पार्किंग म्हटलं की माझ्या नव-याला फार टेन्शन येतं…..अर्थात मी शेजारच्या सीटवर असले तर…!! कारण नेहेमी गाडीतल्या एयरकंडीशनरच्या थंडगार झुळकीने मला अगदी गाडीत बसल्या बसल्या लगेचंच गाढ झोप लागते. पण कशी कुणास ठाऊक….. पार्किंगची वेळ आली की आपोआपच जाग येते आणि माझ्या मेंदूत काहीतरी विलक्षण हालचाली होतात. बापडी मी त्या मेंदूच्या आज्ञेचं फक्त पालन करते. तर माझं काय चुकलं…!!
आता नव-याचं इतकं ड्रायव्हिंग झाल्यानंतर पार्किंगच्या वेळी जर माझी थोडीफार मदत होत असेल तर काय हरकत आहे. पण नको…..तितकीसुद्धा मदत नको असते त्यांना माझी. चालवताना कधी कधी फक्त एकाच बाजूचं पार्किंग दिसतं…म्हणून मी माझ्या बाजूला जर कुठली जागा असेल तर सांगते मग. हं…..कधी कधी ती जागा नेमकी गेटसमोर असते..किंवा नो पर्किंगची असते…..पण माणसाच्या हातून चुका होऊ शकत नाहीत का….!! पण त्यामुळे डाव्या बाजूची एखादी चांगली जागा गेली तर त्याच्या इतका इश्यू काय बनवायचा !! आजकाल तर हे सरळ सरळ दुर्लक्ष करतात मी सांगितलेल्या जागेकडे. धडधडीत अपमान !! बरं …..आता ही गोष्ट दोघांतच ठेवायची ना……..तर नाही……..सगळ्यांच्या समोर अगदी सगळं सांगून मोकळं होतात. म्हणूनच मला लिफ्ट द्यायला ह्यांचे मित्र टाळाटाळ करतात.
रस्ते लक्षात ठेवणं ही खरोखरच कला आहे. पण म्हणून प्रत्येक माणसाला ती कला अवगत असायलाच हवी का…? नाही कळत एकेकाला एखादी गोष्ट ! म्हणून आमच्या हिचा रोड सेन्स अगदी झिरो आहे ह्याची दवंडी कशाला ? तरी मी जेव्हा कोणाच्या गाडीत बसते तेव्हा आधीच सांगून ठेवते की मला रस्ता अजिबात विचारु नका…….आणि मी जर सांगितला तर अजिबात ऐकू नका. आता कॉन्फिडन्स माझ्या बोलण्यातून ओसंडून वाहतो त्याला मी तरी काय करणार ? कुणी सल्ला मागितला तर न देऊन कसं चालेल ना….!! पण रस्त्यांसारखे रस्ते दिसल्यावर गोंधळ उडायचाच.
पण खरं सांगू का, एकदा कुणाला अनुभव आला की कानफाट्या नाव पडतंच ……तसं झालंय माझं. मी गाडीत बसले रे बसले की कुजबुज सुरु होते…… “आज जयू बसलीये गाडीत…….नीट सांभाळून जा…..”!! “अरे आज जयू सोबत असूनही कसं काय बरोबर पोचलो…. “अशी कुजकट वाक्य कानावर पडतात. मी मात्र कानाडोळा करते.
पण त्यादिवशी कहरच झाला. माझी “सारे तुझ्यात आहे” ही सीडी आमच्या एका मित्राने गाडीत लावली…..कुठेतरी लांब जायला निघाला होता तो. गाण्याच्या नादात म्हणे तो रस्ता चुकला. आता ही चूक कुणाची……!! घरी आल्यावर काय म्हणावं त्यानं…… “जयश्री तर चुकवतेच……पण ती नसली तर तिची सीडी सुद्धा ते काम चोख बजावते”. आता मला सांगा, माझी बापडीची काय चूक !!
