सुखकर्ता दुखहर्ता - एक विचार

प्यारे१'s picture
प्यारे१ in विशेष
14 Sep 2013 - 1:09 am
श्रीगणेश लेखमाला २०१३

सर्वप्रथम सर्व मिपाकरांना श्री गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

भारतीय तत्वज्ञानामध्ये भगवद्प्राप्तीच्या अनेक मार्गांपैकी एक प्रमुख मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. ह्या भक्तीमार्गामध्ये श्रवण, कीर्तन, नामस्मरण, वंदन, अर्चन, पादसेवन, दास्य, सख्य नि आत्मनिवेदन अशा नऊ प्रकारच्या भक्ती किंवा मार्ग सांगितले गेले आहेत. ह्या प्रत्येकामध्ये थोडीफार श्रेणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अशा क्रमानं ठरली आहे.
फक्त तांत्रिक कारणामुळं असं होतं कारण देवाविषयी ऐकलं (श्रवण) तर बोलणार (कीर्तन), त्याचं बोलता बोलता नाव (स्मरण) घेणार, त्याचा मोठेपणा समजल्यावर (वंदन) करणार, पूजा करणार (अर्चन), त्याची सेवा करणार (पादसेवन), त्याचं काम करणार (दास्यत्व- हनुमान), त्याचा मित्र बनणार सख्य (अर्जुन), नि शेवटी तो नि मी वेगळा नाही अशा जाणीवेतून आत्मनिवेदन (स्वतःच स्वतःशी निवेदन बोलणं) अर्थात एकच भक्तीमार्ग वापरुन भगवंताची प्राप्ती करुन घेतलेले भक्त आपल्याला दिसतात.

भक्तीमार्गाचा अवलंब करण्याचा एक भाग म्हणून आपण उत्सव देखील साजरे करतो नि ते करताना एकाच मार्गाचा वापर न करता वरीलपैकी अनेक मार्ग वापरले जातात नि ते योग्य देखील आहे.
गणेशोत्सव नि गणेशाची पूजा, अर्चना हा त्यातलाच एक भाग. गणेशोत्सवाचं औचित्य साधून पूजाविधीचा एक भाग असलेल्या आरतीचा थोडा विचार करुयात.

मुळात आरती ह्या शब्दाचा अर्थच आ-रती म्हणजे प्रेम असेपर्यंत म्हणण्याची गोष्ट. बर्याचदा पूजाविधी संपण्याचा 'पिवळा सिग्नल' म्हणजे आरती असा असतो. आरती झाली की प्रसाद! त्यामुळं आरतीकडं फार कमी लक्ष दिलं जाऊन यांत्रिकरित्या संपवण्याची एक गोष्ट असा विषय होऊन बसतो. जेवण 'होतं', मॅच 'कसली भारी संपते' नि पूजा, आरती मात्र 'आटोपली' जाते.

प्रेम नसताना करण्याची यांत्रिक गोष्ट म्हणून आरती होऊ नये म्हणून आरतीच्या शब्दांचा अर्थ लक्षात घेतला तर त्याच आरतीमध्ये प्रेम निर्माण होऊन अधिक तन्मयतेनं आरती होईल.
आरतीचा दुसरा अर्थ आर्तपणं म्हणण्याची गोष्ट. थोडंसं वरचंच विवेचन पण इथं म्हणणारा अधिक व्याकुळपणं, विरहाच्या भावनेनं आर्त होऊन भगवंताकडं पाहत असावा अशी कल्पना.
श्रीगणेशाची 'सुखकर्ता दु:खहर्ता...' ही आरती बहुत करुन म्हटली जाते. समर्थ रामदासस्वामींनी रचलेली ही आरती अतिशय अर्थपूर्ण अशी आहे.

