आजोबा तुम्ही पुअर आहात का?

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
23 Apr 2014 - 7:34 pm

माझ्या एका मित्राने सांगितलेली खरी घटना).

माझी लेक आपल्या ४ वर्षाचा लेकी सहा जवळपास दीड-एक वर्षांनी परदेसाहून परतली होती. म्हणतात न दुधा पेक्षा साय केन्हाही प्रिय. उन्हाळ्याचे दिवस आणि सुट्ट्या. गोंडस नाती बरोबर दिवस भर दंगा मस्ती करत वेळ कसा निघत होता कळतंच नव्हत. दिवस भर अविरत चालणारी तिची बडबड ऐकून मी तिचे नाव टाकिंग बर्ड ठेवले. लेकीने इशारा दिला, आजोबा फार डोक्यावर घेता आहात तिला, पण सावधान राहा, वेळ मिळताच ‘बिन पाण्याची हजामत करेल, तेंव्हा तुम्हाला कळेल, ‘टाकिंग बर्ड’ काय चीज आहे ते. पण मी लक्ष दिले नाही, मला वाटले पोरीच्या मनात असूया निर्माण झाली असेल, अखेर तिच्या हक्काच्या वडलांचा ताबा आता तिच्या पोरीने जो घेतला आहे. पण एकमात्र खरं, तिचे निरीक्षण कमालीचे होते, तिने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देता देता नाकी नऊ यायचे.

रविवारचा दिवस होता, सौ. म्हणाली लेकीला ‘गुलाब जाम’ आवडतात. हिमालय सागर (हलवाईचे दुकान) जाऊन गुलाब जाम घेऊन या. कुर्ता-पाजामा घालून, ‘टाकिंग बर्डला’ सोबत घेऊन गुलाब जाम आणावयास निघालो. पहिल्या माल्या वर घर असल्या मुळे, जिने उतरणे भाग होते. टाकिंग बर्ड हात पकडून जिने उतरू लागलो. अचानक एखाद्या वेगवान गोलंदाज प्रमाणे, तिने पहिला चेंडू फेकला, आजोबा, तुम्ही जीन्स का नाही घालत? जीन्स नाही का तुमच्या कडे? मॅाम-डैड बाहेर जाताना नेहमीच जीन्स घालतात. मी म्हणालो, जीन्स नाही आपल्या कडे बुआ.

तिने लगेच दुसरा चेंडू फेकला, तुमच्या बिल्डिंगला लिफ्ट का नाही? आता काय म्हणणार, तरी ही उत्तर दिले, बिल्डिंग छोटी आहे म्हणून लिफ्ट नाही. ‘म्हणजे तुम्ही छोट्या बिल्डिंग मध्ये राहतात’ आमचा न 17th फ्लोरवर फ्लेट आहे. आजपर्यंत कधी जिना चढला नाही. मनात म्हंटले, च्यायला, या बायका बालपणा पासून दुसर्याला तुच्छ लेखण्याचा मौका सोडत नाही.

खाली उतरल्या वर स्कूटर काढली. लगेच तिने लगेच गुगली टाकली, आजोबा,तुमच्या कडे कार नाही का? मी म्हणालो, स्कूटर आहे ना! कारपेक्षा जास्त मजा येते चालवायला. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून असे वाटले ‘तिला काही माझे उत्तर पटलेले दिसत नाही’.

खैर, हलवाईच्या दुकाना जवळ पोहचलो. स्कूटर थांबतच, तिने मलिंगा सारखा यार्कर आपटला, आजोबा इथे मॅाल नाही आहे का? आम्ही तर भाजी सुद्धा मॅाल मधून आणतो, आजोबा, मॅाल म्हणजे मोठ्ठे दुकान असते, आपले चिमुकले हात मोठ्ठे करत तिने म्हंटले. (जसे काही आजोबाना मॅाल म्हणजे काय, माहित नसावे). मी म्हणालो, या दुकानात, मॅाल पेक्षा मस्त ‘गुलाब जाम’ मिळतात, तुला आवडतात न. तिने मान हलवत होय म्हंटले. मला ही हायसं वाटले. ‘गुलाब जाम’ घेतले, आणि हलवाईला देण्यासाठी खिशातून पर्स काढताना तिने विचित्र नजरेने माझ्या कडे बघितले होते.

