गोव्यावर सुरू असलेल्या चर्चेत भाषा आणि बोली यांवर थोडी चर्चा घडल्याचे दिसते. त्यात एखादी बोली ही अमूक एका भाषेची पोटभाषा आहे किंवा स्वतंत्र आहे, तो विषय भाषाशात्रींवर सोडावा, असे प्रतिपादन केलेले दिसते. त्यावर अजून काही प्रतिसाद देणे म्हणजे मूळ चर्चेत खूपच अवांतर झाले असते म्हणून हा वेगळा धागा सुरू करीत आहे.
http://www.misalpav.com/node/23765
एक भाषा दुसरीपासून संपूर्ण वेगळी आहे का, कुठल्या जातकुळीत येते हे कळणे कर्मकठीण आहे. ते आपण भाषाशास्त्रींवर सोडूयात.
जसे विज्ञानाच्या नियमांची उकल वैज्ञानिकांवर वा गणितीय प्रमेयांची उकल गणितज्ञांवर सोडा असे म्हणता येते, तसे भाषेबाबत होत नाही. आणि तसे होऊ शकत नाही कारण भाषाशास्त्र हे समाजशास्त्राचाच एक भाग आहे.
कसे ते पाहू.
भारतीय भाषांबाबतीत शात्रीय पद्धतीचे सर्वेक्षण सर्वप्रथम ब्रिटिश अमदानीत ग्रियर्सन यांच्या देखरेखीखाली झाले. त्याचे त्यांनी ११ खंड प्रकाशित केले. पैकी सातव्या खंडात मराठीविषयी विवेचन केले आहे. मराठीविषयी ग्रियर्सन अनेक निरीक्षणे नोंदवितात. त्यापैकी ३ आपण पाहू.
१) कोंकणी ही मराठीचीच एक बोली आहे.
२) खानदेशी (ग्रियर्सन ज्याला खानदेशी म्हणतात ती अहिराणी असावी) ही गुजरातीची बोली आहे.
३. कोंकणी आणि हळबी (आजच्या छतीसगडच्या बस्तर विभागात बोलली जाणारी) वगळता, मराठीच्या इतर सर्व बोलींत विलक्षण सारखेपणा आहे.
आता पहिल्या दोन निरीक्षणाबाबत आजची काय परिस्थिती आहे?
राजकीय - आज कोंकणी ही स्वतंत्र भाषा म्हणून साहित्य अकाडमीनेच नव्हे तर, भारतीय घटनेनेदेखिल मान्य केलेले आहे. तर, खानदेशी अशी कुठलीच भाषा घटनेने मान्य केलेली नाही. इतकेच नव्हे तर, भाषावार प्रांतरचनेच्या वेळी, खानदेशाचा समावेश महाराष्ट्रात केला गेला.
सामाजिक - कोंकणी भाषी समाज विभागलेला आहे. काही जण कोंकणीचे भाषा म्हणून स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानतात. तर काही तिला मराठीचीच बोली मानतात. मात्र दोघेही घरी-दारी एकच भाषा (कोंकणी) बोलतात. याउलट, खानदेशी मंडळी घरी-दारी खानदेशी (अहिराणी) बोलत असली तरी आपण व्यापक मराठी समाजाचाच एक हिस्सा आहे असे मानतात. गुजराती समाजाचा नव्हे.
म्ह॑णजे पहिल्या दोन्ही निरीक्षणात, आजची परिस्थिती ग्रियर्सनने म्हटल्यापेक्षा पूर्णपणे उलटी आहे.
याचा अर्थ ग्रियर्सन चूक होता? नक्की सांगता येणार नाही. कदाचित भाषाशास्त्रीय दृष्टीकोनातून त्याची निरीक्षणे बरोबर असतीलही (शिवाय ग्रियर्सननंतरही गोदावरीतून बरेच पाणी वाहून गेले आहे!) परंतु शेवटी महत्त्वाचे ठरते ते ती भाषा बोलणार्या समाजाची भूमिका. जर खानदेशी समाज स्वत:ला गुजरातीचा नव्हे तर मराठी समाजाचा भाग मानत असेल तर, भाषाशात्र काय म्हणते त्याला फारसा अर्थ राहत नाही.
