आज अवंतिका बाईंची फार म्हणजे फारच लगबग चालू होती . आपला अवजड देह ( शक्यं तितक्यां) चपळाईने हालवतं त्या कामे उरकीत होत्या . सकाळी सकाळी त्यांनी आधी निर्मलाबाईंना नाश्त्याचा मेन्यू सांगितला. रामूला घराची साफ - सफाई नीट करण्याच्या सूचना दिल्या. ही महत्वाची दोन कामे उरकल्या नंतर नाही म्हणले तरी त्यांना थोडासा शीण आला होताच . म्हणून त्यांनी निर्मला बाईंना आलं घालून चहा करायला सांगितला. तेव्हढा चहा घेण्यापुरत्या काय ते त्या जरा सोफ्यावर विसावल्या . नंतर लगेच माळ्याला बागेच्या निगराणी संबंधी सूचना देण्यासाठी स्वतः बंगल्याच्या (चार ) पायर्या उतरून बागेत आल्या . तो पर्यंत नऊ वाजत आले होते, आणि ऊन तापायला सुरुवात झाली होती . तशा उन्हामुळे आपल्या त्वचेला अपाय होईल याची पुरेपूर कल्पना असूनही , त्याची पर्वा न करता जवळ जवळ १५ मिनिटे माळ्याबरोबर त्या बोलत उभ्या होत्या. नोकरांवर लक्ष ठेवले नाही तर ते त्यांना दिलेली कामे नीट करत नाहीत असा त्यांचा ठाम विश्वास होता. पण तेव्हढ्या श्रमानेही त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब जमा होऊ लागले होते. मग गॅरेजकडे न जाता गंगाधर ड्रायव्हर ला तिथे बोलावून गाडी नीट स्वच्छ पुसून तयार ठेवायला सांगितली.
आता मात्र अवंतिका बाईंना विश्रांतीची नितांत आवश्यकता होती. पण कर्तव्यं पूर्तिचा आनंद काही औरच.. काही क्षण , आपल्या ढासळत्या तब्येतीची चिंता त्यांच्या मनात दाटून आली. त्यांच्या छाती मध्ये अधून मधून बारीकशी कळ येत होती .. आणि काही वेळा जीव घाबरा होत असे. डॉक्टर कडे गेले तर म्हणतात, म्हणे अॅसिडिटी आहे.. तेलकट मसालेदार खाऊ नका, चहा , कॉफी कमी प्या ..
" या डॉक्टरांना काही म्हणजे काही कळत नाही . "
त्यांनी आपल्या आवडत्या सिद्धांताचा आपल्या मनाशीच पुनरूच्चार केला.
" मला खात्री आहे , मला हार्ट्च आहे" ( म्हणजे र्हुदय रोग बरं , हे अवंतिका बाईंचं स्पेशल इंग्लिश )
"एखादे दिवशी अॅटॅक आला म्हणजे होईल त्यांना पश्चात्ताप माझ्या तक्रारी कडे दुर्लक्ष केल्याचा "
" अॅसिडिटी म्हणे .. हं "
आपलं अपरं नाक आक्रसत आणि कपाळाला आठ्या घालत त्या हॉल मध्ये आल्या. मनातल्या या विचारांनी त्यांना कसंसच होऊ लागलं होतं .
आपल्या एअर कंडिशन्ड हॉल मध्ये आल्यावर त्यांना जरा बरं वाटलं. त्या तिथल्या मऊ आरामशीर सोफ्यावर विसावल्या . नाही म्हणालं तरी स्वतः :च्या तब्येतीची काळजी घेणे त्यांना जरूरच होते. त्यांच्या शिवाय हे घर, हा संसार कसा चालणार ? त्यांना आपल्या हॉस्टेलवर असलेल्या दोन मुलींची आणि घरात असलेल्या थोरलीची - सोनालीची आठवण झाली . तीन मुली .. मुलगा नाहीच . त्या मनोमन खंतावल्या मुलगा व्हावा म्ह्णून त्यांनी आणि त्यांच्या सासूबाईनी सुद्धा किती व्रत वैकल्य केली पण काही उपयोग नाही . एक हिमालयात तप करणारे योगी आले होते , म्ह्णलं जाऊ या त्यांच्याकडे .. तर ह्यांच भलतच . म्हणे मुलगा आणि मुलगी यात काही फरक नाही म्हणे .. आणि मुलगा नसला म्ह्णून काही बिघडत नाही .. यांचं काय जातं असं बोलायला? माझ्या दोन्ही धाकट्या जावांना मुलगे आहेत. त्यांच्यात मला कसं वाटत असेल. अवंतिका बाईंनी सुस्कारा सोडला. त्यांना आता अगदी भरून येत होतं ..
