पिग वॉर (The Pig War)

किलमाऊस्की's picture
किलमाऊस्की in दिवाळी अंक
26 Oct 2013 - 8:37 am

जगातल्या दोन महासत्ता एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. रणशिंग फुंकलं गेलंय. एक गोळी सुटण्याचा अवकाश. कुठल्याही क्षणी युद्धाला तोंड फुटेल. युद्ध नक्की कशासाठी? आजवर जगात विविध कारणांमुळे युद्धं झाली आहेत. पण कधी ऐकलंय दोन बलाढ्य राष्ट्रं लढाईसाठी सुसज्ज झालेली ती एका डुकरामुळे? हो! अमेरिकेच्या इतिहासात 'पिग वॉर' नावाने प्रसिद्ध असलेल्या या युद्धात अमेरिका व ग्रेट ब्रिटन या दोन बलाढ्य महासत्तांनी सान व्हान बेटांवर एका डुकरामुळे रणशिंग फुंकलं होतं.

पार्श्वभूमी -

इ.स. १७००च्या आसपास रशियन, स्पॅनिश व ब्रिटिश राजांनी अनेक दर्यावर्दींना, व्यापार्यांणना राज्यविस्तारासाठी नवनवीन प्रदेश हुडकून काढण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. यातील अनेक दर्यावर्दींनी अमेरिका खंडाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. इ.स. १७७६ साली स्वतंत्र झालेली अमेरिकाही या स्पर्धेत उतरली. युरोपियन किंवा अमेरिकन दर्यावर्दींनी जे भूभाग हुडकून काढले होते, त्या प्रदेशावर कायदेशिररीत्या कब्जा करायला सुरुवात केली. अमेरिकेत अतिउत्तरेला फार पूर्वीपासून स्थानिक 'इंडियन' जमातींचं वास्तव्य होतं. युरोपियनांनी व अमेरिकनांनी साम-दाम-दंड-भेद वापरून या जमातींचा अनेकदा बिमोड केला. अनेक आदिवासी जमातींच्या हक्काच्या जागा गिळंकृत केल्या. इ.स. १८०० साल उजाडेपर्यंत ही स्पर्धा इतकी वाढली की अमेरिकेच्या दक्षिणेकडच्या कॅलिफोर्नियावर स्पेनने कब्जा केला, तर अतिउत्तरेला सध्याचा अलास्का रशियनांच्या हातात होता. ब्रिटिशांनी कॅनडाचा बराचसा भाग आधीच गिळंकृत केला होता. अमेरिकेच्या पश्चिम किनार्यातवर 'ओरेगॉन'च्या भल्यामोठया भूभागावर अमेरिका व इंग्लंड दोघे टपून बसले होते. ओरेगॉन ताब्यात घेण्यासाठी या दोन्ही देशातली स्पर्धा इतकी वाढली की शेवटी १८१८ साली ब्रिटन व अमेरिका या दोन्ही देशांनी या भागावर समान हक्क सांगत 'Treaty of join occupation' या नावाने एक करार संमत केला. या कराराअंतर्गत ओरेगॉनमधे दोन्ही देशांच्या नागरिकांना काम करण्याचे हक्क देण्यात आले.