आता गणपतीची आरती संपूर्ण बघू. (बहुतेकांना पाठ असेल)
आरती :
सुखकर्ता दु:खहर्ता, वार्ता विघ्नाची नुरवी, पुरवी प्रेम, कृपा जयाची|
सर्वांगी सुंदर उटी शेंदूराची, कंठी झळके माळ मुक्ताफळांची|
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती, दर्शनमात्रे मनःकामना पूर्ती ||
रत्नखचित फरा तुजगौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुमकेशरा|
हिरेजडीत मुगुट शोभतो बरा, रुणझुणति नुपुरे चरणी घागरिया|
लंबोदर पितांबर फणिवरवंदना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा वाट पाहे सदना, संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना||

गणपती घरी बसवताना नि जोरात आरती म्हणताना तो विघ्नहर्ता आहे म्हणजे काय? मुळात विघ्नं काय असतात? गणपती विघ्नांची वार्ता सुद्धा उरू देत नाही म्हणजे काय? प्रेम पुरवतो म्हणजे कसं पुरवतो? मुक्ताफळ म्हणजे काय? निव्वळ दर्शनानं मनोकामना कशा पूर्ण होतील? संकट कुठलं? निर्वाणी म्हणजे कधी? रक्षावे ? सुरवरवंदन म्हणजे काय? असे बरेचसे प्रश्न उपस्थित होतात, व्हायला हवेत. नि प्रश्नांची काही उकल होते का? अशी उकल होत असेल तर ह्या मंगलमूर्ती गणेशाचा जयजयकार करताना मुळात आपल्यावर काही जबाबदारी आहे का ह्याचा आपण विचार करण्याची गरज आहे.

संतांच्या शब्दांमध्ये सामर्थ्य असतं कारण त्यांना 'अनुभव' असतो. त्यांच्या आतला भाव हा एकत्वाचा असतो. रामदास स्वामी स्वतः रामाचे भक्त मात्र त्यांनी आरती लिहीली ती गणपतीची, शंकराची (रघुकुलतिलक राम दासा अंतरी), मारुतीची आणि बर्‍याच आरत्या रचल्या... तेव्हा स्वतःला भक्त म्हणवणारांनी माझा देव मोठा की तुझा मोठा हा विषय आपोआपच निकालात निघतो.

तो सुखकर्ता दु:खहर्ता कसा ते पाहू.
'विषयजनित सूखे सौख्य होणार नाही' म्हणणारे समर्थ रामदास गणपतीला सुखकर्ता म्हणतात तेव्हा त्यांच्या समोर गणपतीचं 'मूर्तीरुप' होतंच त्याबद्दल अतिशय रसाळ वर्णन आरती मध्ये केलं आहे.
'रत्नखचित फरा तुजगौरीकुमरा.... घागरिया '

मात्र त्याबरोबरच गणपतीचं 'ईश्वररुप'- त्वं कर्तासि, धर्तासि, हर्तासि आणि 'ब्रह्मरुप'- सर्वं खल्विदं ब्रह्मासि देखील रामदासांना अपेक्षित आहे.
मुळात गणपतीचं दर्शन घेताना अथर्वशीर्षाचा विचार देखील डोक्यात असायला हवा. गणपती कसा आहे?
- देहत्रयातीत, कालत्रयातीत, गुणत्रयातीत, अवस्थात्रयातीत.
माणसाची सुखं नि दु:खं मुख्यत्वे ह्याच देह, काल, गुण, अवस्था ह्यांच्याशी निगडीत असतात.
भूत, वर्तमान नि भविष्य ह्या तिन्ही काळांच्या चिंता, काळज्या, कल्पना, मनोराज्ये, आठवणी ह्यांनी व्यापलेलं जीवन सुखमय कसं असेल?

काही विधानं बघू.
तो काळजीत आहे नि सुखी आहे,
त्याला जुन्या आठवणी बोचतात नि तो सुखी आहे,
तो मत्सराने जळतो नि सुखी आहे,
तो चिडचिड करतो आहे नि तो सुखी आहे,
त्याला खूप हर्ष झालाय नि तो सुखी आहे (मनात सातत्यानं चलबिचल असतेच. वारंवार लाटा सुरुच असतात त्या अर्थी. हर्ष थांबला की सुख अनुभवता येतं हा सूक्ष्म विचार आहे)

चुकीची वाटतात ना? खरंय. कारण असं घडणं शक्य नाही. कारण सुखाचा अनुभव मन शांत असल्याशिवाय येत नाही. गणपती ह्या सगळ्याच्या पलिकडं असल्यानं गणेशभक्तांनी देखील आपल्यामध्ये अशा आत्यंतिक शांततेचा अनुभव कसा घेता येईल ह्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (शांत आत असणं अभिप्रेत आहे, निष्क्रीयता नव्हे)
प्रचंड स्पर्धा, द्वेष, चांचल्य आणि अशा अनेक रजोगुणाच्या तर झोप, आळस, क्रूरपणा, अशा तमोगुणाच्या अभिव्यक्ती आहेत. सत्वगुण चांगुलपणा शिकवतो मात्र तोही अति प्रमाणात बरा नव्हे.

