"अन्न हे पूर्णब्रम्ह" ह्या सदरास एक वर्ष पुर्ण झाल्याबद्दल सर्व मिपाकरांचे व "अन्न हे.." मधील सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.
ह्या दिना निमित्त मी शाकाहारी थाळी तयार केली आहे. ताटात सगळ्यात वरती आहे मिठ. त्याच्या बाजुला लिंबु, कैरीचे झटपट लोणचे व टोमॅटोची कोशिंबीर. त्याच्या बाजुला घडीची पोळी. पोळीला लागुन शिरा, बटाट्याची सुकी भाजी. वाटीत मोड आलेल्या मुगाची उसळ. मधल्या भागात मसाले भात. त्याच्या वरती कांदा भजी, पालक वडी आणि तांदुळाच्या पापड्या.
आता आपण प्रत्येकाची पाकॄ बघु.
कैरीचे झटपट लोणचे:
साहित्यः
कैरी - १ वाटी बारीक चिरुन
गुळ - १ चमचा बारीक चिरुन
लाल तिखट - १ चमचा
हळद - १/२ चमचा
मोहरी - १/२ चमचा
हिंग - १ चिमटी
मिठ - चवीनुसार
तेल फोडणीसाठी
कृती:
कैरी बारीक चिरुन एका बाउल मधे काढुन घ्या. हि कैरी तोतापुरी आंब्याची असेल तर जास्त छान लागते. मला इथे तोतापुरी मिळाली नाही, त्यामुळे मी ब्राझीलीयन कैरी वापरली आहे. ;)
आता फोडणीसाठी २-३ चमचे तेल गरम करुन घ्या. त्यात मोहरी टाकावी. मोहरी थोडी तडतडली कि त्यात हळद, लाल तिखट व हिंग टाकुन परतुन घ्यावे. हि फोडणी लगेच कैरीवर ओतावी. त्यातच चवीनुसार मिठ व बारीक चिरलेला गुळ टाकुन निट मिक्स करुन घ्यावे. कैरीचे झटपट लोणचे तयार आहे.
टिपः
तुम्ही आवडत असल्यास त्यात लोणच्याचा तयार मसाला जो बाजारात मिळतो, तो टाकला तरी चालेल.
गुळ एकदम बारीक चिरुन किंवा किसुन घ्यावा, त्यामुळे तो निट मिक्स होतो.
हे लोणचे वरण्-भाता सोबत सुद्धा एकदम मस्त लागते. नक्की करुन बघा.
टोमॅटो कोशिंबीरः
साहित्यः
टोमॅटो - २ बारीक चिरुन
दही - १/२ वाटी
लाल तिखट - १ चमचा
मोहरी - १/२ चमचा
साखर - १/२ चमचा
तुप - १ चमचा
कोथिंबीर सजावटी साठी
मिठ चवीनुसार
कृती:
टोमॅटो बारीक चिरुन बाउल मधे घ्यावे. त्यात दही, लाल तिखट, मिठ व साखर मिक्स करावी. आता फोडणीसाठी १ चमचा तुप गरम करावे. त्यात मोहरी टाकावी. मोहरी तडतडली कि हि फोडणी टोमॅटो वर ओतावी. वरुन कोथिंबीर टाकुन सजवावे.
टोमॅटो कोशिंबीर खायला तयार आहे.
घडीच्या पोळ्या:
साहित्यः
गव्हाचे पीठ - १ वाटी
तेल - २ चमचे
मिठ - १/२ चमचा
पाणी पीठ मळण्यासाठी लागेल तेवढे
कृती:
गव्हाच्या पीठात तेल व मीठ टाकुन निट मिक्स करावे. त्यात थोडे-थोडे पाणी वापरुन कणिक मळुन घ्यावी. हि कणिक १/२ तास झाकुन ठेवावी.
१/२ तासानंतर कणिक परत एकदा थोडा तेलाचा हात लावुन निट मळुन घ्यावी.
कणकेचा एक छोटा गोळा घ्यावा. त्यास थोडी पिठी लावुन छोटी पुरी लाटुन घ्यावी. त्यात वरतुन परत तेल लावुन थोडे पिठ भुरभुरावे. त्याचा अर्धचंद्र होइल, अशा प्रकारे घडी घालावी. त्या घडीवर परत थोडे तेल व पिठ लावुन, त्रिकोणी आकाराची घडी घालावी. आता ह्या घडीस थोडे पिठ लावुन हलक्या हाताने पोळी लाटुन घ्यावी.
