स्वित्झर्लंड या देशात भर उन्हाळ्यात बर्फाच्छादित हिमशिखरे असणार्या जगातल्या फार थोड्या पर्वतराजींपैकी आल्प्स पर्वत आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यातही या देशात बर्फ आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या डोंगरदर्या यांचा संगम असलेले निसर्गाचे रूप पाहायला मिळते.शिवाय कडक हिवाळ्याचा धसका असलेल्या बहुसंख्य प्रवासी मंडळींनाही स्वित्झर्लंड म्हटले की उन्हाळ्याची सफरच बरी वाटते.
परंतू स्वित्झर्लंड त्याच्या अनेक नैसर्गिक हिमद्यांवर आणि मानवनिर्मित सोयीने तयार केलेल्या ठिकाणांवर उपलब्ध असणार्या अनेक हिवाळी खेळांसाठीही जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे तो देश वर्षभर प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेला असतो. स्वित्झर्लंडच्या निसर्गसौंदर्याच्या एवढीच किंवा त्यापेक्षा काकणभर जास्त भुरळ सहज सोप्या सार्वजनिक सोयी, स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि सर्वात जास्त म्हणजे सर्व गोष्टींचे अतिशय नियमबद्ध आणि काटेकोर नियोजन यांची पडते. त्यामुळे हिवाळ्यात तेथे जायची संधी आली तेव्हा थंडीच्या कल्पनेने हुडहुडीभरण्याऐवजी जरा खुशीची उबच अनुभवली.
थंडीत जायचे नक्की झाले म्हणून सर्वात प्रथम आठवण आली ती स्वित्झर्लंडच्या खास "ग्लेशियर एक्सप्रेस" उर्फ "हिमराणी" ची ("दख्खनची राणी" च्या चालीवर). आप्ल्सची पर्वतशिखरे, दर्या आणि हिमनद्यांतून दौडत जाणारी ही आगगाडी जरी वर्षभर चालू असली तरी तिची हिवाळ्यातली सफर काही औरच असणार हे काय सांगायला पाहिजे काय?
मग एक विकांत अधिक एक दिवस असे जुगाड करून तेथे काम सुरू होणार्या दिवसाच्या तीन दिवस अगोदर जायचे नक्की केले... एवढ्या वेळात हिमराणीची सफर आणि तिच्या प्रवासाच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या महत्त्वाच्या ठिकाणांच्या धावत्या सफरीचे नियोजन शक्य झाले. ते खालीलप्रमाणे होते...
विमानाने सकाळी सकाळी झ्युरिक गाठा - विमानतळावरूनच तडक रेल्वेने दावोस (१ रात्र वस्ती) - रेल्वेने सेंट मॉरिट्झ (१ रात्र वस्ती) - ग्लेशियर एक्सप्रेस उर्फ हिमराणीची सफर - झेरमाट् (१ रात्र वस्ती) - रेल्वेने संध्याकाळ पर्यंत झ्युरिक गाठा आणि एक रात्र झोप काढून दुसर्या दिवसापासून कामाला लागा !
(हिमराणीचा मार्ग जांभळ्या रंगाने दाखविला आहे. मूळ नकाशा जालाच्या सौजन्याने)
मायस्वित्झर्लंड.कॉम ही सरकारी पर्यटनसंस्था अगदी उत्तम खाजगी पर्यटनसंस्थानाही लाजवील अश्या कार्यक्षमतेने आणि योग्य तेच मूल्य घेऊन प्रवासाची व्यवस्था करून देते. यामुळे देशांतर्गत राहण्याची आणि रेल्वे प्रवासाची व्यवस्था या कंपनीतर्फे जालावरून केली. पाच एक दिवसांत हॉटेल्सची कूपॉन्स आणि रेल्वेची तिकिटे कुरियरने घरपोच आली आणि या धावपळीच्या प्रवासातील मुख्य चिंता दूर झाली.
विमानप्रवास निर्वेध पार पडला आणि ठरलेल्या वेळेस झ्युरिकला पोहोचलो. आख्खा स्वित्झर्लंड देश वाहतूक व्यवस्थेचा एक आदर्श वस्तुपाठ आहे. विमानातून उतरल्यावर रेल्वे / ट्रॅम / बस / टॅक्सी काहीही पकडण्यासाठी कमीत कमी चालायला लागेल एवढेच अंतर आणि साधं इंग्लिश वाचता येत असेल तर कोणतीही चौकशी न करता तुमच्या गंतव्यापर्यंत पोचण्याची खात्री असणारे नियोजन; असा हा देश जगभरच्या प्रवाशांचा आवडता नसता तरच नवल. पासपोर्टवर शिक्का मारल्यापासून दहापंधरा मिनिटाच्या आत विमातळावरच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचलोही ! गाडीला जरा वेळ होता. थोडी पोटपूजा आटपतो न आटपतो तोच गाडी फलाटाला लागली आणि टेकतो न टेकतो तेव्हा चालूपण लागली ! या स्विस मंडळींना जरा दोन सेकंद उशीर झाला तरी आकाश कोसळल्यासारखे वाटते !
रेल्वेने झ्युरिकचा शहरी भाग १५-२० मिनिटातच झपाट्याने मागे टाकला आणि आजूबाजूचा नयनमनोहर निसर्ग बघता बघता हिमाच्छादित पर्वतराजी केव्हा सुरू झाली ते कळलेच नाही...
आणि त्यानंतर थोड्याच वेळात आल्प्सच्या बर्फाच्छादित परिसरातील बसकी पण टूमदार घरे असलेली छोटी छोटी गावे सुरू झाली...
====================================================================
दावोस
दावोसला हॉटेलवर पोहोचलो तेव्हा मस्त गोड गुलाबी थंडी होती, आकाश निरभ्र होते आणि सहलीचा मूड अर्थातच जुळून आला होता. मस्त गरम शॉवर घेऊन ताजातवाना होवून हॉटेलच्या खिडकीतून बाहेर डोकावले. आता उघडीप झालेली असली तरी रस्त्यांच्या बाजूला बरेच बर्फ साठलेले दिसत होते...
जवळच्या आईस हॉकीच्या पटांगणात आणि त्याच्या आजूबाजूला भरपूर बर्फ साठले होते...
बर्फ खाली घसरून शहराला धोका पोहोचू नये म्हणून डोंगरांच्या शिखरांवर केलेल्या अडथळ्यांची नक्षी लक्ष वेधून घेत होती...
