विश्वचषकाचे उर्मटशिरोमणी - पुष्प तिसरे - सचिन

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in क्रिडा जगत
18 Feb 2011 - 3:07 pm

आंतरराष्ट्रीय राजकारणात उर्मटपणाचा सगळा ठेका अमेरिकेने घेतला आहे. तसा क्रिकेटमध्ये तो ऑस्ट्रेलिया कडे आहे. त्यांचे एकजात सगळेच खेळाडु उर्मट आहेत. अ‍ॅडम गिलख्रिस्ट सारखा एखादा सन्माननीय अपवाद वगळता बाकीच्यांचे सभ्यतेशी तसे वाकडेच आहे. उर्मटपणा तसा थोड्याफार फरकाने सगळ्याच देशाच्या खेळाडुंमध्येही दिसतो. तसे आपले श्रीशांत (याच्या नुसत्या नावातच 'शांत'ता आहे) आणि सरदार तरी काय कमी उद्धट आहेत का? पण ऑस्ट्रेलियाची गोष्टच वेगळी त्यांचा उर्मटपणा त्यांच्या देहबोलीतुन देखील जाणवतो. त्यासाठी त्यांना तोड उचकटायची किंवा हातवारे करायची गरज नसते.

ही लेखमाला विश्वचषकातल्या ७ महाउर्मट खेळाडुंना समर्पित आहे. काही नावे कदाचित अनपेक्षित असतील, काही नावे अपेक्षित असुनदेखील इथे दिसणार नाहीत. नाइलाज आहे. सध्या क्रिकेटमध्ये उर्मट खेळाडुंची संख्या बरीच आहे. पण हे जे ७ उर्मट उद्धट खेळाडु आहेत त्यांनी मैदानावर देखील करामत केली आहे. त्यामुळे त्यांची नावे इथे आहेत. ७ फक्त ७. बाकी लोग हमे माफ करे.

*************************************************************

सचिन

सचिन? आपला सचिन? सचित रनेश (सॉरी रमेश) तेंडुलकर? काय फालतुपणा चालवला आहे हा? असे सगळे प्रश्न मनात आले ना? मी तुम्हाला दोष देत नाही. हे प्रश्न मनात येणारच. श्री. बाळ गंगाधर टिळक आज हयात असते आणि हे वाचत असले असते तर त्यांनी जरुर विचारले असते की "लेखकाचे डोके ठिकाणावर आहे काय?" तर आहे. लेखकाचे डोके ताळ्यावर आहे (तळ्यावर नाही).

सचिनसारखा विनयशील आणि नम्र माणुस या उर्मट माणसांच्या यादीत आहे. कारण हा ५ फूट ५ इंच उंचीचा माणूस कमालीचा खूनशी आहे. प्रसंगी तो गोलंदाजांशी कमालीच्या उद्धटपणे वागतो. चेहेर्‍यावर नम्र सोज्ज्वळ भाव ठेवून तो समोरच्या गोलंदाजांची दिशाभूल करतो आणि मग त्यांचे लचके तोडत त्यांची कारकीर्द संपुष्टात आणतो.

एरवी सचिनच्या विनयशीलतेचे किस्से मशहूर आहेत. मुंबईत मध्यंतरी एका कवितासंग्रहाच्या वितरणप्रसंगी शंकर महादेवन प्रमुख पाहुणा म्हणुन आला होता. त्याला आधी पुष्पगुच्छ मग हार, मग भेटवस्तु, मग पगडी मग नारळ मग शाल अश्या सगळ्या वस्तु देण्यात आल्या. त्याला त्या नीट धरता येत नव्हत्या. त्याची गडबड होत होती. हे बघुन एक माणूस आपल्या जागेवरुन शांतपणे उठला आणि शंकर महादेवनच्या हातातुन काही वस्तु काढुन घेउन त्याला मदत केली मग सगळे स्थिरस्थावर झाल्यावर परत जागेवर बसला. यु गेस्ड इट राइट. तो सचिन तेंडुलकर होता. वास्तविक त्याला हे सगळे करण्याची काहीच गरज नव्हती. पण हे सौजन्य त्याच्या स्वभावाचा एक भागच आहे. असाच अजुन एक किस्सा सांगतात. पुण्यातले काही तरुण काही कामानिमित्ता लंडनला गेले होते. तिथे एका भारतीय उपाहारगृहात त्यांना सचिन तेंडुलकर आणि अजित आगरकर सहकुटुंब आलेले दिसले. साक्षात सचिन समोर दिसल्यावर कोण सोडतंय? त्यांनी त्याला स्वाक्षरीची आणि फोटोची गळ घातली? सचिन त्यांना शांतपणे अस्खलित मराठीत म्हणाला बाबांनो, अजितची मुलगी झोपली आहे. तिला आपला त्रास होइल. आपण बाहेर जाउयात. बाहेर जाउन सचिनने त्यांना कंटाळा येइपर्यंत फोटो काढु दिले. गप्पा मारल्या, दॅट्स सचिन तेंडुलकर. पण मग हाच विनयशील, सभ्य, नम्र, सौजन्यशील माणूस जेव्हा बॅट हातात धरतो तेव्हा तो कमालीच्या क्रुरपणे वागतो. त्याच्यातले सौजन्य गळुन पडते. कोणी ग्लेन मॅक्ग्राथ जेव्हा त्याला फलंदाजीचे धडे देउ करतो तेव्हा तो काहीच बोलत नाही पण मग त्याला कमालीच्या उर्मटपणे सीमापार धाडतो. दॅट्स अल्सो सचिन.