अखेर दुकानातून बाहेर पडलो, स्कूटर जवळ येताच तिने शोएब अख्तर पेक्षा ही वेगवान बाउन्सर टाकला, आजोबा, तुमच्याकडे क्रेडीट कार्ड नाही आहे का? आता काय म्हणणार, आज पर्यंत कधी क्रेडीट कार्डची गरज भासली नव्हती. मुकाट्याने म्हणालो, नाही. या वेळी तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव उमटलेले दिसत नव्हते. पण तिची बडबड मात्र थांबली. घरी येत पर्यंत ती एकदम शांत होती. घरी आल्या-आल्या, ती हळूच कानात पुटपुटली , जिव्हारी लागणारा बीमर त्रिफळा उडवून गेला, आजोबा तुम्ही पुअर आहात का?

बालकथाप्रकटन

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

23 Apr 2014 - 7:39 pm | आदूबाळ

छान लेख!

एक छिद्रान्वेषी दुरुस्ती:
फलंदाज ष्टंपासमोर मांडी घालून बसला तरच बीमर त्रिफळा उडवू शकतो. तुम्हाला बहुदा यॉर्कर म्हणायचे असावे.

विवेकपटाईत's picture

23 Apr 2014 - 7:57 pm | विवेकपटाईत

बीमर सरळ शरीरावर लागतो, त्या अर्थाने त्रिफळा

शुचि's picture

23 Apr 2014 - 7:45 pm | शुचि

तिला नक्की सांगा - इथे देवांनी नटलेले देऊळ आहे, गर्दीने बहरलेल्या बागा आहेत, बीच आहेत, ताजे ताजे मासे मिळणारा मासळीबाजार आहे, इथे घमघम सुवासिक आंबे आहेत, इथे ४ शब्द बोलता येईल अशी माणसे आहेत, लगबग लगबग गर्दी आहे जिच्यात माणसाला माणसातही राहता येते अन हवे तेव्हा एकटेही. इथे आपलेपण आहे.

टुंड्रा's picture

24 Apr 2014 - 1:49 pm | टुंड्रा

हे प्रचंड आवडलं :)

आयुर्हित's picture

23 Apr 2014 - 8:02 pm | आयुर्हित

"आजोबा" या शब्दाऐवजी "भारतीय लोकं" असं म्हणायचे असेल तिला?

पिवळा डांबिस's picture

23 Apr 2014 - 9:35 pm | पिवळा डांबिस

चार वर्षांच्या नातीने जर हे म्हंटलं असेल तर मला त्यात काहीच वावगं वाटत नाही. लहान मुलं निरागस असतात आणि त्यांची निरिक्षणशक्ती सूक्ष्म असते. त्यांच्याकडे डिप्लोमसी नसते तसाच काही गैरहेतूही नसतो.
हां आता आजोबांच्या लेकीने जर असं काही म्हंटलं असतं तर संवेदनशीलतेचा अभाव म्हणता आलं असतं....

अनुप ढेरे's picture

23 Apr 2014 - 10:08 pm | अनुप ढेरे

त्यांच्याकडे डिप्लोमसी नसते

+१

हा हा हा दुधावरची साय भारी चुणचुणीत आहे.

मागे लेकीने असाच एक गुगली टाकला होता. विमानात चढताना बिझनेस क्लास ओलांडून इकॉनॉमी क्लासची सिट शोधत असताना लेकीने चढ्या सुरात विचारलं बाबा आपण पुअर आहोत का?

दिव्यश्री's picture

23 Apr 2014 - 9:59 pm | दिव्यश्री

बापरे अवघड आहे एकंदरीत . :D

शुचि's picture

23 Apr 2014 - 10:01 pm | शुचि

आपल्या लेकीचे किस्से येऊ द्यात गणपाभाऊ. बर्‍याच दिवसात काही ऐकले नाहीत.