वर म्हटल्याप्रमाणे भाषा-बोली ठरवण्यामागे निव्वळ भाषाशात्रापेक्षाही राजकीय आणि सामाजिक हे दोन्ही पैलू फार महत्वाचे ठरतात. पोर्तुगालचे जर स्वतंत्र राष्ट्र नसते तर, आज पोर्तुगिझ ही स्पॅनिशचीच एक बोली ठरवली गेली असती, असे अनेक युरोपीय भाषाशात्रींचे मत आहे. अगदी तीच गत फ्रान्स आणि इटली यांच्या दरम्यानच्या भागात बोलल्या जाणार्या अनेक बोलींची. नेपोलियन ज्या कॉर्सिकाचा ते कॉर्सिका बेट आता फ्रान्सच्या ताब्यात आहे. साहजिकच कॉर्सिकन ही फ्रेन्चची बोली समजली जाते. पण अनेक भाषाशास्त्रींच्या मते ती इटालियनला जास्त जवळ आहे.
तेव्हा भाषा-बोली ठरवण्यासाठी निव्वळ भाषशास्त्रीय निष्कर्ष लावणे योग्य आहे काय?
प्रतिक्रिया
31 Jan 2013 - 9:21 am | राही
बदलत्या राजकीय परिस्थितीचा भाषेवर पुष्कळ प्रभाव पडतो.दमण स्वतंत्र होण्यापूर्वी तिथल्या भाषेवर, संस्कृतीवर कोंकणीची,गोव्याची आणि पर्यायाने महाराष्ट्राची खूपच छाप होती.आता तिथे पूर्ण गुजरातीकरण झालेले आहे.थोड्याफार प्रमाणात डांग,खेडा ह्यांबाबतही हेच म्हणता येईल.तिथल्या आदिवासी बायकांचे नेसण उजव्या खांद्यावरून पुढे पदर पण काष्टा घेतलेला असे धेडगुजरी असे.आता मात्र ते काष्टा न घेता पूर्णपणे गुजराती पद्धतीचे गोल असते.त्याउलट सीपी अँड बेरार मध्ये सामील असताना विदर्भावर असलेली हिंदीची गडद छाया आता सौम्य होताना दिसते. सोलापूर बाबत मात्र कुतूहल आहे.तिथे कानडी प्रभाव आहेच,मात्र तेलुगु प्रभावही जाणवतो.हे अलीकडचे घटित असावे का?
31 Jan 2013 - 9:34 am | मन१
थोडासा ऐसा ही केहणार होतो. पण तुम्ही मेरा प्रतिसाद छिनून घेतलात.
(नागपुरी पब्लिक सोबत राहिल्याने मराठीची कशी MBA केली जाते त्याचे एक उदाहरण.)
नागपूर, इंदौर इथे कह्रेतर हिंदी बोलली जाते. त्या हिंदीवर मराठीचा प्रभाव आहे, इतकच. किंबहुना "नागपुरी" ही एक स्वतंत्र भाषा आहे असे जाणवते.
1 Feb 2013 - 1:04 am | अभ्या..
सोलापूरात जरा वेगळेच त्रांगडे आहे. येथील बर्याच जणांची मातृभाषा कन्नड असून शिक्षण पण कन्नड भाषेत झालेले असते.
(विशेषतः लिंगायत व ब्राह्मण ज्ञाती) त्यामुळे मराठीभाषिक व कन्नडभाषिक असे विवाह्पण झालेले असतात. ह्यामुळे व व्यवहारातील (सीमेलगत असल्याने) वापरामुळे बहुतांशी लोकांना कन्नड व मराठी ह्या दोन्ही भाषा येतात. पण तेलुगुचे तसे नाहीये. आंध्राची सीमा सोलापूरला लागून नाही. पण आंध्रातील पदमशाली समाज मोठ्या संख्येने येथे स्थायीक आहे व त्यांची घरात बोलायची भाषा ही तेलुगुच असते. पण पदमशाली लोकांचे बेटी व्यवहार कन्नड भाषिकांशी होत नाहीत.
पर्यायाने कन्नड भाषिकांना तेलुगु कळत नाही आणि तेलुगुवाल्यांना कन्नड. पण बर्याच मराठीजनांना दोन्ही भाषा थोड्या थोड्या तरी कळतातच. मराठीवर कन्नडचा खूपच प्रभाव आहे. पण तेलुगुचा एकदम मर्यादित.(चित्रपट आणि आंध्रा भजी सोडून;))
1 Feb 2013 - 1:16 am | दादा कोंडके
काही दशकांपुर्वी सोलापुरात कापड उद्योग इतका भरभराटीला होता की हैद्राबादहून मुंबईला निघालेली शेकडो तुलुगू लोकं मुंबई समजून सोलापुरातच थांबले आणि यथावकाश पुर्ण कापड उद्योग ताब्यात घेतला अशी श्टुरी सांगितली जाते. उद्याच तेलुगूमित्राला विचारून तनी काय म्हन्तो ते बघतो. :)
-(सोलापुरी)दादा
1 Feb 2013 - 2:32 am | अभ्या..
तसे नाही ओ दादा.