तरीही पुढील अनेक वर्ष ओरेगॉनवर 'हडसन बे कंपनी' मुळे ब्रिटिशांचं वर्चस्व कायम राहिलं. हडसान बे - जंगली प्राण्यांच्या कातड्याचा व्यापार करणारी एक मोठी कंपनी. अमेरिकेच्या पश्चिम किनार्यासवर या कंपनीची पाळंमुळं खोल रुतलेली होती. फक्त आणि फक्त व्यापार हा हडसन बे कंपनीचा प्रमुख उद्देश असल्याने स्थानिक इंडियन्सचंही त्यांना सहकार्य मिळत होतं. त्याउलट अमेरिका ओरेगॉनकडे राज्यविस्ताराच्या दृष्टीने नजर ठेवून होती. या भागात स्थायिक होण्यास अमेरिकन जनता फारशी उत्सुक नसली तरी ओरेगॉनला येनकेन प्रकारेणं अमेरिकेत सामील करून घ्यायचा अनेक अमेरिकन नेत्यांचा मनसुबा होता. 'Fifty - Forty Four or Fight!'(१) हे अमेरिकन नेत्यांचं आवडतं घोषवाक्य होतं. 'Treaty of join Occupation'मुळे या प्रदेशात शांतता असली तरी दोन्ही देशांमधला वाद संपला नव्हता. दोन देशातली सीमारेषा नक्की करण्याकरिता 'Oregon Treaty'हा नवीन करार तयार करण्यात आला. या करारानुसार व्हॅकुंवर हे बेट ब्रिटिशांच्या झोळीत पडलं. या करारामुळे या दोन देशातले अनेक वाद संपुष्टात आले असले, तरी यातून नवा वाद निर्माण झाला. अमेरि़केची मुख्य भूमी व व्हॅकुंवर बेट यामध्ये असणार्या सान व्हान या बेटांची मालकी नक्की कुणाकडे जाणार, हे या करारात नमूद केलेल्या दोन देशातल्या धूसर सीमारेषांमुळे स्पष्ट होत नव्हतं.

सान व्हान बेटं(San Juan Islands) -

अमेरिकेच्या उत्तरेला मुख्य भूमीपासून किंचित बाजूला सुंदर अशी तीन बेटं वसली आहेत - सान व्हान, लोपेझ, ऑरका - ही तीन बेटं व आसपासच्या इतर छोट्याछोट्या बेटांच्या एकत्रित समूहाला सान व्हान बेटं असं संबोधतात. या बेटांचा शोध सर्वप्रथम लावला तो स्पॅनिशांनी. त्याला नावही दिलं स्पॅनिश दर्यावर्दी फ्रान्सिस्को एलिझा याने. या बेटांवरचे मूळ निवासी 'सालिश' जमातीचे आदिवासी.

सान व्हान बेटांचा मालकीहक्क -


(सान व्हान बेटं आणि अमेरिका व ब्रिटनव्याप्त कॅनडामधल्या धूसर सीमारेषा)

सान व्हान बेटांच्या मालकी हक्काबाबत ओरेगॉन ट्रीटीमधील संदिग्धपणामुळे दोन्ही देश या बेटांवर आपला हक्क असल्याचा दावा करू लागले. अमेरिकेच्या मते ओरेगॉन ट्रीटीमध्ये नमूद केलेली सामुद्रधुनी हारो(Haro Strait)ही सीमारेषा होती, तर ब्रिटिशांच्या मते सीमारषा होती रोसारिओ (Rosario Strait) सामुद्रधुनी. या दोन सामुद्रधुनींच्या मध्ये फसलेली सान व्हान बेटं प्रत्येकाला आपल्या मालकीची वाटत होती. त्यामुळे दोन्ही देश आपापल्या सोयीने सीमारेषा दाखवून भांडत होते. व्हॅकुंवरमधले अनेक ब्रिटिश स्थानिक नेते, तसंच हड्सन बे कंपनीतील अधिकारी ओरेगॉन ट्रीटीवर नाराज होते. त्यांच्या मते ब्रिटनने सुपीक शेतजमीन असलेला कोलंबिया नदीच्या उत्तरेकडचा भाग या ट्रीटीमुळे हकनाक गमावला होता, तर अमेरिका कुठल्याही परिस्थितीत ओरेगॉन सोडायला तयार नव्हती. दोन्ही बाजूने रस्सीखेच चालू होती. सान व्हान बेटं या खेचाखेचीत महत्त्वाचं प्यादं होतं. तरीही ओरेगॉन ट्रीटी मंजूर झाल्यानंतर दोन्हीपैकी कुठल्याही देशाने या बेटांवर आपलं बस्तान बसवायची घाई केली नाही.