मध्यंतरी कुठेतरी वाचलेला एक किस्सा आहे. एका सामन्यात ब्रॅडमन भारतीय गोलंदाजांना बडवत होता. त्यावेळेस एका भारतीय गोलंदाजाने सुंदर चेंडु टाकला. झेल जाणार याची पुर्ण खात्री होती. चेडु क्षेत्ररक्षकाकडे गेला देखील पण थोडास्सा मागे पडला. गोलंदाजाने क्षेत्ररक्षकाला खुण केली थोडा मागे जा. पुढचा चेंडु तसाच, परत शॉट तसाच. परत तेच. चेंडु थोडा मागे. क्षेत्ररक्षक परत थोडा मागे. असे करत करत क्षेत्ररक्षक सीमारेषेवर गेला तेव्हा कुठे गोलंदाज क्षेत्ररक्षकाला कळले की हे चुकुन होत नाही आहे, हा योगायोग नाही. डॉन त्या दोघांना चक्क खेळवत होता. डॉन सचिनमध्ये स्वत:ला पहायचा याच्या अनेक कारणांमध्ये एक कदाचित हेही असु शकेल की सचिन देखील असाच गॅप काढुन, क्षेत्ररक्षकांना हुलकावणी देत धावा काढत राहतो. हे असे वागणे कमालीचे क्रुर आहे. मांजर कसे उंदराला खेळवत खेळवत मारते त्यातला प्रकार आहे हा. वरवर सभ्यतेचा बुरखा पांघरलेल्या सचिनच्या याच उद्धटपणाबद्दल त्याने या मालिकेत स्थान कमावलेले आहे.

वयाच्या १६ व्या वर्षी म्हणजे ज्या वयात तुमच्या आमच्यासारखे सामान्य मानव पुटकुळ्यांनी भरलेल्या चेहेर्‍याने मख्खपणे कॉलेजात बसुन प्रोफेसरांची लेक्चरं ऐकतात त्या वयात या महामानवाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ते सुद्धा पाकिस्तानसमोर. त्या दौर्‍यावर कसोटी मालिकेत त्याने ३५ च्या सरासरीने २०० हुन आधिक धावा काढल्या. मात्र पहिल्याच एकदिवसीय सामन्यात तो बदकाबरोबर परतला. मात्र याचे उट्टे त्याने एका प्रदर्शनीय सामन्यात काढले. अवघ्या १८ चेंडुत ५३ धावा काढताना त्याने साक्षात अब्दुल कादिरच्या एका षटकात २८ धाव बडवल्या. किती उर्मटपणा. आपले वय काय, समोरच्याचा अनुभव काय याचा कुठलाही सारासार विचार न करता तो किती उद्धटपणे वागला ते तुम्हीच बघा.

