यावा लागतो."

"ठीक आहे, तुम्ही रिसेप्शन मध्ये बसा."

रवी उठतो.

ज्येष्ठ दिसणाऱ्या व्यक्तीकडे बाकीचे तिघे उत्तराच्या अपेक्षेने बघतात.

"मिस्टर रवीला रिटेलमध्ये एका स्टोरचा असिस्टंट म्यानेजर करा", ज्येष्ठ बोलले.

"आणि मिस्टर मराठेंना?" तिघांनी विचारले,

दीर्घ श्वास घेत ते उत्तरले,"त्याना कस्टमर केअर डिविजन चा सी ई ओ करा........"

"....................................................."

सगळे स्तब्ध आणि आश्चर्यदग्ध झाले,

त्या सर्वांचे चेहरे पाहून ज्येष्ठ बोलायला लागले,

"तुम्हाला असे वाटत असेल, की मला कदाचित वेड लागले असावे. मिस्टर मराठेमध्ये मी असे काय पाहिले की फक्त एक दीड वर्षाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीला अत्युच्च पदावर बसवायला निघालोय?, मी जे बघितले ते तुम्हाला सांगतो"

त्यांनी त्यांच्या मर्सिडीजमधून सकाळी घडलेला प्रसंग बघितलेला, तो सांगितला.

"त्या मुलाच्या एवढाश्या परोपकाराने हुरळून जाऊन मी हा निर्णय घेतला असे जर तुम्हाला वाटत असेल, तर पुढे ऐका. त्याने त्या आजोबाना हॉस्पिटल मध्ये नेले असेल आणि इतर सोपस्कार केले असतील, पण तरीही तो मुलगा इंटरव्यू साठी अगदी वेळेत पोचला"

"अपघाताची परिस्थिती अचानकच उद्भवते, भलेभले भांबावून जातात. इथे तर समस्या त्याची नव्हतीच मुळी, तरी त्याने दुसऱ्याच्या जीव आपला समजून मदत केली. आणि अशी काहीतरी व्यवस्था केली की तो इथेपण वेळेत पोचला. म्हणजे त्याचा मेंदू आणि मन कठीण काळात किती भराभर आणि योग्य निर्णय घेत असलं पाहिजे?"

"याचे कारण त्याचा स्वतःवरचा विश्वास आणि कामाबद्दलची निष्ठा, हे सांभाळून तो अडचणीत सापडलेल्याना मदतही करतो."

"आपल्या कंपनीच्या ग्राहकाभिमुखी प्रतिमेसाठी आणखी आपल्याला काय हवे?"

"पण सर, त्याला एवढ्या मोठ्या पदाचा आवाका पेलवेल का, त्याला तसा काहीच अनुभव नाही"

"मिस्टर परांजपे, काय काम करायचे हे आपण त्याला शिकवू, कसे काम करायचे हे त्याला ठाऊक आहे आणि माझ्या मते ते तितके पुरेसे आहे."

दरवाज्याकडे पोचल्यावर त्याने मागे वळून आपल्या साथीदारांना म्हटले,

"आणि हो, त्याचा मित्र विचारे, मेहनती आहे, मन मोडून काम करेन, पण मनुष्याच्या अस्तित्वाबद्दलची त्यांची जाणीव थोडी कमी आहे. फ्लोरवर काम करेल तर येईलच हळू हळू."

लेखक: संदीप डांगे

sandeep dange

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

एस's picture

21 Oct 2014 - 12:46 pm | एस

लेख आवडला. असेच लिहीत रहा मस्तपैकी!

संदीप डांगे's picture

28 Oct 2014 - 10:21 pm | संदीप डांगे

धन्यवाद! हि माझी पहिलीच कथा आहे. एका लघुपटाचा सुरुवातीचा भाग आहे.

डायरेक सीईओ? परिकथा वाटली.

