प्रास्ताविक- राजीव साने हे मुक्त विचारवंत आहेत. ते कामगार चळवळीचे विश्लेषक असुन तत्वज्ञान व समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत. पुण्यात ज्ञानप्रबोधिनीत चालणार्या जनतंत्र - उद्बोधन मंच ( राषट्रवाद अभ्यास मंडळ) हे विचारव्यासपीठाचे संयोजक आहेत.
देशातील गरिबी आणि गहजब हा दै. सकाळ १ एप्रिल २०१० मधील राजीव साने यांचा लेख नेहमी प्रमाणे त्यांच्या अनुमतीनेच येथे चर्चे साठी घेत आहे. हा विषय बराच काळ माझ्या मनात रेंगाळत होता. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या द्विदशकपुर्ती च्या वेळी म्हणजे जाने २०१० मधे अच्चुत गोडबोले यांनी ही टक्के वारी भाषणात मांडली होती व हे ऐकून लोक अस्वस्थ कसे होत नाहीत असा प्रश्न केला होता. खुप पुर्वी पेपर मधे पण ही बातमी मी वाचली होती. संख्या शास्त्रीय आकडेवारीला आपण लोक घाबरतो. त्याचे अर्थ अनर्थ व अन्वयार्थ हे बर्याचदा आपल्या आकलनापलिकडचे असते. या लेखा निमित्त पाहु यात आपल्याला काही समजते का?
देशातील गरिबी आणि गहजब
राजीव साने
देशातील 77 टक्के लोक दारिद्य्राच्या खाईत असल्याचे डाव्या मंडळींकडून सतत सांगितले जात आहे. त्यासाठी सेनगुप्ता समितीच्या अहवालाचा हवाला दिला जातो. वस्तुस्थिती काय आहे?
भारतात नको इतकी गरिबी आहे व ती लवकरात लवकर नष्ट केली पाहिजे, यावर कोणाचेच दुमत असणार नाही. ती निर्माण होण्याची व टिकून राहण्याची कारणे कोणती, तसेच ती नष्ट किंवा निदान वेगाने कमी करण्याचे उपाय व मार्ग कोणते, या प्रश्नांबाबत जरूर मतभेद आहेत. तरीही तिचे अस्तित्व नाकारणे किंवा मुद्दाम कमी दाखवणे, हे खोटेपणाचे व गरिबांवर अन्याय करणारे ठरेल.
परंतु आज एक उलटाच प्रकार घडताना दिसतो आहे. अगदी विभिन्न विचारसरणींचे नेते व कार्यकर्ते सर्रास असे मांडत आहेत, की "आज भारतात 77 टक्के लोक दारिद्य्राच्या खाईत लोटले गेले आहेत. त्यांच्यापैकी जास्तीत जास्त उत्पन्न मिळवणाऱ्याला फक्त 20 रु. रोज मिळतात.' या वाक्याने अत्यंत विदारक चित्र उभे केले जाते. परंतु एक तर हे वाक्य निखालस खोटे आहे. दुसरे असे, की सकारात्मक पावलांना विरोधासाठी विरोध करणाऱ्या अतिजहाल विघ्नसंतोषी मंडळींचे अशा निराशावादी चित्रणाने अधिकच फावते. भन्नाट अतिशयोक्ती करण्याने आता टाळ्या मिळू शकतीलही; पण पुढे जाऊन विश्वासार्हताच गमावली जाऊ शकते.
बरे, ही एकच एक अफवा मुळात कोठून पसरली? मूळ आहे अर्जुन सेनगुप्ता समितीचा अहवाल. काही प्रमाणात त्याचा अर्थ लावणाऱ्यांचा अतिउत्साहीपणा नडला आहे; तर काही अंशी अहवालाच्या प्रास्ताविकातील दिशाभूल करणारे एक वाक्य व सर्वेक्षण पद्धतीच्या मर्यादादेखील गैरसमजाला कारणीभूत आहेत.