" कित्ती कित्ती दु: खी आहे नै मी ? वरकरणी दाखवत नसले म्हणून काय झालं ? "
त्यांना आपल्या मनोनिग्रहाचे फार कौतुक वाटले , आपले डोळे भरून येतायत की काय असे त्यांना उगीचच वाटले . म्हणजे मग त्या कादंबरीतील नायिकांप्रमाणे मोठ्या निकराने आपले अश्रू परतवून मंद हास्य त्यांना करायचे होते. पण नाही डोळे कोरडेच होते.
आपला नाश्ता हॉल मध्येच आणून द्यायला त्यांनी निर्मलाबाईंना इंटरर्कॉम वरून सांगितले. आणि मग पाय पसरून जरा ऐसपैस विसावल्या. सकाळपासून झालेल्या श्रमाने त्यांना हलकीशी झोप लागली . तेव्हढ्यात त्यांचे पती , मनोहरराव सकाळचा नाश्ता करून कचेरीकडे रवाना झाले होते.
त्यांना जाग आली तेव्हा निर्मलाबाई त्यांना आदबीने हाक मारत होत्या,
"मॅडम आहो मॅडम , उठताय ना ? नाश्ता निवून जाईल."
आवाज ऐकून त्यांनी डोळे उघडले . क्षणभर आपल्या बेडरूम मधून आपण इथे कशा आलो याचा त्यांना बोध होईना. पण मग त्या सावरल्या. ( शक्य तितक्या ) चपळाईने टी पॉय वरचे पाय खाली घेत त्यांनी निर्मलाबाईंकडे पाहिले.
" साहेब गेले ? "
" मगाशीच .."
" काही सांगून गेले का ? "
"नाही , काही नाही."
" बरं ! जा तुम्ही , आणि आज रात्रीचा स्वैपाक करू नका बरं का ? आम्ही बहूतेक बाहेरच जेवून येऊ .?
बरं म्हणत निर्मलाबाई स्वैपाकघराकडे निघून गेल्या.
या निर्मलाबाई त्यांच्याकडे जवळ जवळ २० वर्षांपासून काम करत असाव्यात. पहिले काही वर्षे त्या अवंतिका बाईंना वहिनी म्हणत. ते त्यांनी चालवून घेतलं . पण नंतर मात्र त्यांना आणि घरातील इतर नोकरांना सक्त ताकीद दिली , की त्यांना मॅडमच म्हणायचं .
" वहिनी .. हूं ! ,
ई .. बाई कसंतरीच वाटतं नै ? अगदीच ब्याकवर्ड .
एव्हढ्या मोठ्या बंगल्याची मालकीण , आणि वहिनी ? छे .. अगदी नथ्थिंग डुईंग ."
आपल्या जाडजुड मानेला ( त्यांच्या मते ) नाजूकसा झटका देऊन अवंतिका बाईंनी नाश्त्याची प्लेट हातात घेतली . सकाळपासून केलेल्या कामाने त्या दमून गेल्या होत्या. आणि आता त्यांना भूक सुद्धा लागली होती .
मनसोक्त नाश्ता झाला .
निर्मलाबाईंच्या हाताला चव फार छान हं ! आणि अगदी प्रामाणिक बाई, सगळं स्वैपाकघर त्यांच्या हातात .. पण कधी चिमुटभर साखर काही घेतली नाही स्वतःसाठी. त्या जर काम सोडून गेल्या तर .. ?
ही क्ल्पना त्यांना नकोशी झाली .गेल्या वर्षीच त्या काम सोडून निघाल्या होत्या. तेव्हा मोठ्या मिनतवारीने त्यांना थांबवण्यात अवंतिका बाईंना यश मिळाले होते. पण त्या साठी त्यांना पगारवाढ द्यावी लागली होती. आणि त्यांना दिली म्हणून इतर नोकरांना सुद्धा .. हं !त्या नकोशा आठवणीने अवंतिका बाईंचा चेहरा त्रासिक झाला.
मग त्यांनी मोठ्याने हाक दिली ,
" सखू ए सखू .. "
कुठे गेली ही ? वेळेवर कामाला येईल तर शपथ .