संदीप डांगे's picture

28 Oct 2014 - 10:27 pm | संदीप डांगे

आजकाल चांगुलपणावरचा एकूणच विश्वास उडालेला आहे, त्यामुळे हि परीकथा किंवा आदर्श कथा आहे असेच वाटेल. चांगले केले तर चांगले फळ मिळते किंवा वाईट केले तर वाईट फळ मिळते ह्या अगदी कपोलकल्पित गोष्टी आहेत. पण म्हणून काहीहि झाले तरी माणसाने सतत चांगले करत राहण्याचा आपला धर्म सोडू नये. आज समाजात एक प्रकारचा नकारात्मक भाव आहे पण चांगले जे घडते त्याला दुर्लक्ष करू नये. ते घडणारे चांगले हीच समाजाची उर्जा आहे.

स्पंदना's picture

29 Oct 2014 - 4:32 am | स्पंदना

नाही पटत.
उलट मी तर चांगुलपणा सोडुन द्यायची शपथ खाल्ली आहे. माणस फायदा घेतात अन निर्लज्जपणाने लाथा मारतात.

संदीप डांगे's picture

29 Oct 2014 - 2:24 pm | संदीप डांगे

नसेल पटत आपल्याला, पण ठरवून असा चांगुलपणा नाही सोडता येत. फारतर आपण कुणावर दया दाखवायच्या प्रसंगात माघार घेऊ शकाल पण रस्त्यावर जखमी पडलेल्या कुणाला असेच टाळून नाही जाऊ शकणार. असे टाळून जाणारे आणि मदतीला धावणारे यांच्यातला फरक हा मुलभूत असतो. तो ठरवून नाही आणता येत.

काही दिवसांपूर्वी माझ्या कार पुढे चालत असलेल्या एक पंचेचाळीशीतल्या काकू अचानक उजवीकडे वळल्या आणि विरुद्ध बाजूने येणाऱ्या स्कोर्पिओने त्यांना हवेत १०-१२ फूट उडवले. जिथे अपघात झाला ती जागा चढ असलेली होती. स्कोर्पिओचा वेग कमी असून चढ असलेल्याने जोर जास्त होता. सर्वस्वी चूक काकुंचीच होती पण म्हणून त्यांना कोणी त्यांना तसेच सोडून दिले नाही. मी आणि ३० माणसे झटकन आली. त्याच स्कोर्पिओमधे त्यांना टाकून दवाखान्यात रवाना केले. स्कोर्पिओवल्यने काही कटकट केली नाही. सगळाच मामला फार साम्जुतदारीने पार पडला. ट्राफिक बोंबलले ते मी कार थांबवली म्हणून पण कुणीही होर्न वाजवून दंगा केला नाही.

माझ्यामते चांगुलपणाची अशी बरीच उदाहरणे आसपास आहेत. तीच समाज म्हणून राहण्याची आपली क्षमता वाढवत असतात. अन्यथा आपले जगणे कठीण होईल.

कुणीतरी फसवणूक करतो, आपण फारच भोले होऊन गंडवले जातो त्यामुळे आपला कडवटपण वाढतो तो फसवणूक करणाऱ्यांमुळे. त्याचा तोटा खरी गरज असलेल्यांना बसतोच आणि पुढे हि साखळी वाढत जाते. पण चांगुलपणा असणे म्हणजे गरजूस मदत करणे एवढेच नाही.

काही संशोधक, व्यावसायिक आपल्या शोध आणि सेवेतून समाजाचे श्रम कमी करतात, त्यात काही लोक नोकरी करून हातभार लावतात. भले ते पैश्याच्या मोबदल्यात हे सगळे करतात पण मूळ भावना चांगुलपणाची असते. काही कंपन्या फसवे उत्पादन गळ्यात मारतात म्हणून आपण उपयोगी वस्तू पण विकत घेत नाही असे नाही.

