समुद्रमंथन : मानवाचे प्राचीन जलप्रवास

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in दिवाळी अंक
27 Oct 2013 - 8:41 am

प्रास्ताविक : या लेखातली सर्व माहिती मी केवळ कुतूहलाने केलेल्या आतापर्यंतच्या ‘संदर्भ-उत्खननाचा’ परिणाम आहे. माझा या विषयातला अभ्यास सखोल किंवा परिपूर्ण आहे, असा माझा दावा नाही. तसेच सतत चाललेल्या नवीन संशोधनातून अधिकाधिक विश्वासू पुरावे जसजसे बाहेर येतील, तसतसा आता माहीत असलेल्या इतिहासात भर किंवा बदलही संभवतो. या कारणानेच या प्रकरणाचा प्राचीन मानवाच्या प्रवासासंबंधीच्या लेखमालिकेत अंतर्भाव केला नव्हता. तरीही आतापर्यंत कळलेला हा मानवाचा रोचक जलप्रवास सांगायचा मोहही आवरत नव्हता. त्यामुळे यात काही माहिती थोडक्यात, तर काही तुटकपणे आहे. पुढेमागे जर अजून काही सांगण्यासारखे बरेच सापडले, तर एखादी लेखमालिका लिहीन. (अगोदरच धोक्याची सूचना देत आहे ;) )

समुद्रमंथनाची गोष्ट वाचकांपैकी बर्‍याच जणांनी ऐकली-वाचली असेल, १०-१५ वर्षाचे वय होईपर्यंत गंमत अथवा चमत्कार म्हणून तिची पारायणे केलीही असतील. थोडे मोठे झाल्यावर पुराणातली वांगी म्हणून तिची चेष्टा केली असेल आणि घर-संसार-नोकरी-धंदा या चक्रात पडल्यावर तिला विसरूनही गेले असाल. पण एक चमत्कारपूर्ण धार्मिक कथा या दृष्टीने तिचे महत्त्व अगदी तीन-चार दशकांच्या अगोदरपर्यंत नक्कीच होते. मात्र सध्याच्या विशी-पंचविशीतल्या पिढीला ती कथा कदाचित माहीतही नसेल, म्हणून तिची थोडी उजळणी करू या.

भागवत पुराण, महाभारत आणि विष्णुपुराणात समुद्रमंथनाची गोष्ट आहे... इतरत्रही असू शकेल. तिचा गोषवारा साधारण असा की देव आणि दानव यांनी वासुकी सापाचा दोरीसारखा उपयोग करून मेरू पर्वताच्या रवीने दुग्धसागराला घुसळले असता सागरातून अनेक प्रकारच्या आश्चर्यकारक वस्तू मिळाल्या.

समुद्रमंथन हे कुंडलिनी जागृत होताना होणार्‍या अध्यात्मिक अनुभवाचे प्रतिकात्मक वर्णन आहे, असेही म्हटले जाते. माझा अध्यात्माचा अनुभव नगण्य आहे. त्यामुळे कुंडलिनीच्या सर्पविळख्यात न अडकता या पुराणकथेमागे इतर काही घटना दडली आहे काय, असाच विचार माझ्या मनात येत असतो. बर्‍याच लोककथा-दंतकथांमध्ये काहीतरी जुन्या घटनेचे मूळ दडले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र जसा वेळ जात राहतो, तशी अशा कथांत अधिकाधिक कल्पनाविलासी भेसळ होत होते आणि खर्‍या घटनेचे अतिरंजित विनोदी कथेत केव्हा रूपांतर होते, हे सांगणे मोठे कठीण आहे.

असो. तर हे समुद्रमंथन मला परत आठवले माझ्या दक्षिणपूर्व देशांच्या सफरीत. नकाशात पाहिले तर असे दिसते की आशियाच्या मुख्य भूमीच्या दक्षिणपूर्वेस आणि पूर्वेस अक्षरशः दशहजारो बेटे आहेत. त्यात शेकडो बेटाच्या समूहाने बनलेला २० लाख चौ.कि.मी. भूमी असलेल्या आणि २३-२४ कोटी लोकसंखेच्या इंडोनेशियासारख्या देशापासून जगाच्या सर्वसाधारण आकाराच्या नकाश्यात ठिपक्यानेही दाखवता येणार नाहीत इतकी छोटी आणि केवळ काही शेकडा लोकसंख्येची बेटे, तर इतर काही अगदी निर्मनुष्य बेटे आहेत.


(नकाशा जालावरून साभार)

भारताच्या पूर्वेला उडून जाताना तीन तास झाले आणि असंख्य बेटांवरून विमान उडू लागले की पांढर्‍या लाटांनी भरलेला समुद्र आणि बेटांचे फेसाळलेले पांढरे समुद्रकिनारे लक्ष वेधून घेतात. महाकाय समुद्राच्या लाटांवर लाकडी फळी घेउन लीलया तरंगत फिरण्याचा सर्फींग हा खेळ पॉलिनेशियामध्ये हजारो वर्षांपासून आहे आणि तेथून तो युरोपियनांनी पश्चिमेत नेला.


(चित्र जालावरून साभार)

अश्याच एका प्रवासात माझ्या मनात एक विचार तरळला की प्राचीन काळी देव आणि दानव यांनी, म्हणजेच मानवांच्या दोन वेगळ्या गटांनी एकत्रितपणे अथवा एकमेकाशी स्पर्धा म्हणून मेरू पर्वताला केद्रभागी मानून ह्या बेटांच्या सागरी शोधमोहिमा काढल्या असाव्या काय? अगदी युरोपियन लोकांच्या वसाहती स्थापन करण्याच्या मोहिमांसारख्याच... पण त्यांच्या अनेक शत-सहस्र वर्षे अगोदर! आणि या जलसफरीत वासुकी नावाच्या सर्पवंशाच्या (अनेक मानववंश अशी प्राण्यांची नावे घेतात, हे सगळ्यांना माहीत आहेच. भारतात नागालँड आहे आणि नाग व त्याचे ड्रॅगनरूप तर पूर्व आशियाची ओळखखूणच आहे.) दर्यावर्द्याचे महत्त्वाचे योगदान असल्याने त्याला मंथन शक्य करणार्‍या दोरखंडाची उपमा दिली असावी काय?

युरोपियनांचा या भागात शिरकाव होण्याअगोदर मूळ आशिया खंडापासून तुटलेल्या आणि सागरात अतिशय दूर व एकाकी असणार्‍या इथल्या बहुतेक सगळ्या बेटांवर केवळ मानवी वस्ती नव्हती, तर तेथे अनेक बर्‍यापैकी प्रगत राज्ये आणि छोटी साम्राज्येही होती. एवढेच नव्हे, तर यातील अनेक बेटांवरील मानवी संस्कृतींच्या अवशेषांचे वय शेकडो ते हजारो वर्षांपर्यंत मागे जाते! कॅप्टन कुकसारख्या गौरवले गेलेल्या नामवंत दर्यावर्द्यांना या परिसरातील नाविकांनी तेथील व्यापारी वारे आणि सागरी प्रवाह यांची मदत घेऊन त्या काळाच्या युरोपियनांनाही अशक्य वाटणार्‍या सागरी सफरी कशा करता येतात, हे दाखविल्याचे उल्लेख खुद्द त्या युरोपियन दर्यावर्द्यांच्या प्रवासाच्या लेखनातच आहेत.

