जास्वंदाच्या कळ्यांचे चक्र
श्री गणेशाला लाल फुल प्रिय असते. विशेषत: जास्वंदाचे फुल! आमच्या इथे अनेकांच्या घराबाहेरच्या बागेत जास्वंदाच्या फुलांची झाडे लावली आहेत. जांभळा, पिवळा, आबोली, गुलाबी, पांढरा अश्या अनेक प्रकारची जास्वंदाची फुले तिथे आलेली दिसतात. काही दाट पाकळ्यांची असतात तर काही फुले विरळ पाच पाकळ्यांची. तसेच त्यांच्या आकारात लहान मोठेपणा आढळतो. परंतु भारतात पाच लाल पाकळ्यांची, मधुनच उगवलेल्या पिवळ्या तु-यांच्या फुलांनी जशी जास्वंदाची झाडे डवरलेली दिसतात तशी इथे कुठेच दिसली नाहीत. झाडावर दिसलीच तर एकट दुकट फुले! बाजारात विकायला तर अजिबातच नाहीत. आमच्या बागेत ही जास्वंद नाही . म्हणून हया वर्षी कागदाची जास्वंदाची फुले करून त्याचे चक्र श्री गणेशाच्या मागे लावून आरास कारायचे ठरवले.
प्रथम लाल क्रेप कागदाच्या २ इंच रुंद पट्यांचे ४ इंच लांबीचे ५ तुकडे कापून घेऊन त्याला वरून जरासा गोलाकार आकार दिला. ते तुकडे एकमेकात काहीसे अंतर ठेवून एकमेकांवर ठेवले.
केवळ खालच्या बाजूने चण्याच्या पुडीसारखी गुंडाळी केली असता त्याला कळीचा आकार आला. त्या गुंडाळलेल्या भागाला ४ इंच लांबीचा हिरवा क्रेप कागद गुंडाळला. त्यामु्ळे देठ तयार झाला. त्यावर कळी लगतचा हिरवा भागही (sepal) करून चिकटवून टाकला.
फुलाचा मधला स्त्री केसर (pistil ) तयार करण्यासाठी अजून एक ६ इंच लांबीचा लाल क्रेप कागदाचा तुकडा गुंडाळून समईच्या वातीसारखा वळवून घेतला. त्याच्या एका टोकाला पिवळी मूगाची बारीक डाळ चिकटवून परागकण तयार केले आणि ती लाल वात कळीच्या आत सरकवून चिकटवून टाकली. आणि अश्याप्रकारे कागदाची जास्वंदाची एक कळी तयार झाली. ती कळी उलगडून फुल तयार केले. परंतु ते कळी इतके सुरेख दिसले नाही. खरे तर फुल काय आणि कळी काय? दोन्ही कागदाचीच! म्हणजे कृत्रिमच! तरी त्यातल्या त्यात कळीच जरा कमी कृत्रिम दिसत होती. म्हणून तश्याच अधिक कळ्या तयार करून घेतल्या.
त्यानंतर जाडसर पुठ्ठ्यावर ८ इंच व्यासाचा गोल काढून कापून घेतला. त्यापेक्षा अर्धा सें.मी. जास्त व्यासाचा अजून एक गोल सोनेरी कागदावर काढून कापला आणि तो पुठ्ठ्यावर चिकटवून टाकला. त्या सोनेरी गोलावर कागदी जास्वंदाच्या कळ्या गोलाकार चिकटवल्या. उरलेला मधोमधचा रिकामा भाग समोर श्रींची मूर्ती आल्यावर दिसणारच नव्हता. तरीही तिथे उणीव दिसू नये म्हणून एक कळी उमलवून त्याचे मोठे फूल तयार केले आणि ते त्या गोलाच्या रिकाम्या मध्यावर चिकटवून टाकले.
अश्या प्रकारे आमच्या घरच्या श्री गणेश मूर्तीच्या मागे लावायला जास्वंदाच्या कळ्यांचे चक्र तयार केले आहे.
त्याची कृती इथे पहा ---
श्री गणेश २०१२
( अनेक प्रयत्न करूनही व्हिडिओ दिसत नाही आहे. म्हणून लिंक दिली आहे.)
