आठवणीतला सार्वजनिक गणेशोत्सव!

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in विशेष
26 Sep 2012 - 11:18 pm
श्रीगणेश लेखमाला २०१२

लहानपणी गणेशोत्सव म्हणजे आम्हा लहान मुलांसाठी मोठी पर्वणीच असायची. आमच्या चाळीमध्ये घरगुती गणपती सहसा कोणाकडे बसायचे नाहीत. किंबहूना चाळीतल्या लोकांना कधी तसं वाटलंही नाही. त्याचं कारण म्हणजे चाळीतला सार्वजनिक गणेशोत्सव! आपापसात बंधूभाव, एकात्मता टिकून रहावी यासाठी संपुर्ण चाळीचा मिळून एकच सार्वजनिक गणपती आमच्या चाळीत आम्ही जन्माला यायच्याही आधीपासूनच बसत होता. गणपती यायच्या महिनाभर आधीपासूनच चाळीत गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू व्हायची. तयारी म्हणजे अशी कि प्रत्येकाच्या उत्साहाला उधान यायचं नुसतं. महिनाभर आधीच चाळीतल्या सांस्कृतिक कमिटीची गणपती उत्सवाच्या नियोजनासाठीची एक बैठक व्हायची. आम्हा लहान मुलांना त्यातलं फारसं काही कळायचं नाही पण एकूणच मोठ्या माणसांच्या त्या चर्चा ऐकून आम्हाला फार गम्मत वाटे. देखावा कोणता करायचा इथपासून ते आगमनाची आणि विसर्जनाची मिरवणूक कशा पध्दतीने काढायची यांसारख्या अनेक प्रश्नांवर तिथे चर्चा चाले. मग वर्गणीसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या चाळीतल्या घराघरात फेर्‍या होई. एखाद्याच खवचट प्रवृत्तीच्या माणसाचा अपवाद वगळता बाकी सगळेजण इमानदारीने वर्गणी देत. आणि महत्वाचं म्हणजे कोणत्याही स्थानिक पुढार्‍याच्या मदतीविनाच हा उत्सव पार पडल्या जाई.

भाद्रपदातल्या उन-पावसाच्या खेळात गणेश चतूर्थी जवळ आल्याची चाहूल लागे तशी मंडळातल्या कामांना आणखी जोर वाढे. मंडप बांधण्यासाठी लागणार्‍या बांबूच्या काठ्यांचे भारे चाळीसमोरच्या मोकळ्या जागेत येऊन पडत. लोखंडाच्या जड पहारीने जमिनीत खड्डा घेण्यापासून ते बांबूच्या कनातीवर उंच चढून मंडप काथ्याने आवळवण्यापर्यंतची सगळी कामे मंडळातली पोरं खूप हौसेनं करत. एकदा का मंडप बांधून झाला की मग देखाव्याचं काम सुरू होई. संपूर्ण चाळीवर विद्यूत रोषणाई करण्यात येई. रात्रीचं जेवण उरकलं की आम्ही सगळी लहान पोरंही छोटी मोठी काम करण्यासाठी मंडपात पळत असू. रात्री एक-दोन वाजेपर्यंत किंवा कधी कधी पहाटेपर्यंतही ही कामे चालत असत. अंगात भरलेला आळस झटकण्यासाठी मध्येच कुणाच्या तरी घरातून वाफाळत्या चहाचे कप पाठवण्यात येई. शब्दात सांगता न येणारा एक वेगळा अवर्णणीय आनंद आम्हाला त्या कामातून मिळत असे. त्यावेळी आजच्यासारखा डि.जे.चा दणदणाट नव्हता की कर्णकर्कश वाजणारे लाऊड स्पिकर नव्हते. मिरवणूकीपुढे ढोल आणि ताश्यांच्या मदतीने लेझीम खेळण्यात येई किंवा मग एखादा हुशार पोरगा बुलबुल तरंगच्या साथीने हिंदी-मराठी चित्रपटांतली गणपतीची गाणी वाजवी अनं त्याजोडीला ढोल-ताशे! गणपती बाप्पा येण्यापूर्वी आठवडाभर आधीपासूनच चाळीच्या पटांगनात लेझीम खेळण्याची तालिम सुरू होई. शाळेतले एक गुरूजी होते, ते लेझीम खेळण्यासंबधीच्या सुचना मुलांना देत. प्रामुख्याने दहा ते पंचवीस वयोवर्ष गटातली मुलं-मूली या लेझीम पथकात सहभागी होत असत.