शुचि's picture

23 Apr 2014 - 9:50 pm | शुचि

माफ करा भारताचे कौतुक करण्याच्या नादात हे सांगीतलेच नाही की लेखनशैली मस्तच. आवडली. दूधावरच्या सायीचा गालगुच्चा घेत वरील मुद्दे नक्की सांगा. इतकच :)

दिव्यश्री's picture

23 Apr 2014 - 10:04 pm | दिव्यश्री

लेख मस्तच . मला हि पिडा काकांसारखच वाटत . निरागस आहे ती . तिने जे काही आतापर्यंत पाहिलं असेल त्यातून हि तुलना आणि मग फायणल निष्कर्ष . मोठी असती थोडी ८/१० वर्षाची तर मग कदाचित वेगळ वाटल असत . मला तर आधी हसूच आलं . काही म्हणा हि पिढी अतिशय हुशार आहे . या वयात हे असलं आमच्या टकुर्यात / मडक्यात आलं नसत कदाचित . ;) :D

काहीच नाही. प्रत्येकजण कोणा ना कोणाहूनही पुअर असतोच :) पण नंतर नात "आजोबा पुअर आहेत.... आजोबा पुअर आहेत" असे १० लोकांपुढे गात सुटणार नाही याची खात्री नाही.

अर्थात तसे गाण्यातही काही प्रॉब्लेम नाही ;)

प्रभाकर पेठकर's picture

24 Apr 2014 - 1:36 am | प्रभाकर पेठकर

'माणसाला आपल्या गरीबीचं दु:ख नसतं, मात्र ती दुसर्‍यासमोर उघडी पडल्यास भयंकर दु:खं होतं.'

शुचि's picture

24 Apr 2014 - 1:57 am | शुचि

१००% खरे आहे.
______________________
यावरुन कालचाच प्रसंग आठवला - कालच आम्ही $१० चे सुट्टे(क्वार्टरस) घेतले व चालू लागलो. एक गाल खपाटीला गेलेला अतिशय म्हातारा बेघर मनुष्य भीक मागत होता. मी $१ दिला अन पुढे गेले व मी व मुलगी बोलू लागलो की किती दया येते आहे, काम नसेल मिळत, काय खात असेल अन काय नाही बिचारा वगैरे.

वहावत जाऊन, मी मुलीला विचारले "चल परत जाऊ अन $५ देऊन येऊ पण अर्थात २० क्वार्टर्स मध्ये द्यावे लागतील."
मुलगी म्हणाली - "ममा भिकारी असला तरी त्याला डिग्निटी आहे. असे क्वार्टर्स त्याला आवडणार नाहीत त्यापेक्षा पुढल्या वेळी एक $५ ची नोट देऊ."

मनाशी तेच ठरवून आम्ही पुढे गेलो. गरीब असला म्हणून अशी नाण्यानाण्यांची भीक घालणं नक्कीच शोभावह नव्हतं.

आत्मशून्य's picture

24 Apr 2014 - 6:03 am | आत्मशून्य

असो प्रांजळपणाच्या कोड कौतुकात मुळ मुद्दा दुर्लक्षला गेलाय अन तो म्हणजे अमुक गोष्ट हाताशी असणारी व्यक्ती श्रीमंत व नसणारी गरीब हे फ्याड़ त्या शुध्द मनाच्या बाबिच्या डोक्यात कोणी घुसवले ?

मलाही असेच वाटले. इतक्या लहान मुलीच्या मनात ह्या गोष्टी यायला नकोत..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Apr 2014 - 11:36 am | निनाद मुक्काम प...

हा मुद्दा खरेच ध्यानात नाही आला.
ह्याच वयात असे बिनडोक विचार डोक्यात पक्के बसतात.
युरोपात लंडन ते अनेक मोठ्या शहरात सार्वजनिक वाहतूक सेवा हेच दळणवळणाचे साधन आहे.
तेथे लहान मुलांच्या डोक्यात अश्या खुळचट कल्पना माझ्या तरी पाहण्यात नाहीत.