त्यांचा त्रागा चालू असतानाच ओचे , पदर घट्टं बांधत सखू हजर झाली .
" काय वं म्याडम ? म्या हतंच हाय की .. दिसंना जनु तुमास्नी .."
"गप , आगाऊपणे बोलू नकोस , "
अवंतिका बाई ओरडल्या
" काल माझ्या ड्रायक्लिनींग च्या साड्या आणायला सांगितलं होतं ना तुला ? "
" व्ह्य म्याडम, कंदीच आणल्यात त्या , वरी ठिवल्यात ना ."
" बरं बरं जा तू . " अवंतिका बाई कारवदल्या .
ही सखू महा आगाऊ आहे . निर्मलाबाईंसारखी मवाळ नाही . प्रश्नाला उत्तर, आणि उत्तराला प्रत्युत्तर देण्यात पटाईत .पण काय करणार ? सांभाळून घ्यावे लागते ना आजकाल ?
अवंतिका बाई सुस्कारल्या, आपल्याला कित्ती कित्ती सहन करावं लागतं हे आठवून त्यांना अगदी भरून आलं.
मग मोठ्या निकराने त्या उठल्या . आपला गाऊन सावरत जिन्याकडे निघाल्या . साहेबांना हे गाऊन घालणं बिलकूल पसंत नाही. तसं आपण केस कापलेले ही त्यांना आवडले नाही. पण आपण त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. स्त्रियांनी किती म्हणून स्वतःचे मन मारून जगायचे? त्या क्लबातल्या सुधाताई सांगतात ना ,
" स्त्री ने जोखडातून मुक्त व्हायला पाहिजे ... "
त्या बरच काही बोलतात. सगळच नाही बाई कळत. पण त्यांच भाषण ऐकलं ना की कसं अगदी स्त्री मुक्ती केल्यासारखं समाधान वाटतं. हे सारखी चेष्टा करत असतात. म्हणतात " मी कधी तुला कसली बंधनं घातली आहेत का ? मग तुला कशातून मुक्तं व्हायचय . पण मी त्यांच्याकडे लक्षच देत नाही . नाहीतरी सुधाताई म्हणतातच -
" पुरूष तुमच्या मार्गात अडथळे आणतील , कारण मुक्त स्त्री ला ते गुलामा सारखं वागवू शकत नाहीत . तुम्ही त्यांची पर्वा न करता पुढे जायचं, जोखडातून मुक्तं व्हायचं.."
जोखड म्हणजे काय हे जरी त्यांना नीटसं कळलं नाही, तरी कशातून तरी मुक्त व्हायचे आहे, म्हणजे कोणाला तरी विरोध करायचा एव्हढे कळले.
क्लबची आठवण येताच त्यांनी घाईघाईने पावले ऊचलायचा प्रयत्नं केला. पण गुडघ्यातून एक तीक्ष्ण चमक आली, आणि वाकलेली कंबरही चटकन सरळ करणे त्यांना जमेना. कितीतरी दिवसांपासून हे दुखणं त्यांच्या पाठीशी लागलं होतं. अनेक उपाय केले. कसली कसली तेलं, कोरफडीची जेल , .. कश्शा कश्शाचा उपयोग झाला नाही. सर्वं प्रकारच्या डॉक्टरांकडे गेले. - आयुर्वेदिक, अॅलोपॅथी, होमिओपॅथी, युनानी, कुठले कुठले बाबा, आचार्य, स्वामी ... सगळे मेले एका माळेचे मणी ... म्हणतात कसे ?
"काकु .. जरा वजन कमी करा, रोज फिरण्याचा व्यायाम करा ... हं! "
आणि म्हणे काकु .. इतकी का मी म्हातारी दिसते ?
या डॉक्टरांना काही कळत नाही ... मला इतक्या वेदना होतात.. आणि यांच भलतच
म्हणे रोज चालायचा व्यायाम करा .. आता घरी कार असताना मी का म्ह्णून चालत जाऊ ?
तेव्हढ्यात फोन खणखणला. दुखर्या कमरेवर हात ठेवत आवंतिकाबाई फोन जवळ आल्या. फोन त्यांच्या जावेचा, सुमनचा होता.
" आहो वहिनी , आनंदाची बातमी , आपल्या मिनीचं लग्नं ठरलं बरं का ! "
"हो का ? अरे वा !!" अवंतिकाबाईंनी ओढून ताणून आपल्या आवाजात आनंद आणला.
