लहानपणच्या आठवणी

वेदश्री's picture
वेदश्री in जनातलं, मनातलं
9 Jun 2010 - 1:07 pm

"बेट्या, आता तू मोठा झालास. आता वेगळ्या ताटात जेवत जा." मी लहानपणी तिसरीत जाईतो बाबांच्या ताटात जेवायचे. यामुळे त्यांच्या तिखट खाण्याच्या प्रमाणाला आळा बसायचा त्यामुळे ते करवादायचे पण लहान लेकराला काय म्हणा म्हणून असा क्षीण प्रयत्न करायचे.
"पुढच्या वर्षीपासून जेवत जाईन वेगळ्या ताटात. अजून मी छोटीच आहे." बागेत जाऊया, सर्कस बघायचीये, नवे बूट घ्यायचे वगैरे म्हटले की बाबांचे "पुढच्या वर्षी" हे उत्तर इतके ठरलेले असायचे की तेच उत्तर माझ्या तोंडून बाहेर पडल्यास नवल ते कसले?

~~~

बाबांच्या हापिसात बसून त्यांच्या कामात त्यांना मदत करण्याची मला कायम हौस. बेरजा-वजाबाक्यादेखील येत नसताना काय काम द्यायचं हे बाबांना नेहमी पडलेले कोडे असायचे. एकदा अशीच त्यांच्या मानगुटीवर बसल्याने त्यांनी मला पोस्टींग केल्याच्या लाल पेनाने मारलेल्या टिका (टिकमार्क्स) नसलेल्या कॅशबुकातल्या एंट्र्या शोधायचे काम दिले. ते करताना मी दुसर्‍या गोष्टीही शोधायला सुरूवात केली कॅशबुकात आणि मग...
"बाबा, या एंट्रीला टीक मारलेली नाहीये तुम्ही आणि हिच्याखाली एकच शून्य काढलेले आहे. इतरांच्या खाली मात्र तीन शून्यं काढलेली आहेत. यात का नाही ३ शून्यं काढलेली?"
"मी काकांशी बोलतोय. जरावेळानी सांगतो." असे बाबांनी म्हणूनदेखील मला कुठे तितका धीर धरायला?
"सांगा ना, बाबा."
मी जास्तच हट्ट धरता त्यांनी मला कडक शब्दात रागावून हाकलून दिले. मग माझी रडायला सुरूवात आणि तक्रार करायला आईकडे मोर्चा. बाबांच्या सगळ्या क्लायंट्सना तसे माझे बाबांच्या कामातल्या रुचीमुळे भारी कौतुक असायचे.. हट्ट पुरवले जायचे जमतील तितके. काकांनी बघितले कॅशबुकात मी सांगत होते त्या एंट्रीत. चेहर्‍यावर आश्चर्य आणि कौतुक.. मोहरा बाबांकडे वळवत काका,
"वकीलसाहेब, कशाला रागवता छोकरीला? आमच्या पोस्टींगची पद्धत बरोबर हुडकून काढलीये तिने.. आणि त्यातली पोस्ट नसलेली एंट्रीही. पोस्ट झाले की आम्ही ३ पूज्यं देतो रकमेखाली आणि कॅशबुकात एंट्री केल्यावर १ पूज्य देतो."
मग मला बाबांनी परत बोलवून रडणे बंद करायला सांगितले आणि १च पूज्यं असलेल्या एंट्र्या शोधायला सांगितल्या! :)

~~~

"रस्त्यात हरवलीस तर पोलिसमामाला सांगायचे की बरोबर पत्ता शोधून द्या म्हणून. त्यांनी नाव विचारले तर पूर्ण नाव सांगायचे. नुसतं वेदश्री सांगायचं नाही.. कळलं?" आई.
"हो. पण पूर्ण नाव म्हणजे काय?"
"पूर्ण नाव म्हणजे तुझ्या नावासोबत बाबांचं नाव आणि आडनाव सांगितलं की झालं तुझं पूर्ण नाव. आता तू घरात सगळ्यांना पूर्णच नाव सांगत जा."
"हो आई."
पूर्ण नावाची शिकवण मिळताच मी प्रत्येक गोष्टीचे पूर्ण नाव सांगायला सुरूवात केली बाबांचे नाव आणि आडनाव लावून! दप्तर, जांभूळ, चित्ता, दादा, वात्रट, वगैरे सगळ्याच!

मौजमजाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

9 Jun 2010 - 1:27 pm | अवलिया

पूर्ण नावाच्या शिकवणीचा विसर पाडणारी घटना कोणती ?

--अवलिया

वेदश्री's picture

9 Jun 2010 - 2:13 pm | वेदश्री

विसर पडलेला नाही आजही. पूर्ण नाव केव्हा आणि कुठे वापरायचे याचे निकष मात्र लावलेत माझे मी. :)

अवलिया's picture

9 Jun 2010 - 2:17 pm | अवलिया

खुलाशाबद्दल धन्यवाद.

--अवलिया

कानडाऊ योगेशु's picture

9 Jun 2010 - 2:23 pm | कानडाऊ योगेशु

आठवणी छान आहेत.

अमुक अमुक काका,
तमुक तमुक दादा,
क्ष आत्या,य मामा
असे व्यक्तिच्या प्रत्येक नावाबरोबर नाते पण येत असलेले पाहुन माझी चुलत बहीण लहान असताना तिच्या वडलांना बरेच दिवस नुसते बाबा न म्हणता अशोकबाबा अशोकबाबा असे म्हणत असे.

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

मदनबाण's picture

9 Jun 2010 - 3:27 pm | मदनबाण

लहानपणीच्या आठवणी आवडल्या... :)

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

इंटरनेटस्नेही's picture

9 Jun 2010 - 8:52 pm | इंटरनेटस्नेही

छान लेख...!
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

यशोधरा's picture

9 Jun 2010 - 8:56 pm | यशोधरा

छान :)

मस्त कलंदर's picture

9 Jun 2010 - 8:59 pm | मस्त कलंदर

प्रत्येक गोष्टीचे पूर्ण नाव!!!

आयडीया सहीच आहे...;;)
आयडिया नि लेख आवडला हे वेगळे सांगायला नकोच...

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!