पद्मशाली म्हणजे साळीच. त्यांना मार्कंडेय ॠषींनी कमलतंतू पासून वस्त्र विणायची कला शिकवली म्हणून ते पद्मशाली. ते मूळचेच विणकर. तेथील (आंध्रातील) जमीनदार आणि वतनदारांच्या जाचामुळे ते सोलापूरात स्थायीक झाले. येताना आपली कला पण घेऊन आले. या गोष्टींना काही दशकाचा नव्हे तर शतकांचा इतिहास आहे. अगदी थोडासा परिचय करुन घ्यायचा असेल तर आपले कवि श्री. लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे "एका साळियाने" हे पुस्तक आहेच.
1 Feb 2013 - 7:16 pm | दादा कोंडके
नक्कीच.
अगदी लहानपणापासूनचे तेलुगू मित्र आहेत पण हा इतिहास अजिबातच माहीत नव्हता.
1 Feb 2013 - 1:37 am | रेवती
त्यामुळे मराठीभाषिक व कन्नडभाषिक असे विवाह्पण झालेले असतात.
अगदी हेच. असेच लग्न माझ्या आजीआजोबांचे झाले पण कन्नड सासरी आजीला भाषेच्या वेगळेपणाचा त्रास झाला नाही कारण तीही बार्शीत राहून कन्नड शिकली होती. असे होणे नवीन नाही हे नक्की!
31 Jan 2013 - 9:34 am | पैसा
अधिक वाचायला आणि माझी निरीक्षणे लिहायला आवडेल. संध्याकाळी परत येतेच.
31 Jan 2013 - 11:35 am | बॅटमॅन
लेख आवडला. संतुलित अर्ग्युमेंट्स आहेत.
एखादी भाषापद्धती ही स्वतंत्र भाषा कधी ठरते आणि बोली कधी ठरते? हा प्रश्न भाषाशास्त्रीयच आहे, परंतु पूर्णतः नाही. काही प्रमाणात त्या भाषापद्धती बोलणार्यांचे पर्सेप्शनदेखील महत्वाचे ठरते. माझ्या माहितीप्रमाणे कोंकणी ही एक वेगळी भाषा आहे असे सर्वप्रथम तपशीलवार प्रतिपादणारे संशोधक म्हंजे एस एम कत्रे.
त्यामुळे
नक्कीच नाही. लेखाच्या रोखाशी सहमत आहे.
समाजशास्त्राधारित असल्याने भाषाशास्त्राचा "रिगर" कमी आहे असे माझे आपले एक मत (पिंक).
1 Feb 2013 - 3:10 am | धन्या
मीपन तोच म्हनताय.
31 Jan 2013 - 12:06 pm | श्री गावसेना प्रमुख
मटा च्या ब्लॉगवर एक लेख आहे खांदेश चा शोध घेतांना,तो जरुर वाचा.
त्याच्यातला एक पॅरेग्राफ हा असा आहे
आणी विकी वर तर अहीराणी चा
असा उल्लेख आढळला
31 Jan 2013 - 10:25 pm | पैसा
गोव्यात घरी दारी कोंकणी बोलली जाते, पण पहिले छापील कोंकणी पुस्तक १८५६ चे क्रिस्त पुराण. त्यापूर्वी कृष्णदास शामाने १६ व्या शतकात रामायण आणि महाभारताचे काही भाग कोंकणीत लिहिले आणि ते पोर्तुगालमधे आहेत असे म्हणतात. पण त्यातील भाषेचा नमुना कुठेही माझ्या पाहण्यात आलेला नाही. गोव्यात शिक्षणाचे माध्यम फार पूर्वीपासून मराठी आहे. मालवणी जशी फक्त बोलण्यात वापरली जाते आणि लोक पत्रं, दस्त ऐवज करायला मराठी भाषा वापरतात तसाच प्रकार गोव्यात होता. कोंकणी माध्यमाच्या शाळा हल्ली सुरू झाल्या आहेत आणि बंद पडायच्या मार्गावर आहेत. विविध कारणांनी गोव्यातले लोक मराठी शिकणे पसंत करतात. सुनापरान्त हे एकच कोंकणी वृत्तपत्र नाव घेण्यासारखे आहे. कोंकणी अनेक लिप्यांमधे लिहिली जाते. तिला प्रमाण व्याकरण खरे म्हणजे नाही.
