दयेव...

धन्या's picture
धन्या in विशेष
5 Sep 2014 - 1:10 am
श्रीगणेश लेखमाला २०१४

"तुमी कदी घरी जानार हाव?" मी बाबांना विचारलं.
घरी म्हणजे गावी, कोकणात. आठवडाभराने गणपती येणार होते. दोन काका, तीन आत्या सारेच मुंबईला. आम्ही पुण्याला. तयारी करण्यासाठी कुणीतरी लवकर गावी जाणं आवश्यक होतं.
"येग्दिवस तरी आदी जाया लागंल. आरास कराय पायजे ना." बाबांचं उत्तर.

आरास म्हणजे गणपतीच्या बैठकीची सजावट. मी कॉलेजला जायच्या वयाचा होईपर्यंत आमच्या गणपतीची आरास म्हणजे एक दिव्य प्रकार होता. गणपती एव्हढया उंचीवर बसवला जायचा की आम्हा लहान मुलांचा हात गणपतीच्या पायापर्यंतही पोहचत नसे. साधारण १९६० च्या आसपास माझे आजोबा आणि त्यांचे दोन भाऊ यांनी फक्त साडे पाचशे रुपयांत घर बांधले. अर्थात तेव्हा साडे पाचशे रुपयेसुद्धा खुप मोठी रक्कम होती. तेव्हाचा नवसाचा गणपती आमचा. म्हणजे "द्यावा यावडा आमचा घर बांदून व्हवदे. तुला वाजत गाजत घरी आनू" असा नवस बोलून सुरु केलेला. तेव्हापासून जे पत्र्याचे डबे आणि ट्रंका आरास करण्यासाठी वापरल्या गेल्या त्या काल परवापर्यंत. ट्रंका आणि पेटया एकावर एक ठेवल्या जायच्या. त्यांच्यावर मंडप सजवायचे कापड लपेटले जायचे. सगळा नजारा रावणाकडे शिष्टाईला गेलेल्या अंगदाच्या आसनासारखा. उंच. मी कॉलेजला जाऊ लागल्यावर त्या डब्यांना आणि ट्रंकाना कायमचे अडगळीत टाकले आणि सुटसुटीत सजावट करु लागलो.

यथावकाश गणपती पुजनाच्या एक दिवस आधी गावी गेलो. आत्या आणि काकांनी आजोबांच्या जुन्या घराची साफसफाई सुरु केली होती. आमचं, माझ्या काकांची आणि चुलत काकांची गावात आपापली घरे झाल्यामुळे हे पीढीजात घर वर्षभर बंद असतं. फक्त गणपतीला आणि माझ्या आजी आजोबांच्या वर्षश्राद्धालाच उघडलं जातं. गणपतीला सारेच गावी येतात. काका, चुलत काका, आत्या, चुलत आत्या. त्यांची मुलं. नातवंडं. घर अगदी गजबजून जातं.

ईलेक्ट्रीसिटी बोर्डाने कनेक्शन तोडलं होतं. मोठया मिनतवार्‍या केल्यांनतर गावावर नेमलेला वायरमन जोडणी करुन दयायला आला होता. गावात वायरमन आला आहे हे कळताच गावातल्या वाणीण काकू वायरमनला बोलवायला आल्या होत्या. त्यांच्याही घरची लाईट गेली होती.
"काकू कशा हाव?"
"मी बरी हाय. तू बरा हायेस ना?"
"हो. मी पन बरा हाय."
अगदी औपचारीक संवाद. उत्तर कोकणात कुठेही ऐकू येणारा.

