जिन्याची विहीर (फोटोसकट)

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
9 Nov 2011 - 2:31 pm

नाती म्हटलं की डोळ्यासमोर येतात रक्ताची, मैत्रीची नाती. पण आपल्या आसपासच्या ज्या वास्तू असतात त्यांच्यासोबतही आपले जिव्हाळ्याचे, भावनिक नाते जोडले गेलेले असते. अशीच एक माझ्या लहानपणापासूनची माझ्या माहेरची वास्तू म्हणजे जिन्याची विहीर.


बालपणी आजी, वडील, आई, माझा मोठा भाऊ व मी असे आमचे कुटुंब. आई प्रार्थमिक शिक्षिका, (आता रिटायर्ड) वडील कुर्ल्याला प्रिमियर कंपनीत होते (आता व्हॉलेंटरी रिटायर्ड). वडिलांना ४ भाऊ व ५ बहिणी पण आत्या लग्न होऊन गेलेल्या व सगळे काका नोकरी निमित्ताने मुंबईमध्ये स्थायिक झालेले. पण केवळ वाडीची देखभाल व्हावी म्हणून वडील रोज कुर्ला ते उरण जाऊन येऊन करत. दिवसा वाडी, शेती सांभाळायची
म्हणून त्यांनी कायमची नाइट शिफ्ट स्वीकारली. ते रोज संध्याकाळी ७ ला घर सोडून मचव्याने मुंबईला जात आणि नाइट शिफ्ट करून सकाळी १० पर्यंत घरी येत. ते दुपारी १ ते ३ झोप काढत व बाकीची झोप प्रवासात घेत. ह्या वाडीशी त्यातील वास्तुंशी जुळलेल्या जिव्हाळ्यामुळे त्यांना नाईटशिफ्टचा थकावा कधी जाणवलेला वाटलाच नाही.

वडिलांनी ह्या वाडीकडे कधी व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलेच नाही. भात पिकायचा तो पूर्णं वर्षभर पावण्या रावण्यांसकट सगळ्यांना पुरायचा. फळफळावळ वडील प्रत्येक सीझनला सगळ्या त्यांच्या भावंडांना मुंबईला स्वतः वाटायला जायचे. मळ्यातून जे उत्पन्न निघायचे ते वाडीचे डागडूगीकरण, गड्याच्या पगार भागवण्यापुरते असायचे.

आमची वाडी पाच एकराची होती. वाडीत शेती होती, दिवाळीत शेती कापली की हिवाळ्यात वडील गड्याच्या साहाय्याने भाज्यांचा मळा लावायचे. वाडीत फळफळावळही भरपूर होती. आंबे, फणस, चिकू, पेरू, नारळ, ताडगोळे, जांभळ, बोरं, करवंद, चिंचा, सीझनमध्ये अमाप यायच्या. माझे लहानपण जांभळा, बोरांच्या सावलीत जाऊन रानमेवा खाण्यात गेला आहे. ह्या सगळ्या झाडांना, मळ्याला, शेतीला ताजेतवाने ठेवणारी
आमच्या वाडीतील वास्तू म्हणजे आमची अनोखी जिन्याची विहीर.

वाडी माझ्या आजोबांनी घेतली होती. जेव्हा वाडी घेतली तेव्हा आधीपासूनच त्यात एक विहीर होती. विहीर १०० वर्षापूर्वीची असल्याचा दावा आहे. ह्या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे विहिरीत आत उतरण्यासाठी विहीरीच्या बाहेरून दोन खास जिने आहेत. जिन्याच्या सुरुवातीच्या कठड्यांना वळणदार नक्षी आहे.

जिने उतरले की एक त्यात एक आपण उभे राहू शकतो असा हौद आहे. त्याला कमान आहे. त्या कमानीखालच्या कट्यावर बसले की पाण्यात हात घालता येतात. विहिरीत उतरायचे असले की ह्या हौदातूनच उतरायचे. ह्या हौदाला व जिन्याला लागून दोन खांब बसवलेले आहेत. त्यावर बसता, उभे राहता येते. शिवाय हौदाचा कट्टा आहे. विहिरीच्या कडेलाच पूर्वी पाणी ओढण्याची मोट होती. ही मी कधी पाहिली नाही पण
थोरामोठ्यांच्या गप्पांत त्याचा नेहमी उल्लेख येतो. बैल जुंपून पूर्वी शेतीला मोटीचे पाणी दिले जाई.

कालांतराने सरकारची शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या पंपाची योजना आली. आजोबांनी तेव्हा तिथे पंप बसविला. पंपाला एक खोली केली. रहाटाच्या जागी एक थाळा बांधला. पंपाचे तोंड थेट पाणी साठवायच्या थाळ्यात.

