नैतिकता.
स्वतःच्या वागण्यावर स्वतःच घालुन घेतलेले किंवा अमुक गोष्ट अशीच केली पाहीजे अशा अर्थाचा समाजाचा आग्रह.
सध्या आपण समाजाच्या आग्रहाचा विचार न करता फक्त स्वतःच स्वतःवर घालुन घेतलेल्या बंधनाबद्द्ल बोलु.
अमुक एक गोष्ट करणे अथवा न करणे माझ्या तत्वात बसते असे आपण सांगतो. हे नक्की काय असते? तर आपण आपल्या बुद्धीनुसार अमुक एक पद्धतीने वागण्याचे ठरवतो. तसे वागणे हे आपल्या दृष्टीने नैतिकतेने वागणे असते. त्या तत्वाविरुद्ध आचरण करण्याची कल्पना आपल्याला सहन होत नाही. तसे वागणे हे आपल्याला अनेकदा अनैतिक वाटते. कळत न कळत आपल्या नैतिकतेचा आग्रह इतका वाढतो की समोरच्याने सुद्धा तसेच वागावे असे आपण ठरवायला लागतो. तर कित्येकदा ज्यांना आपण आदर्श मानतो त्यांच्या नैतिकतेच्या कल्पना आपण अंगिकारतो. हे अंगिकारणे जर बुद्धीचा वापर करुन असेल तर त्यात गैर काही नाही परंतु कुठलाही विचार न करता केवळ ते तसे वागतात म्हणून आपण तसे वागावे ही आंधळा प्रवास होय. ज्यात कदाचित भविष्यात नैराश्य पदरी येण्याची शक्यता असते.
पण नैतिकतेने वागणे म्हणजे नक्की काय? कित्येकदा नैतिक वागणे हे कायदेशीर असेल असे नाही आणि कायदेशीर वागणे हे नैतिक असेल असे नाही. मग महत्व कशाला द्यायचे ? कायदेशीर वागण्याला की नैतिकतेने वागण्याला? कायद्याचे राज्य, कायदेशीर वर्तणुक याला लोकशाहीमधे महत्व आहेच त्याचबरोबर समाजासाठी ते आवश्यक आहे हे आपल्यावर बिंबवले आहे. त्यामुळे कित्येकदा आपण आपली वर्तणूक केवळ बेकायदेशीर होत नाही ना हे पहातो. त्या साठी मग नैतिकतेचा सुद्धा बळी जातो. पण आपण ही तडजोड सहज करतो. मात्र आपण अनैतिक वागत आहोत असे कधीच मान्य करत नाही. कारण बेकायदेशीर आणि अनैतिक यात प्रचंड फरक आहे हे आपण जाणतच नाही.
कायदा झाला की कायदेशीर काय आणि बेकायदेशीर काय यात फारसा संभ्रम रहात नाही. परंतु नैतिक काय आणि अनैतिक काय याचा क्षणोक्षणी संदर्भ बदलत असतो आणि आपण तेवढा विचार करण्याची तसदी घेत नाही. सोईस्कर रित्या कायदेशीर तेच नैतिक आणि बेकायदेशीर तेच अनैतिक अशी समजुत करुन घेत आपल्या दृष्टीने आपला तिढा सोडवतो. पण तो सुटलेला असतोच असे नाही.
प्रतिक्रिया
7 Jun 2012 - 4:29 pm | परिकथेतील राजकुमार
नैतिक आणि अनैतिक असले काय नसते.
7 Jun 2012 - 4:36 pm | ढब्बू पैसा
आमचा विश्वास ननैतिकतेवर आहे ;)
7 Jun 2012 - 6:25 pm | कुंदन
>>नैतिक आणि अनैतिक असले काय नसते.
तो केवळ एक भास असतो.
7 Jun 2012 - 6:27 pm | मोहनराव
<<नैतिक आणि अनैतिक असले काय नसते.>>
सर्व मनाचा खेळ आहे...
7 Jun 2012 - 4:30 pm | विनायक प्रभू
येळ्कोट येळ्कोट जय मल्हार.
एकटा भेजा फ्राय करतो तर हा नान्या दही बनवतो.