वाणीण काकू वाणीशेठची दुसरी बायको. हे जोडपं त्यांच्या जातीनेच ओळखलं जातं. आम्ही वैश्यवाणी. गावात काही घरं कुणब्यांची. नुसते वाणी असणारे हे एकच घर. त्यांची फक्त वाणी ही जात आमच्या वैश्यवाणी जातीपेक्षा उच्च समजली जायची. त्यामुळे वाणीण काकू आणि वाणीशेठना गावात मान आहे. वाणीशेठना पहिल्या बायकोपासून सुशीला म्हणून मुलगी आहे. साधारण वेडसर असल्यामुळे नवर्‍याने टाकून दिलेली. सारं गाव सुशीलाला "सुशाबाया" म्हणून हाक मारतं. वाणीण काकूंनाही एक मुलगी. दिल्या घरी सुखी असणारी. मात्र मुलगा नसल्याची खंत काकू वेळोवेळी बोलून दाखवायच्या. वाणीशेठ गावच्या भजनाचे तबलजी. कालपरवापर्यंत वार्धक्याने मृत्यू होईपर्यंत म्हातारा कानाचे दडे बसल्यामुळे देव देवळातून पळून जाईल ईतक्या मोठयाने तबला, पखवाज आणि मृदंग ठोकायचा.

"काकू काय म्हनतेत गनपती?" काही तरी म्हणायचं म्हणून मी काकूंना म्हटलं.
"हो... तुमचं आलंत गनपती आनी आमचा..." वाक्य अर्धवट सोडून काकू अचानक रडू लागल्या. काकूंचं नवरा गेल्याचं आणि मुलगा नसल्याचं दु:ख एक झालं होतं.

वटानात गेलो. घराच्या हॉलसदृष्य भागाला वटाण म्हणतात. दर्शनी दरवाज्याला लागून वटी. वटी म्हणजे ओसरी. वटीच्या पुढच्या भागात पडवी. पडवी म्हणजे घराच्या जोत्याच्या एका कोपर्‍यापासून दुसर्‍या कोपर्‍यापर्यंत पसरलेला पाच सहा फुट रुंदीचा घराचा चिंचोळा भाग जो बहूधा घराच्या भींतीला धरुन असतो.

"हा कोण?" वटानात दिगंबर अवस्थेत सताड हात पाय पसरून आडवा झालेल्या दोन अडीच वर्षांच्या बाळाकडे पाहून मी विचारलं.
"शेर्‍या हाय तो". एका आत्याच्या पाच वर्षांच्या चिमुरडीने मला माहिती दिली.
"शेर्‍या नाय श्रेया" अजून एका चिमुरडीने माझ्या ज्ञानात भर घातली. ही छोटी मुलगी माझ्यापेक्षा सहा सात वर्षांनी लहान असलेल्या माझ्या आतेबहिणीची मुलगी.
"पन श्रेया तं पोरीचा नाव आसतो ना?" माझा बाळबोध प्रश्न.
श्रेयस होतं त्याचं नांव. माझ्या आतेबहिणीचाच लहान मुलगा. पठ्ठया माझ्याकडे खाऊ की गिळू अशा नजरेने पाहत होता. माडगुळकरांच्या झेल्यासारखा. त्याचा नावाचा मी केलेला पंचनामा बहुतेक त्याला आवडला नसावा.

मन झर्रकन भूतकाळात गेलं. पंधरा एक वर्षांपूर्वी आतेबहीणीला, श्रेयसच्या आईला ती श्रेयसच्याच वयाची असताना मी खांदयावर बसवून खलाटीत फीरवत असे ते आठवलं. खलाटी म्हणजे पीक काढल्यानंतर रीकामी झालेली शेते. काळ किती भरभर सरकत असतो.

सकाळी अर्धवट झोपेत असताना घरात लगबग चालू आहे हे जाणवलं.
"चला चला. उटा. दयेव आनायला जायचा हाय ना", बाबा भाच्याला जागं करत होते.

गणपती पुजनाच्या दिवशीची ही लगबग अंगवळणी पडली आहे. घाई घाईत आंघोळ उरकायची. छत्र्या घ्यायच्या आणि गोरेगावच्या वाटेला लागायचे. गणपती आणायला. घरातल्या जाणत्यांपैकी कुणीतरी बाजावाल्याला बोलवायला जातं. बाजा म्हणजे ढोलकी, टीमकी आणि पिपेरी. टीमकी हे ढोलकीचं हाय पीच व्हर्जन. पिपेरी म्हणजे गावठी बनावटीची सनई. बाजावाला आदीवासी. "आता येतो रं खोत" म्हणून तो जवळपासचे दोन तीन गणपती घरी सोडून यायचा. आम्ही "खोत" लोक तोपर्यंत गणपतीच्या कारखान्याशी ताटकळत उभे. कुळकायदा येऊन अर्धशतक लोटलं असावं. मात्र खोतांची जमिन कसणार्‍या कुळांच्या बोलण्यातून मात्र खोत शब्द अजूनही गेला नाही.

