'जात नाही ती जात' हे वाक्य क्लिशे होण्याइतकं वापरलं गेलं आहे तरी त्यातलं सत्य कमी होत नाही. किंबहुना अशी वाक्यं क्लिशे होण्यामागे ती नको तितकी खरी असतात, हेच खरं कारण असतं.
याचा अर्थ आपण जातिनिर्मूलन करण्याचा प्रयत्नच सोडून द्यावा असा नाही, पण जातीपाती आपल्या समाजात एवढ्या घट्ट चिकटून राहण्यासाठी जे कॅटॅलिस्ट आहेत, त्यांच्यापैकी जमतील तेवढे हळूहळू बाजूला काढणं करता येऊ शकतं.
आपल्या समाजाची एक खासियत सांगता येईल की, आडनावावरून जात ओळखण्यात आपण सर्व तरबेज असतो. कुणीही नवी व्यक्ती भेटली की, तिच्या आडनावावरून, आपल्या डोक्यात तयार असलेल्या आडनावांच्या एन्सायक्लोपीडियातून आपण पटकन त्याची जात हुडकतो आणि काही गुणवैशिष्ट्यं त्या व्यक्तिला बहाल करून टाकतो. मग ते स्टिरिओटाईप्स घालवण्याची जबाबदारी त्या व्यक्तिची.
आडनाव ही संकल्पना आपल्याकडे केव्हा आली, हे मला माहीत नाही. कदाचित परकीय आक्रमणांनंतर आली असावी. पौराणिक वाङ्मयातल्या कुठल्याही व्यक्तिरेखेला आडनाव असलेलं पाहिलं नाही. प्रि-इस्लामिक भारतातल्या कुठल्या ऐतिहासिक व्यक्तिचं आडनाव ऐकलेलं आठवत नाही. शिवकालात प्रत्येक व्यक्तिचा उल्लेख व्यवस्थित आडनावासहित केलेला आढळतो. अर्थात माझं इतिहासाचं ज्ञान अति तोकडं असल्यामुळे याविषयी फारसं काही ज्ञान मला पाजळता येणार नाही, जाणकार अधिक प्रकाश पाडू शकतील.
एखाद्या व्यक्तिची किंमत जेव्हा 'तो' कोण आहे, यापेक्षा 'तो कोणत्या कुळातला आहे' यावर अवलंबून होती, त्या काळात आडनाव ही संकल्पना महत्वाची होती हे खरं. आजच्या काळात 'आडनाव' या संकल्पनेपासून फायद्यांपेक्षा तोटेच जास्त होत असावेत का?
भारतात सर्वत्र आडनाव ही संकल्पना वापरली जात नाही, याची मला जाणीव आहे. दक्षिण भारतात आडनाव वापरत नाहीत. भारताबाहेर पाहिलं तर काही समाजात आडनाव हे व्यक्तिच्या नावाच्याही आधी येतं. (उदा. कोरिया, चीन इत्यादि आशियायी देश) तर कुठे नुसती तीन नावं पुरत नाहीत म्हणून महंमद अमुक बिन् तमुक बिन् फलाणुद्दिन असं आज्या-पणज्याचंही नाव येतं. एकंदरीत नाव, मधलं नाव, आणि आडनाव हे केवळ व्यक्तिला आयडेंटिफाय करणारे प्लेसहोल्डर्स आहेत आणि ते कसेही वापरलेले चालतात.
आपण आपल्या समाजापुरता विचार करू. समजा आडनाव ही कन्सेप्टच बाद करून टाकली तर? किंवा त्याऐवजी काही दुसरा पर्याय वापरला तर? दुसरा कुठला पर्याय, याचा विचार करण्याआधी 'हे सगळं कशासाठी? आडनावात इतकं वाईट काय आहे?' हा प्रश्न सर्वात आधी येईलच.
आडनावांचा सर्वात मोठा तोटा म्हणजे वर दिल्याप्रमाणे, आडनावावरून होणारं डिस्क्रिमिनेशन, हा आहे. आता वैयक्तिक पातळीवर कदाचित हा काही मोठासा विषय नाही, पण सामाजिक दृष्ट्या याचे तोटे अनेक आहेत. निवडणूकीत कोणत्या उमेदवाराला मत द्यायचं, हे बरेच लोक त्याच्या आडनावावरून ठरवतात. एखाद्या कंपनीत एखाद्या पदासाठी पन्नास-साठ अर्ज आले, तर त्यातले कोणते शॉर्ट-लिस्ट करायचे हे ठरवणार्याचं लक्ष अर्जदाराच्या आडनावाकडे जात नसेलच, असं आपण म्हणू शकत नाही. अर्थात आडनाव गेल्याने एका दिवसात जातीभेद गायब होतील, असं समजणं मूर्खपणा ठरेल, पण जातीपाती प्रपोगेट करायला आडनाव या संकल्पनेची मदत होते, हे निर्विवाद आहे. जातिनिर्मूलनाकडे हळूहळू का होईना, आपण सरकत जात आहोत. त्याच्या आड येणारं हे आडनाव बादच का करून टाकू नये?
