शेअरींग

सही रे सई's picture
सही रे सई in जनातलं, मनातलं
17 Jun 2012 - 11:07 am

संध्याकाळची सात वाजताची वेळ. रस्त्यावर नेहमीचीच तुडुंब गर्दी. मी ऑफिस मधुन घरी रस्त्यातुन वाट काढत काढत चालले होते. नळस्टॉपपाशी बराच वेळ सिग्नलला उभी होते. तेवढ्यात तिथे दोन मुले गुलाबांचे टवटवीत रंगीबेरंगी गुच्छ घेउन फिरताना मला दिसली. त्या गुलाबांकडे पाहिल्यावर इतक प्रसन्न वाटलं की चटकन ती फुले मनात भरली आणि घ्याविशी वाटली.

पण इतक्यात सिग्नल सुटणार असे माझ्या लक्ष्यात आले. मनाला थोडी रुखरुखच लागली. मनात म्हणलं हरकत नाही. उद्या घेउ ते गुच्छ. पण सिग्नल सुटल्यावर वळून थोडी पुढे आले आणि दिसले की काही बायका फुटपाथ वर हे असेच गुच्छ विकत होत्या. मी गाडी जरा लांब उभ्या असणाऱ्या एका वयस्क बाईच्या समोर जाऊन उभी केली. आजुबाजुला बघितलं तर, या फुट्पाथच्या एका कडेला या बायका आणि त्याचे नवरे मुले, ही फुले नीट लावून वेगवेगळ्या रंगांच्या फुलांचे गुच्छ तयार करत होती. जणू हा त्यांचा फॅमिली बिझिनेसच आहे. ते तिथेच राहातही असावित बहुदा. मी त्या बाईला विचारलं " कितीला एक देणार?" त्या बाईने २०-३० रुपयांनी जास्तच किंमत सांगितली. मी थोडी घासाघिस केली. पण ती बाई मला सांगायला लागली की "नाही ताई, एवढ्या कमी किमतीत नाही परवडत आम्हाला. सकाळत बाजारातून फुलं आणतो आम्ही. काही त्यातली दुपारपर्यंतच कशी खराब होतात. रात्रीपर्यंत फुलं खपली नाहित की कसं उरलेली फुले टाकून द्यावी लागतात आणि नुकसान होते आमचे". एवढं ऐकल्यावर मला वाटलं जाउदे. दोन पाचंच रुपये मिळणार यांना. तिनं कमी करून दिलेल्या किमतीला मी ती फुल घेउन घरी आले.

घरी येऊन फुले छान फ्लॉअरपॉट मधे सजवली. दिवाणखान्याला त्या फुलांनी एक वेगळचं रूप दिलं. येता जाता माझं लक्ष त्या फुलांकडेच लागुन राहायचं. आणि प्रत्येकवेळी त्या मावशी पण आठवयच्या. दोन दिवसांनी ती फुले कोमेजल्यावर मी पुन्हा त्याच बाईंकडून फुले घेऊन आले. मग दर दोन दिवसांनी त्याच मावशीं कडून फुले आणण्याचा जणु माझा नेमचं झाला.

मधे काही दिवस काही कारणानं मी फुले घ्यायची थांबले. आज घेउ, उद्या घेउ करता करता चांगले १५ दिवसांनी मी त्याच मावशीं कडे फुलं घ्यायला परत गेले. मधे इतके दिवस जाउनही ती मला विसरली नव्हती. मला तिने विचारलेही की ताई आला नाहीत खुप दिवस. तेवढ्यात तिथे तिचा नातु आला. आठ दहा वर्षाचा, गोल चेहऱ्याचा चुणचुणीत मुलगा. लांब त्याच्या मित्र मैत्रिणींमधे खेळता खेळता त्याचं लक्ष बहुदा माझ्याकडे गेलं असावं. आणि मी नवीन गिऱ्हाईक आले आहे असं वाटून तो तिथे पळत पळत आला असावा. आल्या आल्या त्याने एक दोन छान फुलांचे गुच्छ माझ्यासमोर धरले. आणि मोठ्या आजिजीने तो मला म्हणाला. "घ्या ना ताई, छान ताजी फुले घ्या" ती मावशी पण अभिमानाने आपल्या नातवा कडे बघत होती. त्याचं कौतुक तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहात होत. मी त्या मुलाकडून फुले घेतली. पैसे देउन मनीपर्स पुन्हा बॅगेत ठेवताना लक्षात आले की माझ्या पर्स मधे एक मोठी कॅटबरी आहे. त्या मुलानं इतक्या स्मार्टली मला ती फुलं विकली होती की मला त्याचं फार कौतुक वाटल. तो दिसायला आणि बोलायला पण खुप लाघवी होता. ते चॉकलेट पटकन मला त्याला द्यावस वाटलं. मनात हाही विचार आला की या गरीब लोकांच्या मुलांना कुठुन मिळणार चॉकलेट सारख्या गोष्टी खायला. मग लगेच ते चॉकलेट मी त्या मुलासमोर धरलं आणि त्याला म्हणाले " घे, तुला बक्षीस, मला छान फुलं निवडून दिलीस ना तु त्या बद्दल" ते चॉकलेट बघताच क्षणार्धात त्याचा चेहरा अत्यानंदाने उजळला की ते पाहून मला पण खुदकन हसूच आल. त्यानं ते चॉकलेट हातात घेतल्यावर उडीच मारली. मला वाटलं की ते तो लगेच तिथेच रॅपर उघडून खायला लागेल. पण...

