जागतिकीकरणामुळे बदललेल्या विकासाच्या प्राधान्यक्रमाचा मोठा फटका महिलांनाच बसत असून, जागतिक मंदीची सर्वाधिक झळही त्यांनाच सहन करावी लागत आहे. कुटुंबाचे भविष्य निर्भर करण्याची शक्ती असलेल्या महिलांच्या सबलीकरणासाठी जगाने प्रामाणिक इच्छाशक्तीने पुढे यावे, अशी साद संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधीने जगाला घातली आहे.
जागतिकीकरणामुळे विकासाचे प्राधान्यक्रम झपाट्याने बदलत असून, कुटुंबकल्याण आणि माता-बालकांच्या आरोग्याचा प्रश्न मागे पडत आहे. हा प्रश्न हाताळण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव भविष्यात आणखी गंभीर समस्या निर्माण करू शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधीने दिलाय. केवळ पुरेशा उपचारांच्या अभावामुळे दर वर्षी जगात पाच लाख महिला गर्भवती असताना किंवा प्रसूतीच्या वेळी मरण पावतात. आफ्रिकी देशांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक असून, ते प्रगत देशांच्या शंभरपट अधिक असल्याचे लोकसंख्या निधीच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. महिला-बालकांचे आरोग्य आणि कुटुंबकल्याण या विषयांचा प्राधान्यक्रम जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे मागे पडला आहे. जागतिक मंदीचा पहिला फटका महिलांनाच बसल्याचे या पाहणीत नमूद करण्यात आले आहे. भविष्याचा वेध घेण्याची मानसिकता स्त्रीच्या अंगी असल्याने, बालकांचे भविष्य निर्भर करण्यात तिचा मोठा वाटा असतो. त्यामुळे महिलांचे आरोग्य आणि मानसिकता जपण्याची खरी गरज आहे. महिलांचे कल्याण म्हणजेच कुटुंबांचे कल्याण आणि पर्यायाने भविष्याची निर्भरता असल्याचे मत लोकसंख्या निधीने नोंदविले आहे.
जागतिक मंदीमुळे बेरोजगारी वाढत असून, या वर्षाअखेरीस बेरोजगारांची संख्या 50 दशलक्षांपर्यंत पोचेल, असा जागतिक कामगार संघटनेचा अंदाज आहे. यातही, महिलांमधील बेरोजगारी पुरुषांपेक्षा अधिक असेल आणि साहजिकच महिलांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होईल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. कुटुंबाच्या चरितार्थाची साधने जेव्हा आकसतात, तेव्हा मुलींचे शिक्षण ही "चैनी'ची बाब बनते. मंदीमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये नेमकी हीच स्थिती उद्भवण्याची भीती असल्याने महिला आणि मुलींच्या हक्कांचे संरक्षण करण्याची गरज लोकसंख्या निधीने अधोरेखित केली आहे.
भारतात, आणि विशेषत: महाराष्ट्रात, या वर्षी मंदीसोबत दुष्काळाचेही संकट ओढवणार आहे. साहजिकच, अन्नधान्याचे उत्पादन घटेल. महाराष्ट्रातील ग्रामीण भागांत, ज्यांचा उदरनिर्वाह केवळ तुटपुंज्या शेतीवरच अवलंबून असेल, अशा अनेक घरांमध्ये दोन वेळा पेटणा-या चुली कदाचित एका वेळेपुरत्या थंडावतील... घराशेजारच्या गोठ्यातल्या ‘बिनकामा’च्या गुराढोरांची वैरण कमी होईल... महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजही एकत्र कुटुंबपद्धती टिकून आहे. कदाचित, ती तिथल्या जीवनपध्दतीची गरज आहे. मंदी आणि दुष्काळामुळे अनेक कुटुंबाचे उत्पन्नाचे स्रोत आखडतील. मग काटकसर ही नवी जीवनशैली बनेल. आणि, ‘जगण्या’चे प्राधान्यक्रमही बदलतील. सहाजिकच, कुटुंबातल्या ‘कामाच्या हातां’ची पोटे भरण्यावर भर पडेल. माणुसकी जिवंत असतानाही, नाईलाजाची त्यावर मात होईल. एकत्र कुटुंबातल्या, किंवा एकट्या, निराधार वृद्धांची आबाळ होईल. महिला आणि मुलींच्या गरजांना दुय्यम स्थान मिळेल.