दावोस तसे एक ११-१२,००० वस्तीचे छोटेखानी शहर आहे. तेथे दरवर्षी होणार्या जागतिक वित्त परिषद उर्फ World Economic Forum (WEF) च्या संमेलनामुळे ते जगप्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांत या वार्षिक संमेलनात भारताचा सहभाग असल्याने त्याचे नाव आपल्या वृत्तपत्रांतही येत असते. त्यामुळे साहजिकच मला तेथे जाण्याबद्दल बरीच उत्सुकता होती. WEF या गैरसरकारी विनाफायदा संस्थेतर्फे भरवल्या जाणार्या मेळाव्यात जगभरातून २,५०० राजकीय नेते, वित्तमंत्री आणि जागतिक उद्योगधंद्यांचे धुरीण हजेरी लावतात, एकमेकाशी संवाद साधतात आणि बर्याचदा आपले भविष्यातले मनोरथही उघड करतात.
आल्प्सच्या दोन रांगांच्या मध्ये १,५६० मीटर उंचीवर वसलेले हे शहर युरोपमधिल सर्वात जास्त उंचीवर वस्ती असलेले ठिकाण आहे. तेथे असलेल्या नैसर्गिक बर्फावरच्या हिवाळी खेळांच्या जागतिक स्तरांच्या सोयीमुळे ते एकोणाविसाव्या शतकाच्या मध्यापासून एक जागतिक आकर्षण आणि हिवाळी खेळांचे केंद्र ठरले आहे. मात्र या शतकातल्या ७०-८० च्या दशकापासून इतर अनेक ठिकाणी कृत्रिम बर्फ वापरून हिवाळी खेळ खेळण्याची सोय झाल्याने हल्ली तेथे पहिल्यापेक्षा कमी स्पर्धा भरतात. मॅजिक माऊंटन नावाच्या प्रसिद्ध कादंबरीतल्या अनेक घटना या शहराच्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या आहेत.
खिडकीतून दावोसचे लोभस दर्शन झाल्यावर आणि शिवाय सूर्य अजून बराच वर आहे म्हटल्यावर चार भिंतीत राहणे कठीण होते. अर्थातच प्रवासाचा आलेला सगळा शीण रात्रीवर ढकलण्याचा निर्णय घेऊन कॅमेरा घेऊन बाहेर पडलो. हे शहर छोटे असले आणि प्रवाशांची सतत गर्दी असली तरी ते स्वित्झर्लंडच्या प्रसिद्धीला साजेसे नीटनेटके आणि कमालीचे स्वच्छ आहे. मात्र ह्या कार्यक्षमतेची खरी ओळख पटली ते दहा-पंधरा मिनिटे पायी चालत शहराच्या टोकाला पोहोचलो तेव्हा...
.
अख्खे शहर बर्फमुक्त आणि कोरडे होते ते नैसर्गिकरीत्या नव्हते... तो मानवाच्या करणीचा परिणाम होता. कारण शहराच्या कडेच्या रस्त्यापलीकडे हू म्हणून बर्फ पडलेले होते. मात्र शहरातल्या रस्त्यांवर ना बर्फ ना पाण्याचा मागमूस !
बर्फ बघितल्यावर त्याच्यावर चालल्या शिवाय कसे राहवेल? अर्थात त्या दिशेने पुढे गेलो. वाटेत एक रज्जूमार्ग दिसला. त्यात बसून क्लॉइस्टर माउंटन्स या एका पर्वतशिखरावर जाताना खालच्या बर्फावर खेळाडूंची ही गर्दी दिसली... कोणती तरी स्किईंगची स्पर्धा होती असे समजले. पांढर्या शुभ्र बर्फावर निळ्या-तांबड्या पोशाखातील खेळाडूंची आकर्षक नक्षी दिसत होती...
शिखरावर एक छानसे रेस्तरॉ आहे. हिमशिखरावरच्या उच्चासनावर बसून थंड बियरचा आस्वाद घेत खेळाडूंच्या करामती बघायला मिळाल्या...
.
दावोसमध्ये स्किईंग स्पर्धा बघण्याच्या अचानक झालेल्या लाभाने सहलीची सुरुवात तर मजेशीर झाली होती. काही वेळाने रज्जूमार्गानेच परताना दावोसचे विहंगम दर्शन झाले...
.
हॉटेलवर परत येईपर्यंत अंधार होत आला होता. जेवण होईपर्यंत आतापर्यंतचा सगळा शीण जाणवू लागला होता. केव्हा गादीला पाठ टेकली आणि केव्हा गाढ झोप लागली ते कळलेही नाही.
====================================================================
सेंट मॉरिट्झ
सकाळी जरा लवकर उठून न्याहारी करून सेंट मॉरिट्झकडे जाणारी आगगाडी पकडली. आल्प्सच्या दुर्गम भागातून जाणारा हा नागमोडी मार्ग म्हणजे एक खास अनुभव होता. गाडीच्या मार्गात अनेक उंचसखल घाटांचे आणि दर्यांचे टप्पे आहेत त्यामुळे नजरेला अगदी मेजवानी असते.
वाटेत पर्वतांच्या कुशीत थोडासा सपाट भाग पकडून वसलेली १५-२५-५० घरांची अनेक छोटी छोटी गावे दिसत होती...
तर मध्येच उंच पर्वतराजी अचानक समोर येऊन छातीवर दडपण आणत होती...
एक जुनी पारंपरिक स्विस घरे असलेले गावही दिसले. त्या घरांवरची नक्षी पाहण्याजोगी होती...
सेंट मॉरिट्झला हॉटेलवर पोहोचलो तेव्हा दुपारचे दोन वाजले असतील. जेवण आगगाडीतच उरकले होते आणि प्रवास वातानुकूलित (स्वित्झर्लंडमध्ये ही चैन नसून आवश्यकताच आहेच म्हणा) त्यामुळे ताजातवानाच होतो. दूर डोंगरांवर थोडा बहुत ढगांचा नाच चालला होता...
पण बाहेर चांगली उघडीप होती आणि मधूनच ऊनही डोकावत होते...
कॉफी घेऊन लगेच दिवसाच्या उरलेल्या वेळेचा फायदा घ्यायला बाहेर पडलो. हॉटेलच्या रिसेप्शनवर गावातल्या प्रेक्षणीय स्थळांची चौकशी करून मार्गदर्शन घेतले होतेच. शिवाय रिसेप्शनिस्टने "इथल्या हवामानाचा काय भरवसा नाय बा." असं म्हणत दिलेली छत्रीही बरोबर घेतली होती. लख्ख दिवस आणि मधून मधून पडणारी उन्हाची तिरीप दिसत असूनही एवढ्या आपुलकीने दिलेल्या छत्रीला नाही म्हणता आले नाही.
