माज

सविता's picture
सविता in जनातलं, मनातलं
19 Sep 2010 - 4:02 pm

एखाद्याला उगाच माज आहे एखाद्या गोष्टीचा असं वाटून किती वैतागतो आपण कधीतरी.....

माझ्या घराच्याजवळच एक सायकलचे दुकान होते."जयनाथ सायकल मार्ट". हवा भरणे, किरकोळ दुरुस्ती अशा प्रकारचे एक १५ बाय १५ जागेत थाटलेले जुनाट दुकान होते ते! दुकान तसे यथा तथाच पण बहुतेक त्या एरिया मध्ये तेव्हा असेलेले एकमेव सायकलचे दुकान असल्यामुळे चांगले चालायचे...
दुकानाचा मालक एक गतकाळीचा पहिलवान होता.....म्हणजे ते मला दुकानात लावलेल्या फोटोवरुन कळले होते. पहिलवान गल्ल्यावर बसण्यशिवाय आणि एखाद्या आलेल्या मित्राशी तास न तास गप्पा मारण्याशिवाय काहीच करायचा नाही. खरेतर त्याला स्वत:ला सायकल दुरुस्ती मधले...हवा भरणे सोडले तर काहीच कळत नसावे असा माझा अंदाज आहे.

त्या दुकानात एक नोकर कामाला होता....नाव माहीत नाही....पण विद्रुप आणि त्रासिक चेह-याचा तो माणूस होता.....जरी नोकर असला तरी मालकाला काहीच येत नसल्यामुळे मग तोच सगळ्या दुकानात एकमेव माहीतगार माणसाच्या तो-यात फिरायचा.....

तुम्ही सकाळी कितीही लवकर शाळेसाठी निघा....हा बाबाजी मालक असला किंवा नसला तरी एखादी सायकल दुरुस्त करत बसलेला किंवा पंक्चर काढत बसलेला दिसायचा. रात्री पण जवळ जवळ ८:३०-९:०० पर्यन्त तो असायचा.... दुपारी अर्धा तास जवळ कुठे तरी जेवायला जात असावा तेवढाच!
कायम तेच ठराविक कपडे.....शर्ट दुकानाच्या आतल्या खुन्टीवर टांगलेला, लाल-नारंगी रंगाचे मळके बनियन आनि ऑईल चे डाग पडून पडून काळपट झालेली पॅन्ट ह्याच ठरलेल्या पोशाखात मी त्याला वर्षानुवर्षे पाहात आले....

मी आठवीला असताना आमची पहिली सायकल घरात आली.....तशी मी मैत्रिणिंच्या सायकल वरुन धडपडत-धडपडत एक दोन वर्ष आधीच सायकल शिकले होते. ताईला मात्र सायकल सुरुवातीला नीट येत नव्हती...त्यामुळे ताई साठी घेतलेली सायकल मीच जास्त फ़िरवायचे. मग दर दोन तीन दिवसांनी हवा भरणे, कधी ऑईलिंग यासाठी येण्या जाण्याच्या रस्त्यावर जयनाथच सोयिस्कर पडायचे.....

सायकल घेउन ३-४ महिने झाले होते....आणि दुचाकी प्रमाणे सायकलचे पण सर्विसिंग करुन घ्यावे, मग सायकल जास्त दिवस चांगली राहते..असे कोणितरी मला सांगितले होते........ मग एक दिवस त्याप्रमाणे मी जयनाथ मध्ये सर्विसिंगसाठी सायकल टाकून आले......संध्याकाळी सायकल आणायला गेले....माझी
सायकल तिथे पुर्ण खोलून ठेवलेली होती...तासाभरात सायकल मिळेल...आणि बिल १२५ रुपये झाले हे ऐकून मी दचकले.....