मी त्याच्या कारकीर्दीबद्दल काही लिहिणार नाही आहे. लिहायची गरजही नाही आणि पेशन्सही नाही आहे. काय काय लिहिणार ना? फलंदाजीचे जगभरातले सगळे विक्रम त्याच्या नावावर आहेत म्हणुन लिहु की कसोटी सामन्यांत शतकांचे अर्धशतक पुर्ण करणारा पृथ्वीतलावरचा पहिला आणि एकमेव फलंदाज म्हणुन लिहु की त्याच्या ४६ एकदिवसीय शतकांबद्दल लिहु की एकदिवसीय आणि कसोटी मिळुन शतकांचे शतक पुर्ण करण्यासाठी लागणार असलेल्या अवघ्या ३ शतकांच्या औपचारिकतेबद्दल लिहु की एकदिवसीय सामन्यातील पहिल्या आणि आजवरच्या एकमेव द्विशतकाबद्दल लिहु. नक्की कशाबद्दल लिहु? १० विक्रम लिहिले तर अजुन कित्येक तरीसुद्धा राहुनच जातील. त्याने केलेल्या सगळ्या विक्रमांची नोंद त्याच्याकडे तरी आहे की नाही देवच जाणे (क्रि़केटचा देव असाही तोच आहे म्हणा). असे म्हणतात की सचिनचा स्वतःचा असा कुठला आवडता शॉट नाही. पीटरसन स्विच हिट मारतो, धोनी हेलिकॉप्टर शॉट, गांगुली पुढे सरसावुन षटकार ठोकायचा. सचिनचा स्वत:चा असा एकही फटका नाही. नसणारच. कारण तो सगळेच फटके त्याच सफाइने मारतो.

तरी एक मोठ्ठा श्वास घेउन सुरुवात करतो. १७७ कसोटी सामन्यात ५६.९४ च्या सरासरीने १४६९२ धावा (जगातील सर्वाधिक), ४४४ एकदिवसीय सामन्यात ४४.९७ च्या सरासरीने आणि ८६+ धावगतीने १७००० + धावा आणि दोन्ही प्रकारचे सामने मिळुन बळींच्या द्विशतकाला अवघा १ बळी कमी. त्याशिवाय २४९ झेल. आणि एवढे करुन देखील त्याला आपण अष्टपैलु क्रिकेटपटु म्हणत नाही. आपण त्याला फक्त जगातला सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणतो.

असो. हे झाले त्याच्या एकुण कारकीर्दीबद्दल. विश्वचषकाबद्दल बोलायचे तर तो आजवर ५ विश्वचषक खेळला आहे. २०११ त्याचा सहाव विश्वचषक. विश्वचषकातल्या ३६ सामन्यांमधुन ५७.९३ च्या सरासरीने त्याने १७९६ धावा काढल्या आहेत. यात ४ शतके (विश्वचषकातील सर्वाधिक. बहुधा मार्क वॉ आणि सौरव गांगुलीची पण इतकीच आहेत) आणि १३ अर्धशतके आहेत. १३ अर्धशतकांपैकी ७ वेळा त्याने ८० पेक्षा आधिक धाव केल्या आहेत. म्हणजे जवळजवळ प्रत्येक दुसर्‍या सामन्यात त्याने भरीव योगदाने दिले. त्याशिवाय ८ बळी आणि १० झेल आहेतच.

१९९२ चा विश्वचषक त्याचा पहिला विश्वचषक. यात त्याने ७ सामन्यांतुन ४४ च्या सरासरीने २८३ धावा केल्या. यातली पाकिस्तानविरुद्धची ६२ चेंडुतली नाबाद ५४ धावांची खेळी उल्लेखनीय. भारताने हा सामना ४३ धावांनी जिंकला. याव्यतिरिक्त भारताची धावसंख्या २ बाद ३९ असताना असताना मैदानावर येउन ७७ चेंडुत झोअडपलेल्या ८१ धावा देखील महत्वाच्या. न्युझीलंड विरुद्ध देखील त्याने ८४ धावांची उप्युक्त खेळी केली. मात्र तो सामना ग्रॅटबेच (पहिल्या १५ ओवर्स झोडपणारा हाच तो मार्टिन क्रोचा हुकुमी एक्का) आण जोन्सच्या जोरावर न्युझीलंडने जिंकला. मात्र या विश्वचषकात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट ईंडीज आणि न्युझीलंड अश्या सगळ्यांकडुन भारत हारला आणि साखळीतुनच बाहेर पडला.

