सिंहासन

मीराताई's picture
मीराताई in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 7:58 am

नव्यानेच आलेल्या त्या दोघ तरुणांशी प्राथमिक चर्चा झाली आणि सरदारांची भव्य मुद्रा समाधानाने उजळली. ते पाहून त्या दोघांनाही हुरूप आला. त्यांच्या आशांना पंखच पंख फुटले. सरदारांच्या मार्गदर्शनाने आपण किती धन्य झालो आहोत हे त्या दोघांनी पुन्हा एकदा आदबीने विदीत केले. सरदारांनी त्यांच्याकडे कृपाकटाक्ष टाकून एक मंद स्मित केले. आणि त्यांना आपल्या गोटात दाखल करून घेतल्याचा संकेत केला. आधीच रूजू झालेल्या शिलेदारांनी त्या नवागतांचे मोठया उत्साहाने स्वागत केले.

ते दोघे तरुण जात असता सरदार त्या दिशेने मोठया संतुष्ट मुद्रेने पाहात होते. त्यांच्या हाताशी सतत असणारा अतुल त्याच्यातल्या अंगभूत जिज्ञासेने हे सर्व काही पाहात होता, ग्रहण करत होता. त्याने पाहिले, सरदारांच्या मुद्रेवरील संतुष्टतेत पाहाता पाहाता एक कुत्सित भाव हलकेच तरळला. संतुष्ट स्मिताच्या जागी एक छद्मी हास्य तरळले. त्यांची मुद्रा त्या कुटिलतेच्या छायेने विरूप दिसू लागली. पण क्षणातच सावरून त्यांनी पुढील सूचना देण्यासाठी अतुलकडे पाहिले. आता त्यांची मुद्रा पुन्हा शांत आणि धीरगंभीर होती. हाही बदल अर्थात् अतुलला अपेक्षित असाच होता. सरदारांच्या चर्येवरचे आणि वर्तनातले हे असले सगळे सूक्ष्म चढउतार आणि बदलणारे रागरंग तो प्रत्यही जाणून घेत होता. अन् त्यातूनच त्याची मुळातली सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि तीव्र आकलनक्षमता परिपक्व झाली होती. सरदारांच्या मुद्रेवरील बदल जाणून त्या नवागतांकडे दर्याद्र दृष्टीने पाहणारा अतुल एकदम भानावर आला. सरदारांच्या सूचना आज्ञाधारकपणे ऐकू लागला.

तोही पूर्वी कधीतरी अशाच खूप मोठया आशा उराशी धरून त्यांच्याकडे दाखल झाला होता. सरदारांचे ज्ञान, त्यांचा दबदबा, अत्युच्च स्तरापर्यंत असणारे त्यांचे लागेबांधे, एकूणच त्यांच्या प्रभावाविषयी तो बरेच ऐकून होता. त्यांना प्रत्यक्षच भेटण्याची उत्सुकता त्याला लागून राहिली होती. लवकरचीच संधी साधून त्यांच्या भेटीसाठी मोठया उत्सुकतेने तो आला होता. मग काय? 'तो आला, त्याने पाहिले, आणि...
...आणि तो हरला!' सरदारांकडे येणाऱ्या प्रत्येकच तरुणाप्रमाणे!

सरदारांची उंचीपुरी आकृती, भव्य भालप्रदेश, गरुडचोचीसारखी बकदार, ठसठशीत आणि दीर्घ नासिका, अन् समोरच्या व्यक्तीचा नेमका ठाव घेणारी त्याला भेदून आरपार, दूरवर पोहोचणारी त्यांची ती त्या गरुडा सारखीच भेदक, तीक्ष्ण नजर! अर्थात वेळीप्रसंगी हीच तीक्ष्ण नजर मृदू होऊन कृपेचा वर्षावही करीत असे आणि मग समोरच्या व्यक्तीला आकाशच ठेंगणं होऊन जाई. त्यांची मधूर वाणी त्याला आश्वस्त करून टाकी. उच्च आणि भव्य आसनावर विराजमान झालेल्या त्या प्रभावशाली व्यक्तीसारखे मार्गदर्शक लाभणं म्हणजे आयुष्याचं सोनं होणं असंच त्याक्षणी अतुलला वाटलं होतं. उगाच आपण इतकी वर्षं इकडे-तिकडे भटकून वाया घालवली असाही विचार त्याच्या मनाला चाटून गेला. अर्थात् उशिरा का होईना तो त्यांच्या गोटात दाखल झाला होता. त्यांच्या इतर शिलेदारांसह आता तोही त्यांच्या कृपाछत्राखाली काम करत पुढे जाणार होता. खूप काही शिकणार होता. त्यांची मर्जी संपादन करण्यासाठी तो सर्व काही करायला तयार होता.