7 Jun 2012 - 4:40 pm | Maharani
नैतिक आणि अनैतिक हे समाजाने घालुन दिलेले नियम आहेत.आपण जेंव्हा समाजात राहातो तेंव्हा काही नियम पाळणे आवश्यक/अपेक्षित असते.हे नियम सर्वांना कळावे म्हणुन व सर्वांच्या हितासाठी कायदे केले गेले.
7 Jun 2012 - 5:09 pm | परिकथेतील राजकुमार
समाजने मुझे क्या दिया ?*
*श्रेयाव्हेर :- कणेकर गुर्जी.
7 Jun 2012 - 6:16 pm | रमताराम
एवढा सौंदर्यफुफाटा दिला होता की क्याफेत, एवढ्यात विसरलास?
8 Jun 2012 - 11:13 am | परिकथेतील राजकुमार
तो मला B.A. Firsl Class First आल्याबद्दल मिळालेला आहे.
बाकी खालच्या काही प्रतिक्रिया वाचून बेदम हसलो.
अहो, भरल्या पोटाने आणि भरल्या खिशाने अशा चर्चा करायची मजाच वेगळी. पण खरे सांगू का, एकदा खिसे फाटके असताना पोटात आगीचा डोंब उसळला ना, की मग नैतिकता अनैतिकता ह्या फक्त वांझोट्या चर्चा ठरतात. महत्वाची ठरते ती फक्त पोटाची भूक.
8 Jun 2012 - 1:13 pm | निनाद मुक्काम प...
सहमत
फक्त खिसा भरलेला असो किंवा नसो
पण शरीराची भूक हि निसर्ग नियमाला अनुसरून असते.
समाजाने त्याची सोय करण्यासाठी विधीपूर्वक लग्न हा विधी मंजूर केला आहे.
पूर्वी सोळाव्या वर्षी लग्न होत. आता लग्नासाठी शिक्षण नोकरी , मालमता आणि अजून बरेच निकष आडवे आल्याने लग्नाचे वय ३० पर्यंत पोहोचले आहे.
आता शरीर म्हणाले की ......
असे बाईंडर म्हणून गेलच आहे की.
8 Jun 2012 - 2:35 pm | परिकथेतील राजकुमार
अहो मी पोटाच्या भूके विषयी बोलतो आहे हो.
8 Jun 2012 - 5:26 pm | निनाद मुक्काम प...
ते कळले हो (त्याच्याशी सहमत आहे )
आणी मी शरीराच्या
म्हणूनच सुरवातीला लिहिले की खिसा भरलेला असो किंवा रिकामा
निसर्गनियमानुसार शरीराची गरज किंवा भूक हा नैसर्गिक प्रकार आहे.
मात्र नर आणि मादी ह्यांच्या मिलनात सध्याच्या समाजात नैतिकतेचे अवास्तव स्तोम माजवण्यात आले आहे.
असे आमचे प्रामाणिक मत आहे.ह्यामुळे बलात्कार व अजून अनेक गुन्हे घडतात.
7 Jun 2012 - 4:43 pm | sneharani
छान लिहलं आहेस.
एखादं उदाहरण दिलं असतं तरी चाललं असतं की!!
7 Jun 2012 - 4:45 pm | बॅटमॅन
आधी मृत्यु, आता नैतिकता, नंतर काश्मीर प्रश्न, अमेरिकेची आर्थिक घडी बसविण्याचा खरा मार्ग कोणता, बाजरीवरील कीड, इ.इ. सर्व विषय ओळीने पाहून ड्वॉले पाणवले ;)
7 Jun 2012 - 5:07 pm | बिपिन कार्यकर्ते
एके काळी मोजून पन्नास विषयांची यादी देऊन त्यावर लेखन करण्याचे प्रॉमिस करणारे नानासाहेब आम्ही अजून विसरलो नाही. बघू... कधी होतंय ते! :)
7 Jun 2012 - 5:24 pm | बॅटमॅन
ऐला खरंच? बघूच मग :)
7 Jun 2012 - 6:24 pm | रमताराम
नानासाब आता जिवात जीव आला. थेट मृत्यूवर वगैरे लिहायला लागलात तेव्हा अंमळ घाबरलो होतो. पराला फोन करून लक्ष ठेवायला सांगितलं होतं.