आयुर्हित's picture

24 Apr 2014 - 2:49 pm | आयुर्हित

धन्यवाद. अजून एक छान विषय मिळाला आपल्यामुळे.
"सार्वजनिक वाहतूक सेवा" या विषयावरही नवीन धागा काढून मिपाकर तज्ञांनी आपले मत मांडायला हरकत नाही.

प्रभाकर पेठकर's picture

24 Apr 2014 - 12:13 pm | प्रभाकर पेठकर

ह्यासाठीच माझा हा प्रतिसाद मला तरी महत्त्वाचा वाटतो. संस्कारक्षम वय आहे. ह्या वयातच त्या निष्पाप आणि निरागस नातीवर योग्य ते संस्कार झाले तर तिचे व्यक्तिमत्व योग्य त्या दिशेने खुलण्यास मोलाची मदत होईल.

ह्याचा अर्थ तिच्या आईवडिलांनी कांही चांगले संस्कार केलेच नाही असे नाही. कधी कधी मुलं कांही चुकीचा विचार करीत आहेत, कांही चुकीच्या कल्पना त्यांच्या मनांत रुजत आहेत हे आपल्या, धकाधकीच्या जीवनांत, लक्षातच येत नाही.

चित्रगुप्त's picture

23 Apr 2014 - 10:24 pm | चित्रगुप्त

व्वा. मस्त.
हे गरीब-अमीर प्रकरण अगदी लहानपणापासून मुलांच्या कानावर पडत असते खरे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Apr 2014 - 10:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

चुणचुणीत आहे तुमची नात. असं काही बोलली की गालगुच्चे घ्या (एक तुमच्यातर्फे आणि एक आमच्या तर्फे) आणि मजा अनुभवा. फार काळ ही अवस्था राहत नाही हो :(

ज्या वातावरणात ती वाढते आहे त्याबरोबर इतर सर्व अनुभवांची तुलना सहाजिकच आहे... शिवाय ती निरागस आहे त्यामुळे मनातले लपवून "पोलिटिकली करेक्ट" बोलायला ती अजून शिकली नाही. मोठी होत जाईल तशी (इतरांचे मन सांभाळायला का होईना) आजूबाजूच्या लोकांचा इगो दुखावणार नाही याची काळजी घेऊन बोलायला शिकेल... पण ते बरं की वाईट याबाबत संभ्रम आहे !

पाषाणभेद's picture

24 Apr 2014 - 1:25 am | पाषाणभेद

एकदम सहमत.

तुमचा अभिषेक's picture

23 Apr 2014 - 11:14 pm | तुमचा अभिषेक

अगदी अगदी
इथे आपल्यालाही आपला देश गरीब आणि परदेशात गेले की डोळे विस्फारून येतात तर निरागस जीवांना ते वाटणारच आणि ते बोलून दाखवणारच.

माझा एका मित्रही असाच बरेच वर्षांनी परदेशाहून परतलेला. देश फिनलंड. तर त्याच्या लहानग्या (वय वर्षे सात-आठ) मुलालाही आता आपला भारत देश अस्वच्छ वाटू लागलाय आणि तो इथल्या मुलांमध्ये मैदानावर खेळायला वगैरे जात नाही कि कोणात मिसळत नाही.
आता अपने वतन के मिट्टी की खुशबू वगैरे कसे त्याच्या डोक्यात भरवावे की येईल ती भावना त्याच्यात हळूहळू की सवय होईल त्याला इथल्या वातावरणाची..

बाकी किस्सा छानच :)

दिव्यश्री's picture

24 Apr 2014 - 1:23 am | दिव्यश्री

तो इथल्या मुलांमध्ये मैदानावर खेळायला वगैरे जात नाही कि कोणात मिसळत नाही.>>> हा प्रकार जवळून अनुभवलाय . नात्यातली मुलगी ३ वर्षाची पण नव्हती त्यावेळी ते परदेशात राहायचे . भारतात कधी आली कि सुरु इथे गार्डन क्लीन नाही मग थोडीफार रडारड . अर्थात ते गार्डन छोट्याशा सोसायटीच होत .