नमुनेदार गैरसमज व वस्तुस्थिती
मुळात हा अहवाल असंघटित कामगारांच्या प्रश्नांवरचा आहे. त्याच्या प्रास्ताविकातील एक वादग्रस्त वाक्यच वारंवार उद्धृत केले गेल्याने तो गरिबीविषयीचा म्हणून गाजत आहे.
1) सदर अहवाल सध्याची म्हणजे 2010 सालची माहिती देत नसून, 2004-05 या वर्षाविषयी बोलतो आहे. आजचा उदा. 20 रु. चा अर्थ खूपच बदलला आहे.
2) अहवालासाठी वापरलेली सर्वेक्षणे फक्त त्या सालची नसून 1999-2000 व त्याही आधीची आहेत. जुन्या माहितीवरून अनुमानाने 2004-5 सालचे चित्र बनवलले आहे.
3) अहवालातील 20 रु. हे उत्पन्न नसून, "सेवन खर्च' (कन्झम्प्शन एक्स्पेंडिचर) आहे.
4) हा खर्च एका कुटुंबाचा नसून दरडोई दर दिवशीचा एकेका व्यक्तीवर होणारा खर्च आहे. म्हणजेच 5 जणांचे कुटुंब धरले तरी हा आकडा 100 रु. येतो; 20 रु. नव्हे.
5) प्रास्ताविकातील वाक्य "77 टक्के जनतेच्या वाट्याला दरडोई दर दिवशी 20 पर्यंतच रु. येतात,' असे येते. म्हणजेच 77 टक्क्यांतील उच्चतम व्यक्तीला 20 रु. खर्चायला मिळतात, असा अर्थ होतो. परंतु अहवालातील कोष्टकानुसार 20 हा आकडा 77 टक्क्यांमधील उच्चतम व्यक्तीबाबतचा नसून, "गरीब नव्हे, पण संकटप्रवण' (नॉट पुअर बट व्हल्नरेबल) नावाच्या 36 टक्के संख्येच्या गटाची सरासरी म्हणून येतो. या एकाच गटाच्या सरासरीला 77 टक्क्यांतील उच्चतम व्यक्ती गणणे, हे साफ चूक आहे. हे म्हणजे शाळेतील एखाद्या तुकडीत मुलांना सरासरी 50 टक्के मार्क पडले, यावरून "एकाही मुलाला 50 टक्क्यांच्या वर एकही मार्क पडला नाही,' असा निष्कर्ष काढण्यासारखे आहे.
6) यावर कोणी असे म्हणेल, की वाक्यरचनेत गडबड झाली असेल. पण खरे तर सेनगुप्ता साहेबांना "सरासरीच' म्हणायचे होते. पण हाही बचाव टिकत नाही. कारण 77 टक्के जनतेचा सरासरी सेवन खर्च अहवालात नेमकेपणाने दिलेलाही आहे व तो आहे 16 रु.; 20 रु. नव्हे. 16 हा आकडा जास्तच "विदारक' दिसला असता! तरीही 20 रु. हाच आकडा प्रास्ताविकात येतो. म्हणजेच 77 टक्क्यांपैकी सर्वोच्च असेच म्हणायचे आहे; पण ते वरील कारणांनी साफ चूक आहे.
7) अहवालात "77 टक्के जण दारिद्य्ररेषेखाली' असे कुठेही म्हटलेले नाही. अहवालात अधिकृत दारिद्य्ररेषेखाली 22 टक्के लोक, "विस्तारित' दारिद्य्ररेषेखाली 19 टक्के, असे एकूण 41 टक्के लोकच "सर्व प्रकारचे गरीब' या सदरात गणले आहेत.