मात्र त्यानंतरच्या सर्व काळांत युरोपियन वरचश्मा कायम ठेवण्यासाठी इतर सर्व वंशांच्या इतिहासाचे पुरावे एकतर नष्ट केले गेले, नष्ट झाले अथवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच या भागातील संशोधनाचा प्रसिद्धीसाठी तेवढासा उपयोग नसल्याने अगदी नजीकच्या काळापर्यंत या भागातील संशोधनाकडे एकतर दुर्लक्ष झाले आहे किंवा युरोपियन खलाशांनी सांगितलेल्या ‘दंतकथा’ प्रमाण मानून या भागांबद्दल लिखाण केले गेले आहे. मात्र गेली दोन-तीन दशके, विशेषतः खातरीलायक जनुकशास्त्रीय पुरावे उपलब्ध होऊ लागल्यानंतर या भागाचा इतिहास परत नव्याने पडताळून पाहण्यास सुरुवात झाली आहे.

तर मुख्य मुद्दा म्हणजे, युरोपियन तेथे जाण्याअगोदर या भागातल्या काही मोजकी भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असलेली बेटे सोडली तर इतर बहुतेक सगळ्या बेटांवर मानवी वस्ती होती किंवा मानवी वस्ती असल्याचे अवशेष सापडले आहेत. आतापर्यंतच्या भौतिक पुराव्यांवरून त्या काळी मानवाला हवाई मार्गाने तेथे जाणे शक्य नव्हते. मग केवळ एकच मार्ग – जलमार्ग - शक्य होता. पण त्या काळी तर मोठी जहाजे नसावीत. मग मानव तेथपर्यंत पोहोचले कसे? याची अनेक कारणे सांगितली जातात, त्यापैकी काही अशी आहेत.

१. मानव या बेटांवर गेल्या केवळ ३ ते ६,००० वर्षांतच पोहोचला, या समजुतीलाच काही शास्त्रज्ञांचा विरोध आहे. जर ४०,००० वर्षांपूर्वी काहीशे कि.मी. सागरी अंतर ओलांडून मानव इंडोनेशियातून ऑस्ट्रेलिया-न्यू गिनी या खंडावर पोहोचू शकतो, तर मग त्याला इतर दिशांनी पुढे इतर बेटांवर जायला काय हरकत होती?

२. वरच्या शक्यतेला आणखी दुजोरा मिळतो ते हिमयुगाच्या अतिथंड कालखंडामध्ये समुद्राच्या १०० ते १३० मीटर खाली असलेल्या पाण्याच्या पातळीचा. यामुळे आजच्या घडीला समुद्रात बुडालेले अनेक भूभाग कोरड्या जमिनी होते, तर आता खोल समुद्र असणारे काही भाग उथळ पाण्याने भरलेले होते. बेटांना जोडणारे हे समुद्रतळ खालील नकाशात बघायला मिळतील. या नकाशात समुद्राच्या रंगाची छटा जिथे हलकी आहे, तेथे उथळ समुद्र आहे आणि जेथे तो खोल आहे तेथे ती खोलीच्या प्रमाणात जास्त गडद दाखवली आहे. त्या काळी ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यू गिनी हे मिळून एकच खंड होते. त्यांच्यामधल्या आणि आजूबाजूच्या निळ्या रंगाच्या फिक्या छटेवरून आताच्या समुद्राचा कोणता भाग कोरडी जमीन होता, त्याचा काही प्रमाणात अंदाज येऊ शकेल...


(नकाशा जालावरून साभार)

म्हणजे काही हजार वर्षांपूर्वी या बेटा-बेटांमधील जलसफरी आजच्यापेक्षा नक्कीच जास्त सुलभ असणार.

३. त्या काळी होड्यांचा वापर होत होता, हे ऑस्ट्रेलिया व इतर बेटांवर सापडलेल्या प्रस्तरचित्रांवरून नक्की झाले आहे. एवढेच नाही, तर खालील प्रकारच्या खास बोटी ही भारतीय उपखंडाची व प्रशांत महासागरीय देशांची खासियत आहे.

अ) कॅटामरान (catamaran) या प्रकारच्या बोटी दक्षिण भारतातील द्रविड संस्कृतीत आणि प्रशांत महासागरातील पॉलिनेशियन द्वीपसमूहातही प्राचीन काळापासून वापरात आहे. कॅटामरान हा शब्दही तमिळ ‘कट्टूमरम्’ या शब्दावरूनच घेतला आहे. ही बोट म्हणजे दोन बोटींना जोडून बनवलेला एक मोठा तराफाच असतो...


पुलिकत सरोवरातील (तामिळनाडू) पारंपरिक ‘कट्टूमरम्’ (चित्र जालावरून साभार)....

.


पॉलिनेशियन कॅटामरान (चित्र जालावरून साभार)

.


आधुनिक कॅटामरान (चित्र जालावरून साभार)

आ) प्रशांत महासागरातील बर्‍याच बेटांवर आउटरिग्गर (outrigger) प्रकारची बोट हजारो वर्षांपासून वापरली जात आहे. ह्या प्रकारात मूळ बोटीला एका बाजूला जरा अंतर ठेवून लाकडी ओंडका बांधलेला असतो...


हवाई बेटावरची पारंपरिक आउटरिग्गर (चित्र जालावरून साभार)

.


बोरोबुदूर (इंडोनेशिया) येथील मंदिरावर कोरलेले आउटरिग्गर प्रकारातले प्राचीन व्यापारी जहाज. (चित्र जालावरून साभार)

खवळत्या समुद्रात बोट उलटू नये म्हणून या दोन्ही व्यवस्थांचा उपयोग होतो. अशा प्रकारची मोठी शिडे असलेल्या बोटी त्या काळी लांबच्या प्रवासासाठी आणि व्यापारासाठी वापरल्या जात असत. हे बोटींचे दोन्ही प्रकार पूर्वेची खासियत आहे आणि त्या काळच्या युरोपियन लोकांना माहीत नव्हते.

४. प्रशांत महासागरातील मोसमी वारे आणि समुद्रातील पाण्याचे प्रवाह यांची माहिती तेथील रहिवाशांना वसाहतवादी युरोपियन तेथे पोहोचण्याच्या अगोदरपासून होती आणि ते जलप्रवासासाठी त्यांचा उपयोग करत असत. किंबहुना युरोपियन दर्यावर्द्यांनी स्थानिक खलाशांना बरोबर घेऊन त्यांच्या साहाय्याने तेथल्या पहिल्या काही सफरी केल्याच्या नोंदी आहेत.

५. पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला चीनच्या सम्राटाने प्रत्येकी ४०० फूट लांबीच्या जहाजांचे अनेक काफिले सागरी खजिन्यांच्या शोधासाठी संपूर्ण भारतीय महासागर पिंजून काढायला पाठविले होते. या मोहिमेत सगळे मिळून २८,००० लोक सामील होते आणि त्यांनी आफ्रिकेच्या पूर्व किनार्‍यापर्यंत धडक मारली होती *. (त्याविरुद्ध कोलंबसने अमेरिका सफरीला जी तीन जहाजे नेलेली होती, त्यातले सर्वात मोठे सांता मारिया जहाज साधारणपणे ५८ फूट लांब होते आणि तीन जहाजे मिळून ८६ ते ८९ माणसे होती.) १५व्या शतकाच्या सुरुवातीला चीनची एवढी प्रगती असायला त्याअगोदर कमीतकमी अनेक दशकांचा, किंबहुना शतक-दोन शतकांचा तरी दर्यावर्दी आणि जहाजबांधणीचा अनुभव त्यामागे असायला हवा.