बेल व्ह्यू फार्म -

१८५१ साली हडसन बे कंपनीने या बेटांच्या दिशेने पहिलं पाऊल उचललं. सामन मासे टिकवण्यासाठी प्रक्रिया करणारा कारखाना काढण्यासाठी या कंपनीने जेम्स डग्लस या आपल्या मोठ्या अधिकार्यावला सान व्हान बेटांवर पाठवलं. पुढच्या दोन वर्षात डग्लसने आसपासचं घनदाट जंगल साफ करून मेंढ्यांसाठी कुरणं आणि शेतजमीन तयार करुन घेतली. या लांबच लांब पसरलेल्या हिरव्यागार कुरणांना त्याने नाव दिलं - बेल व्ह्यू(२). या कुरणांची देखरेख करण्यासाठी त्याने आपल्या कंपनीतर्फे नियुक्ती केली चार्ल्स जॉन ग्रिफिन याची. ग्रिफिनने या कुरणांची देखरेख करण्याबरोबरच आसपासच्या जमिनीत शेती फुलवली, तसंच काही पाळीव प्राण्यांचीदेखील भर घातली.


(चार्ल्स जॉन ग्रिफिन)

....आणि गोळी सुटली -

इ.स. १८५०मध्ये अमेरिकन काँग्रेसने 'डोनेशन लँड क्लेम अॅीक्ट' (३) पास केल्यानंतर इ.स. १८५८च्या सुमारास काही अमेरिकन नागरिकांनी सान व्हान बेटांच्या आसपास वस्ती करण्यास सुरुवात केली. यातले बरेचसे कोलंबिया नदीजवळ थोड्या काळासाठी आलेल्या गोल्ड रशमध्ये हाताला काहीही न लागलेले, वैतागलेले कामगार होते. यातल्या अनेकांना पोटापाण्यासाठी थोडीफार शेतजमिनीची व राहण्यासाठी घराची आवश्यकता होती. अमेरिकेच्या बाजूने सान व्हान बेटांच्या दिशेने अचानक स्थलांतरित होणार्या लोकसंख्येला पाहून डग्लसच्या मनात शंकाकुशंका येऊ लागल्या. काही दिवसातच हे अमेरिकन्स बेल व्ह्यू फार्मवर अड्डा जमवतील, याची खातरी पटल्याने डग्लसने लागलीच ब्रिटिश अधिकार्यां कडे आपली भीती बोलून दाखवली.