काही लोक म्हणतील, आमचं आडनाव आम्हाला प्रिय आहे, ते बाद करणारे तुम्ही कोण टिक्कोजीराव? आणि, या मुद्द्यात तथ्य आहे. बर्याच लोकांना आपलं आडनाव आणि त्याच्याबरोबर मोफत येणारी ग्लोरी प्रिय असते. 'निंबाळकरांचं रक्त आहे म्हणावं!'... 'महाराजांच्या वेळपासूनची हिस्ट्री आहे'...'पुरंदरच्या लढाईत...' वगैरे वाक्यं म्हणत पूजेत ठेवलेली गंजकी तलवार आणून दाखवली जाते. हे करताना आपण सांगली नगरपालिकेच्या मूषकनिर्मूलन विभागात चतुर्थश्रेणी कर्मचारी आहोत हे आठवायची गरज नसते. अग्निहोत्री असल्याचा अभिमान बाळगणार्याच्या घरात चारमिनारखेरीज कुठला अग्नि पेटत नसेल, आणि 'धर्माधिकारी' म्हणवून घेणारा धर्माचरण करत असेलच, असं नाही. पण तरीही आपलं आडनाव टाकून द्यायची कोणावर जबरदस्ती नाही, म्हणून वरच्या प्रस्तावात थोडासा बदल करतो. *सरकारी पातळीवर* आडनाव बाद करून टाकावे. आडनाव ही गोष्ट धर्म, कुलाचार, कुलदैवत, गोत्र, प्रवर यांप्रमाणे वैयक्तिक असावी. अधिकृत सरकारी कामकाजात कुठेही आडनावाची गरज पडू नये.
बरं मग आडनावाला पर्याय काय?
एक म्हणजे काही पर्याय असण्याचीच गरज नाही. वर म्हटल्याप्रमाणे फक्त आपलं नाव आणि वडिलांचं नाव वापरता येईल (दाक्षिणात्यांसारखं)
किंवा, आणि माझ्या मते आडनाव गाळण्याचा सर्वात चांगला फायदा, म्हणजे आडनावाऐवजी आईचे (प्रथम) नाव वापरता येईल. पासपोर्ट, रेशनकार्डवर आडनावाऐवजी आईचं नाव आलं तर काय बिघडेल? सध्या आईच्या नावाला कुठे काही स्थान नसतं. स्त्री नवर्याकडे जाते तीच आपलं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव टाकून. म्हणजेच जणू आपलं पूर्वीचं सर्व अस्तित्व पुसून टाकून. ज्या काळात स्त्री ही 'मालमत्ता' होती त्या काळासाठी हे सुसंगतच आहे, पण आता?...
पेपरात कधी बातमी येते 'दिपक बाबुराव पारधी याचे दैदिप्यमान यश. प्रतिकूल परिस्थितीशी झगडून आपल्या समाजातील पहिला डॉक्टर' वगैरे. दिपकबरोबर पिताश्रींचंही नाव झळकतं. मग भले बाबुरावसाहेब अक्खा टायम दारू टाकून पडत असतील आणि संसाराचा सगळा गाडा पार्वतीबाईने चार ठिकाणी घरकाम करून ओढला असेल. पण तिच्या नावाची, तिच्या अस्तित्वाची कुठेही नोंद नाही. मग? आडनावाऐवजी आईचं नाव वापरणं सध्याच्या काळाशी जास्त सुसंगत ठरेल काय?
प्रतिक्रिया
19 Jan 2014 - 11:12 pm | आनन्दा
ह्म्म..
19 Jan 2014 - 11:44 pm | कवितानागेश
आडनाव सोडून देउन, आई वडील दोघांचे नाव लावलं तर जास्त चांगलं...
किंवा सगळीच उपनामे सोडून देउन फक्त स्वतःचे नाव वापरलं तर अजून उत्तम.
20 Jan 2014 - 12:49 am | रेवती
काह्ही उपेग व्हायचा नै माऊ! उदा. समोर बसलेल्या जमावापैकी दहा रेवत्या असल्या तर कोणाबद्दल कोण काय बोलतय हे समजणार नाही (त्याच्या फायद्याबद्दल आत्ता नको बोलायला). मग तुम्ही म्हणाल की गावाची नावं लावा. मग मी रेवती पुणे असे सांगितले की चर्चा धडाडून पेटतील. ;) आणखी मज्जा. शेवटी आडनावावर यायलाच लागणार. ;)
19 Jan 2014 - 11:45 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर
छान उत्तम विचार आहेत. पुलेशु
20 Jan 2014 - 6:45 pm | मी-सौरभ
सहमत आहे
19 Jan 2014 - 11:47 pm | धन्या
तुमचं खंडागळे हे आडनांव खंडाळा घाटात टाकून येऊन मग लेख लिहायला हवा हो ;)
लेख आवडला.
20 Jan 2014 - 11:10 am | यसवायजी
तेच म्हंतो म्या.
निदाम मिपावर आयडी घेताना बिन्-आडनावाचा घ्यायचा की.
ओ खंडागळे साहेब, बदला ऐडी
20 Jan 2014 - 2:49 pm | सूड
यांचं म्हणजे आपण हसे लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला अशी गत आहे. आधी आयडी बदला म्हणाव स्वत:चा!!
20 Jan 2014 - 5:52 pm | चिन्मय खंडागळे
तुमच्या प्रश्नामागचा टोन हीन असला तरी प्रश्न चांगला आहे. आडनाव नको म्हणून सांगणार्याने आयडीत स्वतः आडनाव का लावावं?
