श्रीधर

mvkulkarni23's picture
mvkulkarni23 in दिवाळी अंक
29 Oct 2013 - 1:12 pm

देवांनी दिलेल्या आणि आपल्याला लाभलेल्या या छोट्याशा आयुष्यात आपल्याला किती आणि किती तर्‍हेची माणसे भेटतात! काही जण पहिल्याच भेटीत जिवाभावाचे मित्र होऊन जातात, काही जण अकारण शत्रूसारखे वागतात. काही नीट ओळख झाल्यावर त्याच्याविना जगणे अशक्य करून टाकतात. यामध्ये वयाचा, मानाचा कसलाही मुलाहिजा नसतो. एखादा लहानगाही त्याच्या मोजक्या शब्दांनी आपल्याला विचारात पडतो, तर कधी वृद्धांचे कातरलेले शब्द काळजाला घर करून जातात. ह्या सगळ्यात कधी आपली अपंग, मतिमंद, अंध किंवा काही व्यंग असलेली व्यक्ती जर समोर आली, तर आपण सहसा टाळायचा प्रयत्न करतो. माशी झटकल्यासारखे किंवा तुच्छतेने कटाक्ष टाकून आपण दुसरी वाट घेतो. ‘कशाला ही ब्याद आली आहे आपल्यापाठी?’ असे कधी मनात, तर कधी चारचौघात विचार व्यक्त करतो. अशा व्यक्तींचे गुण पाहण्यापेक्षा आपण त्यांचे व्यंगच पाहतो आणि जमलीच तर दया दाखवतो. एखादा आंधळा उत्तम चित्रकार असू शकतो, एखादा हात गमावलेला पायाने उत्तम कलाकृती करू शकतो अगर उत्तम गायन करू शकतो. पाय गमवलेली एखादी व्यक्ती सायकलरिक्षाच नव्हे, तर आपले घरही चालवू शकते, ह्याचा कधी आपण विचार करत नाही. हीच माणसे जेव्हा आपल्या मदतीला येतात आणि मग त्यांचा हेवा वाटायला लागतो. देवाने दिलेल्या धडधाकट शरीराचा, चांगल्या वाणीचा उगीचच मत्सर वाटायला लागतो.

असाच एक मनुष्य माझ्या आयुष्यात आला. त्याला आता वीस वर्षे झाली. आम्ही काही मित्रांनी एक वाद्यवृंद बनवला होता आणि त्याचे गणेशोत्सवामध्ये कार्यक्रम करायचे होते. आम्ही मित्राच्या घरी त्याची गाण्याची तयारी आणि तालीम करायचो. रोज संध्याकाळी ६ ते ८-८.३० पर्यंत सराव चालायचा. अचानक एक दिवस ‘श्रीधर कुलकर्णी’ आमच्या मैफलीत अवतरला. साधारण ५ फूट उंची, वर्ण आडनावाला साजेसा, शरीरयष्टी अगदी किरकोळ. अंगात स्वत:च्या वर्णापेक्षा स्वच्छ सदरा आणि पायात जुनेसे वाटणारे बूट. सुरुवातीला हा येण्याचे प्रयोजन कळले नाही. बरे, अतिशय आकर्षक व्यक्तिमत्त्व नसल्याने विशेष लक्ष वेधून घेईल असेही नाही. नुसताच इकडे तिकडे पाहत होता. थोड्या वेळाने त्याला वाद्य आणायला कोणीतरी सांगितले आणि हा तडकाफडकी उठला आणि सगळी वाद्ये घेऊन आला. पाच मजले वाद्य अंगावर टाकून आल्याने घामाघूम झाला होता. ‘आण ते इकडे’ अशी कोणीतरी खूण केली आणि त्याने त्याचे कर्तव्य पार पाडले. मी आपला उगीचच तोंडदेखले Thanks म्हटले आणि त्याचे उत्तर आले. सुरुवातीला मला काहीच कळले नाही, म्हणून मी परत त्याच्याकडे पहिले आणि परत तो काहीतरी बोलला आणि मला ते कळले नाही. त्याची जीभ जड होती. त्याचा कुठलाही शब्द किंवा वाक्य ‘अ’च्या बाराखडीत उच्चारले जायचे. उदा. ‘तू कसा आहेस?’ असे त्याने विचारले तर याचे ‘उ अआ आएअ?’ असले काहीतरी ऐकू येते. सुरुवातीला आम्हा कोणालाच काही अर्थबोध होईना. मग हा काहीतरी हातवारे करून (पूर्वी दूरदर्शनवर रविवारी दुपारी विशेष बातम्या लागायच्या, तसे) आम्हाला समजायला मदत करायचा. याचे हे व्यंग म्हटले तरी फार विशेष नव्हते, पण समोरच्याशी संवाद साधण्यासाठी मोठा अटकाव निश्चित होते.