ज्याच्या विरोधी शब्द नाही त्याला सुख (आनंद) म्हणतात. नि हे सुख देणारा असा हा गणपती आहे. कारण तो ह्या सगळ्याच्या पलिकडे, त्रयातीत असा आहे. पलिकडं म्हणताना त्या गुणांचं स्वामीत्व त्याच्याकडं आहे असं म्हणणं जास्त उचित ठरतं. ज्याप्रमाणं आपण घोडेस्वारी करताना घोड्याला आपल्या तालावर चालायला पळायला भाग पाडतो तसं आपल्या ह्या अभिव्यक्तींना आपण आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे.
गणपतीच्या भक्तानं असंच होणं अपेक्षित आहे. विभक्त शब्द आपल्याला माहिती आहे. विभक्त म्हणजे वेगळा. त्याउलट भक्त. 'भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे..' असं समर्थच आपल्याला सांगतात.

गणपतीप्रमाणं सगळ्याच्या पलिकडं गेलं की सुख शंभर टक्के आहे. म्हणूनच गणपती सुखकर्ता कारण हे सुख कुणा व्यक्तीवर, कशावर म्हणजे कुठल्या वस्तूवर, नि कुठल्या काळ अथवा परिस्थितीवर अवलंबून नाही. शंभर टक्के सुख म्हणजे दु:ख नाही. म्हणून आपसूकच दु:खहर्ता.
आता पुन्हा अथर्वशीर्षाकडं वळू. 'त्वंसच्चिदानंद अद्वितियोसि.' असा जर गणपती असेल तर गणपती सर्वव्यापी आहे. म्हणजे खरंतर तोच आहे नि सर्वत्र व्यापून आहे. (पुन्हा मूर्तीरुप नव्हे, ब्रह्मरुप) अद्वितियोसि असल्यानं दुसरा नाही, त्यामुळं दुसर्याकडून निर्माण होणारं विघ्न नाही. नि सर्वत्र एकत्वानं असल्यानं तोच तो असल्यानं भांडणाला दुसरा नाहीच. त्यामुळं द्वेष, मत्सर , हेवेदावे नाहीत नि त्यामुळं प्रेममय दृष्टी होऊन जाते. नि त्यामुळंच विघ्नाची वार्ता नुरते नि प्रेम पुरवतो.

खरंतर माणसाला बंधनं असतात ती हीच. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर ह्या षडरिपुंबरोबर 'मी नि माझं' हे सगळ्यात मोठं बंधन माणसाला आहे. गणपतीच्या भक्तानं 'माझे' पणाची नि 'मी' पणाची भावना मनातून काढली तर ही बंधनं सुटतात. नि माणूस मुक्त होतो. मुक्ती मुक्ती म्हणतात ती हीच. नि अशी मुक्ताफळं गणपती आपल्या गळ्यात घालून मिरवतो आहे. गणपतीच्या (पक्षी सगळ्याच देवभक्त म्हणवणारांवर) ही फार मोठी जबाबदारी आहे. मी, माझे पण गळून गेल्यावर मनात कामना उरतील काय? गणपतीच्या मात्र दर्शनानं कामना पूर्ती होते ती अशी.

ह्याबरोबरच गणपतीची वेगवेगळी नावं आरतीत येतात. वक्रतुंडचा अर्थ वाकड्या तोंडाचा बरोबरच 'वक्राय तुंडयति' वाकड्या विचाराला मारणारा असा आहे. फणीवर म्हणजे नाग. फणीवरवंदना म्हणताना सत्ता, संपत्ती, कीर्ती, प्रतिष्ठा, यश हे विषयरुपी सर्प त्याला वंदन करतात, म्हणजे गणपती त्यांच्याहून वरचढ आहे, श्रेष्ठ आहे हा अर्थ लक्षात येतो. त्रिनयन म्हणताना गणपतीचा ज्ञानरुपी तृतीय नेत्र (लाईक फादर लाईक सन) उघडा आहे.
रत्नजडीत मुगुट असतानाही 'कुमकुमकेशर' वैराग्य आहे असं सुचित करतो.