आता मला सगळ्यांच्या टोमण्यांची सवय झालीये. त्यामुळे मी ते फारसं मनाला लावून घेत नाही. पण कधी कधी असे काही प्रसंग घडतात की सगळ्यांना बोलायला कारणच मिळतं. अशीच एकदा माझी मैत्रिण एका सेलमधून बरीच खरेदी करुन आली होती. घेतांना स्वस्त स्वस्त म्हणून हाताला येईल ते उचललं. पण घरी गेल्यावर साईझ चा प्रॉब्लेम लक्षात आला. तर कपडे एक्स्चेंज करायला तिच्यासोबत येईन का म्हणून तिने मला विचारलं. मी मोकळीच होते. म्हटलं….. दोन वाजायच्या आत नक्की घरी पोचणार तर येते म्हणजे मुलांचा खोळंबा नको. तर ती म्हणाली, आरामात येऊ परत तोपर्यंत. आम्ही साडे नवालाच घरातून निघालो. साधारण एक तासाचा रस्ता होता म्हणजे साडे दहापर्यंत पोचून एका तासात काम आटोपून बाराला जरी निघालो तरी एक वाजता नक्की पोचणार होतो आम्ही घरी. सालमियाच्या एक्झिटला तिने नेमका मला नको तो प्रश्न विचारला, “ए हाच आहे ना गं एक्झिट…?” मी पण विचारलेल्या प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर दिलं……”हा नाही पुढला आहे बहुतेक” कुठलाही प्रश्न अनुत्तरीत ठेवायचा नाही हे शाळेत मिळालेलं बाळकडू अजूनही लक्षात आहे माझ्या ! पण आता माझ्या “बहुतेक” वर तिने इतका भरवसा का दाखवावा !! म्हणजे चूक कोणाची ? त्या एका चुकीच्या एक्झिटमुळे आम्ही अजून तासभर फिरत होतो रस्ता शोधत. शेवटी पोचलो एकदाचे………तर पार्किंग साठी पुन्हा मारामारी. आता माझ्या नव-याला माझ्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष करायची सवय झालेली पण मैत्रिणीला नव्हती ना….!! “अगं ती बघ जागा, ती बघ” असं करत करत मी तिला खरंच पिडलं. जवळची जागा काही दिसतच नव्हती आणि जी जागा दिसायची त्या जागेवर वळसा घालून पोचेस्तोवर तिथे आणखीन कुणीतरी पार्क करायचं. शेवटी दोघीही कंटाळलो. कशीबशी कोप-यावर एक जागा मिळाली……हुश्श झालं अगदी. जग जिंकल्याच्या आनंदात दुकानात शिरलो…घड्याळात बघितलं तर चक्क १ वाजला होता. म्हणजे आम्हाला लगेचंच घरी निघायला हवं होतं नाहीतर पिल्लाला घराबाहेर थांबावं लागलं असतं. मी तिच्या चेहे-याकडे बघितल्यावर मला तिची दया आली. इतका जीवाचा आटापिटा करुन दुकानात पोचूनही आत जायला वेळच उरला नव्हता. मला तर इतकी लाज वाटत होती ना…..!! आज फक्त माझ्यामुळे तिला त्रास झाला होता. येतांना मी अगदी गप्प होते….. म्हणूनच कदाचित चक्क ४५ मिनिटात आम्ही व्यवस्थित घरी पोचलो. त्यादिवशी पासून तिने काही पुन्हा मला एकटीला तिच्या सोबत यायचं आमंत्रण दिलं नाही.
एकंदरीत काय…… तर मला गाडीत बसवायचं असेल तर ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर बसवावं हा माझ्या नव-याचा त्याच्या आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना धोक्याचा इशारा सगळे अगदी मनापासून लक्षात ठेवतात :)
प्रतिक्रिया
10 Mar 2010 - 8:13 pm | चतुरंग
चालायचंच खूप वाईट वाटून घेऊ नका!
तुम्हाला कविता करता येतात तशा तुमच्या नवरोबांना येतात का? नाही ना मग झालं तर!! ते कवितेत गल्ली चुकत असतील, तुम्ही गाडीतून चुकता फिट्टंफाट!! ;)
(खुद के साथ बातां : रंगा, अनुभव अगदी ओळखीचा वाट्टोय नै! ;) )
(गूगल म्याप वापरणारा)चतुरंग
10 Mar 2010 - 8:26 pm | रेवती
अनुभव अगदी ओळखीचा वाट्टोय नै!
न वाटायला काय झालय!
दुसरोंके साथ बातां: आता हे बरं लक्षात राहतं?;)
रेवती
10 Mar 2010 - 10:12 pm | संदीप चित्रे
>> अनुभव अगदी ओळखीचा वाट्टोय नै!