१९९६ चा विश्वचषक खरे म्हणजे भारताचाच होता. सचिन ऐन भरात होता. त्याने ७ सामन्यांमधुन ८७.१६ च्या सरासरीने ५२३ धावा काढल्या. यात २ शतके आणि ३ अर्धशतके होती. पहिल्याच सामन्यात त्याने लिंबुटिंबु केनियाविरुद्ध १३८ चेंडुत १२७ धावा काधल्या. त्याला आवरता आवरता बिचार्‍या ओडुंबेची दमछाक झाली. त्याने तब्बल ८ गोलंदाज वापरले. पण परिणाम शुन्य. तेंडुलकर सलामीला येउन नाबाद राहिला आणि भारताने सामना ४२ व्या शतकात खिशात टाकला. नंतर वेस्ट इंडिज विरुद्ध सुद्धा ९१ चेंडुत सर्वाधिक ७० धावा काढल्या. भारताने हाही सामना जिंकला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया या त्याच्या आवडत्या प्रतिस्पर्ध्याबरोबर तर त्याने २ बाद ७ या धावसंख्येवरुन संघाला तारले आणि ८४ चेंडुत धडाकेबाज ९० धावा केल्या. मात्र तो बाद झाल्यावर संघ ढेपाळला (नेहेमीप्रमाणे) आणि भारताने हा सामना अवघ्या १५ धावांनी गमावला. त्यानंतर त्या विश्वचषकात विजेत्या ठरलेल्या श्रीलंकेविरुद्ध देखील त्याने १३७ चेंडुत १३७ धावा काढल्या. शिवाय गोलंदाजी करताना देखील लंकेच्या खेळाडुंना जखडुन ठेवले आणि १० षटकांत माफक ४१ धावा दिल्या. पण लंकेच्या फलंदाजाने विशेषतः जयसुर्याने इतर गोलंदाजांना बडवले आणि भारताने हा ही सामना गमावला. यानंतर झिंबाब्वे आणि पाकिस्तानविरुद्ध तो चालला नाही मात्र तरीही भारत उपांत्य फेरीत पोचला. नाणेफेक जिंकुनही अझहरने अनाकलनीय रीत्या प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मात्र श्रीनाथने बरोब्बर सापळा रचुन जयसुर्याला अवघ्या ४थ्या चेंडुवर तंबुत धाडला. त्याआधी सामन्याच्या पहिल्याच चेंडुवर त्यानेच कालुविथर्णाला बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर चाचपडत खेळणार्‍या गुरुसिंघेला १६ चेंडुत अवघी १ धाव काढता आली आणि तो बाद झाला. सामन्याचा निकाल तिथेच स्पष्ट झाला होता. पण डिसिल्वा , महानामाच्या प्रतिकारामुळे लंकेने २५० धावा काढल्या. २५१ चे आव्हान विशेष नव्हते खासकरुन तेंडुलकर भरात असताना आणि संघात कांबळी, अझहर असताना २५१ धावा अवघड नव्हत्या. सचिनदेखील हाहा म्हणता ६५ वर पोचला. भारताला धावांचे शतक फलकावर लावण्यासाठी अवघ्या २ धावांची गरज होती. पण नियतीने घात केला आणि सचिन परतला. त्यानंतर अझहर, जडेजा, मांजरेकर, मोंगिया चा समावेश असलेला भारतीय संघाची अवस्था काही वेळातच ८ बाद १२० झाली. मुरलीधरन जयसुर्याने इतर सर्व फलंदाजांना अक्षरशः नाचवले. अवघ्या २२ धावात ६ फलंदाज परतले होते. प्रेक्षकांनी हुल्लडबाजी सुरु केली. विनोद कांबळी भर मैदानात ढसाढसा रडला. सचिनच्या विकेटनंतर भारतीय फलंदाजीची अवस्था अक्षरश: पानिपताच्या मैदानावर भाउंच्या पतनानंतर मराठे सैन्याची झाली होती तशी झाली. त्या संघाल जणू कोणी वालीच उरला नाही. सचिनच्या विकेटनंतर भारतीय फलंदाजीने नांगी टाकल्याचे हे पहिले उदाहरण नव्हते आणि संघात गांगुली , द्रविडचा उगम होइपर्यंतर हे चित्र त्यापुढेही अनेकवेळा दिसले. पण तो दिवस अशक्य होता. प्र्क्षकांच्या हुल्लडबाजीमुळे पंचांनी तो सामना लंकेला बहाल केला. सचिन हारला. भारत हारला मुख्य म्हणजे भारताने जगाला दाखवुन दिले की आम्हाला पराभव पचवता येत नाही.