एक म्हणजे, मी आधी बिनआडनावाचाच आयडी काढला होता. पण तो अॅप्रुव झाला नाही :( आडनाव नसेल तर बहुधा मालकांना डुप्लिकेट आयडी वाटत असावा ;)
दुसरं म्हणजे या गोष्टी व्यक्तिगत पातळीवर कोणी करायच्या ठरवल्या तरी जोपर्यंत अधिकृत पातळीवरून त्याला मान्यता मिळत नाही तोवर त्याला काही अर्थ राहत नाही, मग तुम्ही तुमचं आडनाव खंडाळ्याच्या घाटात फेकून या नाहीतर पन्हाळ्याच्या कोटात. मी पासपोर्टच्या अर्जात माझ्या आडनावाच्या जागी माझ्या आईचं नाव टाकून अर्ज केला तर मला फ्रॉड समजून आत टाकायचाच चान्स जास्त आहे.
20 Jan 2014 - 5:55 pm | सूड
>>मी पासपोर्टच्या अर्जात माझ्या आडनावाच्या जागी माझ्या आईचं नाव टाकून अर्ज केला तर मला फ्रॉड समजून आत टाकायचाच चान्स जास्त आहे.
यातच तुमच्या लेखाचं उत्तर आहे असं नाही वाटत का?
20 Jan 2014 - 6:05 pm | चिन्मय खंडागळे
>>>>मी पासपोर्टच्या अर्जात माझ्या आडनावाच्या जागी माझ्या आईचं नाव टाकून अर्ज केला तर मला फ्रॉड समजून आत टाकायचाच चान्स जास्त आहे.
>>यातच तुमच्या लेखाचं उत्तर आहे असं नाही वाटत का?
अर्थातच!
मी पासपोर्टच्या अर्जात माझ्या आडनावाच्या जागी माझ्या आईचं नाव टाकून अर्ज केला तरी जोवर सरकारी पातळीवर त्याला मान्यता मिळत नाही तोपर्यंत मला फ्रॉड समजून आत टाकायचाच चान्स जास्त आहे.
20 Jan 2014 - 6:52 pm | यसवायजी
जोवर सरकारी पातळीवर त्याला मान्यता मिळत नाही तोपर्यंत
म्हणजे नक्की कशाला मान्यता मिळत नाही?
कारण आडनाव बदलायला मान्यता आहे एवढं नक्की. त्यासाठी काही नियम आहेत का? (आईचे नाव नसावे इ.)
जाताजाता - माझ्या एका मित्राने आडनाव बदलून घेतले होते. कारण काही सांगायला तयार नव्हता. दोन्ही आडनावे एकाच जातीची होती.
20 Jan 2014 - 7:14 pm | अनिरुद्ध प
माझ्या आयडी मध्ये माझे उपनाम दर्शवलेले नाही. तशीच अजुन भरपूर उदाहरणे मिपावर देता येतील.
19 Jan 2014 - 11:54 pm | नेहा_ग
चांगला विचार आहे
20 Jan 2014 - 12:15 am | प्यारे१
सुनीती सुलभा रघुनाथ (सुनीती सु.र.) ; संजय मंगला गोपाळ (संजय मंगो) अशी काही नावं चटकन आठवली.
(माझा अभ्यास नाही, काही लोकांच्या बोलण्यातून आलेलं) कर्नाटक, तामिळनाडू मध्ये वेगळा प्रकार असतो. (कधी गावाचं नाव तर कधी जातीचं नाव, कधी वडलांचं नाव असं वेगवेगळं असतं) यु पी वाले सुद्धा वडलांचं नाव न लावता फक्त नाम उपनाम (आडनाव) लावतात.
20 Jan 2014 - 12:18 am | मुक्त विहारि
मला पटला....
पण भारतीय संविधानाला हे मंजूर होईल का?
20 Jan 2014 - 12:31 am | आयुर्हित
शी! कसला घाण विचार आहे तुमचा.
धोंडा पडो तुमच्या लक्षणाला.
१) सर्व प्रथम भावी पंतप्रधानाचे आडनाव जाईल.मग आमची जनता कोणाला निवडून आणणार मग?
कारण जनतेला नेहरू किंवा गांधी या शिवाय दुसरे आडनाव दिसतही नाही आणि चालत हि नाही.
मनमोहन सिंगांनी सांगीतल्याप्रमाणे होणार "भारताचे काही खरे दिसत नाही हो"
२) जनतेला आरक्षण कसे मिळेल हो? मग सर्व लोक म्हणतील मी BC/OBC! आणि मग राजकीय लाभ उठवण्याच्या सर्व प्रयत्नावर पाणी फिरेल हो!
3) एक गठ्ठा मतांवर डोळा लावून बसलेले सर्व राजकारणी बाजूला फेकले जातील.आणि मग नवीन लोकांना विकासाची संधी मिळालेली चालेल तुम्हाला?
आपला मिपास्नेही :आयुर्हीत
20 Jan 2014 - 12:44 am | खटपट्या
लेख पटला. अंमलबजावणी कशी होणार.
20 Jan 2014 - 12:47 am | काळा पहाड
उदा: चिन्मय खंडागळे, मराठा, ९६ कुळी (चुभुद्याघ्या), खंडागळ्यांचं रक्त, पंचवीस एकर बागायती जमीन, मुख्य व्यवसाय शेती, पेट्रोल पंप, साखर कारखाना, बियाण्यांची सोल एजन्सी वगैरे, उप व्यवसाय आयटी, प्रेमाचे विषय - तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, बुलेट, स्कॉर्पीओ वगैरे वगैरे...
20 Jan 2014 - 7:02 am | टॉपगिअर्ड फिलोसॉफर
स्कॉर्पीयो गेली राव ,आता ही लोकं डस्टर ईकोस्पोर्ट वगैरे वापरायला लागलीत.
20 Jan 2014 - 8:54 am | खटपट्या
"हि लोकं?"