तो ९२-९३ च काळ होता....नवीन सायकल ११००-१२०० ला मिळायची....तेव्हा ३-४ महिन्यापुर्वी घेतलेल्या नवीन सायकलच्या सर्विसिंग साठी १२५ रुपये म्हणजे खूपच जास्त वाटले...हा माणूस आपल्याला फसवतो आहे असे वाटून मी घरी परत आले.....पप्पांना सांगितले....तेव्हा "आता पैसे द्यावे लागतील...त्याने तुझी सायकल आता पुर्ण खोलून ठेवली आहे..आणि पैसे दिल्याशिवाय काही तो परत ती पहिल्यासारखी जोडून देणार नाही.....मुळात तू कशाला नवीन सायकल सर्विसिंगला टाकायला गेलीस...आधीच किती पैसे होतील ते का नाही विचारले.." वगैरे वगैरे बोलणी खाल्ली.......

दोन-तीन दिवस आधी आमच्यापेक्षा थोडा मोठा असलेला माझा आत्येभाऊ आमच्याकडे राहायला आला होता...... मी त्याला सगळे सांगितले, तो पण अगदी तावातावात..."तो आपल्याला कसं फसवतोय....आत्ता जाऊन विचारू ना...१२५ रुपये कसले झाले.....अजिबात मिळणार नाही...." असे बोलला....मला कोणितरी आपल्या बाजुने भांडायला आहे म्हणुन जरा धीर आला...... आम्ही दोघे लगेच परत त्या दुकानात यायला निघालो......

आलो...तर आमची सायकल जोडण्याचेच काम चालु होते....माझ भाऊ आवेशात...."कसले १२५ रूपये....कुठले एवढे पार्ट बदलले नविन सायकल मध्ये...उल्लु बनवतात का...आम्हाला पण कळतं"....वगैरे वगैरे बडबडायला लागला.... यावर त्या माणसाने तुच्छतेने माझ्या भावाकडे बघितले.....आणि मोठयाने बडबड करत एक बिल आणुन त्याला दिले...आणि बदललेला असे दाखवलेला प्रत्येक पार्ट बाजुला ठेवलेला दाखवला आणि तो पार्ट बदलणे का आवश्यक होते ते धाड्धाड सांगायला सुरुवात केली....आता मला आठवत नाही ती लिस्ट...पण लिस्ट आणि बदललेल्या आधीच्या पार्ट चा ढिग पाहिल्यावर माझा भाऊ निरुत्तर झाला....

शेवटी सगळे काम होईपर्यन्त थांबुन.......आम्ही पैसे देउन सायकल घेउन निघालो.......सगळा वेळ तो माणुस तोंडातल्या तोंडात काहितरी "हल्लीची आगाऊ मुले" या सदरावर पुटपुटत होता...आणि आमच्या कडे "मला शिकवताहेत" असे तुच्छतादर्शक माजोरडे कटाक्ष टाकत होता.....

या सगळया प्रकारामुळे बहुतेक माझा चेहरा पण त्याच्या लक्षात रहिला....नंतर पण कित्येक दिवस मी हवा भरायला थांबले...की माझ्याकडे माजोरडा तुच्छतेचा कटाक्ष टाकायला तो विसरयचा नाही.......

नंतर हळूहळू मग त्याच्या मनातुन हे पुसट झाले असावे...त्याने बाकिच्या गि-हाईकांना देतात तशी कामात असल्यामुळे "खिजगणतीत नसलेली" वागणुक मला द्यायला सुरवात केली.... आणि मी हुश्य केले...

अशी कित्येक वर्षे गेली......माझी सायकल वरुन सनी..स्कूटी.... एम-८०...मग कार अशी वाटचाल होत राहिली........पण जायचा यायचा रस्ता तोच असल्यामुळे....कोप-यावर तो माणूस दिसत रहिला.....तेच लाल - नारंगी बनियन अन मळकी पॅन्ट....तोच त्रासिक चेहरा.........त्यामुळे त्याचे वय वाढलंय हे कधी फारसे जाणवले नाही.....जणु त्याच्या दुकानात काळ वर्षानुवर्षे तिथेच थांबला होता....

