माझ्या पुष्पसख्या

नूतन's picture
नूतन in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 4:22 pm

(प्रसिद्ध बंगाली लेखक श्री बिभूतीभूषण बंदोपाध्याय यांचे ’अरण्यक’ हे (मूळ बंगाली भाषेतील ) पुस्तक वाचनात आले.य़ा पुस्तकात कथानकाच्या अनुषंगाने, भागलपूर,बिहार येथील मोहनपूरा रिझर्व्ह फौरेस्ट मधील वनश्रीचे नितांतसुंदर वर्णन केले आहे. ते वाचून मला माझ्या शाळकरी वयातील झाडाझुडपांच्या आठवणी जाग्या झाल्या. त्याच सांगण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.)

हा साधारण १९६७-६८ च्या दशकाचा काळ. सुशिक्षित मध्यम वर्ग वाडे किंवा चाळीत बिऱ्हाड करुन रहायचा हा काळ. तर आम्हीही अशाच एक चाळीत रहात होतो. म्हणायला जरी ती चाळ असली तरी ते एक टुमदार, कौलारू एकमजली घरच होतं. बिऱ्हाडं निराळी असली तरी ते एक मोठं कुटुंबच होतं.चाळीच्या तीन बाजूंनी अंगण आणि परसदारी मोठी विहीर. परिसर हिरवागार करण्यासाठी आंबा,जांभूळ,शेवगा फणशीसारखी मोठी झाडं होती. सुगंधासाठी शुभ्र चांदणी कुन्दाचा वेल,मदमस्त मधुमालती,शांत मंद अनंत होता. अंगणभर गालिचा पसरवणारे तीन तीन प्राजक्त-नाजूक, कातर पाकळीचे आणि ठसठशीत. पहिल्या वहिल्या पावसाचे पाणी पडताच दडी मारुन बसलेले लिलीचे कोंब उगवत आणि बघता बघता पिवळ्या,पांढऱ्या आणि गुलाबी फुलांचे मनोहारी ताटवे फुलत. खास श्रावणात फुलणारी, पांढऱ्या रंगाची, तलम कांतीची, तिन्हिसांजेला फुलणारी आणि फुलता फुलता सुगंधाने आसमंत भरून टाकणारी सोनटक्क्याची फुलं फुलत. बाराही महिने फुलणारी साधी तगर, डबल तगर, गुलबाक्षी, अबोली, सतेज निळी, क्वचित पांढरी गोकर्ण, यांचीही उपस्थिति होती.

फुलाचा राजा गुलाब पण त्याची अनुपस्थीती विशेष कधी जाणवली नाही. मला आठवतं, असच कोणाकडून तरी आणलेला स्पायडर लिलीचा कंद लावला होता. या फुलाची तेव्हा अपूर्वाई वाटायची. त्यामुळे साहजिकच, त्या कन्दातून ती हिरवीगार पाती आणि पांढरी शुभ्र फुलं कधी येणार याकडे आमचे डोळे लागले होते. आणि एक दिवस ती लवलवणारी पाती आली, ती मोठीही झली आणि मधल्या दांड्याला दोन कळ्याही आल्या. फ़िकट पोपटी आवरणातून डोकावणाऱ्या पांढऱ्या कळ्या फार सुंदर दिसतात. त्या हळुहळु उमलत जातात आणि एक वेळ अशी येते की त्या पाकळ्या फक्त एका बिन्दूशी जोडलेल्या असतात आणि बाकीकडून विलग. पक्वांनातल्या चम्पाकळी सारख्या किंवा हाताच्या बोटाची टोकं फक्तं टेकवून बाकी हात फुगीर केल्यावर दिसावं तश्या. खरी गंमत असते ती तो जोडबिंदू फुटून कळीचं फूल होण्याचा क्षण पाहण्यात. श्रावणाचा महिना, पावसाची हलकीशी सर पडून गेलेली, वातावरणात मातीचा सुगंध, संध्याकाळचे मावळतीच्या उन्हाचे किरण कळीवर पडलेले, श्रावण सोमवार नाहीतर शुक्रवारचे रसना जागृत करणारे वास आणि बस्स...तो क्षण...टक असा आवाज आणि चंपाकली उमलून, तरल पापुद्र्यानी जोडलेलं लांबसडक पाकळ्यांचं. पोपटी देठांचं फूल फुलतं. आतली केशरी रंगाची आडवी पट्टी थरथरत राहते आणि काहीसा आइसक्रीमसारखा सुवास पसरतो. तो क्षण, तो श्रावण, ती फुलं, कधीच न विसरण्यासारखं.