त्या प्रचंड किल्ल्यातली ही एक गढी होती. अशा कितीतरी गढया त्या किल्ल्यात होत्या. त्यांचे त्यांचे एकेक सरदारही होते. पण या सरदारांचा रुबाब आणि प्रभाव काही वेगळाच होता. भविष्यात त्या बाकी सर्वच सरदारांना मागे टाकून त्या प्रचंड किल्ल्यांतील ते सर्वेसर्वा बनतील ही दाट शक्यता होती. ती शक्यता ध्यानी घेऊनच, सर्वचजण त्यांचा आब राखीत होते. त्यांच्या गढीतला खजिना हा इतर सर्वांपेक्षा भरभक्कम होताच, पण त्याशिवाय त्या खजिन्याला जिवंत झऱ्यांचाही मोठाच आधार होता म्हणे! कदाचित त्यामुळेही असेल, सरदारांच्या व्यक्तिमत्त्वाला एक विशेष आभा प्राप्त झाली होती. त्यांचं सिंहासन त्या खजिन्यामुळे दिवसेंदिवस उंचच होत चाललं होतं.

अतुल दाखल झाल्यानंतर सरदारांनी त्याच्यासाठी खास वेळ काढून त्याच्याशी संवाद केला होता.त्याच्या जीवनाविषयीच्या कल्पना आणि त्याच्या कार्यक्षेत्रांतली त्याची स्वप्नं जाणून घेतली होती. त्यात रस घेऊन त्या कल्पनांना स्वत:च्याही कल्पनांच्या सुंदर झालरी लावून दिल्या होत्या. आपल्या स्वप्नांची जरतारी वेलबुट्टी रेखून त्याची स्वप्न आणखीनच सजवली होती. शिवाय नव्या-जुन्या सगळयांनाच एकत्र, पंखाखाली घेऊन ते आपल्या गढीच्या सर्वोच्च प्रगतीची स्वप्नंही रंगवत. अतुलला आता स्वर्ग दोनच बोटं उरल होता. आपल्या आणि हो, सरदारांच्याही स्वप्नपूर्तीसाठी अतुल जीव तोडून राबू लागला. रात्रीचा दिवस करू लागला. त्याची बुध्दिमत्ता, कल्पकता, कार्यशक्ती आणि त्याचा उत्साह यामुळे सरदार प्रसन्न होते. शिवाय नव्याने येणाऱ्या तरुणांना तो त्यांच्या लहानमोठया अडचणीत मदत करीत असे. सावरून घेऊन शिकवीत असे. त्यामुळे तर तो सरदारांचा उजवा हातच झाला होताग्. असाच कार्यमग्नतेत कितीतरी काळ गेला.

अलीकडे मात्र त्याचं चित्त काहीसं अस्वस्थ झालं होतं. त्याचा उत्साह आणि त्याचा सरदारांवरचा विश्वासही थोडा डळमळू लागला होता. त्याच्यावर कितीतरी जबाबदाऱ्या टाकल्या जात होत्या. त्यामुळे आपल्या महत्त्वाच्या स्थानाची जाणीव त्याला होत होती. पण त्या जबाबदाऱ्या होत्या त्या इतरांच्या संदर्भातल्या, गढीच्या कारभारातल्या! अन् त्याची स्वप्नं? त्याच्या कार्यक्षेत्रातल्या योजना? त्याचं भविष्य? त्याच्या आशा-आकांक्षा? त्यांची अवस्था मात्र अडगळीत टाकल्यासारखी झाली होती. सरदारांनी मोठया कौशल्याने रेखलेली सुबक जरतारी वेलबुट्टी धुळकटली होती. तिची झळाळी पार लोपली होती आणि त्याहूनही दु:खाची गोष्ट म्हणजे सरदारांना याची काही जाणीवच नव्हती. हे सगळं ते विसरूनच गेले होते की काय? अशीही शंका अतुलच्या मनात डोकावून जायची. त्यांच्यामागे कारभाराचा प्रचंड व्याप होता. त्या व्यापाचा भार उचलताना त्यांना मदतीची आवश्यकता भासत असे. अशावेळी त्यांच्या डोळयासमोर मुख्यत: अतुलच येई. त्याला ते आवर्जून मदतीला घेत होते. त्याच्यावर विश्वासाने विसंबून राहात होते. कधीतरी त्यांना त्याच्याही स्वप्नांची आठवण येई. मग त्याविषयी ते तळमळीने बोलत आणि आपण ते काहीही विसरलेलो नाही हे ते अतुलला जाणवून देत. अशा वेळी अतुलला मात्र राहून राहून वाटत राही की हे आश्वासन, ही कृपादृष्टी, हे मधुर शब्द हा चकवा आहे. यांची भुरळ आपल्याला पडू देता कामा नये. त्या कृपेमागे, त्या मधूर भासणाऱ्या जवळिकीमागे काहीतरी वेगळंच आहे ही शंका त्याला त्रस्त करून टाकी. अलीकडे वारंवार या विचारांनी तो व्याकुळ आणि विषण्ण होऊन जात असे.