मग असेच दोन तीन वर्षापुर्वी अचानक मला दिसले...की जयनाथ सायकल मार्ट बंद होऊन तिथे "जयनाथ स्नॅक्स सेन्टर" सुरु झालेय......बहुदा तो पहिलवान गेला असावा अणि त्याच्या मुलाबाळांना सायकल दुकानापेक्षा वडापाव सेन्टर हा जास्त योग्य व्यवसाय वाटला असावा.....दुकानच्या बाहेरच्या जागेत बाकडयावर दोन माणसे गप्पा मारत बसली होती....

दुकानात झालेला बदल पाहिल्याचे आश्चर्य ओसरल्यानंतर माझी दॄष्टी दुकानाच्या ओसरीकडे वळली.........तिथे तोच नोकर बसला होता....... हवा भरण्याचा मॅन्युअल पम्प घेउन! इतक्या वर्षात पहिल्यांदा मी त्याला निवांत बसलेले बघितले...अन काहितरी दुसरा मोठा बदल होता.... चेह-यावरचा माज कुठे तरी हरवला होता......

त्याचे साम्राज्य...जिथे तो एकमेव राजा होता.......अचानक पणे संपले होते........पण वर्षानुवर्षे तेच काम, त्याच जागेत तो-यात केल्यावर...अता नव्या परिस्थितीमध्ये काय करावे हे त्याला बहुतेक कळत नव्हते....

कित्येक दिवस मी मग रोज येता-जाता त्याचे निरिक्षण करत होते.....कधी तरी हवा भरायला कोणितरी असायचे...कधि नसायचे तेव्हा बुडाखाली दगड घेऊन आणि गुडघ्यावर हाताची घडी घालून तो रस्त्याकडे बघत बसलेला असायचा.......

त्याच्या चेह-यावरचा तो राज्य हरून परागंदा झालेल्या राजासारखा बापुडवाणा भाव बघताना खूप कसेतरी वाटले.....आणि हळूहळू तो माणूसही म्हातारा झाल्याचा खुणा मला त्याच्या चेह-यावर दिसायला लागल्या.... विद्रुप असला तरी त्याचा चेहरा पुर्वी माजामुळे कदाचित वयापेक्षा तरुण दिसत असेल बहुतेक...

मग मी काही महिन्यांसाठी पुण्याबाहेर गेले....... मध्ये कित्येक दिवस माझे लक्ष पण नव्हते...आणि परत एक दिवस सहज माझे कोप-यावर लक्ष गेले....... स्नॅक्स सेन्टर फ़ारसे काही फायदेशीर ठरले नसावे...आणि त्या जागेत दुसरे काय करावे हे न सुचल्याने नवीन मालकाने बहुतेक अर्ध्या जागेत परत सायकलचेच दुकान सुरु केले होते....

तो नोकर परत उत्साहाने आणि लगबगीने सगळीकडे सायकल दुरुस्ती सामानाच्या ढिगा-यात बुडाला होता. त्याच्या नेहमीच्या त्रासिक चेह-यावर "राज्य" परत मिळाल्यामुळे पुर्वीचा रंग परत आला होता की मलाच असा भास होत होता कुणास ठाऊक!

माज करतो म्हणून त्रासदायक वाटतात माणसं..पण त्याच माजोरड्या माणसाला त्या नेहमीच्या मिजासीतून बाहेर आले कि वाटतं....नको.. ही माणसे स्वत:च्या माजात असतात तेव्हाच बरी दिसतात.....त्यांना केविलवाणे झालेले बघणे अजूनच कसेतरी वाटते....

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

शुचि's picture

19 Sep 2010 - 4:10 pm | शुचि

माणुसकीची आणि बारीक नीरीक्षणाची पोत असलेला लेख.

स्वाती२'s picture

19 Sep 2010 - 5:30 pm | स्वाती२

लेख आवडला!

