कथा : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture
हणमंतअण्णा शंकर... in जनातलं, मनातलं
22 Dec 2025 - 7:39 pm

---------- अलिकडं ------------

सगळ्यात आधी त्यांना जाणवला तो निसर्गाच्या सर्व हालचालींनी गजबजलेला एकांत. कुठलाही गोंगाट नाही. काटेरी झुडुपांवरून सर्र असा आवाज करत वाहणारे वारे. पक्षांची किलबिल. तळपायाखाली एखाद्या सपाट दगडाची रुतणारी ऊब.

शहरातल्या घरातल्या मधल्या डिजिटल भिंतींना कंटाळून ते इथे भटकत होते. त्या भिंतींच्या आत तीच रोजची 32k पिक्सेलमधली भांडणं करून ते वैतागले होते. ज्या ज्या त्रासदायक आठवणी ते काढत त्या त्या भिंतींवर लगेच प्रोजेक्ट होत. ती किंचाळायची, “तू मला कंट्रोल करू बघतोस”. तो किंचाळायचा, “तुझ्यापेक्षा माझी डॉलच परवडली”.

आता ते दक्षिण महाराष्ट्रातील खुरट्या झुडपांमधून आणि खरमरीत बसॉल्ट खडकांवरून चालत होते. अनवाणी, अंगात जाडेभारडे घोंगडीच्या लोकरीचे कपडे घालून. जमिनीचा रंग भाजलेल्या मडक्यांसारखा. हवेची चव धुळीचीच होती. जिथून सुरुवात केली तिथे त्या प्रवेशद्वारावर एका बंद केबिन मधून बाहेर आलेल्या कागदावर सही झाली होती. किमान वास्तव्य: बारा महिने. कोणतेही कर्मचारी दिसणार नाहीत. बाहेरच्या जगाशी कसलाही संपर्क नाही. अंगातले आधीचे कपडे फेकून द्यावे लागले. त्यांनी आणलेले लॅबग्रोन चामड्यांचे जोडे घालायला त्यांना परवानगी होती. त्या आवाजाने सही झाल्यावर एकच विशेष सूचना दिली: “जोपर्यंत इतर लोक सापडत नाहीत तोपर्यंत चालत रहा.”

“अजूनही वाटतंय काय ही चांगली कल्पना आहे?” अर्जुन त्याच्या किनऱ्या आवाजात रिकाम्या जमिनीकडे पाहत म्हणाला. शहरात तो कानभुंग्यांशिवाय झोपत नसे. त्यामुळे आता जणू कानात वाऱ्याची शीळ अजून वेगाने घुमू लागायची. इथे तर डोक्यावर छतही नव्हते किंवा चार भिंतींच्या आतली अत्यंत काटेकोर नियंत्रित केलेली स्वच्छ वातानुकूलित हवा.

“मिळून काहीतरी चॅलेंजिंग करायचे ठरवले होते, मग आता माघार नाही” मीरा म्हणाली.

“मी, मी दबावाखाली मान्य केलं.” अर्जुन चाचरत म्हणाला. तिच्या कपाळावर आठी उमटली.

तितक्यात फर्रकन एक तितर शेजारच्या झुडपातून उडाले. तोंडातलं वाक्य गिळून ती दचकली.

सावरून एका कोरड्या ओढ्याच्या पात्रातून ते शांतपणे चालू लागले. सूर्य झुकत आला होता. ओघळीत आजूबाजूला लहान मनोऱ्यांसारख्या उभ्या असलेल्या वारुळांच्या मागे सावल्या गडद होत चाललेल्या. ओहोळीच्या कडा म्हणजे प्राचीन लाव्हा थंड होऊन बनलेल्या भेगाळलेल्या दगडाच्या पट्ट्या, हे त्याला वाचून ऐकून माहित होतं. जागोजागी घाण बाभळीची झाडंच झाडं. त्यांच्या फिकट पिवळ्या शेंगांचा खच सगळीकडे पसरला होता.

“अजून किती कुठवर चालायचं?” पात्रातल्या एका विस्तीर्ण फाट्यावर त्याने विचारले.
“प्रवाहाच्या दिशेने पुढं जात राहू” ती म्हणाली, “जिथे पाणी असतं, तिथे माणसं असतात.”