नैतिकता हा बहुतेक वेळा वादाचा मुद्दा राहतो. नैतिकता ही बहुधा विशिष्ट व्यवस्थेच्या अंतर्गत निश्चित केलेली असते, त्याचे मूल्यमापन त्या व्यवस्थेसंदर्भातच करायला हवे हा महत्त्वाचा मुद्दा बहुधा विसरला जातो. त्यामुळे मग वेगवेगळ्या संदर्भात नैतिक मानल्या गेलेल्या पण वरकरणी परस्परविरोधी भासणार्या गोष्टींपैकी कोणती नैतिक यावर रणं माजतात.
नैतिकता म्हणजे कायदा नव्हे. केवळ नैतिक मानले गेलेले कृत्य न केल्याबद्दल किंवा अनैतिक मानले गेलेले कृत्य केल्याबद्दलच - जर स्वतंत्रपणे ते बेकायदेशीर देखील ठरवले गेले नसेल तर - ती व्यक्ती दंडनीय ठरत नाही. किंबहुना नैतिकतेला स्वतःचे असे दंडविधान नसते. त्या कृत्याचे परिणाम बहुधा अप्रत्यक्ष स्वरूपाचे - दुय्यम सामाजिक स्थान वगैरे स्वरूपाचे - असतात.
7 Jun 2012 - 7:09 pm | शुचि
वैयक्तिक नैतिकतेचे एक उदाहरण देते - आम्हाला टेक्सासमध्ये सी व्ल्ड ला जायचे होते. आई बाबा थकलेले आणि थोडे वय झालेले असल्या कारणाने बर्याच पाण्याच्या बाटल्या घेऊन जाणार होतो, कारण पायपीट खूप असते आत सी वल्ड मध्ये. ओढत घेऊन जायला आणि बर्फ/बाटल्या ठेवायला वॉलमार्ट मध्ये, एक "क्रेट" मिळतो $२० ला.
सी वल्ड च्या ट्रीपनंतर त्या क्रेट चा काहीही उपयोग नव्हता. मैत्रिणीने सुचविले. मग एकदा वापर आणि परत कर. मी म्हटले "शक्य नाही". वापरलेली गोष्ट मी परत करणार नाही कारण ते माझ्या तत्वात बसत नाही.
_____________________________________________
अजून एक "करड्या" रंगातील उदाहरण. मी नववीत असेन. माझ्या मैत्रिणीच्या मोठ्या बहीणीचे लग्न ठरले होते. मी खूप नटले. आईला म्हटले मला "वधूपेक्षा सुंदर दिसायचे आहे" ...... आई ने समज दिली, कान उघडणी केली की असली महत्त्वाकांक्षा ठेवायची नाही. अशी स्पर्धा आयुष्यात कधीच करायची नाही. आता यात काही जणांना वावगे दिसेल काहींना दिसणार नाही. पण ही मूल्ये आहेत.
_______________________________
दुसर्याच्या संसारात वीष न कालविणे
आपण बरे की आपले बरे असे वर्तन ठेवणे
बाह्य रूपापेक्षा आंतरीक गुणांची जोपासना करणे
आदि अनेक मूल्ये आईने दिली. याला मी माझ्या नैतिकतेचा कणा म्हणेन.
7 Jun 2012 - 7:59 pm | पैसा
पटलं. नैतिकतेची व्याख्या ही व्यक्तीसापेक्ष, कालसापेक्ष असते. तसंच प्रत्येक व्यक्तीसमुहागणिक बदलत जाते. त्यातही प्रत्येकाच्या मनात एखादी गोष्ट किती अनैतिक याच्या कमी जास्त श्रेण्या ठरलेल्या असतात.
पूर्वी काळी राजेलोक अंगवस्त्र/उपपत्न्या बाळगत असत. त्यात कोणाला कधी काही वावगं वाटलं नाही. पण आजच्या काळात असा विचार करणंही आपल्याला पटणार नाही.