जेट सेटर्स आणि उच्चभ्रू लोकांचे महागडे स्की रिसॉर्ट म्हणून सेंट मॉरिट्झ ओळखले जाते. पिझ् बर्निना (Piz Bernina) हे पूर्व आल्प्समधले सर्वात उंच शिखर येथून जवळच आहे. हे ठिकाण प्रसिद्ध कसे झाले याची एक कहाणी आहे. योहान बाड्रूट नावाच्या हॉटेल मालकाने एका उन्हाळ्यात त्याच्या हॉटेलमध्ये उतरलेल्या चार ब्रिटिश प्रवाशांबरोबर पैज लावली की त्यांनी पुढच्या हिवाळ्यात इथली मजा अनुभवण्यास यावे; जर त्यांना ती हिवाळी सहल आवडली नाही तर योहान त्यांना त्यांचा प्रवासाचा खर्च भरून देईल आणि जर आवडली तर त्यांना जितके दिवस राहावेसे वाटेल तितके दिवस योहानचे पाहुणे म्हणून राहता येईल. त्या ब्रिटिश प्रवाशांनी ते आव्हान स्वीकारले (आव्हान एवढ्याकरिता की त्यावेळेपर्यंत स्वित्झरलंड आल्प्स पर्वतामुळे खूप थंड आणि म्हणून हिवाळी सहलीस अयोग्य अशीच समजूत होती). ती हिवाळी सहल प्रवाशांना खूप आवडली. या गोष्टीला कर्णोपकर्णी आणि इतर इतकी प्रसिद्धी मिळाली की एकोणिसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत सेंट मॉरिट्झ एक अग्रगण्य हिवाळी सहलीचे केंद्र झाले !
येथे १९२८ आणि १९४८ साली हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले गेले होते. तसेच या शहराने अनेक जागतिक / युरोपीय मानांकनात प्रथम क्रमांकाची स्थाने पटकावली आहेत... स्वित्झर्लंडमधला पहिला विजेचा बल्ब येथल्या कुल्म हॉटेलमध्ये पेटला (१८८७); पहिली युरोपियन आईस स्केटिंग स्पर्धा (१८८२); आल्प्समधली पहिली गोल्फ स्पर्धा (१८८९); पहिली बॉब (बर्फावरून घसरण्यार्या एका विशिष्ट वेगवान गाडीचा हिवाळी खेळ) स्पर्धा (१८९०); आप्ल्समधली पहिली विजेवर चालणारी ट्रॅम (१८९६); स्वित्झर्लंडमधले पहिले स्की स्कूल (१९२९); थिजलेल्या तळ्यावरची पहिली गोल्फ स्पर्धा (१९७९); ई. ई.
हेच ते जगप्रसिद्ध तळे... त्याच्यावरून चालवलेल्या गाड्यांच्या चाकांच्या खुणा दिसत होत्या पण गाईड बरोबर नसल्याने त्याच्यावर चालण्याचा धोका न पत्करता त्याला काठावरूनच बघून समाधान मानले ! ...
फक्त ५-६,००० वस्तीच्या या शहराची समृद्धी जागोजागी उठून दिसत होती...
दोन तास फिरून झाले असताना काही मिनिटांतच वातावरण बदलले आणि प्रथम जोरदार ढग दाटून आले आणि ते दूर होताच बर्फवृष्टी सुरू झाली. आतापर्यंत छत्रीचे लोढणे हातात बाळगत फोटो काढताना हॉटेलच्या रिसेप्शनिस्टला दोष देत होतो... आता दुवा द्यायला लागलो ! दर मिनिटामागे वार्याचा आणि बर्फवृष्टीचा वेग वाढू लागला तसे वेगाने हॉटेलवर यावेच लागले ! तोपर्यंत तेथे पार्किंगमध्ये वितळलेल्या बर्फाचे पाणी साचले होते आणि गाड्यांवर बर्फाचा बर्यापैकी थर जमलेला होता.
खोलीत शिरताना ध्यानात आले की भरपूर हुडहुडी भरली आहे आणि हात गारठून लाकडे बनलेले आहेत ! त्वरित शॉवरमध्ये घुसून पंधरा मिनिटांचा सचैल गरम शॉवर घेतला तेव्हा जरा बरे वाटले. सात वाजताचा गजर लावून जाड उबदार रजईखाली ताणून दिली.
जाग आली तेव्हा बरीच हुशारी आणि गरमी आली होती. पोटात कावळे-कुत्रे ओरडायला सुरुवात झाली होती. सहकार्याबरोबर फोनाफोनी करून हॉटेलच्या रेस्तरॉमध्ये जमलो. थाई पद्धतिचा प्रॉन्स फ्राईड राईस मागवला. (बहुतेक चेहरा बघून) वेटर म्हणाला, "जरा तिखट केला तर आवडेल काय?" अर्थातच त्याला नंतर बर्यापैकी टिप् मिळाली !
रात्री बर्फवृष्टीचा जोर वाढतच होता. खोलीतल्या टीव्हीचे चित्रही बर्याचदा गायब होत होते. रिसेप्शनवर तक्रार केली तर सांगितले की परिसरात खूप मोठे बर्फाचे वादळ चालू आहे त्यामुळे तसे होते आहे. शेवटी कंटाळून टीव्ही बंद करून झोपी गेलो.
पहाटे पाचच्या सुमाराला जाग आली आणि ऐकू येणार्या घरघराटीमुळे खिडकीतून बाहेर नजर टाकली. निसर्गाचे रूपरंग एकदम बदलून गेले होते. रात्रभर दणकून बर्फवृष्टी झाली होती. जवळच्या झाडा-रस्त्यापासून तर दूरवरच्या जंगल-डोंगरापर्यंत निसर्गाने एक व्हाईटवॉशचा हात मारल्यासारखे दिसत होते...
.
हॉटेलच्या पोर्चवर एक मीटरभर उंचीचा बर्फाचा थर साठला होता...
झाडांच्या निष्पर्ण फांद्यांच्या काड्यांवर (बिनरंगांचे) बर्फाचे गोळेच गोळे तयार झाले होते...
====================================================================
हिमराणी (Glacier Express)
हॉटेलच्या आवारात त्या बर्फाची मजा घेत थोडे फिरून झाल्यावर हिमराणी सुटण्याची वेळ झाल्याचे ध्यानात आले आणि आम्ही आमचे चंबूगबाळे आवरून रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालो. स्टेशन चालत पाच मिनिटाच्या अंतरावरच होते. मुख्य म्हणजे रात्री इतका बर्फ पडूनही केवळ ६,००० वस्तीच्या गावातले रस्ते सकाळी साडेसहाला आमच्या चाकांच्या बॅगा निश्चिंतपणे ओढत नेता येतील इतके स्वच्छ आणि बर्फमुक्त होते. सकाळी मला जाग आणणारी घरघराट बर्फ साफ करणार्या गाड्यांची होती... रहदारीला अडथळा येऊ नये म्हणून त्यांचे काम पहाटेच संपवून त्या गाड्या निघूनही गेल्या होत्या !
रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला काल रात्री पडलेल्या बर्फाने दिवाणखान्यात लावावी इतकी सुंदर चित्रे रंगवली होती. त्यातली काही कॅमेर्याच्या मदतीने हळूच चोरून घेतली...
.
हिमराणीला बघूनच खूष झालो. सर्वच स्विस गाड्या अत्यंत आरामदायक आणि स्वच्छ असतातच. पण हिमराणीचा रुबाब काही खासच होता...
आरामदायक २ X २ आसनांची व्यवस्था, निसर्गसौंदर्य पाहायला अजिबात अडचण येऊ नये यासाठी भल्यामोठ्या पॅनोरामा खिडक्या, समोर टेबल, उत्तम वातानुकूलित व्यवस्था आणि गाडीचा आवाज अथवा हालचाल प्रवाशांच्या ध्यानात येणार नाही इतपत कमी राहिल असे डबे....
अश्या तर्हेने हिमराणीची सेंट मॉरिट्झ ते झेरमाट् ही आठ तासांची सफर सुरू झाली...
ही गाडी आणि तिचा मार्ग म्हणजे एक अभियांत्रिकी चमत्कार आहे. या मार्गावर ९१ बोगदे आणि २९१ पूल आहेत...
कधी ती आपल्याला स्वित्झर्लंडच्या नयनरम्य नागरी भागातून फिरवत नेते...
तर कधी केवळ बर्फाने भरलेल्या दर्या-खोर्यातल्या छोट्या गावांतून...
.
कधी पर्वताच्या पायथ्याने तर कधी "ओबराप्ल्पपास" या समुद्रसपाटीपासून २०३३ मीटर वर असलेल्या पठारवजा खिंडीतून...
.
.
.
ही हिमराणीची विमानातून काढलेली चित्रे (ग्लेशियर एक्सप्रेसच्या संस्थळावरून साभार)...
.
हिमराणीच्या ऊंचसखल प्रवासाचा नकाशा (मायस्वित्झर्लंड.कॉम वरून साभार)
झेरमाट् आले आणि हा आठ तासांचा प्रवास इतक्या लवकर कसा संपला हाच विचार करत हॉटेलवर जायला निघालो !
====================================================================
झेरमाट्
साधारण ६,००० लोकवस्तीचे झेरमाट् हे पर्वतारोहण आणि स्किईंगचे एक जागतिक केंद्र आहे आणि वर्षातून बर्याचदा त्याच्या लोकसंख्येएवढेच प्रवासी या शहरात असतात असे म्हणतात ! झेरमाट् हे आल्प्स पर्वतराजीतील ४,००० मीटरपेक्षा जास्त ऊंचीच्या वीसएक शिखरांनी वेढलेले ठिकाण आहे. त्यातली महत्त्वाची अशी आहेत... इथले माँटे रोझा (४,६३४ मीटर) हे स्वित्झर्लंडमधले सर्वात उंच शिखर, डोम (४,५४५ मीटर), लिस्काम (४,५२७ मीटर), वाईसहोर्न (४,५०५ मीटर) आणि माटरहोर्न (४,४७८ मीटर). मात्र या सर्वात माटरहोर्न (Matterhorn) हेच शिखर सर्वात जास्त प्रसिद्ध आणि गिर्यारोहकांमध्ये प्रिय आहे.
हॉटेलवर बॅगा टाकल्या आणि झेरमाट् मध्ये संध्याकाळची चक्कर मारायला बाहेर पडलो. नव्याबरोबर झेरमाट् च्या एका भागात जुन्या काळची रेस्तराँ व इमारती त्यांच्या मूळ स्वरूपात जतन करून ठेवलेल्या आहेत...
सदासर्वदा काटेकोरपणे सर्व गोष्टी घासून पुसून लख्ख ठेवणार्या स्वित्झर्लंड मध्ये असे काही पाहून मजा वाटली ! दुसर्या दिवशी बरेच फिरणे होणार होते आणि संध्याकाळच्या थंडीचा कडाका वाढला होता म्हणून हॉटेलवर परतून जेवण करून गुडुप झोपी जाणे पसंत केले.
दुसर्या दिवशी जरा लवकरच उठून न्याहारी करून साडेआठलाच बाहेर पडलो, कारण आजच्या शेवटच्या दिवसाचा भरगच्च कार्यक्रम संध्याकाळच्या झ्युरिककडे नेणार्या रेल्वेच्या वेळेअगोदर संपवायचा होता.
सगळ्यात पहिले निघालो माटरहोर्न गोटहार्ड बान्ह (रेल्वे) स्टेशनवर. ह्या रेल्वेला नेहमीच्या रूळांच्या मध्यभागी दातेरी पकड असणारे जादा रूळ असतात. त्यामुळे ती खडा चढ आणि उतार जलद आणि सुरक्षितपणे चढू-उतरू शकते...
स्वित्झर्लंडमध्ये ही रूळांची खासियत अनेक डोंगरी प्रवासी आकर्षणाच्या ठिकाणी दिसते. ही गाडी आम्हाला तीन किलोमीटर दूर गोर्नरग्राट (गोर्नर कडा) येथे घेऊन जाणार होती. तेथून गोर्नर हिमनदी आणि आल्प्सच्या ४,००० मीटरपेक्षा जास्त उंच असलेल्या २० शिखरांचे दर्शन करता येते.
गाडी सुरू झाली आणि जगप्रसिद्ध माटरहोर्न शिखराने सकाळच्या उन्हात चमकत प्रसन्न दर्शन दिले...
वाटेत अनेक हिमनद्या आणि आल्प्सच्या हिमशिखरांचा नजारा दाखवत रेल्वे पुढे जात होती. काय बघू आणि काय नको असे झाले. इतर वेळेस कडक शिस्तीत असणारे स्विस येथे मात्र प्रवाशांना गाडीत हवे तसे फिरून चारी दिशांना निसर्गाने उधळलेल्या सौंदर्याची मजा मनसोक्त लुटू देत होते. मी तर ड्रायव्हरला त्याच्या शेजारची रिकामी जागा बघून तेथे बसू का असे विचारले तर "नो प्रॉब्लेम. खुशाल बसा." असे म्हणाला. लगेच मी ती निसर्गसौंदर्य बघायला आणि फोटो काढायला सर्वोत्तम जागा काबीज केली !...
.
.
.
.
गोर्नरग्राटला पोहोचलो तेव्हा सूर्य चांगलाच वर आला होता, आकाश निरभ्र झाले होते आणि वार्याचा वेगही खूप कमी होता. थोडक्यात ३,१३५ मीटर उंच असलेल्या या ठिकाणावर निसर्गाने आमचे चांगले स्वागत केले होते. त्यामुळे तापमान -११ अंश असूनही केवळ स्वेटर आणि कोट घालून येथे येण्याचा वेडेपणा तेवढासा महाग पडला नाही !...