... असे होईलच असे नाही, पण परिस्थितीचा रेटा किती जोरदार असेल, त्यावरच असे चित्र अवलंबून असेल, हे नक्की... कारण, ‘जगण्या’च्या लढाईत माणुसकीचा पराभव होतो, याचे दाखले आजवर कमी नाहीत. दक्षिणेकडच्या काही राज्यांत परदेशात, विशेषत: आखाती देशांमध्ये नोकरीधंद्यानिमित्त जाणा-या तरुणांची संख्या वाढत असल्यामुळे, घरांमध्ये केवळ वृद्धांचाच वावर उरला असल्याचे एका पाहणीत उघड झाले होते. ही मुले आपल्या आईबापांच्या उदरनिर्वाहासाठी भरपूर पैसेही पाठवतात. पण देखभाल ही त्यांची उतारवयातील गरज दुर्लक्षित राहाते. मग, पैशाची पोतडी सोबत घेऊन त्यांना वृद्धाश्रम गाठावा लागतो...
... कुटुंबसंस्थेच्या या व्यवहाराकडे अजून जागतिक लक्ष गेलेले नसेल, तर तेच बरे आहे. नाही का?
प्रतिक्रिया
28 Aug 2009 - 12:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जागतिकीकरणाचा फटका केवळ महिलांनाच बसतो असे म्हणतांना जरा कचरतोय पण तसे असेल,नसेल. पण बेकारी, महिलांचे शोषण, बालकांचे प्रश्न, वृद्धांचे प्रश्न 'आ' वासून आपल्या समोर उभे आहेत. अर्थात तुटपूंज्या उदरनिर्वाहाच्या साधनांद्वारे कुटुंब चालवणे अवघड झाले आहे, हे खरे आहे. फक्त माणूसकी कमी होऊ नये असे वाटते.
महिलांसाठी पंचायतीत ५० टक्के आरक्षण ही एक आज आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल.
आखाती देशांमध्ये नोकरीधंद्यानिमित्त जाणा-या तरुणांची संख्या वाढत असल्यामुळे, घरांमध्ये केवळ वृद्धांचाच वावर उरला असल्याचे एका पाहणीत उघड झाले होते. ही मुले आपल्या आईबापांच्या उदरनिर्वाहासाठी भरपूर पैसेही पाठवतात. पण देखभाल ही त्यांची उतारवयातील गरज दुर्लक्षित राहाते. मग, पैशाची पोतडी सोबत घेऊन त्यांना वृद्धाश्रम गाठावा लागतो...
नो कमेंट्स !
-दिलीप बिरुटे
28 Aug 2009 - 10:34 pm | मिसळभोक्ता
फारच हळवे बुवा तुम्ही बिरूटे सर..
आज कुठे धावायला गेला होतात ?
-- मिसळभोक्ता
29 Aug 2009 - 12:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फारच हळवे बुवा तुम्ही बिरूटे सर..
:) मी हळवाच आहे.
विंदाच्या ओळी आठवल्या......
विविध वादांच्या
असंख्य चिंध्या
जोडून बनवितो
आपल्या लंगोट्या.
तरिही शेवटी
राहतो नागडेच...
-दिलीप बिरुटे
(नागडा)
29 Aug 2009 - 12:17 am | मिसळभोक्ता
म्हणजे अजूनही विजार शिवण्या इतपत वादांच्या चिंध्या केल्या नाहीत तर. आम्ही बघा, सूट शिवलाय, खिडक्यांचे पडदे, बेडशीट्स.
-- मिसळभोक्ता
28 Aug 2009 - 1:57 pm | रामदास
जागतिकीकरणाचा फायदा गावांपर्यंत पोहचण्याआधीच मंदीला सुरुवात झाली.
कुटुंबकल्याण आणि माता-बालकांचे आरोग्य ,मुलींचे शिक्षण ,आणि इतर अनेक समस्या आहेत तशाच राहतील.
जगण्याच्या लढाईत माणुसकीचा पराभव होतो
हे मात्र जोरकस वाक्य आहे.