तात्कालिक संकटं अनेक असतात मात्र महासंकट म्हणतात ते मृत्यूचं, निर्वाणाचं संकट गणेशभक्तांना जाणवत नाही कारण पुन्हा गणेश त्रिकालाबाधित नि देहांच्या अतित आहे. मी देहातीत, कालातीत आहे असा अनुभव आल्यावर कसलं भय? पूर्णपणे निर्भय अशी अवस्था प्राप्त होते नि मग कसलं नि कोण कुणाचं रक्षण करणार? त्यामुळं गणेश निर्वाणप्रसंगी 'रक्षितो' ते अशा अर्थानं.

'दास रामाचा वाट पाहे सदना' म्हणताना गणपती माझ्याही घरी यावेत अशी आपली अपेक्षा असावी. मात्र नेता एखाद्या सच्च्या कार्यकर्त्याच्या घरीच जातो तसं गणपती त्याच्या सच्च्या 'भक्ता'कडंच जातो हे लक्षात घेऊन आपण तसं भक्त होण्याच्या दिशेनं वाटचाल करुयात हीच श्री मंगलमूर्ती चरणी प्रार्थना.
|| गणपती बाप्पा मोरया ||

१. हे असं नेमकं का नि कसं होतं त्याबद्दल समर्थांचे नि सर्व संतांचे पाय पकडावे लागतात.
२. ऋणनिर्देश : डॉ. श्री. द. देशमुख ह्यांचे प्रवचन.

प्रतिक्रिया

अग्निकोल्हा's picture

14 Sep 2013 - 1:16 am | अग्निकोल्हा

आता नेहमीचा यशस्वी कलाकार काय प्रतिक्रिया देतोय या प्रतिक्षेत.

कवितानागेश's picture

14 Sep 2013 - 1:23 am | कवितानागेश

छान लिहिलय. फार आवडलं.

मुक्त विहारि's picture

14 Sep 2013 - 7:24 am | मुक्त विहारि

विचार मंथन आवडले..

अर्धवटराव's picture

14 Sep 2013 - 8:58 am | अर्धवटराव

छान झाली आरती गजाभाऊंची.

मूकवाचक's picture

17 Sep 2013 - 10:54 am | मूकवाचक

+१

पैसा's picture

14 Sep 2013 - 10:32 am | पैसा

आरती "आटोपताना" नाहीतर "ओरडताना" एवढा सगळा विचार कोणी करत नाही. पण छान लिहिलंय!

प्रचेतस's picture

14 Sep 2013 - 11:49 am | प्रचेतस

विवेचन आवडले.

सस्नेह's picture

14 Sep 2013 - 7:04 pm | सस्नेह

आरतीचा अर्थ छान दिलात प्यारेभौ.
पण अर्थ माहिती नसतानाही तितकीच गोड लागत होती ती कानाला !

जॅक डनियल्स's picture

14 Sep 2013 - 9:14 pm | जॅक डनियल्स

खूप मस्त, एवढे नीट कोणीच आत्ता पर्यंत समजावून सांगितले नव्हते.

आतिवास's picture

15 Sep 2013 - 7:31 am | आतिवास

विवेचन आवडलं.

स्पा's picture

15 Sep 2013 - 8:14 am | स्पा

वाह प्यारे काका
फर्मास लिहिलंय

सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे आभार.

वर डिस्क्लेमर टाकायचा राहिला तो म्हणजे आरती 'आटोपण्या'बद्दलचं अथवा जोरात म्हणण्याबद्दलचं विधान हे एक सर्वसाधारण विधान (मराठीत जनरल स्टेटमेंट) आहे. ;)
होतं काय की उत्सवांमध्ये अनेकांना आरत्या म्हणण्याचा उत्साह दांडगा असतो. मला किती जास्त आरत्या येतात हे दाखवण्याचा हेतू देखील.
त्यामुळं एकापेक्षा एक भरपूर आरत्या म्हणण्याच्या नादात आवाज टीपेला पोचतो नि त्याचं गांभीर्य, आर्तता निघून जाते.... !

पुन्हा एकदा आभार. :)

प्यारे कसलं भारी मांडतोस रे निरुपण.
मला तर संपूर्णकीर्तनकारी वेषात दिसलास. :)
सुरेख सुरेख अन प्रासादिक :)

अत्रुप्त आत्मा's picture

16 Sep 2013 - 8:06 am | अत्रुप्त आत्मा

+१ :)

सुधीर's picture

16 Sep 2013 - 2:08 pm | सुधीर

विवेचन आवडलं.

