म्याउ...म्याउ....
जेवण आटोपुन पडल्यापडल्या दिवाळी अंकाचं वाचन चालु होतं. तिकडे ओबामा दिल्लीतुन पूर्वेकडे गेला असल्याच्या बातम्या चालु होत्या. भारताला काय मिळालं आणि भारतानं काय दिलं यावर काथ्याकुट चालु होता. अजुन दुसर्या चॅनेलवर अशोकराव गेले पृथ्वीराज आले यावर कुठे आनंद कुठे दु:ख यावर खल चालु होता. अजुन एक चॅनेल कुठल्यातरी रिअॅलिटी शोमधल्या लग्नावर घसा खरवडुन चर्चा करत होते. दिवाळी अंकाचं वाचन हाच सर्वोत्तम पर्याय निवडुन इडीयट बॉक्स बंद केला आणि निवांत पाय पसरुन तिरपा होत अक्षरांपासुन बनणार्या शब्दांचे अर्थ लावत वाचन सुरु केले. कुणी काहीही म्हणो वाणीला शब्दबद्ध करुन तिला डोळ्यांच्या सहाय्याने पाहुन त्यातला अर्थ समजुन घेणे हा भारी खेळ असतो. एकंदर तंद्री लागलेली होती. ध्यानमग्नच म्हणा ना ! आणि तो आवाज आला. अगदी हलकेच पण स्पष्टपणे. मांजरीचं एखादं लहानसं पिल्लू असावं असा मनात विचार आला आणि परत वाचू लागलो.
बरेच दिवसांपूर्वी असेच केव्हातरी एक मांजरीचे पिल्लु अचानक दारात आलं होतं. मस्त पिवळसर झाक असलेलं जवळ गेल्याबरोबर फिस्स करुन पंजा उगारायचं. चांगलं दिड दोन महीन्याचं असावं. कुठुन आलं ते कळालं नाही पण एक दिवस दाराशी बसुन म्याऊ म्याऊ करत होतं. एका वाटीत दूध घेऊन त्याच्यापुढं ठेवलं. बराच वेळ ते माझ्याकडे आणि वाटीकडे पहात होतं. शेवटी मी तिथुन बाजुला झालो. पंधरावीस मिनिटांनी पाहिलं तर वाटी साफ होती आणि पिल्लू गायब. पळालं वाटतं असा मनाशी विचार करुन कामात गुंगुन गेलो. रात्री केव्हातरी परत आवाज आला. कसाबसा उठलो आणि दार उघडुन पाहिलं. त्याच कोपर्यात परत बसुन म्याउ म्याउ चालु होतं. मी आपला मुकाट्याने आत आलो, वाटीत दुध घेतलं. नेऊन ठेवलं. आणि आत येऊन झोपुन गेलो.
सकाळी उठुन पाहिलं. वाटी साफ आणि महाशय कोपर्यात सकाळच्या उन्हात मस्त अंग चाटत बसलेले. मनात म्हटलं मला स्वतःला किती दिवसांच सकाळचं असं उन्हात बसुन निवांत वेळ घालवायचा आहे पण इतर अनेक इच्छांप्रमाणे ही इच्छा मारावी लागत आहे. आणि हे बच्चमजी मस्त मजा करत आहेत. स्वतःशीच हसलो आणि परत थोडंसं दूध आणुन वाटी कोपर्यात ठेवली. हळू हळू हे रोजच झालं. इतकं की बाहेरच्या कोपर्यातुन ते पिल्लू कधी घरातल्या एका खुर्चीवर राजाप्रमाणे बसायला लागलं हे कळलंच नाही.
बघता बघता ते पिल्लू घरातलंच एक होऊन गेलं. मोठं व्हायला लागलं. भाटी होती ती. तिचं नाव ठेवलं होतं मधू. बहुधा त्यावेळी माधुरी दिक्षित ही माझी आवडती नटी असावी म्हणुन हिचं नाव मधु असं ठेवलं असावं. आता नक्की आठवत नाही. दिवसभर इकडे तिकडे फिरुन संध्याकाळी बरोबर घरी यायची. ठरलेल्या जागेवर बसुन तिचा सगळा रुबाब दाखवायची. तिच्या खुर्चीवर कुणी बसलं तर चिडायची. तिची वेगळी वाटी होती. खायच्या वेळा ठराविक होत्या. सकाळी सकाळी दूधपोळी कुस्करलेली खाऊन तोंडाने अंग चाटता चाटता मधुनच म्याउ म्याउ करत गप्पा मारायची. बहुधा तिला बोललेलं समजतं असं मला वाटायचं. कधी रागवायची. कधी खुशीत येत अंग घासायची. फार लळा लागला होता तिचा.
ती जसजशी मोठी झाली तसतशी तिने आजुबाजुला काही मित्र जमवायला सुरवात केली. अधुन मधुन त्यांच्या चकरा व्हायच्या. ही आत मधे आणि ते बाहेर. ते बाहेरुन हाका मारायचे. ही आत बोलवायची. शेवटी जा बाहेर आणि घाल काय घालायचा तो गोंधळ असे म्हणुन तिला बाहेर काढुन द्यायचो ! थोड्यावेळाने परत घरात घ्या असा पुकारा सुरु व्हायचा !
पुढे निसर्गनियमाप्रमाणे चक्र सुरु झालं. मधुच्या हालचाली मंदावल्या. बराच काळ ती खुर्चीवर बसुन रहायची किंवा बाहेर सकाळी उन्हात. अंग साफ करतांना सुद्धा हळुवार पण होता. दिवस भरत आले आणि मधुला पिल्लं झाली. कुठे बाळंत झाली, कशी झाली देवालाच ठाउक ! दोन दिवस दडी मारुन बसली होती. एक दिवस आली. दूध पिऊन पळाली. परत थोड्या वेळाने आली. पोळी कुस्करुन ठेवली होती, ती खाल्ली. परत पळाली. असं चारपाच दिवसं झालं आणि एक दिवस रात्री हलकेच तिचा आवाज आला. लाईट लावुन दरवाजा उघडला. तर हळुच तोंडात काहीतरी धरुन आणलं होतं. पटकन शोकेसच्य खाली घेऊन गेली. दोन तीन मिनिटांनी परत बाहेर गेली. थोड्याच वेळात अजुन एक पिल्लू तोंडात धरुन आणलं. परत शोकेस च्या खाली. अजुन एक चक्कर. मी आपला पहातच होतो. आता परत बाहेर येईल म्हणुन जरावेळ वाट पाहिली. पण आली नाही. म्हणुन बॅटरीने शोकेसच्या खाली वाकुन पाहिलं तर चक्क तीन मस्त इवली इवलीशी पिल्लं आणि त्यांची आई अशी चार जण शोकेसखाली मस्त झोपुन गेलेली.
चार पाच दिवसांनी पिल्लांनी डोळे उघडले. हळु आवाजात त्यांचे आईला बोलावणे ऐकु यायचे. मधु सुद्धा जास्त इकडे तिकडे जात नसे. बराचसा वेळ ती पिल्लांपाशीच बसुन किंवा झोपुन असे. छोटी छोटी ती पिल्लं तिच्या आजुबाजुला बागडत असत. तिच्या अंगाशी झटुन खेळत असत. लांब बसुन त्यांच्याकडे पहात बसणं हा मोठा विरंगुळा होता. वेळ कसा जात असे काही समजत नसे. हळू हळू पिल्लं मोठी व्हायला लागली. चारी पायांवर न पडता चालायला लागली. आता शोकेसखालची जागा अपुरी पडायला लागली. त्यामुळे घर आपलंच आहे कोण आहे अडवायला ? या विचाराने मधुने पिल्लांना शोकेसच्या बाहेर आणले. घरभर चौघे फिरत असत. त्यामुळे घरात फिरतांना मलाच परक्यासारखं अंग चोरुन वावरावं लागे. कारण पिल्लं अजुन तशी लहान होती. त्यांना पटकन पळता येत नसे. मला पाहुन पहिले फिले बिचकत असत पण हळू हळु ते मला आणि मी त्यांना सरावलो होतो.
अचानक एक दिवशी उघड्या दरवाजातुन कसा ते माहित नाही पण एक करडा बोका आत आला आणि एका पिल्लाला घेऊन पळाला. खुप वाईट वाटलं. पण इलाज नव्हता. त्या बोक्याच्या मागे धावलो पण उशीर झाला होता. तो बोका तसा मधुच्या मित्रांपैकीच होता पण त्यांच्या जगाचे नियम कुणाला माहित असा विचार करुन मनाचे समाधान केले. मात्र आता कटाक्षाने दरवाजा बंद ठेवायचा हे ठरवले आणि त्याप्रमाणे केले. दोघे जण त्यांचे नाव चंगु मंगु ठेवलं होतं, आता वाटीतले दूध पिऊ लागले होते. एक दिवस जोरात फिस्स आवाज आला तेव्हा पाहिले तर ते दोघे जवळ आल्याबरोबर मधु त्यांच्यावर फिस्कारत होती. कालपर्यंत अंगावर दूध पिऊ देणारी आज अचानक का पिऊ देत नाही अशा विचाराने बहुधा दोघे भांबावले होते. दोन चार दिवसांनी आपली आई अशीच आहे असे समजुन ते सुद्धा तिच्याकडे जात नसत. मात्र सगळे एकमेकांशेजारी बसत. झोपत. खेळत.
बरेच दिवस झाले. पिल्लं हळू हळू मोठी झाली. एक दिवस मंगु जो बोका होता तो बाहेर गेला तो आलाच नाही. पण तोपर्यंत मधूने अजुन दोन पिल्लं घरात आणली होती. त्या करड्या बोक्याची मला चांगलीच आठवण होती त्यामुळे मी फार काळजी घेत होतो. चुकुनही दरवाजा उघडा रहाणार नाही याची काळजी घेत होतो. चंगु सुद्धा त्या पिलांबरोबर खेळायचा. मला वाटलं होतं तो पण करड्या बोक्याप्रमाणे काही करेल की काय पण नाही. पूढे तो जास्त बाहेरच असायचा. फक्त दूध पोळी खायला यायचा. बाहेर बागेत नाहीतर गच्चीवर त्याचा मुक्काम असायचा. कधी आत येऊन झोपायचा नाहीतर दरवाज्याच्या बाजुला बसलेला असायचा.
एक दिवस रात्री खूप जोराचे भांडण ऐकु आले. गुरगुर आवाज काढित एकमेकांचा अदमास घेत दोन मांजरं भांडण करत होती. आवाजावरुन बहुधा एक चंगु असावा असे वाटले. बराच वेळ झाल्यावर पळापळी झटापटीचा आवाज आला. धप्पकन कुणीतरी पडलं आणि सगळं शांत झालं. बराच वेळ आवाज झाला नाही आणि अचानक हलकेच म्याउ आवाज आला. मी उठुन दरवाजा उघडुन पाहिलं तर दारात चंगु होता. डोळा फुटलेला. तोंड सुजलेलं. लंगडत लंगडत दारापर्यंत आला होता. मी पटकन उचलुन त्याला आता खुर्चीवर ठेवलं. माझ्या परीने त्याची जखम साफ केली. सकाळी गुरांच्या दवाखान्यात नेऊ असा विचार करुन त्याला थापटले, कापसाच्या बोळ्याने हलकेच दूध पाजले. सकाळी उठुन पाहिले तर खेळ संपला होता.
आजवर त्याच्याशी खेळुन आनंद मिळवलास तेव्हा हे सुद्धा सहन करायलाच हवे असा विचार करुन बाहेर खड्डा खणुन त्यात चंगुला एका कापडात गुंडाळुन ठेवले. हलक्या हातांनी माती लोटली आणि आत यायला निघालो. तोच कोपर्यात बसलेला करडा बोका दिसला. त्याचे तोंड सुजलेले होते. म्हणजे काल रात्री यानेच तर.. मनात विचार आला आणि चीड येऊन मी त्याला मारण्यासाठी काहीतरी शोधु लागलो. बहुधा त्याला माझ्या मनातल्या विचारांचा सुगावा लागला असावा. चटकन उडी मारुन पळाला. पण तो करडा बोका आता माझ्या डोक्यात गेला होता. त्याला एकदा तरी चांगला झोडला पाहिजे हेच माझ्या मनात फिट्ट बसले होते.
असे बरेच दिवस गेले. अधुन मधुन मधु पोरं आणत होती. पोरं मोठी होत होती. लळा लावत होती. कधी मधी एखादे लहान असतांनाच जग सोडून जायचे तर कुणी घर सोडून जायचे. मधू मात्र घराला कधी सोडून गेली नाही. याच घरात तिने शेवटचा श्वास घेतला. मधू गेल्यानंतर तिचे मित्र आजुबाजुला फिरायचे ते कमी झाले. तिच्या पिल्लांपैकी एखादं अधुन मधुन दाराशी यायचं. दूध पिऊन निघुन जायचं. पुढे पुढे ते पण बंद झालं. घर पुन्हा पहिल्यासारखं उदास झालं.
एक दिवस मात्र तो करडा बोका परत दिसला. बागेत एका कोपर्यात पाठ करुन बसला होता. तोंड पुसणे चालु होते. त्याला पहाताच माझा राग पुन्हा उफाळुन आला. एक तरी याला धपाटा द्यायचाच हा बराच जुना निश्चय पुन्हा वर आला आणि मी हळुच दबक्या पावलांनी त्याच्याकडे सरकु लागलो. तेवढ्यात तो जागचा हलला आणि तोंड फिरवुन बसला. आता मी त्याच्याकडे आणि तो माझ्याकडे पहात होतो. मला पाहुन तो हलकेच म्याउ म्हणुन हळू हळु चालु लागला. एका पायाने लंगडत होता. आणि अवतार पाहता आता बराच म्हातारा झाला होता. त्याच्याकडे पहाता पहाता अचानक माझ्या मनातले हिंस्त्र विचार न जाणे कुठे पळुन गेले. मी शांतपणे वळुन आत आलो आणि खुर्चीवर बसलो.
त्यावेळेस मनात काय विचार येत होते ते माहित नाही पण एक अनामिक अशी भावना मनात दाटुन आली होती. तोंडाने बोलायचा प्रयत्न केला तर शब्दच फुटत नव्हता. गळ्यात काहितरी अडकल्यासारखं वाटत होतं. माझं मलाच कळेना मला काय झाले आहे ते. अखेर फक्त उठुन एका वाटीत दुध घेऊन ते बाहेर त्याच्या शक्य तितक्या जवळ नेऊन ठेवलं येवढंच आता आठवत आहे.
पुन्हा एकदा तोच म्याउ आवाज आला आणि वाचन बंद करुन मी उठलो. दरवाजा उघडला. बाहेर एक गोजिरवाणं मांजराचं पिल्लू थंडीत कुडकुडत होतं. दरवाजा तसाच उघडा ठेवुन आत गेलो. दुधाची वाटी घेऊन बाहेर आलो. ते पिल्लू बाहेरच दरवाजाच्या जवळ बसलं होतं. हलकेच त्याच्या जवळ दुधाची वाटी ठेवली आणि आत आलो. सकाळी उठुन पाहिलं तर वाटी साफ होती आणि ते पिल्लू कोपर्यात उन खात अंग चाटत बसलं होतं !
प्रतिक्रिया
11 Nov 2010 - 2:52 pm | sneharani
मस्त, आमच्या मनीची आठवण आली!
अगदी मस्त्..निम्या भागापर्यंत आमच्याच मनीची गोष्ट लिहलीत की काय असे वाटले.
अशीच आमची मनी यायची पहाटे ५-६ वाजता परड्यात यायची, नंतर घरातलीच सदस्य झाली...आज ती नाहीये पण खूप आठवणी आहेत.
:)
सूंदर लिहलयं!
11 Nov 2010 - 2:58 pm | यशोधरा
मस्त :)
11 Nov 2010 - 3:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आमची पांढरू अशीच दिसायची! वेडी होती ती थोडी, पण खूप लळा लागला होता तिचा!
11 Nov 2010 - 9:44 pm | प्रीत-मोहर
माझा बु अस्साच दिसायचा
11 Nov 2010 - 3:12 pm | धमाल मुलगा
च्छ्या:! असे प्राण्यांचे अनुभव वाचायचे म्हणजे मला आजवर पाळलेल्या सगळ्या प्राण्यांच्या आठवणी निग्रहानं बाजूला सारुन बसावं लागतं. :(
कथेबद्द्ल काय बोलणार...मस्तच आहे.
बाकी, माझ्यापुरतं म्हणायचं, तर ह्या कथेच्या सारांशाचा संबंध मी आपले संस्कार आणि संस्कृतीशी नक्कीच जोडेन.
11 Nov 2010 - 3:26 pm | मनि२७
मस्तच..
मनीमाऊ आवडते बा आपल्याला ;-)
11 Nov 2010 - 3:37 pm | अरुण मनोहर
खुप मजा आली वाचायला. असेच साधे सरळ (वाफाळलेला वरणभात, त्यावर तूप आणि लिंबू, वाटीत चटका लावणारी कढी आणि बाजुला भेंड्यांची कुरकुरीत भाजी) लिखाण आणखी येऊ द्या नाना!
(अवांतर, मजेसाठी- साधे सरळच होते ना हे? नाहीतर काही तिरकस अर्थ असायचा! मिपावर कशाचा भरोसा नाही बुवा!)
11 Nov 2010 - 11:42 pm | शिल्पा ब
+१
11 Nov 2010 - 4:18 pm | दिपक
नानाचे ले़ख म्हणजे एक स्वतंत्र दिवाळी अंक तयार होऊ शकतो. मस्त वाफाळलेला चहा पीत हा लेख वाचला. फ्रेश वाटले. लहानपणी माजंराचा लळा लागलेला. ’शेरखान’ असे नामकरणही केले होते. सकाळी उठताना नेहमी पायाखाली झोपलेले असायचे ते पिल्लू.. असो
मस्त रे नाना :-)
12 Nov 2010 - 1:26 am | मेघवेडा
>> नानाचे ले़ख म्हणजे एक स्वतंत्र दिवाळी अंक तयार होऊ शकतो.
असेच म्हणतो! सुंदर लिहिलंय!
बाकी दिपकसाहेब, तुम्ही कोणता चहा पिता? नाही, चहा पिताना वाचलेल्या लेखाला प्रतिसाद "वाह नाना!" असा आला म्हणून विचारलं! ;)
12 Nov 2010 - 8:14 pm | प्रभो
>>नानाचे ले़ख म्हणजे एक स्वतंत्र दिवाळी अंक तयार होऊ शकतो
१००% सहमत...
11 Nov 2010 - 4:53 pm | बिपिन कार्यकर्ते
मांजर आवडत नाही... पण कथा / लेख आवडलाच. मस्तच नानासाहेब.
11 Nov 2010 - 5:11 pm | शुचि
राग-लोभ-काळजी-आत्मीयता-भूतदया सर्व काही आहे या लेखात. अतिशय सुंदर लेख. इवलासा संसारच वसवलात घरात.
11 Nov 2010 - 5:15 pm | मृत्युन्जय
साधेसेच लेखन किती चांगले होउ शकते याचा उत्तम नमुना आहे हा.
11 Nov 2010 - 5:20 pm | स्वाती दिनेश
मनीम्याऊ आवडली, आमच्या अनेक मन्या, बोकोबा तर आठवलेच पण माऊ आजीची आठवण झाली.
आमच्या बिल्डिंगमध्ये एक आजी रहायची.तिच्या घरात किमान ४,४ मांजरे एकावेळी असायचीच.तिला मांजरे एवढी आवडायची की तिच्या या मार्जारवेडापायी तिला सगळे माऊआजी म्हणायचे.
स्वाती
11 Nov 2010 - 7:02 pm | रेवती
चांगले लेखन!
जवळ जवळ प्रत्येकाकडे मनीमाऊच्या आठवणी असणार.
माझ्या लहानपणीही डोळे न उघडलेली पिल्ले बघण्यात बराच वेळ घालवलेला आहे.
माझा मुलगा लहान असताना अशीच एक मांजरी ओळखीची झाली होती.
तीच्या तीन बाळंतपणात झालेली ९ पिल्ले यांनीही बरीच करमणूक केली होती.
11 Nov 2010 - 7:14 pm | गणेशा
अतिशय छान लिहिले आहे ..
आवडले .
लिहित रहा .. वाचत आहे
11 Nov 2010 - 7:26 pm | पैसा
आमच्याही देवाघरी गेलेल्या अनेक वाघाच्या मावश्यांची आणि मामांची आठवण आली. सध्या आमच्याकडे जी मिजासखोर मनी आहे तिने तिच्या सोयीसाठी आम्हाला घरात पाळलंय की काय अशी शंका येते. या मार्जार कुलातील मंडळींचा संसार पाहताना आपले सगळे व्याप- ताप विसरायला होतं हे खरं. पण तसंच निसर्गनियमानुसार ती आपलं चिमुकलं आयुष्य जगून निघून जातात तेव्हा होणारं दु:खही दर वेळेला तेवढंच ताजं...
11 Nov 2010 - 9:46 pm | प्रीत-मोहर
सहमत ...अगदी हेच्च म्हणते.......
11 Nov 2010 - 7:41 pm | रामदास
शैलीनी जाता जाता अवचट शैलीपासून बचावलेला लेख आवडला.
आचार्य अत्र्यांनी त्यांच्या एका लेखात म्हटले होते की "मी बोक्यासारखा जगलो. जी खिडकी उघडी दिसली त्या खिडकीतून डोकावून पाहीलं .जे दिसलं ते लिहीलं ."
नाना ,अभिनंदन .
और आन्दे ....और आन्दे.....
(म्हातारा बोका ) रामदास
11 Nov 2010 - 7:49 pm | श्रावण मोडक
शैलीबाबत सहमत. लेख चांगला. आवडला.
11 Nov 2010 - 7:42 pm | चिगो
सुरेख... माझा अगदी लहानपणीचा आमच्या बोक्याला बशीत दुध देतांनाचा फोटो आहे.. आता त्याच्याबद्दल फारसं काही आठवत पण नाही.. पण तुमच्या लेखाने त्याची आठवण आली..
11 Nov 2010 - 7:43 pm | चिगो
सुरेख... माझा अगदी लहानपणीचा आमच्या बोक्याला बशीत दुध देतांनाचा फोटो आहे.. आता त्याच्याबद्दल फारसं काही आठवत पण नाही.. पण तुमच्या लेखाने त्याची आठवण आली..
11 Nov 2010 - 9:26 pm | टिउ
:)
11 Nov 2010 - 9:45 pm | विलासराव
मांजर तर नाही पण आमच्या अबुल भुभुची आठवण झाली.
11 Nov 2010 - 11:46 pm | राजेश घासकडवी
लेख आवडला
12 Nov 2010 - 5:08 am | नंदू
आवडला.
12 Nov 2010 - 2:23 pm | अवलिया
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे मनापासुन आभार ! :)
12 Nov 2010 - 10:59 pm | शिल्पा ब
You'r welcome..
12 Nov 2010 - 3:53 pm | स्पंदना
आम्ही अगदी पहिल्यांदा मांजर आणल , ते काही केल्या अंग धरेना. आम्ही सारे जण 'अग मने! अग मने!' म्हणुन थकलो पण बिचारी काही अंग धरेना. नंतर आमच्या घरी मदत करायला येणार्या पैकी एकजण (जाणता) म्हणाला ' आवो ह्यो बोका आहे, का त्याला मने मने म्हणताय?' मग आम्ही मन्या मन्या म्हणायला लागलो अन मग चांगला वाघासार्रखा रुबाबदार झाला. सकाळी भुक लागली की हा आईंच्या बेडशिटला धरुन झोके घ्यायचा' म्याव असा एक वेगळाच बिच्चारा आवाज काढायचा! पण आमच्या वर मात्र 'म्ह्याव' असा जरा जोरदार आवाज असे. हा पठ्ठ्या उंबर्यावर बसायचा अन येणार्या जाणार्या 'वाघ्या'ला पंजान मारायचा!
अवलियाजी अतिशय सुन्दर अन भावनोत्कट लेखण. विषेशतः शेवट की नविन पिल्लु दारात बसल होत!
12 Nov 2010 - 3:54 pm | llपुण्याचे पेशवेll
मस्तं लेख. आवडला.
12 Nov 2010 - 4:27 pm | परिकथेतील राजकुमार
नान्या अतिशय हलकट लेखन ;) कळाले, समजले आणि त्यामुळे आवडले.
स्वगत :- नान्याच्या लेखाची दुसरी बाजु फक्त मलाच दिसली का काय ;)
13 Nov 2010 - 1:14 pm | विनायक प्रभू
दुसरी बाजु कळाली.
योग्य वेळी योग्य गोष्टी होणे आवश्यक असते.
12 Nov 2010 - 8:22 pm | राघव
छान हो नाना. आवडले लेखन.
बाकी कोणता दुसरा आशय असला तर समजला नाय ब्वॉ आपल्याला. :)
13 Nov 2010 - 9:42 am | ज्ञानेश...
एकेकाळी मीसुद्धा असेच मांजरावर काहीबाही खरडले होते, ते इकडे डकवतो-
मी खूप लहान असतांना बालसुलभ हट्ट करून आमच्याकडे एक पोपट आणला होता. त्याला काहीबाही बोलायला शिकवण्याचाही प्रयत्न केला. दुर्दैवाने त्याने महिन्याभरातच मान टाकली. (त्याची कबर अजून आमच्या जुन्या वाड्यात आहे. त्या प्रसंगापासून मी कुठलाही प्राणी पाळण्याचा प्रयत्न केला नाही. कारण भीती- ’पुन्हा पोपट व्हायचा.’
मात्र एक प्राणी नंतर मजेशीररित्या पाळला गेला. मांजर. हीचे नावच होते ’मांजर!’ किटी वगैरे भानगड नाही. (हे नाव आता इतके अंगवळणी पडले आहे की दुसर्या कोणत्याही मांजराला ’मांजर’ म्हणावे वाटत नाही.)
तर हे असे मांजर आम्ही पाळले आहे, हा दावा आमच्या कॉलनीतले किमान दहा कुटुंब करू शकतात. या मांजराचे निरीक्षण करता करता मला कधी हा प्राणी आवडू लागला, ते कळलेच नाही. यापुढील वर्णन माझ्या मांजराचे असले, तरी ते सर्व मांजरांना सारखेच लागू पडत असावे, असा माझा कयास आहे.
आमच्या या प्राण्याचे एकंदर व्यक्तिमत्व हे घरातल्या एखाद्या बिघडलेल्या मुलीसारखे असते. केव्हाही वेळीअवेळी घरात येणार. घरातली यच्चयावत माणसे आपल्याकडे पाहत आहेत याची पूर्ण जाणीव असूनसुद्धा खुशाल दुर्लक्ष करून आपल्या आवडत्या जागेवर जाऊन बसणार. दिवसातून दहा वेळा आपले अंग चाटुनपुसून साफ करणार. गल्लीतल्या उनाड बोक्यांना विनाकारण नादी लावणार इत्यादि. सकाळी आणि संध्याकाळी बरोबर चहाची वेळ झाली, म्हणजे मांजर अंगाला आळोखेपिळोखे देत घरात हजर. त्यानंतर जो कुणी उभा असेल, किंवा खुर्चीवर बसला असेल त्याच्या पायाशी लाडीक चाळे, मधूनच एखादे मंजूळ "म्यांव" वगैरे. ही सगळी लाडीगोडी दुधासाठी आहे, हे आपल्याला कळत असूनही आपण उगाच त्याच्या डोक्यावर हात फिरवायचा. कारण एवढी एकच वेळ असते जेव्हा मांजर निवांतपणे आपल्याला डोक्यावर हात फिरवू देते. (मांजराचे डोके विलक्षण मऊ असते.)
एकदा (तणफणत का होईना,) आईने दुधाची ताटली पुढे केली, की त्याचा आपला संबंध संपला. नंतर डोळे मिटून दुधावर ताव मारायचा, एकदा मस्तपैकी मिशीवर जीभ फिरवायची आणि मजेत चालू लागायचे. पोट भरलेल्या मांजराचे लाड करणे केवळ अशक्य. तुम्ही तिच्या नुसते जवळ गेलात तरी 'Mind your own business' असा एक तुच्छ कटाक्ष टाकून मांजर चालू पडते.
खरं तर अजून एक दुसरी वेळ असते. हिवाळ्याच्या दिवसात सकाळी आठ वाजता ’गोव्याच्या बीचवर सनबाथ घेत पहुडलेल्या विदेशी ललनेप्रमाणे’ मांजर घराच्या मागच्या ओट्यावर ऊन खात बसलेली असते. अशा वेळी मांजर आपल्या अंगाचे असे काही मुटकुळे करते की तिचा एकही पंजा बाहेर दिसत नाही. आपण तिच्याजवळ जायचे. तिला हे फारसे पसंत पडत नाही, पण उठून दुसरीकडे जाण्याचा अंमळ कंटाळा आल्याने ती आपल्याला हात लावू देते. आपण डोक्यावर हात फिरवावा. ती डोळे बंद करते. आपण मानेवर, पाठीवर हात फिरवल्यावर ती कंठातून ’गर्रर्रर्र....’ असा काहीसा आवाज काढते. हा आवाज पसंतादर्शक असतो की नापसंतीदर्शक, ते मला आजवर कळलेले नाही.
थोड्या वेळाने मांजरालाही आपला उबदार हात आवडू लागतो. मग मांजर उगाच मान तिरपी करून "आता इकडे जरा खाजव, कानाच्या मागे.. आता जरा गळ्याला.." असे सिग्नल्स देते. आपल्याला न्हावी असल्याचे फिलींग येऊ लागते.
मांजर प्रचंड स्वार्थी प्राणी आहे. एकदम कामापुरता मामा. पण एवढ्या एकाच गोष्टीसाठी मला मांजर फार आवडते ! मांजर आपल्या नैसर्गिक प्रेरणांशी प्रामाणिक असते. त्याने आपली Dignity सोडलेली नाही. कुत्रा जसा माणसाच्या आहारी गेला आहे, तसे मांजर गेलेले नाही. कुत्र्याच्या डोळ्यात असंख्य वेळा दिसतात, तसे आशाळभूत भाव मांजराच्या डोळ्यात मला कधीच दिसलेले नाहीत. खरं तर मराठी भाषेत ’आशाळभूत’ हा शब्द आपले अस्तित्व टिकवून आहे, तो केवळ ’कुत्रा’ या प्राण्यामुळे ! मांजराने रस्त्यात येणे अशुभ मानले जाते. पण मांजराला जीवे मारले तर फार मोठे पाप लागते, अशी समजूत आहे. खरं तर मांजराचा कुठल्याही देवाकडे वशीला नाही. मांजर कुठल्या देवाचे वाहन नाही. पुराणकथांमधे त्याचे फार उल्लेख नाहीत. तरीही मांजराला मारण्याचा आपल्याकडे इतका बाऊ का करतात, हे मला अजून कळलेले नाही.
कारण काहीही असो, मांजराला मारता येत नाही हे किती चांगले आहे; नाही?
13 Nov 2010 - 6:24 pm | अवलिया
मस्त प्रतिसाद ! :)
13 Nov 2010 - 12:00 pm | नगरीनिरंजन
सुंदर लेख आणि त्यावरचे प्रतिसादही सुंदर. विशेषतः ज्ञानेश यांचा प्रतिसाद लेखाला अगदी साजेसा.
13 Nov 2010 - 5:56 pm | kalyani B
तस मला स्वतःला मांजर आवडत नाही पण माझ्या बहीणीला आवडायचे.सुट्टी छोट्या भावाने मांजराला गळ्यात दोरी अडकवुन ईतक फिरवल की जशी दोरी तुटली तस ते मांजर पळुन गेल आणि नंतर पुन्हा कधीच नाही आल.
अवलिया यांचा लेख आणि ज्ञानेश यांचा प्रतिसाद आवडला