थाळ्याला दोन भोगदे आहेत. त्या भोगद्यातून शेतीच्या दोन्ही दिशांना पाटाद्वारे पाणी जाते. पंपाला इतका फोर्स आहे की आपण त्या पाण्याखाली हात धरला की बॅलंस न राहता हात प्रेशरने खाली जातो. पाच एकरच्या जमिनीला ही विहीर पंपाच्या साहाय्याने हिरवीगार ठेवत होती. पावसाळ्यात विहीर पूर्ण भरायची कधी कधी हाताने पाणी काढता यायचे. जिन्याची शेवटून तिसरी पायरी शिल्लक राहील इतके पाणी
भरायचे. हौद तर दिसायचाच नाही.

विहिरीच्या थाळ्यात व आतील हौदात माझ बालपण गेल. ह्या विहिरीने माझ्याशी मैत्रीच नात जोडल होत. आमचे घर विहिरीपासून १. ५ किलोमीटरवर होते. तेव्हा घरात नळ नव्हता. शाळेत जायच्या आधीच आई व आजी दोघी विहिरीवरून पाणी भरून आणायच्या. डोक्यावर त्या हंड्यांच्या राशी आणि हातात एक कळशी असे त्या दोघींच गौळण रूप मला खुप आवडायच. मलाही मग अनुकरण करावस वाटायच. मी आईकडे पाणी भरण्यासाठी
हट्ट करायचे तेव्हा मग आई माझ्या हातात एक तांब्या द्यायची. तो तांब्या घेऊन मी आईसोबत पाणी आणायला जायचे. भांडी व कपडे आई विहिरीवरच्या थाळ्यातच धुवायची. भाऊ लहान होता तेव्हा तोही जायचा आईला पाणी काढून देण्यासाठी. कारण पंप सारखा लावता यायचा नाही. तो शिंपण्यासाठीच वापरात यायचा. मीही मग लुडबूड करायला जायचे थाळ्यात मज्जा करायला. काही दिवसांतच वडिलांनी विहिरीच्या बाजूला
एक पाण्याची टाकी बसवली व त्या टाकीचे पाणी पाईपलाईनद्वारे आमच्या घरातील नळात येऊ लागले. तेव्हापासून फक्त जेव्हा लाइट नसेल तेव्हाच आम्हाला पाणी भरण्यासाठी विहिरीवर जावे लागे. पण त्यामुळे विहिरीची संगत काही कमी नाही झाली. उलट जसजसे माझे वय वाढत गेले तसतशी ती वाढतच गेली.

उन्हाळ्यात शाळेतून आले की मी वडीलांच्या बरोबर शेतावर जात. मग वडिलांनी पंप चालू केला, त्याचे शिंपणे उरकत आले की मी थाळ्याच्या दोन्ही बाजूचे भोगदे दगडे, मोठी पाने लावून बंद करायचे. स्विमिंग पुल प्रमाणे थाळ्यात पाणी साचवून मनसोक्त डुंबायचे. गार गार पाण्यात सुरुवातीला थंडी लागायची पण नंतर सवय होऊन निघू नये असेच वाटायचे. हिवाळ्यात संध्याकाळी ह्याच थाळ्यात मग आई
कोथिंबीर, मुळा, मेथी ह्या लागवड केलेल्या भाज्यांची मुळे धुवायची. ती धुवायलाही मी मध्ये मध्ये लुडबुडायचे. आमच्या विहिरीत मासेपण होते. मधून मधून भाऊ आणि त्याचे मित्र गळ लावून मासेही पकडत. मलाही हा गळ ध्ररायला मज्जा वाटे. पण अजून एकही त्या विहिरीतील मासा माझ्या गळाला लागला नाही.

शाळेत जायला लागल्यावर माझी खेळाची अभ्यासाची आवडती जागा म्हणजे पायऱ्या उतरून गेल्यावर असणारा हौद. हौदात गेल्यावर गार गार वाटायच. उन्हाची झळ तिथे पोहोचत नाही. ह्या हौदात मी अभ्यास करायचे, खेळायचे. कविता, गाणी म्हणायचे. कधी कधी तर रुसून पण त्या हौदात जाऊन बसायचे. मी तशी पाहिल्यापासूनच धाडसी होते. भूत वगैरे मी कधी मानलेच नाही. त्यामुळे बिनधास्त एकटी बसायचे. तसेही वडील व
गडी वाडीत असायचे. ते मधून मधून मला बघून जायचे.