काटकसर ही नवी जीवनशैली
ही तर आमची परंपरागत शैली आहे.
लेख आवडला.पण चांगल्या लेखांची वारंवारीता फार कमी असते.
धन्यवाद.
28 Aug 2009 - 2:10 pm | ऋषिकेश
चांगला लेख.
मुले व वृद्ध व काहि प्रमाणात स्त्रीया, समाजाचे 'अन्प्रोडक्टीव्ह' भाग. त्यातही मुले ही भविष्य व स्त्रीया मुले जन्माला घालणार म्हणून निदान समाज त्यांच्याकडे- त्यांच्या प्रश्नांकडे ( हेवे तितके नसले तरी काहि प्रमाणात) लक्ष तरी देतो. वृद्धांना मात्र आपला "पाचोळा" होतो का "निर्माल्य" इतकंच काय ते बघणं नशीबी असतं.
लेख आवडला. ह्या मंदीमुळे म्हणा - महागाई मुळे म्हणा - दुष्काळामुळे म्हणा सर्वात जास्त परिणाम होणार तो याच घटकांवर हे आपले म्हणणे पटले.
रामदासजी म्हणतात त्याप्रमाणे "जगण्याच्या लढाईत माणुसकीचा पराभव होत" हे वाक्य मार्मिक आहे.
ऋषिकेश
------------------
दूपारचे २ वाजून ०९ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहु देऽऽ...."
28 Aug 2009 - 5:59 pm | लिखाळ
जगण्या’च्या लढाईत माणुसकीचा पराभव होतो, याचे दाखले आजवर कमी नाहीत. हम्म ! खरे आहे.
लेख आवडला.
निवासी करियरिस्टांच्या मुलांची एक कथा आणि करियरिस्ट अनिवासींच्या पालकांची दुसरी कथा !!
-- लिखाळ.
आम्ही पैशामागे पळत नाही. त्याला आम्ही दामटून खिशात भरून ठेवतो. ;)
28 Aug 2009 - 7:51 pm | स्वाती२
>>जगण्या’च्या लढाईत माणुसकीचा पराभव होतो, याचे दाखले आजवर कमी नाहीत>>
खरे आहे पण माणूसकी हरू देणार नाही ही जीद्द बाळगणे, त्यासाठी प्रयत्न करणे तर आपल्या हातात आहे.
>>पैशाची पोतडी सोबत घेऊन त्यांना वृद्धाश्रम गाठावा लागतो...
याच परीस्थितीकडे एक संधी म्हणून बघितले तर बर्याच जणांना रोजगार मिळू शकतो. एकेकाळी पाळणाघर ही कल्पना ही काहीशी विचित्र वाटायची आज तिच गोष्ट सामान्य वाटते. सुट्टीत मामाच्या गावाला जाणारी मुले आता फारशी दिसत नाहित. दिवाळीच्या सुट्टीतील कँपच्या जाहिराती बरेच काही सांगुन जातात. आजच्या काळात एकत्र रहात रहात असले तरी किती मुलांना आपल्या वृद्ध आईवडिलांसाठी वेळ देता येतो?
आमच्या इथे मंदीचा फटका महिलांना बसलाय पण तो अगदी वेगळ्या प्रकारचा. सहसा पुरुष ज्या क्षेत्रात काम करतात, उदा. घरबांधणी, कारखान्यात कामगार वगैरे तिथे मंदीमुळे नोकर कपात. त्यामुळे पुरुष मंडळी बेकार. बायका साधारण शाळा,पाळणाघर,हास्पिटल, डेंटिस्ट किंवा डाक्टरचे इथे कामाला. त्या कमावत्या. या परिस्थितीत इगो दुखावलेल्या जोडीदाराला सांभाळत घर चालवायचे, प्रसंगी त्याच्या रागापासून मुलांना, स्वतःला वाचवायचे, त्यातुन जोडीदाराची व्यसने. पुन्हा काम अशा प्रकारचे की सतत चेहर्यावर खोटे हसू वागवावे लागते.
28 Aug 2009 - 9:46 pm | प्रकाश घाटपांडे
स्वाती२ यांचा उत्तम प्रतिसाद. अगदी असेच म्हंतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.