आपण सर्व एकच "लोकं" आहोत असा माझा समज आहे.
20 Jan 2014 - 9:36 am | टॉपगिअर्ड फिलोसॉफर
dont change the locus of discussion
20 Jan 2014 - 11:58 am | मंदार दिलीप जोशी
locus नाही हो फोकस focus.
आधी स्पेलिंगा लिवायला शिका की न्यिउट्रल गिअर वाले.
20 Jan 2014 - 1:18 pm | गब्रिएल
नाय हो. त्येन्ला त्यांच दुस्र नावं locust म्हनायच आसंल. कायबाय ल्हिवून आप्ल्याक्डं सग्ळ लक्ष ओडून घ्याची त्येंची न्हेमिचि सवय हायच की.
20 Jan 2014 - 10:17 pm | खटपट्या
सुरवात तर तुम्हीच केलीत न फ़िलोसोफ़ेर साहेब
20 Jan 2014 - 12:50 am | स्वप्नांची राणी
लेख एकदम पटला. आमचे एक स्नेही त्यान्च्या आडनावामुळे आणि त्या अनुशन्गाने होणार्या जातीय भेदभावामुळे ईतके त्रस्त झाले होते की त्यानी ते बदलुन घेतले.
20 Jan 2014 - 3:16 am | विजुभाऊ
आडनाव रद्द करणे हा मूर्खपणा आहे.
बीहार मध्ये जयप्रकाशानी आडनाव टाकुन द्यायला साम्गितल्यामुळे बरेचजण स्वतःच्या नावपुढे कुमार लावु लागले. त्यामुळे विनय कुमार , विवेक कुमार अशा नावाम्ची बरीच संख्या वाढली. त्यामुळे व्यक्ती ओळखणे कठीण जावु लागलय.
या उत्तरभारतीय लोकांचा अजुन एक विचित्रपणा म्हणजे विश्वनाथप्रताप असे नाव असेल तर ते त्याची आद्याक्षरे वी पी अशी करतात.
एखाद्याचे नाव जर प्रेमकुमार रघुनाथ शर्मा असे असेल तर ते त्याचे नाव "पी के शर्मा:" असे करतात.
महाराष्ष्ट्र , गुजरात मध्ये हेच नाव पी आर शर्मा असे केले जाते.
20 Jan 2014 - 5:04 am | पिवळा डांबिस
पण भारतात ज्या राज्यांमध्ये आडनांवं लावली जात नाहीत किंवा जिथे असलेली आडनांवं टाकून दिली गेली, तिथली जातीयता नक्की नाहिशी झालीये का?
हो, नाहीतर उगाच ष्टांपपेपरचा भुर्दंड!!!!
20 Jan 2014 - 12:17 pm | प्यारे१
डांबिस हे खानदानाचं नाव का जात का आणखी काही?
-हलकाफुलकापणपि-डांअसल्यानंघाबरट मोड ;)
21 Jan 2014 - 10:45 am | पिवळा डांबिस
दोन्ही!! :)
पण आता तुम्हाला ते खुपत असल्याने "येलोनॉटी" हे आम्हाला मुक्तसुनीताने दिलेले आणि आडनांव नसलेले नांव आम्ही धारण करायच्या विचारात आहोत!!!! :)
पण एक प्रश्न सिरियसली. ज्यांना आपली आडनांवं अडचणीची वाटतात त्यांनी ती खुशाल बदलावीत, कोणाची काहीही हरकत असू नये. पण ज्यांना आपल्या आडनांवाबद्दल काहीही प्रॉब्लेम नाही त्यांनी आपली आडनांवं का बदलायची/ गाळायची?
20 Jan 2014 - 3:50 pm | राजेंद्र मेहेंदळे
पि.डां.शी सहमत.
बाकी तुमचे गाव कुठले? या निरुपद्रवी वाटणार्या प्रश्नामागेही जात असु शकते (संदर्भ-आमचा बाप आणि आम्ही-नरेंद्र जाधव)
20 Jan 2014 - 5:56 pm | चिन्मय खंडागळे
मी धाग्यात लिहिलेलं पुनः लिहितो. आडनाव टाकून जाती एका दिवसात गायब होणार नाहीत. पण आडनावामुळे जात प्रपोगेट होते, हे खरं की नाही?
21 Jan 2014 - 10:10 am | सुबोध खरे
एकदम मान्य.
आमच्या एका वर्गमित्राने अनुसूचित जातीच्या आरक्षणातून एम बी बी एस ला प्रवेश घेतला. त्यानंतर शल्यशास्त्रात द्विपदवी(एम एस)ला प्रवेश सुद्धा आरक्षणातून घेतला. एम एस झाल्यावर व्यवसाय सुरु केला तर त्यांच्याच जातीचे लोक त्याच्याकडे येईनात. "हा आपल्यापैकीच आहे याच्या कडे ऑपरेशन नको. किती येतंय काय माहिती?" असे बोल त्याने स्वतः आम्हाला सांगितले. शेवटी एक दिवस त्याने शपथपत्र बनवून महाराष्ट्र शासन राजपत्र (ग्याझेट) मध्ये आपले आडनाव बदलून एक उच्च जातीय ब्राम्हणांचे आडनाव लावून घेतले.(दोन्ही आडनावे मुद्दामच लिहिली नाहीत.) आपल्या रुग्णालयाचे नाव सुद्धा बदलले. आता त्याचा व्यवसाय सुरळीत चालला आहे.