स्थलांतरित होणार्या कामगारांमधे एक होता लीमन कटलर. कोलंबिया नदीजवळ आलेल्या गोल्ड रशमध्ये अपयशी ठरलेला कटलर एप्रिल १८५९ रोजी सान व्हान बेटावर आपल्या वाटच्या जमिनीच्या आशेवर आला होता. हाती लागलेल्या काही एकराच्या जागेत त्याने आपलं घर व बटाट्याचं शेत वसवलं. आता कटलरचं नशीब म्हणा अथवा कमनशीब - त्याला मिळालेली जागा होती ती बेल व्ह्यू फार्मजवळ. बेल व्ह्यू फार्मपासून जवळच असलेल्या या त्याच्या शेताला कुंपण नव्हतं. आता कुंपण नसलेल्या या शेतात अधूनमधून बेल व्ह्यू फार्ममधली डुकरं अरामात घुसून बटाटे फस्त करीत असतं. हे वारंवार घडू लागल्यावर वैतागलेल्या कटलरने हडसन बे कंपनीकडे तक्रार केली.
अर्थातच हडसन बेच्या अधिकार्यां नी ही तक्रार फारशी मनावर घेतली नाही. पुढील बरेच दिवस डुकरांना कटलरच्या शेतात मेजवानी मिळत गेली. नेहमीप्रमाणे १५ जून १८५९ या दिवशी बेल व्ह्यू फार्ममधलं एक डुक्कर शेतात घुसताना कटलरने पाहिलं आणि त्याचा पारा चढला. आज काय या डुकराला सोडायचं नाही, या इराद्याने कटलर बंदूक घेऊन त्या डुकरामागे धावला आणि योग्य संधी मिळताच त्याने डुकरावर गोळी झाडली. थोड्या वेळात डोकं शांत झाल्यावर कटलरला आपली चूक उमगली. कटलरने ग्रिफिनला घडलेला प्रसंग तत्काळ कथन करून भरपाई म्हणून बदल्यात दुसरं डुक्कर देऊ केलं. परंतु ग्रिफिनला मोबदला म्हणून पैसे हवे होते. तेही वट्ट १०० डॉलर्स. कटलरच्या मते मरतुकड्या डुकरासाठी १०० डॉलर्स जरा जास्तच होते. तो १० डॉलर खर्चायला तयार होता. पण ग्रिफिन अडून बसला. त्याला रो़कड हवी होती आणि तीसुद्धा १०० डॉलर्स. ग्रिफिनने हडसन बे कंपनीकडे व ब्रिटिश सरकारकडे आपली फिर्याद केली. ब्रिटिश अधिकारी सान व्हान बेटात तत्काळ दाखल झाले. त्यांनी कटरलला धमकावलं : एकतर ग्रिफिनला १०० डॉलर्स द्यावे, अन्यथा मुसक्या बांधून त्याला व्हॅकुंवरमध्ये ब्रिटिश तुरुंगात नेलं जाईल. झालं! ठिणगी पडली होती. आता आग लागायला वेळ लागणार नव्हता.


(पिग वॉरमधलं मुख्य पात्र - कटलरची बंदूक.)

या प्रकरणात कटलरच्या नखालाही धक्का लागला नसला तरी सान व्हान बेटावर हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या जनतेच टाळकं सटकायला इतकं कारण पुरेसं होतं. त्यातून भांडण काही ऐर्यामगैर्यायबरोबर नव्हतं, तर ओरेगॉन गिळंकृत करू पाहणार्यां ब्रिटिशांबरोबर. एकमताने ४ जुलैचा दिवस ठरला. या प्रकरणाचा विरोध करण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर ध्वजारोहण झालेला झेंडा अमेरिकनांनी तसाच फडकत ठेवला. एक-दोन दिवसातच अमेरिकन जनरल विल्यम हार्नेला हा फडकणारा झेंडा दिसला. चौकशी करता त्याला एका डुकरावरून झालेल्या बाचाबाचीचा सुगावा लागला. ब्रिटिशांचा दु:स्वास करणार्याा विल्यम हार्नेच्या हातात आयतंच कोलीत मिळालं. हार्नेने गावकर्यांनना बोलावून सर्वांच्या संमतीने त्यांना गावकर्यां ना ब्रिटिशांपासून धोका असल्याने सैनिकी संरक्षण देण्याविषयी अर्ज करायला सांगितला. हार्नेने अर्जावर तत्काळ अंमलबजावणी करून जॉर्ज पिकेटच्या नेतृत्वाखाली ६६ अमेरिकन सैनिकांची एक तुकडी सान व्हान बेटाकडे रवाना केली.

अमेरिकेच्या या युद्धखोर हालचाली पाहून ब्रिटिश अधिकारी सजग झाले. कुठल्याही परिस्थितीत सान व्हान बेटांचा ताबा त्यांना सोडायचा नव्हता. ताबडतोब त्यांनी कॅप्टन जेफ्री हॉर्न्बीच्या नेतृत्वाखाली तीन युद्धनौका व्हॅकुंवरवरून सान व्हान बेटांकडे धाडल्या. दिवस जात राहिले, तसतशी परिस्थिती अजूनच बिघडत गेली. १० ऑगस्ट १८८९ रोजी अमेरिकेने ४६१ सैनिक १४ तोफा तैनात केल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून ब्रिटननेही २१४० बंदूकधारी सैनिक उभे केले. युद्धाला तोंड फुटण्यासारखी परिस्थिती तयार झाली होती. अजून एकही गोळी झाडली गेली नव्हती.