सीख : माज इन्सान को नौजवान बना देता है.

मितभाषी's picture

21 Sep 2010 - 10:33 am | मितभाषी

सीख : माज इन्सान को नौजवान बना देता है.

अगागा वेताळा,
पोट धरुन हसतोय.

रेवती's picture

19 Sep 2010 - 5:53 pm | रेवती

लेख आवडला.

चतुरंग's picture

19 Sep 2010 - 6:01 pm | चतुरंग

एखाद्या गोष्टीत निष्णात असण्याने आपण लोकांच्या गरजेचे आहोत हा भाव माणसाला काम करत ठेवण्यास आवश्यक असतो. गरज संपली की मग माणसाला काळ वेगाने घेरतो!
(पूर्वीच्या बलुतेदारांचे काळाच्या ओघात हळूहळू असेच झाले असावे काय? असा एक प्रश्न अस्वस्थ करुन गेला..)

रंगा

पैसा's picture

19 Sep 2010 - 6:44 pm | पैसा

सेम टू सेम

गणपा's picture

20 Sep 2010 - 2:36 pm | गणपा

आपण लोकांच्या गरजेचे आहोत हा भाव माणसाला काम करत ठेवण्यास आवश्यक असतो. गरज संपली की मग माणसाला काळ वेगाने घेरतो!

रंगाशेठशी सहमत.
बरेजण रिटायर झाल्यावर त्यांच वय झपाटाने चेहेर्‍यावर जाणवते.

दत्ता काळे's picture

19 Sep 2010 - 6:20 pm | दत्ता काळे

संस्थाने खालसा झाली तरी संस्थानिकांची 'आब' राखून ठेवण्याची केविलवाणी धडपड ह्या विषयावरचे 'नामधारी राजे' नावाचे श्री. माधव जोशींचे नाटक एकदम आठवले.

(पूर्वीच्या बलुतेदारांचे काळाच्या ओघात हळूहळू असेच झाले असावे काय? असा एक प्रश्न अस्वस्थ करुन गेला..)
- पूर्वीच्या बलुतेदारांकडे माज नसावा ( कारण तसे कुठे, कुठल्याही माहीतीत / वाचनात आलेले नाही ) पण गावगाड्यातला त्यांचा असणारा मान समाजाने मान्य केलेला असल्याने ते त्याबाबत आग्रही असंत हे निश्चित. नैसर्गिकरित्या गरज संपली आणि बलुतेदारी संपुष्टात आली. गावातले तथाकथित बलुतेदार हल्ली शेतावर शेतमजूर म्हणून काम करतात हे मी बघितले आहे.

ज्ञानेश...'s picture

19 Sep 2010 - 6:52 pm | ज्ञानेश...

आवडला.
'माज' या विषयाचे तज्ञ 'परा' यांचे मत जाणून घ्यायला आवडेल. :)

ह्यातच सारे काही आले! ;)

(हिरवा माजुर्डा)रंगा

सुनील's picture

19 Sep 2010 - 7:11 pm | सुनील

लेख आवडला.

शिल्पा ब's picture

19 Sep 2010 - 8:44 pm | शिल्पा ब

छान लिहिलंय...
असे केविलवाणे लोक पहिले कि आधीचाच गोंधळ बरा होता असे वाटते.

काव्यवेडी's picture

19 Sep 2010 - 10:20 pm | काव्यवेडी

लेख आवडला. एखादी साधी गोष्ट ही खुलून येते.
तसा वाटला लेख !!

मी-सौरभ's picture

19 Sep 2010 - 10:41 pm | मी-सौरभ

आवडेश :)

चिगो's picture

20 Sep 2010 - 11:06 am | चिगो

सुंदर निरीक्षण.. आणि हे पण आवडलं "सीख : माज इन्सान को नौजवान बना देता है"
माजलेला तो सांड, चेचलेला तो बैल..