मग आमच्यावर प्रसन्न झालेल्या निसर्गाचे मनमुक्त दर्शन घेण्यासाठी आम्ही इतर प्रवासी आणि स्किअर्समध्ये मिसळून गेलो...
आणि तिथल्या बर्फात आपली पावले उमटवली...
तेथल्या पर्वतशिखरावरच्या रेस्तरॉमध्ये अल्पोपाहार करून परत आलो. परत येताना रेल्वे शेजारच्या ट्रॅकवर अनेक खेळाडू वेगाने स्किईंग करत रेल्वेशी स्पर्धा होते, ते बघता बघता परतीचा प्रवास जरा लवकरच संपला.
झेरमाट् ला परतल्यावर लगेच "माटरहोर्न ग्लेशियर पॅरॅडाईज" अथवा "क्लाईन माटरहोर्न (धाकले माटरहोर्न)" ला घेऊन जाणार्या रज्जूमार्गाची वाट पकडली. हा युरोपमधील सर्वात जास्त उंचीवर (३,८२० मीटर) नेणारा रज्जूमार्ग आहे. एवढ्या उंचीवर, -४० अंश पर्यंत खाली जाणार्या तापमानात आणि १०० किलोमीटर प्रतितास वेगाच्या बोचर्या थंड वादळवार्यात काम करून बनवलेला हा रज्जूमार्ग एक अभियांत्रिकी आश्चर्य आहे !
रज्जूमार्गावरून जाताना झालेले झेरमाट् चे विहंगम दर्शन...
हा रज्जूमार्ग दोन टप्प्यांमध्ये आहे. पहिल्या टप्प्यात आपण श्वार्झझे (पांढरा समुद्र) रेस्तरॉ येथे पोहोचतो. या रेस्तरॉचे नाव जवळच असलेल्या पण या दिवसात पूर्ण गोठून गेलेल्या एका विस्तीर्ण तळ्यावरून ठेवलेले आहे. येथून माटरहोर्नचे एकदम जवळून आणि सुस्पष्ट दर्शन होते...
.
या रेस्तरॉमध्ये अडीच हजार मीटर उंचीवर बसून फ्राईड टायगर प्रॉन्स हा त्यांचा खास पदार्थ खाताना थंडीने काय हालत झाली ती फोटोत दिसते आहेच. तरी बरे की या वेळेस सकाळच्या अनुभवाने शहाणे होऊन एक खास उबदार जॅकेट भाड्याने घेऊन आलो होतो (पण खरी मजा पुढेच आहे)...
आजूबाजूचे सौंदर्य बघत आणि खाण्यात काही वेळ येथे काढणे हा आनंददायक अनुभव तर आहेच. पण उंचीवर जाताना वाढत जाणार्या प्राणवायूच्या कमतरतेची सवय होण्यासाठी हे आवश्यकही आहे. यापुढचा प्रवास बसपेक्षा मोठ्या आणि एका वेळेस १०० प्रवासी वाहून नेणार्या केबिन्स असलेल्या रज्जूमार्गाने होता...
होय, मी त्या केबिनच्या दारातच उभा आहे... एखाद्या इमारतीच्या दारात नाही !
या रज्जूमार्गाने जाताना बाजूचे डोंगर ठेंगणे वाटायला लागतात...
.
.
थिओडूल हिमनदीवरून जाताना रज्जूमार्ग आणि केबिन (जालाच्या सौजन्याने)...
रज्जूमार्ग संपला की एका मानवनिर्मित गुहेतून आपल्याला त्या पर्वतशिखराच्या दुसर्या बाजूला जाऊन खोल दरीत असलेल्या हिमनदीचे दर्शन करता येते. हा भाग मुद्दाम पूर्णपणे नैसर्गिक ठेवला आहे. अर्थात कठडा वगैरे बांधायची तशी सोय नाहीच म्हणा, फक्त एक पिवळी प्लास्टिकची दोरी सांगते की, "मला ओलांडून पुढे गेलात तर तुम्ही आणि तुमचे नशीब"... बस, इतकेच ! गुहेच्या तोंडासमोरच्या छोट्याश्या पठारावर उभे राहून आपण अनेक हिमाच्छादित हिमशिखरांना वाकुल्या दाखवत "मी तुमच्यापेक्षा उंच आहे" असे म्हणू शकतो !...
मोठया उत्साहाने पाचदहा मिनिटे तेथे उघड्यावर उभे राहून फोटो काढण्याची हौस केली तेव्हा कळले नाही... इतकेच काय पण गुहेत परतल्यावरसुद्धा दहा मिनिटे हात एकमेकावर चोळत होतो तेव्हाही आपल्याला हात आहेत हे कळत नव्हते ! एक हात दुसर्याला टेकलेला दिसत होता पण स्पर्श कळत नव्हता. तरी बरं फोटो काढायला फक्त पाचेकच मिनिटे हात उघडे होते ! नंतर गुहेतल्या निर्देशक पाटीवर पाहिले तर गुहेच्या तोंडाचे तापमान होते -२२ अंश सेल्सियस !!!
परतीचा मार्ग तोच होता. परत एकदा आल्प्सचे सौंदर्य नजरेत साठवत झेरमाट् ला परतलो. झ्युरिकच्या गाडीची वेळ होतच आली होती. हॉटेलमधून सामान घेऊन परतीचा रेल्वेप्रवास सुरू केला. तीन दिवसाच्या धावपळीने थकलेल्या शरीराला आता तीन तास तरी आराम मिळणार होता. मधूनच डुलक्या घेत वेगाने मागे जाणारे निसर्गसौंदर्य आणि प्रेक्षणीय शहरे-वस्त्या पाहत पाहत झ्युरिक गाठले...
.
.
.
प्रतिक्रिया
15 Sep 2013 - 2:47 am | खेडूत
छान!!
15 Sep 2013 - 3:10 am | बॅटमॅन
अप्रतिम लेख!!!! स्विट्झर्लंडचे बसल्या बसल्या दर्शन घडविलेत. सर्व फोटो अतिशय देखणे आलेत. पाहता पाहता धणी पुरेना असे एकेक फोटो, व्हिज्युअल ट्रीटच :) पुन्हा (कितीदा काय माहिती) फोटो पाहून समाधान झाले की मग नीट प्रतिक्रिया लिहितो.
15 Sep 2013 - 3:28 am | मोदक
वाह्ह!!!!
15 Sep 2013 - 4:10 am | प्यारे१
अप्रतिम!
सु रे ख!!
15 Sep 2013 - 9:31 am | पैसा
डोळ्याचं पारणं फिटलं. लिखाण नेहमीप्रमाणेच अप्रतिम!
15 Sep 2013 - 9:32 am | अजया
"शुभ्र काही जीवघेणे"!