..."दर्शनमात्रे मन कामनापूर्ती... जय दयेव जय दयेव..." पारंपारीक भजनांच्या चालीत आरती सुरु होती. पखवाज आणि टाळांचा आवाज घुमत होता. सवयीमुळे यांत्रिकपणे माझे हात टाळ्या वाजवत होते. आरतीत लक्ष नव्हतं. गणपतीकडेही नव्हतं. नजरेच्या पडदयासमोरुन भूतकाळ झरझर सरकंत होता...

"तू लय बारीक व्हतास तवा गनपती घालवताना ज्याम रडला व्हतास. नुसता आमचा दयेव बुडवू नुका, आमचा दयेव बुडवू नुका म्हनून वरडत व्हतास". मी कळायच्या वयाचा झाल्यावर काही वर्ष आत्या माझी ही आठवण गणपतीच्या दिवसांमध्ये आवर्जून सांगायच्या.

गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि रात्री चंद्र पाहायचा नसतो. पाहिला तर पाहणार्‍यावर चोरीचा आळ येतो. अशी पुराणकथा. याला पुरावा म्हणजे स्यमंतक मण्याची अजून एक पुराणकथा. मात्र या गोष्टीची आमच्या लहानपणी प्रचंड दहशत होती. संध्याकाळी पाच साडे पाच नंतर अगदी दहा वाजेपर्यंत आम्ही मान खाली घालून चालत असू. तरीही कसा कोण जाणे, चंद्र दिसायचाच. बहूधा संध्याकाळी गुरं पाण्यावर नेताना. मात्र चंद्र पाहील्यावर चोरीचा आळ न येण्यासाठी एक तोडगा होता. रात्री उशीरा कुणाच्या तरी परसावातील भाजीपाल्याची नासधूस करायची, कुणाच्या तरी वटीवर हागून ठेवायचे. सकाळी उठल्यावर त्या घरवाल्यांनी शिव्या दिल्या की हा आळ चुकतो असा समज होता. गावात तीन चार ठीकाणी तरी हा तोडगा वापरला जायचा. त्यामुळे दुसर्‍या दिवशी शिव्यांची लाखोली न चुकता ऐकायला मिळायची. मंत्रपुष्पांजलीसारखी.

पुढे नोकरीनिमित्त गाव सोडलं. तरीही गणपतीला मात्र न चुकता गावी जात होतो. देश सोडल्यानंतर मात्र गणपतीला येता येणं शक्य नव्हतं. आरतीच्या वेळी मोबाईल चालू ठेवायला सांगितला. जन्माला आल्यापासून घरच्या गणपतीच्या आरतीला हजर नसण्याची ही पहिलीच वेळ होती. फोनवर आरती ऐकत असताना डोळ्यांत अश्रू जमा झाले होते.

आरती संपल्यावर आजोबांशी बोललो.
"बाला, मी काय आता तू परत येईपरत र्‍हाईत नाय." आजोबांचा स्वर कातर झाला होता.
आजोबांनी त्यांचे म्हणणे खरे केले. जेमतेम आठवडाभरात त्यांनी देह ठेवला. मला त्यांचे अंत्यदर्शनही घेता आले नाही.

परदेशातून परत आलो. तशीही घरात गौरी येतेच ना तर दिड दिवसांचा गणपती गौरी विसर्जनापर्यंत ठेवूया म्हणून घरच्यांना राजी केले. "बामनांकड बगून ठरव काय तो" हा घरच्यांचा मुद्दा देव घरात ठेवायला ब्राम्हणाला कशाला विचारायला हवे असा युक्तीवाद करुन निकालात काढला. दिड दिवसांचा गणपती आता गौरी आवाहन आणि विसर्जनाच्या तिथींनुसार पाच सहा दिवसांचा झाला.