मग कोण मुलगा? कुठे असतो ? काय करतो ? इ. माहिती विचारून, ऐकून झाली.
फोन क्रेडलवर ठेवताना नाही म्हणलं तरी त्यांचा मूड गेलाच. ही सुमन , त्यांची धाकटी जाऊ. घरात सगळ्यांची लाडकी , नोकरी करून घर सांभाळते म्ह्णून सगळ्यांना हिचं फार कौतुक , अगदी ह्यांना सुद्धा .
हं .. मी नोकरी करत नसले म्हणून काय झाले? कित्ती कित्ती बिझी असते मी ? माझा क्लब , माझं सोशल वर्क. पण आमचं मेलं कोणाला कौतुकच नाही .... सगळे नुसते परधार्जिणे ..
आवंतिका बाई सुस्कारल्या. आता तर काय मिनीचं लग्नं ठरलय. ही मिनी आपल्या सोनालीपेक्षा दोन वर्षांनी लहानच की ..पण तिचा योग काही अजून येत नाहीये. तशी ती मिनी एव्हढी शिकली नाहीये .. पण गॅज्युएट आहे की. आणि दिसायला ... अं ? म्हणजे स्मार्टच की , अग्गदी माझ्यासारखी . .. अजून लोळते आहे वाटतं अंथरूणात. आवंतिका बाई स्वतः;शीच बोलल्या.
आज असा मूड जाऊन चालणार नव्हतं . आज क्लब मध्ये त्यांचा सत्कार होता. म्हणजे सत्कार प्रसिद्ध समाजसेविका मालती बाईं चा होणार होता. आणि त्यांच्या हस्ते अवंतिकाबाईना बक्षिस मिळणार होतं. त्यांच्या क्लब ने स्त्रियाच्या उन्न्ती साठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात अवंतिका बाईंना उत्तेजनार्थ तिसरे पारेतोषिक मिळाले होते. अशा अलवार साटोर्या केल्या होत्या त्यांनी ... खरं म्हणजे त्यांनाच प्रथम पारितोषिक मिळायला हवं होतं असं अवंतिका बाईंचं स्पष्ट मत होतं ... पण छे ! सगळीकडे नुसती वशिलेबाजी .... पण जाऊ दे म्हणत अवंतिकाबाई जिना चढायला लागल्या .
खोलीत आल्यावर धोब्याकडून आलेला साड्यांचा गठ्ठा नीट पाहिला , मग कपाट उघडून हँगर वरच्या साड्या पाहिल्या . नक्की कोणती आजच्या समारंभासाठी चांगली दिसेल हे त्यांना ठरवता येईना ..
शेवटी एक अंजिरी प्युअर सिल्क त्यांनी नक्की केली . त्यावर बदामी रंगाची पश्मिना घ्यावी .. की पांढरी बरी दिसेल? त्या परत विचारात पडल्या. शेवटी बदामीच घ्यायची ठरवली . सध्या काही थंडीचे दिवस नाहीत पण मोठ्या मोठ्या समाजसेविका शाल घेताना त्यांनी पाहिले होते. म्हणुन ...
मग साडीला मॅचिंग लिपस्टिक, रूमाल, पर्स सॅन्डल्स इ ची जुळवाजुळव झाली आणि मगच त्यांचे समाधान झाले.
दुपारी जेवणा नंतर हॉल मध्ये टी. व्ही समोर रिमोट घेऊन बसल्या. एक एक चॅनल बदलत उगाचच वेळ घालवत होत्या. आज त्यांना टी. व्ही. वरील सासवा - सुना रिझवत नव्हत्या. मनात विचारचक्र चालू होते..
"येतील ना हे वेळेत ? नाहीतर विसरून पण जातील . काही सांगता येत नाही. "
खरं म्हणजे सोनाली ने सुद्धा यायला हवं पण ती सुद्धा अगदी आपल्या बा.. अं वडिलांच्या वळणावर गेली आहे. प्रत्येक गोष्टीत चेष्टा करण्यासारखं काय मिळतं यांना ? देव जाणे ...
पण यांनी निदान काल तरी कबूल केलय येण्याचं.
सकाळी भेट झाली नाही कामाच्या गडबडीत ..
अवंतिका बाईंना आपल्या स्वतः बद्द्ल कौतुक वाटलं
"कित्ती जबाबदार्या सांभाळायला लागतात नै आपल्याला " त्या मनात म्हणाल्या .