15 Sep 2013 - 9:44 am | स्पा
चकट फु स्विट्झर्लंड ची सफर घडवून आणलीत कि राव :)
बहुत बढीया
15 Sep 2013 - 10:15 am | प्रचेतस
अतिशय सुरेख आणि देखणे दर्शन घडवलेत स्वित्झर्लंडचे.
15 Sep 2013 - 10:37 am | ज्ञानव
एक उत्सुकता हि कि आपण एकट्याने हा प्रवास आखला होता कि इतर प्रवासी किंवा प्रवासी कंपनीद्वारे गेला होतात?
वर्णन आणि फोटो अति उत्तम.
-२२ म म म मला जमेल का?
15 Sep 2013 - 11:32 am | डॉ सुहास म्हात्रे
खेडूत, बॅटमॅन, मोदक, प्यारे१, पैसा, अजया, स्पा, वल्ली आणि ज्ञानव: सुंदर प्रतिक्रियांसाठी धन्यवाद !
@ ज्ञानवः
जालावरून माहिती काढून आणि मायस्वित्झर्लंड.कॉम वर बुकींग करून प्रवासाचे नियोजन केले होते. बरोबर सहकारी सहप्रवासी होते.
योग्य गरम कपडे असले तर थंडीची इतकी काळजी नाही. हिवाळी खेळांसाठी आणि जेव्हा पर्वतावर जायचे असते तेव्हा असे खास कपडे अत्यंत आवश्यक आहेत. प्रत्येक पर्यटन केंद्र असलेल्या शहरात असे कपडे भाड्याने वापरायला देणारी दुकाने असतात.
15 Sep 2013 - 11:32 am | उदय
तुमची ट्रीप छान झाली, असे एकंदरीत वाटते. माझा अनुभव आणि मत थोडे वेगळे आहे.
15 Sep 2013 - 11:32 am | अग्निकोल्हा
अप्रतिम.
अतिअवांतर :- आवड असेल तर अगाथाख्रिस्ती(च) या वातावरणात आवर्जुन वाचा एकदम मस्त वाटतं.
15 Sep 2013 - 11:33 am | उदय
तुमची ट्रीप छान झाली, असे एकंदरीत वाटते. माझा अनुभव आणि मत थोडे वेगळे आहे.
15 Sep 2013 - 1:07 pm | दादा कोंडके
आपला अनुभव वाचला. माझ्या अनुभवानुसार भारतीय लोकांना स्विसमध्ये जायला बंदी घालावी. पण सर्वातजास्त रिवेन्यु भारतीय लोकांकडूनच मिळतो. :(
17 Sep 2013 - 10:49 pm | खादाड_बोका
स्वःनुभव सारखाच आहे . मी सुद्धा अमेरिकेत राहात असल्यामुळे , मलाही रेसिझम ताबडतोब कळते. युरोप मध्ये खूप आहे …म्हणुन अमेरिका सगळ्यात बेस्ट जागा आहे
15 Sep 2013 - 12:00 pm | दिपक.कुवेत
केलत हो! (तसे तुम्हि नेहमीच करता सुंदर प्रवासवर्णन आणि फोटो दाखवुन). फार हेवा वाटतो हो तुमचा. पण प्रत्येक भागावर एक स्वतंत्र लेख/फोटो असते तर नयनरम्य फोटो बघुन डोळे अधीक सुखावले असते.
15 Sep 2013 - 12:40 pm | स्वाती दिनेश
वर्णन आणि फोटो आवडले,
स्वाती
15 Sep 2013 - 1:00 pm | त्रिवेणी
खर खर सांगु का,
तुमचा खुप हेवा वाटतो तुमची सर्व प्रवास वर्णन वाचून.
15 Sep 2013 - 1:58 pm | पियुशा
सुंदर !
15 Sep 2013 - 3:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
उदय, अग्निकोल्हा, उदय, दादा कोंडके, दिपक्.कुवेत, स्वाती दिनेश,त्रिवेनि आणि पियुशा : अनेक धन्यवाद !
@ दिपक्.कुवेत :
जरा जास्त कालावधिच्या तेथल्या शरद ऋतुतील भेटीचे वर्णन नंतर जरा सवडीने दुसर्या एका लेखमालेत टाकण्याचा विचार आहे.
@ दादा कोंडके :
आपल्या येथेही स्वित्झर्लंडच्या तोडीची किंबहुना जास्त सुंदर ठिकाणे काही कमी नाहीत... स्वित्झर्लंडमध्ये जास्तीतजास्त उंच शिखर ४,६३४ मीटरचे आहे. हिमालयात उत्तरपूर्व व उत्तर्पश्चिमेत ६ ते ८,००० मीटर उंचीची अनेक शिखरे आणि सुंदर ठिकाणे आहेत. मात्र ती पर्यटनविकास, वाहतूक, स्वच्छता, इ बाबतीतला निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष यांची शिकार झालेली आहेत हे आपले दुर्दैव आहे. एखाद्या ठिकाणी जाण्याची बंदी लावा असे शासनाला सांगणे हा उपाय म्हणजे आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी असा होईल ! त्याऐवजी त्याच शासनाला आपली ठिकाणे आपण पर्यट्कांसाठी आकर्षक होतील असे बघा असे सांगायची बुद्धी आपल्याला झाली तर केवळ आपणच नाही तर परदेशी प्रवासीही तेथे रीघ लावतील.
16 Sep 2013 - 10:07 am | दादा कोंडके
बरोबर. स्वित्झर्लंडच काय बहुतेक देशांत अनेक पर्यटनस्थळं बघितले की हा अनुभव येतो. पण त्या ठिकाणाचं व्यवस्थित मार्केटींग केलेलं असतं. चांगली सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, स्वच्छतागृह, फुकट माहितीपत्रके-नकाशे यांच्यामुळे लोकंही तिथं जातात.
हे तिकडच्या शासनाने करायला पाहिजे असं (गमतीने) म्हणालो मी. म्हणजे पुर्वी इंग्रज राजवटीत हॉटेलबाहेर 'इंडियन्स अँड पेट्स/ड्वाग्ज आर नॉट अलाउड' अशा पाट्या असायच्या तसं. :)
मागच्या एक-दोन दशकभरात बॉलिवूडवाल्यांच्या मार्केटींग मुळे आणि हातात खुळखुळणार्या पैश्यामुळे नवश्रिमंतांची स्विसमध्ये गर्दी दिसु लागली आहे. बेडौल शरीराची, चेहर्यावर प्रचंड माज आणि गॉगल लावलेली, कसलाही सिव्हीक सेन्स नसलेली, गोर्या बायकांकडे वखवखलेल्या नजरेनी बघणार्या बाप्यांची आणि 'हम भी कुछ कम नही' असं वाटून जाड पडवळा सारखे दंड आणि स्ट्रेचमार्क पडलेल्या भोपळ्या एव्हड्या मांड्या दाखवणार्या बायका असलेली, एकमेकांच्या नजरा आणि तोंड चुकवत हिंडणारी मंडळी बघितली की आपल्यापैकीच काही संवेदनशील लोकांना किळस येते. :))
वाट बघा. :)
16 Sep 2013 - 2:17 pm | बॅटमॅन
शी!!!!!!!!!!!!!! =)) =)) =))
16 Sep 2013 - 5:20 pm | पैसा
पूर्णा एक्सप्रेसने पुण्याहून गोव्यापर्यंत या, टुरिस्टांची दादागिरी बघा आणि दूधसागर धबधब्याच्या परिसराची टुरिस्टांनी वाट लावलेली बघा तर हे भारतीय टुरिस्ट भारतात तरी कशाला पाहिजेत म्हणाल!