१९९९ च्या विश्वचषक परत नव्या आशा घेउन आला. आता संघात द्रविड / गांगुली होते. सचिन एवढे महान नसले तरी त्यांचा स्वतःचा एक क्लास होता. त्यामुळे भारताला परत आशा होत्या. पण सचिनच्या दृष्टीने हा विश्वचषक फारसा यशस्वी नाही ठरला. ७ सामन्यांतुन ४२ च्या सरासरीने त्याने २५० च्या आसपास धावा केल्या, म्हणजे सचिनच्या रेकॉर्डच्या मानाने अगदीच किरकोळ. यात केनियाविरुद्धचे एक शतक सुद्धा होते. शतक जरी केनिया विरुद्ध असले तरी ते ज्या परिस्थितीत मारले होते त्यामुळे त्याची व्हेल्युअ प्रचंड वाढते. वडिलांच्या निधनानंतर अवघ्या ४थ्या दिवशी तो संघासाठी परतला. त्या पुर्वी भारत अक्षरश: झिंबाब्वेकडुनही हारला होता. वडिलांचे निधन बाजुला ठेवुन सचिन लढला. शतक ठोकले, मात्र मालिकेत नंतर तो फारशी चमक नाही दाखवु शकला. अपेक्षेप्रमाणे सचिनच्या यशापयाशाशी नाळ बांधली गेलेला भारतीय संघ उपांत्य फेरीत नाही पोचु शकला.

२००३ साली नव्या उमेदीने भारतीय संघ सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली उतरला. हा कप सचिनचाच होता. ११ सामन्यांमध्ये ६३ च्या सरासरीने त्याने विक्रमी ६७३ धावा काढल्या. यात ६ अर्धशतकं आणि नामिबिया विरुद्धचे एक शतक समाविष्ट आहे. पण ही केवळ आकडेवारी झाली. ८१,८३,९७ आणि ९८ यांना अर्धशतक म्हणायचे? पाकिस्तानविरुद्धच्या ९८ धावा काय द्विशतकापेक्षा कमी होत्या? त्या ९८ धावा तर जागतिक उर्मटपणाचे पारितोषिक मिळवु शकल्या असत्या. प्रचंड हाइप झालेल्या शोएब अख्तर विरुद्ध सचिन तेंडुलकर या सामन्याचा तेंडुलकरने अवघ्या ४थ्या चेंडुवर अप्रतिम षटकार ठोकुन बोर्‍या वाजवला होता. त्याच्यानंतरच्या लगोपाठ २ चेंडुंवर चौकार मारुन त्याने शोएबच्या आक्रमणातली हवाच काढुन टाकली. नंतर शोएब १० षटकांमच्ये ७२ धावांसाठी पिटला गेला. अवघ्या ७५ चेंडुत १२ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने ९८ धावा काढल्या. २७ व्या षटकात तो परतला तोवर भारताच्या १७७ धावा झाल्या होत्या आणि २३ षटकात ७३ धावा करण्याची औपचारिकता तेवढी उरली होती. शोएब विरुद्ध सचिन या पहिल्या लढतीत शोएबने बाजी मारली होती. त्याने सचिनला पहिल्या चेंडुवर त्रिफळाचित केले होते. सचिनने ते बहुधा मनात ठेवले असाठे. तो असले अपमान विसरत नाही. सचिनला बाद केल्यावर भर मैदानात भांगडा केलेल्या ओलोंगाला नंतर त्याने असेच धरुन धरुन बडवले होते. नंतर बिचार्‍याची कारकीर्दच संपुष्टात आली. शोएबला देखील सचिन ने नंतर बर्‍याच वेळा हिसका दाखवला. एका मॅच मध्ये शोएब असाच सेहवागला बाउन्सर टाकुन उचकावत होता. सिक्स मार म्हणत होता. सेहवाग शेवटी वैतागला तो त्याला म्हणाला "वोह देख सामने तेरा बाप खडा है (म्हणजे सचिन) उसको बोल." शोएबच तो. कोणाला उचकावायचे एवढी अक्कल असली असती तर ४ वर्षे संघाबाहेर बसला नसता. त्याने सचिनलादेखील तसाच चेंडु टाकला आणि बिचार्‍याला सीमेपार पळावे लागले. असो. बॅक तो विश्वचषक. याच विश्वचषकात सचिन ने इंग्लंड, श्रीलंका आणि न्युझीलंडला देखील धुतले. भारत सर्व सामने जिंकला. मात्र अंतिम सामन्यात भल्यामोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतान सचिन अवघ्या ४ धावांवर परतला आणि विश्वचषक हातचा गेला.