चित्रगुप्त's picture

23 Apr 2014 - 11:15 pm | चित्रगुप्त

लहानपणी वाचलेली 'गरीब' ची व्याख्या सहज आठवली:
"ज्याला नेहमी 'आणखी हवे' असे वाटत असते, तो गरीब"
... हे लहानपणीच कळल्याने आयुष्यभर श्रीमंत राहता आले.

तुमचा अभिषेक's picture

24 Apr 2014 - 12:29 am | तुमचा अभिषेक

श्रीमंताच्या मुलीने गरीबांवर लिहिलेला एक निबंधही वाचल्याचे आठवतेय लहानपणी..

गरीब माणूस, त्याचे कपडे फाटके. त्याच्या बायकोचे कपडे फाटके. त्याच्या पोराबाळांचे कपडे फाटके. त्याच्या नोकरांचे कपडे फाटके. त्याच्या ड्रायव्हरचे कपडे फाटके. एवढेच नव्हे तर त्याच्या गाड्या देखील फाटक्या तुटक्या मोडक्या तोडक्या वगैरे वगैरे..

रेवती's picture

24 Apr 2014 - 12:30 am | रेवती

हा हा हा. चुणचुणीत मुलगी दिसतीये.

इरसाल's picture

24 Apr 2014 - 10:38 am | इरसाल

मुलगी चुणचुणीत आजोबांना आणते अडचणीत.

रेवती's picture

24 Apr 2014 - 6:54 pm | रेवती

असू द्या हो इरसालजी. हे प्रश्न ४ वर्षाच्या मुलांकडून यायचेच! नंतर नंतर त्यांनाही समजत जातं आणि अडचणीत आणणं कमी होतं. आता नैतर कधी प्रश्न विचारायचे त्यांनी?

प्रभाकर पेठकर's picture

24 Apr 2014 - 1:42 am | प्रभाकर पेठकर

विचार करायला लावणारा लेख.

नातीला थोड्याच शब्दात, तिला समजेल अशा भाषेत, आनंद आणि सुखाची व्याख्या समजवावी. कदाचित तिच्या वयामुळे आत्ता तिला कांही शब्दांचा, भावनांचा अर्थ लागणार नाही. पण तिचा चौकस स्वभाव आणि तिक्ष्ण बुद्धी शब्द लक्षात ठेवेल आणि एके दिवशी, आजोबांनी बालपणी शिकविलेले, शहाणपण आठवेल.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Apr 2014 - 4:38 am | निनाद मुक्काम प...

आमचे कन्यारत्न १४ महिन्याचे असल्याने यंदाच्या भारतभेटीत तिने निखळ आनंद उपभोगला. दोनच आठवड्यात तिने तिच्या आयुष्यात आजतागायत जर्मनीत पहिले नसतील एवढ्या माणसाइतके भारतात नातेवाईक पहिले.
युरोपात मिळत माहित अशी रसाळ फळे खाल्ली.
पुढे मोठी झाल्यावर तिच्या आईला भारतात आल्यावर जो सांस्कृतिक, सामाजिक धक्का बसला तो बसणार
ह्या दौर्यात माझ्या वर्ग मैत्रीण केनेडा वरून आल्याने डोंबिवलीत भेट झाली.
तेव्हा तिच्या ५ वर्षाच्या मुलीने रस्त्यावर एवढे होर्न का वाजवतात , आणि बरेच प्रश्न विचारले.
मात्र पेठकर काका म्हणाले तसे आजोबांनी आपल्या नातीला सुखाची व्याख्या आपल्या काळातील समाजवादी सुखाची व्याख्या समजाऊ नये.
नात मोठी झाल्यावर आपसूकच दोन देशात तुलनात्मक फरक करायला शिकेल.