21 Jan 2014 - 10:20 am | मंदार दिलीप जोशी
कठीण आहे. म्हणजे जातीयता तथाकथित उच्चवर्णीय कमीच पाळतात आणि हे लोकच जास्त पाळतात असे दिसते.
सहज अवांतरः आम्ही लहान असताना आम्ही ज्या डॉक्टरांकडे जायचो त्यांचं नाव कदम होतं. आम्ही फार लहान असल्याने ते कॅटेगरीमधले होते की नाही विचारलं नाही पण आजूबाजूच्यांकडुन ऐकलं त्यावरुन ते दलित असावेत. आमच्या कॉलनीत कॉस्मॉपॉलिटन वस्ती होती. का पासून क पर्यंत आणि गु पासून आ(साम) पर्यंत सगळ्या प्रांतातले लोक होते. अनेक ब्राह्मणही होते. त्या डॉक्टरांची ख्याती अशी की आमच्या शेजारच्याच इमारतीतले जोशी आडनावाचे एक आजोबा म्हणायचे "कदमाचे औषध खिशात असले की अर्धे बरे वाटते" - आणि माझ्या घरच्यांचेही असेच मत होते. तेव्हा एका उर्दू म्हणीनुसार "खुदी को कर बुलंद इतना" याप्रमाणे स्वतःचे कर्तॄत्व सिद्ध केले की लोक जातीचा विचार करत नाहीत.
5 Feb 2014 - 11:27 am | इच्चक
+१
20 Jan 2014 - 8:40 am | प्रमोद देर्देकर
आयला धन्या , हे बाकी मस्त शालजोडीतले हाणलेस की.
20 Jan 2014 - 8:51 am | सुनील
आडनाव असूनही ते न लावणारे भारताचे दोन पंतप्रधान कोण? (आणि हो, त्यांची - ते न लावणारी - आडनावे कोणती?)
पहिल्या तीन बरोबर उत्तरकर्त्यांना माझ्यातर्फे मामलेदारची मिसळ!! :)
20 Jan 2014 - 9:11 am | आतिवास
चरणसिंह(ग)आणि विश्वनाथ प्रताप सिंह??
एक अंदाज!!
20 Jan 2014 - 9:27 am | हंस
H. D. Devegauda, Chandrashekhar.
20 Jan 2014 - 9:56 am | मारकुटे
इंग्लंड अमेरीकेत काय परिस्थिती आहे? नाही म्हणजे काय तिथे जे असतं तेच योग्य असतं आणि भारतासारख्या देशातलं तुच्छ, टाकाऊ, ब्राह्मणी काव्याने पोखरलेलं बगैरे असतं ना म्हणून विचारलं. तिथं जे असेल ते करु हं. !
20 Jan 2014 - 11:59 am | सचीन
सहमत
20 Jan 2014 - 1:22 pm | गब्रिएल
म्हंजे इट्लीबराबर आता इंग्लंडआमेरिकेचिबि भाटगिरि कर्नार कायवो? धंदा लय वाडवायचा पोग्राम दिसतुया जनु. ;)
20 Jan 2014 - 11:46 am | एम.जी.
जातीभेद हा डोक्यातून काढायला हवा.
आडनावे बदलून काही होणार नाही.
फक्त पहिल्या भेटीत जात कळणार नाही इतकेच.
डोक्यात असेल तर मग आडून जातीची चौकशी केली जाईलच...
आपल्याकडे आडनावांवरूनच कशाला, दिसण्यावरूनही आडाखे बांधले जातात.
एखादी व्यक्ती "क्ष" आडनावाची असली तरीही " वाटत नाही" असले मतप्रदर्शन कुजबुजत का होईना, केले जातेच.
नाहीतर मग सरळ नंबरच द्या..
20 Jan 2014 - 12:10 pm | क्रेझी
शाळेत असतांना आमच्या एका मॅडमनी आम्हांला 'आडनाव विचारायचं नाही' ही सवय लावली त्यामुळे आजतागायत मला कोणाचं आडनाव विचारायची सवय नाही आणि जरी कुठून कळालं तरी लक्षात राहत नाही. स्वतःचं लक्षात राहतं कारण ब-याच ठिकाणी लिहावं लागलं/तं!
21 Jan 2014 - 5:24 am | चिन्मय खंडागळे
तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये होता का? आमच्या नेमस्त मराठी शाळेत आडनावच वापरायची पद्धत होती. अर्ध्या चड्डीतले पाचवीतले मित्रही एकमेकांना आडनावाने पुकारत हे आता खूप चमत्कारिक वाटतं.
21 Jan 2014 - 10:04 am | मंदार दिलीप जोशी
मी माझं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव हे तीनही अत्यंत अभिमानाने लावतो. यातलं काहीही काढावं असं मला अजिबात वाटत नाही.
20 Jan 2014 - 12:14 pm | मंदार दिलीप जोशी
अगदी बरोबर आहे. पण मग त्याच न्यायाने नाव तरी कशाला हवे? म्हणजे पहा, चिन्मय म्हणजे हिंदू, महंमद म्हणने मुस्लिम, जॉन म्हणजे ख्रिस्चन अशी वर्गवारी पण करता येतेच की. त्यापेक्षा सगळ्या नागरीकांना नंबर द्यायचा. ज्या शहरातले/गावातला जन्म असेल तिथला पिनकोड शेवटी जोडायचा (आडनावासारखा :P )
:D
20 Jan 2014 - 12:18 pm | प्यारे१
अब्दुल नारायण डिसुझा कसं वाटतं?
