आज प्रत्येक घराच्या दारात एक दमलेला बाबा आपल्या चिमण्यांची वाट पाहतांना दिसून येतो. घरच्या होममिनिस्टर त्यांच्याच तोऱ्यात असतात. त्या अन् त्यांचं ऑफिस यातच गुरफटलेल्या असतात. त्यांचं करिअर इतकं मोठ्ठं की सर्व भार बाबाच्या खांद्यावर येऊन तो धापाच टाकीत राहतो. वाणसामान, दुधबील, लाईटबील असे किरकोळ खर्च बाईसाहेबांच्या पेमेंट मधून तर फ्लॅटचा हप्ता, गाडीचा इ.एम्.आय. असे आकडे बाबाच्या खात्यातून परस्पर परागंदा होण्याची तरतूद बाबाने स्वीकारलेली असते. आणि मग तरीही त्याला वाढदिवसाची साडी, दिवाळीचा रत्नहार, मकरसंक्रांतीचा नेकलेस अशाची जुळवाजुळव आपल्याच खात्यातून करण्याची गोडगुलाबी सक्ती केली जाते. अशी सक्ती बाबाला नवी नसली तरी टाळता मात्र येत नाही. जणू काही तीही एक जबाबदारीच असल्याच्या अविर्भावात बाईसाहेब ‘तुणतुण’त असतात...
शाळा सुरु व्हायच्या वेळी तर बाबा नामक पात्र इतके मेटाकुटीला येते की खिसा उलथा पालथा करुन स्कूल फी, ट्युशन फी, स्टेशनरीचा खर्च, गणवेश इ. घेऊन देण्याचं कर्तव्य त्याच्याच माथी मारलं जातं. बाबाला लागलेल्या दम्याकडे कोण लक्ष देतो मग? त्याची धाप ऐकू येण्याइतपत बाईसाहेब जाग्या राहत असतील तर ना?
सकाळी उठून कपड्यांच्या घड्या घालणे, केरकचरा काढणे, भांड्यातील खरकटी ओली सुकी अशी वेगवेगळ्या थैल्यांमध्ये भरणे, रिकामी भांडी प्रसंगी घासणे, कपडे वॉशिंग मशीनला लावणे ही कामे करता करता बाईसाहेब काय करणार तर फक्त स्वैपांक! म्हणजे पाच सहा पोळ्या लाटणे, भाजी टाकणे इतकेच! कुकर लावण्याचे काम अर्थात बाबाकडेच वळतं. त्यानंतर पोरांचा डबा भरणे, सॅक भरणे, त्यांना अंघोळी घालून बस येण्यापूर्वीच रेडी ठेवणे, बस मध्ये व्यवस्थित बसवून देणे. ही कामं तर बाबाला अगत्याने करावीच लागतात. मग उरतात बाकीच्या गोष्टी. स्वतःचा टिफिन स्वतःच भरून घेऊन ऑफिस गाठायचं, तिथेही बॉस’मॅडम’चा शब्दनशब्द झेलत मान मोडून काम करायचं.
ऑफिस सुटलं की थेट घरी येण्याशिवाय पर्याय नसतो. कारण आता चिमणीपाखरं येण्याची वेळ झालेली असते. वाळलेले कपडे व्यवस्थित घड्या घालून जिथल्या तिथे ठेवून पुन्हा झाड लोट करायची. पोर बाळांना काहीतरी चॅवमॅव खायला करायचं. कधी उपीट, तर कधी भेळ, तर कधी सामोसे आणायचे. येतांनाच बाबा मंडईतून भाजी घेऊन आला तर बाईसाहेबांचा पारा चढत नसतो.
मुलं आली की त्यांचे कपडे चेंज करून त्यांना खायला प्यायला घालून जरावेळ खेळायला सोडलं की हुश्श करायचं. कुकर लावेपर्यंत गृहमंत्री हजर! मग काय त्यांच्या दिमतीत बाबाचा कसा वेळ जातो कळतच नाही. गिझर चालू करून देणे, चहाला आधण ठेवणे, सकाळचं दुध तापविणे, कुकरच्या शिट्ट्या मोजणे, बाईसाहेबांच्या हातात चहाचा वाफाळता कप ठेऊन अदबीने उभं राहिलं की त्या खेकसणार- ‘असा काय शुंभासारखा उभा राहतोस? माझं सिरीयलमध्ये लक्ष लागत नाहीये तुझ्यामुळे. जा पोळ्यांचं पीठ मळून ठेव. अगदी एकजीव मळ बरं का? नाहीतर मागच्या सारखं पात्तळ रगडा करून ठेवशील. जा. पोरं येतील खेळून. त्यांना हात पाय धुवायला लावून अभ्यासाला बसव. मी तोवर माझं आवरून स्वैपाकाला लागते. तू त्यांचा होमवर्क बघ. अभ्यास घे. मी जेवायला बोलवीन तेव्हाच उठायचं. काय? जा आता...’