पुन्हा पुन्हा श्रावण आठवतो कारण खरोखरच श्रावणात निसर्ग काही वेगळाच असतो. त्या तीन पारिजतकांपैकी आमच्या पारिजातकाचं वैभव कहि निराळंच होतं. त्यावेळी आमचं अंगण अगदी नियमित सारवलं जायचं. हे झाड जरा आतल्या बाजूला होतं. त्यामुळे वावर जरा मर्यादित होता. चंगलं विस्तीर्ण झाड. खाली सारवलेलं अंगण आणि त्यावर पडलेला केशरी देठांच्या पांढऱ्याशुभ्र फुलांचा सडा. हे दृश्य बघण्यासाठी आईकडे पहाटे उठण्यासाठी हट्ट. ते बघण्यात जे सुख मिळायचं त्यालच तर ईश्वराचं सानिध्य म्हणत नसतील? ईश्वरावरून आठवलं, पुढच्या अंगणात तुळशीमाई आणि आवळी. चातुर्मासात काकड आरतीनंतर आवळी भोजनाचा कार्यक्रम होई.

कुन्दाचा वेल तर इतका मोठा आणि जुना होता की वेलीचा दोरखंड झाला होता. थेट वरच्या मजल्यापर्यंत पोचलेला हा वेल जुलै महिन्याच्या सुमारास चांदणीसारख्या फुलांनी भरून जायचा. बघून वाटायचं जणू एखाद्या युवतीची भरदार, लांबसडक वेणी आणि त्यावर खोवलेली तारकाफुले.

मे महिना सुट्टीचा, मजेचा पण त्याच बरोबर उन्हाळ्याचा. मधुमालतीला बहर उन्हाळ्यातच. दिवसभराचं ऊन कलतं झलं की खराटा घेऊन अंगण लख्ख करायचं, सडा शिंपायचा, एवढं होइतो मधुमालतीच वेल सांजवार्‍याने डोलु लागे. मदमस्त वासाच्या, झुमक्यासारख्या गुच्छाने लटकणाऱ्या कळ्या उमलताना पांढुरक्या गुलाबी, मग सुरेख गुलाबी आणि रात्र वाढेल तशा लाल होत जाणाऱ्या. सन्ध्याकाळच्या कळ्या सकळी लालचुटुक. अगदी ’कोठुनी हे आले येथे, काल संध्याकाळी नव्हते’ या धर्तीवर. ह्या माझ्या लाडक्या मधुमालतीचा माण्डव मी मलेशियातील एका उद्यानात पाहिला आणि हरखूनच गेले. नटण्या मुरडण्याची हौस कोणत्या मुलील नसते? मलाही होती. पण सौंदर्यप्रसाधनं आजच्यासारखी सहज उपलब्ध्ही नव्हती आणि वापरलीही जात नव्हती. मग काय, मधुमालतीच्या गुलाबी, लाल पाकळ्या घ्यायच्या आणि ओल्या करुन नखांवर चिकटवायच्या. झालं सुन्देर नेल-पालिश, तेही इको फ़्रेन्डली! मी अगदी खात्रीने सांगते ती शेड मिळणं बहुधा अशक्यच.

ज्याने गुलबाक्षीचं फुल पाहिलं असेल त्यालाच कळेल गुलबाक्षी रंग कशाला म्हणतात. तसे याचे पांढरा, केशरी, पिवळा असेही रंग असतात. आणि ही रोपे जर एकत्र असतील तर एक फुलात दोन दोन रंगछटाही पहायला मिळतात. तर या गुलबाक्षीची फूलही संध्याकाळीच उमलतात. तिन्हिसांजेला टपोऱ्या, फुगीर कळ्या असतात. फुलतात तेव्हा अंधार पड्तो. मग फुलं कशी मिळणार? मग वेळ साधायची आणि त्या टपोऱ्या कळ्या खुडून ताम्हनात पाणी घालून ठेवायच्या. हात पाय धुवून ’शुभं करोति’ म्हणेस्तो कळ्या उमलत. मग तीन फुलांचा पहिला गट घेऊन केसांचे पेड वळावेत तशी एक एक फूल घेउन वेणी करायची

आणि शेवट दोऱ्याच्या तुकड्याने बंद करायची. या वेणीची गंमत अशी की एका बाजूने फुलांची ओळ तर दुसऱ्या बाजूने मण्यांची ओळ (फुलाच्या देठाच्या टोकाचे मणी). देव्हाऱ्यातल्या कमळाकार पात्राभोवती ही वेणी सुरेख बसायची, सुरेख दिसायची.