तव्यावर दोन्ही बाजुने पोळी शेकुन घ्यावी. आपल्या आवडीप्रमाणे त्यास वरतुन तेल किंवा तुप लावुन घ्यावे. गरमा-गरम घडीची पोळी तयार आहे.
शिरा:
साहित्यः
रवा - १/२ वाटी
साखर - १/४ वाटी (आवडी प्रमाणे कमी-जास्त करु शकता)
दुध - १ ते दिड वाटी
तुप - २ चमचे
बदाम्-काजु-मणुका - १ चमचा
विलायची पावडार - १/४ चमचा
केशर - १ चिमटी
कृती:
रवा तुपा वर निट परतुन घ्यावा. एका पातेल्यात दुध गरम करुन घ्यावे. त्याच दुधात साखर, वेलची पावडर व केशर एकत्र करुन घ्यावे. रवा निट परतल्यावर त्यात हे गरम केलेले दुध एकत्र करावे. हे गरम दुध टाकताना काळजी घ्यावी. दुध वरती उडुन भाजण्याची शक्यता असते.
सर्व निट मिक्स झाल्यावर त्यात वरतुन ड्रायफ्रुट्स टाकुन झाकण ठेवुन ३-४ मिनिटे शिजवुन घ्यावे. गोड शिरा खायला तयार आहे.
मी मोद्क्याच्या साच्यामधे हा शिरा भरुन त्याला मोदकाचा आकार दिला आहे.
बटाट्याची सुकी भाजी:
साहित्यः
बटाटे - २ उकडुन त्याच्या मोठ्या फोडी करुन घ्याव्यात.
कांदा - १/२ बारीक चिरुन
हिरवी मिरची - २ बारीक चिरुन
मोहरी - १/२ चमचा
हळद - १/२ चमचा
कडिपत्ता - ३-४ पाने
हिंग
कोथिंबीर सजावटीसाठी
मिठ चवीनुसार
तेल फोडणीसाठी
कृती:
कढईत तेल गरम करुन घ्यावे. त्यात मोहरी, हिंग, हळद व कडिपत्ता टाकुन १ मिनिट परतुन घ्यावे. त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची व कांदा परतुन घ्यावा. कांदा थोडा परतल्यावर त्यात बटाट्याच्या फोडी व चवीनुसार मिठ टाकुन निट मिक्स करावे. त्यावर ४-५ मिनिटे झाकण ठेवुन, गॅस बंद करावा. वरतुन कोथिंबीरने सजवुन, बटाट्याची भाजी खायला तयार आहे.
तुम्ही आवडत असल्यास त्यात थोडे लिंबु पिळु शकता किंवा ओले खोबरे टाकु शकता.
हिरव्या मुगाची उसळ
साहित्यः
हिरवे मुग - १/२वाटी
कांदा - २ चमचे बारीक चिरुन
टोमॅटो - ३ चमचे बारीक चिरुन
ओले खोबरे - १ चमचा
हिंग - १ चिमटी
मोहरी - १/२ चमचा
हळद - १/२ चमचा
लाल तिखट - १ चमचा
गोडा मसाला - १ चमचा
कडिपत्ता - २-३ पाने
मिठ चवीनुसार
कोथिंबीर सजावटीसाठी
तेल फोडणीसाठी
कृती:
कढईत तेल गरम करुन मोहरी, हिंग, हळद व कडिपत्ता टाकुन १ मिनिट परतावे. त्यात कांदा व टोमॅटो टाकुन २ मिनिट परतुन घ्यावे. त्यात लाल तिखट व गोडा मसाला टाकुन परतावे. त्यात मोड आलेले मुग, ओले खोबरे व चवीनुसार मिठ टाकुन निट मिक्स करावे. ह्यात १/२ वाटी पाणी टाकुन, झाकण ठेवुन ५ मिनिटे मुग शिजु द्यावे. ५ मिनिटांनी मुग शिजले असल्यास गॅस बंद करावा. वरुन कोथिंबीरने सजवुन, मुगाची उसळ खायला तयार आहे.