हे सारं होत असताना मी ही विचारांनी बदलत होतो. नदीकिनारी स्मशानाच्या बाजूला भयाण शांततेत असणार्‍या शिव मंदीराच्या काळोख्या गाभार्‍यात शंकराच्या पींडीसमोर तासन तास बसणारा मी "देव नाही" असे मानणारा कट्टर नास्तिक झालो. हळूहळू हा नास्तिकतेचा टोकदारपणाही बोथट होतोय. जगण्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये "देव आहे की नाही?" हा प्रश्नच "इर्रीलेव्हंट" होऊ पाहतोय.

मात्र हा घरचा "दयेव" कदाचित "इर्रीलेव्हंट" नाही होणार. तसं झालं तर माझं अर्धं आयुष्यही "इर्रीलेव्हंट" होऊन जाईल.

प्रतिक्रिया

रामपुरी's picture

5 Sep 2014 - 1:23 am | रामपुरी

...
गणपतीला घरी जाता येत नाही हि खंत परत एकदा जागी झाली. इथले गणपती नावापुरतेच असतात. पण आरती चालू झाली कि मी जुन्या काळात पोहोचतो. आजोबा आरती करत असतात आणि आम्ही गुडघ्याएवढी पोरं आमच्या ताकदीच्या बाहेरच्या आवाजात आरत्या म्हणत असतो..... :( :( :(

प्यारे१'s picture

5 Sep 2014 - 1:34 am | प्यारे१

सच्चं लिखाण आवडलं.
खूपच आवडलं. नदीकाठी बसून वाहणार्‍या पाण्याकडं नुस्तं बघत रहावं असं लिखाण वाटलं. आत्ममग्न.
बाकी कुठलंच टॅगिंग करण्याची दैनंदिन जीवनात तितकीशी आवश्यकता नाही असं मला वाटतं.
आणि हो, लिहीत रहा.

स्पंदना's picture

5 Sep 2014 - 4:02 am | स्पंदना

सुरेख प्रतिसाद!

कवितानागेश's picture

5 Sep 2014 - 7:44 pm | कवितानागेश

लिहित रहा. :)

बहुगुणी's picture

5 Sep 2014 - 1:42 am | बहुगुणी

सुरेख लिहिलं आहेत, धन्याशेठ!
हळूहळू हा नास्तिकतेचा टोकदारपणाही बोथट होतोय. जगण्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये "देव आहे की नाही?" हा प्रश्नच "इर्रीलेव्हंट" होऊ पाहतोय. मात्र हा घरचा "दयेव" कदाचित "इर्रीलेव्हंट" नाही होणार. तसं झालं तर माझं अर्धं आयुष्यही "इर्रीलेव्हंट" होऊन जाईल. हे अप्रतिम!

स्पंदना's picture

5 Sep 2014 - 4:01 am | स्पंदना

मला सुद्धा हा शेवटचा प्यारा फार आवडला.

स्पंदना's picture

5 Sep 2014 - 4:05 am | स्पंदना

धनाजीराव अतिशय सुरेख; झुळुझुळु वाहणार्‍या प्रवाहासारखं लिखाण.
बाकि तुमचा चंद्र प्रकार आम्हीही भोगलाय. पण आमच्याकडे इतकं भयानक परकरण नव्हत याचं. आम्ही आपले कुणाच्यातरी घरावर खडे मारायचो अन शिव्या खात पळायचो. तुमच प्रकरण जरा लय डेंजर मध्ये मोडतयं. अक्षरशः ख्यां ख्यां करुन हसले.
आणि हो ती घरातल्या खोल्यांची नावे आवडली.

खटपट्या's picture

5 Sep 2014 - 5:05 am | खटपट्या

धन्या, थोड्याफार फरकाने माझ्याच गावचा गणपंती उत्सव डोळ्यासमोर आला. तुम्ही उत्तर कोकणातले आणि आम्ही दक्षिण. बाकी गावची घरे ती गावची घरे. गावी गेल्यावर जुने घर माझ्याशी बोलते. आपण किती साता समुद्रापार गेलो तरी गावच्या घरी गेल्यावर वेगळाच अनुभव येतो.