* : एक रोचक सत्यकथा सांगितल्याशिवाय हा मुद्दा पूर्ण होणार नाही : चीनच्या सम्राटाच्या दरबारात हिजडे सरदार विरुद्ध इतर सरदार अशा चढाओढी नेहमीच होत असत. कारण हिजड्यांचा वावर सम्राटाच्या राजवाड्यात (फॉर्बिडन सिटी) सगळीकडे असे आणि कितीही शूर व ताकदवान असले तरी इतर सरदारांची मात्र बाहेरच्या एकदोन खोल्यांतच बोळवण होत असे. सम्राटाच्या सतत सहवासात असल्याने हिजडे सम्राटाच्या मर्जीतले असायचे. तसेच ते सम्राटाला धोका पोहोचवणार नाहीत याची खातरी असायची, कारण त्यांना सत्तेवर येणे शक्य नव्हते. तसेच एका सम्राटाचा पाडाव होऊन दुसरा सत्तेवर आला की जुन्या सम्राटाचे खास नोकर म्हणून हिजड्यांची कत्तल होत असे. हिजड्या सरदारांचा राजधानीपासून जास्त दूर प्रभाव नसे आणि त्यामुळे त्यांचे सैन्य जमिनीवरचे म्हणजे पायदळ, घोडदळ असे होते. इतर काही सरदारांकडे याशिवाय नौदलही होते. नौदलाच्या बळावर अमाप धनसंपत्ती कमावून काही सरदारांनी आणि व्यापार्‍यांनी सम्राटाला शह देण्याचे प्रयत्न झालेले होते. पैशाच्या तंगीने सम्राटाने व्यापार्‍यांकडून कर्ज घेण्याचे प्रकारही होतेच. पंधराव्या शतकाच्या सुरुवातीस राजदरबारात झालेल्या एका चढाओढीत हिजडे सरदारांचा वरचश्मा होऊन त्यांनी सम्राटातर्फे सर्व प्रकारच्या मोठ्या सागरी जहाजांवर बंदी घातली, तशा जहाजांची बांधणी करणार्‍या सर्व गोद्या उद्ध्वस्त केल्या आणि मोठ्या जहाजांची बांधणी हा राजद्रोह ठरवला. अशा प्रकारे अंतर्गत दुफळी आणि संकुचित स्वार्थ यामुळे चीनचे सागरी वर्चस्व नष्ट होऊन पंधराव्या शतकाच्या मध्यापर्यंत धुळीस मिळाले. तसे झाले नसते, तर आफ्रिकेपर्यंत धडक मारणारी चिनी जहाजे कदाचित् युरोपपर्यंत पोहोचून सगळा इतिहास उलटासुलटा होण्याची शक्यता होती!

६. पूर्वग्रहदूषित विचारसरणीमुळे मागे पडलेली अनेक निरीक्षणे आणि निष्कर्ष गेल्या दोन दशकात जनुकशास्त्रीय पुरावे पुढे आल्याने मान्य करणे भाग पडू लागले आहे. मात्र या विभागातील संशोधनाला प्रसिद्धीचे वलय नसल्याने त्या सबळ पुराव्यांची अवहेलना होण्याची आणि जुनी मतेच दामटण्याची उदाहरणे अपवादात्मक नाहीत.


या जनुकीय नकाशात (जालावरून साभार) जगातील वेगवेगळ्या ठिकाणच्या वंशांची जनुके स्वतंत्र रंगाने दाखवली आहेत. त्यांच्या ठिपक्यांच्या पुंजातील अंतर त्या वंशातल्या जनुकीय जवळीक-दुराव्याच्या प्रमाणात कमी-जास्त होते. आफ्रिकेतील (तांबडा), मध्यपूर्वेतील (तपकिरी) आणि दक्षिणमध्य आशियाई (फिकट निळा) लोक जरी भौगोलिकरीत्या एकमेकाजवळ असले, तरी त्यांची जनुके एकमेकापासून दुरावलेली आहेत. आपण मानवाचा प्राचीन प्रवास पाहताना त्याचे कारण पाहिले आहेच. तीच गोष्ट पूर्व आशियाई (नारिंगी) व पॉलिनेशियातील (निळा) लोकांसंबंधी दिसते आहे. मात्र पॉलिनेशियन आणि मूळ अमेरिकन (जांभळा) लोकांच्या जनुकात बरीच जवळीक दिसते आहे. जनुकप्रसरणाची जवळीक आणि दिशा लक्षात घेता, पॉलिनेशियन लोक आशियातून सरळ बेटांवर न जाता प्रथम अमेरिकेत आणि मग काही काळाने तेथून पॉलिनेशियातील बेटांवर गेले, असा एक विचारप्रवाह आहे.

असो. आपल्या मूळ विषयाबद्दल उत्सुकता वाढवून त्यात संशोधनाला वाव आहे, हे सिद्ध करण्यास इतकी पार्श्वभूमी पुरेशी आहे.

====================================================================

सर्वात प्रथम केवळ गंमत म्हणून मी गूगलबाबांच्या आशीर्वादाने मेरू पर्वताचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि आश्चर्य म्हणजे मला तो सापडला!... तोही इंडोनेशियाच्या जावा बेटावर!

.


(वरील दोन्ही चित्रे जालावरून साभार)

या पर्वताला तेथे मेरू, सुमेरू अथवा महामेरू या नावांनी संबोधले जाते. या पर्वताबद्दल एक रोचक कथाही सापडली.

पंधराव्या शतकात लिहिल्या गेलेल्या तांतू पागेलारान (Tantu Pagelaran) नावाच्या तेथील हिंदू आणि बौद्ध लोकांना मान्य असणार्‍या प्राचीन ग्रंथात लिहिल्याप्रमाणे हा पर्वत भारतातून जावा बेटावर आणला गेला. प्रथम जावा बेटाच्या पूर्वेस त्याची स्थापना केली गेली, पण नंतर बेटाच्या होणार्‍या हालचालीमुळे त्याला पश्चिमेस हलवावे लागले. तसे करताना त्याचे अनेक तुकडे वाटेत पडले. अर्थात, पुराणातल्या अनेक भाकडकथांपैकी एक अशी या कथेची संभावना करून आपण मजेत पर्यटन करून सुखाने झोपू शकतो. पण मग त्यात मजा काय? तर पाहू या पुढच्या माहितीउत्खननात काय सापडले ते!

• वरच्या दुसर्‍या चित्रात पाहिले तर दिसेल की जावा बेटाच्या मध्यभागात जिवंत ज्वालामुखींची रांग आहे आणि तेथे सतत भूकंप होत असतात. मेरूचे केंद्र बेटाच्या पूर्वेकडून पश्चिमेस हलवण्यास हे कारण झाले असावे.

• आफ्रिकेत केनियाच्या पूर्व किनार्‍यावर मेरू नावाचे शहर आहे.