असो. माझ्या मते माणसातला मूळ चांगुलपणा टिकवा. तो चांगुलपणा जो उस्फुर्त आहे, ज्याला ठरवून करावे लागत नाही. भिकाऱ्याला भिक देणे हा मूळ चांगुलपणा नाही, चांगुलपणा म्हणजे लोकल मध्ये खेळणी विक्रेत्याकडून १०-२० रुपयाची खेळणी विकत घेणे. महिन्यात दहा भिकाऱ्यांना जे दान कराल त्यात एका खेळणीवाल्याचा धंदा होईल आणि तो घरी त्याच्या मुलांसाठी काही खायला घेऊन जाऊ शकेल. तुमच्या घरी लहान मुल आनंदी होईल, त्याचा आनंद बघून तुम्ही हि आनंदी व्हाल. आनंदाची साखळी वाढत जाइल.

तुम्हाला काय वाटते?

प्रभाकर पेठकर's picture

29 Oct 2014 - 3:49 pm | प्रभाकर पेठकर

माझ्या माहितीत एकाने, रजेवर भारतात गेला असताना, रस्त्यातल्या एका अपघातग्रस्त व्यक्तीला इस्पितळात पोहोचवले. ती व्यक्ती शुद्धीवर यायच्या आतच निवर्तली. झाले. नातेवाईकांनी त्या मदत करणार्‍यालाच आरोपी ठरवून पोलीसात तक्रार केली. त्याला अटक झाली. तो मस्कत मध्ये नोकरी करतो. कसाबसा जामिन मिळवून सुटला आणि मस्कतला नोकरीवर परतला. पुढे, 'त्या नातेवाईकांनी खोटे साक्षिदार उभे केले आहेत आणि आपण निरपराध आहोत' हे सिद्ध करण्यास ७ वर्षे लागली. ह्या सात वर्षात जेंव्हा जेंव्हा केस उभी राहायची आणि इतरवेळीही आपल्या वकीलाबरोबर चर्चेसाठी त्याला मस्कताहून भारतात जावे लागायचे. अतोनात खर्च, पराकोटीचा मनस्ताप आणि 'आपण न केलेल्या गुन्ह्यासाठी आपल्याला शिक्षा होईल की काय?' ह्या भितीच्या सावटाखाली ७ वर्षे काढली त्याने.

दूसरा एक मराठी आणि पेशाने डॉक्टर सौदी अरेबियात होता. तो आणि दूसरा एक इजिप्शियन डॉक्टर ह्या मराठी डॉक्टरांच्या कार मधून कामावर जात असताना समोरच्या एका गाडीने रस्त्यावरच्या सौदी नागरिकाला उडविले. आणि न थांबता ती गाडी पळून गेली. जखमी व्यक्ती तडफडत होती. ह्याने गाडी थांबवून त्या इजिप्शियन डॉक्टरच्या मदतीने जखमीला आपल्या गाडीत घेतले आणि हॉस्पिटलला नेले. दुर्दैवाने त्या सौदी नागरीकाचा वाटेतच मृत्यू झाला. तिथल्या नियमानुसार ह्यालाच कस्टडीत घेतला. त्या इजिप्शियन डॉक्टरने सुरुवातीला ह्या मराठी डॉक्टरांच्या बाजूने पोलीसात जबानी दिली की, 'अपघात दुसर्‍याच गाडीने केला आहे आम्ही फक्त त्याला हॉस्पिटलला पोहोचविण्याचे काम केले. भारतिय डॉक्टर निरपराध आहे.' पण पोलीसांनी त्याला काय पट्टी पढविली कळत नाही. कोर्टात अचानक १८० अंशात पलटी मारून, 'भारतिय डॉक्टरनेच त्या सौदी नागरिकाला उडविले आणि तो पळून जाणार होता पण मी त्याला असे करण्यापासून परावृत्त केले आणि जखमीला इस्पितळात पोहोचविले.' अशी जबानी दिली. आणि ह्याला शिक्षा लागली. पण सुदैवाने ज्या इस्पितळात तो काम करीत होता त्या इस्पितळाने रॉयल फॅमिलीत वशिला लावून त्याची सुटका केली. पण सुटल्याबरोबर त्या डॉक्टरने त्या देशात राहायला नकार देऊन नोकरीचा राजीनामा दिला आणि भारतात परतला.

चांगुलपणा कधी कधी भयंकर समस्या निर्माण करतो.