“आणि जनावरं देखील असतात”, भीतीची एक आदिम लहर त्याच्या अंगावरून फिरली.

“फट्टू! अंगात दम नाही तर कशाला आलास?” ती कुजक्या चेष्टेच्या सुरात म्हणाली.

सूर्य आणखी खाली घसरला आणि झुडपं तारेसारखी दिसू लागली, तेव्हा त्यांनी मुक्काम ठोकला. त्याने आजूबाजूची लाकडं गोळा केली आणि त्याला पहिल्यांदा कळलं की इथल्या प्रत्येक फांदीला वेगवेगळे काटे आहेत. मीराने शेजारच्या पांढऱ्या दगडाचा एक पापुद्रा काढला, सुकलेल्या गवतात ठिणगी पाडली आणि फुंकून जाळ केला.

“तू हे आधी केलं आहेस?” कुडकुडत अर्जुनने विचारलं.

“माझ्या आजीने एकदा चूल पेटवली ती मेमरी माझ्यासमोर प्रोजेक्ट झाली होती. नंतर मी आग कशी लावायची ते पाहून घेतलं.”

त्यांनी काहीच खाल्लं नाही. विमानतळावरचा पराठा हे शेवटचं अन्न. परंतु ही भूक साधी आणि स्थिर होती. भूक वाढत गेली तसे त्यांचे विचार मंदावत गेले. काय खावं या विवंचनेत त्यांनी आजूबाजूला पाहिलं. शेवटी तो नाद सोडून दिला. चालून चालून थकल्याने त्यांनी मऊ वाळूत पाठ टेकताच त्यांना झोप लागली. पेटवलेली शेकोटी थोड्यावेळाने विझून गेली. वारा मंदावला. आभाळभर पसरलेल्या लख्ख चांदण्या पाहण्याइतपत देखील उत्साह त्यांच्यात नव्हता.

पहाटे चांदण्या अजून जवळ आल्या. एक रातपक्षी एकदा, पुन्हा, पुन्हा ओरडत होता. तो तुकड्या-तुकड्यांत दाट स्वप्नात जात होता. थंडीने त्याला कापरे भरत होते. अधून मधून लहान हिरव्या लेझर लाइट असाव्यात तसे दोन खूप बारीक ड्रोन आकाशात घोंगावताना दिसत होते. त्याला एका करारापत्राचं स्वप्न पडलं. किमान वास्तव्याचा काळ त्या करारपत्रावर होता. खाली गर्भधारणेबद्दल एक कलम. 'इथे कोणतेही नियम नाहीत' असं एक वाक्य होतं. पण कसले तरी अदृश्य नियम त्याला स्वप्नातदेखील डाचू लागले. त्याला शरीर नसलेला एका बाईचा आवाज आठवला. तो थंडीने आपसूक तिच्याकडे ओढला गेला.

सकाळी त्याने मीराला सांगितलं की त्याने आकाशात दोन हलणारे बिंदू पाहिले., पक्ष्यांसारखे नव्हेत, मंद काजवे असावेत तसे. तो पुढे बोलण्याआधीच ती म्हणाली, “जर ते दिसले तर त्यांच्याकडे बोट दाखवू नकोस. ते काजवेच आहेत असं समज आणि विसरून जा”

“हा खेळ चालला आहे का? तुला माहिती आहे का ते काय होते, कोण होते”

“नाही. पण तुला अंदाज नाही का? आपण स्वतःहून आलोय इथे. आपल्याला कागदपत्रे करावी लागलीच की. असेल काहीतरी कायद्याने बांधील असे. आता चालायला लागू.”

दुसऱ्या दिवशी कोरड्या प्रवाहात एक डोह दिसला. त्यात थोडे पाणी होते. त्यातले लहान मासे पकडायचा पूर्ण दिवस ते प्रयत्न करत राहिले. शेवटी हाताने पाणी उडवून दोन चिंगळ्या त्यांनी डोहाबाहेर काढल्या. भूक आवारत नव्हती. शेजारच्या निवडुंगावरची लाल बोंडं ओरबाडली. आणि एकेक मासा तसाच गिळून ते पुन्हा शेकोटी पेटवून शेजारी झोपून गेले.