कोंकणी ही वेगळी भाषा आणि अस्मिता वगैरे गोष्टी फार उशीरा सुरू झाल्या. त्यातही देवनागरी कोंकणी भाषेची चळवळ मुख्यतः कर्नाटकातून गौड सारस्वत ब्राह्मण समाजाने चालवली. या मंडळींनी ज्ञानेश्वरी आणि मुकुंदराजाचा ग्रंथ, लीळाचरित्र, श्रवणबेळगोळचा शिलालेख हे सगळे कोंकणी भाषेत आहेत असा दावा केला आहे. या सगळ्या ठिकाणी जुनी प्राकृत/मराठी भाषा वापरली गेली आहे आणि त्यात कोंकणीबरोबर खूप साम्य दिसते.
गोवा महाराष्ट्रापासून पूर्ण वेगळा आहे हे दाखवण्यासाठी मुख्यतः कोंकणीला स्वतंत्र भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी भाषावादाचे राजकारण खेळले गेले. ख्रिश्चन लोकांना त्यांची रोमी कोंकणी हवी आहे. ही माझी निरिक्षणे आहेत. या सगळ्यावरून काय निष्कर्ष काढता येतो? कोंकणी आणि मराठीमधल्या साम्य आणि भेदांबद्दल नंतर परत लिहिते.
1 Feb 2013 - 2:01 am | विकास
रोचक माहिती आणि लेख तसेच प्रतिसाद!
तेव्हा भाषा-बोली ठरवण्यासाठी निव्वळ भाषशास्त्रीय निष्कर्ष लावणे योग्य आहे काय?
नाही असेच वाटते. भारतीय भाषांमधे राजकीय कारणांमुळे पुर्वीच्या बोलीभाषा ठरल्या असाव्यात असे मात्र वाटत नाही. मुंबईत मराठी जरी राजभाषा असली आणि जरी ती मुंबईत जास्त वापरात नसली तरी मुंबईतील हिंदी ही मराठीची बोलीभाषा झाली की काय असे कधी कधी वाटायचे. (आता त्यात इंग्रजीपण आले)
बोलीभाषा म्हणून नाही, पण लोकसंख्येचा रेटा आणि तो देखील कामगार वर्गातला असताना काय होते याचे उदाहरण म्हणजे अमेरीकेत अनौपचारीक रीत्य दुसरी प्रमुख भाषा झालेली दक्षिण अमेरीकेतील स्पॅनिश. दक्षिण अमेरीकेतील म्हणायचे कारण इतकेच की, स्पेन मधली स्पॅनिश आणि द. अमेरीकेतील स्पॅनिश यात बोलीभाषा म्हणून फरक आहे. (एकदा माझ्या एका पर्यावरण संदर्भातील द्वैभाषिक संस्थळाचे मुळच्या स्पेन मधील स्पॅनिश मुलीने स्पॅनिश भाषांतर केले. त्यात तीने जे काही "क्लिक हिअर" चे स्पॅनिशीकरण केले ते वाचून दक्षिण अमेरीकेतील एका सहकारी व्यक्तीने सावध केले... कारण त्याचा अर्थ त्यांच्या बोली स्पॅनिशमधे "**** हिअर" असा होत होता! )
बाकी : याचा अर्थ ग्रियर्सन चूक होता?
नसावा. त्यावेळेस गुगल आणि विकीपिडीया नसणे यात त्याचा काय दोष! ;)
1 Feb 2013 - 9:17 pm | राही
ग्रिअर्सन चूक होता असे नव्हे पण सध्याच्या काळात 'तो अपुरा होता' हे मानणे योग्य ठरेल. त्या काळात वाहतूक आणि संपर्काच्या सुलभ साधनांच्या कमतरतेमुळे पुरेशी माहिती गोळा करणे अवघड होते.शिवाय प्रत्यक्ष फील्डवर्क करणारेही या विषयाशी परिचित आणि पारंगत नव्हते.यामुळे माहिती गोळा करण्यात आणि निष्कर्ष काढण्यात त्रुटी निर्माण झाल्या. दर पन्नास शंभर वर्षांनी प्रत्येक संशोधनाची नवीन निकषांनुसार छाननी होत असते,किंबहुना होणे आवश्यक असते.जरी नवीन निष्कर्ष निघाले तरी त्यामुळे पूर्वसूरी चुकीचे ठरत नाहीत. इतिहासाचार्य राजवाड्यांनी वणवण भटकून,स्वतःच्या खिशातली शेवटची पै खर्च करून इतिहासाची अनमोल साधने जमा केली. त्यावरून त्यांनी काढलेले कित्येक निष्कर्ष आज वादग्रस्त किंवा चुकीचे ठरले असले तरी त्यांच्या प्रयत्नांचे मोल कमी होत नाही.