नाही. थोडी दुर त्याचे जे ५-६ सवंगडी खेळतं होते, त्यांच्या कडे तो मुलगा धावत उंच उड्या मारत गेला. त्याने ते चॉकलेट हातात उंच धरून सगळ्यांना दाखवले. त्या सगळयाच चिल्यापिल्यांनी ते चॉकलेट बघुन एकच हल्लागुल्ला केला. त्या मुलाने ते चॉकलेट चे रॅपर काढुन एक एक छोटा छोटा तुकडा आपल्या प्रत्येक मित्र मैत्रिणीला दिला. आणि उरलेला शेवटचा तुकडा आपण खाल्ला.

मी हे सगळ बघत तिथेच उभी होते. त्या मुलाबद्दल अतीव कौतुक, खुप सारे आश्चर्य अश्या वेगवेगळ्या भावना माझ्या मनात दाटून आल्या होत्या. त्या सगळ्या माझ्या चेहऱ्यावर दिसल्या असणार बहुतेक.. कारण त्या मावशीचे शब्द कानावर आले "ताई, ही पोर नेहमीच काहीही खाऊ असाच वाटून खातात"

समाजजीवनमानप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

17 Jun 2012 - 11:16 am | श्रीरंग_जोशी

अश्या प्रसंगांचे साक्षीदार होणे खरंच भाग्याची गोष्ट आहे.

या लेखनातील ओघवती भाषाशैलीही आवडली.

पैसा's picture

17 Jun 2012 - 11:20 am | पैसा

लिखाण आवडलं.

गणपा's picture

17 Jun 2012 - 11:22 am | गणपा

छान लिहिलंय!
लिखाण आवडलं.

असेच म्हणतो.

मोदक's picture

19 Jun 2012 - 12:57 am | मोदक

+१

दादा कोंडके's picture

17 Jun 2012 - 11:33 am | दादा कोंडके

लेख अजिबात आवडला नाही.

मी ऑफिस मधुन घरी रस्त्यातुन वाट काढत काढत चालले होते

यात 'ऑफिसमधुन'च्या ऐवजी 'शाळेमधुन' असं असतं तर लेख ठिकठाक आहे असं वाटून प्रोत्साहनपर वरच्या संपादकांसारखं खरडलंही असतं. :)

किसन शिंदे's picture

17 Jun 2012 - 11:53 am | किसन शिंदे

तुला आलेला अनुभव आणि तो मांडण्याची तुझी हातोटी दोन्ही छानच. :)

तर्री's picture

17 Jun 2012 - 12:48 pm | तर्री

छोटा प्रसंग -छान वर्णन.
एकदम आठवले पु.ल.दे.
आज माणूस माणसाला पारखा झाला आहे....

तिमा's picture

17 Jun 2012 - 12:50 pm | तिमा

त्या मुलाच्या चेहेर्‍यावर तुम्हाला जो निखळ आनंद दिसला ते परमेश्वराचे एक रुप आणि त्याने त्याचा आनंद सर्वांना वाटला ते परमेश्वराचे आणखी एक रुप! ही दोन रुपें तुम्हाला बघायला मिळाली हे तुमचे भाग्य!
लिहित रहा.

निवेदिता-ताई's picture

17 Jun 2012 - 1:20 pm | निवेदिता-ताई

हो ना हल्ली शेअरींग हा प्रकारच कमी झालाय, एक किंवा दोन मुले असलेल्या घरात प्रत्येकालाच
भरपुर मिळत असते, आई वडील दोघेही नोकरीचे त्यामुळे आपल्या मुलांना काही कमी नको पडायला
म्हणून भाराभर वस्तू, पदार्थ आणून ठेवत असतात, त्यातले कित्येक वाया पण जात असतात.
अशा मुलांना शेअरींग करावे हे शिकवलेच जात नाही म्हणजे आपण मुद्दाम करतोय असे नाही,
तर आपल्याला मिळाले नाही ना, मुलांना भरपुर मिळावे,,ही भावना असते...
पण ज्यांना मिळत नाही ना अशा मुलांना याची खरी किंमत कळते. हे वरील उदा. वरुन लक्षात येते.

मुलांच शेअरिंग खासच.
पण सरेस मी अस ऐकलय की ही फुल सिमेटरी मधुन आणली जातात. त्यामुळ विकत घेताना जरा विचार करुन. अर्थात हे लिहिताना मी एका फॅमीलीच्या पोटावर पाय आणतेय हे मला माहित आहे.

किसन शिंदे's picture

17 Jun 2012 - 4:55 pm | किसन शिंदे

मी अस ऐकलय की ही फुल सिमेटरी मधुन आणली जातात.