• भारतीय (हिंदू, बौद्ध आणि जैन) पुराणांत मेरू पर्वत जगाचा मध्य समजला जातो. अनेक लिखाणांत त्याची वेगवेगळी स्थाने मानली गेली आहेत. उदाहरणार्थ, काही जणांच्या मते तो पामीरच्या पठारावर म्हणजे काश्मीरच्या उत्तरपूर्वेस होता, तर काहींच्या मते जेथून मानवजमात सुरू झाली त्या जंबुद्वीपावर तो होता. हे जंबुद्वीप जावा बेटाचे नाव असावे काय? मार्कंडेय पुराणातील जंबुद्वीपाच्या वर्णनाप्रमाणे ते उत्तरदक्षिणेस उतार असलेले आणि मध्यभागी उंच होते. वरच्या दुसर्‍या चित्रात पाहिले तर हे वर्णनही जावा बेटाचे म्हणून शोभते! बाली बेटाच्या सफरीतील कार्तिक नावाच्या जावा राजघराण्याशी संबधित असलेल्या आणि तेथे शिक्षकाचेही काम करणार्‍या आमच्या मार्गदर्शकाने दिलेल्या माहितीनुसार ५,००० वर्षांपूर्वी मार्कंडेय ऋषींनी हिंदू धर्म इंडोनेशियामध्ये नेला, असे बाली हिंदूंचे धर्मग्रंथ म्हणतात. बालीच्या लोकसंख्येत ८५ ते ९०% हिंदू आहेत.

• वराहमिहिराने त्याच्या पंचसिद्धांतिका या ग्रंथात मेरू म्हणजे उत्तर ध्रुव अशी कल्पना केली आहे. पण उत्तर ध्रुवावर पर्वतच काय, जमीनही नाही. तो केवळ समुद्रावर तरंगणारा काही किलोमीटर जाडीचा बर्फाचा थर आहे.

• बालीमध्ये तर सर्व देवळांचे आणि मोठ्या इमारतींचे दरवाजे खालील चित्राप्रमाणे दुभंगलेल्या मेरू पर्वताच्या रुपात बनवतात.

• याशिवाय महत्त्वाची आणखी एक गोष्ट अशी की समुद्रमंथनाचे महत्व भारतात साधारणपणे गोष्ट आणि चित्रे यांच्या फार पुढे जाताना दिसत नाही. पण दक्षिणपूर्व आशियाई देशांत या घटनेचे महत्व जनमानसात, धर्मात, कथांत आणि शिल्पकलेत फार मोठे आहे.

बँकॉकच्या सुवर्णभूमी विमानतळावरचे समुद्रमंथनाचे शिल्प (चित्र जालावरून साभार)
यांत फक्त देव व दानव अशा दोनच वंशांचे मानव न दिसता दोन्ही बाजूला स्पष्टपणे अनेक वंशांचे मानव दिसतात!

कंबोडियातल्या सिएम रीप येथील जगप्रसिद्ध अंगकोर वट या जगातल्या सर्वात मोठ्या प्राचीन हिंदू मंदिरातिल भिंतीवर कोरलेले समुद्रमंथनाचे चित्र (जालावरून साभार)...


कंबोडियातल्या सिएम रीप येथील अंगकोर थोम या दुसर्‍या एका मोठ्या जगप्रसिद्ध मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे समुद्रमंथनाचे शिल्प आहे. या शिल्पातही चेहरे एकाच साच्याचे नसून वंशांची सरमिसळ दिसते.

इतके सगळे पाहिल्यावर सहाजिकच, मेरू हे एक कुठलेतरी जलव्यापारी केंद्र (Oceanic Trade Headquarter) होते, या कल्पनेला वाव आहे असा विचार मनात आला. कारण असे केंद्र भारतातून (किंवा इतर कोठूनही) जावा बेटावर हलवणे शक्य होईल. आणि जर काही दर्यावर्द्यांच्या गटांना जलसफरी करून संपत्ती गोळा करायची असली, तर जावा बेट त्या काळची मोक्याची जागा होती. जनुकीय पुरावाही हेच सांगतो की प्रशांत महासागराच्या सफरी इंडोनेशियाच्या बेटांवरूनच सुरू झाल्या.

समुद्रमंथनाच्या इतक्या चर्चेनंतर आता आधुनिक जगात यायला हरकत नाही. तर मग चला, बघू या मानवाने कशी काय पादाक्रांत केली प्रशांत सागरातली बेटे. ते सागरी प्रवास समुद्रमंथन होते की नाही, हे तुमचे तुम्हीच ठरवा लेख वाचून-बघून झाल्यावर!

====================================================================

तेथील लोकांच्या ढोबळ वंशावरून आणि त्या बेटांवर झालेल्या वस्त्यांच्या क्रमावरून ह्या बेटांचे तीन मुख्य भाग केले जातात. ते खालील नकाशात दाखविले आहेत...

(नकाशा जालावरून साभार)

१. मेलॅनेशिया : प्राचीन काळी हिमयुगाच्या कडाक्यात जेव्हा सागरांच्या पाण्याची पातळी १०० ते १३० मीटर खाली होती, तेव्हा पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया हे मिळून एकच खंड होते. (लेखाच्या सुरुवातीचा समुद्राची खोली दाखवणारा नकाशा पाहा). जसे हिमयुगाचा कडाका कमी होऊन बर्फ वितळू लागले, तशी समुद्राच्या पाण्याची पातळी वर येऊ लागली आणि हे दोन भूभाग वेगळे झाले. ऑस्ट्रेलियाचा इतर जगाशी संबंध तुटला. पण ४,००० वर्षांपूर्वी पापुआ न्यू गिनीतील लोकांचा त्यांच्या जवळच्या बेटांशी संबंध येऊन तेथे वस्त्या निर्माण झाल्या. अर्थातच या लोकांचा ऑस्ट्रेलियन लोकांशी दूरचा पण पॉपुअन लोकांशी जवळचा जनुकीय संबंध आहे. नंतर येथे तैवानामधून आलेल्या ऑस्ट्रेनेशियन्सनी काही प्रमाणात शिरकाव केला असला तरी येथील लोकांवर त्यांचा तितकासा जनुकीय प्रभाव नाही. या नवीन जनुकीय पुराव्यामुळे ‘प्रशांत महासागरातील वसाहती मेलॅनेशियाच्या मार्गे झाल्या’ या जुन्या समजाला धक्का बसला आहे.

२. मायक्रोनेशिया: हा हजाराच्या संख्येने असलेल्या अत्यंत छोट्या आकाराच्या बेटांचा समूह आहे. वेगवेगळ्या कालखंडात झालेल्या मेलॅनेशियन, पॉलिनेशियन आणि फिलिपिनो प्रसरणाने या बेटांवर बरीच वांशिक भेसळ झाली आहे. ह्या भागात सर्वात शेवटी मानववस्ती झाली.

३. पॉलिनेशिया : हा बेटांचा सर्वात मोठा समूह आहे. यावर राहणार्‍या लोकांचे पूर्वज येथे दक्षिण चीन, तैवान, मलाय द्वीपकल्प असे करत सर्व प्रशांत महासागरभर पसरले, असा एका मोठ्या शास्त्रज्ञांच्या गटाचा दावा आहे. पण त्याविरुद्धही काही भिन्न आणि रोचक मतप्रवाह आहेत.

तर प्रश्न असा की ह्या सगळ्या बेटांवर ‘कोणी’, ‘कशी’ आणि ‘केव्हा’ ‘पहिली’ वस्ती केली?

खालील नकाशाने सुरुवात करू या. हा या भागातील (सध्यातरी बरीच मान्यता असलेला) मानववस्ती प्रसरणाचा मार्ग दाखवतो.