(पिग वॉरशी संबंधित चार खंदे अधिकारी - पिकेट, हार्ने, डग्लस, हॉर्न्बी)

खरं तर साध्या डुकरावरून युद्धासाठी सज्ज होणं हे दोन्ही बाजूच्या अधिकार्यां ना मूर्खपणाचंच वाटत होतं. पण सान व्हान बेटांचा ताबा सोडायला दोन्ही देश तयार नव्हते. दोन्ही बाजूच्या सैन्याला सर्वप्रथम गोळी न झाडण्याचे कडक निर्देश देण्यात आले होते. पलीकडून गोळी सुटल्यास प्रत्युत्तर द्या, असा दोन्ही बाजूने आदेश देण्यात आला. त्यामुळे विरुद्ध बाजूने गोळी पहिल्यांदा कधी सुटेल, याची दोन्ही बाजूचे सैनिक वाट बघत बसले. दिवस जात होते, वातावरण तापायला लागलेलं होतं. कुठच्याही क्षणी गोळी सुटेल आणि युद्धाला सुरुवात होणार होती. पण अनेक दिवस विरुद्ध बाजूने हालचाल न दिसल्याने कंटाळलेल्या सैनिकांमध्ये शाब्दिक चकमकी सुरू झाल्या. दुसर्याध बाजूचे सैनिक अर्वाच्य शब्दात शिवीगाळ करून युद्धासाठी उचकवत असत.

जेव्हा अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन आणि ब्रिटनची राजधानी लंडन येथे ही बातमी पोहोचली, तेव्हा मात्र एका मामुली डुकरावरून युद्धजन्य परिस्थिती निर्माण व्हावी, याचा तिथल्या अधिकार्यांबना धक्का बसला. दोन्ही बाजूच्या सरकारी अधिकार्यांीनी तत्कालीन परिस्थितीतील संभाव्य धोका लक्षात घेऊन तत्काळ पावलं उचलली. अमेरिकन सरकारने संबंधितांना चांगलंच फटकारलं. जोवर सान व्हान बेटांची सीमारेषा स्पष्ट होत नाही, तोवर कुठल्याही प्रकारच गैरवर्तन खपवून घेतलं जाणार नाही, अशी कानउघडणीही करण्यात आली. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकॅनन यांनी जनरल स्कॉट याला डग्लससोबत चर्चा करण्यासाठी धाडलं. जनरल स्कॉटनी सान व्हान बेटांवर मुक्काम हलवताच वातावरण निवळण्यास थोड्याफार प्रमाणात मदत झाली. थोड्याफार चर्चेनंतर दोन्ही बाजूंच्या अधिकार्यांमच्या सहमतीनुसार दोन्ही बाजूला प्रत्येकी १०० सैनिक सान व्हान बेटांवर तैनात केले गेले. दळणवळणाच्या व सैन्याला रसद मिळण्याच्या दृष्टीने योग्य असल्याने सान व्हान बेटांच्या उत्तर किनार्याकवर ब्रिटिशांनी छावणी थाटली, तर युद्ध झालंच तर दारूगोळा ने-आण करण्यासाठी सुयोग्य अशी अमेरिकन छावणी दक्षिण किनार्याावर थाटण्यात आली. दोन्ही बाजूच्या अधिकार्यां्नी आपापल्या सैन्याला शांतता राखण्याचं आवाहन केलं.