संदीप डांगे's picture

29 Oct 2014 - 5:25 pm | संदीप डांगे

अगदी खरे! ह्यामुळेच ("कधी कधीच" घडणाऱ्या अशा कथा ऐकून ) आजकाल मदत करायला कुणी धजावत नाही. आणि परोपकाराने मदत करून शेवट चांगलाच झाल्याच्या कथा समाजात पसरत नाहीत. एकूण काय एक समाज म्हणून आपण निराशवादी होत चाललो आहोत आणि त्यातूनच एकलकोंडेपणा, आत्मकेंद्रितपणा येत आहे. पराकोटीच्या दोन्ही शक्यता ठायी ठायी उपलब्ध असतात. तुम्ही सांगितलेल्या दोन्ही कथा खऱ्या आहेत, माझी घटना पण खरी आहे. त्याचमुळे वर सांगितलेली कथा खरोखर कुठेतरी घडो अशी प्रार्थना. अच्छा सोचो अच्छा होगा, नाही झाले तरी हरकत नाही मन तोपर्यंत तरी प्रसन्न राहील.

प्रभाकर पेठकर's picture

21 Oct 2014 - 5:54 pm | प्रभाकर पेठकर

कथा चांगली आहे पण 'ज्येष्ठांचा' निर्णय भावनिक वाटला. प्रत्यक्षात असे कधी घडत असेल ह्यावर विश्वास बसणे कठीण आहे.

नाखु's picture

28 Oct 2014 - 11:11 am | नाखु

जेष्ठ सदस्य "भावनिक" पेक्षा "व्यावहारिक" विचार करतील.
अवांतर :मर्सीडीझ मधील "माणसां"ना मदत करण्याचे वावडे आहे काय? (किमान कथेमध्ये तरी!!)

संदीप डांगे's picture

28 Oct 2014 - 10:08 pm | संदीप डांगे

मर्सिडिस च्या आत बसलेल्या काही "माणसांना" आपल्या गाडीखाली कुणी आले तर त्याची फिकर नसते मग मदत वैगेरे सोडाच. इथे ज्येष्ठ सहृदय आहेत आणि त्यांनी मदत करण्याची वेळच आली नाही कारण घटना फार पटकन घडते अक्षरश: २-३ मिनिटात. कथा लिहिताना कमीत कमी शब्दात दृश्य उभे करणे हाच उद्देश होता.

संदीप डांगे's picture

28 Oct 2014 - 10:16 pm | संदीप डांगे

काही व्यक्ती प्रत्यक्ष बघण्यात आल्या आहेत. तेच निरीक्षण वापरले आहे. शिवाय कथा काल्पनिकच आहे.

कथेचे तात्पर्य किंवा बीज असे आहे कि तुम्ही कुठेही सार्वजनिक ठिकाणी कसे वागता हे बरेच लोक बघत असतात. चांगले किंवा वाईट कसेही, कुणीतरी बघत असतच, त्याचे परिणाम नकळत मिळतातही. त्यामुळे काही फळ मिळो न मिळो, सतत चांगले करत राहावे ह्या भावनेतून हि कथा प्रसवली.

सस्नेह's picture

21 Oct 2014 - 10:36 pm | सस्नेह

आदर्शाची सुरेख कथा.
प्रत्यक्षात असे घडेल तो सुदिन.

मुक्त विहारि's picture

22 Oct 2014 - 6:29 pm | मुक्त विहारि

सहमत....

खटपट्या's picture

22 Oct 2014 - 5:55 am | खटपट्या

आवडली कथा !!

संदीप डांगे's picture

28 Oct 2014 - 10:18 pm | संदीप डांगे

धन्यवाद !

पैसा's picture

27 Oct 2014 - 10:31 pm | पैसा

कथा आवडली!

संदीप डांगे's picture

28 Oct 2014 - 10:18 pm | संदीप डांगे

धन्यवाद!

कपिलमुनी's picture

28 Oct 2014 - 12:09 pm | कपिलमुनी

वाटली

संदीप डांगे's picture

28 Oct 2014 - 10:17 pm | संदीप डांगे

धन्यवाद !