20 Jan 2014 - 12:24 pm | मंदार दिलीप जोशी
लई झ्याक. पण शेवटी आडनाव डिसोझा म्हणजे तो ख्रिस्चन हे ओळखता येतंच की :D
20 Jan 2014 - 12:44 pm | प्यारे१
बबलू डेव्हिड खरात, जॉन प्रभाकर नाईक, आशिष जोसेफ हे खरंच नाव असलेल्या व्यक्तीला २००२-०३ मध्ये मी भेटलोय. क्षीरसागर, देशमुख, इनामदार ही आडनावं मुस्लिमांच्यामध्ये आहेत.
बाकी माणसातली आतली वृत्ती काहीही केलं तरी लपणार नाही. रंगावरुन, जन्मावरुन, शारिरीक क्षमतांवरुन, गुणांवरुन, दिसण्यावरुन कशावरुन तरी माणूस 'आपपरभाव' (मराठीत डिस्क्रिमिनेशन?) करतोच्च.
20 Jan 2014 - 12:45 pm | प्यारे१
>>>बबलू डेव्हिड खरात, जॉन प्रभाकर नाईक, आशिष जोसेफ हे खरंच नाव असलेल्या व्यक्तीला २००२-०३ मध्ये मी भेटलोय.
हे
बबलू डेव्हिड खरात हे खरंच नाव असलेल्या व्यक्तीला २००२-०३ मध्ये मी भेटलोय.
जॉन प्रभाकर नाईक, आशिष जोसेफ ह्या नावाचे मित्र आहेत.
असं वाचावं.
20 Jan 2014 - 1:34 pm | सुनील
नारायण वामन टिळक, हे कसं वाटतं? ;)
20 Jan 2014 - 2:31 pm | llपुण्याचे पेशवेll
म्हणजे एकदम पुणे मराठी उपासना मंदिर अर्थात सेंट अँड्र्यूज चर्चामधे गेल्यासारखं वाटतं.
20 Jan 2014 - 2:16 pm | llपुण्याचे पेशवेll
हा हा हा. म्हणजे पुणे शिवाजीनगरचा रहिवासी १२४२४१ ४११०१६ असा आपला नंबर व आडनावी पिनकोड सांगेल.
20 Jan 2014 - 4:44 pm | वडापाव
म्हणजे मग दोन धर्म निघतील - सम आणि विषम.
त्यात संयुक्त, मूळ अशा जाती निघतील.
२ ने भाग जाणारे, ३ ने भाग जाणारे, एक अंकी, दोन अंकी, तीन अंकी, इ. अशा पोटजाती निघतील.
धर्म-जाती-वर्ण किंवा अशी कुठलीही समाज-वर्गवारी, यांवरून लहान स्वरूपात निर्माण होणा-या भेदभावांना भडकावणारे लोक जोवर या भेदभावांतून स्वतःची पोळी पिकवणं मनाची लाज बाळगून थांबवत नाहीत, किंवा त्यांना आपण थांबवत नाही, तोवर हे चालूच राहणार. माणसांना नावं द्या, नाहीतर नंबर.
20 Jan 2014 - 4:58 pm | मंदार दिलीप जोशी
:D
20 Jan 2014 - 2:22 pm | प्रकाश घाटपांडे
आजच्या सुधारक या विवेकवादाला वाहिलेल्या मासिकात आडनावावरुन जात ओळखून लेखकांची वर्गवारी करण्याचा प्रयत्न आमच्या मित्रांनी केला होता. त्या संदर्भात http://mr.upakram.org/node/1208#comment-20002
20 Jan 2014 - 4:15 pm | मंदार दिलीप जोशी
घाटपांडे तुम्ही ज्योतिष धागा सोडून या बंडलाच्या मागे का बरे? :D
20 Jan 2014 - 9:42 pm | प्रकाश घाटपांडे
बाकी बी विषय असतातची की.लईच ज्योतिष ज्योतिष म्हनल कि कंटाळा येतो आमचे मिपावरील लेखन
20 Jan 2014 - 2:24 pm | परिंदा
सर्वांनी आपला आधारकार्ड हाच आपले नाव म्हणून वापरावा. कसे? :)
20 Jan 2014 - 2:57 pm | रविंद्र प्रधान
डॉ. रोड हे नाव ऐकले आहे कधी?
साधारणपणे ४० वर्षांपुर्वी तमिळनाडूत कयदा आणला गेला की रस्त्यांच्या नावातून आडनावे काढून टाकावीत.
तो लगेच अंमलात आणला गेला आणि डॉ.नायर रोड हा डॉ. रोड झाला.
हे नाव सुमारे वर्षभर वापरात होते.
20 Jan 2014 - 3:38 pm | बर्फाळलांडगा
विशेषत: क्न्पुबाजांची।
20 Jan 2014 - 6:03 pm | माहितगार
कोणतेही भेदा भेद वस्तुतः मनातून जाणे हेच खर यश. बर्याच बाबीत संस्कृती आणि धर्म अथवा जातीची सरमिसळ केली जाते.कुंकू (टिकली) लावणे रांगोळी काढणे यांचा धर्माशी संबंध काय ? बहुसंख्य हिंदु स्त्रीया कुंक लावतात अथवा रांगोळी काढतात एवढाच ? जाती धर्म भेदा भेदांशी संबंध नसलेल्या सांस्कृतीक बाबी कशा लक्षात आणून देता येतील आणि शेअर करता येतील ते पाहणे वाढदिवस फ्रेंडशीपडे सारखी सेक्यूलर सेलिब्रेशन्स जातीधर्मा पलिकडे जाऊन भावनिक धागे घट्ट करण्यास साहाय्य करू शकतात हे पहावयास हवे असे वाटते.