(नकाशा जालावरून साभार)

या भागातले दर्यावर्दी इसवी सनापूर्वी ५-६,००० वर्षांपूर्वी (काही जणांच्या मते त्याच्याही फार पूर्वी) तैवानमधून दक्षिणेला निघाले आणि बोर्निओ, जावा आणि फिलिपाईन्सची काही बेटे त्यांनी व्यापली, तर काही मलेशियन द्वीपकल्पावर गेले. नंतर ते केंद्र धरून त्यांनी चारी दिशांनी समुद्रप्रवास करून बेटे काबीज केली. तर मग एखाद्याने काव्यात्म भाषेत त्यांनी ‘जावा बेटावरचा मेरू पर्वत केंद्र मानून त्याच्या चारी बाजूचा खवळलेला (दुग्ध)सागर ढवळून काढला’ असे म्हटले, तर ते खोटे आहे का?

ते खरे असो अथवा नसो, पण ह्या मंडळींनी इ.स.च्या पाचव्या शतकात उत्तरेला हवाई बेटे, इ.स.च्या अकराव्या शतकात दक्षिणेला न्यूझीलंड, पूर्वेला अमेरिकेचा पश्चिम किनारा आणि इ.स.पूर्वी ३५० ते ५५० वर्षांपूर्वी पश्चिमेला आफ्रिका खंडाच्या मादागास्कर बेटापर्यंत धडक मारली होती, हे मात्र शास्त्रीयरीत्या सिद्ध झालेले सत्य आहे! रोचक गोष्ट अशी की हे ऑस्ट्रोनेशियन इंडोनेशियन मादागास्करचे पहिले रहिवासी होते. आफ्रिकन अथवा अरब फार नंतर तेथे पोहोचले. याविरुद्ध इ.स.च्या तिसर्‍या शतकात युरोपमधे रोमन साम्राज्य कोसळत होते. पण त्या अगोदरही त्यांच्या चलतीच्या काळात त्यांच्या आरमाराच्या समुद्रप्रवासाची मजल भूमध्य समुद्रापलीकडे गेली नव्हती.

असो. आता आपले संशोधन जरा अधिकच रोचक करणारे आणि या मुख्य विचारप्रवाहाला जोरदार धक्के देणारे काही पुरावे पाहू या.

====================================================================

समुद्रातल्या नद्या

प्रशांत महासागरात अनेक, अक्षरशः शेकडो जलप्रवाह आहेत. हे पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या गोल फिरण्यामुळे तसेच वेगवेगळ्या ऋतूंत सागराच्या वेगवेगळ्या ठिकाणी असणार्‍या पाण्याच्या तापमानातील फरकामुळे तयार होतात. पॉलिनेशियन त्यांना समुद्रातल्या नद्या म्हणतात.


प्रशांत समुद्रातील पाण्याचे प्रवाह ऊर्फ ‘समुद्रातल्या नद्या’ (‘पाथवेज इन्टू पॉलिनेशिया’वरून साभार)

मुख्य म्हणजे मानवाचे प्रशांत महासागरातले प्रसरण या प्रवाहांच्या दिशांनी होत गेल्याचे जनुकीय पुराव्यांतून पुढे येत आहेत. या पुराव्यांनी मानव बेरिंगियातून अमेरिकेत गेला, हे पूर्णपणे खोडले नसले तरी त्या मार्गाबरोबर जलमार्गही एक महत्त्वाचा मार्ग होता, हे प्रतिपादन केले आहे. या सिद्धान्ताप्रमाणे अमेरिकेतले मानव प्रथम जपानजवळच्या (आता पाण्यात बुडालेल्या आणि बॉक्सिंग ग्लोव्हसारख्या दिसणार्‍या) बेटावर गेले आणि जेव्हा ते बेट समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून बुडू लागले, तेव्हा सागरी (कुरोशिओ) प्रवाहांच्या आधारे कॅनडाच्या पश्चिम किनार्‍यावर ६,००० वर्षांपूर्वी उतरले. त्यानंतर २,२०० वर्षांपूर्वी त्यांतील काही दर्यावर्दी लोक परत समुद्रपर्यटन करत प्रथम हवाई बेटे व तेथून दक्षिणेकडे ताहितीपर्यंत पोहोचले. Bw48 हे जनुकीय उत्परिवर्तन फक्त वरच्या तीन ठिकाणीच सापडते. शिवाय आतापर्यंत केवळ दंतकथा म्हणून दुर्लक्षिलेल्या हवाईच्या प्राचीन भाषेतल्या कथांत या प्रवासाचे संदर्भ सापडतात.

====================================================================

इजिप्शियन प्रसरण

दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावरील गव्हिया येथे इजिप्शियन / मेसोपोटेमियन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. त्या काळी हे लोक ब्राँझच्या, चांदीच्या आणि सोन्याच्या खाणींमुळे उरुग्वेमध्ये आणि पनामामध्ये येत असत.

मावी (Maui) नावाच्या इजिप्शियन दर्यावर्द्याने इ.पू. २३२च्या आसपास जगप्रदक्षिणा करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. इजिप्शियन आणि पॉलिनेशियन लोककथांमध्ये त्याचे नाव सतत येते.


मावीच्या प्रवासाचा नकाशा (‘पाथवेज इन्टू पॉलिनेशिया’वरून साभार)

उत्तर आफ्रिकेतील लिबियात आणि ट्युनिशियात प्राचीन काळी वापरात असलेल्या लिपी पॉलिनेशियातही सापडल्या आहेत. हा एक फार महत्त्वाचा दुवा असे सांगतो की मावी हाच एकुलता एक आफ्रिकन पॉलिनेशियात गेला नव्हता, तर त्या दोन भागांचा व्यापारी संबध असावा.


(‘पाथवेज इन्टू पॉलिनेशिया’वरून साभार)

====================================================================

कॉकेशियन प्रसरण

काही मतांप्रमाणे १८,००० ते १३,००० वर्षांपूर्वीच्या कालावधीत स्पेन आणि फ्रान्समधील कॉकेशियन लोक अमेरिकेच्या पूर्व किनार्‍याला पोहोचले होते. ११,००० वर्षांपूर्वी झालेल्या एका बर्फाने भरलेल्या महाप्रचंड उल्कापाताने अमेरिकेचा उत्तर भाग बर्फाच्या आणि पाण्याच्या मार्‍याने निर्जन झाला. सध्याच्या हिमयुगाच्या अतिथंड कालखंडाशीही हा काळ मिळताजुळता आहे. त्या काळात गल्फ स्ट्रीम या सागरी प्रवाहाच्या मदतीने अमेरिकेतले काही दर्यावर्दी युरोपच्या दिशेने परतले. तेच बर्बर, बास्क, आर्मोरिकन आणि आयरिश लोकांचे पूर्वज असल्याचा काहींचा दावा आहे. या सगळ्यांना सेल्टीक असेही म्हणतात. सेल्टिक नावाजलेले दर्यावर्दी होते आणि त्यांनी युरोपच्या पश्चिम किनार्‍यांवर काही शतके राज्य केले, हा इतिहास आहे. आयरिश लोककथांमध्ये high Brazilचा उल्लेख येतो, तो अँडिज पर्वतांचा उल्लेख असावा असा काहींचा दावा आहे.