"फोन करावा का यांना ? नको बाई त्यांना आवडत नाही ऑफीस मध्ये फोन केलेलं .
मग बराचवेळ त्या वेगवेगळे चॅनल्स बघत राहिल्या.
अपेक्षे प्रमाणे संध्याकाळी मनोहर रावांचा फोन आलाच ..
"तू पुढे हो .. मी माझी मीटिंग आटपून येतोच ."
अवंतिका बाई अगदी खट्टू झाल्या .
म्हणजे आता रिक्षेने जायला पाहिजे .
तशा त्या नेहमी रिक्षेनेच जात पण आजतरी आपल्या प्रशस्त कार मधून जाण्याची इच्छा होती . आज सुधाताईंचा सत्कार, मालतीबाईंचे भाषण .. आणि बक्षीस समारंभ . म्हणजे झाडून सार्या क्लब मेंबर्स येणार , सगळ्याच उच्चभ्रू ..त्यांच्या समोर ऐटीत कार मधून उतरताना किती छान वाटलं असतं ..
पण हूं .. जाऊ दे .. आमचं मेलं नशीबच असलं,
अगदी कसोशीने अवंतिका बाई तयार झाल्या. साडी, शाल, मेक अप , पर्स, रूमाल .. आणि हलकासा सेंट सुद्धा लावला.
अवंतिका बाई क्लब मध्ये पोहोचल्या , पण अजून सुधाताई आल्या नाहीत असे कळले. कदाचित येणार नाहीत कारण ते कुठलं तरी स्त्रियाच आंदोलन चालू आहे तिथं व्यस्त आहेत म्हणे .
बराच वेळ वाट बघून शेवटी मालतीबाईंच्या हस्ते बक्षिसे दिली.. फक्त पहिले तीन नंबर, उत्तेजनार्थ बक्षिसे फक्त जाहीर केली कारण वेळ कमी होता. मालती बाईंना सुधाताईंच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा द्यायला जायचे होते. त्यांनी सुधाताईंचा संदेश वाचून दाखवला पण अवंतिका बाईंचे लक्षच नव्हते. मग पुढची मीटिंग कधी घ्यायची ते ठरवून सगळ्याजणी पांगल्या. अवंतिका बाई रिक्षेनेच घरी आल्या. मनोहर राव आलेच नाहीत.
घरी आल्या तेव्हा मनोहरराव खालच्या हॉलमधेच टी,व्ही वर न्यूज बघत्/ऐकत होते. अवंतिकाबाईंकडे न पाहताच म्हणाले ..
"अग मीटिंग खूपच लांबली .. मग विचार केला तुझा समारंभ तर संपलाच असणार म्हणून घरीच आलो .."
अवंतिका बाई गप्पच राहिल्या..त्यांना काही बोलावेसेच वाटत नव्हते.
"चल आपण लवकर जेवून घेऊ या , नंतर मला आणखी थोडं काम करायचं आहे.
अवंतिका बाईंच्या मनात निराशा दाटली होती.
" काहीच माझ्या मनासारखं का होत नाही ? कोणालाच माझी पर्वा नाही . की कसलं म्हणून कौतुक नाही .
त्या क्लब साठी किती केलं मी ? स्त्रियांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा , त्यांचे शिवणकाम, विणकामाचे वर्ग .. काय अन् काय
आणि आज मला बक्षीस मिळालं तर कोणाला काही नाही , स्टेज वर सुद्धा बोलावलं नाही. आणि घरी ? साध विचारलं पण नाही की कसा समारंभ झाला ते. माझ्यापेक्षा यांना त्या जगभरातल्या बातम्या महत्वाच्या ..
आणि ही सोनी कुठे उधळलीय कोणास ठाऊक , एक दिवस पाय घरात टिकेल तर शप्पथ.
अवंतिका बाईंचा नुसता संताप, संताप झाला होता. . त्या नुसत्याच न बोलता बसून राहिल्या.
बराच वेळाने मनोहररावांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. काहीतरी बिनसले आहे हे त्यांच्या लक्षात आले. आता टी. व्ही बंद केला नाही तर रामायण- महाभारत घडेल हे त्यांना अनुभवाने माहीत होतं.
टी. व्ही. बंद करून त्यांनी विचारलं , " काय गं ? काय झालं ? "
त्यांच्या या प्रश्ना बरोबर अवंतिका बाईंचा आत्ता पर्यंत रोखून धरलेला बांध फुटला.