२००७ मध्ये तर भारत एक संघ म्हणुन उतरलाच नव्हता. जिथे सगळेच फेल गेले तिथे सचिनही गेला एवढेच. ३ सामन्यांमधुन अवघ्या ६३ धावा. भारत साखळीतच गारद झाला. ४था सामना भारतीयांच्या नशिबी नव्हता. सचिन स्वतःही तेव्हा आउट ऑफ फॉर्म होता.

३७ वर्ष ३०० दिवस वय असणारा हा माणूस उद्या आपला ४४५ वा एकदिवसीय सामना खेळेल. विश्वचषकातला त्याचा ३७ वा. २००३ च्या विश्वचषकात त्याने शोएब वर सूड उगवला होता. त्या आधी ओलोंगा वर. कारकीर्दीत त्याने अनेकांचे हिशोब चुकते केले. अनेकांची कारकीर्द बरबाद केली. आशा करुयात तो उद्या बांग्लादेशवर २००७ च्या पराभवाचा सूड उगवेल. तो बहरला तर उद्या अनेकांची कारकीर्द संपेल कदाचित. ३६ वर्ष ३०६ दिवस हे वय असताना त्याने एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातातले आजमितितले एकमेव द्विशतक काढले आहे. या विश्वचषकात त्याची पुनरावृती होइल अशी आशा करुयात.

गोलंदाजांशी क्रुरपणे वागणार्‍या, बॅट हातात आल्यावर अतिशय उर्मटपणे सगळ्या गोलंदाजांची धुलाई करणार्‍या, उद्धटपणे वयाच्या १६ व्या वर्षीच अब्दुल कादीर सारख्या दादा गोलंदाजाला तुडवणारा, तोंडातुन चकार शब्द न काढता अतिशय मग्रुर बॅट हातात धरुन चेंडुची कातडी सोलणारर्‍या या क्रुर, खुनशी उर्मट शिरोमणीला हे तिसरे पुष्प सादर समर्पित.

टीपः
१. चित्रे आणि आकडेवारी जालावरुन साभार.

२. लेखातील काही माहितीबद्दल माझ्या मित्राचे रविंद्र देशपांडेचे आभार.

क्रिकेट

प्रतिक्रिया

प्रमोद्_पुणे's picture

18 Feb 2011 - 3:23 pm | प्रमोद्_पुणे

हे सुद्धा पुष्प छान. थोडे आश्चर्य वाटले मात्र तू सचिन वर एवढे लिहिलेस..

गणपा's picture

18 Feb 2011 - 3:32 pm | गणपा

क ड क

गणपा's picture

18 Feb 2011 - 3:38 pm | गणपा

डु प्रतिसाद काढला आहे.

गणपा's picture

18 Feb 2011 - 3:38 pm | गणपा

डु प्रतिसाद काढला आहे.

मुलूखावेगळी's picture

18 Feb 2011 - 3:38 pm | मुलूखावेगळी

सचिन ला उर्मट लोकांत आणुन त्यामगाची थियरी जी मांडलीत ती शब्दशः.पटवुन सांगायची पद्धत आवडली.
कणेकर पाठ केलेत वाटतं?
फार छान लिहिलेस सगळेच पुष्प १ नं.
नेक्ष्ट कोन रे?

जर व्हिव रिचर्ड्स उर्मटांच्या शाळेचा मुख्याध्यापक असेल तर सचिन आणि गांगुली हे त्याच्या शाळेतून बाहेर पडलेले गुणवत्ता यादीतले विद्यार्थी आहेत. सचिनपेक्षा त्याची बॅट जास्त उर्मट आहे.
आजपर्यंत सचिनमुळे घरी बसून सामने बघायला लागणारे खेळाडू मोजायला गेलो तर त्याचेदेखील शतक झाल्याचे लक्षात येईल.

उर्मटांच्या शाळेत गांगुली बहुतेक रेकॉर्डहोल्डर असावा.