आडनावाच्या बळावर भेदा भेद करण सोप जात हे वास्तव आहे पण दाक्षिणात्य राज्यांमध्ये केवळ आडनाव घालवण्याची पुरेशी फळे मिळाली आहेत का? या बद्दल साशंकता वाटते.अशा धर्मात जेथे आडनाव नाही तेथे पण उपभेद टिकून आहेत.त्या दृष्टीने आडनाव टाळणे वरवरची मलमपट्टी तर ठरणार नाही ना.
आडनावांची गरज पडणार्या आणि आडनाव नको असलेल्या दोन्ही जागा आहेत. आडनावा सहित एकाच नावाची असलेली एक पेक्षा अधिक माणस पण असतात पण अजून थोडे क्रायटेरीआ लावलेली त्यांना वेगवेगळ ओळखण कठीण जात.आडनाव नसल्याची एक अडचण येते ती इतिहास संशोधनात दोन ग्रंथ लिहिणार्या व्यक्तींची नावे एक सारखी दिसतात तेव्हा ते दोघे वेगवेगळे का एकच हा प्रश्न वारंवार उपस्थीत होताना दिसतो.अलिकडच्या काळातली बाब म्हणजे की संगणकीकरणाच्या जमान्यात एक सारखी नावे त्रास दायक होतात त्यात आडनाव नसल्याची अजून एक भर त्रास दायक होते.प्रॉपर्टी पत्रव्यवहार पासपोर्ट व्हीसा इत्यादीकरता लागणारे आयडेंटीफिकेशन तपास यंत्रंणांचे शोधही कठीण होऊ शकतात.
विकिपीडिया सारख्या साईट्वर संदिग्धता कमी करून योग्य व्यक्तीची माहिती योग्य व्यक्तीच्याच नावावर जाते आहे हे पाहण्या करता पुर्ण नावाची गर भासते त्याच वेळी तुम्ही म्हणता तसे लेखन आणि संपादन करणार्यांनी टोपण नावे वापरणे विकिपीडियास वाद विवाद टाळण्याच्या दृष्टीने बरे पडते हा झाला प्रॅक्टीकल भाग.मराठी विकिपीडियावर उघडल्या जाणार्या दर नऊ खात्यातील सहा खाती आडनावा सहीत असतात आणि तीन खाती आडनावा शिवाय असतात. सर्वच जातीधर्माच्या लोकांना आडनावांसहीत सदस्य खाती उघडणे आवडते असे दिसून आले . काही महिने नविन खाते उघडताना टोपणनाव वापरण्याचे आवाहन करून पाहीले पण ६:३ या रेशो मध्ये काहीच फरक पडला नाही.तात्पर्य आपण येथे चर्चा केल्या म्हणुन मराठी माणसे या बाबतीत कितपत बदलतील या बाबत शंका वाटते
तरीही आडनाव नसण्या पेक्षा जाती धर्म न्यूट्रल आडनावांनी आडनावे बदलण्याचा मी समर्थक आहे.
20 Jan 2014 - 6:09 pm | आदूबाळ
उदा?
20 Jan 2014 - 6:13 pm | माहितगार
आता पर्यंत आडनाव म्हणून वापरले न गेलेले शब्द
21 Jan 2014 - 5:18 am | चिन्मय खंडागळे
याच्यापेक्षा आईचं नाव वापरण्याचा पर्याय सोपा वाटत नाही का?
21 Jan 2014 - 10:50 am | माहितगार
एक रस्ता चुकलेल मुल तुम्हाला वाटेत भेटल मदतीची विनंती केली तुम्ही मदत करू इच्छिता त्याला त्याच्या घरी नेऊन सोडू इच्छिता पण त्याने त्याच्या बाबांच आणि आईच नावच तेवढ सांगितल त्यावरून काही बोध होतो ? पण आडनाव सांगितल तर त्या आडनावाची गावातली चार कुटूंब शोधण सोप जात. अर्थात आधारकार्डच्या जमान्यात हा शोध संगणकावरून अधिक सोपा व्हावयास हवा.
आडनावांनी कुलपरंपरेच कुलपरंपरा प्रत्येकात अपेक्षित संस्कार प्रत्येकवेळीच पेरू शकते असे नाही पण समाजाकडून अपेक्षांच ओझ लादल्या गेल्यामुळे काही जण काही वेळा प्रेरणा घेऊ शकतात किमान पक्षी समाज लज्जेस्तव काही चुकीच्या गोष्टी करण्याचे टाळण्याची शक्यता वाढते.समजा कुणी शिवाजी महाराजांच्या घराण्यातील व्यक्ती आहे त्याला हे करणे शोभेल ते करणे शोभणार नाही हा सामाजिक दबाव अंशतः काम करू शकतो. अर्थात आडनावा पेक्षाही कुलपरंपरा जात आणि धर्माची वीण गरजेपेक्षाही अधिक करकचून बांधताना दिसतात. आडनाव न वापरणे किंवा आईचे नाव वगैरे वापरणे दोनचार पिढ्या चालू शकते आयडेंटीफाय करण्या करता समाज काय ओळख वापरतो त्या नुसार नवी आडनावे पुन्हा येऊन चिटकू शकतात.पण कर्मानुसार आडनाव चिटकण्याचे दुष्परिणाम आपल्या समाजाने अनुभवले आहेत.मुल्यांनुसारी आडनावे जसे कि सत्य करूणा साहस शौर्य अशी आडनावे कुटुंबांना आवडीची मुल्ये सांभाळण्यास साहाय्यभूत होऊ शकतात एकदा एक आडनाव आहे म्हटल्यानुसार दुसरे आडनाव चिटकण्याची शक्यता कमी होते किंवा कसे असा विचार येतो.