सिमेटरी म्हणजे नक्की कोठून? हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकतोय.

दादा कोंडके's picture

17 Jun 2012 - 5:01 pm | दादा कोंडके

ख्रिस्तवासी जेथे चीरनिद्रा घेतायत ती जागा.

JAGOMOHANPYARE's picture

17 Jun 2012 - 2:51 pm | JAGOMOHANPYARE

अप्रतिम.

मुक्त विहारि's picture

17 Jun 2012 - 3:02 pm | मुक्त विहारि

आपण इथे, आपले अनुभव शेयर करत असतोच की....

किचेन's picture

17 Jun 2012 - 6:34 pm | किचेन

खुप छान.सुन्दर

मदनबाण's picture

17 Jun 2012 - 6:47 pm | मदनबाण

लेखन आवडले. :)

सही रे सई's picture

17 Jun 2012 - 10:47 pm | सही रे सई

मिपा च्या सगळ्याच वाचकांना खास करून येथे लिखाण आवडल्याची प्रतिक्रिया देणाऱ्यांना धन्यवाद. माझा हा पहिलाच प्रयत्न आहे असे आंतर्जालावर लिहिण्याचा. त्याचे तुम्ही तोंडभरून कौतुक केलेत, त्यामुळे पुढे लिहण्यास हुरुप आला. या लिखाणासाठी मी विशेष काही केले असे नाही तर हा प्रसंगच माझ्या साठी खुप अदभूत होता त्यामुळे हे आपोआपच लिहिले गेले.

निवेदिता-ताई तुम्ही जो विचार मांडलात अगदी तोच विचार करीत मी त्या दिवशी घरी आले.

ति.मा. तुम्ही या प्रसंगाकडे पाहण्याचा एक वेगळाच विचार दिलात मला.

तर्री.. पु.ल. दैवत आहे हो माझं (आपलं सगळ्यंचचं). त्यांच्या तुम्ही केलेल्या नुसत्या उल्लेखाने देखील काजाव्याला सुर्याकडे बघितल्या सारखे वाटले.

पुन्हा एकदा धन्यवाद!!!!

टर्मीनेटर's picture

18 Oct 2016 - 8:50 pm | टर्मीनेटर

"मिपा च्या सगळ्याच वाचकांना खास करून येथे लिखाण आवडल्याची प्रतिक्रिया देणाऱ्यांना धन्यवाद. माझा हा पहिलाच प्रयत्न आहे असे आंतर्जालावर लिहिण्याचा. त्याचे तुम्ही तोंडभरून कौतुक केलेत, त्यामुळे पुढे लिहण्यास हुरुप आला. या लिखाणासाठी मी विशेष काही केले असे नाही तर हा प्रसंगच माझ्या साठी खुप अदभूत होता त्यामुळे हे आपोआपच लिहिले गेले. "

छान लिहिलंय...
पण "त्यामुळे पुढे लिहण्यास हुरुप आला." लिहा कि पुढे पण.

सही रे सई's picture

18 Oct 2016 - 9:01 pm | सही रे सई

होय. प्रयत्न करेन असं म्हणलं खरं. पण नंतर ऑफिस मधे मिपा दिसेनास झालं आणि राहूनच गेलं. आता पुन्हा लिहायच्या आधी म्हणल पहिले लेखांना प्रतिसाद देऊन सुरुवात करू.

मोहनराव's picture

18 Jun 2012 - 1:03 am | मोहनराव

छान लेखन केले आहे. अशा प्रसंगातुनच जगण्याची आशा पल्लवित होत असते, असो.
मिपावर तुमचे स्वागत!

अर्धवटराव's picture

18 Jun 2012 - 1:37 am | अर्धवटराव

छान चितारलाय प्रसंग.

अर्धवटराव

रेवती's picture

18 Jun 2012 - 2:43 am | रेवती

लेखन आवडले.

मृत्युन्जय's picture

18 Jun 2012 - 12:12 pm | मृत्युन्जय

छानच लिहलय. साधासा प्रसंग आणि साधेसे निवेदन. दोन्हीही आवडले. :)

सहज भाषेतील लिखाणही आवडलं.

यकु यांनी सुरू केलेला 'अशात काय पाहिलंत?' हा एक चांगला धागा आठवला, आणि हा लेख तिथे एक आनंददायी अनुभव म्हणून शोभला असता असं वाटलं.

(सद्या तो धागा थंड आहे, 'मनात काहीतरी उमटवणारे' असे अनुभव येतात ना लोकांना, मग 'शेअर' का नाही करत कुणी?)

शैलेन्द्र's picture

19 Jun 2012 - 11:37 am | शैलेन्द्र

अनुभव, लेखन .. खुप आवडलं.. प्रसन्न करुन गेल...

दिपक's picture

19 Jun 2012 - 12:19 pm | दिपक

लिहित रहा

रुपी's picture

1 Dec 2016 - 12:35 am | रुपी

सुंदर लिहिलंय.. आवडलं :)

पाटीलभाऊ's picture

1 Dec 2016 - 1:35 pm | पाटीलभाऊ

छान लिहिलंय...पुलेशु