8) यापुढील अचंबित करणारा प्रकार असा, की ज्या सेनगुप्ता अहवालातील 20 रु.ला आपण दारिद्य्राची खाई म्हणत आहोत, त्याच अहवालात त्याच 2004-05 मध्ये "सेवन खर्चाची' अखिल भारतीय सरासरी (श्रीमंतही धरून) फक्त 23 रु. दिलेली आहे. 9) या सर्वांवर कळस असा, की 2004-05 या वर्षीचे दरडोई राष्ट्रीय उत्पन्न (एनएनपी/कॅपिटा) होते रु. 25,694 (स्टॅटिस्टिकल आउटलाइन ः टाटा प्रेस). म्हणजेच दरडोई दर दिवशी 25694/365 = 70.4 रु. उत्पन्न होते. बचत प्रमाण अगदी 30 टक्के धरले तरी सेवनासाठी सुमारे 50 रु. उरतात. पण इथे तर फक्त 23 रु. दिसत आहेत. उरलेले 27 रु. कुठे गायब झाले? उत्पादनावरून मिळणारी माहिती व सेवनाच्या सर्वेक्षणात लोकांनी दिलेली उत्तरे यात किती प्रचंड तफावत आहे!
10) आज 2010 मध्ये जर खालच्या 77 टक्के जनतेतील सर्वोच्च व्यक्तीला दिवसामागे फक्त 20 रु. खर्चता येत असते, तर तळच्या 40 टक्क्यांना 10 रु. सुद्धा खर्चता आले नसते. उष्मांकांचा (कॅलरीज) विचार करता आज ही माणसे जिवंतच राहिली नसती. ("सकाळ', ता. 24 मार्चमध्ये 2009-10 चा आढावा आलेला आहे त्यात तर महाराष्ट्राचे दरडोई दर दिवशी उत्पन्न 150 रु. दिसते आहे. हेच भारताचे 2004-05 मध्ये 70 रु. होते!) सारांश ,अर्जुन सेनगुप्ता अहवालाचे नाव घेऊन पसरवली गेलेली वदंता निखालस खोटी आहे.
समांतर अर्थव्यवस्था..
अशा सर्वेक्षणांमध्ये लोक हातचे राखून उत्तरे देणार हे स्वाभाविकच आहे. अनौपचारिक क्षेत्राचे स्वरूपच असे असते, की चोख हिशेब राखणे हे ज्याचे त्यालाही कठीणच पडते. कित्येक व्यवहारांना "पैसा हस्तांतर' (मोनेटायझेशन) हे स्वरूपही आलेले नसते. शेती किंवा तत्सम क्षेत्रात करमाफीमुळे व श्रमविषयक कायद्यातून वगळण्यामुळे एकूण "नोंदणीकृत' व्यवहारच कमी असतो. काळा पैसा भांडवलप्रधान उद्योगात गुंतवणे फारच कठीण असते. कारण तेथे नोंदणीचे प्रमाण जास्त असते. तुलनेने श्रमप्रधान उद्योगात हा पैसा सहजच खेळतो. बांधकाम, हॉटेल, समारंभ, वाहतूक, तसेच वीटभट्ट्या, दगडखाणी, फटाके अशी अनेक क्षेत्रे सांगता येतील, की ज्यांचे हिशेब पुरेशा प्रमाणात नोंदवलेच जात नाहीत. काळा पैसा गुंतवणे वा खर्चणे या दोन्ही माध्यमांतून कितीतरी "अनौपचारिक' श्रमिकांना रोजगार मिळत असतो. खुद्द राजकारण हे एक दणदणीत "अनौपचारिक' क्षेत्र आहे. सारांश, ज्या देशात अधिकृत अर्थव्यवस्था ही प्रत्यक्षापेक्षा कमीच दाखविली जाते, त्या देशात गरिबीचे आकडेही अधिकच "गरीब' दिसणे हे स्वाभाविकच आहे.