त्यांनी मनातलं सगळं, सगळं बोलून घेतलं. परत " कुणा कुण्णाला आमचं कौतुक नाही , तर कशाला काही करायचं ? " हे पालुपद होतच.
मनोहरराव समजुतींच्या स्वरात म्हणाले " अगं इतकी नाराज कशाला होतेस ? आपण काम कारावं , फळाची अपेक्षा करू नये . तुला साटोर्या करताना आनंद मिळाला की नाही ? झालं तर मग . समजायचं तेच तुझं बक्षीस. आणि बाहेरच्यांना नसे ना का ? मला तर आहे ना तुझं कौतुक. तुझा स्वैपाक ... म्हणजे तू ह्ल्ली करत नाहीस .. पण चांगला व्हायचा .
आज तू निर्मला बाईंना सुट्टी दिलीयस ना? मग आपण कुठे तरी बाहेर जाऊ या , की मिर्च - मसाला मधून ऑर्डर करूयात ? "
मनोहररावांच्या समजूतदार शब्दाने त्या जरा शांत झाल्या पण तरीही फणकारल्याच
" काही नक्को, करीन मी घरीच ... ती सोनी पण यायची आहे "
मग असं कर, सगळं करत नको बसुस आता, नुसता गोडाचा शिरा कर खूप दिवसात तू केलेला खाल्ला नाही. निर्मलाबाई चांगलं करतात पण तुझ्या हाताला जी चव आहे त्याची सर नाही ..."
या स्तुतीने मात्र अवंतिका बाई जरा सुखावल्या . पंचवीस वर्षांपूर्वीच्या उत्साहात पदर खोचत त्या स्वैपाकघराकडे निघाल्या. चालताना परत गुडघ्यात कळ आली , पण आता त्यांचे तिकडे लक्ष नव्हते. त्यांनी लगबगीने रवा कढई मध्ये घेऊन कढई शेगडीवर चढवली. रवा भाजता भाजता त्या म्हणत होत्या
' काही नको मला तो क्लब, ती समाजसेवा आणि ते बक्षीस .. मी आधी होते, म्हणजे एक सर्वसामान्य गृहिणी , तशीच बरी आहे.. आणि तशीच सुखीपण आहे .
खमंग , केशरी, गोड शिर्याचा सुवास घरभर दरवळत होता.
(सर्वं पात्रे काल्पनिक )
प्रतिक्रिया
11 Feb 2011 - 8:39 am | निवेदिता-ताई
सुंदर..आवडली
11 Feb 2011 - 8:40 am | कवितानागेश
(सर्वं पात्रे काल्पनिक )??
खरी वाटतेय हो कथा!!
;)
11 Feb 2011 - 9:16 am | यशोधरा
LOL :d
झकास
11 Feb 2011 - 9:23 am | ५० फक्त
अहो, हे काल्पनिक नाही, अतिशय जळजळित आणि प्रखर वास्तव आहे, ज्याला कोणि सामोरं जाउ इच्छित नाही, तु निदान या उपहासाच्या का निमित्ताने याला तोंड फोडलंस बरं झालं
छान लिहिलं आहेस, तु लिहित रहा, आम्ही वाचत राहु.
11 Feb 2011 - 2:22 pm | चिगो
खुसखुशीत, खुमासदार विडंबण...
आवडेश..
(शिराप्रेमी) चिगो
11 Feb 2011 - 2:51 pm | निनाद मुक्काम प...
इंटर कॉम वरून नाष्टा मागवला
प्रत्येक वाक्यातून प्रसंग खुलला आहे .
पु ले शु
11 Feb 2011 - 3:14 pm | शरदिनी
अवंतिकाव्बाईंचे दु:ख वाचून मन विषण्ण झाले..
पण शेवट अजिबात आवडला नाही...
इथले पुरुष या गोष्टीचं कौतुक करतीलच हे ठाऊक आहे...त्यात नवीन काही नाही..
पण स्त्रीचे दु:ख स्त्रीने तरी जाणावे असे मला नेहमी वाटते...
स्त्री मुक्ती साठी कार्य करणार्या महिलांचे असल्या गोष्टींनी मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करताना कोणी दिसले की संताप होतो माझा...