अशीच परिस्थिती आहे पण ती माझ्यामुळे.
एकदा तर मी चक्क एअरपोर्टहून घरी येताना घराचा रस्ता चुकलो होतो !
लेख आवडला ग जयू.
मनाला पटतं / भिडतं ते आवडतंच ना ! ;)
(न्यू जर्सीतले यू टर्न्स पाठ असलेला) संदीप :)
10 Mar 2010 - 10:14 pm | चतुरंग
घराचाच रस्ता चुकताय? ते बरोबरच आहे म्हणा, एकटेच असाल गाडीत आणि एअरपोर्टहून येताना म्हणताय्...म्हणजे शक्यताच शक्यता...चालू द्या ;)
(न चुकता स्वतःच्याच घरी नीट येणारा)चतुरंग
11 Mar 2010 - 11:21 am | जयवी
खुद के साथ बाता काय...... सगळ्याच पुरुषांना असं अगदी ठाम वाटत असतं :) आणि वाईट वगैरे मी अजिबात वाटून घेत नाही. मी त्याच्या पार कधीच गेलीये ;)
10 Mar 2010 - 8:22 pm | शुचि
मस्त!!
आमच्याकडे उलटच आहे पार्कींग लॉट आला की नवरा मला दामटवतो - आता लक्ष दे जरा. लाल लाइट दिसले गाडीचे की मला सांगायचं वगैरे वगैरे.
आणि इतका वेळ मस्त गाणी ऐकून सुस्तावलेली मी मग अचानक सजग आणि सतर्क व्हायला इतका त्रास पडतो ना की ज्याचं नाव ते. त्यात २/३ जागा जातात मग मी कशी डायनॅमिक नाही त्याची रेकॉर्ड ऐकावी लागते.
शेवटी त्याची घारीची नजर त्यामुळे मिळते जागा ती त्यालाच आणि माझी गाण्यांची धुंदी फुकट निघून गेलेली असते.
असो. लेख खूप आवडला. मस्तच आहे.
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर
10 Mar 2010 - 8:23 pm | रेवती
हेहेहे! मस्तच!
अगदी प्रामाणिकपणे लिहिलयस गं!;)
माझाही अगदी हाच प्रॉब्लेम आहे असं नाही म्हणू शकत पण रूट्सचे नंबर कसे काय लक्षात ठेवायचे ते अजूनही समजत नाही. माझ्या मैत्रिणी (आणि नवरा) सहजपणे म्हणतात्,"ते अमकं दुकान ना, अगं रूट ६२ वर आहे." किंवा रूट ३ नॉर्थ असं काही म्हटलं कि माझी पंचाईत!
मी रस्ता बरोबर लक्षात ठेवते, अगदी एक्झीट नंबरही ......पण रूट नंबरचा उल्लेख आला कि सगळेजण माझ्याकडे संशयाने पाहतात्....आता यात माझा काय दोष?;)
'सारे तुझ्यात आहे' या नावापेक्षा 'सारे तुझ्यामुळे आहे' हे नाव कसे वाटते?;)
रेवती
11 Mar 2010 - 11:23 am | जयवी
"सारे तुझ्यामुळे आहे" ....सही !! माझ्या नवर्याला एकदमच पटलं गं :)
10 Mar 2010 - 8:36 pm | प्राजु
हेहेहे.. चालयचंच.
पत्ते सांगायच्या बाबतीत कोणी मला विचारतच नाही. कारण, "त्या तिथे कोपर्यावर एक बैल बसलेला असतो, त्याच्या बाजूच्या गल्लित वळायचं" असे पत्ते मी सांगते.. असं माझ्या नवर्याचं ठाम मत आहे.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/
10 Mar 2010 - 9:46 pm | मदनबाण
गाडी पुराण आवडले... :)
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com
11 Mar 2010 - 5:15 pm | विसोबा खेचर
हेच म्हणतो..!
जयू, जियो..! :)
तात्या.
10 Mar 2010 - 10:12 pm | बिपिन कार्यकर्ते
“जयश्री तर चुकवतेच……पण ती नसली तर तिची सीडी सुद्धा ते काम चोख बजावते”.