खरे तर दारिद्य्रमापनाची आकडेवारी प्रचंड फुगवणे हे इष्टही नाही व आवश्यकही नाही. जे दारिद्य्र आहे तेच पुरेसे हृदयद्रावक आहे. तसेच वास्तवाशी इमान राखूनच नेमके व व्यवहार्य उपाय सापडत जाणार आहेत. एवढेच नव्हे, तर दारिद्य्रनिवारणाच्या कार्यक्रमात योग्य त्याच स्तराला अग्रक्रम मिळण्याच्या मार्गात अशी अतिशयोक्ती आड येऊ शकते. उदाहरणार्थ, अन्न सुरक्षा कायदा करताना लक्ष्यगट न ठरविता सर्वांनाच कक्षेत घ्या, अशी मागणी डाव्यांकडून केली जात आहे.
हे सर्व लक्षात घेता, जबाबदार नेतृत्वाकडून भडक भाषणबाजीचा मोह टाळण्याची व कोणताही अहवाल चिकित्सक दृष्टीने वाचण्याची अपेक्षा आहे. सोईस्कर तेवढेच उचलणे व एकाने विपर्यस्त मांडले की इतरांनी त्याचीच पुनरावृत्ती करत राहणे, या पोरकटपणातून आपण कधी बाहेर पडणार आहोत?
(संदर्भ : सेनगुप्ता समितीचा अहवाल, साह्य - प्रा. प्रदीप आपटे)
(लेखक सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक आहेत.)
प्रतिक्रिया
5 Apr 2010 - 11:51 am | राजेश घासकडवी
घाटपांडेसाहेब, अतिशय छान लेख. जगभर तुटपुंज्या आकडेवारीचे चुकीचे अर्थ काढून संख्याशास्त्राला लोकांनी अतिशय वाईट वागणूक दिलेली आहे... सरासरीला महत्तम म्हणणे, सेवनाला उत्पन्न म्हणणे... व आश्चर्य म्हणजे कुडमुड्या ज्योतिष्याच्या भविष्याप्रमाणे लोकं मुकाट्याने प्रश्न न विचारता हे आकडे गिळतात. भारतात गरीबी आहे यात वादच नाही, पण प्रगती होते आहे की नाही, कुठले मार्ग उपयोगी पडतात, व कुठले निरुपयोगी आहेत याची साधकबाधक चर्चा करण्यासाठी जरूर असलेली शिस्त बाळगली नाही, तर आकडेवारीचा उपयोग होण्याऐवजी दुरुपयोगच होतो...
राजेश
5 Apr 2010 - 12:58 pm | चिरोटा
छान लेख. कुणीतरी म्हंटलेच आहे-तीन प्रकारची असत्ये असतात-
lies,damn lies and statistics.
भेंडी
P = NP
8 Apr 2010 - 10:18 pm | आळश्यांचा राजा
खरं आहे. बेंजामिन डिझरायलीनं म्हटलं आहे ते.
आळश्यांचा राजा
6 Apr 2010 - 3:50 pm | अरुंधती
खरं सांगू का? मला ही सर्व आकडेवारी पाहूनच घाम फुटतो, गरगरायला होतं.... अगदी वर्गात गणिताच्या तासाला मास्तरांनी किंवा चिडकुट्या बाईंनी वर्गात उभे करून अत्यंत अवघड गणिताचं उत्तर [जे मला माहीत नसतं!] विचारावं असं काहीतरी.... माझ्या आईला कळेल हे सारे.... स्टॅटिस्टिक्स म्हटलं की बाईसाहेब तरंगायला लागतात.... पण मग मलाच का बरे कळू नये? :P
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
6 Apr 2010 - 9:04 pm | विकास
प्रकाशराव, एकदम माहीतीपूर्ण लेख.
ह्याच संदर्भात मार्च २८ ला पी. चिदंबरम यांचे खालील विधान पहा:
मला सेनगुप्तांविषयी विशेष माहीती नाही. पण त्यांच्या बद्दलची माहीती जालावर वाचताना, ते जर डाव्या विचारसरणीला जवळचे असले तर आश्चर्य वाटायला नको. त्यांना संपुआ सरकारने जेंव्हा या समितीचे अध्यक्ष म्हणून नेमले तेंव्हा ते सरकार कम्युनिस्टांच्या पाठबळावर चालले होते हा देखील एक मुद्दा आहे. त्या मुळे आकडेवारी काय आहे या पेक्षा कशी दाखवली जाते हे त्यांनी अथवा त्यांच्यापेक्षा जास्त त्यांचा वापर करणार्यांनी फायदा घेतला तर आश्चर्य वाटायला नको. आणि अर्थात हा फायदा करणारे साम्यवादी आहेत हे त्याहूनही आश्चर्यकारक नाही...