निनादजी, अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे हा. ह्या मुलीला माझ्याकडून मनापासून धन्यवाद.
"रस्त्यावर एवढे होर्न का वाजवतात"या विषयावर एक नवीन लेख येऊ शकतो!

ब़जरबट्टू's picture

24 Apr 2014 - 1:25 pm | ब़जरबट्टू

आता म्हणताच तर...

http://www.misalpav.com/node/24880

:)

आजोबा, अशी हुशार चुणचुणीत नात मिळालीय तुम्हाला, खरंच श्रीमंत आहात.

-----
कुठेतरी छानसं वाचलेलं-

एक अति श्रीमंत पिता आपल्या मुलाला एका खेड्यात घेऊन गेला।लोक किती गरिबीत जीवन जगतात हे मुलाला दाखवण्याचा त्याचा उद्देश होता.एका गरीब कुटुंबात शेतातील घरात दोन दिवस ते राहिले.आपल्या घरी परततांना त्यने मुलाला विचारले ,' कशी झाली ट्रिप ? '' फारच छान डॅड '' गरीब लोक कसं जीवन जगतात बघितलंस ना? '' हो ' मुलगा म्हणाला.' हं आता मला सांग हे बघितल्यानंतर तू काय शिकलास ?' वडीलांनी विचारलंमुलगा म्हणाला
'' मी बघितलं आपल्याजवळ एक कुत्रा आहे तर त्यांच्याजवळ चार .''आपल्या बागेच्या मध्यभागी एक तळं आहे तर त्यांच्याजवळ खाडी आहे की जिला अंत नाही.आपल्या बागेत इंपोर्टेड दिवे आहेत तर त्यांच्याजवळ रात्रभर लुकलुकणारे तारे आहेत.आपल्या बागेची सीमा कुंपणापर्यंत संपते त्यांच्यासाठी तर अवघं आकाश खुलं आहे.राहण्यासाठी आपल्याकडे जमिनीचा लहानसा तुकडा आहे. तर नजर पोहोचणार नाही तिथपर्यंत त्यांची शेतं आहेत.आपल्याकडे नोकर आहेत आपली सेवा करण्यासाठी आणि ते दुसर्‍यांची सेवा करतात.आपले अन्न आपण विकत घेतो आणि ते स्वत: चं अन्न स्वत: पिकवतात.संपत्तीचं रक्षण करण्यासाठी त्याभोवती आपण कुंपण बांधले आहे. रक्षणासाठी त्यांचे मित्र धावून येतात.वडील स्तब्ध झाले.मुलगा पुढे म्हणाला , '' आपण किती गरिब आहोत ते मला दाखवल्याबद्दल मी तुमचा
ऋणी आहे.

पाहण्याचा दृष्टीकोन ही अजब गोष्ट आहे की नाही ?आपल्याजवळ जे नाही त्याचे दु:ख करण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार माना........

तुमचा अभिषेक's picture

24 Apr 2014 - 2:06 pm | तुमचा अभिषेक

वाचलेले हे आधीही.
खरेच पाहण्याचा द्रुष्टीकोण मॅटर्स..

बरेच जण म्हणतात टाईम इज मनी.
पण तो टांईम पैसा कमवायलाच वापरला, त्यातून विकत घेतलेले सुख उपभोगायला नाही तर त्याला काय म्हणावे?
टाईम इज मनी पेक्षा टाईम स्पेंड विथ हॅपीनेस इज मनी हे समजायला हवे.

दिपक.कुवेत's picture

24 Apr 2014 - 1:55 pm | दिपक.कुवेत

केवळ निखळ आनंद देणारा म्हणुन हा लेख वाचला आणि मजा आली. अजुन लहान आहे तोच असे अनुभव / क्षण अजुन मिळवायचा आनंद लुटा.