अजया's picture

5 Sep 2014 - 8:08 am | अजया

अतिशय आवडलं.शेवटच्या परिच्छेदाशी रिलेट करता येत असल्याने जास्त!

सरळ साधं लेखन आवडतं तुमचं. ह्या दयेवाच्या उत्सवातल्या लहानपणापासून जमलेल्या आठवणी खरंच लोभस आहेत. 'सगळ्यांनी एकत्र जमणं' हीच खरी साजरी करण्याची गोष्ट असते त्यातली.
प्यारे१चा प्रतिसादही छान आहे.

किसन शिंदे's picture

5 Sep 2014 - 9:01 am | किसन शिंदे

लेखन आवडलं.

प्रशांत's picture

5 Sep 2014 - 10:25 am | प्रशांत

धन्या तिशय सुरेख लेखन

अनुप ढेरे's picture

5 Sep 2014 - 10:31 am | अनुप ढेरे

खूप आवडला लेख

नंदन's picture

5 Sep 2014 - 10:36 am | नंदन

आवडला. आठवणींच्या गर्दीत शेवटी अलगद अंतर्मुख झालेला.

प्रभाकर पेठकर's picture

5 Sep 2014 - 10:43 am | प्रभाकर पेठकर

अतिशय मनापासून लिहीलेलं लेखन थेट वाचकाच्या मनाला जाऊन भिडतं. गणेशचतुर्थीच्या दिवशी चंद्रमुख न पाहण्याचं बंधन आणि (कदाचित म्हणूनच) ते पाहिलं जाण्याचा प्रमाद माझ्याही लहानपणी माझ्याकडून अनेकदा घडला आहे. पण त्यावरचा उतारा माहित नव्हता.
>>>> फोनवर आरती ऐकत असताना डोळ्यांत अश्रू जमा झाले होते.
आणि हे वाचताना माझ्याही.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Sep 2014 - 6:15 pm | अत्रुप्त आत्मा

@फोनवर आरती ऐकत असताना डोळ्यांत अश्रू जमा झाले होते.
आणि हे वाचताना माझ्याही. >>> +++१११

चांगलंय हो दादा...फारच नेमकं जमलंय!

(बाकी ते आरास वगैरेचे अर्थ नाही हो सांगायला लागत!! आपले सगळेच वाचक कोकणातले नाहीत, म्हणून काही अगदीच 'हे' पण नाहीत!)

बाळ सप्रे's picture

5 Sep 2014 - 11:01 am | बाळ सप्रे

छान लेख !
नोस्टाल्जिक होणं स्वाभाविकच आहे..
पण भावना तुमच्या आजच्या विचारांना वरचढ ठरल्या.. पूर्वीचं अर्ध आयुष्य इर्रीलव्हंट होउ नये म्हणून गणपतीचं देवपण जपताय !

माझ्या किंवा इथल्या बर्‍याच जणांच पूर्वीचं आयुष्य/ विचार असच असेल कदाचित..
पण ईट्स ओके ते तेव्हाचे विचार होते हे स्वीकारून मी आजच्या विचारांना वागण्यात प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतो.. कुणाला न दुखावता असं करणं शक्य असतं..

एस's picture

5 Sep 2014 - 11:43 am | एस

हळूहळू हा नास्तिकतेचा टोकदारपणाही बोथट होतोय. जगण्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये "देव आहे की नाही?" हा प्रश्नच "इर्रीलेव्हंट" होऊ पाहतोय.

वर सप्रेसाहेब म्हणाले तसे आजच्या विचारांशी प्रामाणिक राहणे मलाही महत्त्वाचे वाटते.

सौंदाळा's picture

5 Sep 2014 - 11:08 am | सौंदाळा

लेख अत्यंत आवडला, भिडला

स्पा's picture

5 Sep 2014 - 11:20 am | स्पा

सुरेख ललित

विटेकर's picture

5 Sep 2014 - 11:42 am | विटेकर

आवडले !

मूकवाचक's picture

6 Sep 2014 - 4:31 am | मूकवाचक

+१

मधुरा देशपांडे's picture

5 Sep 2014 - 12:13 pm | मधुरा देशपांडे

सुंदर.