मसाले भात:
साहित्यः
बासमती तांदुळ - १/२ वाटी
मटार - ४ चमचे
तोंडली - १ चमचा
टोमॅटो - २ चमचे (थोड्या मोठ्या फोडी कराव्यात)
कडिपत्ता - ३-४ पाने
हळद - १/२ चमचा
लाल तिखट - १ चमचा
धणे-जिरे पावडर - १ चमचा
गरम मसाला - १/२ चमचा
गोडा मसाला - १ चमचा
मिठ चवीनुसार
तुप - २ चमचे
कोथिंबीर व ओले खोबरे सजावटीसाठी
कृती:
तांदुळ निट धुवुन १५-२० मिनिटे भिजवुन घ्यावेत. कढईत तुप गरम करुन त्यात हळद, कडिपत्ता, टोमॅटो, तोंडली व मटार निट परतुन घ्यावे. त्यात लाल तिखट, धणे-जिरे पावडर, गरम मसाला व गोडा मसाला टाकुन तेल सुटे पर्यंत परतावे. त्यात भिजवलेले तांदुळ टाकुन परत १-२ मिनिटे परतावे. त्यात १ ते दिड वाटी गरम पाणी ओतावे. त्यात चवीप्रमाणे मिठ टाकावे. झाकण ठेवुन पहिले २ मिनिटे मोठ्या आचेवर व नंतर ५-१० मिनिटे मंद आचेवर भात शिजु द्यावा. भात शिजल्यावर वरुन कोथिंबीर व ओले खोबरे पेरुन मसालेभात serve करावा.
कांदा भजी:
साहित्यः
कांदे - २ लांब चिरुन
हिरव्या मिरच्या - १ बारीक चिरुन
बेसन - १/२ - १ वाटी
तांदुळाचे पीठ - २ चमचे
ओवा - १/२ चमचा
हळद - १/२ चमचा
लाल तिखट - १ चमचा
कोथिंबीर - १ चमचा बारीक चिरुन
तेल तळण्यासाठी
मिठ चवीनुसार
कृती:
कांदा लांब चिरुन घ्यावा. त्यात हिरव्या मिरच्या, ओवा, लालतिखट, हळद, कोथिंबीर व चवीनुसार मिठ टाकुन मिक्स करावे. आता त्यात बेसन व तांदुळाचे पीठ टाकुन निट एकत्र करावे व १०-१५ मिनिटांसाठी झाकुन ठेवावे. १०-१५ मिनिटांनी कांद्याचे पाणी सुटलेले असेल, त्यामुळे वरुन पाणी टाकावे लागणार नाही. पाणी जास्त सुटले नसल्यास थोडे पाणी टाकु शकता.
कढईत तेल गरम करुन घ्यावे. तेल गरम झाल्यावर त्यातले १/२ चमचा गरम तेल भज्याच्या पिठात टाकुन मिक्स करावे. ह्यामुळे भजी हलकी व crispy होते. आता गरम तेलात भज्या सोडुन २-३ मिनिटे निट तळुन घ्याव्यात. कांदा भजी खायला तयार आहे.
पालक वडी:
पालक वडीची पाकृ तुम्हाला येथे मिळेल.
प्रतिक्रिया
7 Sep 2013 - 4:03 pm | संजय क्षीरसागर
ताटाच्या दर्शनानंच तृप्त झालो!
7 Sep 2013 - 4:15 pm | मुक्त विहारि
झक्कास..
7 Sep 2013 - 4:28 pm | पैसा
आलेच जेवायला!
7 Sep 2013 - 4:32 pm | रमेश आठवले
याच्या आधी थाळीचे दोन प्रकार मिपा वर नुकतेच आले. दोन्ही मासांहारी. १. कोकणी व २. गोवन .
दोन्हींची वाचक संख्या आजमितीस अनुक्रमे ३८२५ व ३९५६ अशी आहे . आता मृणालिनी ताईंनी शाकाहारी थाळी दिली आहे. आणखीही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील लोकांच्या आवडीचे असे थाळ्याचे प्रकार येतील अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.
7 Sep 2013 - 4:40 pm | अत्रुप्त आत्मा
@आणखीही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील लोकांच्या आवडीचे असे थाळ्याचे प्रकार येतील अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही>>> +++++++११११११११११ विदर्भ/मराठवाडा/खान्देश ! :)
7 Sep 2013 - 8:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१११
थाळीचे चित्र बघूनच तोंपंसु.