तुमचा अभिषेक's picture

24 Apr 2014 - 2:10 pm | तुमचा अभिषेक

हे हि खरेय, काही लेखांत काथ्याकूट न शोधलेलेच बरे.
लहान मुले बोलायचे बोलून जातात आणि आपण त्यात गहन अर्थ वा लॉजिक शोधत राहतो.. ;)

सार्थबोध's picture

24 Apr 2014 - 2:25 pm | सार्थबोध

किस्सा छानच

मनीषा's picture

24 Apr 2014 - 3:50 pm | मनीषा

किस्सा छान आहे
आणि आशा आहे की त्या मुलीला मोठेपणी आजोबा गरीब आहेत असे वाटाणार नाही

मलाही वाटते गरीबी ही मानसिक अवस्था आहे. जी व्यक्ती समाधानी नाही ती कायमच गरीब राहते. मग त्यांचा खजिना किती का भरलेला असेना
अर्थात ही व्याख्या जे खरोखर गरीब आहेत त्यांच्यासाठी लागू होत नाही . त्यांना असे म्हणणे ही क्रूर चेष्टाच ठरेल.

आत्मशून्य's picture

25 Apr 2014 - 3:05 am | आत्मशून्य

गरीबी ही मानसिक अवस्था आहे.

राहुल-G हेच म्हणाले होते न्हाई ?

समीरसूर's picture

24 Apr 2014 - 3:55 pm | समीरसूर

आवडेश. लहान मुलांची निरीक्षणशक्ती अफाट असते. माझा पुतण्या आता ९ वर्षांचा आहे. साधारण डिसेंबर २०१२ मध्ये त्याने आमीर खानचा 'तलाश' पाहिला होता. आणि त्याला तो आवडला होता. अगदी २-३ आठवड्यांपूर्वी मी त्याला त्या चित्रपटातल्या आमीर खानच्या पात्राचे नाव विचारले आणि त्याने तात्काळ 'सुरजन शेखावत' सांगीतले. करीना कपूरच्या पात्राचे नाव विचारल्यावर ताबडतोब 'सिमरन' आणि 'रोझी' सांगीतले. मला खूप आश्चर्य वाटले. हुशार आहेत पोरं. :-)

प्रभाकर पेठकर's picture

24 Apr 2014 - 4:06 pm | प्रभाकर पेठकर

मलाही लहानपणी शिवा़जी महाराजांच्या आईचं, वडिलांचं, मुलांचं नांव विचारलं की मी झटकन सांगायचो. शिवाजी महाराजांना मारायला आलेला विजापूर सरदार कोण, दिल्लीचा मुघल राजा कोण, राणा प्रताप कोण वगैरे वगैरे सर्व झटकन सांगता यायचं.... पण साला आमच्या लहानपणी कौतुक करणारे नातेवाईकच नव्हते. 'असाच अभ्यास कर' असे कोरडे आशिर्वाद मिळायचे. आमच्या पिढीची हुशारी धुळीला मिळाली.

प्यारे१'s picture

24 Apr 2014 - 4:23 pm | प्यारे१

=))

___/\___

बॅटमॅन's picture

24 Apr 2014 - 4:26 pm | बॅटमॅन

=))

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Apr 2014 - 4:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)

और ये लगा (अस्सल) पेठकरी चौका..

:) खरय!! अस्सल पेठकर श्टायल!! :)

ब़जरबट्टू's picture

24 Apr 2014 - 5:03 pm | ब़जरबट्टू

ह्य..ह्य..ह्य.. :))

आमची शाळा प्रथम बक्षीस १ पेन, दुसरे १ पेन्सिल, व तिस-याला सरळ कांडीच... :)

कसले डोम्बल्याचे प्रोत्साहन येणार...