भाषिक अस्मिता उफाळून येणे हे स्वतंत्र भारतात,किंबहुना जगातच नवे नाही.भाषिक तत्त्वावर राज्यनिर्मिती ही एक मोठी राजकीय घटना स्वतंत्र भारतात यामुळेच घडली.एकदा मोठे एकभाषी प्रदेश निर्माण केले/झाले तरी ही प्रक्रिया थाबत नाही.या मोठ्या प्रदेशांतही भाषिक,धार्मिक,वांशिक अल्पसंख्यांक उरतातच आणि नंतर त्यांची स्वतंत्र अस्मिता जागृत होते.योरप मध्ये असे बरेच वेळा झाले आहे.युगोस्लाविया,चेकोस्लोवाकिया यांची शकले झालेली आपल्यापैकी बहुतेकांनी पाहिली असतील.आपल्याकडे मैथिलीला स्वतंत्र भाषेचा दर्जा मिळाला आहे.भोजपुरीलाही तो मिळावा अशी चळवळ सुरू आहे.(मिळाला का? अद्ययावत माहिती नाही.)कोंकणीचेही असेच झाले. कोंकणीभाषक सध्या तीन राज्यांत विखुरलेले आहेत. तीनही प्रदेशांतली कोंकणी एकमेकांना समजते,पण त्यातली दक्षिण कारवार आणि कासारगोड प्रदेशातली भाषा मराठी माणसाला समजणे फारच कठिण.तिला मराठीची बोली मानणे चूकच ठरेल.पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा-सिंधुदुर्ग यातल्या लोकव्यवहार आणि सांस्कृतिक पद्धतीतही फरक आहे. ना.गो. कालेलकरांनी हे मान्य केले होते.भाषिक राज्ये होण्यापूर्वी बेळगाव,कारवार,धारवाड आणि विजापुर हे सध्याच्या कर्णाटकातले चार जिल्हे मुंबई इलाख्यामध्ये मोडत तेव्हा तिथे महसूल व्यवहाराची,सातबाराची भाषा मराठीच(कन्नड दुय्यम होती) होती.आता सर्व ठिकाणी साहजिकपणे कन्नडच आहे.कोंकणी आणि मराठीचा उगमस्रोत एकच असला तरी पुढे त्यांचे प्रवाह काही काळ समांतर पण निश्चितपणे अलग झाले. गोवा मुक्तीनंतर या प्रक्रियेला खूपच वेग आला आणि कोंकणीमध्ये जोमाने आणि हिरीरीने साहित्यनिर्मिती होऊ लागली.कुठलीही भाषा/गोष्ट अशी वर्धिष्णु होताना तटस्थतेने पहाणे आनंददायी असते. या संदर्भात सिंधीचे उदाहरण देण्याजोगे आहे.स्वतंत्र भारतात सिंधीला काहीच स्थान उरले नाही.ते मिळावे म्हणून सिंधी निर्वासितांनी सुरुवातीला हिरिरीने प्रयत्न केले,देवनागरी लिपी अधिकृतपणे स्वीकारली.पण भाषावाढीसाठी सरकारी प्रयत्न पुरेसे नसतात. त्यात लोकांचा जीव ओतला जावा लागतो,जे सिंधीच्या बाबतीत झाले नाही. कोंकणी आणि सिंधी दोन्हींची व्याप्ती चिमुकली,भाषकलोकसंख्याही कमीच.पण दोघांचे आलेख विरुद्ध आहेत.एकीचा चढता तर दुसरीचा उतरता. ह्याची कारणे शोधणे म्हणजे संस्कृतींचा उदयास्त का व कसा होतो या व्यापक प्रश्नास हात घालण्यासारखे आहे.