विहिरीच्या जवळच एक साखरबाठी ह्या जातीचा आंबा होता. हा आंबा सगळ्यात वेगळा. आकाराने लहान, ह्याचा रंग हिरवाच असायचा पिकला की फक्त नरम व्हायचा. आतून पांढराच. पिवळा रंग नव्हताच. पण चव मात्र साखरेसारखी गोड म्हणून तो साखरबाठी आंबा. ह्या आंब्याचे बरेचशे आंबे ह्या हौदात, जिन्यावर व विहिरीत पडायचे. हे आंबे गोळा करण्या साठी मी सकाळी जायचे व हौदातून, पायरीतून गोळा करायचे. विहिरीत
पडलेले आंबे लामण्याने मोठी माणसे काढायची. एखादा आंबा राहिलाच तर त्याचा वास हौदातील पाण्यात मिसळायचा. ह्या विहिरीने त्या आंब्याची मधुरात चाखली आहे. कालांतराने ते आंब्याचे झाड वार्धक्याने गेले. पण त्याच्या आठवणी अजून जिभेवर आहेत. विहिरीच्या पाण्यात मिसळलेल्या आहेत.

आमच्या वाडीत ताडाची भरपूर झाडे होती. ताडाच्या पेंडी उतरवणारा माणूस यायचा. तोच विकायला न्यायचा. पण एका वेळी एवढे ताडगोळे काढून विकणे शक्य नसायचे मग ते ताजे राहावेत यासाठी त्या पेंडी वडील विहिरीत टाकून ठेवायचे. ते टाकताना बघायलाही मला खुप गंमत वाटायची. त्या टाकल्या की अस वाटायच की आता बुडणार. पण त्या चक्क तरंगायच्या.

दिवाळी, मे महिन्याची सुट्टी म्हणजे आमच्याकडे काका-आत्यांच्या कुटुंबाची जत्राच. माझी २०-२५ चुलत भावंडे एकत्र यायची. मग काय दिवसा मुक्कामपोस्ट फक्त विहीर आणि वाडी. माझ्या वडिलांनी ह्याच विहिरीत माझ्या सर्व चुलत भावंडांना, भावाला पोहायला शिकवले. मी सगळ्या भावंडात सर्वात लहान. त्यामुळे मी बघत बसायचे. वडील त्या भावंडांना दोरी बांधायचे आणि विहिरीत उडी मारायला लावायचे.
एखादा घाबरला, उडी मारली नाही तर सरळ त्याला आत ढकलायचे. हे दृश्य मात्र मला खुप भीतिदायक वाटायचे. माझ्या भावाला वडिलांनी तो अवघा ४ वर्षांचा असतानाच पोहायला शिकवले. मलाही त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न केला. पण एकदा अशीच सगळी भावंडे विहिरीत उतरली होती. मला वडिलांनी विहिरीत टायर वर बसवून इतर भावंडांच्या हाती सुपूर्द करून वर दुसऱ्या एका भावाला दोरीने बांधून टाकण्यासाठी
गेले. वडिलांनी त्या भावाला विहिरीत ढकलले त्याच्या उडीने पाणी घुसळून माझा टायर उलटा झाला. माझे डोके खाली व पाय वरती झाले. तेवढ्यात माझ्या आत्तेबहिणीने पाहिले आणि माझे पाय घट्ट पकडून ठेवले व वडिलांना हाक मारली. वडिलांनी लगेच विहिरीत उडी मारली व मला बाहेर काढले. त्या दिवसापासून मी कधीच विहिरीत उतरले नाही. पण आतील हौदावर बसून विहिरीत पाय सोडून बसायचे.

पुढे मी मोठी झाल्यावर वडिलांना मदत करायला मी सुद्धा शिंपण करायचे. पाटात येणारे पाणी सगळ्या शेतात, झाडांना एक एक पाट उघडून फिरवायचे. अहाहा काय धन्यता वाटायची झाडांना पाणी पाजून त्यांना जीवनदान देण्यात! गावातील लोक म्हणायचे की ह्या विहिरीला मोठे झरे आहेत. पण ते कधी मला लहानपणी दिसले नाहीत. कारण दिसायची वेळच त्या विहिरीने कधी आणले नाही. सदा त्या हौदापर्यंत भरलेली
असायची. पाच एकराच्या वाडीला पाणी शिंपूनही तिने स्वतः कधी तळ गाठला नाही.