ते चक्र दिसते आहे छानच. पण ,
रंग ले आएँगे,
रूप ले आएँगे
काग़ज़ के फूल,
ख़ुशबू कहाँ से लाएँगे?
पण हे जास्वंदाचे फुल असल्यामुळे ख़ुशबू म्हणाल तर तसेही नाहीच. पण रंग, रूप मात्र या कागदाला ही आहे.
त्या कलेच्या देवतेला ही आरास पसंतीस उतरेल अशी आशा आम्हाला वाटते. अर्थात ही कल्पना सुचवणारा, आणि त्यानुसार करून घेणारा तोच. आमचे असे काय?
बाकी तुमचे कसे काय? तूम्हाला श्रींनी काही कल्पना सुचवली का? त्यानुसार तूम्ही काय काय केलेत?
प्रतिक्रिया
17 Sep 2012 - 8:02 pm | मदनबाण
चला... जालिय उपवास सुटला एकदाचा ! ;)
नेहमी प्रमाणेच तुझा ह्या विषयावर धागा येणार याची खात्री होती,आणि तसेच झाले.:)
फुलाचा एखादा फोटु हिथ दिला असता तर अजुन छान वाटले असते...
दुव्यात दिलेला ब्लॉग पाहिला... ब्लॉग माझा स्पर्धेसाठीची तयारी पूर्ण झालेली वाटतेय ! ;)
17 Sep 2012 - 8:08 pm | मीनल
ब्लॉग केवळ व्हिडिओ पहाण्यासाठी दिला आहे. म्हणून इथे फोटो दिला नाही.
ती स्पर्धा? आता पुन्हा बक्षिस कोण देणार?
17 Sep 2012 - 8:12 pm | रेवती
इतके सुंदर वाटते आहे ते चक्र!
कळ्या आणि फूल करण्याचे कृती आवडली मीनलताई.
किती दिवसांनी दिसतीयेस!
आता येत रहा.
17 Sep 2012 - 8:13 pm | गणपा
कलाकुसर भारीये.
युट्युब वरचा दुवा दिला तर ती चित्रफीत लेखात अडकवता येईल.
17 Sep 2012 - 8:36 pm | निवेदिता-ताई
मीनल--- ब्लॉग खूपच छान....आवडला.....:)
19 Sep 2012 - 7:36 pm | रेवती
आणखी काही दिवस आधी हा धागा आला असता तर चक्र करू शकले असते. दोनेक तासात ११ फुले केली आणि मी केलेल्या चक्राच्या मागे चिकटवली. सराव झाल्यास पटापट होतात ही फुले. दिसतातही छानच.
19 Sep 2012 - 7:49 pm | मीनल
धन्यवाद रेवती. त्या चक्राचा आणि श्री गणपतींचा फोटो पहायचा आहे.
आता आमच्या घरी पूजा झाली आहे आणि मला ही फोटो टाकायचा आहे. पण इथे प्रतिसादात सोय नाही.
नविन मिपा वर १ MB पेक्षा जास्त टाकायची सोय सध्या उपलब्ध नाही.
19 Sep 2012 - 8:10 pm | रेवती
फोटो कसा चढवायचा हे बघतिये गं.
21 Sep 2012 - 2:38 pm | पियुशा
मीनलजी तुस्सी ग्रेट हो :)
24 Sep 2012 - 4:10 am | स्पंदना
पहिली सारी कृती मिनल अन अतिशय आवडली. आता पुढच्या गणपतीला करुन पाहेन.
24 Sep 2012 - 10:03 am | जयवी
मीनल....... फारच सुरेख दिसतंय गं !!
जास्वंदाची फुलं तर अगदी खरीच वाटताहेत. त्यातून स्वतः केलेली आहेत त्यामुळे बाप्पा खुश होणार तुझ्यावर :)
अवांतर : तुझ्या ब्लॉगवर प्रतिक्रिया द्यायचा मी खूप प्रयत्न केला पण प्रतिक्रिया जातच नाहीये.....काय कारण असावं ????
24 Sep 2012 - 10:07 am | पैसा
अप्रतिम कला आहे!