तिसऱ्या दिवशी उठून ते पुढे चालत राहिले. प्रवाहात आता जास्त डोह दिसत होते. पुढे गेल्यावर त्यांना धुराचा वास आला आणि एका विझलेल्या शेकोटीभोवती वीसेक लोकांची एक लहान टोळी दिसली. कातडी तपकिरी आणि उन्हाने पोळलेली. केस धाग्यांनी बांधलेले. दात किडलेले. डोळे चपळ आणि स्थिर. उजव्या हातावर पांढरे व्रण असलेल्या एका स्त्रीने छातीवर आणि कपाळावर हात नेला, मोठ्या आवाजात ती किंचाळली: “आम्ही तुम्हाला बघतो; आम्ही आम्हाला बघतो”.

मीराने काळजीपूर्वक तिची नक्कल केली. “नमस्कार,” ती हळूच म्हणाली. “मी…” ती थांबली. तिला नावे अनावश्यक वाटली.

अर्जुन हातवारे करून म्हणाला, “आम्ही तुम्हाला मदत करतो.”

त्या स्त्रीने त्याच्याकडे दुर्लक्ष करून मीराकडे पाहिले. तिने मीराला पारखलं: तिची चाल, तिच्या शरीरावरची चरबी, ती पाय कसे टेकवते, ती कशी उभी आहे, तिचे ओटीपोट.

त्यांना वर्तुळाच्या बाहेरच्या कडेला जागा देण्यात आली. आणीबाणीच्या परिस्थितीत उतरंड पटकन ठरते. टोळीतली लहान मुलं त्यांच्या हातांकडे, त्यांच्या चपलांकडे पाहत होती. एकाने फटकन उठून अर्जुनच्या चेहऱ्यावर धूळ फेकली, तो दचकतो का ते पाहण्यासाठी. त्या व्रण असलेल्या स्त्रीने त्यांना भाजलेलं कंदमूळ दिलं. ते कडू आणि खरखरीत होतं, पण अद्भुत होतं. अर्जुन ते हळू हळू खाऊ लागला. खाताना जमिनीकडे पाहू लागला. मीराने तिचा तुकड्यातला एक तुकडा मोडला आणि सुजलेल्या डोळ्याच्या एका मुलाला दिला. परतफेड हा पहिला आश्वासक डाव असतो. त्या स्त्रीने तिच्या कपाळाला भिजलेली माती लावली. आणि ते दोघे टोळीचा भाग झाले.

त्यांच्या दिवसांना एक लय सापडली. टोळी उजेडाच्या आधी उठायची. ते दगडांनी लाकडाचे सापळे तासून तयार करत. जिथे एखादी वेल जमिनीत अन्न असल्याचे सुचवायची, तिथे त्यांची मुळं ते खणायचे. राखेमध्ये, दगडाच्या एका खणलेल्या पसरट टोपलीत निखारे वाहून आग जिवंत ठेवायचे. ते खूपदा आणि सहज हसायचे. रक्तपात न होता शांतता टिकून राहायची. उपासमार व्हायची नाही.

अर्जुन आणि मीरा रात्री एकमेकांना भिडत नाहीत हे त्या मोठ्या स्त्रीने पाहिले. दुसऱ्या रात्री अर्जुनला दुसऱ्या गर्भार बाईजवळ आणि मुलांजवळ झोपवले गेले. आणि मीराशेजारी टोळीतला एक पुरुष झोपला. त्याने त्या रात्री काहीच हालचाल केली नाही.

अर्जुन हळू हळू त्यांच्या गोष्टी शिकत होता. त्याचे हात मऊ होते. एकदा दगडाच्या एका पापुद्र्याने त्याचा तळवा कापला गेला आणि खूप वेळ रक्त वाहत राहिलं. चिखलातून खेकड्याला बाहेर काढणाऱ्या एका लहान मुलाची त्याने नक्कल करत खेकड्यांची शिकार शिकायचा त्याने प्रयत्न करू लागला. त्या मुलाकडेही संयम होता. काही दिवसानी अर्जुन खेकडे ओढायला शिकला.