ब़जरबट्टू's picture

24 Apr 2014 - 5:13 pm | ब़जरबट्टू

काका, हसून हसुन फुटतोय आज... :))

चित्रगुप्त's picture

24 Apr 2014 - 5:32 pm | चित्रगुप्त

माझा आईची स्मरणशक्ती अफाट होती. वयाच्या ८० व्या वर्षी पण अगदी लहानपणीच्या कविता (वाहवा वाहवा चेंडू हा..सुरेख कितितरी खचीत हा.... मिस मेरी भोर...) पासून शिवाजी, महाभारत, पेशवाईचा संपूर्ण इतिहास, अनेक मजेदार चित्रविचित्र कथा (उंदरलीची उंदरली खिरीत पडाली...टाईप) अश्या शेकडो गोष्टी तोंडपाठ होत्या. माझ्या आग्रहामुळे तिने आत्मचरित्रात्मक आठवणी लिहिल्या, त्यात सर्व अगदी तपशीलाने लिहिले होते.
हल्लीसारखे पोरांचे कवतिक तेंव्हा केले जात नसे, आणि हल्ली तर पोरांना जरा थोडे काही येत असेल, तर त्यांना एकदम 'शेलेब्रिटी'च बनवण्याची घाई आईबापांना लागलेली असते.

त्रिवेणी's picture

24 Apr 2014 - 4:29 pm | त्रिवेणी

sकाका

तिमा's picture

24 Apr 2014 - 5:43 pm | तिमा

नात निरागस, चुणचुणीत असली तरी लेख आवडला असे म्हणवत नाही. अमेरिकनच कशाला, अगदी भारतातल्याच जन्मापासून सगळं मिळालेल्या या नातवंडांना, जिने चढणे,जमिनीवर बसून जेवणे, भारतीय पद्धतीच्या संडासात बसता येणे, मातीत खेळणे, पतंग उडवता येणे, पायी चालणे वगैरे माहितीच नसेल तर, आपत्कालीन परिस्थितीला ते कसे सामोरे जातील, असा विचार मनांत येतो.

आयुर्हित's picture

24 Apr 2014 - 6:58 pm | आयुर्हित

हे खरे तर खूप सोप्पे आहे!
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत एकदा तरी गावी राहणाऱ्या आजी-आजोबांकडे किंवा कोकणात एखाद्या गावी किंवा ग्राम-कृषी पर्यटनाला घेवून जायचे!
हाकानाका!

विवेकपटाईत's picture

24 Apr 2014 - 8:17 pm | विवेकपटाईत

प्रतिसादाबाबत सर्वाना धन्यवाद. तिमा ताई 'निखळ आनंद देणारा म्हणुन हा लेख' वाचा. जो पर्यंत लहान आणि निरागस असतात तो पर्यंतच त्यांच्या बोलण्यातून आपल्याला आनंद मिळतो. लहान मुलांचे जेवढे ज्ञान असते त्या आधारावर ते निष्कर्ष काढतात आणि अधिकांश निष्कर्ष गमतीदार असतात. म्हणूनच लहान पोरांबरोबर वेळ घालविण्यात मजा येते. मग मुले अमेरिकेतले असो, दिल्ली-मुंबईचे असो किंवा खेडे गावातले. सर्वच सारखी असतात.

अहो विवेकपटाईत जी, तिमा ताई नसून भाऊ आहेत. त्यांचे पूर्ण नाव .... तिरशिंगराव माणूसघाणे.

मदनबाण's picture

25 Apr 2014 - 6:23 am | मदनबाण

:) वाचतोय.... :)
बाकी सगळ्यांना लयं आवडेल असं एक इडियो देउन जातो...

पोहोणार्‍या बाळांचे व्हिडो केवळ अद्भुत.
वरील व्हिडो संपल्यावर आणखीन येणारे सुद्धा अवश्य बघावेत.
धन्यवाद मदनबाणहो.

दिपक.कुवेत's picture

25 Apr 2014 - 8:55 am | दिपक.कुवेत

कसली ग्गोग्गोड बाळं आहेत.

नगरीनिरंजन's picture

25 Apr 2014 - 12:30 pm | नगरीनिरंजन

मुलं गोड असतात पण ती काय बोलतात त्यावरून त्यांचे आईबाप एकमेकांशी काय बोलत असावेत त्याचा अंदाज येतो.
आमच्या एका मित्रयुगुलाच्या मुलाने एक-दोनदा त्यांच्या कारने गेल्यावर एकदा "काका, तू कार का घेत नाहीस?" असे विचारले होते.