ब्रिटिश टिंग्या's picture

20 Sep 2010 - 11:17 am | ब्रिटिश टिंग्या

आमच्या एका अंमळ माजोर्ड्या मित्राची आठवण आली :)

अभिरत भिरभि-या's picture

20 Sep 2010 - 11:45 am | अभिरत भिरभि-या

>>"जयनाथ सायकल मार्ट".
>>दुकानाचा मालक एक गतकाळीचा पहिलवान होता..

तुम्ही कोथरूडला होतात का हो ?? :)

अवांतर : छान लेख

सविता's picture

20 Sep 2010 - 12:05 pm | सविता

व्हय व्हय........

ब्रिटिश टिंग्या's picture

20 Sep 2010 - 12:20 pm | ब्रिटिश टिंग्या

बर्‍याच दिसांनी व्हय ऐकल्याने ड्वाले पानावले!

इकडे लोकांचे डोळे अमंळ जास्तच वेळा पाणावतात असं दिसतंय....

अभिरत भिरभि-या's picture

20 Sep 2010 - 2:40 pm | अभिरत भिरभि-या

च्यायला आपल्याशी नाय माजोरा वागायचा तो. तुम्हाला पुण्याबाहेरच्या समजला का काय ? ;)

आता लोक त्याच्या नावाने "वैचारिक पिंका" टाकणार. टायर/रिटायर च बौद्धिक घेणार - भाग्य मोठं त्याचे.

अवांतर - त्या पहिलवानाला लिहिता वाचता येत नव्हते. बर्‍याचदा पत्र/पेपर वाचून दाख्वून फुकट हवा भरऊन घेतली आहे आपण ! :-) एवढ्या मोठ्या पहिलवानाला लिहिता वाचता येत नाही याचे मला आधी आश्चर्य वाटायचे. :)

नगरीनिरंजन's picture

20 Sep 2010 - 11:46 am | नगरीनिरंजन

छान लिहीलंय. साध्या साध्या गोष्टी फुलवण्याची हातोटी आवडली.
बहुतेक वेळा आपल्याला कष्टकरी वर्गाचाच माज खुपतो हे ही एक निरीक्षण आहे. उच्चभ्रू लोकांचा माज ही त्यांची शान समजली जाते.
असो. प्रत्येकालाच कसला ना कसला माज असतो. फक्त, स्वतःचा असतो तो स्वाभिमान आणि दुसर्‍याचा असतो तो माज हाच काय तो फरक. :-)

रम्या's picture

20 Sep 2010 - 2:16 pm | रम्या

लेख आवडला!

माज करतो म्हणून त्रासदायक वाटतात माणसं..पण त्याच माजोरड्या माणसाला त्या नेहमीच्या मिजासीतून बाहेर आले कि वाटतं....नको.. ही माणसे स्वत:च्या माजात असतात तेव्हाच बरी दिसतात.....त्यांना केविलवाणे झालेले बघणे अजूनच कसेतरी वाटते....

सेम भाव होते माझे ही .. ह्या लाईन वाचताना .

असो
बकीनगरी निरंजन यांच्या रिप्लायशी सहमत

फारएन्ड's picture

21 Sep 2010 - 3:14 am | फारएन्ड

छान लिहीले आहे.

मदनबाण's picture

21 Sep 2010 - 7:24 am | मदनबाण

लेखन आवडले... :)

हर्षद आनंदी's picture

22 Sep 2010 - 12:57 pm | हर्षद आनंदी

त्याचे साम्राज्य...जिथे तो एकमेव राजा होता.......अचानक पणे संपले होते........पण वर्षानुवर्षे तेच काम, त्याच जागेत तो-यात केल्यावर...अता नव्या परिस्थितीमध्ये काय करावे हे त्याला बहुतेक कळत नव्हते....

तो बापुडवाणा चेहरा जसा डोळ्यासमोर उभा राहिला.

सुरेख व्यक्तीरेखाचित्रण!!