अशातच सरदार काही कामानिमित्त दूरदेशी गेले होते. आता गढीचे दायित्व मुख्यत: अतुल आणि त्याचे सहकारी यांच्यावर होते. महत्त्वाची कामे झपाटयाने हातावेगळी झाली होती. अन् मग सैलावलेल्या वातावरणात गप्पा-टप्पा चालू झाल्या. बोलण्याच्या ओघात त्याच्या मनातली ही चिंता हुरहूर सहजच व्यक्त झाली आणि आश्चर्य म्हणजे उण्यापुऱ्या प्रत्येकानेच आपलीही अवस्था अशीच असल्याचे सांगितले. स्वप्नं हातातून निसटत चालली होती. काळ ओंजळीतल्या पाण्यासारखा वेगाने सरत होता. त्यांचे उसळते, सळसळते तारुण्य खंतावून कोमेजत चालले होते आणि सरदार? त्यांचे प्रौढत्व त्या तरुणांच्या सळसळत्या उत्साहाच्या सहवासाने फुलले होते. 'नुसत्या सहवासानेच का?' अतुलच्या मनात प्रश्न उभा राहिला. उत्तरही त्याचे त्यालाच मिळाले. जेवढे तरुण तिथे दाखल होत होते, तेवढे सगळे त्यांच्या अगदी 'आहारी' पडत होते अन् त्या तरुणांच्या तारुण्याच्या 'आहारानेच' सरदारांचे प्रौढत्व आजही असे सळसळते रहात होते. होय, हेच ते वास्तव होते. कठोर होते ते, कटू होते, पण अखेर हेच वास्तव होते आणि अतुलला ते स्पष्ट दिसले.

आणि मग एका एका प्रसंगातल्या सरदारांच्या मुद्रेवरील भावांची क्षणचित्रे त्याच्या दृष्टीपुढून सरकू लागली. कधी कृपाळू, कधी स्निग्ध, कधी स्वप्नाळू तर कधी धीरगंभीर, प्रभावी भासणारी त्यांची मुद्रा कधी क्षणभर हिशेबी भासे. कधी कुत्सित तर कधी कावेबाज वाटे. कधी त्यांची दृष्टी मुरब्बी राजकारण्यासारखी समोरच्या माणसाची उपयुक्तता आजमावणारी असे तर कधी चक्क ती झडप घालण्याच्या पवित्र्यात असलेल्या वाघासारखी असे. कधी त्या चर्येवर लाघट स्वार्थ दिसे तर चर्चेच्या ओघात अतुलच्या बुध्दीची चुणूक पाहून ते मत्सरग्रस्त झाल्याचेही कधीकधी स्पष्टच जाणवे. मात्र हे सर्व काही क्षणभरच आणि तेही सूक्ष्म निरीक्षण करण्यास सरावलेल्या नजरेला जाणवे. मग त्यांच्यातला काटेकोर हिशेबीपणा सत्वर जागा होई. कसलेल्या नटाप्रमाणे ते लगेचच पुन्हा चेहऱ्यावर सहज अशा मित्रत्वाच्या भावाचा बुरखा ओढून घेत. काही झाले तरी त्यांना त्यांच्या गोटात दाखल झालेला, नव्हे जमा झालेला, तो तारुण्याचा खजिना गमावायचा नव्हता.

आजवर हे सगळं अंधुक होतं. त्याला त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा पूर्ण अंदाज येत नव्हता. ते खूप गुंतागुंतीचं आहे, खूप जटिल आहे असंच त्याला वाटत असे. पण आज त्याला स्पष्टच जाणवले की त्या जटिलतेला कुटिलतेची मोठीच जोड आहे. किंबहुना त्या कुटिलतेचं अस्तरच त्या जटिलतेला जोडलेलं आहे.