अनिरुद्ध प's picture

16 Sep 2013 - 7:03 pm | अनिरुद्ध प

मलासुद्धा आरती= देवाला आर्ततेने मारलेली हाक्/साद एवडाच माहिती होता,पण आपल्या विवेचनाने तो पटला.

रेवती's picture

16 Sep 2013 - 7:05 pm | रेवती

लेखन आवडले.

स्पंदना's picture

17 Sep 2013 - 6:50 am | स्पंदना

मला आरत्या आवडतात त्या त्यातल्या शब्द लालित्याने...पंचानन मनमोहन सुंदर मदनारी..किंवा रत्नखचीतफरा तुज गौरी कुमरा..त्रीभुवनी भुवनी पहाता
पण इतका सुंदर विचार, अशी विचारांची मांडणी..वा..येथुन पुढे एकच आरती मनापासुन आर्ततेने म्हणेन.

प्यारे१'s picture

18 Sep 2013 - 2:59 am | प्यारे१

>>>येथुन पुढे एकच आरती मनापासुन आर्ततेने म्हणेन.

कुणाची आरती म्हणायची हे ज्यानं त्यानं ठरवावं. प्रत्येक आरती मध्ये असलेल्या शब्दांकडं लक्ष दिलं की आपलं आपल्याला कळतं की सगळ्या 'नद्या' एकाच 'सागरा'ला जाऊन मिळणार आहेत. वाद असला तर असतो तो आपल्या समजुतीमध्ये.
बाकी उपासनामार्गातली विविधता हे तर 'आपलं' वैशिष्ट्य आहे. उपासनापद्धती वेगवेगळ्या, उपास्य देवता वेगवेगळ्या असल्या तरी कोणतीही आडकाठी नाही, उलट ते भूषणच आहे. त्यामागची भूमिका एकच आहे हे लक्षात घेतलं की काम भागतं.

सुरवरवंदन गणेश अन सुरवरईश्वरवरदा माता जगदंबा तशा 'एकाच माळे'चे मणी आहेत.
संकटी पावणारा गणेश नि हारी पडलो आता संकट निवारी वाली माता वेगळे 'रिझल्ट्स' देत नाही.
दर्शनमात्रे मनकामना पूर्ती करणारा मंगलमूर्ती गणेश नि प्रसन्नवदने प्रसन्न होसी वाली अंबा एकच असते.

चारी (वेद) श्रमले परंतु न बोलवे काही नि साही (शास्त्रे) विवाद करता जिची महती पूर्ण सांगू शकत नाहीत तेच इकडे 'नेति नेति शब्द न ये अनुमाना' (हे नाही हे नाही असं सांगून सांगून दमतात) असं दत्त गुरुंच्या आरतीत म्हणतात.
दत्त म्हणजे दिलेला. कुणी दिलेला?
अत्रेय ऋषींनी नि अनसूयेनं दिलेला.
अत्री कोण? जे तीन च्या पलिकडं आहेत ते.
तीन काय? परत तेच. स त्त्व, रज, तम हे गुण, स्थूल, सूक्ष्म, कारण देह.
भूत वर्तमान भविष्य हे काल असं सगळं.
नि अनसूया म्हणजे जी अजिबात असूया करत नाही ती.

पुराणातल्या वानग्या पुराणात ठेवून आपल्या कल्याणाचा अर्थ लावायला काय हरकत आहे?

जाताजाता: गणपती आज जात आहेत, लवकरच घटस्थापना होईल. महिषासुरमर्दिनी मधला महिषासुर कुणीही असला तरी त्यातला महिष म्हणजे रेडा नि रेडा हे अत्यंत आळसाचं, मठ्ठपणाचं, अज्ञानाचं प्रतिक आहे. आपल्यामध्ये असा महिष थोडा जरी असला तरी त्याला 'मारुन' सीमोल्लंघन करण्याचा प्रयत्न केला तर विजयादशमी साजरी होईल.

:)

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!

स्पंदना's picture

18 Sep 2013 - 7:34 am | स्पंदना

हा ही एक धागा होउ शकतो प्यारे१.

प्यारे१'s picture

18 Sep 2013 - 7:32 pm | प्यारे१

हम्म.
आत्ताच नको. तुम्ही बोअर व्हाल! :)

प्रकाश घाटपांडे's picture

18 Sep 2013 - 7:39 pm | प्रकाश घाटपांडे

'नेति नेति शब्द न ये अनुमाना' (हे नाही हे नाही असं सांगून सांगून दमतात) असं दत्त गुरुंच्या आरतीत म्हणतात.