पण एक दिवस असा किस्सा झाला की आम्हाला ह्या विहिरीचा तळ काढावा लागला. आमच्या वाडीत एक गडी होता. आमच्या घरात घरातल्यांनी कधीच कुठल्या गड्याला गडी म्हणून मानले नाही. तो नेहमी आमच्या सोबतच पंगतीत जेवायचा, त्याचे नातलग लांब म्हणून माझे आई-वडील मला त्याला रक्षाबंधन, भाऊबीज करायला लावायचे. त्याच्यासाठी कपडे आणायचे. तो पण मला गोष्टी सांगायचा. थोडासा भोळसटच होता. नुकतेच
त्याचे लग्न झाले होते व तो महिनाभर गावी राहून परत कामावर रुजू झाला होता. काही दिवसातच तो आजारी पडला. ताप येऊन त्याला खुप अशक्तपणा आला होता. तो आमच्या माळ्यावर झोपायचा. माळयाचा जिना घरा बाहेरूनच होता. वडिलांनी त्याला डॉक्टरांकडे नेऊन आणले. काविळीची शक्यता वाटली म्हणून काविळीचे औषधही दिले. तो म्हणायचा की माझ्या अंगाची आग-आग होतेय. माझ्यावर कोणीतरी करणी केली आहे. मी
गावाला जातो करणी बघून येतो अस काहीतरी बडबडत होता. पण अशा अशक्त अवस्थेत त्याला कस पाठवणार म्हणून त्याला वडिलांनी सांगितलं की तू थोडा बरा हो मग जा गावाला. पण सकाळी तो दिसलाच नाही. अशा अवस्थेत तो कुठे गेला असेल? तेव्हा फोनही नव्हता त्याच्या गावला. वडिलांनी त्यांच्या मित्रासोबत गावाला निरोप पाठवला की तो गावाला आला असेल तर आम्हाला कळवा. सगळीकडे शोधाशोध केली पण तो कुठेच
सापडला नाही. तो गावालाच गेला असेल असा आम्ही तर्क काढला. माझी एक आत्या आमच्या गावात राहायची. ती फ्रेश होण्यासाठी सकाळी विहिरीवर यायची. गडी गेल्याच्या तिसऱ्या-चौथ्या दिवशीच ती विहिरीवरून घाबरलेली धावत घरी आली. आणि अडखळत सांगू लागली. गडी... विहिरीत फुगून वर आलाय. सकाळची वेळ वडील कामाला गेलेले. भाऊ मित्रांसोबत पिकनिकला गेलेला. आम्ही घरातील मंडळी सुन्न झालो. काय करावे
कळेना. मग आम्ही ताबडतोब वडीलांच्या मित्राला घरी बोलावले. वडील येईपर्यंत त्यांनी पोलिस स्टेशनला वगैरे कळवले. आम्ही सांगितल्याप्रमाणे तो बेपत्ता असल्याचे वगैरे सांगितले. वडिलांना एस. टी. स्टँड वरच कोणीतरी ही बातमी दिली. वडील जे तडक रिक्षांतून उतरून आले. ते घरात येऊन आलेल्या ह्या प्रसंगावर रडू लागले. भाऊही तोपर्यंत आला. तोही घाबरलेला. सगळ्यांनी त्यांना समजवलं.
गड्याच्या गावी कळवले. त्याचे काही नातलग आरडाओरडा करतच आले. साहजिकच होते ते. घरातल्यांनी सगळी हकीगत त्यांना सांगितली. गावची त्याचे अर्धे नातलग आम्हाला दोष देत होते. पण गड्याच्या वडिलांनीच त्यांना शांत केले. कारण तो जेव्हा घरी जायचा तेव्हा आमची वागणूक तो त्यांना सांगायचा. आपल्याला मुलाप्रमाणेच वागवतात ही गोष्ट त्याने घरात सांगितली होती. त्या काळी आम्हाला खरी नाती
समजली. गावातील काही माणसे धावून आली तर काही फिरकलीच नाहीत. आम्हाला धीर देण्यासाठी बरीचशी गावकरी मंडळी रात्री उशिरा पर्यंत आमच्या घरी बसून असायची. ती विहीर साक्षी होती म्हणून तिच्या कृपेने गड्याच्या वडिलांनी माझ्या वडिलांचा काही दोष नाही ही पोलिस स्टेशनला जबानी दिली. पोलिसांच्या तपासात अशक्तपणात त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडल्याचा निष्कर्ष निघाला.

पाणी दूषित झाल्याने आम्ही काही दिवस गावात येणाऱ्या नळाचे पाणी पिण्यासाठी वापरू लागलो. आमच्या सगळ्या आप्तजनांनी तीन-चार पंप इकडून तिकडून गोळा करून विहिरीचा तळ उपसला. विहिरीच्या मोठ्या झऱ्यांमुळे पाणी उपसण्याचे काम दोन दिवस चालूच होते. काम सगळे रात्री २-३ पर्यंत करायचे. तेव्हाही मी न घाबरता सगळ्यांसाठी चहा घेऊन अंधारात एकटी जायचे विहिरीवर. अखेर तळ स्वच्छ केला आणि
पाणी साचल्यावर पुन्हा पोटॅशियम टाकून पाणी स्वच्छ केले. विहीर पुन्हा आपल्या कामावर रुजू झाली. पुन्हा आपले मायेचे झरे ती आमच्यावर, वाडीवर पाझरू लागली. त्यानंतर आम्ही पुन्हा वाडीत गडी ठेवला नाही. फक्त रोज येऊन जाणारे मजूर लावले. त्या विहिरीजवळ सुरुवातीला मजूरही घाबरायचे गड्याचे भूत येईल म्हणून पण आम्हाला कोणालाच त्या विहिरीवरच्या प्रेमाने असे वाटले नाही. मी नंतरही
विहिरीच्या हौदात अभ्यासाला जायचे.