====================================================================

सिंधू संस्कृतीतील (हराप्पातील) लोकांचे मेलॅनेशियाद्वारे पॉलिनेशियात प्रसरण

मेलॅनेशियन लोक पूर्वेकडे फिजीपर्यंत पोहोचले, याचा पुरावा तेथे सापडलेल्या लापिता प्रकारच्या मातीच्या रंगवलेल्या भांड्यांवरून मिळतो. लापिता लोक जरी गडद रंगाच्या मेलॅनेशियन लोकांत राहत असले, तरी त्यांचे केस तांबड्या रंगाचे होते आणि ते सिंधू नदीच्या खोर्‍यातल्या हराप्पा संस्कृतीतून तेथे आले, असा पुरावा आहे. त्यांचा मेलॅनेशियामध्ये येण्याचा काळही हरप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाच्या काळाच्या जवळपास, म्हणजे इ.पू. १५०० आहे. त्याची भांड्यांवरची नक्षी हराप्पाच्या भांड्यांवरच्या नक्षीशी मिळतीजुळती आहे...

 ...
हरप्पातील भांडे (डावीकडील) आणि पॉलिनेशियन (लापिता) भांडे (जालावरून साभार)

हराप्पातील लिपी आणि इस्टर बेटावरच्या लिपी यांच्यामध्ये एकच म्हणावे इतके साम्य आहे.


(जालावरून साभार)

हिमयुगातील थंड कालखंड समाप्त होऊ लागल्यावर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढू लागल्यामुळे हराप्पा संस्कृती पाण्याखाली जाऊ लागली. त्याच सुमारास परकीय आक्रमणांमुळेही तेथील लोक स्थलांतर करू लागले. त्यांचे व्यापारी संबंध असलेल्या मार्गांवरून हे स्थलांतर झाले असावे. कारण मुलाबायकांसह नवीन ठिकाणी जायचे, तर अगोदर माहीत असलेल्या ठिकाणी जाणे साहजिकच होते. इतर आशियाई भूभाग व आफ्रिकेपर्यंतच नव्हे तर पॉलिनेशियामार्गे मध्य अमेरिकेत आणि पुढे दक्षिण अमेरिकेत सध्याच्या पेरू देशाच्या भूभागापर्यंत हे लोक पोहोचले. इतकेच काय, पण अशक्यप्राय वाटणारा पश्चिमेकडचा मार्ग, जो आफ्रिकेला वळसा घालून अमेरिकेच्या पूर्व किनार्‍याला पोहोचतो, त्या मार्गाने ते गेल्याचा काही जण दावा करत आहेत. त्यांनी प्रवास केलेले अनेक जलमार्ग दाखवणारा नकाशा -


(‘पाथवेज इन्टू पॉलिनेशिया’वरून साभार)

====================================================================

आफ्रिकन प्रसरण

सगळ्यात पहिले आफ्रिकन मेलॅनेशियापर्यंत साधारण ८०,००० वर्षांपूवी आफ्रिकेतून बाहेर पडलेल्या पहिल्या मानव लाटेबरोबर पोहोचले. ते पिग्मी होत आणि त्यांनी आफ्रिकेतला मलेरियाचा एक (Plasmodium Falciparum) जिवाणू त्यांच्याबरोबर तेथे नेला. त्यानंतर १०,००० वर्षांपूर्वी आलेल्या आफ्रिकन मानवांनी त्यांच्याबरोबर Plasmodium Vivax हा मलेरियाचा दुसर्‍या प्रकारचा जिवाणू आणला. हे लोक मुख्यतः न्यू गिनी बेटावरच आहेत.

साधारण इ.स. पूर्वी १५००ला या भागात ओल्मेक संस्कृती नांदत होती आणि तिच्यात आफ्रिकन (मांदे) आणि चिनी (शांग) संस्कृतीचा प्रभाव होता, असे दिसते. या काळात असलेल्या व्यापारी जलप्रवासामुळे इतर अनेक संस्कृतींचाही प्रभाव या भागावर होता, असे दिसते.

====================================================================

थोर हायरदाल आणि कोन टिकी

थोर हायरदाल (Thor Heyerdahl) या जगप्रसिद्ध नॉर्वेजियन दर्यावर्द्याने इ स १९४७ मध्ये केवळ प्राचीन लोकांना शक्य असणारे सामानच वापरून दक्षिण अमेरिकेतल्या पेरू देशात एक तराफा बनवला आणि त्याच्या साहाय्याने ५ सहाय्यकांबरोबर कोणतीही आधुनिक उपकरणे न वापरता प्रशांत महासागरातील पॉलिनेशियन बेटांचा १०१ दिवसांचा ६,९०० किलोमीटर्सचा प्रवास करून दाखवला. नॉर्वेची राजधानी ओस्लोमध्ये कोन टिकी आणि त्या सफरीत वापरलेल्या सर्व वस्तू एका संग्रहालयात ठेवल्या आहेत.

हा आहे तो कोन टिकी नावाचा तराफा...


kon Tiki (जालावरून साभार)

====================================================================

मदर ऑफ ऑल सीफारिंग मॅप्स !

आतापर्यंत आपण पाहिलेल्या सर्व व्यापारी आणि स्थलांतरांच्या जलमार्गांचा हा महानकाशा…


(‘पाथवेज इन्टू पॉलिनेशिया’वरून साभार)

====================================================================

मला माझ्या संदर्भमंथनात जी काय रत्ने सापडली, ती मी तुमच्या पुढे ठेवली आहेत. यावरून ज्याने त्याने आपले मत बनवावे. समुद्रमंथनाच्या पौराणिक कथेशी त्यांचा किती संबंध आहे किंवा नाही, याबद्दल प्रत्येकाने आपले मत बनवायला हरकत नाही. तो संबंध शास्त्रीयरीत्या सिद्ध झाला आहे, असा माझा दावा नाही. सध्या ते एक गंमतीदार ‘असोसिएशन’ (शास्त्रीय भाषेत) म्हणूनच मी त्याकडे बघत आहे.

जसजसा वेळ पुढे जाईल, तसतश्या नव्या संशोधनाने नवीन सत्ये बाहेर येऊ शकतात किंवा काळाच्या ओघात नाहीशीसुद्धा होऊ शकतात. मात्र सध्या जे काय कळत आहे, ते मात्र फार रोचक आहे. म्हणूनच हा लेख लिहिल्याशिवाय राहवले नाही.

====================================================================

महत्वाचे दुवे:

http://en.wikipedia.org/wiki/Semeru
http://en.wikipedia.org/wiki/Tantu_Pagelaran
http://en.wikipedia.org/wiki/Mount_Meru
http://en.wikipedia.org/wiki/Samudra_manthan
http://www.polynesian-prehistory.com/
http://en.wikipedia.org/wiki/Polynesia
http://www.pakahiki.com/polynesia/history-of-ancient-polynesia/
http://www.environmentalgraffiti.com/featured/the-origins-of-polynesia/1...
http://en.wikipedia.org/wiki/Polynesia#Mainstream_theories
http://en.wikipedia.org/wiki/Micronesia
http://en.wikipedia.org/wiki/Melanesia
http://en.wikipedia.org/wiki/Oceania

दिवाळी अंक २०१३

प्रतिक्रिया

प्रसाद प्रसाद's picture

1 Nov 2013 - 1:51 pm | प्रसाद प्रसाद

लेख खूप चांगला लिहिला आहे.