अतुल सावध झाला. त्याला प्राप्त झालेले कठोर वास्तवाचे ज्ञान सर्वांनाच प्राप्त झाले आहे. काय याचा त्याने अंदाज घेतला. पण बहुतेकजण अजून अंधुक उजेडात चाचपडत होते. काहीजण बिचारे अजाण होते. काही दुबळे होते. काही भोळे होते. काही लाचार होते तर काही अगदी मूर्खसुध्दा होते. अस्वस्थ असूनही, अशा वेगवेगळया कारणांनी ते सरदारांच्या कृपाछत्रापासून दूर जाण्यास धजावत नव्हते. तो विचारही त्यांना करवत नव्हता. त्यांची ती मूर्ख निष्ठा पाहून अतुलला त्यांची चीड आली. त्यांच्या दुबळेपणाचा उद्वेग आला. दु:ख झाले. त्यांची कीवही आली. पण त्यांच्या आयुष्याचा विचार त्याने करून उपयोग नव्हता. त्यांच्या आयुष्यातले वास्तव त्यांनीच पहायला हवे होते. ते उमजून घेऊन त्यांचे निर्णय त्यांनीच घ्यायला हवे होते. स्वत:चा मार्ग निश्चित करून तो त्यांनी स्वत:च आक्रमायला हवा होता. आपण मात्र यापुढे गढीच्या कारभाराची ओझी उचलण्यात काळ दवडायचा नाही असे त्याने मनोमन ठरवले.

आता तो सरदारांचे वागणे अधिकच बारकाईने पारखू लागला. त्यांच्या चेहऱ्यावरचे बदलते रंग निरखू लागला. त्यांच्या शब्दांचे वजन तोलू लागला. त्या शब्दांचे फोलकट दूर सारून त्यातले तथ्य शोधू लागला. त्यांच्या सर्वच योजना आणि कल्पनांचा हिशेब मनात ठेवून त्यांचे कावे आजमावू लागला आणि हे सारे करताना आपले आडाखे योग्यच होते हे त्याला खात्रीपूर्वक उमजून आले. इथून आता सुटका करून घ्यायची ती केव्हा आणि कशा रितीने याचा विचार तो करू लागला. आपल्या मनातल्या या खळबळीचा पत्ता सरदारांना लागणार नाही अशी काळजी घेत तो योजना आखू लागला. निद्रेची आराधना करण्याऐवजी त्याच्या रात्री अशा विचारात जाऊ लागल्या...

... आणि अशातच आज दाखल झालेले ते कोवळे, भोळे, उत्साही, बुध्दिमान तरुण! त्यांचाही विचार त्याच्या मनात त्यालाच न जुमानता येत होता. इथे या गढीत गाडले जाण्यापूर्वीच त्यांना जागे करावे का? बाहेरच्या मोकळया हवेत श्वास घेण्यासाठी त्यांनाही इथून बाहेर काढावे का? त्यांना हे पटेल का? असल्या विचारात रात्र कशी गेली ते त्याला समजलेच नाही.

कसाबसा तयार होऊन जडावलेल्या डोळयांनीच तो सकाळी सरदारांच्या मिदीस हजर झाला. दोघे नवागत अपार उत्साहाने आधीच सादर झाले होते. त्यांच्या बाजूला अदबीने उभे होते. सरदारांना अभिवादन करून तोही एका बाजूला उभा राहिला. त्याचे लक्ष सरदारांच्या तरतरीत मुद्रेकडे वेधले. त्याच्या चर्येवर एक सूक्ष्म नाराजी उमटली आणि दुसऱ्याच क्षणी आश्चर्यही!...

सरदारांचे सिंहासन आणखीन् दोन बोटे वर उंचावले होते!

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

एस's picture

21 Oct 2014 - 7:49 pm | एस

रूपक आवडले. पुढे वाचायला आवडले असते.

प्रभाकर पेठकर's picture

21 Oct 2014 - 8:16 pm | प्रभाकर पेठकर

नीटसे कांही कळले नाही.

विशाखा पाटील's picture

21 Oct 2014 - 9:59 pm | विशाखा पाटील

उत्तम लिहिलंय. समाजात अनेक क्षेत्रात चालणारी व्यक्तिपूजा, दांभिकता, समूहामागे जाण्याची वृत्ती रूपकात्मक मांडलीय.

सस्नेह's picture

22 Oct 2014 - 2:49 pm | सस्नेह

कटू वास्तवाची झळझळीत अभिव्यक्ती.
कथा अधुरी वाटली