देखावा तयार होई. रोषणाईचं कामंही संपे. लेझीम पथकाची तालिमही संपूर्ण काटेकोरपणे पार पडे. मग सगळ्यांना वेध लागत ते गणपतीच्या पहिल्या दिवसाचे. गणेश चतूर्थीच्या दिवशी चाळीतल्या लेकी-सूना भल्या पहाटे उठून मंडपातली आणि मंडपासभोवतालची जागा सडा शिंपण करून शेणाने सारवत. मग त्यावर रेखीव रांगोळी काढण्यात येई. इथून पुढचं चाळीतलं सगळं वातावरण एकदम मंगलमय वाटू लागे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेजण अगदी नटून थटून बाप्पांच्या आगमनासाठी सज्ज होत. आगमनाच्या मिरवणूकीत अतिशय शिस्तबध्द पध्दतीत लेझीम खेळला जाई. नऊवारी साडी आणि नाकात नथनी घातलेल्या आया-बाया फुगडी खेळत. गुलालाची मुक्तहस्ताने उधळण करत आणि भक्तिभावाने जयघोष करत बाप्पांच आगमन होई.

'गणपती बाप्पा.....मोऽऽऽऽऽरया'च्या गजरात गणराय मंडपातल्या त्यांच्या स्थानावर विराजमान होत. प्राणप्रतिष्ठा झाली की बाप्पांच्या पहिल्या वाहिल्या आरतीला प्रारंभ होई. 'सुखकर्ता दुख:हर्ता' म्हणताना चाळीतल्या प्रत्येक आबालवृध्दाच्या चेहर्‍यावर एक अपुर्व समाधान झळके. नित्यनेमाने मग सकाळ संध्याकाळ टाळ मृदूंगाच्या साथीने गजाननाच्या आरतीचा तो अपुर्व सोहळा साजरा होई. चाळीतली बहुतांश मंडळी आरतीसाठी मंडपात जमा होत. गणपती बाप्पा म्हटल्यानंतर आम्ही बच्चेकंपनी गळ्याच्या शिरा ताणून अतिशय मोठ्ठ्याने 'मोऽऽऽरया' असं ओरडत असू. सगळी धम्माल असायची

आरतीनंतर धुपार्तीवर श्रध्देने धरलेला हात, त्या हाताला लागलेली उब तोंडावर घेऊन तो केसांवरून मागे फिरवणं..

प्रसादासाठीची झुंबड..

गणपती बाप्पाला मनोभावे केलेला नमस्कार आणि परिक्षेत पास होण्यासाठी त्याच्याकडे मागितलेला आशिर्वाद..

खणखणीत आवाजात म्हटलेलं गणपती स्तोत्र...

सकाळी सकाळी मंडपातून ऐकू आलेलं 'प्रथम तूला वंदितो' हे भक्तीगीत..

हे सगळं आठवलं की खूप काही मागे टाकल्याची जाणिव होते. मन पुन्हा त्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घ्यायला लागतं.

तिसर्‍या चौथ्या दिवशी गौरीचं आगमन व्हायचं. चाळीतल्या सगळ्ञ सवाष्ण बायका मोठ्या भक्ती भावाने आणि कौतूकाने गौराईचं स्वागत करीत असत. गौराई जागवण्याच्या रात्री घराघरातल्या सर्व बायका-पोरी मिळून रात्रभर झिम्मा-फुगडी यांसारखे पारंपारीक खेळ खेळत. एखादी सासूरवाशिन यासाठी आवर्जून माहेरा यायची.