15 Sep 2013 - 8:04 pm | विनोद१८
इ.एक्का.. धन्यवाद...
विनोद१८
15 Sep 2013 - 9:14 pm | पाषाणभेद
आपले आभार आम्हाला फिरवून आणलेत त्याबद्दल.
15 Sep 2013 - 9:34 pm | संजय क्षीरसागर
मनःपूर्वक धन्यवाद!
16 Sep 2013 - 12:31 am | डॉ सुहास म्हात्रे
विनोद१८, पाषाणभेद आणि संजय क्षीरसागर (सपत्निक) : आपल्या सर्वांना सहलीत सहभागी झाल्याबद्दल अनेक धन्यवाद ! तुमच्यासारख्या रसिक सहप्रवाशांमुळेच अश्या सफरींचा आनंद व्दिगुणित होत असतो.
16 Sep 2013 - 1:07 am | एस
मस्त.. ह्या वाक्याला दाद..
16 Sep 2013 - 3:01 am | अभ्या..
लैच भारी एक्कासाहेब.
तुम्ही आम्हाला बसल्या जागी जग फिरवताय :) धन्यवाद
पाटलीणबैंच्या पेपरमधल्या पेड वीणावादनापेक्षा अप्रतिम प्रामाणिक शैलीत तुम्ही जगाची सफर घडविता. ;)
20 Sep 2013 - 11:20 am | अत्रुप्त आत्मा
@अप्रतिम प्रामाणिक शैलीत तुम्ही जगाची सफर घडविता >>> +++१११
16 Sep 2013 - 7:20 am | रेवती
सुरेख!. मस्त सफर! आता स्वित्झर्लंडला जाण्याची गरज उरली नाही. हाच लेख आमच्या इथे बर्फ पडेल तेंव्हा पुन्हा वाचीन. ;)
16 Sep 2013 - 8:43 am | मिसळलेला काव्यप्रेमी
रेवतीतै, असं करु नका, संधी मिळाल्यास जरूर जा.
ग्लेशियर एक्स्प्रेस हा एक सुंदर अनुभव आहे.
16 Sep 2013 - 8:42 am | मिसळलेला काव्यप्रेमी
माझ्या ग्लेशियर एक्स्प्रेसच्या आठवणी जाग्या केल्यात.
तो एक दिवस पूर्ण जगायचा झरमॅटतर फारच सुंदर आहे आणि सेंट मॉरीट्स तर अफ्फाट आहे.
तुम्ही पिझ नायरला नाही गेलात कां?
मस्त फटू, आमचेही फटू जमले तर टाकीन इथे.
16 Sep 2013 - 9:47 am | चौकटराजा
नेहमी प्रमाणेच मस्त लेख व फोटो .माझ्याकडे जालावरून घेतलेले ग्लेशियर एक्सप्रेसचे हिवाळा व उन्हाळा अशा दोन्ही
प्रवासाचे ३० /३० मिनिटांचे व्हिडओ आहेत . आपल्या धाग्याच्या निमितताने तो पुन्हा पहात बसलो व आपल्याला काय मस्त अनुभव आला असेल याचा अंदाज आला. श्री उदय यांच्या ब्लोंग मधे म्हटल्याप्रमाणे माझ्या मेहुण्याला वंश भेदाचा अनुभव स्वीस मधे आला. त्याच्या मते एकंदरीत युरोपचे लोक भारतीय प्रवाशाना अस्पृश्यतेने वागवतात. पण आमचे फिजिशियन यांचा अनुभव वेगळा आहे. असो. आपल्याला आता बर्निना एक्स्प्रेसच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो. इटलीतील Turano ते स्वीस मधील Chur असा तो रम्य प्रवास आहे. मी तो तूर्तास व्हिडिओतून व गुगल अर्थ मधून केला आहे.
आपण तो प्रत्यक्ष करून एक धागा घेउन यालच ! गुड लक !
16 Sep 2013 - 10:19 am | सौंदाळा
मस्तच.
लेख व छायाचित्रे बेहद्द आवडली.
श्री गणेश लेखमालेची जोरदार मेजवानी मिळाली आहे या वर्षीदेखील.
16 Sep 2013 - 1:42 pm | Mrunalini
वाव... खुप छान लेख आणि फोटो सुद्धा!! पुभाप्र
16 Sep 2013 - 1:59 pm | सूड
हाही भाग छानच !!
16 Sep 2013 - 10:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
स्वॅप्स, अभ्या.., रेवती,मिसळलेला काव्यप्रेमी,चौकटराजा, सौंदाळा, Mrunalini आणि सूड : सर्वांसाठी मनःपूर्वक धन्यवाद !
रेवतीतै, असं करु नका, संधी मिळाल्यास जरूर जा.
+१११ग्लेशियर एक्स्प्रेस हा एक सुंदर अनुभव आहे.
@ मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त फटू, आमचेही फटू जमले तर टाकीन इथे.
जरूर टाका. मजा येईल बघायला.17 Sep 2013 - 6:45 am | स्पंदना
मस्त मस्त अन मस्त!
असेच दिलखुलास फिरत रहा हो एक्के राव.
मला तो जवळुन घेतलेला डोंगराचा फोटो फार आवडला.
माहीती, नकाशा, प्रवासाचा वेळ सारे सारे अगदी डीटेलमध्ये दिलेले उल्लेख अतिशय माहीतीपुर्ण.
17 Sep 2013 - 7:51 pm | भ ट क्या खे ड वा ला
अप्रतिम ,भन्नाट ,जबरदस्त
17 Sep 2013 - 8:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
aparna akshay आणि भ ट क्या खे ड वा ला : अनेक धन्यवाद ! असाच लोभ असू द्यावा.
17 Sep 2013 - 9:21 pm | जॅक डनियल्स
फोटो बघून, तिकडे एखाद्या ल्याब मध्ये जॉब शोधायचा प्रयत्न करीन.
नेहमी प्रमाणे खूप सुंदर वर्णन आणि फोटोज.