7 Sep 2013 - 4:34 pm | अनिरुद्ध प
फोटो पाहुन भूक चाळवली.
7 Sep 2013 - 5:00 pm | रुमानी
आता तर खरा सीझन आहे ह्या थाळ्याचा... गणपति , महालक्ष्मी, आलेत की.. :)
आणि गुरुजीचा सुद्धा ... :) काय हो @ अ. आ. बरोबर ना !
7 Sep 2013 - 9:24 pm | अत्रुप्त आत्मा
आणि गुरुजीचा सुद्ध ... Smile काय हो @ अ. आ. बरोबर ना! >>> चूक! :D आमचा १ सीझन झाला सुद्धा! ओळखा पाहू कोणता? :)
7 Sep 2013 - 5:02 pm | प्रभाकर पेठकर
आली....आली....अखेर शाकाहारी थाळी 'अन्न...'वर. अवतरली धन्यवाद.
छायाचित्र अगदी आकर्षक आणि निमंत्रण देणारे आहे.
हिरव्या मुगांची उसळ करून पाहायला हवी. आमचा मसाले भात बाकी जSSSरा वेगळा असतो. असो. प्रत्येकाच्या पाककृती आणि हाताची चव वेगवेगळी असतेच.
7 Sep 2013 - 5:06 pm | प्रचेतस
झकास
7 Sep 2013 - 6:41 pm | आतिवास
थाळी पाहून भूक जागी झाली :-)
7 Sep 2013 - 8:20 pm | सानिकास्वप्निल
आली गो बाय थाळी एकदाची :)
शाकाहारी थाळीतले सर्वचं पदार्थ मस्स्स्त्त्तचं
कैरीचे झटपट लोणचे खास आवडले नक्की बनवणार :)
7 Sep 2013 - 8:40 pm | अर्धवटराव
पूर्णब्रह्माचा हा सात्वीक अविष्कार काय भन्नाट आहे.
मजा आ गया.
7 Sep 2013 - 9:06 pm | प्यारे१
असे जेवूनि मिपाकर तृप्त झाले....
बघूनच प्रसन्न वाटतंय.
जुन्या वाड्यात मध्यभागी रामाचं छोटं देऊळ असावं, शेजारी चार दोन चाकरमानी (शिक्षक, पोस्टमन, मुद्रणालयात अमुक तमुक) कुटुंबं असावीत नि त्यातल्या एका घरात दुपारी जेवायला बोलावलेलं असावं.
मागे परसात जाऊन हात पाय धुवून यावं नि मोठ्ठ्या लाकडी पाटावर बसावं. समोर असं ताट यावं, एवढंस्सं काय वाढलंय असा 'कुणबी' विचार मनात येईस्तोवर हळू हळू एक एक पदार्थ थोडा थोडा करत ताटात यावा नि गप्पा मारत मारत कधी पोट भरुन तृप्तीचा ढेकर यावा हे समजायचं नाही..... आहाहा!
7 Sep 2013 - 9:49 pm | भाते
श्रावण महिना सुरु झाल्यावर दोन मांसाहारी थाळ्या आल्यापासुन एका शाकाहारी थाळीची वाट पहात होतो. श्रावण महिना संपताना आणि गणपती बाप्पाच्या आगमनापुर्वी हि अशी भरलेली शाकाहारी थाळी बघुनच मन तृप्त झाले. यात फक्त उकडीचा मोदक ठेऊन गणपती बाप्पा समोर नैवेद्य ठेवायला हरकत नाही.
__/\__ साष्टांग दंडवत मृणालिनी ताई.
पेठकर काका, तुमच्या आज्ञेनुसार श्रावण महिना मोडायची हिंमत झाली नाही हो. गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर तिकडे (तुमच्या थाळीकडे) मोर्चा वळवणारच आहे.
8 Sep 2013 - 2:35 am | प्रभाकर पेठकर
जरूर. शुभेच्छा... आणि रिपोर्ट कळवा.
8 Sep 2013 - 1:58 am | अभ्या..
मस्त. एक नम्बर थाळी.
त्यातल्या त्यात शाकाहारी असल्याने तर लैच भारी.