(अमेरिकन छावणीतील तंबू)


(ब्रिटिश छावणी)

आता युद्ध होत नाही म्हटल्यावर दोन्ही बाजूचे सैनिक थोडे सुस्तावले. रोज एकमेकांशी हमरीतुमरीवर येणार्याी सैनिकांमध्ये आता छोट्यामोठ्या वस्तूंची देवाणघेवाण होऊ लागली. हळूहळू दोन्ही बाजूचे सैनिक एकमेकांच्या छावणीला भेट देऊ लागले. रविवारची सामूहिक प्रार्थना एकत्र होऊ लागली. सणाच्या दिवशी एकत्रितपणे गोडधोड केलं जाई. दोन्ही बाजूच्या छावण्या खेळही रंगत असत. युद्धच नाही, तर आता करणार तरी काय? मग बरेचदा दोन्ही बाजूंपैकी एकीकडे मेजवान्या झडायच्या. अधूनमधून दोन्ही बाजूने खटके उडतही असत, पण ते तेवढ्यापुरतेच. एकूणच दोन्ही बाजूने सौहार्दपूर्ण वातावरण सांभाळण्याचा प्रयत्न चालू होता. वातावरण निवळू लागलं होतं. या काळात शांतता नांदण्याचं एक प्रमुख कारण दिलं जातं, ते म्हणजे व्हिस्की. प्रचंड प्रमाणात उपलव्ध असलेल्या दारूने दोन्ही बाजूंना काबूत ठेवण्याचं काम उत्तम प्रकरे केलं. तब्बल एक तप ही परिस्थिती अशीच जैसे थे चालली. दोन्ही बाजूने एकही गोळी झाडली गेली नसली, तरी सान व्हान बेटांवरचा ताबा सोडायला एकही देश तयार नव्हता.

https://lh4.googleusercontent.com/-AFTdXH4f1Oc/UmWM8TepmcI/AAAAAAAABlQ/uM8qJJ1VPpY/s300/pigwar4.jpg
(युद्धकाळात आराम करणारे सैनिक)

सरतेशेवटी मे १८७१मध्ये ब्रिटिश व अमेरिकन, दोघांच्या संमतीने 'ट्रिटी ऑफ वॉशिंग्टन' वर स्वक्षरी करण्यात आली. या करारात ब्रिटनव्याप्त कॅनडा व अमेरिकेच्या सीमरेषेसंबधी अनेक वाद मिटवण्यात आले. दोघांच्या सहमतीने जर्मनीचा राजा कैसर विल्यम पहिला याला या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी मध्यस्थ म्हणून नेमण्यात आलं. कैसर विल्यमने या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तीन जणांची समिती बनवली. या समितीच्या जिनिवा येथील बैठकीत 'हारो सामुद्रधुनी' ही सान व्हान बेटांना मुख्य व्हॅकुंवर बेटांपासून अलग करीत असल्याने सान व्हान बेटं अमेरिकेच्या मालकीची असल्याचा महत्त्वाचा ठराव पास करून तेरा वर्ष चाललेल्या दोन महासत्तांमधल्या संघर्षाला पूर्णविराम दिला. लागलीच २१ मे १८७१, रोजी ब्रिटिश सैन्याने सान व्हान बेटांवरून माघार घेतली व व्हॅकुंवरच्या दिशेने प्रस्थान केलं. एक तपाहून जास्त काळ गाजावाजा झालेलं 'पिग वॉर' संपलं. मात्र एकही गोळी न झाडता तब्बल तेरा वर्ष चाललेल्या या पिग वॉरमध्ये घडलेला एकमेव दु:खद मृत्यू होता - एका डुकराचा!