पहिल्याच भेटीत त्याने हॅलो, गुड इव्हनिंग असे बोलून सुरुवात केली. सुरुवातीला प्रत्येक वाक्याला आम्ही आं आं करायचो. पण नंतर हळूहळू सवय होत गेली. हा सारखा कुठेतरी आणि कोणासाठीतरी धावत असायचा. कोणीही काहीही काम सांगितले की हा ते काम करायला अतिशय तत्पर असायचा. क्षणाचाही विलंब न लावता हा निघालाच त्या वाटेवर. कोणाचे गॅस सिलेंडर घेऊन ये, कुणाच्या मुलाला शाळेत सायकलवर सोडून ये, कुठल्यातरी आजींची औषधे मेडिकलच्या दुकानातून घेऊन ये, तर कधी कोणाचातरी गाडीत पेट्रोल भरून आण. एखाद्याच्या किराणा मालाचा जड सामान आणायचा आहे, की हा पठ्ठ्या निघाला मोहिमेवर. पूर्ण सोसायटीचा ‘नारायण’च म्हणा हवे तर. कधीही तयार आणि तत्पर. मागे एकदा सोसायटीमधील एका वयस्क व्यक्तींना त्रास व्हायला लागला, तातडीने दवाखान्यात नेणे आवश्यक होते. श्रीधर हातातली कामे सोडून लगेच रिक्षा घेऊन आला. त्यांना रिक्षात घालून रुग्ण योग्य डॉक्टरच्या हवाली पोहोचेपर्यंतची सर्व कामे त्याने यथासांग पार पडली. किंबहुना तेथील रहिवाश्यांनी त्याला गृहीतच धरले होते की हा आहेच. पूर्वी फोन, मोबाइल वगैरे नव्हते. कधी कोणाला निरोप द्यायचा असला तरी ‘श्रीधर.कॉम.’ कोणाला बोलावून आण, कोणाचा निरोप पोचवून दे, हा माणूस सायकल वर टांग मारून काही क्षणात पुढच्या गल्लीत अदृश्य झालेला असायचा. त्याला एका क्षणाची उसंत नसे.

आमचा वाद्यवृंदाचा जाहीर कार्यक्रम असो किंवा आकाशवाणीवर गाण्याचे रेकॉर्डिंग असो, श्रीधर वेळेपूर्वी एक तास हजर असायचा. मग कोण आले आहे, कोण आले नाही, याची गणती करायचा. आमच्यापेक्षा त्यालाच कार्यक्रमाची जास्त काळजी. एखाददुसर्‍या व्यक्तीला उशीर झाला असेल वा उशीर होणार असेल, तर तो फार अस्वस्थ व्हायचा. सरळ गाडीवर जायचा आणि त्या व्यक्तीला गाडीवर घालून घेऊनच येणार. कार्यक्रमाची वाद्ये गाडीमध्ये नीट ठेवणे, त्यांचा हिशोब ठेवणे, वाद्ये गाडीतून काढून स्टेजपर्यंत आणून देणे, इतकेच काय, तो कार्यक्रमात तालवाद्यांची साथही करायचा. कार्यक्रम झाल्यावर वाद्ये आणि माणसे त्यांच्या त्यांच्या ठिकाणी सुखरूप पोहोचवायची जबाबदारीही त्याचीच.