=))
मस्त!!! च्यायला, काय ट्रेनिंग असेल ना त्या सीडीला... ;)
बाकी कुवेतमधे काही डेंजर एक्झिट्स आहेत. चुकली की बसलाच काही किलोमीटरचा फटका... :)
(सालमियाचा एक्झिट चुकलेला) बिपिन कार्यकर्ते
10 Mar 2010 - 10:17 pm | चतुरंग
'सारे तुझ्यामुळे' च्या सीडीज घेऊन भेट द्याव्यात म्हणतो काही लोकांना! ;)
चतुरंग
10 Mar 2010 - 10:27 pm | बिपिन कार्यकर्ते
त्या सीडी घेऊन निघालात की तुम्ही चुकीच्याच लोकांच्या घरी पोचणार हे नक्की.... ;)
बिपिन कार्यकर्ते
10 Mar 2010 - 10:59 pm | पिवळा डांबिस
हम्म! मजेशीर आत्मपरीक्षण आहे!!:)
आमच्याबाबतीत बाकी काही असलं तरी आमची "ही" एक फर्स्टक्लास नॅव्हिगेटर आहे. जीपीएस आणि मॅपक्वेस्ट आत्ता आले पण त्यापूर्वीही अगदी रॅन्ड-मॅक्नलीचे नकाशे घेऊन तिने आम्हाला रस्ता-मार्गदर्शन केलेलं आहे अनेक वर्षं! कधी रस्ता चुकल्याचं फारसं आठवत नाही...
असो. आमच्या नशिबात ही करमणूक नाही म्हणाना!!:)
11 Mar 2010 - 11:25 am | जयवी
करमणूक......अहो काय बोलताय हे....... तुम्ही "करमणूक" म्हणताय ना तो एक फार "ज्वलंत " विषय आहे आमच्याकडे....!!
10 Mar 2010 - 11:05 pm | प्रमोद देव
वाट चुकण्याचाही एक वेगळा आनंद असतो.
शालेय जीवनात मराठीच्या पुस्तकात सुप्रसिद्ध लेखक श्री. अनंत काणेकर ह्यांचा
’वाट चुकल्याचा आनंद’ नावाचा एक मस्त निबंध होता....तो वाचल्यावर नेहमी वाटायचं की आपलीही वाट चुकावी...पण नाही चुकली कधी आणि आम्ही त्या आनंदाला पार मुकलो. :(
10 Mar 2010 - 11:48 pm | शुचि
>>वाट चुकण्याचाही एक वेगळा आनंद असतो.>>
क्या बात है
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर
10 Mar 2010 - 11:47 pm | आपला अभिजित
अनुभव आहे हा.
why men don't listen and why women can't read maps
हे धमाल पुस्तक वाचतोय सध्या. ते स्त्री-पुरुषांच्या अशाच गमतीदार अनुभवांवर आधारित आहे. वाचून झाल्यावर इथे लेख टाकेन सविस्तर.
11 Mar 2010 - 1:33 am | संदीप चित्रे
आवडत्या पुस्तकांपैकी हे एक पुस्तक आहे रे !
रेफ्रिजरेटरमधली वस्तू पुरूषांना पटकन का सापडत नाही, बायकांना रात्री गाडी चालवायला अन्कम्फर्टेबल का वाटू शकतं इ. उदाहरणांचे स्पष्टीकरण योग्य वाटतं.
11 Mar 2010 - 12:21 am | वात्रट
<<कुठलाही प्रश्न अनुत्तरीत ठेवायचा नाही हे शाळेत मिळालेलं बाळकडू अजूनही लक्षात आहे माझ्या >> :))
हे मस्त..
11 Mar 2010 - 12:59 am | Pain
हेहेहे..लेख आणि प्रतिक्रिया मस्त आहेत :))
@चतुरन्ग
कवितान्पेक्शा रस्ते लक्षात ठेवणे महत्वाचे.
11 Mar 2010 - 10:24 am | राजेश घासकडवी
>>म्हणूनच कदाचित चक्क ४५ मिनिटात आम्ही व्यवस्थित घरी पोचलो
मग तुम्ही १५ मिनिटात शॉपिंग आटपू शकत नव्हतात? गोष्टी नुसत्या बदलून तर आणायच्या होत्या ना? (या पॅटर्नमध्ये वेगळ्या साईजचा माल आहे काहो? नाही - मग परत घ्या, आहे - मग बदलून द्या...)