(समाप्त)

आज सान व्हान बेटं अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्याचा भाग आहेत. इतिहासप्रेमींसाठी सान व्हान बेटांवर ' San Juan Island National Historical Park'थाटलं आहे. ब्रिटिश छावणी ज्या ठिकाणी होती, त्या ठिकाणी पार्क रेंजर्सतर्फे आजही युनियन जॅक फडकवला जातो.
https://lh5.googleusercontent.com/-ZV8knLrp-y8/UmWI4jAdJiI/AAAAAAAABkU/cAN_jN1Wy20/s500/engcamp.jpg

टिपा:
(१) Fifty - Forty Four or Fight -इ.स. १८४४ साली डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जेम्स पोल्क यांनी ओरेगॉनला अमेरिकेत सामील करून घेण्यासाठी तयार केलेली ही 'ओरेगॉन न मिळाल्यास अमेरिका युद्धास तयार आहे' हे ठासून सांगणारी घोषणा त्या काळी फार लोकप्रिय झाली होती. ‘५० अंश ४०' ही ओरेगॉनची त्या वेळची सीमारेषा ठरवण्यात आली होती.

(२) बेल व्ह्यू (Belle Vue) -
फ्रेंच शब्द, अर्थ - सुंदर देखावा

(३) डोनेशन लँड क्लेम अॅक्ट - अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावर - विशेषतः ओरेगॉनमध्ये सामान्य अमेरिकन नागरिकांनी वस्ती करावी, यासाठी अमेरिकन काँग्रेसने १८५० साली हा कायदा पास केला. या कायद्याअंतर्गत, जर अमेरिकन अविवाहित पुरुष/स्त्री या भागात घर बांधून राहणार असेल, तर ३२० एकर जागा, तर विवाहित जोडप्यांना ६४० एकर जागा विनामोबदला देण्याची तरतूद करण्यात आली होती.

संदर्भः

(१) The pig war : standoff at Griffin Bay by Mike Vouri
(२) Pig War islands : the San Juans of Northwest Washington by David Blair Richardson
(३) The Pig War by Michael Vouri

दिवाळी अंक २०१३

प्रतिक्रिया

वसईचे किल्लेदार's picture

1 Nov 2013 - 2:15 pm | वसईचे किल्लेदार

आवडल्या गेलेय!

मुक्त विहारि's picture

1 Nov 2013 - 2:46 pm | मुक्त विहारि

अत्यंत अभ्यासपुर्ण लेख...

मदनबाण's picture

1 Nov 2013 - 2:56 pm | मदनबाण

वा... इतिहासा बद्धल नविन माहिती मिळाली !
एका डुकारासाठी युद्ध करायची तयारी ठेवणारे हो दोन्ही देश आजच्या घडीला अत्यंत महत्वपूर्ण संबंध ठेवुन आहेत.
आपल्या हिंदुस्थानाचे सैनिक मात्र एखादा बकरा हलाल करावा तसे कापले जात आहेत आणि रोज नविन जवानांची आहुती हा देश अर्पण करतो आहे याची मनस्वी चीड वाटते.अनेक थोर महापुरुष आणि योद्ध्यांच्या गाथा ज्या देशात अभिमानाने गायल्या जातात त्याच देशात इतके बलिदान देउन सुद्धा लोकांचे रक्त अजुन उसळत कसे नाही ? असा प्रश्न मात्र मला रोज पडतो आणि त्याचे उत्तर मात्र काही सापडत नाही. :(

प्यारे१'s picture

1 Nov 2013 - 3:16 pm | प्यारे१

लोकांना भांडायला का ही ही निमित्त पुरतं.
अभ्यासू मुलांचा अभ्यासपूर्ण लेख. :)

(ही शाळेत पहिल्या बेंचवर बसत असणार. नक्कीच.)

किलमाऊस्की's picture

5 Nov 2013 - 12:25 am | किलमाऊस्की

(ही शाळेत पहिल्या बेंचवर बसत असणार. नक्कीच.)

हेहेहेहे... :-)

पैसा's picture

2 Nov 2013 - 12:35 pm | पैसा

आता हास्यास्पद वाटतंय. पण तेव्हा नक्कीच हिरीरीने भांडण झालं असणार! लेख नेहमीप्रमाणे झक्क!