'रूणूझूणू त्या पाखरा, जा रे माझिया माहेरा
आली गवराई अंगणी, तिला लिंब लोणं करा'

नाटक आणि सांगितिक कार्यक्रमांची रेचचेल असायची या दहा दिवसात. बाप्पांच्या सहवासातले ते दहा दिवस मग खूप आनंदात जात. सकाळ-संध्याकाळ आरती. रात्रभर गणपतीसमोर जागरण करून मारलेल्या गप्पा. मग तिथेच पथारी टाकून काढलेल्या डुलक्या, हे सगळे क्षण मनाच्या एका कोपर्‍यात साठवून ठेवलेले, अगदी वहीतल्या मोरपिसासारखे!

विसर्जनाच्या दिवशी सकाळपासूनच मनात एक प्रकारची हुरहूर दाटून येई. मंडपातल्या फेर्‍या वाढत. बाप्पांची शेवटची आरती होई. मग 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' या आरोळीत गणपती बाप्पा विसर्जनासाठी सज्ज होत. ढोल-लेझीम पथक पुन्हा सज्ज होई. मग थाटात मिरवणूक चाले. पण विसर्जनाच्या दिवसापेक्षा आगमानाच्या दिवशीचा जल्लोष तुलनेने जास्तच वाटायचा. विसर्जन करून आल्यानंतर मंडपातला तो रिकामेपणा एकदम अंगावर येई. दहा दिवसातल्या बाप्पासोबच्या सगळ्या आठवणी नजरेसमोर तरळू लागत.

लोकमान्यांना अभिप्रेत असणारा गणेशोत्सव खर्‍या अर्थाने आमची चाळ साजरा करायची. बाकिच्या दिवसात नसलेली सामाजिक एकात्मता निदान या दिवसांत तरी हमखासपणे जपली जायची. आधुनिकीकरणाच्या रेट्यात आमची चाळ नाहिशी होऊन तिथे टॉवर संस्कृती उभी राहिली. प्रत्येकाच्या घराघरात गणपती आले. मग हळूहळू चाळीतला सार्वजनिक गणेशोत्सव लोप पावला.

प्रतिक्रिया

रेवती's picture

27 Sep 2012 - 12:45 am | रेवती

अगदी छान लेखन. सगळेजण वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या ठिकाणी, देशा, परदेशात हा उत्सव साजरा करतात. गणपती येण्यादिवशी आणि विसर्जना दिवशी मात्र सगळ्यांच्या भावना त्याच असतात. इतक्या उत्साहानं सार्वजनीकरित्या साजरा केला जाणारा उत्सव शब्दानच तू चितारला आहेस.

अभ्या..'s picture

27 Sep 2012 - 1:11 am | अभ्या..

अगदी रे किसन्देवा
अगदी अस्सच होतं बघ सगळं वातावरण आमच्या गल्लीत. ते लेझीम, ढोल, बँजो.... अजूनही कुठे आवाज एकला की हातपाय नकळत हलायला लागतात.
छानच.

विकास's picture

27 Sep 2012 - 6:11 am | विकास

त्यावरून ठाण्यातल्या घंटाळी नवरात्रोत्सवाची आणि विष्णूनगर मधील माघातल्या गणेशोत्सवाची आठवण झाली...

Pearl's picture

27 Sep 2012 - 7:38 am | Pearl

छान लिहिलं आहे.
चाळीतल्या गणेशोत्सवाच डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं.

प्रचेतस's picture

27 Sep 2012 - 8:21 am | प्रचेतस

मस्त लिखाण रे किसना.

झकास. डोळ्यांपुढे माहौल उभा राहिला.
>>मग हळूहळू चाळीतला सार्वजनिक गणेशोत्सव लोप पावला. >> :(

उत्तम लिखाण, कुणाची तरी उणीव भरुन निघतेय असं वाटतंय. ... धन्यवाद.

प्रास's picture

27 Sep 2012 - 11:03 am | प्रास

छान लिहिलंय किसनद्येवा!

काही म्हणा, संपादक होता होता किंवा झाल्यानंतर किसनद्येवांच्या लेखणीला अगदी 'वसंत जडलाय', नै?

छान छान, आवडलंय एकदम...... :-)

अन्या दातार's picture

27 Sep 2012 - 11:21 am | अन्या दातार

संपूर्णतः सहमत.