काही नको मला तो क्लब, ती समाजसेवा आणि ते बक्षीस .. मी आधी होते, म्हणजे एक सर्वसामान्य गृहिणी , तशीच बरी आहे.. आणि तशीच सुखीपण आहे
सर्वसामान्य स्त्रीचे सुख तिने घरात बसण्यातच आहे, हे गोष्टीचे तात्पर्य असेल तर त्याचा माझ्या परीने अल्पसा निषेध करते.
मी म्हणते का जाऊ नये अवंतिकेने क्लबात? का मिळवू नये तिने बक्षीस? का तिनेच करावा शिरा? एखाद्या दिवशी का , एक आड एका दिवशी तिच्या नवर्यानेही तिला घीवर किंवा सुरळीच्या वड्या का खायला घालू नयेत?
स्त्रीने घरातच अडकून पडून राहावे असा कट रचणार्या मानसिकतेबद्दल मला चीड आहे...
स्त्री ही बंदिनी आहे असं उच्चारवाने सांगणार्या आणि असली गाणी अभिमानाने मिरवणार्या आणि असली गाणी आवडणार्या सार्यांना , मग ते स्त्री असोत की पुरुष, एक दिवस उपरती होईल अशी ईश्वराचरणी प्रार्थना....
11 Feb 2011 - 3:18 pm | प्यारे१
शरदिनीकाकूंशी अगदी म्हन्जे अगद्दीच्च सहमत.
-प्यारी
11 Feb 2011 - 3:24 pm | नगरीनिरंजन
लै शमत आहे. गोष्ट फार जुनी वाट्टे.
मी तर म्हंतो की लेखिकेने तातडीने संपादकांना गाठून अवंतिकाबाईंचे पात्र आणि त्यांच्या नवर्याचे पात्र यांची अद्लाबदल करून घ्यावी म्हंजे एकदम आधुनिकोत्तर कथा होईल.
शिवाय, "अशी ईश्वराचरणी प्रार्थना" या शरदिनीतैंच्या वाक्यातही बदल करून "अशी ईश्वरीचरणी प्रार्थना" असे करावे.
11 Feb 2011 - 10:04 pm | मनीषा
गोष्ट फार जुनी वाट्टे.
बरोबर आहे , जुन्या लोकांची जुनी कथा ..
पण अजून चालू आहे.
मी तर म्हंतो की लेखिकेने तातडीने संपादकांना गाठून अवंतिकाबाईंचे पात्र आणि त्यांच्या नवर्याचे पात्र यांची अद्लाबदल करून घ्यावी म्हंजे एकदम आधुनिकोत्तर कथा होईल.
नाही हो , तसं काही होणार नाही .. फक्त स्त्री मुक्ती ऐवजी पुरूष मुक्ती असा फक्त शाब्दिक बदल होईल फार तर
11 Feb 2011 - 10:07 pm | रेवती
जुन्या लोकांची जुनी कथा ..
पण अजून चालू आहे.
अगदी सहमत.
11 Feb 2011 - 9:53 pm | मनीषा
पण शेवट अजिबात आवडला नाही..
पण अशा कथे मधे सहसा शेवट असाच असतो.
स्त्री मुक्ती साठी कार्य करणार्या महिलांचे असल्या गोष्टींनी मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करताना कोणी दिसले की संताप होतो माझा..
अगदी अगदी माझापण .. पण काय आहे तुमची ती एक कविता होती ना डुर्र डुर्र .. अशी काहीतरी त्या कविते सारखी मला स्त्री मुक्ती वाटते.. म्हणजे त्यात काहीतरी अर्थ आहे असे वाटते , पण नक्की काय ते कळत नाही .
एका दिवशी तिच्या नवर्यानेही तिला घीवर किंवा सुरळीच्या वड्या का खायला घालू नयेत?
खरच का बरं ? कदाचित त्यांना त्या करता येत नसाव्यात , हेच कारण वाटते. मी जर 'ह्यांना' काही करायला सांगीतले तर ते सरळ विकत आणून देतील आणि म्हणतील मी केले काय अन् विकत आणून दिले काय , तुला आयते मिळाल्याशी कारण ..
स्त्रीने घरातच अडकून पडून राहावे असा कट रचणार्या मानसिकतेबद्दल मला चीड आहे...
मलापण ...
आणि ते " स्त्री ही बंदिनी ... " तेच गाण म्हणताय ना , मला नाही आवडत ..
प्रतिक्रिये बद्दल आभार ..
11 Feb 2011 - 4:09 pm | गवि
चिं. विं. जोशींची आठवण झाली.