मीरा मात्र पटपट शिकत होती. ती मांडीवर वेली वळून दोर बनवायची. कोरफडीच्या साली सुकवून ताग काढायची. त्यासाठी ती योग्य कोनात दगड आपटून लहान तीक्ष्ण पापुद्रेही काढायची. तिच्या नव्या जोडीदाराबरोबर जुगताना रात्री किंचाळायची. अर्जुन दचकून उठून बसायचा पण पुन्हा झोपी जायचा. दुसऱ्या दिवशी अर्जुन भरपूर खेकडे धरून आणायचा आणि तिच्या पुढे ओतायचा.

रात्री शेकोटी भोवती बसल्यावर, ते कधीकधी त्यांच्या जुन्या ‘आवाजा’त बोलायचे.

“रागावू नकोस,"आग पेटवण्यात अयशस्वी झाल्यावर तो म्हणाला.

“मी रागावलेली नाहीये," ती दोन काड्यांमध्ये निखारा ठेवत आणि त्याला फुंकत म्हणाली. “मी पाहतेय."

“मला?"

“हो."

“का?"

“जो पुरुष मला हवाय असं तुला वाटतं तो तू व्हायचा आटोकाट प्रयत्न करतो आहेस. मात्र तो पुरुष सतत विझत राहतो."

“हे काव्यात्मक आहे.”, निखाऱ्यांकडे पाहत तो म्हणाला.

ती दोघे वर्षाचा 'मेनू' शिकले. सुरुवातीचा मान्सून: मशरूम, बेडकं, वामा, नवी नवी कोवळी पानं. उशिराचा मान्सून: मासे, मध, नंतर पक्षी. कोरडे महिने: कंदमुळं, उंदीर, ससे, घोरपडी, दगडाने पायाची हाडं फोडून मिळणारा हाडांमधला मगज. एखाद्या प्राण्याच्या मृतदेहापाशी लवकरात लवकर पोचून सपाट दगडावर दगडाने हाडं फोडून ते मगज काढत. या टोळीकडे शेतं नव्हती, कुंपणं नव्हती. सतत हालचाल आणि स्थलांतर. खूप गोष्टी मात्र लक्षात ठेवाव्या लागत: कोणती रोपं खाल्याने आपण मरत नाही, कोणती रोपं आधी दंड देतात आणि नंतर विष काढून टाकल्यावर पोट भरतात. कोणता प्राणी किती सडू द्यायचा.

मीरा स्त्रिया, वृद्ध लोक, जखमी पुरुष आणि मुलांसोबत फिरायची. ती टोळी वनस्पती, किडे आणि जमिनीतील बिळांना धुंडाळत कॅलरी गोळा करणाऱ्या एखाद्या फिरत्या जाळ्यासारखी होती. ते मुंग्यांच्या चालींवरून मध शोधायचे. ते मधमाश्यांना कुजलेल्या लाकडाचा धूर द्यायचे आणि चपट्या दगडांनी अशा प्रकारे पोळं कापायचे की मधमाश्या चिडून डसणार नाहीत. टोळीतल्या बायका चालताना बायका एक मंद रिदम गुणगुणायच्या. त्यामुळे त्यांची चाल आणि मन स्थिर राहायचं. स्त्रिया गर्भार असल्या की हलकी कामं करत. पुरुष सतत हालचाल करत. स्त्री गर्भार आणि दुभती नसली की कामांमध्ये भेद नव्हता. मुलं मात्र आयांभोवती असायची. कोणत्याही दुभत्या स्त्रीच्या स्तनांतून दूध प्यायची.

अर्जुन पुरुषांसोबत जाण्याचा प्रयत्न करी. इथले पुरुष केवळ मांसाच्या मागे धावत नसत. ते धोक्याचा आणि जोखमीचा पाठलाग करत. त्याने चिकाटीची शिकार (persistence hunting) शिकण्याचा प्रयत्न केला: रणरणत्या उन्हात एक काळवीट निवडून त्याचा सावध पाठलाग करायचा. माग काढायचा. जमीन वाचायची. आपलं शरीर निराखायचं. थोडं आणि वारंवार पाणी प्यायचं. अहंकार पाय निकामी करण्याआधी थांबायचं. अर्थात त्याला ते जमलं नाही. त्याचे घोटे सुजले. श्वास जळजळू लागला. त्याला कडूझार पित्ताच्या उसळ्या आल्या.