पण मला या आकडेवारी बरोबर अथवा चूक ठरवणे इतक्याने हे विश्लेषण मर्यादीत करावे असे वाटत नाही. आज भारतात (तुर्तास भारतापुरतेच मर्यादीत ठेवूया, पण इतरत्रही) आर्थिक दरी किती ह्याची स्पष्ट आकडेवारी माहीत नसली तरी जिथे जिथे गेलो आहे, तेथे जाणवली आहे. ती केवळ रस्त्यावरील असहाय्य व्यक्तींपुरतीच मर्यादीत नसून कनिष्ठ वर्ग, कनिष्ठ मध्यमवर्ग आणि काही अंशी मध्यमवर्गाशी पण निगडीत आहे. याचा अर्थ ज्यांना (प्रामाणिकपणे) पैसे मिळत आहेत त्यांना अपराधी वाटायचे कारण नाही, आणि इतरांना दारीद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी त्यांचे पैसे कमी करायचे असाही मुद्दा नाही/म्हणायचे नाही. पण दरीच नाही अथवा तितके गंभीर नाही असे म्हणणे मला अयोग्य वाटते. इतकेच म्हणायचे आहे.
आज आपण अगदी कौतुकाने सांगतो की कामाठ्यापासून कंत्राटदारापर्यंत आणि कामवाली पासून ते घरवालीपर्यंत सर्वांकडे मोबाईल फोन्स आहेत म्हणून. पण त्याच कामाठ्याला अथवा कामवालीला कुटूंबाचे आरोग्य, मुलभूत सुविधा (अन्न/वस्त्र/निवारा), शिक्षण आदी जमू शकते का? याचा देखील विचार करायला हवा.
तसेच जर उच्च वर्गात होणारे गुन्हे आणि तसे गुन्हे करणारे उच्च वर्गातील तरूण, आत्महत्या, घटस्फोट आदी मानसीक दबावातून घडणार्या घटना, ह्यांतून पण "नको तिथे/नको तसे" पैशाचे वाढलेले महत्व देखील चिंतनीय आहे.
कधी काळी डॉमिनिक लॅपियरेने "सिटी ऑफ जॉय" पुस्तकाच्या सुरवातीस लिहीले होते, की "असे नक्की या (कलकत्यातील त्याने पाहीलेल्या दरीद्री जनतेत) काय आहे ज्यांनी ते आनंदी राहू शकतात आणि आम्ही (पाश्चिमात्य) सर्व सुखसोयी पायाशी लोळण घेत असूनही दु:खी असतो?".
माझ्या मते त्या दरीद्री जनतेचे दु:खातील सुख आणि पाश्चिमात्यांचे सुख दुखणे, हे दोन्ही कमी अधिक प्रमाणात अज्ञानातूनच (ignorance) आले आहे. म्हणून वरील लेख हा सेनगुप्तांच्या अहवालातील आणि त्याच्या वापरातील तृटी दाखवण्यासंदर्भात जरी नेमके बोट ठेवत असला तरी त्याच मर्यादेमुळे, त्यातून एका मूळ मुद्याचे उत्तर मिळू शकत नाही, "आपण आनंदी आहोत का?"
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
10 Apr 2010 - 8:57 am | अक्षय पुर्णपात्रे
योग्य विश्लेषण.
सेनगुप्ता अहवालाचा उल्लेख डाव्या राजकीय विचारसरणीच्या लोकांनी केला असावा असे वाटते. श्री साने यांनी उजव्या बाजूच्या अशाच विपर्यासाचे उदाहरण दिले असते तर लेख संतुलित झाला असता.