1 Feb 2013 - 9:33 pm | पिशी अबोली
इथे प्रत्येकजण भाषाशास्त्राबद्दल बोलताना दिसतोय. पण मुळात गम्मत अशी आहे की भाषाशास्त्रासाठी भाषा व बोली ही विभागणी इतकी गौण आहे, की हा मुद्दाच फारसा विचारात घेतला जात नाही.
एखाद्या भाषाशास्त्रज्ञाने जर सांगितलं की अमुक अमुक स्पीच सिस्टम ला भाषा म्हणा आणि अमुकला बोली तर त्यासाठीची त्याची कारणं ही सापेक्ष असली पाहिजेत.आधुनिक भाषाशास्त्र असे़ कोणतेही निकष ठरवत नाही.भाषा आणि बोली अशा विभागणीसाठी पूर्णतः जनमानस कारणीभूत असते,भाषाशास्त्र नाही.
1 Feb 2013 - 10:04 pm | पिशी अबोली
राहता राहिली कोंकणीची गोष्ट. ती भाषा आहे का बोली यावर खूप चर्चा झालेली आहे. प्रत्येकाला भाषाशास्त्रीय पुरावे द्यायचे असतात त्या बाबतीत. वाद घालायचाच झाला तर वादा-प्रतिवादासाठी इतके मुद्दे आहेत की संपणारच नाहीत. पण सद्यस्थितीमधे कोंकणीचा विकास भाषा म्हणूनच होत आहे. मग अजून भूतकाळात किती रमायचं हे या प्रश्नात रस असणार्या प्रत्येकाचा निर्णय असावा, त्यात भाषाशास्त्राला ओढलं जाऊ नये असं मला वाटतं; तेही सापेक्ष मत म्हणून सोडून देऊ शकता..
1 Feb 2013 - 11:17 pm | धनंजय
"भाषा आणि बोली" च्या व्याख्या टाळण्याकरिता "शब्द-व्यवस्था" असे म्हटले आहे.
भाषाविज्ञानात भाषा आणि बोली यांच्यात रेखीव-स्पष्ट फरक करण्यासाठी कुठलेच तत्त्व नाही. "भाषाशास्त्र्यांवर सोडूया" म्हणणार्या लोकांना जर असे वाटत असेल, तरी नाही. असे कुठले भाषाशास्त्रीय तत्त्व कोणाला सांगता येईल काय?
आता भाषावैज्ञानिक सवेक्षण करून दोन व्यवस्थांमधील साम्ये आणि भेद तक्त्यात मांडता येतील. कुठल्याही दोन व्यवस्थांत साम्येही सापडतील आणि भेदही सापडतील. (उदाहरणार्थ अल्जझीरा अमुकतमुक कार्यक्रमातील शब्दप्रयोग आणि पणजी आकाशवाणीवरच्या व्हनीबाय्ली वासरी कार्यक्रमातील शब्दप्रयोग अशा दोन व्यवस्था सर्वेक्षणात घेतल्या. तर "नकारात्मक वाक्यांत क्रियापदात बदल होतो" असे साम्य दाखवता येईल. आणखी कुठली साम्ये दाखवता येतील. फरक भरपूर दाखवता येतील.)
फरक आणि साम्ये यांचे विचारपूर्वक सर्वेक्षण करणे, इतके काय भाषाशास्त्राच्या तत्त्वांत आहे. नेमकी किती साम्ये असली तर त्या दोन व्यवस्था "एकाच भाषेच्या बोली आहेत" असे सांगणारे कुठलेच तत्त्व भाषाशास्त्रात नाही. जर "मराठी विरुद्ध तमिळ इतका फरक असला तरच वेगळ्या भाषा" असे कोणी म्हटले, तर बाङ्ला आणि गुजराती या एका "नवप्राकृत" भाषेच्या बोली ठरतील. जर राजस्थानी आणि हिंदी पुरेशा वेगळ्या असे कोणी ठरवले, तर वेगळा काही निर्णय होईल. पण या रेषा आखण्याचा खटाटोप भाषाशास्त्राच्या कक्षेबाहेरचा आहे. राजकारण आणि समाजकारण यांच्या कक्षेतला आहे.
3 Feb 2013 - 1:04 pm | स्वाती दिनेश
चर्चा रोचक आहे, वाचते आहे,
स्वाती
4 Feb 2013 - 2:15 pm | ५० फक्त
ब-याच दिवसांनी एका वेगळ्या विषयावर चाललेली उत्तम चर्चा, धागाकर्त्याचं हार्दिक आभार.