स्पा's picture

27 Sep 2012 - 12:29 pm | स्पा

असेच म्हणतो.. भारी लिहील आहेस.. गविंकडे क्लास लावलास कारे..

सूड's picture

27 Sep 2012 - 2:45 pm | सूड

बाडिस !!

तरीही >>तिसर्‍या चौथ्या दिवशी गौरीचं आगमन व्हायचं. चाळीतल्या सगळ्ञ सवाष्ण बायका मोठ्या भक्ती भावाने आणि कौतूकाने गौराईचं स्वागत करीत असत
सार्वजनिक गौरीपूजन पहिल्यांदा वाचतोय, ऐकतोय.

मी-सौरभ's picture

28 Sep 2012 - 9:54 am | मी-सौरभ

अगदी हेच म्हणायला आलो होतो :)

विसुनाना's picture

27 Sep 2012 - 11:37 am | विसुनाना

लेख आवडला. आवडला म्हणजे आमच्याही याबाबतीतल्या आठवणी जाग्या करणारा ठरला.
आमचा सार्वजनिक गणपतीतला अनुभव मात्र असा 'सज्जन' नव्हता इतकेच नमूद करतो.
याहून अधिक लिहीले तर कुटुंबवत्सल झाल्यावर आपोआप चढलेले सभ्यपणाचे कवच गळून पडेल अशी साधार भिती वाटते.
मोरया...

खरेच चाळ संस्क्रुतीत होणारा गणेशोत्सव खरेच खुप मिस करतोय.... लेख वाचला आणि काजूपाडा बोरिवली येथील आमच्या चाळीतल्या गणेशोत्सवाची आठवण आल्याने टचकन डोळ्यातून पाणी आले बघा.... लेखाबद्द्ल काय म्हणू जबरी लिहीला गेला आहे लेख आवडेश :)

बाकी काही म्हणा शेवटी चाळ ती चाळच खरेच लेख वाचून माझ्या जून्या आठवणींना उजाळा मिळाल्याने किसनदेव आपले मनापासून आभार ----^----

नंदन's picture

27 Sep 2012 - 2:17 pm | नंदन

लेख आवडला. ग्रँटरोडच्या जुन्या चिखलवाडीतल्या गणेशोत्सवाच्या आठवणी जाग्या झाल्या. सुदैवाने चाळ अजूनही तगून आहे, पण हळूहळू पूर्वीचा उत्साह/नवीन कार्यकर्त्यांची आवक रोडावली आहे म्हणतात :(.

प्रभाकर पेठकर's picture

28 Sep 2012 - 2:35 am | प्रभाकर पेठकर

आजच ABP माझा वर चिखलवाडीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा कार्यक्रम होता. किशोरी अंबिये चिखलवाडीच्याच आहेत ही नवी माहिती त्या कार्यक्रमात मिळाली.

वा! प्रचंड नॉस्टॅल्जिक करणारा लेख. उत्तम जमलाय. आवडला.

सुहास..'s picture

27 Sep 2012 - 3:03 pm | सुहास..

मुळात च चांगल्या दोन मंडळाच्या अध्यक्ष असल्याने, एक कार्यकर्ता म्हणुन ठुस्स होणारा अनुभव आहे ..अध्यक्ष म्हणुन अडचणी आणि त्यावर मात करणे , हे लिहायला घेतले तर ४० - ५० भाग लिहावे लागतील. ;)

( दरवर्षी गणपतीच्या वर्गणीचा, काही वेगळे उपक्रम राबवुन, खर्चाची जबाबदारी घेणारा )

इरसाल's picture

28 Sep 2012 - 9:29 am | इरसाल

आणी सुहास लिहा ४०-५० भाग आम्ही आहोत ना वाचायला.
मग सुरुवात कधी ?

पैसा's picture

27 Sep 2012 - 11:22 pm | पैसा

उत्तम लिहिलंय!