मान खाली घालून आज्ञा शिरसावंद्य केली की पुन्हा काम काम आणि काम... पोरं तरी काय गप्प बसणारी असतात का? गडबड गोंधळ घालतात, बाबाचं ऐकत नाहीत. ते आपल्या बाबाला असं का बरं छळीत असावेत? हे बाबालाही कळत नसतं. अभ्यासाला बसवंलं तरी नीट स्टडी करीत नाहीत. त्यात त्यांचा अभ्यास घेणं म्हणजे दिव्यकर्मच असतं. बाबा ओरडून ओरडून थकून जातो. कधी तर मुलांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतांना त्याचा जीव मेटाकुटीला येतो. रात्रीची जेवणं उरकून ताटं बेसिन मध्ये ठेवली की जरा निवांतपणे सोफ्यावर बसून काय स्कोर झाला ते पहावं म्हणून थांबावं तर आतून गृहमंत्री ओरडणार- ‘आता काय बसालायेस टीव्ही समोर? चल झोपायचं नाहीये का? मला उद्या जरा लवकर ऑफिसला जायचंय.’
हिरमोड करून बेड रूम मध्ये जावं आणि बाईसाहेबांच्या जवळ सरकावं तर तिथेही बाबाचा हक्क चलत नसतो. चल झोप बघू मुकाट्याने, अजिबात हालचाल करायची नाही. मला खूप झोप येतीय, अंगाला झटू नकोस चल हो बाजूला.
आणि बाबा ‘बाजूला’ बसल्यासारखं तोंड घेऊन मानसिकरीत्या दमून जातो... झोपतो कुठला? आज काय काय केलं याची उजळणी करीत उगाच आपलं या कुशीवरून त्या कुशीवर वळत राहतो...
प्रतिक्रिया
19 Jun 2011 - 3:14 pm | धन्या
तुमच्या लेखाचं शिर्षक जरी "दमलेला बाबा" असं जरी असलं तरी आतलं लेखन मात्र तसं नाही. लेखाला "हताश नवरा" असं शिर्षक जास्त समर्पक ठरलं असतं.
असो. प्रतिक्रिया वैयक्तिक होण्याच्या भीतीने तुमच्या प्रकटनावर जास्त काही लिहित नाही.
देव करो आणि अशी वेळ आमच्यावर न येवो.
आणि समजा आलीच तर आम्ही बायकांची कामं आणि पुरुषांची कामं असं विभाजन न करता कराव्या लागणार्या कामांची एकच यादी बनवणार आणि लोड बॅलन्सिंगचा अल्गोरिदम चालवणार. कसे?
अमेरिकेहून परत आल्यानंतरची गोष्ट. आई मागच्या दारात भांडी घासत होती. मीही सरळ आईच्या बाजूला बसून एक पातेलं ओढून घासायला सुरुवात केली. आई अवाक. थोडावेळ तिला सुचेचना काय बोलावे ते. नंतर जरा सावरल्यावर म्हणायला लागली "अरे अरे, काय करतो आहेस. हे असं भांडी घासणं शोभतं का तुला?" मग मीही आईला बायकांची कामं आणि पुरुषांची कामं असं काही नसतं हे समजावून सांगितलं. काम हे काम असतं वगैरे वगैरे...
आता पुढे माझं लग्न झाल्यावर जर कधी तिने मला किचनमध्ये भांडी घासताना पाहिलं तर तिला धक्का बसणार नाही किंवा मुलगा "जोरू का गुलाम" झाला आहे असंही वाटणार नाही.