पु.लं.च्या ‘नारायण’प्रमाणे त्याला कुठल्याही घरात आणि कोणत्याही खोलीत शिरायचा अलिखित परवाना होता. दार ढकलून स्वयंपाकघरातील ओट्याच्या खाली असलेली गॅस सिलेंडर ठेवायची जागा त्यालाच माहीत असायची. कोणाला विचारावे लागत नसे. नवीन सिलेंडर घेऊन, त्याचा रेग्युलेटर लावून गॅस चालू करून काम फत्ते. त्याच्या बोलण्यावरून सुरुवातीला आम्ही त्याची फार चेष्टा करायचो. त्याच्यासमोर त्याच्यासारखे बोलायचो, त्याची नक्कल करायचो. त्याला चिडवायचो. एकाच्या घरी जाऊन त्याच्या माळ्यावरील डफ आणायला सांगितला होता, तर श्रीधरने दुसर्‍या खोलीतील ढोलकी चुकून आणली होती. त्या वेळी तर इतकी टर उडवली होती की बस! बिचारा निमूटपणे परत गेला आणि डफ घेऊन आला. त्याची कितीही खेचा, पण श्रीधर एकदम स्थितप्रज्ञ. कधीच चिडायचा नाही. कधीच रुसून बसायचा नाही. त्याचे व्यंग त्याने ‘स्वीकारले’ होते. त्याच्यावर मात करून पुढे कसे जायचे, हे त्याने ठरवले होते.

हा मुलगा अनाथालयात वाढला. तिथेच शिकला, दहावी, बारावी करत बी.कॉमसुद्धा झाला. ह्याचे अक्षर अगदी मोत्यासारखे. कोणी अनोळखी व्यक्ती भेटली की त्यांना श्रीधरचे बोलणे समजायचे नाही. हा सरळ त्याच्या सुवाच्य अक्षरात कागदावर लिहून द्यायचा.

कधीकधी त्याची दया यायची. मग त्याला घरी थोडावेळ बसवून चहा द्यायचो. जेवायची वेळ असेल तर जेवू घालायचो. त्याच्याशी चार गोष्टी बोलल्या तरी खूश होऊन जायचा. हा मनुष्य पोटापाण्यासाठी काय उद्योग करतो, हा मला अनेक दिवस प्रश्न पडला होता. हळूहळू तो उलगडत गेला. तो एका गॅरेजमध्ये काम करतो, एका ट्रकचा क्लीनर म्हणूनही काम करतो. फावल्या वेळात पूजा सांगायला ब्राह्मण म्हणून जातो. आणि शिवाय बाकीचे हे सारे उद्योग!

आता त्याचे लग्न झाले आहे. मराठवाड्यातील मुलगी केली म्हणे. आम्हाला त्याच्याइतकी त्या मुलीची काळजी वाटत होती. पुढे हे सगळे कसे निभावणार... त्यानंतर काही गाठ पडली नाही. सुखाचा संसार करतो आहे, इतपत मित्रांकडून खबर लागली. त्याच्या आयुष्याची गाडी नीट मार्गावर लागली, यात आनंदच नाही का?

- मंदार कुलकर्णी

दिवाळी अंक २०१३

प्रतिक्रिया

प्रत्येकाकडे कांही न कांही तरी गुण असतातच. शारीरिक व्यंगांवर माणसाचे मूल्य ठरविण्यापेक्षा अशा अंगिभूत गुणांवर त्यांची योग्यता ठरवावी हेच खरे.

मनांतील सहानुभूतीची भावना काढून टाकून बरोबरीची वागणूक द्या.

मुक्त विहारि's picture

1 Nov 2013 - 2:35 pm | मुक्त विहारि

अगदी हेच लिहायला आलो होतो.

छान छोटेखानी व्यक्तिचित्र.
पेठकर काकांशी सहमत.
मनात आलं तरी पोटातलं ओठावर आणू नाही दिलं तरी पुरेसं ठरावं.

पैसा's picture

1 Nov 2013 - 5:02 pm | पैसा

अशा जिद्दीच्या माणसांबद्दल केवळ आदर वाटतो.

नीट न बोलू शकणारा माणूस एव्हढि सगळी कामं करतो आणि "फावल्या वेळात पूजा सांगायला ब्राह्मण म्हणून जातो." हे अगदिच विसंगत आहे. पुलेशु....

दिपक.कुवेत's picture

2 Nov 2013 - 1:26 pm | दिपक.कुवेत

वाचायला थोडं विचित्र वाटतयं.

हेच म्हणतो....(जे भाकरी बोलली ते)

पाठांतर केलेल बोलायला सोप जात असाव म्हणुन पुजा सांगत असावेत हे गृहस्थ!
किंग्ज स्पीच आठवला.

अक्षया's picture

8 Nov 2013 - 2:44 pm | अक्षया

व्यक्तीचीत्र आवडले.
लिहीत रहा. :)