थोडीशी दुर्लक्षित असलेली फुलं म्हणजे अबोली, कोरांटी, कर्दळ, जास्वंद. अबोलीच्या सुकलेल्या बोंडांवर पणी टाकलं की फट फट फटाके वाजतात. कुंपणाशी असणारी काटेकोरांटी. काट्यासोबत फुलणारी, पांढऱ्या, केशरी क्वचित फिक्या जांभळ्या रंगाची. उग्र वासाची पण गजरा/ हार केला तर बघत रहावं अशी.

कर्दळही अशीच. फार मशागतीविना वाढणारी. याची पानं हळदीच्या पानासारखी आणि कर्टुल्यासारख्या दिसणाऱ कणसातून डोकावणारी लालचुटुक फुलं. आठवणी तर हिच्याशीही जोडलेल्या. लहानपणचा (आताचाही) एक आवडता पदार्थ म्हणजे पानगी. दूध साखर, वेलचीपूड आणि तांदुळाचं पीठ कालवून केळीच्या पानावर पातळ पसरायचं वर दुसरं पान झाकून ही पानजोडी तव्यावर दोन्ही बाजूनी शेकून काढायची. पानगी शिजली की पानं आपोआपच सुटून येतात. मग ती गरम गरम पानगी पुन्हा केळीच्या पानावरच घ्यायची, त्यावर लोणकढं तूप घालून, तूपची बोटं चाखत चाखत फस्त करायची. अहाहा! पण केळीची पानं नेहमीच उपलब्ध नसत मग आहेच आपली कर्दळ. कमी तिथे आम्ही. पानंही अशी मापात असतात की एका पानगीसाठी अगदी फिट्ट. परिजातकाच्या बाजूच्या कुंपणावर जास्वंद फुललेली असायची. त्याची फुलं काढताना सहजच ’परख’ मधील ’साधनाच्या’ तोंडचं ’मिला है किसीका झुमका ...’ हे गाणे गुणगुणलं जायचं. उगाचंच नायिका झाल्यासारखं!

विहिरीच्या बाजूला शेवगा आणि मुचकुंद. दुपारच्या वेळातले आम्हा पोरांचे आवडते उद्योग म्हणजे काठीने शेंगा पाडणं, कधी एखाद्याला झाडावर चढवणं, शेवग्याची फुलं गोळा करुन आईकडून भाजी करून घेणं, आणि एक.. खोडातला डिंक गोळा करणं. त्या डिंकाची लायकी तितपतच पण उगाच टाइमपास.

शेवग्याला खेटून होते ते मुचकुंदाचं झाड. हे झाड तितकं सहज न आढळणारं. याचा चांगला मोठा वृक्ष असतो. पळसासरखी दिसणारी पाने आणि उपयोगीही पळसासारखीच. याची पान घेऊनच तर मी पत्रावळ लावायला शिकले. पण मला खरी गंमत वाटायची ती त्याच्या फुलांची. कुठल्याही प्रकारे सौंदर्याच्या मापदंडात न बसणारी, तरीही स्वतःच्या वेगळेपणाचा ठसा उमटवणारी आणि म्हणूनच मला लोभवणारी. घंटेच्या आकाराची, ५-६ लांब पाकळ्यांची, आतपासून येऊन लांब लांब झुलणाऱ्या तुऱ्यांची. यलो आकर रंगाची, खरकागदी पोताची, जराश्या उग्र पण सूक्ष्म सुगंधाची. घर सोडल्यानंतर मी हे झाड दोनच ठिकाणी पाहिलं-पुण्याला तुळशीबागेतील राम मंदिरापाशी आणि मनालीहून परतीच्या प्रवासात एका विश्रांतीथांब्यावर.