--असुर

विजुभाऊ's picture

18 Feb 2011 - 4:07 pm | विजुभाऊ

गांगुलीचे लॉर्ड्स वर शर्ट काढून फिरवणे या इतके सॉलीड दृष्य भारतीय संघाने कधीच पाहिले नव्हते. त्या एका दृश्याने भारतीय संघ गोर्‍यांविरुद्ध "माज" दाखवू शकतो हे सिद्ध केले

मेघवेडा's picture

18 Feb 2011 - 5:23 pm | मेघवेडा

लेख काय तुमचा प्रतिसाद काय.. इतका 'वाईड बॉल' आजवर बघितला नाय बा.. =)) =))

http://www.misalpav.com/sites/all/modules/bueditor/icons/quote_s.png

त्या ९८ धावा तर जागतिक उर्मटपणाचे पारितोषिक मिळवु शकल्या असत्या.
तो असले अपमान विसरत नाही. सचिनला बाद केल्यावर भर मैदानात भांगडा केलेल्या ओलोंगाला नंतर त्याने असेच धरुन धरुन बडवले होते.

अगदी अगदी! पाकिस्तान विरूद्ध विश्वचषकातला सामना.. ते चार्ज्ड वातावरण.. अब्जो लोकांच्या अपेक्षांचं ओझं .. नि तरी साहेब तितकेच निर्विकार .. कसं जमतं या माणसाला कोडंच आहे ब्वॉ..

बाकी ओलोंगासारखाच मॅग्रालाही धरून धरून बडवला होता त्यानं.. कॅडीकनंही नाही का फुकाची बडबड केली होतीन २००३ च्या वर्ल्डकपमधल्या सामन्याआधी आणि आता त्याला सचिन म्हटला की फक्त तो षटकार आठवत असेल!!

लेख मस्तच रे मृत्युंजया! फक्त सचिनची बॅटिंग क्रूर वाटली नाही कधी त्यामुळे जरा 'उर्मट-उद्धट' वगैरे विशेषणं पटायला वेळ लागला जरा.. पण मुद्दा एकदम मान्य! छान लिहिलंय!

स्वाती दिनेश's picture

18 Feb 2011 - 4:56 pm | स्वाती दिनेश

हे पुष्पही आवडलेच
मी त्याच्या कारकीर्दीबद्दल काही लिहिणार नाही आहे. लिहायची इच्छाच नाही आहे.
येथे फक्त एक लहानसा बदल सुचवू इच्छिते..
इच्छा ऐवजी गरज... :)
बाकी मस्तच..
४थ्या उर्मटवीराची वाट पाहत आहे,
स्वाती

मृत्युन्जय's picture

19 Feb 2011 - 2:09 am | मृत्युन्जय

संपादित. सुचनेबद्दल धन्यवाद.

निमिष ध.'s picture

18 Feb 2011 - 8:41 pm | निमिष ध.

अवांतर
त्या माईक कास्प्रोवीचची शारजा मध्ये काय हवा काढली होती. ती पूर्ण मालिका भारत सचिन मुळेच जिंकला होता.

एकदम मस्त लेखमाला !!

चतुरंग's picture

18 Feb 2011 - 8:52 pm | चतुरंग

परंतु सचिनला उर्मट म्हणण्यापेक्षा बेडर आणि सडेतोड म्हणणे जास्त आवडेल. इतर महान खेळाडू आणि सचिन ह्यात हाच फरक मला नेहेमी जाणवत आलाय की आपल्या गुणवत्तेचा पुरेपूर माज बरेच मोठे खेळाडू दाखवतात आणि सचिन फक्त बॅटनेच बोलतो!
तरीही चांगल्या लेखाबद्दल तुझे कौतुक आहे! पुढचे शिरोमणी कोण ते बघायची उत्सुकता लागली आहे.
-रंगा

इन्द्र्राज पवार's picture

18 Feb 2011 - 9:37 pm | इन्द्र्राज पवार

आमच्या लाडक्या सचिनला उद्देश्यून 'उर्मट' असे जरी "अत्यंत नाईलजास्तव" श्री.मृत्युन्जय यानी म्हटले असले तरी या लेखमालेचा तो एक भाग आहे म्हणून तिकडे दुर्लक्ष करावे असे वाटते...पण क्रिकेट विश्वातील कुठलाही देश त्याला 'उद्धट, उर्मट, आगावू, बेफिकीर, गुर्मीत असणारा...' अशी विशेषणे कदापिही लावण्याचे इच्छिणार नाही, इतकी सचिनची प्रतिमा धवल आहे.....[ती वरील काही उदाहरणावरून लेखकाने अधिकच स्पष्ट केलेली आहे....]