अशी ही आमची विहीर. आम्हाला सतत साथ देणारी सुखाबरोबर असे भयानक क्षणही तिने आमच्या सोबत रिचवले आहेत. सदैव आमच्या वाडीला आपल्या जीवनाचा पुरवठा केला आहे. भाज्या पिकवल्या आहेत, शेती पिकवली आहे, फळबागा फुलवल्या आहेत. माणसे-जनावरांची तहान भागवली आहे. आम्हाला अंगा खांद्यावर खेळवले आहे.

कालांतराने माझ्या भावाचे लग्न झाले. आजीचे वय झाल्याने आजीने तिच्या मुला-मुलींमध्ये जागेचे हिस्से करण्यास सांगितले. दोन काकांचे कुटुंब रिटायरमेंटनंतर वेगवेगळी घरे बांधून वाडीत राहू लागले. वाडीत इतर लोकांची वर्दळ चालू झाली. प्रिमियरच्या कंपल्सरी व्हॉलेंटरी रिटायरमेंटमध्ये वडिलांनी सेवानिवृत्ती स्वीकारली. आई ही काही वर्षांत रिटायर्ड झाली. वाडीच्या हिश्शामुळे,
मजूर न परवडण्यामुळे शेती करणे वडिलांनी बंद केले. काही वर्षांत वार्धक्याने आजी वारली. माझेही काही वर्षांत लग्न झाले.

विहीर एका काकांच्या हिश्शांत गेली होती पण ती कॉमन ठेवायची असा निर्णय घेण्यात आला होता. ही विहीर ज्या काकांच्या हिश्शांत गेली होती ते काकाही काही वर्षांनी वारले. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा त्या हिश्शाची देखभाल करू लागला. पण काही आर्थिक परिस्थिती मुळे पुढे माझ्या वडिलांनी व त्या भावाने जागेचा काही भाग विकला. नेमकी काकांच्या विकलेल्या हिस्यातील त्या भागात ती
विहीर गेली. विकत घेणारा बिल्डर आहे. त्याला विहीर कॉमन असल्याचे सांगितले. त्याने तेव्हा कबूल केले. पण कागदपत्रांत तसा उल्लेख त्याने नाही केला. व्यवहारातील पायवाटेच्या जागेवरून झालेल्या वादाचा राग त्याने विहिरीवर काढला. त्याने लगेच विहिरी भोवती तारेचे कंपाउंड लावून घेतले. वडिलांना हे कळताच वडील त्याला जाब विचारण्यासाठी गेले. पण त्याने वेडी वाकडी उत्तरे दिली व
जास्त वाद घातलात तर विहीरच तोडून टाकेन ही धमकी दिली. ही भाषा वडिलांना रुचली नाही. घरातील सगळेच विहिरीसाठी हळहळले. मी माहेरी गेल्यावर विहिरीजवळ जाणेच बंद केले. पण ह्या धक्क्याने तेव्हा वडील आजारी पडले. त्यांचे प्रेशर वाढले. त्यांना आपल्यातली एक व्यक्ती आपण गमावतोय ह्याची जाणीव होऊ लागली. आधी आई गेली आता विहीर चालली ह्या विचारांत त्यांची झोप उडाली. घरात सगळ्यांनाच
विहिरी बद्दलची खंत, हळहळ वाटत होती. मलाही माझे ह्या विहीरीसोबत गेलेले बालपण आठवून खंत वाटते. पण वडिलांना अजून दु:ख होऊ नये म्हणून आम्ही ती व्यक्त करत नव्हतो.

केवळ पैशांमध्ये ज्यांच्या भावना गुंतलेल्या असतात त्यांना अशा वस्तूंच्या मागे असलेल्या भावनांची काय कदर असणार? कसे बसे माझ्या मिस्टरांनी, भावाने आणि मी त्यांना समजावून त्या विहिरीचा विचार सोडण्यास प्रवृत्त केले. आपण सगळे मिळून त्याच्यावर दावा दाखल करू असे त्यांच्या भावंडांनी सांत्वन केले. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये ही म्हण पण आम्हाला लागू व्हायच्या आधीच
ती आम्ही लागू केली. माझे मिस्टर स्वतः वकील असल्याने त्यांना कायद्याच्या सगळे खाच खळगे माहीत आहेत. चुलत भावाने केलेल्या कागदपत्रांचे व्यवहार कोर्टाद्बारे विहीर मिळून द्यायला बाधा आणणार व त्यात वडिलांचे उतारवयातील दिवस कोर्ट, दु:ख, भांडणात जाणार म्हणून आम्ही विहिरीचा मुद्दा वडिलांना दुर्लक्षित करण्यासाठी प्रवृत्त केले. पण त्यांच्या मनात ती सल अजून खुपसतेय.