चित्रगुप्त's picture

1 Nov 2013 - 2:09 pm | चित्रगुप्त

जबरदस्त लेख.
बोरोबुदूर येथील व्यापारी जहाजाचे शिल्प कोणत्या शतकातील आहे ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Nov 2013 - 7:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

या कोरीवकामाचा काळ आठवे शतक आहे. मात्र यासारख्या एका जहाजाला एका देवळाच्या कोरीवकामात स्थान मिळण्यासाठी अश्या जहाजांची परंपरा लोकजीवनात व व्यापारात (मोठ्या अर्थकारणाशिवाय मोठे बांधकाम / अथवा शिल्प उभे राहणे कठीणच म्हणा) बराच काळ अगोदरपासून अस्तित्वात असावी.

बॅटमॅन's picture

1 Nov 2013 - 2:43 pm | बॅटमॅन

फार जबरी लेख. माहिती अंमळ जास्तच आहे ;) (नेहमीप्रमाणेच) त्यामुळे पचवून घ्यावयास जरा वेळ लागतो आहे, पण लावलेली संगती आवडली. हडप्पा आणि पॉलिनेशियन संस्कृतीतले साम्य सगळ्यात रोचक वाटले.

विटेकर's picture

1 Nov 2013 - 2:53 pm | विटेकर

खूप मेहनत घेतली आहे .. रोचक आणि वाचनीय.

नमस्कार स्वीकारा.

अनुप ढेरे's picture

1 Nov 2013 - 3:20 pm | अनुप ढेरे

खूप आवडला लेख.

प्यारे१'s picture

1 Nov 2013 - 3:26 pm | प्यारे१

___/\___
खूपच अभ्यासपूर्ण.
आपल्याच एका प्रतिसादातला हा 'सिद्धांत' (थिअरी) आहे ना?

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Nov 2013 - 7:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

पॉलिनेशियन मानवप्रसरण हा एक फार मोठा पण काहिसा दुर्लक्षित आभ्यास विषय आहे. या लेखात बर्‍याच संदर्भातून मिळालेली रोचक माहिती आहे. बरेच संदर्भ "विश्वासू वाटत आहेत". पण इतर संशोधकांचे त्यासंबद्धिचे सबळ पुरावे मिळाल्याशिवाय (पियर रिव्ह्युड सपोर्ट) मिळाल्याशिवाय त्याला शास्त्रिय सिद्धांत म्हणणे कठीण आहे. फारतर त्याला आपण एक "पुढील सशोधनासाठी विश्वास वाटावा असा दावा" ( a claim worth further investigation) म्हणू शकतो.

मात्र सागरमंथनाबद्दल म्हणत असाल तर, लेखातच म्हटल्याप्रमाणे,

सध्या ते एक गंमतीदार ‘असोसिएशन’ (शास्त्रीय भाषेत) म्हणूनच मी त्याकडे बघत आहे.

मेहनत घेतली आहे, भरपूर माहिती आहे हे खरे.. पण (की त्यामुळेच) लेखन करा विस्कळीत वाटले. लेखाचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन त्याला आवश्य तेवढीच तथ्ये तार्किक क्रमाने मांडली असती तर अधिक बोध झाला असता.

असो. तुर्तास घेतलेल्या मेहनतीबद्दल कौतूक वाटते.. ह्याप्पी दिवाळी! :)

प्रचेतस's picture

1 Nov 2013 - 4:40 pm | प्रचेतस

नेहमीप्रमाणेच प्रचंड माहितीने खचाखच भरलेला लेख.

एक्कासाहेब, तुम्हाला आता जावा-कंबोडिया भटकंतीवर लिहिल्याशिवाय गत्यंतर नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Nov 2013 - 7:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

दिवाळी अंकात एका लेखात सर्व रोचक माहिती द्यायची म्हणून आणि या विषयावर तसे सुसंबद्ध संशोधन मिळणे कठीण या दोन कारणांमुळे एकाच लेखात बरीच माहिती आली.

जावा-कंबोडया, इ चा नंबर यानंतर लगेच आहे !

वसईचे किल्लेदार's picture

1 Nov 2013 - 5:43 pm | वसईचे किल्लेदार

वाचुन नाहि झाला अजुन पुर्ण ... वाचतोय.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Nov 2013 - 5:52 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कोन टिकी वर ह्याचं नावाची एक झक्कास कादंबरी सुद्धा आहे.

लेख आवडला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Nov 2013 - 8:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

कोन टिकी वर एक सिनेमा पण काढलेला आहे. त्याशिवाय कोन टिकीवरून स्फुर्ती घेउन अजून नऊ-दहा जणांनी तश्याच सफरिही केल्या.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Nov 2013 - 7:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रसाद प्रसाद, चित्रगुप्त, बॅटमॅन, विटेकर, अनुप ढेरे, प्यारे१, ऋषिकेश, वल्ली, वसईचे किल्लेदार आणि मन उधाण वार्याचे: तुम्हा सर्वांचे प्रतिसादांबद्दल अनेक धन्यवाद !

ही दिवाळी आपणा सर्वांना आनंद, आरोग्य व वैभवपूर्ण असो ही शुभेच्छा !

किलमाऊस्की's picture

2 Nov 2013 - 2:12 am | किलमाऊस्की

लेख आवडला. फोटो मस्तच आहेत. विशेषत: सुवर्णभूमी विमानतळावरचा. कोन तिकीबद्द्ल वाचलं होतं आधी.

एखादी लेखमालिका लिहीन. (अगोदरच धोक्याची सूचना देत आहे ;)

खरंच लिहा. आवडेल वाचायला!

कवितानागेश's picture

2 Nov 2013 - 12:53 pm | कवितानागेश

हरप्पा मधले पेंटिंग थेट 'वारली' आहे. अगदी बाईचा आम्बाडा आणि पुरुषाची शेन्डी पण तश्शीच आहे. गंमत आहे!
बाकी लेख पुन्हा शांतपणे वाचेन. अत्ता फक्त नजर फिरवली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Nov 2013 - 1:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

हेमांगीके आणि लीमाउजेट: अनेक धन्यवाद !

ही दिवाळी आपणाला आनंद, आरोग्य व वैभवपूर्ण असो ही शुभेच्छा !

ही दिवाळी सर्व मिपासभासदांना आनंद, आरोग्य व वैभवपूर्ण असो ही शुभेच्छा !

युगंधर's picture

2 Nov 2013 - 10:24 pm | युगंधर

नेहमीप्रमाणेच अतिशय माहितीपूर्ण लेख !!!!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Nov 2013 - 11:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

सुधीर कांदळकर's picture

4 Nov 2013 - 8:33 am | सुधीर कांदळकर

माहितीपूर्ण, तरीही आकर्षक आणि रोचक. (बहुधा बीबीसी वरच्या) माहितीपटांच्या मालिकेत नसलेली बरीच माहिती आपण पुढे आणलीत. धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Nov 2013 - 11:52 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

मुक्त विहारि's picture

4 Nov 2013 - 10:00 pm | मुक्त विहारि

मस्त लेख.

सुंदर माहिती.

पुढच्या लेखमालेच्या प्रतिक्षेत...

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Nov 2013 - 10:11 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

जेपी's picture

5 Nov 2013 - 2:24 pm | जेपी

आवडला

खटपट्या's picture

5 Nov 2013 - 11:07 pm | खटपट्या

वाचतोय,

पहिल्याच चित्रात (नकाशात) काश्मीर अर्धा दाखवला आहे. बहुतेक आंतराष्ट्रीय पातळीवर, जेवढा काश्मीर भारताच्या ताब्यात आहे तेवढाच दाखवत असावेत. माझ्या कार्यालयात लावलेल्या नकाशावर सुद्धा असाच अर्धा काश्मीर दाखवला होता. मी त्यावर आक्षेप घेवून बदलून घेतला.