धन्यवाद मृणालिनी. :)
8 Sep 2013 - 1:09 pm | दिपक.कुवेत
सुंदर दिसत आहे. बघुनच तॄप्त झालोय आणि समाधानाची ढेकर दिली आहे. पण पंचामॄत कुठे आहे? मसालेभाताबरोबर जाम आवडतं.
8 Sep 2013 - 3:13 pm | त्रिवेणी
तोपासु थाळी
8 Sep 2013 - 4:36 pm | Mrunalini
थाळी आवडल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद!!! :)
9 Sep 2013 - 5:20 pm | अनन्न्या
मस्त आहेत सगळेच पदार्थ!
9 Sep 2013 - 10:46 pm | अत्रन्गि पाउस
मग हे सगळे पुन्हा कसे खाणार???
आय बि येन ठोकमत वर असतो तर म्हणालो असतो...
पुन्ना एकदा एक थाळी आली आहे आणि पुन्ना एकदा खाण्याचा आग्रह होतोय..
आपल्या प्रेक्षकांना सांगा कि हा नक्की काय आहे ...
मृणालिनी ताई आपल्याला पुन्ना एकदा हा प्रश्न...
हा हा हा !!!
12 Sep 2013 - 12:47 pm | निवेदिता-ताई
अतिशय सुंदर
12 Sep 2013 - 12:53 pm | अमोल केळकर
१ नंबर :)
अमोल केळकर
12 Sep 2013 - 1:50 pm | सस्नेह
अशी निगुतीने बनवलेली थाळी अन गणपती बाप्पा घरी आलेले..
चला जेवायला !
12 Sep 2013 - 5:42 pm | रेवती
वाह! छान हां मृ! माझ्या शेजारी रहायला येण्याचा विचार करावास असे पुन्हा सुचवते. (एकदा अनाहितामध्ये सुचवले आहेच! ;) )
12 Sep 2013 - 9:23 pm | Mrunalini
हि हि हि... नक्की विचार करते. ;)
13 Sep 2013 - 7:38 pm | पिंगू
एक नंबर.. कित्ती दिवस ह्या थाळीची वाट बघत होतो..
21 Sep 2013 - 2:43 am | प्रसाद गोडबोले
ही थाळी सुरेख आहेच !
( पण आपली शाकाहारी थाळी अशी असते केळीच्यापानावर...
वरणभात + पळीभर तुप + तुळशीचे पान (मस्टच )
लोणचे
कांदा टामाटु काकडीची कोशिंबीर
ओल्या खोबर्याची चटणी
लिंबु मीठ
कुरवड्या
बटाट्याचे पापड
भजी
बटाट्याची भाजी
मसाले भात
कटाची आमटी
साखरभात
पुरणपोळी + पळीभर तुप
दहीभात
मठ्ठा
आणि जेवण झाल्यावर मस्त भावेंची बडीशेप सुपारी घालुन बनवलेले घरगुती पान !!
अहाहा क्या बात है !! पुढच्यावेळी फोटो सकट टाकेन )
30 Sep 2013 - 9:00 am | मदनबाण
आहाहा... सकाळी ९ वाजताच ही थाळी पाहत आहे,आता पुढचा दिवस थाळी थाळी करतच काढावा लागेल. :)
(उंदीयो प्रेमी) ;)
1 Oct 2013 - 6:28 am | स्पंदना
हे तर खरं अन्न! चार दिवस पक्वान्न अथवा मांसाहार झोडला की एक दिवस नुसता मुगाच्या खिचडीचा बेत असावा तसा!
12 Jul 2014 - 3:21 pm | संजय कथले
छान, वजन कमी करायला मदत होईल या थाळी मुळे..
23 Aug 2014 - 1:25 am | निवेदिता-ताई
खूप छान
13 Nov 2014 - 11:59 pm | निवेदिता-ताई
झकास
17 Sep 2014 - 7:01 pm | नयना डोन्गरे
खुप छान
1 Jan 2015 - 12:11 pm | योगेश पाडेकर
वा!!!
3 May 2015 - 6:26 pm | विवेकपटाईत
थाली आवडली, कैरीचे लोणचे विशेष
14 May 2015 - 12:39 pm | अनुप७१८१
उत्तम ! तोण्डाला पाणी सुटले !
14 May 2015 - 2:23 pm | Mrunalini
सगळ्यांचे आभार, :)