दोन पार्टींच्या चर्चेतूय हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे. तसे न झाल्यास कोर्टाद्वारे न्याय मागण्याचीही तयारी आम्ही ठेवली आहे. पण देव करो आमची ही प्रिय वास्तू आम्हाला प्रेमाने आमच्या पदरी पडो.

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

भावपूर्ण लेखन जागुतै

देव करो आणि ती विहीर तुला मिळो

चेतन सुभाष गुगळे's picture

9 Nov 2011 - 2:40 pm | चेतन सुभाष गुगळे

छायाचित्रे आणि किस्से आवडलेत. इथे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद. तुमची विहीर लवकरच तुमच्या ताब्यात येवो ही शुभेच्छा!

अवांतर: जिन्याच्या विहीरीची छायाचित्रे पाहून आनंद झालाच परंतु खजिन्याची विहीर असती तर आनंद द्विगुणित झाला असता.

जागुताई तुझ्या घरची विहिर तुझ्याकडेच येवो. बाकी घरोघरी मातीच्याच चुली असतात.

- पिंगू

जागु's picture

9 Nov 2011 - 2:45 pm | जागु

जाई धन्स.

चेतन आहो ती खजिन्याची निर्मीती करते ना. फळा, फुला, भाज्या.न्चा खजिना.

मदनबाण's picture

9 Nov 2011 - 2:53 pm | मदनबाण

देव करो आणि तुमची विहीर तुम्हाला परत मिळो...

जिन्याच्या विहिरीने तुमचे आयुष्य संपन्न केले!

माणसासारखी माणसे जातात, तिथे विहीर गेल्याचे दु:ख ते काय?

पण जी संपन्नता तिच्या सान्निध्याने तुम्ही अनुभवली, त्याला म्हणतात देणे ईश्वराचे. आम्हाला कुठे तशी विहीर मिळाली? तो हौद मिळाला?

जिन्याची विहीर, तिचे फोटो, तुमचे लेखन आणि ही सारीच कहाणी हृदयस्पर्शी वाटली. गेल्याचे दु:ख नसावे, मिळाले त्याचे सुखही कमी नाही. तेही सगळ्यांच्या वाट्याला येत नाही.

तरीही ती विहीर तुम्हाला पुन्हा मिळावी हीच माझी सदिच्छा राहील!

नरेद्रजी धन्स तुमचा प्रतिसाद पटला आणि आवडलाही.

माणसासारखी माणसे जातात ती कायमची जातात. त्यान्चा सहवास आपल्याला पुन्हा केव्हाच लाभत नाही. शिवाय ह्या जगातच ती नाहीत त्यामुळे ते दु:ख पचले जाते. पण जी वस्तू आपल्याला डोळ्यासमोर दिसते आपले तिच्याशी रुणानुब.न्द आहेत. आणि ती हालअपेष्टा सोसत आहे तर दु:ख होणारच ना.

स्मिता.'s picture

9 Nov 2011 - 4:48 pm | स्मिता.

जागुताई, विहिर आवडली. तुमची विहीर परत मिळो ही सदिच्छा!

गणेशा's picture

9 Nov 2011 - 4:52 pm | गणेशा

लेख खुपच हृद्यस्पर्शी आहे..
लेख वाचताना आपणच तेथे आहोत आणि हे सारे अनुभवले आहे असे वाटुन.. त्या वाडीशी .. विहरीशी आपलेही नातेच आहे असा भास होतो..
आणि नंतर येणार्या गोश्टीमुळे मन सुन्न होते ...

आपल्या असलेल्या अश्या गोष्टींपुढे कधी कधी काहीच इतर सुचत नाही.. आपला हक्काचा सोबतीच वाटतात अश्या गोष्टी.. घर .. जागा..

त्यामुळे एक विनंती ह्या विहिरीच्या बदल्यात.. त्या बिल्डर्शी गोड बोलुन कसे ही करुन ती पायवाट देवुन वेळ प्रसंगी थोडी पड खावुन ती विहीर सोडवुन घ्यावी.. कोर्टामध्ये फक्त कागद बोलतो .. तेथे न्याय हा अंध असतो त्याला भावनांशी देणे घेणे नसते..

बिल्डर कडुन ती सोडवुन घेवुन वडीलांच्या मनाला एक अतिव आनंद तुम्ही देण्याचा प्रयत्न करा.. जरी त्यांना तुम्ही पराव्रुत्त करत असला तरी ते कधीच ते विसरणार नाहीत... कोर्टात लढुन कदाचीत काहीच हाती येणार नाही...