20 Jan 2014 - 6:08 pm | म्हैस
सहमत... विशेषकरून शेवटच्या परीछेदाशी. काही जन आईचं नाव लावतात . जसं कि संजय लीला भन्साळी . आडनाव वडिलांचं आणि मधलं नाव आईचं .. असा पर्याय असू शकतो. किवा मध्ये वडिलांचं नाव आणि आडनाव आईचं. असा सुधा पर्याय होऊ शकेल
23 Jan 2014 - 11:38 pm | पैसा
काही फायदे, काही तोटे. आडनाव टाकणे ही फुलप्रूफ व्यवस्था नाही. माणसांच्या मनातली जात जात नाही तोपर्यंत या सगळ्या मलमपट्ट्या ठरणार. रोगावर उपचार नव्हे.
24 Jan 2014 - 6:20 am | सतरंगी_रे
जात हा प्रश्न आहेच पण जन्मदात्या आईची भूमिका काय ? असाही "व्यक्तिगत" प्रश्न होता.
त्यामुळे माझ्या मुलीचे नाव : नाव आईचे नाव वडिलांचे नाव असे आहे. पारपत्र, जन्मदाखला आदि ठिकाणी.
आणि हो, यातून काहीही सिद्ध करण्याचा मानस नाही. मुलीला (वय १ वर्ष ५ महिने) पुढे स्पष्टीकरण देण्यात येईल, यानंतर तिचा निर्णय ती घेईल.
खुलासा : आई - मुलीची आई - माझी पत्नी आणि वडील - मी स्वत: (हे न कळण्याइतके हुशार लोक आहेत त्यांच्यासाठी)
[सध्या] परदेशात राहणारा पुणेरी [खूप आहेत, मी एकटा, पहिला, विशेष, भारी, शेवटचा वगैरे नाही] असल्याने तिरकस प्रतिक्रीया स्वाभाविक आहे, नाही का ?
24 Jan 2014 - 10:14 am | चिन्मय खंडागळे
>>त्यामुळे माझ्या मुलीचे नाव : नाव आईचे नाव वडिलांचे नाव असे आहे. पारपत्र, जन्मदाखला आदि ठिकाणी.
इंटरेस्टिंग! असे करताना सरकारी बाबू लोकांनी काही खळखळ केली का?
24 Jan 2014 - 9:44 pm | सतरंगी_रे
खळखळ कोणी केली नाही. वेड मात्र लागलं काही लोकांना... पण आता ते चालायचंच.
आणि हो ... माझा एक मित्र आणि त्याची बहीण असेच नाव लावतात साधारण गेली ३० वर्षे .... आणि ते सुद्धा पुण्यात...! आता बोला..!
आणि वागतातही तसेच (जात धर्म न मानता). उदा. दाखल्यावर जात = भारतीय, दोघांचे विवाह आंतरजातीय
त्यामुळे जात जाईल का ? कोणी घालवायची ? असा विचार न करता असा स्वार्थ साधायला काय हरकत आहे ?
म्हणतात ना "You are what you do when it counts"
प्रेरणा त्यांच्याकडूनच (वागण्याची आणि फक्त निर्रथक मताची पिंक न टाकण्याची सुद्धा) !
24 Jan 2014 - 10:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
ब्राव्हो आणि अभिनंदन !
"You are what you do when it counts"
हे नक्कीच +१००० !24 Jan 2014 - 9:40 am | इरसाल
आडनाव रिटायर करावे काय?
जर तुम्हाला तुमचे खंडागळे हे आडनाव आवडत नसेल तर तुम्ही ते कोर्टात बदलुन "चिन्मय रिटायर " करुन घेवु शकता. फक्त त्याला अॅफेडेव्हिट करुन घेवुन पेपरात बातमी द्यावी लागेल.
24 Jan 2014 - 10:09 am | चिन्मय खंडागळे
खिक! *smile*
24 Jan 2014 - 10:11 am | बाळ सप्रे
भावना समजल्या !! पण आडनावावरुन जशी जात समजते तसच नाव, आडनाव या दोन्हीवरुन धर्म, भाषा, प्रांत तसच इतर आणखी काही समजु शकते.. अशी प्रतवारी होणारच त्यात काही चूक नाही .. पण त्यावरुन समोरच्याशी कसं वागायच हे ठरवलं जातं तिथे प्रॉब्लेम आहे.. त्यामुळे नाव वडिलांच नाव / आईचं नाव, आडनाव हे फक्त व्यक्तिला uniquely identify करण्यासाठी आहे एवढ ध्यानात ठेवावं..
एखाद्या व्यक्तिला कसं वागवायचं / judge करायचं ते महत्वाचं.. काहीजणं फक्त नाव ऐकुन त्याच्या जात धर्म भाषा प्रांत ओळखुन तो/ती असेल/ अशीच असेल असा शिक्का मारुन मोकळे होतात.. काहीजण व्यक्तिला नुसतं बघुन असे शिक्के मारतात.. काही थोड्याशा ओळखीनंतर शिक्के मारतात..
त्यामुळे कधी असे fuzzy logic वरुन मत बनवायचं आणि कधी पूर्ण माहितीवरुन मत बनवायचं हा सारासार विवेक असणं महत्वाचं.