अप्रतिम.......अंतर्मुख करणारे......

मनिष's picture

5 Sep 2014 - 1:23 pm | मनिष

अगदी मस्त झालाय लेख. खूप जिवाभावाच्या मित्राशी रात्री उशीरापर्यंत गप्पा माराव्यात आणी अशा जुन्या आठवणी जागवाव्या तसा झालाय लेख!! खूप मनापासून लिहलेला आणि मनापर्यंत पोहोचलेला. जियो!!!!

माझाही नास्तिकपणा बोथट होत असल्याने शेवटचा पॅरा अगदीच भिडला -

हे सारं होत असताना मी ही विचारांनी बदलत होतो. नदीकिनारी स्मशानाच्या बाजूला भयाण शांततेत असणार्‍या शिव मंदीराच्या काळोख्या गाभार्‍यात शंकराच्या पींडीसमोर तासन तास बसणारा मी "देव नाही" असे मानणारा कट्टर नास्तिक झालो. हळूहळू हा नास्तिकतेचा टोकदारपणाही बोथट होतोय. जगण्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये "देव आहे की नाही?" हा प्रश्नच "इर्रीलेव्हंट" होऊ पाहतोय.

पिलीयन रायडर's picture

5 Sep 2014 - 1:48 pm | पिलीयन रायडर

सुंदर...!

प्रांजळ आणि सहज लेखन आवडले.
प्रत्येकीने आपल्या आस्तिक अन नास्तिकतेचा धांडोळा घ्यावा या लेखावरून.

सस्नेह's picture

5 Sep 2014 - 2:27 pm | सस्नेह

'प्रत्येकाने' असे वाचावे.

लेख भूतकाळात घेऊन गेला. काहीतरी लिहावं असं आता मला पण वाटतंय!! :)

अतिशय सुंदर आणि तरल लेख आवडला.

माझ्यापण गावच्या गणपतीच्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Sep 2014 - 3:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

लिखाण मनाला भिडलं.

आस्तिक-नास्तिकतेचा हिंदोळा असणे हे एकाच जागी न थबकलेल्या, सगळी कवाडे बंद न केलेल्या, जिवंत, विचारी मनाचं ल़क्षण आहे... ते चांगलं आहे ! त्याने नक्की उत्तर मिळेलच असे नाही, पण मन खुले आणि जिवंत जरूर राहील.

vikramaditya's picture

5 Sep 2014 - 3:18 pm | vikramaditya

फार आवडला. लेखाअंतीचा प्रांजळ्पणा भावला.

कालाय तस्मै नमः

पैसा's picture

5 Sep 2014 - 5:43 pm | पैसा

खूप सुंदर लिहिलंस! मस्त!

देव, धर्म या गोष्टी इर्रिलिव्हंट झाल्या तरी घरातली एखादी गोष्ट, पद्धत याचा घरच्या सर्वांबरोबर आनंद घेणे इर्रिलिव्हंट होत नाही. यात गणपती हा देव, वगैरे काही मानलं आहे असं वाटत नाही. अशा गोष्टींबरोबर चिकटून येणार्‍या अनेक आठवणी, जशा की तुझ्या आजोबांबरोबरचं शेवटचं संभाषण, जमणारे सगळे पाहुणे, नैवेद्य, मोठमोठ्याने ओरडून म्हणायच्या आरत्या अशा इतरही अनेक आठवणी आयुष्यभर जमा केलेल्या असतात. त्यांची लाज वाटावी असं काही नसतं. तशीही या सगळ्यात फार गंमत असते. बघायची दृष्टी हवी.

मात्र हा घरचा "दयेव" कदाचित "इर्रीलेव्हंट" नाही होणार. तसं झालं तर माझं अर्धं आयुष्यही "इर्रीलेव्हंट" होऊन जाईल.

अगदी पटलं. इथे "द्येव" हे त्या सगळ्या आठवणींचं नाव आहे. त्या पुसू नयेतच.