मी आतापर्यंत नेति नेति शब्द न ये हनुमाना असे ऐकत होतो. अर्थाकडे कधी कुणाच लक्षच गेल नाही. लक्षात राहायच ते गेयते मुळे शब्दांमुळे

अनिरुद्ध प's picture

20 Sep 2013 - 6:25 pm | अनिरुद्ध प

परन्तु माझ्या आत्तापर्यन्त्च्या वाचनानुसार,"नेति नेति शब्द न ये अनुमाना' म्हणजे आम्हाला माहीत नाही किवा आम्ही याचे वर्णन करण्यास असमर्थ आहोत असे वेद म्हणतात असा आहे.

प्यारे१'s picture

20 Sep 2013 - 7:35 pm | प्यारे१

हो. तुमचं बरोबर आहे.
थोडक्यात लिहीण्याच्या नादात 'चारी श्रमले परंतु न बोलवे' काही बद्दल लिहीलं गेलेलं मिक्स झालं.
'नंतर' सविस्तर लिहीण्याचा प्रयत्न करेन.

(पर्सनल : तुम्ही अनिरुद्ध पंडीत धोम कॉलनी वाई?)

वेल्लाभट's picture

18 Sep 2013 - 9:25 am | वेल्लाभट

उत्तम विवेचन! आवडलं बुवा!

प्रकाश घाटपांडे's picture

18 Sep 2013 - 10:22 am | प्रकाश घाटपांडे

आरती झाल्यावर घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन रुप तुझे..... चालू झाल्यावर लोक प्रत्यक्ष लोटांगण घालण्याऐवजी स्वतःभोवती गोल गोल फिरतात. मी असा तर्क केला की हे एक सामूहिक कर्मकांड आहे. तेव्हा जर सगळ्यानी लोटांगण घालायचे ठरवले तर जागा पुरणार नाही त्यामुळे कुणातरी सूज्ञ भाविकाने लोटांगण घालण्याऐवजी स्वत;भोवती गोल गोल फिरण्याची आयडिया काढली असावी. आणी एकदा ती प्रॅक्टीसमधे आली की तिचा पायंडा पडतो. नाहीतरी बरीच शी कर्मकांड ही गतानुगतिकतेतुनच संक्रमित होतात.
तुम्हाला काय वाटतं?

साहेब त्याला प्रदक्षीणा असे म्हणतात्,आणि ती स्वताभोवतीच करतात (फक्त घरगुती गणेशोत्सवात ?) बाकी जाणकार माहीती देतिलच कारण मी माझ्या कुवती प्रमाणे (अल्प ज्ञानाने) दिलेली माहिती आहे.

प्यारे१'s picture

18 Sep 2013 - 2:24 pm | प्यारे१

मलाही तसंच वाटतंय.
लहानपणी हा प्रश्न होता.
स्वतः भोवती गिरकी घेण्यानं आतल्या 'आत्मदेवा'ला प्रदक्षिणा घातली जाते. आठवण राहिली तर! :)

इनिगोय's picture

19 Sep 2013 - 12:18 am | इनिगोय

लेख आणि प्रतिसादही आवडले. यापुढे आरती म्हणताना प्रत्येक शब्दाकडे नीट लक्ष जाईल.

असाच एक लेख घटस्थापनेच्या निमित्ताने जरूर लिहावा, अपर्णाला अनुमोदन..

सुधीर काळे's picture

21 Sep 2013 - 7:44 am | सुधीर काळे

एक बारीकशी शंका.....दुखहर्ता कीं दु:खहर्ता?

अनिरुद्ध प's picture

23 Sep 2013 - 11:32 am | अनिरुद्ध प

mate दु:खहर्ता hech yogya waaTate.

प्यारे१'s picture

23 Sep 2013 - 10:59 pm | प्यारे१

+1 .

Geyata, yamak yansathi aapan 'Dukkhaharta' aivaji 'Dukhaharta' mhanato!

एकनाथ जाधव's picture

23 Sep 2013 - 12:27 pm | एकनाथ जाधव

sahamat

प्रसाद गोडबोले's picture

23 Sep 2013 - 12:57 pm | प्रसाद गोडबोले

Very nice article !!

( Due to some technical issues , unable to type in maraThi . )