आपटे सरांचे सहकार्य असल्याने लेखातील मुद्दे बिनतोड आहेत.
10 Apr 2010 - 8:43 am | मुक्तसुनीत
http://www.mimarathi.net/node/1191
10 Apr 2010 - 8:51 am | प्रकाश घाटपांडे
अगदी पटले.
नजरेतुन सुटले होता हा परिचय. राजीव सान्यांना पाठवत आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
10 Apr 2010 - 9:15 am | मदनबाण
निवड्णुकीच्या आधी हे राजकारणी त्यांची संपत्ती जाहीर करतात तेव्हा मला नेहमी हसायला येत...
http://bit.ly/bTolre
हिंदुस्थानात गरीब राह्यच नसेल तर राजकारणात प्रवेश करावा,तुम्ही नक्कीच श्रीमंत व्हाल.... ;)
अवांतर :--- वरती भरपुर आकडेवारी दिसली-वाचली पण अजुन मला मुंबईत मराठी माणुस किती याची आकडेवारी (नवी) काही मिळालेली नाही.
आता काही दिवसांनी १ मे येईल...आपले नेते मंडळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालतील...महाराष्ट्र दिनावर अन् जमल्यास माय मराठी,मराठी माणुस्,मराठी संस्कृती यावर भाषण ठोकतील... शेवटी एकदाचा दिवस संपेल...
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
10 Apr 2010 - 11:58 am | नितिन थत्ते
लेखाचा एकूण टोन मात्र आकडेवारीच्या अतिशयोक्तीने गरीबीचे चित्र उगाचच विदारक असल्याचे दिसत आहे असा वाटतो. (उदा: अहो स्फोटात ४० लोक मेले म्हणून उगाच गहजब करीत आहात. केवढी ही अतिशयोक्ती !!! बातमी नीट वाचलीत तर ३९ च मेले आहेत असे दिसेल).
लेखाच्या शेवटी आहे ती गरीबी पुरेशी विदारक आहे असे म्हटल्याने हा टोन पुसला जात नाही.
सेनगुप्तांनी किंवा डाव्यांनी किंवा माध्यमांनी चुकीची आकडेवारी उधृत केली असेल तर नक्की आकडेवारी काय आहे हे दाखवायला हवे होते. (जालावर सेनगुप्ता समितीचा अहवाल मिळाला नाही. साने यांनी तो वाचला असावा. एका साईटवर त्या अहवालाचे पुस्तक रु. ~३५०० ला उपलब्ध दिसले. :( )
उदाहरणार्थ १६ रु सेवनखर्च ३६% च लोकांचा असेल आणि सरासरी अखिल भारतीय* सरासरी सेवनखर्च २५च असेल तर ७७% लोकांचा सेवनखर्च २० रु असूही शकेल.
आज मुंबईसारख्या (जास्त मजुरी मिळणार्या) शहरात प्लंबर/सुतार/रंगारी वगैरे थोड्याशा स्किल्ड कामगारांना सुमारे १५० ते २०० रु दर दिवसाला मिळतात. महिन्यातील २० दिवस काम मिळाले तर त्याची कमाई सरासरी १११ रु दिवसाला होते. ५ माणसांचे कुटुंब धरले तर दरडोई उत्पन्न २५ रु च्या आत आहे. तेव्हा सरासरी देशभरातील ७७ टक्क्याम्चा सर्वाधिक सेवनखर्च २० रु असे म्हतले तरी ते सत्यापासून फार लांब नाही.
*अखिल भारतीय सेवन खर्च श्रीमंतांचा धरून असे लेखात लिहिले आहे. माझ्या मते अहवाल असंघटित क्षेत्रातील कामगारांविषयी आहे. त्यामुळे हा सेवन कर्च श्रीमंतांचा धरून नसून असंघटित कामगारांतील अधिक उत्पन्न मिळवणार्यांचा असू शकेल.
नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)