- धनाजीराव वाकडे
19 Jun 2011 - 4:11 pm | शैलेन्द्र
+१
19 Jun 2011 - 2:48 pm | पियुशा
आज प्रत्येक घराच्या दारात एक दमलेला बाबा आपल्या चिमण्यांची वाट पाहतांना दिसून येतो. घरच्या होममिनिस्टर त्यांच्याच तोऱ्यात असतात. त्या अन् त्यांचं ऑफिस यातच गुरफटलेल्या असतात.
आक्षेप,आक्षेप !
याच्या विरुद्ध परिस्थिति मि आजवर पाहिल्यामुळ हा लेख फारसा रुचलेला नाहिये :)
19 Jun 2011 - 2:59 pm | ५० फक्त
'तुमच्या लेखाचं शिर्षक जरी "दमलेला बाबा" असं जरी असलं तरी आतलं लेखन मात्र तसं नाही. ते "हताश नवरा" असं शिर्षक असलेल्या लेखात जास्त समर्पक ठरलं असतं.' + १०००००
19 Jun 2011 - 4:41 pm | आचारी
अगदि मराठि मालिके सारखा लेख, शिर्शक आणि ले़खन या मध्ये कुठ्लाहि सम्बन्ध नाहिये
19 Jun 2011 - 5:41 pm | विदेश
दमलेला बाबा न वाटता, हतबल किंवा अगतिक बाबाचे वर्णन वाटते आहे. कामांची तडजोडीने वाटणी तरी करून घ्यावी. दम(घेत-)लेल्या बाबाने दम देऊन संसार म्हणजे तडजोड हे होममिनेस्टरकडून वदवून घेतल्याशिवाय, या बाबाला असेच जीवन कंठावे लागणार!
वर्णनातली 'अतिरेकी' हुकुमशाही दिसून येत नाही, वास्तवात अशी असेल असे वाटत नाही.
19 Jun 2011 - 7:45 pm | धन्या
हा ना राव...
अगदी अगदी. हे वर्णन मसाला चित्रपटांसारखं उगाचच जास्त मसाला घालून भडकपणा आणण्याचा प्रयत्न केल्यासारखं वाटतंय...
19 Jun 2011 - 9:12 pm | शिल्पा ब
<<<अगदी अगदी. हे वर्णन मसाला चित्रपटांसारखं उगाचच जास्त मसाला घालून भडकपणा आणण्याचा प्रयत्न केल्यासारखं वाटतंय...
यांचे लेख बर्याचदा असेच असतात.
19 Jun 2011 - 10:19 pm | नगरीनिरंजन
लेख अतिरंजित वाटत असला तरी अतिरंजन वजा केलं तरी तळाशी थोडंसं सत्य उरतंच. :-) अशी परिस्थिती सर्वसामान्य नाही हे मान्य केलं तरी दुर्लक्ष करता येणार नाही इतक्या संख्येने 'समजदार' पुरुषांच्या बाबतीत हा प्रकार होत असावा असं मानायला जागा आहे.
सर्व प्रकारच्या एकांगी समानतेचा मिसळपाववर चालू असलेला पंचनामा स्वागतार्ह आहे.
आता कोणी स्त्रियांवर होणार्या अन्यायांची यादी वाचेलच आणि ते बरोबरच असेल पण बर्याच ठिकाणी वेगळी परिस्थिती आहे हे मान्य केले तरी पुष्कळ.
19 Jun 2011 - 11:17 pm | धन्या
एखादी स्त्री वाईट वागली म्हणून "सगळ्या बायका अशाच" किंवा एखादा पुरुष वाईट वागला म्हणून "सगळे पुरुष असेच" असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल.
बरे वाईट गुण स्त्री आणि पुरुष दोन्हींमध्ये असतात. एखाद्या केसमध्ये स्त्रीचा दोष असेल तर एखादया केसमध्ये पुरुष दोषी असेल. कधी दोघांचीही चुक असेल. त्यामुळे समाजात घडणारी अशी एखादी घटना घडते तेव्हा स्त्री पुरुष अशी विभागणी न करता "ती व्यक्ती" म्हणणे जास्त सोयीचे ठरेल.