या देशात संगीतक्षेत्रातील अढळ तारा "लता" नावाचा तसा प्रत्येक क्रिडारसिकाच्या हृदयी वसलेला हा तारा "सचिन...". या लेखाच्या निमित्ताने या दोन तार्‍याच्या भेटीचा एक फोटो आपल्या सर्वांसाठी. [नेटवर हा फोटो सर्वानी पाहिला असणारच, पण तरीही या लेखाला पूरक आहे म्हणून इथे देत आहे....]

LataSachin" alt="" />

लेख आवडला हे वेगळे सांगणे न लगे.

इन्द्रा

बेसनलाडू's picture

18 Feb 2011 - 10:27 pm | बेसनलाडू

साहेबांवरचे लेखन सकाळी सकाळीच वाचून उरलेला दिवस सुखासमाधानाचा जाणार, याची खात्री पटली.
(सचिनभक्त)बेसनलाडू

निशदे's picture

18 Feb 2011 - 10:32 pm | निशदे

ह्याच लेखाची वाट बघत होतो.......
पुनश्च तुम्हाला दंडवत.....सचिन च्या खेळाचा मस्त आढावा घेतलात. अजून येऊ द्यात.
:)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Feb 2011 - 1:31 am | निनाद मुक्काम प...

मस्त लेख झालाय
सचिन च्या तेंडूलकर ह्या गेटवे जवळील उपहारगृहात सहपत्नी ४ वर्षापूर्वी गेलो होतो .तिथला बार चा व्यवस्थापक माझा मित्र (सचिन भक्त ) तेथे मायकेल शूमेकर आणि सचिनचा एकत्र भलामोठ्ठा फोटो होता ..(त्यांचा जाहिरातीमधील ).
कुटुंब उद्गारले '' हा तर आमच्या देशाचा लिजेंड ''
''आणि हा आमच्या '' (इति मी )
ज्या दिवशी सचिनने शोहेबाची पिसे काढली २००३ मध्ये
उपहारगृहात सर्वांना शेंपेन पाजण्यात आली .
क्रिकेट आमचा धर्म
सचिन आमचा देव

मृत्युन्जय's picture

19 Feb 2011 - 1:52 am | मृत्युन्जय

सचिनला उर्मट म्हटल्याबद्दल ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्यांची जाहीर माफी. त्याला उर्मट म्हणलेच नाही आहे अ‍ॅक्चुयली. त्याच्या बॅटला उर्मट म्हटले आहे. :)

या मालिकेत सचिनवरचा लेख खरे म्हणजे ६ / ७ वा येणार होता पण उद्याच्या सामन्याचा मुहुर्त दाधुन जरा लवकर टाकला. :)

या लेखामालिकेत सौरव गांगुलीचा समावेश करण्याची जबरदस्त इच्छा होती. पण दुर्दैवाने त्याचे नाव या लेखमालिकेत येणार नाही आहे. त्याचा सूड तुम्हा सर्वांवर त्याच्यावर एक वेगळा लेख लिहुन काढण्यात येइल.

गणेशा's picture

21 Feb 2011 - 4:40 pm | गणेशा

मनापासुन धन्यवाद आपले ...

सचिन बद्दल हि खुप छान लिहिले आहे.. खुप आवडले .. गेल्या भागातच याचे नाव यावे असे वाटले आणि लगेच पुढचा भाग सचिन म्हंटल्यावर खुपच छान वाटले.

पुढचा भाग कदाचीत : रीकी पाँटींग असेल असे वाटते..

अवांतर : बिच्चारा गांगुली .. कारकिर्द खुपच छान असताना ही तो दुर्दैवीच ठरला ..आणि येथे ही त्याचे तेच दुर्दैव आड आले वाटते.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Mar 2014 - 6:25 pm | अत्रुप्त आत्मा

सुंदर लेख! पण

ह्या सगळ्यात सचिन आणि वॉर्न बद्दलचे सारेच कसे र्‍हायले???

http://www.sherv.net/cm/emo/sad/sad.gif

अता ह्या लेखाच्या शेवटापासून पूर्ण-विरामा पर्यंतचा उरलेला सचिनही लिहुन टाका. http://www.sherv.net/cm/emoticons/sport/playing-cricket-smiley-emoticon.gif आणि मग त्यात नमनाला मात्र (अर्थातच-घडाभर! ;) ..) वॉर्न'च टाका . म्हणजे कसं, अनुष्ठानाची-सांगता जाहल्या सारखे कृतकृत्य वाटेल.