सुहास झेले's picture

2 Nov 2013 - 3:02 pm | सुहास झेले

सुपर्ब.... अतिशय अभ्यासपूर्ण लेख.... :) :)

प्रभाकर पेठकर's picture

3 Nov 2013 - 10:59 am | प्रभाकर पेठकर

अतिशय रंजक, उत्कंठावर्धक सामाजिक आणि राजकिय घटनांचे विविध पदर असलेले ऐतिहासिक नाट्य मोजक्या शब्दात शब्दबद्ध केलं आहे. आवडलं.

देशात चक्क डुकरासाठी लढाई? छान ऐतिहासिक माहिती, तितक्याच रंजकतेने लिहिली आहे.

राजेश घासकडवी's picture

4 Nov 2013 - 8:12 pm | राजेश घासकडवी

लेख आवडला.

जर अमेरिकन अविवाहित पुरुष/स्त्री या भागात घर बांधून राहणार असेल, तर ३२० स्क्वेअर फुटाची जागा, तर विवाहित जोडप्यांना ६४० स्क्वेअर फुटाची जागा विनामोबदला देण्याची तरतूद करण्यात आली होती.

३२० स्क्वेअर फूट नाही - ३२० एकर!!

किलमाऊस्की's picture

5 Nov 2013 - 12:24 am | किलमाऊस्की

३२० स्क्वेअर फूट नाही - ३२० एकर!!

धन्यवाद! सुधारणा केली आहे.

विनोद१८'s picture

4 Nov 2013 - 11:54 pm | विनोद१८

अतिशय सुन्दर व अभ्यासपूर्ण लेख....*good*

एका डुकरामुळे निर्माण झालेला सीमाप्रश्ण कायमचा निकालात निघाला एकदाचा. सहजच मनात विचार आला आपल्या काश्मिरचा सीमाप्रश्ण सोडविण्यासाठी कोणाचा बळी द्यावा लागेल ? डुकराचा, बोकडाचा कि आणखी कुणाचा.....व किती ??

विनोद१८

किलमाऊस्की's picture

5 Nov 2013 - 12:30 am | किलमाऊस्की

वसईचे किल्लेदार ,मुक्त विहारि ,मदनबाण ,प्यारे१ ,पैसा ,सुहास झेले ,प्रभाकर पेठकर,अनन्न्या ,राजेश घासकडवी, विनोद१८ -
मनःपूर्वक धन्यवाद !

मुक्त विहारि's picture

5 Nov 2013 - 8:19 pm | मुक्त विहारि

लिहील्याबद्दल तुम्हाला पण धन्यवाद...

पुढील लेखाच्या प्रतिक्षेत...

विअर्ड विक्स's picture

6 Nov 2013 - 3:54 pm | विअर्ड विक्स

अतिशय रोचक लिखाण

अश्या लेखांनीच इतिहासाबद्दल गोडी वाढते.....

कवितानागेश's picture

9 Nov 2013 - 11:44 pm | कवितानागेश

मस्त लिहिलय. :)

किलमाऊस्की's picture

12 Nov 2013 - 12:42 am | किलमाऊस्की

धन्यवाद - विअर्ड विक्स, लिमाउजेट!

एस's picture

12 Nov 2013 - 11:47 pm | एस

हेमांगीके हे नाव बघूनच धागा उघडला जातो.

इरसाल's picture

13 Nov 2013 - 4:03 pm | इरसाल

आणी सहमत.
प्रत्येक्वेळी जरी प्रतिसाद दिला नाही तरी तुमचे लेखन हे वाचतोच वाचतो.

इन्दुसुता's picture

18 Nov 2013 - 9:59 am | इन्दुसुता

माहितीपूर्ण लेख, अतिशय आवडला.

किलमाऊस्की's picture

6 Dec 2013 - 11:17 am | किलमाऊस्की

स्वॅप्स, इरसाल व इन्दुसुता - मनःपूर्वक धन्यवाद

सुरेख माहितीपूर्ण लेख!