या मुचकुंदाशी अशीच एक आठवण आहे. माझे थोरले काका आर्टिस्ट होते. ते आणि त्यांचे एक मित्र त्यांच्या चित्राच्या गुंडाळ्या आमच्या घरी ठेऊन गेले ते न्यायला परत आलेच नाहीत. कलंदर माणसं, दुसरं काय! इतकी सुंदर चित्र, काय करणार त्यांचं. शेवटी बाबांनी त्यातल्या एका मुक्तहस्त चित्राला शोभेलशी आणि खिशाला झेपेल अशी फ्रेम करून आणली आणि आमच्या त्या वेळच्या १० बाय १२ च्या भव्य (!) दिवाण्खान्यात लावली. आज आमचं खरोखरीच मोठ्ठं घर आहे आणि ते चित्रही तितक्याच दिमाखात लावलेलं आहे. या चित्राचं वैशिष्ठ्य हे की ते यलो ओकर आणि तपकिरी अशा उदास रंगछटेतील आहे तरीही आकर्षक आहे आणि य चित्रातील फुलं खचितच मुचकुंदाची.

कुंपणाच्या पलीकडे उभा बकुळवृक्ष. रुपानं थोडी डावी पण गुणानं उजवी अशी ही बकुळीची फुलं. हातात धरली तर दीर्घकाळ हातांन सुगंधी ठेवणारी. शांत, मंद पण दीर्घकाळ स्मरणात रहावं हे शिकवणारी. बकुळवृक्षही आता तितकासा दिसत नाही. भ्रमन्तीत दिसला तो पुण्याच्या शनिवार वाड्यात आणि उदयपूरच्या ’सहेलियों की बाडी’ च्या प्रवेशद्वाराशी.

कालौघात आता वाडे, चाळी नाहीश्या झाल्या. सुंदर वसहती आणि मुद्दाम रचलेल्या बागा आल्या. त्या निर्विवाद भरपूर नेत्रसुखही देतात, पर्यावरणाचे रक्षण करतात. पण हे सारं लंकेतील सोनं. म्हणूनच इतका रमणीय परिसर असूनही, घराघरातून कुंड्या दिसतात, कुठेतरी आपलेपणाची, स्वामीत्वाची जाणीव देणाऱ्या. माझ्या बाप्पाला, माझ्या सदाफुलीचं फूल देणाऱ्या.

धन्यवाद!

- नूतन

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

21 Oct 2014 - 3:24 pm | आयुर्हित

अतिशय छान प्रकारे माहिती मिळाली.

सोबत फुलांचे फोटो टाकता आले असते तर अजून टवटवीतपणा आला असता!
संमंला एक विनंती करून पहा.

वाचताना मनच जणू सुगंधी होऊन गेले!

प्रभाकर पेठकर's picture

27 Oct 2014 - 1:55 am | प्रभाकर पेठकर

खरंच सुंदर लेख. अर्थात, छायाचित्र असती तर अजून चार चाँद लागले असते.

स्पंदना's picture

27 Oct 2014 - 6:04 am | स्पंदना

खूप जुनी ओळख जणु नव्याने सामोरी यावी तसा लेख झालाय.

चौथा कोनाडा's picture

29 Oct 2014 - 10:56 pm | चौथा कोनाडा

मन प्रसन्न करणारा टवटवीत पुष्पचित्र ! सुंदर लेख !

पैसा's picture

8 Nov 2014 - 11:26 am | पैसा

फुलांसारखाच प्रसन्न लेख! नेहमी लिहीत जा तुम्ही!

सुधीर कांदळकर's picture

9 Nov 2014 - 12:45 pm | सुधीर कांदळकर

आवडले. सर्व झडाझुडपांची फुलांसहित प्रकाशचित्रासह माहिती लेखस्वरूपात वाचायला आवडेल

धन्यवाद.

सविता००१'s picture

9 Nov 2014 - 3:24 pm | सविता००१

एक सुरेख, सुगंधित लेख वाचायला मिळाला. अगदी लहानपणात फेरफटका मारून आले. पै ताई सारखंच म्हणते - नेहमी लिहीत जा तुम्ही!

सखी's picture

18 Nov 2014 - 2:11 am | सखी

वरील सर्वांशी सहमत.
सध्या इंदिरा संतांचे मृदगंध वाचतेय, त्यावर एका जेष्ठ परीचितांची प्रतिक्रिया होती की हे सहज, सोपे लिहलेलं ललित असलं तरी असं लिहणं सोप नाही, तुमचा लेख वाचुन मलाही तसेच वाटले, अजुन वाचायला नक्कीच आवडेल.

नूतन's picture

21 Nov 2014 - 7:46 pm | नूतन

मा़झ्या पहिल्या प्रयत्नाला दिलेल्या प्रतिसादबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल मनापसून आभार. पुढे लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेन