मित्रांनो,
अनेक दिवसांनी माझ्या एका मित्राने मला पत्र लिहिलेले आहे. त्यात काही विचार आहेत. आणि काही महत्त्वाचे प्रश्न. त्या पत्रामधला वैयक्तिक मजकूराचा भाग वगळता , तेच पत्र आपल्या मिपाकर मित्रमैत्रिणीना दाखवावे असे वाटले. कदाचित उत्तमोत्तम संकल्पना, उत्साह ऊर्जा असलेल्या आपल्या या सुहृदांकडूनच माझ्या या मित्राला काही उत्तरे सापडतील अशी आशा वाटली. (मित्राला मिसळपाव वर हा धागा टाकल्याचे कळवणार आहे. तो अर्थात वाचनमात्र असेल. )
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पत्र लिहायला काहीही कारण नाही. निमित्त नाही. काल बोलणे झाल्यावर थोडे बरे वाटले होते. आणि बर्याच दिवसात पत्र न लिहिल्याची जाणीवही प्रकर्षाने झाली.
आजकाल काय झाले कळत नाही. काही लिहूनच होत नाही. संकल्पना सुचतात (असे निदान माझ्यापुरते मला तरी वाटते !) . परंतु त्या कागदावर उतरवायच्या म्हण्टल्यावर आळस येतो, नको वाटते - बहुदा आतून कुठे तरी भीतीसुद्धा. (कसली ते माहिती नाही.) तुला म्हण्टल्याप्रमाणे , हमड्रम असा शब्द कानात वाजत राहतो. असे अनेक प्रश्न , शब्द, विधाने खूपच गुणगुणायला लागली की एकदम गोंधळल्यासारखे होते.
चांगल्या लेखकाचे (माझ्यापुरते मला कळलेले) एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे, त्याच्या कुठल्यातरी निवेदकाप्रमाणे/पात्राप्रमाणे कधीतरी विचार आपण नक्की केलेला असतो. तर पेठेबाईंची ती "आएं कुछ अब्र" मधली नायिका ..तिला जे वाटते ते मला वाटल्याने कुठेतरी जवळीक साधली गेली आहे. "वयाची अमुक वर्षे ओलांडली तरी आपण ठेचकाळत चालणारे आपण" अशा अर्थाचे वाक्य ती म्हणते. अगदी हजार हिश्शांनी हे पटलेले वाक्य आहे. कशाचीच नक्की खात्री पटत नाही. "आपण नक्की डिप्रेस्ड आहोत का ?" या प्रश्नाचेही खात्रीलायक उत्तर असे जवळ नाहीच ! (हद्द आहे की नाही !) आणि हे जे फ्रॅगमेंटेड असल्याचे दु:ख आहे तेदेखील असे जाळून टाकणारे, तेजाबी नव्हेच , की ज्यामधे सगळे नष्ट करून पुन्हा नव्याने स्वत:ची पुनर्स्थापना करण्याचे इमले बांधावे. किडुकमिडुक अतृप्तींचे किडुकमिडुक आयुष्य.
अनेक प्रश्नांचा छडा लावायचा आहे; परंतु ही उत्तरे जगण्यातून शोधावीशी वाटतात. जे वाचतो, जे ऐकतो, जे पाहातो ते खूप शिकवतेच - किंबहुना , तेच तर सगळे संचित आहे - पण आपल्याला फर्स्ट हँड गोष्टी कशा समजतील ? जगण्याचा सुगंध/दुर्गंध , स्पर्श, रस , तृष्णा , या सार्याचा परिपोष करणारे जगणे आपल्याला कसे साधता येईल ? त्याची एखादी छटा तरी आपल्याला कशी अनुभवता येईल ? अनेक प्रकारची पुस्तके वाचूनसुद्धा, या एका प्रश्नाचे उत्तर मला माझ्यापुरते समाधानकारक मिळावयाचेच आहे.
आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यात न केलेल्या गोष्टी करून पाहाणे हा एक उपाय आहे. आपल्या आयुष्यातल्या आजवर केलेल्या गोष्टीच "समरसतेने" करण्याचा प्रयत्न करणे हा दुसरा उपाय आहे.
आणि बहुदा, मला केवळ थिअरीपुरतीच - पण पक्की - पटलेली एक गोष्ट आहे. ती म्हणजे , "बी अवेअर". "तू आळस करतो आहेस" , "तू ही ही गोष्ट कशीतरीच उरकतो आहेस" , "तू तुझ्याकडून शंभर टक्के देत नाहीस" , "या या गोष्टीचे हे हे परिणाम नक्की होणार", हा जो अवेअरनेस आहे तो (माझ्यासारख्यांच्या बाबतीत) अंधुकसर , अस्पष्ट, धूसर जाणीवेच्या पातळीवर असतो हे मला कळलेले आहे. तो सेन्स जोवर पूर्णपणे जागा होत नाही, तोवर आयुष्य मरगळलेले राहील, त्यामधे कन्व्हिक्शनचा अभाव असेल, बेचव अन्न खूप वेळ खाल्यासारखा आयुष्याचा अनुभव राहील. हे निदान थिअरीपुरते मला कळलेले आहे.
प्रश्न तोच तो सनातन आहे जो अगदी घासून गुळगुळीत झालेला आहे : हे सर्व रोजच्या कृतीमधे कसे आणायचे ?
मला अजून हे कळलेले नाही. तुला तुझ्यापुरते कसे ते समजलेले असेल तर मला सांग.
तुझा मित्र
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
10 Nov 2010 - 10:17 am | ज्ञानेश...
मिभोकाका याचे उत्तर देऊ शकतील असे वाटते.
(गेस्टिमेट- तुमच्या मित्राचे नाव 'स' ने सुरू होते आणि 'व' ने संपते. ;))
11 Nov 2010 - 1:36 am | मिसळभोक्ता
मिभोकाका याचे उत्तर देऊ शकतील असे वाटते.
हे का बॉ ?
साला, आधीच डोक्याचे क्वांटिटेटिव्ह ईझिंग झाले आहे. त्यात हा बेल आऊट कशाला ?
10 Nov 2010 - 10:30 am | सहज
तुम्ही काय उत्तर दिलेत सर?
10 Nov 2010 - 11:53 am | विसोबा खेचर
मुक्तराव,
आपला मित्र बर्यापैकी डिप्रेशनमध्ये वाटतो.. त्याला काही आर्थिक किंवा प्रकृतीच्या विवंचना आहेत काय? कारण या अश्या डिप्रेशनचं/नकारात्मकतेचं ते एक प्रमुख कारण असू शकेल..
आपल्या मित्राला कुठला छंद (अर्थात, चांगल्या अर्थाने.!) आहे काय? उदा - संगीत वगैरे. तो त्याला अवश्य जोपासायला सांगा.
आत्महत्या करायचे विचार जेव्हा मनात घोळू लागतात तेव्हा संगीतच त्या विचारांपासून परावृत्त करू शकतं हा माझा आजपर्यंतचा तरी अनुभव..!
असो,
पत्रातील भाषा व विचार मात्र एकंदरीत भारीच वाटले..
असो..
तात्या.
10 Nov 2010 - 12:15 pm | राजेश घासकडवी
"वयाची अमुक वर्षे ओलांडली तरी आपण ठेचकाळत चालणारे आपण" हे काहीसं दिशाभूल करणारं वाटतं. कदाचित अमुक वर्षं ओलांडल्यामुळे ठेचा बसायला सुरूवात होत असावी. नक्की काय व्हायचंय, आपण तिथपर्यंत पोचलो का हे प्रश्न अठराव्या वर्षी पडत नाहीत. शॉक अॅब्सॉर्बर्स ताजेतवाने असतात. रस्त्याचे खाचखळगे देखील आपलं एक नावीन्य घेऊन येतात. डिप्रेशनच्या गर्तेत फार काळ पडून राहायला उसंत नसते, आणि बाहेर पडण्यासाठी आवश्यक वेळ असतो. आयुष्याच्या मध्याह्नीच आपला प्रवास योग्य चालू आहे की नाही, आपण खड्ड्यात तर अडकत नाही, एकाच विचारपद्धतीच्या गोल गोल फेऱ्यात तर सापडलो नाही - या विचाराच्या चक्रात अडकण्याची सोय असते. "तू आळस करतो आहेस" , "तू ही ही गोष्ट कशीतरीच उरकतो आहेस" , "तू तुझ्याकडून शंभर टक्के देत नाहीस" , "या या गोष्टीचे हे हे परिणाम नक्की होणार", हे सुपरइगोचे कठोर झालेले विचारही याच काळातले. कारण आयुष्याच्या सुरूवातीला त्यांना ती धार नसते. कारण या गोष्टीचे हे परिणाम होणार अशी निश्चिती नसते. अनुभवातून शिकण्याचे तोटे नसतात, जे असतात ते दुर्दम्यशा आत्मविश्वासाचे असतात.
मला काही उत्तर सापडलेलं आहे अशातला भाग नाही. कारण इंटलेक्च्युअल पातळीला जे समजलेलं असतं ते प्रत्यक्षात कसं आणायचं हा कळीचा मुद्दा आहे. पण या बाबतीत सुपरइगोची धार बोथट झाली तर खरी प्रगती होईल असं मला मनापासून वाटतं. जीएंच्या कथांचे नायक अशी अंतिम अवस्था शोधत असतात. असा काहीतरी शोध घेण्याची धडपड, उत्साह चांगला. निदान त्यापायी का होईना, थोडी हालचाल होते. तरीही जीवनाच्या प्रत्येक क्षणाला आपण काहीतरी देणं लागतो या विचारापासून मुक्ती मिळाली तर खरोखर समरसून जगता येईल. अमुक वयापर्यंत आलेल्या अनुभवांचे फायदे घेऊन जर तरुणपणातला काहीसा आंधळा आत्मविश्वास बाळगता आला तर सर्वोत्तम. पण हे करणं सोपं नाही.
10 Nov 2010 - 2:49 pm | चिंतातुर जंतू
अशा प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाची वेगळी असणार. आतापर्यंतच्या आयुष्यात नक्की कोणत्या गोष्टींनी मनापासून आनंद दिला हेही तपासून पाहावं लागेल. कधी कधी अगदी साध्या गोष्टींनी आनंद मिळू शकतो. उदा: बाजारात चाललेली माणसांची आपापसांतली बोलणी ऐकून किंवा बसमधला गोंगाट-गर्दी अनुभवून छान वाटतं असं म्हणणारे लोक जगात आहेत, तसंच एखाद्या अत्यंत किचकट गणिती प्रश्नावर तासनतास घालवून त्यातून जगण्याची उर्जा मिळवणारे शोधकही जगात आहेत. कुणाला एकट्यानं मारवा ऐकून आनंद मिळतो, तर कुणाला स्वतःच्या हातानं दोस्तांना खायला-प्यायला घालायला आवडतं, तर कुणाला दोन्ही थोडं-थोडं आवडतं. त्यामुळे एकंदरीत काही शक्यता चाचपून पहायला सांगण्याशिवाय अधिक ठोस काही सांगता येईल असं वाटत नाही. असे लोक आजूबाजूला पुष्कळ आहेत असं मात्र जाणवतं.
10 Nov 2010 - 5:47 pm | विकास
चांगला विषय... उत्तर नंतर जसे सुचेल तसे देईन... (पण ते, "आधी केले मग सांगितले" मधे बसेल का ते माहीत नाही...). मला एकदम बालकवींची कविता आठवली:
कोठुनि येते मला कळेना
कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला
काय बोचते ते समजेना
हृदयाच्या अंतर्हृदयाला ।।
येथे नाही तेथे नाही,
काय पाहिजे मिळावयाला?
कुणीकडे हा झुकतो वारा?
हाका मारी जीव कुणाला?
मुक्या मनाचे मुके बोल हे
घरे पाडिती पण हृदयाला
तीव्र वेदना करिती, परि ती
दिव्य औषधी कसली त्याला !
तसेच थोडीशी वेगळी असली तरी, ही चर्चा देखील...
10 Nov 2010 - 8:56 pm | मुक्तसुनीत
मंडळी, अनेक आभार. माझ्या मित्राला या धाग्याची लिंक पाठवलेली आहेच.
10 Nov 2010 - 8:59 pm | गणेशा
व्.पु काळेंचे एक वाक्य आठवले (येथे सारांश देतो)..
" पाणी म्हणजे H2O येथेच जग थांबलेले आहे, पृथ्थकरण करायचे ते पाण्याचे..तहानेचे नाही, तहान लागली की पाणी प्यायचे .. बस्स "
आपण कुठली गोष्ट का करतो ? , कुठल्या गोष्टीचे परिणाम काय ?.. आणि फक्त थेअरीच माहीती आहे.. वगैरे वगैरे ..
ह्या गोष्टीपेक्षा ही एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे समाधान .. तृप्ती ..
जगात कोण कोठे का आहे .. या पेक्षा जगात मी कसा कोठे आणि का आहे हे महत्वाचे ...
सुखी समाजाकदे बघुन ही माणुस बर्याच दा बैचेन होतो ते आपल्या नशिबावर ..
पण प्रत्येक माणसाने हे जाणावे सुख आणि समाधान हे वेगळॅ असते ..
प्रत्येक गोष्टीची चव, रस, रंग अनुभवायचा म्हण्जे आपल्याकदे ती कमी आहे म्हनुन त्याची लकीर आपल्याला हवी आहे असे जेंव्हा मन म्हणते .. तेंव्हा हे जाणावे .. असे अनेक रंग निर्मायची ताकद आपल्या अंतरंगात आहे... आपल्या त्या रंगाने आपले मन तरी नकीच न्हावुन निघत आहे..
काय कमी आहे त्या पेक्षा आपल्याकडे काय आहे हे जाणने महत्वाचे ..
एखाद्या कष्ट करणार्या व्यक्तीस थोडाजरी हातभार दिला तरी त्याच्या ओठांवर उमटणार्या हाष्याचा रंग कुठल्याही सुखात उमटत नाही..
(असो थांबतो .. लिहिल पुन्हा असेच कधीतरी .. बाकिच्यांचे वाचत आहे ... )
10 Nov 2010 - 9:45 pm | शुचि
प्रत्येक व्यक्तीमध्ये नीर्मीतीची शक्ती कमी जास्त प्रमाणात जागृत असते. Also it is given only as much to be used. लेखक चित्रकार हे कलाकृती नीर्मीतीमध्ये या शक्तीचा सतत व्यय करत असतात. ही शक्ती भरून येणे हे खूप महत्वाचे असते. अन्यथा "burnt out" स्टेज येऊ शकते.
ही शक्ती हळूहळू भरून कढता येते. नामस्मरण, स्तोत्र पारायण आदि उपाय करून मानसिक बळ पूर्ववत "replenish" करता येऊ शकतं.
11 Nov 2010 - 12:48 am | अडगळ
हा विषय आणि पत्र इथं मांडल्याबद्दल प्रथम आभार.
जाणते लोक प्रतिक्रिया देत आहेतंच. फक्त वारा कापत चालल्यासारखे , दिवसांचे झेरॉक्स मारत जगत आहोत असं प्रत्येकालाच बहुधा कधी ना कधी वाटतं. याला वैयक्तिक महत्वाकांक्षा, उपजीविका(संधी , निवड, समस्या), नातेसंबंध बरेच पैलू असणार. याबाबत वाचायला मी पण उत्सुक आहे.
जाता जाता :
सर्जनशीलता काही विशिष्ट गोष्टीसाठीच जणु राखीव ठेवल्याने ( उदा . लिहीणे, गाणे , नाचणे) बाकी दैनंदिन क्रिया नीरस , वैतागवाण्या होतात. याबाबत कवी मनमोहन यांची एक गोष्ट आठवते . एकदा ते रस्त्यातून भरभर चालत चालले होते . अशोक शहाणे भेटले .शहाणे म्हणाले की काही नवीन कविता वगैरे? मनमोहन म्हणाले ,कसल्या कविता वाचताय . पतंग उडवायला चाललोय्.येताय ?चला.शहाणे म्हणतात की मनमोहन यांच्यासाठी पतंग उडवणे ही कविताच होती. दळिता कांडिता आठवायचा तो हाच विठ्ठ्ल बहुतेक. जनाबाई कवयित्री म्हणून मोठी असते कारण तिचं जातं , केरसुणी आणि तिचं सॄजन (विठ्ठल) यात अतूट कलात्मक संबंध आहे.
'पहिली माझी ओवी गं 'म्हणत चालू केलं दळण की ' दुसरी माझी ओवी गं' ला मुठ्भर जोंधळे जात्यात .आणि 'दहावी माझी ओवी गं , सरले दळण ', म्हणत पीठ गोळा करायला चालू . अशी हातात हात घालत चालणारी जात्याची आणि ओवीची वर्तुळं.
11 Nov 2010 - 12:59 am | Nile
जाता जाता मस्त सांगुन गेलात, पटले. अनेक गोष्टी करायच्या आहेत आणि त्या करायला जमत नाही आहे ही खंत जरी असली तरी त्यातल्या काही गोष्टी होत असतील तर परिस्थिती वाईट नाही असे समजायला हरकत नसावी.
11 Nov 2010 - 1:00 am | मुक्तसुनीत
अडगळराव,
रोचक प्रतिसाद. दैनंदिन आयुष्यातल्या गोष्टीसुद्धा मनःपूर्क , समरसतेने करणे हे सूत्र नीट समजले. मात्र
'पहिली माझी ओवी गं 'म्हणत चालू केलं दळण की ' दुसरी माझी ओवी गं' ला मुठ्भर जोंधळे जात्यात .आणि 'दहावी माझी ओवी गं , सरले दळण ', म्हणत पीठ गोळा करायला चालू . अशी हातात हात घालत चालणारी जात्याची आणि ओवीची वर्तुळं.
वरील वाक्यांमधल्या क्रियांचेच उदाहरण घेतले तर अशा स्वरूपाच्या क्रियांना "काय कविता केल्यात की दळण लावलंय !" - म्हणजे , थोडक्यात , एखादी कविता दळणकामासारखी बोअरिंग आहे असेदेखील म्हण्टले जाते. अशा वेळी "दैनंदिन गोष्टीमधेही काव्य पाहावे" हा दृष्टांत कितपत उपयुक्त/योग्य ठरतो ?
11 Nov 2010 - 1:23 am | अडगळ
>>एखादी कविता दळणकामासारखी बोअरिंग आहे असेदेखील म्हण्टले जा>>
जनाबाईला मजा येत होती ,ती करत होती.
मला दळपाचा डबा घेऊन गिरणीत जायला आवडतंय.
आमचे तानाजीराव मस्त बिडी ओढत , पट्यापट्याची विजार घालून गिरणी चालवतात. पालीला घालवायला कोपर्याकोपर्यात अंड्याची टरफलं अडकवतात. डाळीवर डाळ घाला म्हटलं की होय म्हणुन गव्हावर घालतात. आमची पिशवी बरोबर ओळखतात. दरवेळी प्यांटिला पांढरं लागंल , शिस्तीत जावा म्हणुन सांगतात.
11 Nov 2010 - 3:16 am | सुप्परमॅन
मुक्तसुनीत,
तुमच्या मित्राला सांगा की प्रेमात पड. चांगल्या लेखकाला किंवा कवीला प्रेरणा लागते. जावेद अख्तरला सुद्धा 'एक लडकी को देखा तो' हे गीत लिहण्यासाठी शबानाच्या प्रेमात पडावं लागलं होतं. त्याशिवाय अशी खुमासदार रचना प्रसवत नाही.
जमेल या वयातही.
11 Nov 2010 - 3:17 am | शुचि
तुमच्या मित्रासाठी ही सुंदर कविता -
जिसके कान हैं ......खुली हैं जिसकी आँखें
जिसने पा लिया है मुझे .....उसे मेरा आशीर्वाद !
मेरा नाम ताबीज़ है तुम्हारे लिए
वैभव से भरी हैं तुम्हारे लिए स्वर्ग की गहराईयाँ
तुम्हें मेरा आशीर्वाद !
मेरे शिष्य ! भविष्य का सपना देखो,
दिखाई देगी तुम्हें संसार की पुनर्सृष्टि ।
भूलना नहीं अपनी तपस्या में करुणा-तत्त्व को
याद रखना-
भावी संस्कृति का अनिवार्य माध्यम है कला
सौन्दर्य के माध्यम से पहुँचोगे तुम
अपने लक्ष्य तक।
मैं आदेश देता हूँ तुम्हें :
उच्चारण करो सौन्दर्य का !
एक ने कहा- प्रेम !
दूसरे ने कहा- कर्म !
और तुमने कहा- सौन्दर्य !
यै चाहते हो कि खुले मिलें मेरे वार
उच्चारण करो मेरे चिन्ह का।
अभियान और विजय के क्षणों में कहा मैंने सौन्दर्य,
मैंने सौन्दर्य कहा और असफ़लताओं को ढक लिया सौन्दर्य ने।
पर्वत खिल उठे सौन्दर्य के साथ
खुला रखो रास्ता सौन्दर्य पुष्पों के लिए।
बच्चों को यहाँ आने दो,
निर्वस्त्र होने दो उन्हें उसके सम्मुख
जो विराट ब्रह्माण्ड का सौन्दर्य लाया।
याद रखो - न सम्पत्ति का अस्तित्व है, न निर्णयों का
न गर्व का, न ही किसी प्रायश्चित का
अस्तित्व केवल सौन्दर्य का है।
तुम्हें सौंपता हूँ यह सौन्दर्य
रक्षा करना दृढ़ता से इस सौन्दर्य की
इसी में ही हैं तुम्हारे मार्ग
जो मुझे पाएंगे
वे मुझे सौन्दर्य के साथ पाएंगे
वे चल इए हैं मेरी ओर !
सौ - जाल ........ मूल रूसी भाषा से अनुवाद : वरयाम सिंह
11 Nov 2010 - 3:51 am | रमणरमा
पत्र वाचून उत्तरायण मधल धुंद होते गाण आठवल... त्यात एक ओळ आहे,
सई ये रमुणी सार्या या जगात रिक्त भाव असे परी.. कैसे गुंफू गीत हे..
हा रिक्त भाव प्रत्येकाच्या वाट्याला येतो अधूनमधून.. तो कधी आपला मित्र बनतो आयुष्यातल्या सुखद आठवणी बरोबर आणणारा आणि कधी शत्रू हे केल नाही ते केल नाही तू असाच आहे तू तसाच आहे ही बोचनी लावणारा... जेवढा या विचारातून बाहेर पडायचा विचार करणार तेवढा त्यात गुरफटत जायची शक्यता जास्त.. पण म्हणून त्याला कवटाळुन बसण्यात ही काही अर्थ नाही.. सगळयानच सगळ मिळवता येत अस नाही.. अपयश आणि यश ह्या एकाच नाण्याचा दोन बाजू असतात.. मन मोठी विचित्र गोष्ट आहे.. त्यावर लिहाव एवढी माझी पात्रता नाही पण आजवर जितके उन पावसाळे पाहीले त्यावरून एवढ तर सांगू शकेन आपल मनच आपल्याला राखेतून जन्म घ्यायची शक्ति देत.. त्याच्याशी मैत्री करायची आणि शिकत राहायच. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही म्हणतात...मला वाटत त्याशिवाय चांगला माणूस पण घडत नाही...
तुमचा मित्र नशीबवान आहे, इतक्या सुंदर रीतीने मनातल काहीतरी सांगू शकला तुम्हाला.. आणि असा काहीतरी सांगण्यासाठी तुमच्यासारखा मित्रही आहे त्याच्याकडे. सगळ्यानाच असे मित्र असतात अस नाही. आपल्या भावना शब्दात उतरवण कठीण असत..आणि ते तुम्ही करू शकलात यासाठी तुम्हाला सलाम!
11 Nov 2010 - 3:52 am | धनंजय
बौद्ध लोक हे जे काय "साक्षीत्वाने जगणे" म्हणतात, तसे काहीसे हवे आहे तुमच्या मित्राला.
असे म्हणतात की हे कौशल्य सरावाने मिळवले जाऊ शकते. "विपश्यना" म्हणजे अशा प्रकारचा सराव, असे ऐकले आहे.
11 Nov 2010 - 5:52 pm | विकास
असे म्हणतात की हे कौशल्य सरावाने मिळवले जाऊ शकते.
सहमत.
11 Nov 2010 - 8:49 am | अर्धवटराव
ग्राउंड लेव्हलवर हि समस्या बरेचदा कुठल्याश्या एंझाइमस्च्या सिक्रिशन प्रोब्लेम मुळे होउ शकते. वेगळ्या शब्दात सांगयचं तर ध्यानशक्तीच्या गोठण्याने हा प्रोब्लेम होउ शकतो. त्या करता हमखास उपाय म्हणजे भरपूर घाम येइल असा व्यायाम करणे, कडकडुन भुक लागु देणे आणि मग मस्त आवडते पदार्थ चापुन खाणे आणि रात्रिची पुरेशी झोप घेणे. एक ठरावीक वेळ थोडी ध्यानसाधना करणे. बरेचदा मुळसमस्या अशी असते कि जे आहे ते स्विकारता येत नाहि आणि म्हणुन त्यातुन बाहेर पडायला मार्ग सापडत नाहि वा मार्ग सापडुनही त्यावर चालायची ईच्छाशक्ती नसते. अश्यावेळी कुठलीतरी बाह्यप्रेरणा आवशय असते... जस वर सुचवले कि "प्रेमात पडा". पण अशे बाह्य स्टिम्युलस नेहमीच मिळेल याची शाश्वती नसते. तेंव्हा ति प्रेरणा आतल्याआत जनरेट झालि पाहिजे/करायला हवी. त्यावर योग्य व्यायाम, आवडता आणि योग्य प्रमाणात आहार, गाढ झोप आणि ध्यानसाधना... बरेचदा हे सोल्युशन काम करुन जाते.
तुमच्या मित्राला असं थोडं रुटीन बनवायला सांगा... आणि सर्वात महत्वाचं, हे एका दिवसात होत नाहि. त्याला आवश्यक तेव्हढा वेळ लागतोच. सातत्य हवं. १५ मिनिट व्यायाम आणि १५ ध्यान केलं सुरुवातीला तरी पुरे. कुठला व्यायाम करावा किंवा कुठला ध्यानमार्ग चोखाळवा यावर जास्त विचार करु नये. पटकन निर्णय घेउन सुरुवात केलेली बरी.
तुमच्या मित्राला आमच्या शुभेच्छा कळवा.
अर्धवटराव
11 Nov 2010 - 10:00 am | महाबळ
आपण ज्या दैनंदिन गोष्टी बहुधा सर्वांनाच कंटाळ्वाण्या वाटत असतात किंवा त्यातून काही साध्य केल्यासारखं वाटत नाही. मी स्वत: या गोष्टींचा अनेक वेळा विचार केला आहे. अगदी कंटाळा येईपर्यंत , :) आणि त्यातून मला काही विचार येत गेले तसं मी वागण्याचा प्रयत्न केला, बरेचसे उपाय वाया गेले; मोजके परिणामकारक होते.
त्यातलाच हा एक. रोजच्या बारीक सारीक गोष्टी ज्या आपण करतो त्यात काही करतो त्यात बदल करून पहावा आणि तेव्हा आपली सर्व इंद्रिय (senses) उघडी ठेऊन बदल अनुभवावा. एक उदाहरण देतो. मी दररोज ऑफिस साठी दुचाकी वरून जातो. १७-१८ किमीचं अंतर आणि बेंगलोरची रहदारी, अगदी वैताग येतो. मग मधूनच एके दिवशी मी बसने प्रवास करतो. वेळ जास्ती जातो पण त्यावेळचा एखादा प्रसंग मन तरतरीत करून जातो. सकाळी- सकाळी एखादी गजरा माळलेली स्त्री तुमच्या पुढच्या बाकावर बसते, तो फुलांचा सुवास पुढचा पूर्ण दिवस पुरतो, किंवा एखाद्या शाळकरी पोरानं पळत पळत बस पकडलेली असते, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हालाही कुठे तरी सुखावून जातो. हे अनुभव दुचाकीवरून प्रवास करताना मिळणार नाहीत आणि रोजच असा प्रसंग मिळेल असाही नाही. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. गोष्ट तशी लहानच पण जर ती मनाला स्पर्श होऊ दिली तर ती नक्कीच मदत करते आणि येणारा दिवस तजेलदार करते.
11 Nov 2010 - 10:58 am | मुक्तसुनीत
महाबळ, तुमचा प्रतिसाद आवडला.
माझ्या मित्राने हेच सूत्र त्याच्या पत्रात कुठेतरी मांडले आहे असे मला वाटले. पण तुमचे उदाहरण मला फार आवडले.
11 Nov 2010 - 11:27 am | राघव
मला असं वाटतंय की थोडं न्यूनगंडाकडे झुकलेलं विचारचक्र आहे हे. हे केवळ सर्जनशीलतेबाबतच आहे असं मी गृहीत धरतो.
मी स्वत: या प्रकारातून गेलेलो आहे. अर्थात् माझ्यासाठी जरा जास्त गुंतागुंत होती, कारण मला त्यावेळेस जगण्यातल्या कोणत्याच गोष्टीत रस वाटत नव्हता. न्यूनगंडाकडून नैराश्याकडे जाणारा हा प्रवास पुढे खूप घातक ठरतो. वाचलो म्हणायचे. :)
माझ्यामते अशा वेळेस त्यांनी स्वत:च धनात्मक विचार करावा. शक्यतो कुणा दुसर्याच्या विचाराचा, पुस्तकाचा आपल्या विचारचक्रावर प्रभाव नको. त्यामुळे नको ते प्रश्न उगाच उभे राहतात अन् अकारण गुंतागुंत वाढत जाते.
एक म्हणजे आपले विचार (कोणत्याही कारणाने का होईना) मुक्तपणे व्यक्त न करता आल्याने तुमच्या मित्राचे विचारचक्र असे होत असावे. आपणच आपल्यावर अकारण लादलेली ही बंधनं असतात.
सरळ एक डायरी करायची. दररोज कोणत्याही विषयावर कमीत कमी ५ ओळी लिहायला सुरुवात करायच्या. अट एकच, त्यात स्वत:चे मत व्यक्त झाले पाहिजे. शक्यतो इतरत्र वाचून नाही, स्वत:च्या विचारमालेतून असावे. २-३ डायर्या भरल्या की आपल्यालाच आपल्या विचारचक्राचा प्रवास समजायला लागतो. आपलाच प्रवास आपल्याला आवडायला लागतो. स्वत:वर प्रेम करण्याची ती पहिली पायरी आहे. त्यातून आत्मविश्वास येतो. अन् आत्मविश्वास आला की न्यूनगंडास जागा कुठे?
दुसरं म्हणजे सतत सर्वत्र चुकीचेच घडतांना दिसण्याची/बघण्याची सवय. याचाच नंतर स्वभाव बनतो. अन् हेच आपल्याला काहीही विधायक विचार करण्य़ापासून अडवतं. कोणत्याही गोष्टीत चांगले काय झालं ते आधी बघायची सवय मनाला प्रयत्नपूर्वक लावावी लागते. जसं सोन्याच्या खाणीत माती-धोंड्यांचे मोठमोठ्या गोळ्यांमधून सोन्याचा फक्त कण काढून घेतात तस्सं.
तुम्ही सगळे माझ्याहून वयाने मोठे आहात. त्यामुळे चुकून जास्त लिहून गेलो असल्यास अन् वाईट वाटल्यास क्षमस्व.
11 Nov 2010 - 11:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चर्चा प्रतिसाद माहितीपूर्ण आणि उपयोगी आहेत.
-दिलीप बिरुटे
11 Nov 2010 - 2:23 pm | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
11 Nov 2010 - 12:57 pm | विजुभाऊ
मित्राला सांगा वर्जेश सोळंकी किंवा तत्सम कविता जरा कमी वाचत जा.
सणासुदी च्या दिवाळीच्या दिवसात जरा घरी मुलांमाणसात कपाळावर सुतकी कळा न आणता आनन्दात रहा.
जगण्यात अर्थ आहे किंवा नाही याचा विचार अकरण्यापेक्षा जगणे जगायला लाग.
रमणीच्या गालावर उमटलेली लाली ही लज्जे मुळे आहे , रडल्यामुळे आहे ,पित्तप्रकोपामुळे उमटली आहे , अपचनामुळे अग्नीमांद्यामुळे आलेली आहे थंडीने गाल फुटले आहेत की तारुण्याची नवीनव्हाळी झळझळत आहे याचा विचार करण्यापेक्षा लालसरझालेल्या गालामुळे ती तरुणी किती सुंदर दिसते हे पहायला लागा
..... टारेश विजुभाऊ.
11 Nov 2010 - 5:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रमणीच्या गालावर उमटलेली लाली ही लज्जे मुळे आहे , रडल्यामुळे आहे ,पित्तप्रकोपामुळे उमटली आहे , अपचनामुळे अग्नीमांद्यामुळे आलेली आहे थंडीने गाल फुटले आहेत की तारुण्याची नवीनव्हाळी झळझळत आहे याचा विचार करण्यापेक्षा लालसरझालेल्या गालामुळे ती तरुणी किती सुंदर दिसते हे पहायला लागा
अहाहा...! क्या बात है विजुभौ. :)
-दिलीप बिरुटे