17 Sep 2013 - 10:54 pm | चित्रगुप्त
बापरे... फोटोतील बर्फ बघूनच हुडहुडी भरली, तर तिथे काय होत असेल...
नेहमीप्रमाणे उत्तम फोटो आणि वर्णन.
18 Sep 2013 - 12:42 am | किलमाऊस्की
निवांत वाचायला ठेवलेला.. घरबसल्या स्विट्झर्लंड दर्शन झालं. :-)
18 Sep 2013 - 1:28 am | sagarparadkar
झेरमॅट चे फोटो पाहून मन ह्या वर्षीच्या जून मधे गेलं ..... आम्ही खुर हून झेरमॅट्ला गेलो होतो. तेथील ड्यु पाँट हे हॉटेल ४०० वर्ष जुने आहे .... तेथे फॉन ड्यु छन मिळाले होते ... जम्ल्यास फोटो टाकीन.
18 Sep 2013 - 9:34 am | वेल्लाभट
स्विस ची मजाच वेगळी आहे यार्र!
18 Sep 2013 - 10:19 am | डॉ सुहास म्हात्रे
जॅक डनियल्स, चित्रगुप्त, हेमांगीके, sagarparadkar आणि वेल्लभट : सहलितील सहभागासाठी धन्यवाद !
@ sagarparadkar@:
तेथे फॉन ड्यु छन मिळाले होते ... जम्ल्यास फोटो टाकीन.
फाँड्यू तर स्वित्झर्लंडची खासियत आणि माझी आवडती डिश आहे ! फोटो जरूर टाका. फाँड्यूचाही फोटो असल्यास जरूर टाका... खाण्याच्या नादात मी फोटो काढायलाच विसरलो :(18 Sep 2013 - 10:20 am | डॉ सुहास म्हात्रे
वरच्या प्रतिसादात "वेल्लभट" ऐवजी कृपया "वेल्लाभट" असे वाचावे.
18 Sep 2013 - 12:41 pm | सुदर्शन काळे
मिपावर प्रथमच प्रतिक्रिया देत आहे. (तसं बरंच लेखन वाचत असतो) पण लिहायचा कंटाळा.
बाकी लेख अगदी फर्मास आहे. घरबसल्या स्वित्झर्लंड दर्शन. उणे २२ बघून कापरं भरलं. अजुन येउ द्या.
18 Sep 2013 - 9:45 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
19 Sep 2013 - 2:41 am | प्रभाकर पेठकर
मस्तं सुरेख छायाचित्रे आणि रसभरीत वर्णन. मजा आली वाचताना.
मी गेलो होतो तेंव्हा माऊंट टिटलीस पाहून पुढच्या प्रवासास निघावे लागले होते. आता तुमच्या ह्या लेखाने हिवाळ्यातील स्विट्झर्लँडची स्वप्न पडायला लागली आहेत.
20 Sep 2013 - 9:46 am | नितिन काळदेवकर
फारच सुंदर.. आता पुढची टूर कोणती आहे?
20 Sep 2013 - 1:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
खादाड_बोका, प्रभाकर पेठकर, नितिन काळदेवकर : सहलितील सहभागासाठी अनेक धन्यवाद !
@ प्रभाकर पेठकर:
डोंगरदर्यातली पांढर्या रंगाची जादू आवडत असेल तर हिवाळ्यातला स्विट्झर्लँड तुम्हाला नक्कीच आवडेल. हिमराणीचे आठ तास तर एका वेगळ्या जगाची सफर करून आणतात.
21 Sep 2013 - 2:51 am | प्रभाकर पेठकर
जरूर. हिमराणीचे आकर्षण तर आहेच त्याच बरोबर...... 'साद देती हिमशिखरे उंच पर्वतांची'
21 Sep 2013 - 10:45 am | डॉ सुहास म्हात्रे
हिमराणीचा सर्व प्रवास स्वित्झर्लंडमधल्या आल्प्सच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आहे, त्यामुळे तुमचा हा हेतूही साध्य होईल. तुमच्या प्रवासासाठी शुभेच्छा !
20 Sep 2013 - 5:46 pm | अनिरुद्ध प
अप्रतिम!!!!!!!!!! पुलेशु.
20 Sep 2013 - 6:08 pm | अनन्न्या
त्यामुळे तुमच्या बरोबर यायला तिकीट मिळेना! मस्त झालीय सहल, फोटो तीनवेळा पाहिलेत पण समाधानच होत नाहीय.
20 Sep 2013 - 6:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
अनिरुद्ध प आणि अनन्न्या : अनेक धन्यवाद !
@ अनन्न्या :
तुमच्या बरोबर यायला तिकीट मिळेना!
नो वरीज (आणि नाचणीज) :) . आमची सहल कंपनी लैच खास आहे... तुमच्या घरातल्या तुमच्या आवडीच्या खुर्चीत आरामात बसून ब्येष्टेष्ट व्ह्यू दिसेल अशी यकदम राजेशाही वेवस्था ही आमची खासियत हाय ;)30 Sep 2013 - 10:39 am | मदनबाण
आहाहा...कधी तरी जायला मिळालेच पाहिजे इथे ! ;)
बाकी स्वित्झर्लंड म्हंटले की यश चोप्रा देखील आठवतात...त्यांनी चित्रीत केलेली काही लोकेस्न्स आणि गाणी इथलीच आहेत तसेच त्यांना स्वीस सरकारकडुन संमानित देखील करण्यात आले आहे.
बाकी स्वीस बर्फ पाहुन मला माझे आवडते गाणे आठवले... चित्रपट "डर"
30 Sep 2013 - 12:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या स्विस् सहलीसाठी शुभेच्छा !
5 Oct 2013 - 1:49 pm | प्रसाद गोडबोले
वाह एक्काराव ,
अप्रतिम प्रवासवर्णन ! फोटो पाहुन डोळ्याचे पारने फिटले :)
लेखातुन मस्त सफर घडवलीत स्विस ची !!
असेच लिहित रहा ... :)
5 Oct 2013 - 4:35 pm | मुक्त विहारि
तुमची प्रवास वर्णने मस्तच असतात..
5 Oct 2013 - 10:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
गिरीजा आणि मुक्त विहारि : अनेक धन्यवाद !
11 Sep 2014 - 5:56 am | वैशाली हसमनीस
फारच सुंदर वर्णन आहे.
13 Sep 2014 - 7:28 pm | किल्लेदार
झकास...
30 Apr 2015 - 4:27 pm | गणेशा
निव्वळ अप्रतिम ... खुप सुंदर सहल वाचनात आली.. मस्त वाटले
23 May 2015 - 9:16 pm | चित्रगुप्त
तुमची भटकंतीची आवड, उत्साह, ऊर्जा, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, चोखंदळपणा, नेमकपणा, लेखनकळा ... सर्वांना कडक सलाम.