एखाद्या माणसाला पैसे खाणं अनैतिक वाटेक, तर एखाद्याला पैसे खाऊन काम न करणं. काही व्यापारी बंधू भगवान श्रीकृष्णाला १ टक्क्याचा पार्टनर समजतात म्हणे. मग कृष्णाच्या देवळात संगमरवरी फरशा घातल्या की स्वतः केलेला काळा बाजार नैतिक होतो अशी त्यांची समजून असावी.
पाश्चात्य संस्कृतीमधे राजकारण्यानी भ्रष्टाचार करणं जास्त अनैतिक मानलं जाईल, तर आपल्याकडे राजकारण्याने व्यभिचार करणं भ्रष्टाचाराहून जास्त अनैतिक समजलं जाईल.
हेही पटलं आणि आवडलं!
8 Jun 2012 - 1:03 am | निनाद मुक्काम प...
नैतिकता
ह्या बद्दल अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांचे एक सुप्रसिद्ध विधान शीत युद्धाच्या पार्श्व भूमीवर
फार प्रसिद्ध पावले होते ह्याची आठवण झाली.
नैतिकता देशाच्या सीमेवर संपते.
नैतिकता वैगैरे सब झूठ आणि काही लोक त्याबद्दल भाकड संकल्पना समाजाच्या मनी रुजवून त्या अनेक पिढ्या मेंढरी वृत्तीने वाहत राहतात.
आपल्या पुढे नेहमीच कोणत्याही गोष्टीबाबत दोन पर्याय असतात.
ती करणे किंवा न करणे
ह्यामुळे एखादी गोष्ट करण्यास भीड ,लाज वाटत असेल तर ती करू नये.
व जर ती केलीच मग समाजाला अजिबात घाबरू नये
.
प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांना आलेले वयक्तिक अनुभव , सामजिक संस्कार ,
वाचन व भवताली असलेल्या परिस्थितीचे आपला मेंदू , करीत असलेले निरीक्षण
ह्या सर्व गोष्टी आपल्या शरीराच्या संगणकात मेंदू रुपी सोफ्ट वेअर मध्ये फीड होतात.
व त्यात्नून आपण एखाद्या गोष्टीविषयी मत ,धोरण ,तत्व ,नियम ह्यांची विचार रुपी
एक प्रोग्राम बनवतो. व म्हणूनच नैतिकता व्यक्ती व स्थळ ,काळ सापेक्ष असते.
आपला सांगाडा व देहाचा बाह्य साचा जरी सारखा असला तरी
नैतिकतेचा प्रोग्रेम हा कधी पुरोगामी तर कधी प्रतिगामी तर कधी
मोका फरस्त असतो.
8 Jun 2012 - 10:44 am | जयंत कुलकर्णी
//आपल्या पुढे नेहमीच कोणत्याही गोष्टीबाबत दोन पर्याय असतात.
ती करणे किंवा न करणे ///
तिसरा पर्याय असतो तो म्हणजे तीच गोष्ट करणे पण वेगळ्या पद्धतीने करणे. बस्स या तीनच......
8 Jun 2012 - 1:13 pm | आनन्दा
देव, देश आणि धर्म यांची हानी न होईल असे वागणे म्हणजे नैतिकता.. असे आपले मला वाटते.
8 Jun 2012 - 1:21 pm | सुहास..
च्यायला !
9 Jun 2012 - 6:18 am | स्पंदना
नैतिकतेच्या नावाखाली जो कर्मठपणा येतो तो नाही आवडत मला. पण सौजन्यशिल वागण्याला नैतिक म्हणता येइल का?
9 Jun 2012 - 10:21 am | कवितानागेश
सरळ आरशासमोर उभे रहावे.
स्वतःच्या डोळ्यात रोखून बघावे.
जी गोष्ट आठवताना, किंवा विचार करताना स्वतःच्या डोळ्यात तसेच रोखून बघता येते, ती 'नैतिक',
ज्या वेळेस बघता येत नाही ती अनैतिक.
9 Jun 2012 - 10:28 am | मदनबाण
नानाला चेंगटपणा करायला बराच वेळ मिळतोय हे कळलं ! ;)