आणि एक समाधानाची बाब लक्षात ठेवा, तुमचे काका/भाऊ सगळॅ जण तुमच्या बरोबर सेम विचार करत आहेत.. तुमच्यातीलच कोणी मुद्दामुन ती हडप केली नाही.. हे सुख खरेच छान आहे, हे वडीलांना ही निदर्शनास आनुन द्या..
असेच एकत्र रहा... येणार्या नविन पिढीला ही हे चित्रण दिसल्याने एकी हेच बळ पैश्यापेक्षा ही भावना मोठ्या ह्या गोस्।टी रुजल्या जातायेत ...

तुम्हाला मनापासुन विहिरी साठी शुभेच्छा !

गणेशा's picture

9 Nov 2011 - 4:52 pm | गणेशा

लेख खुपच हृद्यस्पर्शी आहे..
लेख वाचताना आपणच तेथे आहोत आणि हे सारे अनुभवले आहे असे वाटुन.. त्या वाडीशी .. विहरीशी आपलेही नातेच आहे असा भास होतो..
आणि नंतर येणार्या गोश्टीमुळे मन सुन्न होते ...

आपल्या असलेल्या अश्या गोष्टींपुढे कधी कधी काहीच इतर सुचत नाही.. आपला हक्काचा सोबतीच वाटतात अश्या गोष्टी.. घर .. जागा..

त्यामुळे एक विनंती ह्या विहिरीच्या बदल्यात.. त्या बिल्डर्शी गोड बोलुन कसे ही करुन ती पायवाट देवुन वेळ प्रसंगी थोडी पड खावुन ती विहीर सोडवुन घ्यावी.. कोर्टामध्ये फक्त कागद बोलतो .. तेथे न्याय हा अंध असतो त्याला भावनांशी देणे घेणे नसते..

बिल्डर कडुन ती सोडवुन घेवुन वडीलांच्या मनाला एक अतिव आनंद तुम्ही देण्याचा प्रयत्न करा.. जरी त्यांना तुम्ही पराव्रुत्त करत असला तरी ते कधीच ते विसरणार नाहीत... कोर्टात लढुन कदाचीत काहीच हाती येणार नाही...

आणि एक समाधानाची बाब लक्षात ठेवा, तुमचे काका/भाऊ सगळॅ जण तुमच्या बरोबर सेम विचार करत आहेत.. तुमच्यातीलच कोणी मुद्दामुन ती हडप केली नाही.. हे सुख खरेच छान आहे, हे वडीलांना ही निदर्शनास आनुन द्या..
असेच एकत्र रहा... येणार्या नविन पिढीला ही हे चित्रण दिसल्याने एकी हेच बळ पैश्यापेक्षा ही भावना मोठ्या ह्या गोस्।टी रुजल्या जातायेत ...

तुम्हाला मनापासुन विहिरी साठी शुभेच्छा !

तुम्ही विहीरीची कहाणी खूप छान सांगीतली ... आवडली !

तुमची विहीर तुम्हाला परत मिळो हीच सदिच्छा !

प्रभाकर पेठकर's picture

9 Nov 2011 - 5:38 pm | प्रभाकर पेठकर

जागु,

तुमच्या बालपणीच्या कथेचे जे, हेवा वाटावे असे, रम्य चित्र तुम्ही उभे केले आहे त्याचा शेवट इतका हृदयस्पर्षी आणि करूण होईल असे वाटले नव्हते.

तुमची विहिर तुम्हाला परत मिळो एवढीच इश्वरचरणी प्रार्थना.

अन्या दातार's picture

10 Nov 2011 - 6:05 am | अन्या दातार

शब्दाशब्दाशी सहमत. :)

प्रभाकर पेठकर's picture

9 Nov 2011 - 5:41 pm | प्रभाकर पेठकर

प्र.का.टा.आ.

उदय के'सागर's picture

9 Nov 2011 - 6:32 pm | उदय के'सागर

सर्व प्रथम तर मी म्हणेन तुम्हि खुप नशिबवान अहात कि तुम्हाला असं बालपण मिळालं :) खुपच हेवा वाटतो तुमचा.
ती विहीरही तुमच्या ताब्यात येण्यासाठी आतुर आहे. देव करो आणि विहीरीची इच्छा पुर्ण होवो.

अतिशय तळमळीने लिहिलेली हृद्य आठवण, अर्थात तिला आठवण तरी कसे म्हणायचे, कारण ती सतत तुमच्या मनामध्ये आहेच.

तुमची विहिर तुम्हाला परत मिळो हीच सदिच्छा.

रेवती's picture

9 Nov 2011 - 8:13 pm | रेवती

अशी विहीर पहिल्यांदाच पाहिली.
अगदी भक्कम बांधकाम आहे.

प्राजु's picture

9 Nov 2011 - 8:26 pm | प्राजु

अ प्र ति म!!
खूप दिव्सांनी इतकं सुंदर काहीतरी वाचायला मिळालं आहे.

तुझी विहिर तुला नक्की मिळेल.