पिवळा डांबिस's picture

28 Sep 2012 - 2:08 am | पिवळा डांबिस

चांगलं लिहिलंय किसनशेठ!
मी लहान असतांना गणेशोत्सवाला गिरगावातल्या चाळीत रहाणार्‍या आत्याकडे रहायला जायचो.
पूर्वी चाळी/सोसायटीच्या गणेशोत्सवात (पांढरा पडदा ताणून लावून) पिच्चर दाखवायचे एखादा दिवस...
मी दादा कोंडकेंचे सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव वगैरे पिक्चर्स प्रथम गणेशोत्सवातच पाहिले....
(नंतर मग दादांच्या चित्रपटांनी वेगळंच वळण घेतलं आणि गणेशोत्सवाऐवजी शिमग्याशी जवळीक केली..... ते असो!)
एनिवे, दे वेअर इनोसंट डेज!!!!

आवडलं. गिरगावातला गणपती उत्सव आठवला. लेझीम वगैरे नसलं तरी ठणाणा नसायचा.

प्रसन्न शौचे's picture

28 Sep 2012 - 9:03 am | प्रसन्न शौचे

चाळीतला सार्वजनिक गणेशोत्सव! आपापसात बंधूभाव, एकात्मता टिकून रहावी यासाठी संपुर्ण चाळीचा मिळून एकच सार्वजनिक गणपती आमच्या चाळीत आम्ही जन्माला यायच्याही आधीपासूनच बसत होता. गणपती यायच्या महिनाभर आधीपासूनच चाळीत गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू व्हायची. तयारी म्हणजे अशी कि प्रत्येकाच्या उत्साहाला उधान यायचं नुसतं. महिनाभर आधीच चाळीतल्या सांस्कृतिक कमिटीची गणपती उत्सवाच्या नियोजनासाठीची एक बैठक व्हायची. आम्हा लहान मुलांना त्यातलं फारसं काही कळायचं नाही पण एकूणच मोठ्या माणसांच्या त्या चर्चा ऐकून आम्हाला फार गम्मत वाटे. देखावा कोणता करायचा इथपासून ते आगमनाची आणि विसर्जनाची मिरवणूक कशा पध्दतीने काढायची यांसारख्या अनेक प्रश्नांवर तिथे चर्चा चाले. मग वर्गणीसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या चाळीतल्या घराघरात फेर्‍या होई. एखाद्याच खवचट प्रवृत्तीच्या माणसाचा अपवाद वगळता बाकी सगळेजण इमानदारीने वर्गणी देत. आणि महत्वाचं म्हणजे कोणत्याही स्थानिक पुढार्‍याच्या मदतीविनाच हा उत्सव पार पडल्या जाई.सम्पुर्ण लेखातली हे शब्द माझ्या मनात खोलवर रुजली. मला फक्त इतकेच नमुद करावेसे वाटते त्यावेळेस तथाकथित वडील मण्डळी कडून प्रबोधन कसे व्हायचे याचा लेखात समावेश हवा होता.

निखिल देशपांडे's picture

28 Sep 2012 - 11:40 am | निखिल देशपांडे

अनेक आठवणी डोळ्यासमोर आल्या...
सार्वजनिक गणेसोत्सव पार पाडण्यासाठी काय काय दिव्य करावे लागते.
आमच्या कॉलनीतलल्या गणेशोत्सवाची सांगता आम्ही १०० कुटुंबाच्या जेवणाने करावयाचो.
मी अध्यक्ष असताना जो आचारी नेमला होता त्याने शेवटच्या क्षणी आम्हाला जी पळापळ करायला लावली ते आठवुन आज जाम हसु आले.

एकदाच मुंबईत सर्वजनीक गणेशोत्सवात सक्रिय सहभाग नोंदवला होता. (बाकी सगळे गेणेशोत्सव गावीच साजरे केले.)
तु लिहिलेल्या बर्‍याच आठवणी त्याच्याशी मिळत्या जुळत्या आहेत.

छान लिहिलेयस.

गवि's picture

28 Sep 2012 - 1:42 pm | गवि

छान आहेत आठवणी,,

धनंजय's picture

8 Oct 2012 - 9:13 pm | धनंजय

वा. आठवणींनी भरगच्च.