नैऋत्य खुर्शिदाबादेतल्या अशाच एका समाजसेविकेची खुसखुशीत स्टोरी त्यांनी लिहीली होती.
11 Feb 2011 - 7:55 pm | मराठे
मला वाटतं ती पु.लं ची ष्टुरी आहे... नाव आठवत नाहीये. कदाचीत 'पुरचुंडी' किंवा 'उरलं-सुरलं' मधल्या कथासंग्रहात आहे.
11 Feb 2011 - 9:59 pm | मनीषा
कथा लिहिताना पु.लं. च्या तुझे आहे तुझंपाशी नाटाकातील आचार्यांना आमंत्रण द्यायला आलेल्या तीन 'अति विशाल महिला मंडळाच्या ' सभासदांची त्यक्ती रेखा मनात होती
पण बाकी पूर्ण कथा माझीच आहे आणि पात्रं काल्पनिक असली तरी कथा वास्तव वादी आहे .
13 Feb 2011 - 7:58 am | गवि
बाकी पूर्ण कथा माझीच आहे आणि पात्रं काल्पनिक असली तरी कथा वास्तव वादी आहे .
>>>>
Of course. Its a different story.
Instead it was a compliment that it reminds of Chi.vi. (or Pu.La. If Marathe is right)
11 Feb 2011 - 8:16 pm | रेवती
अगदी छान कथा!
मनातल्या मनात हसू येत होते.
मीही दर महिन्या दोन महिन्यानं स्वयंपाकाचा कंटाळा आल्यावर 'स्वयंपाकाकीण काकू' असल्या तर बरे होइल असे म्हणते.
पण खरच त्या बाईंच्या हातात स्वयंपाकघर सोपवीन का याबद्दल साशंक आहे.
11 Feb 2011 - 10:10 pm | मनीषा
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार !
12 Feb 2011 - 1:44 am | गोगोल
चिमटे काढ्लेत. मस्तच.
बाकी "कामापुरता नर", "स्त्री बद्दल ची एक बाजु", आणि हा लेख वाचून डोक भंजाळून गेलयं.
काय खर काय खोट ..
16 May 2015 - 3:05 am | रुपी
फारच मजा आली वाचायला..
16 May 2015 - 4:04 am | श्रीरंग_जोशी
खुमासदार आहे लेखनशैली.
मनोहररावांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे ;-) .
धन्यवाद रुपी या उत्खननाबद्दल.
16 May 2015 - 6:24 am | रुपी
उत्खनन यांच्या या प्रतिसादामुळे झाले. :)
याचे मूळ श्रेय या उत्खननासाठी स्वॅप्स यांना!
16 May 2015 - 7:16 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
रंगा जोशींचं इन्फेक्शन पसरायला लागलं.
16 May 2015 - 7:33 am | श्रीरंग_जोशी
स्वॅप्स यांचेही धन्यवाद.
तुम्ही या धाग्यावर नव्याने प्रतिक्रिया टाकली नसती तर धागा वर आला नसता हे दुर्लक्षित करता येणार नाही.
16 May 2015 - 11:31 am | विवेकपटाईत
च्यायला भारी मजा आली. मनोहर रावांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवणारा आणि वागणारा निश्चित आयुष्यात सुखी राहील. रागावलेल्या बायको कडून ही गोड शिरा करवून घेतला..(मी ही कधी कधी काही खावेसे वाटले कि सौ. ची तारीफ सुरु करतो. आणि तारीफ सर्वच स्त्रियांना प्रिय असते) मिठी छुरी त्यांना हलाल करणे सौपे असते (पुरोगामी स्त्रिया कृपया राग मानू नका)
16 May 2015 - 12:17 pm | नाखु
सदाबहार लेख कुठे असतील ते उत्खनन करणार्या सर्वांचा अत्यंत आभारी..
"घरोघरच्या श्रुतीकांचा"
बाकीचा साक्षीदार
नाखु.
16 May 2015 - 8:57 pm | मनीषा
अरे वा ! आज काय उत्खनन दिवस साजरा होतो आहे का मिपावर ?
माझी ही कथा वर आणलीच आहे तर परत वाचली.
त्यात सगळीकडे ' म्हणून' च्या ऐवजी 'म्हून' असं का दिस्तय?
ओरीजीनल कॉपी मधे बहुदा तसं नसावं.
शक्यं असेल तर संपादक ते दुरूस्तं करतील का?