अर्धवटराव's picture

5 Sep 2014 - 5:57 pm | अर्धवटराव

मनातला ओलावा डोळ्यातुन प्रकट झाला. हि स्निघ्नता अशीच जपली जावी. त्याचा 'फायदा' काहिच नसतो...पण प्रत्येक गोष्ट फायद्यासाठी असु पण नये.

सांधं, मनातून आलेलं आवडलं रे.

दिवाळी पेक्षा गावचा गणपती (जरी घरी बसत नसला तरी) नेहमीच जास्त जवळचा वाटायचा.
परदेशात आल्यापासुन सध्या देखल्या देवा दंडवत करतो लांबूनच.

आनन्दिता's picture

5 Sep 2014 - 7:06 pm | आनन्दिता

गेले काही दिवस याच सगळ्या विचारचक्रातुन जातेय.. तोच तो नॉस्टॅल्जिया, :(

यशोधरा's picture

5 Sep 2014 - 7:56 pm | यशोधरा

काय सुरेख लिहितोस!

अप्रतिम लिहलयं! पहील्या गौरी-गणपतीला माहेरी नसल्याचं इतकं वाईट्ट वाटलं होतं ते आठवलं. आता जिथे आनंद मिळतो तिथे मिळवते आणि वाटतेही.
वरचे प्रतिसादही आवडले - इनी म्हणाली तसं मलाही हे पटतं, नंतर खुपदा तेच आठवतंही. 'सगळ्यांनी एकत्र जमणं' हीच खरी साजरी करण्याची गोष्ट असते त्यातली.

टिवटिव's picture

5 Sep 2014 - 11:40 pm | टिवटिव

मस्त लिहिलय...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Sep 2014 - 2:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

धनाजीराव, तक्रार आहे. गावाकडचा गणपती, जुन्या आठवणी हे सगळं तालेवार लिखाण केलंत तसाच पुढचा कट्टर नास्तिक, कडवेपणा जाणारा नास्तिक असा प्रवास का नाही लिहीलात? या प्रवासाबद्दलही "होऊ द्या (शाब्दिक) खर्च".

मनिष's picture

7 Sep 2014 - 11:38 am | मनिष

सहमत. हा प्रवासही वाचायला आवडेल!

अन्या दातार's picture

6 Sep 2014 - 6:12 am | अन्या दातार

अप्रतिम लेख. __/\__

नगरीनिरंजन's picture

6 Sep 2014 - 12:26 pm | नगरीनिरंजन

मस्त लिहिलंय! अतिशय आवडलं.

आतिवास's picture

6 Sep 2014 - 3:53 pm | आतिवास

लेख आवडला.
प्रांजळ आणि कसलाही अभिनिवेश नसणारं प्रामाणिक लेखन!

खेडूत's picture

7 Sep 2014 - 9:29 am | खेडूत

छान लेख!
कोकणातला गणेशोत्सव अनुभवण्याची अनेक वर्षांची इच्छा आहे.
तुम्ही तर अगदी गावी घेऊन गेलात! धन्यवाद.

कंजूस's picture

7 Sep 2014 - 12:58 pm | कंजूस

वा !लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही आवडले .

कंजूस's picture

7 Sep 2014 - 1:06 pm | कंजूस

१

२

सुहास..'s picture

10 Sep 2014 - 11:23 pm | सुहास..

:) मस्त !!

mbhosle's picture

11 Sep 2014 - 11:30 am | mbhosle

छान लेख.

मृत्युन्जय's picture

11 Sep 2014 - 11:36 am | मृत्युन्जय

मस्तच लेख हो धन्याशेठ. तुमच्या मनातही गणपतीसाठी एक हळवा कोपरा असेल असे वाटले नव्हते

बबन ताम्बे's picture

11 Sep 2014 - 6:18 pm | बबन ताम्बे

मस्त वर्णन केलेय. रुखरुख लागून रहाते जूना काळ आठवला की.

मुक्त विहारि's picture

11 Sep 2014 - 10:21 pm | मुक्त विहारि

आमच्या लहानपणाचे दिवस आठवले...

मेघवेडा's picture

13 Sep 2014 - 4:36 pm | मेघवेडा

छान.

इशा१२३'s picture

15 Sep 2014 - 6:29 pm | इशा१२३

सुरेख लिहिलय...