काय लिहितोय मी हे...पंधरा मिनिटात तीन शर्ट व दोन पॅंट अशी खरेदी आटपू शकते अशा कोत्या पुरषी दृष्टीकोनातून.... मुळात 'तासाभरात काम आटपेल' हेच गृहितक कितपत बरोबर होतं याचा मी विचार करतोय.
चिंतातूरजंतूंसाठी मी हे पाठवू शकेन कदाचित पण ते भारतीय महिलांनाच केवळ लागू नाही म्हणून धुडकावून लावतील.
राजेश
11 Mar 2010 - 11:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
हेहेहेहे ...
लेख तर भारीच आहे आणि बाबा घासकडवींचा प्रतिसादही मजेशीर!
('शोफर' ड्रीव्हन स्कूटरवरची) अदिती
11 Mar 2010 - 11:40 pm | शुचि
तुम्ही अगदी (इफ्....एल्स्...एन्ड इफ) लूप मधेच बसवला की प्रश्न :)
अणि परत शेवटी मूळ अॅझम्प्शन ला हात घातला ..... किती वैज्ञानिक विचार करता हो :)
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर
11 Mar 2010 - 11:33 am | जयवी
आता "कोता पुरषी दृष्टीकोन" हे तुम्हीच म्हणताय म्हणून ठीक आहे :)
"माल वेगळ्या साईज आहे का हो......".इतकं सोपं नसतं ते मिस्टर.....!! साईज बघता बघता...आजुबाजूच्या कितीतरी गोष्टी नजरेत भरतात म्हटलं....आणि त्या पुढे काय हे काय सांगायचं ;) ??
इतक्या सुरेख प्रतिक्रियांबद्दल खूप खूप धन्यवाद :)
11 Mar 2010 - 12:03 pm | बज्जु
रस्ते लक्षात ठेवणं ही खरोखरच कला आहे.
अहो आधी जाऊन आलेल्या गडावरसुध्दा पुन्हा जाताना आम्ही भरपुर वेळा चुकतो. एकदा तर रस्ता चुकल्यामुळे रात्रभर जंगलात रहावं लागलं होतं. ~X(
असो लिखाण कुठेही न चुकता योग्य वाटेने झालं आहे. ;)
गडप्रेमी बज्जु
11 Mar 2010 - 1:33 pm | स्वाती दिनेश
मस्त खुसखुशीत लेख ग...
स्वाती
11 Mar 2010 - 7:15 pm | भाग्यश्री कुलकर्णी
मस्त लिहीलंस . मला तर पायी जातानाही रस्ते नीट सापडत नाहीत अन नवरा झोपेतही रस्ता चुकत नाही.माझा भाउ अन नवरा एखाद्या जागेचे नाव सांगतात अन ती जागा कुठे आहे अन तिथे कसे जायचे ते सांग असं म्हणुन मला सारखे पिडतात.:(
11 Mar 2010 - 9:30 pm | चित्रा
खुसखुशीत लेख.
पार्किंगला तुमच्या मैत्रिणीने आत जाऊन येईपर्यंत तुम्ही बाहेर गोल गोल गाडी चालवीत बसला असतात तर जमले असते असे वाटते. ;)
थट्टा जाऊ दे. असले उद्योग आमच्या इथे शहरात कायमच करावे लागतात. मी नवर्याला शहरात अगदी थोड्या वेळाचे काम असले की अशा चकरा मारत असते.. :) पैसे देऊन करण्याचे पार्किंगही काही काही ठिकाणी मिळत नाही.
11 Mar 2010 - 11:11 pm | जयवी
अगं राणी.... माझ्या नवर्याच्या कृपेनी अजूनपर्यंत मला इथलं कुवेतचं लायसन्स मिळालं नाहीये ना :(
12 Mar 2010 - 12:04 am | एक
कारण आमच्याकडे नेहमी असच होतं..
मी जर कधी एखाद्या दुसर्या ड्रायव्हरच्या चुकीबद्दल काही प्रेमळ शब्द उच्चारले किंवा बोटांच्या कलाकृती त्याला दाखवल्या तर आमची बायको तातडीने त्या "बिचार्याची" बाजू घेते किंवा मीच आधी कसा चुकलो ते पटवायला लागते..
तेही खरच आहे..चूक माझीच असते. तिला माझ्या शेजारी गाडीत बसवलं हीच चुक!! (तिला दुसर्याच्या गाडीत बसवायला हवं होतं म्हणजे तिने माझी बाजू घेतली असती)