च्यायला, खरंच असं झालं तर? म्हणजे गुणदोष पाहताना स्त्री पुरुष असं न पाहता केवळ व्यक्ती म्हणून पाहिलं तर? सगळ्यात मोठा प्रश्न हा असेल की युयुत्सूराव धागे कशावर काढणार? :)
20 Jun 2011 - 7:12 am | नगरीनिरंजन
वा! आवडलं! तुम्ही बर्याच लोकांचं दुकानच बंद करून टाकाल अशानं. :-)
पण सगळ्या स्त्रिया किंवा सगळे पुरुष असं मला म्हणायचं नव्हतं हे स्पष्ट आहे. समानतेचा बर्याचवेळा विपर्यास होतो एवढंच म्हणायचं होतं. असो.
19 Jun 2011 - 11:48 pm | योगप्रभू
धनाजीराव येक नंबरचं बोलला.
डाक्टरसायेब,
लगीन झाल्यावर नवरा-बायकोत 'तुजं माजं' आसं काई र्हात नाई. सगळं 'आपलं' होतंय बगा. इशेषतः प्वार झाल्यावर जास्त.
आन कितीबी वाद घातला तरी येक गोष्ट 'क्रिश्टल क्लियर' हाय. बायका जेवड्या निगुतीनं नवर्याचं/घराचं/पोरांचं करत्यात त्येवडं आजुनबी पुरुषाला साधल्येलं न्हाई. बायकांचे उपकार इसरुन चालायचे न्हाईत.
पन याचा अर्थ बायकोनं काई बी बोलल्यालं आयकून घ्यायचं न्हाई. तिनं त्वांडाला त्वांड लावलं तर तेवड्यापुरतं गप र्हायाचं आन संधी साधून आपनबी त्वांडाला त्वांड लावायचं. :)
20 Jun 2011 - 9:07 am | ऋषिकेश
या (इतक्या गांजलेल्या) नवर्याला का अजून काय (आणि का) सांगावं? ;)
असो.. ज्याचं त्याचं नशीब, समज, वैयक्तिक वगैरे वगैरे!
20 Jun 2011 - 9:57 am | प्यारे१
डॉक्टरसाहेबांची 'केस'च निराळी आहे.... :)
तुम्ही लिहित जा हो सर...!!!
बिचार्यांना उगाच तोंड दाबून बुक्क्यांचा मार असतो हो घरी नेहमी. मन तरी कुठं मोकळं करणार नै...
कुणी उपाय सुचवो न सुचवो मन मोकळं झालं की बरं वाटेल तुम्हाला.
आणि काय मेल्या बायका तरी, सारखं सारखं काय बोलायचं (घालून पाडून नाही म्हणत हो परा ;))
आता नाई जमत एखाद्याला हे आणि ते! म्हणून काय सारखं धारेवर धरायचं? किती बरं अन्याय सहन करायचा एखाद्यानं
तुम्ही लिहीत जा हो.... अगदी मोकळे होईपर्यंत लिहा.... मन हो.
फक्त कुणी गैरफायदा घेणार नाही आपला एवढं पहा म्हणजे झालं.( अर्थात तुमचा कोण घेणार हो... गैरफायदा म्हणतोय मी ;) )
20 Jun 2011 - 12:53 pm | परिकथेतील राजकुमार
अगदी अगदी..
अहो मी तर म्हणतो तुम्ही एकच काय चार आयडींनी लिहा अजुन :)
20 Jun 2011 - 12:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाहाहा............. डॉक्टरसाहेब, काळाचा महिमा आहे बाकी काही नाही. :)
-दिलीप बिरुटे
20 Jun 2011 - 2:30 pm | रामजोशी
//हिरमोड करून बेड रूम मध्ये जावं आणि बाईसाहेबांच्या जवळ सरकावं तर तिथेही बाबाचा हक्क चलत नसतो. चल झोप बघू मुकाट्याने, अजिबात हालचाल करायची नाही. मला खूप झोप येतीय, अंगाला झटू नकोस चल हो बाजूला.
आणि बाबा ‘बाजूला’ बसल्यासारखं तोंड घेऊन मानसिकरीत्या दमून जातो.////
यकदम काकोडकर ! लिवा लिव्वा (मद) मस्त.
बाजूला या शबअदला ' ' का दिलेले आहेत ? आणि fathers day ल बापबदल लिहीतात असाउगाचच गैरसमज होता आतअपर्यंत....
20 Jun 2011 - 3:12 pm | योगी९००
http://nilyamhane.blogspot.com/2010/03/blog-post_09.html