तुमचे त्या विहिरीशी जितके ऋणानुबंध जुळले आहेत तितकेच त्या विहिरीचेही तुमच्याशी जुळले असणार हे नक्की. ती विहिर नक्की मिळेल तुम्हाला.

अशोक पतिल's picture

9 Nov 2011 - 8:47 pm | अशोक पतिल

तुमची ही कहाणी वाचुन मला माझे बालपण आठवले. भावनाशील व्यक्तीनाच निर्जीव वास्तूशी जवळीक साधता येते . तुम्हाला मनापासुन विहिरी साठी शुभेच्छा !

दीपा माने's picture

9 Nov 2011 - 9:17 pm | दीपा माने

जागु,
लेख वाचून खुप आवडला. जगात चेतन आणि अचेतन दोन्हीही गोष्टी भावभावना जागृत असणार्‍यांसाठी किती एकच असतात ह्याचे सुंदर वर्णन वाचायला दिल्याबद्दल जागु ह्या निसर्गकन्येचे आभार!
जागु, तुमच्या जिन्याच्या विहिरीच्या बाबतच्या सर्व इच्छा लौकर पुर्ण होवोत!

पैसा's picture

9 Nov 2011 - 10:24 pm | पैसा

लेख उत्तम झालाय. आठवणी फार आतून इथे उतरल्यात हे जाणवतं. पण कायदा गाढव असतो आणि बिल्डर्सच्या पुढे काही शहाणपण चालत नाही हे माझ्या अनुभवावरून सांगते. अशा वेळी "Hope for the Best & be prepared for the WORST." एवढंच सांगेन.

स्मिता, मनिषा, प्रभाकर, उदय, वल्ली, रेवती, प्राजू, अशोक, पैसा, दिपा धन्यवाद तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा आहेतच पाठीशी.

गणेशा आम्ही त्याच प्रयत्नात आहोत.

रामदास's picture

10 Nov 2011 - 12:18 am | रामदास

तुमच्या पाककृतीद्वारा तुम्ही आम्हाला पोटभर जेवू घालताय त्याचे भरपूर पुण्य तुमच्या गाठी आहे ते उपयोगात येईलच. शुभेच्छा.

नंदन's picture

10 Nov 2011 - 8:31 am | नंदन

लेख आवडला. मनापासूनचा, साध्या सरळ शब्दांतला. पायर्‍यापायर्‍यांनी विहिरीत उतरत जावं तशा जुन्या आठवणी जागवत लिहिलेला. वरील सर्वांप्रमाणेच ही विहीर परत तुमच्याकडे यावी यासाठी मनःपूर्वक सदिच्छा व्यक्त करतो.

प्रीत-मोहर's picture

10 Nov 2011 - 10:09 am | प्रीत-मोहर

जागुताई लेख खुपच छान. माझ्या सासरीही अशीच विहिर आहे.

तुझी विहिर तुझ्या कुटुंबाला लवकरात लवकर परत मिळो .

रामदास, नंदन, प्रित धन्यवाद.

रुस्तम's picture

7 Dec 2013 - 2:31 am | रुस्तम

लेख आवडला.

खटपट्या's picture

7 Dec 2013 - 4:50 am | खटपट्या

खूप मस्त !!!
मि तर विहिरीच्या प्रेमात पडलोय !
माझ्याही लहानपणी मी रहात असलेल्या इमारतीमधील काही जागा मला अतिशय प्रिय होत्या. सर्वात आवडती जागा म्हणजे गच्चीवर जातानाचा जीना. या जिन्यावर मी माझे सर्व शालेय जीवन घालवले. दहावी, बारावी, आणि पुढचा सर्व अभ्यास मी इथेच बसून केला. आजही मी कधी तिथे गेलो कि त्या जिन्यात थोडावेळ बसावेसे वाटते.

रमेश आठवले's picture

7 Dec 2013 - 9:12 am | रमेश आठवले

लेख आवडला. विहीर जांभा दगडात खणल्या सारखी वाटते. बहुधा शम्भर वर्षाहून खूप जुनी असावी. हा अंदाज विहिरीच्या दगडांचे जे weathering झालेले दिसते त्यावरून काढावासा वाटला. तुमची स्वत: ची वाडी खरेदी केल्याची कागदपत्रे असल्यास कल्पना येईल. कदाचित विहीर काही शे वर्षा पूर्वीची निघेल.

लॉरी टांगटूंगकर's picture

7 Dec 2013 - 9:33 am | लॉरी टांगटूंगकर

मागचा डोंगर, मोकळी जागा, पिवळट वाळकं गवत बघून थेट गावाला पोहोचलो.
जुना लेख वर आलेला दिसतो आहे, पुढे काय झालं??

सुधीर कांदळकर's picture

8 Dec 2013 - 11:29 am | सुधीर कांदळकर

साध्यासोप्या भाषेतले भावपूर्ण लेखन आवडले. धन्यवाद.