कधी पाकव्याप्त काश्मीर आपल्याला परत मिळणार देव जाणे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Nov 2013 - 12:21 am | डॉ सुहास म्हात्रे

तथास्तु आणि खटपट्या: धन्यवाद !

खटपट्या's picture

6 Nov 2013 - 5:47 am | खटपट्या

मस्त माहिती,

हरप्पा येथील भान्ड्यावरील नक्षी थेट वारली पेंटिंग शी मिळतीजुळती आहे.

पैसा's picture

6 Nov 2013 - 4:11 pm | पैसा

नेहमीप्रमाणे निवांत वाचण्यासाठी लेख ठेवून दिला होता. मात्र यावेळी लेखनविषय संपूर्ण वेगळा आणि नवीन असल्याने प्रतिसादांमधे वाचक फार भर घालू शकले नाहीत वाटते!

कंबोडियाला ख्मेर असेही नाव आहे ना? म्हणजे मेरूला जवळचेच की! समुद्रमंथनाची गोष्ट रूपक म्हणून सहज वापरली गेली असेल. मनू आणि देवमासा ही गोष्ट सगळ्या संस्कृतींमधे वेगवेगळ्या अवतारात वाचायला मिळतेच!

हरप्पामधली लिपी आणि इस्टर बेटावरील लिपी यातील साम्ये पाहून थक्क व्हायला झाले. भांड्यांवरील नक्षी समान असण्याचे कारण ते (हरप्पन लोक) नक्कीच पॉलिनेशियात पोचले असणार हे दिसते. हरप्पन हे द्रविड वंशाचे लोक होते. तसेच द. भारतातले लोकही द्रविड वंशाचे म्हणवतात. द. भारतीय लोक कंबोडियात गेले होते हे नक्की आहे. त्यांनी आपली लिपी भाषा सगळेच तिकडे नेले. हे सगळे काही एकदम उठून कोलंबसासारखे निघालेले नव्हते. या सर्व प्रदेशात त्याच्या फार आधीपासून दळणवळण सुरू असणारच!

फक्त युरोपियन्स म्हणतील तेवढाच इतिहास अशी समजूत आपली कित्येक वर्षे करून दिल्यामुळे कोणी असे वेगवेगळे विचारही कधी करत नाहीत. एका अगदीच नव्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद! जावा कंबोडियाच्या सफरीवर कधी निघायचे ते सांगा!!

अनन्न्या's picture

6 Nov 2013 - 6:24 pm | अनन्न्या

मस्त माहिती! अजून पूर्ण वाचला नाहीय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Nov 2013 - 9:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

खटपट्या, पैसा आणि अनन्न्या: अनेक धन्यवाद !

@ पैसा: काही लोकांचे असेही म्हणणे आहे की हराप्पन लोकांमध्य तांबड्या केसांचे गोरे लोकही होते. त्यातले काही पॉलिनेशियनात जावून लापिता पॉटरीवाले झाले. त्यामुळे हराप्पन आणि लपिता भांड्यांवरच्या नक्षीत इतके साम्य आहे.

सौंदाळा's picture

8 Nov 2013 - 11:24 am | सौंदाळा

नेहमीप्रमाणेच अप्रतिम लेख.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Nov 2013 - 3:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

स्पंदना's picture

11 Nov 2013 - 5:37 am | स्पंदना

केव्हढा अभ्यास तो!
अतिशय सुरेख मांडणी. पुराणे अन दंतकथा या इतिहास जपण्यासाठी निर्माण झाल्या अशी माझी ठाम समजुत आहे. कधीतरी गणेशपूराणात एक प्रसंग वाचला होता. त्यात श्री गणेश हे दक्षीणेकडुन येत असताना वाटेत त्यांना एका अंधार्‍या गुहेत स्वतःच्या विद्रुप रुपामुळे लज्जीत होउन लपून बसलेल्या हरीहर पुत्राची कथा वाचली होती. हा हरीहर पुत्र म्हणजे अय्यपा अथवा साबरी.
मग पुढे खुप वर्षानंतर मलेशियात बातू केव्हजनाबातू केव्हज जाण्याचा योग आला, अन अक्षरशः थक्क झाले ती गुफा पाहून. तेथे बाजुलाच असलेली काल गुंफा तर अजुनही कोणाला पुरेपुर पार करता आली नाही म्हणतात.
या साबरीमलयाचा आपल्या दाक्षिणात्य संस्कृतीवरचा पगडा तर आपण जाणतोच, पण जे वर्णन पुराणात आहे ते असे सामोरे आल्याने खुप आश्चर्य वाटले. तीच गोष्ट लॅटीन अमेरिकेतील त्रीशुलाची. रामायणातल्या सुग्रीवाच्या तोंडी या चिन्हाबद्दल माहीती आहे.
इस्पिकएक्काजी लेखन अतिशय विस्तृत अन सखोल आहे. अर्थात यावर तुम्ही अजुन लिहु शकता अन लिहाल अशी अपेक्षा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Nov 2013 - 10:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

अनेक धन्यवाद !

सद्या या विषयावरचे संशोधन बर्‍यापैकी विस्कळीत आणि पियर रिव्ह्यूड पुरावे बरेच कमी आहेत. पुढेमागे जर पुरेशी शास्त्रिय दृष्टीने भक्कम माहिती सापडली तर या विषयाचा अभ्यास करायला खरंच मजा येईल आणि मग अजून काही लिहूनही होईल.

त्रिवेणी's picture

12 Nov 2013 - 3:21 pm | त्रिवेणी

कित्ती अभ्यास आहे हो तुमचा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Nov 2013 - 10:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

जॅक डनियल्स's picture

17 Nov 2013 - 12:04 am | जॅक डनियल्स

खूप माहितीपूर्ण आणि मस्त लेख.
२०१२ साली कोन-टिकी वर एक सिनेमा आला आहे. कोन टिकी !
प्रिंट काढून परत नीट वाचला, तेंव्हा पूर्ण नीट समाजला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Nov 2013 - 10:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

इन्दुसुता's picture

18 Nov 2013 - 9:56 am | इन्दुसुता

लेख आणि माहिती आवडली.
तुमची मालिका यापूर्वी वेळेअभावी वाचावयाची राहिली, ती लवकरच वाचणार.

समुद्रमंथन हे कुंडलिनी जागृत होताना होणार्‍या अध्यात्मिक अनुभवाचे प्रतिकात्मक वर्णन आहे.

एकदम correct . एखादी गोष्ट समजून सांगण्यासाठी काही प्रतीकांचा वापर केला जातो . पुढे पुढे ती प्रतीकेच आवडू लागल्यामुळे त्यामागची मूळ विचारधारा नाहीशी होते . समुद्रमंथन हे असंच १ प्रतिक. भौतिक जगात कधीही न घडलेली घटना .
असो पण लेखाचा उद्देश कळला नाही . कुठले लोक किती वर्षांपूर्वी कुठून कुठे गेले एवढाच उद्देश आहे का ?

अनिंद्य's picture

22 Dec 2017 - 1:13 pm | अनिंद्य

@ डॉ सुहास म्हात्रे,

ही थीम रोचक आहे, तुमचा अभ्यास-संशोधन पुढे चालू ठेवा असे सुचवेन.
शुभेच्छा,
अनिंद्य