साधारण अठराव्या दिवशी, पहाटे दुसऱ्या टोळीमधला एक गट आला. हा मुद्दाम योजलेला हल्ला नव्हता. फक्त एक चाचणी होती. नेहमीचा गोंधळ. थोडा व्यापारउदीम: रिकामे तळहात दाखवणे, भरलेले तळहात दाखवणे, योग्य वेळी नजर दुसरीकडे वळवणे, एखाद्या मुलाच्या हसण्याने वातावरण बदलू देणे. त्या टोळीतल्या पुरुषांनी जोरदार प्रदर्शन केलं. काही रगेल पुरुषांनी कंबरेच्या लयदार हालचाली करून मीराभोवती गिरक्या घेतल्या. ठरल्याप्रमाणे दोन्ही टोळ्यांमधले स्त्री पुरुष एकमेकांना निरखू लागले. स्त्रियांनी अतिशय शांतपणे मोजमाप केलं: खांद्याच्या पाठीमागची चरबी, भरलेले व्रण, कोण संकट आणू शकेल, कोण संकटांतून तारू शकेल. काहीं स्त्रियांनी पुरुषांच्या कमरेभोवतीच्या लोकरी गुंडाळ्या वर केल्या, हात घालून जननेंद्रिये तपासली.

वेणी घातलेल्या आणि हाडांचे कोरलेले काटे लावलेल्या एका पाहुण्या नराने मीराचा बारीक अभ्यास केला. तिला तो स्पर्श करत नव्हता. अर्जुनकडे पाहून तो विचकट हसला. जमीनीवर बसून कुंडली मारलेल्या घोणशीसारखा सित्कारू लागला. त्याची अपेक्षा होती की अर्जुन त्याला प्रतिआव्हान देईल. तसे काहीच घडले नाही. मग त्याने व्रण असलेल्या त्या वृद्ध स्त्रीकडे पाहिलं. तिला त्याने आणलेली फळं दिली. घायपाताच्या धाग्यांचा एक दोर दिला.

मीरा अर्जुनला म्हणाली, “लहान टोळ्यांमध्ये अर्थव्यवस्था खरंतर गुंतागुंतीची असते.“

“खरेच?”

“त्याने मला मागून घेतलं”

“काय?”

“मला त्याच्या टोळीत काही काळ घेऊन जायला.” अर्जुनच्या कपाळावरची आठी पाहून ती म्हणाली, “धागे विणायला शिकण्यासाठी!” तिने व्रण असलेल्या स्त्रीला होकार कळवला. पुढे काय होणार हे त्या दोघांनाही ठाऊक नव्हते.

त्या रात्री त्या टोळीतल्या माणसांनी आणलेली शिकार भाजून सगळ्यांना वाटली. काही मंडळी झोपून गेली. नव्या जोड्या जवळजवळ झोपल्या. मीराच्या डाव्या अंगाला अर्जुन शेकोटीच्या उबेकडे झोपला. मीराच्या उजव्या अंगाला तोच पुरुष येऊन झोपला. काही जोड्या जुगण्यासाठी बाजूला गेल्या.

सोट्याचा जोरदार फटका हातावर पडल्याने अर्जुन खाडकन जागा झाला. त्याच रात्री हल्लेखोर गुपचूप आले होते. त्यांच्या खांद्याच्या कापडांवर काटे शिवलेले होते. स्त्रियांनी जोरदार किंकाळ्या फोडल्या. शिरा ताणून त्या जीव तोडून हाडांच्या शिट्ट्या फुकू लागल्या. आसमंतात जोरदार शिट्या घुमल्या. सर्वजण प्रतिकार करू लागले. हल्लेखोरांनी एकाला आगीत ढकललं. त्यांनी सुकलेल्या माशांच्या दोन टोपल्या हिसकावून घेतल्या. एक मूल उचलून धावू लागले. आणि जेव्हा किंकाळ्यांमुळे आणखी टोळ्या येण्याचा धोका निर्माण झाला तेव्हा त्याला परत आणून टाकलं. मात्र ते मीराला घेऊन गेले. जाताना कुणीतरी अर्जुनाच्या डोक्यात सोटा हाणला.

अर्जुनला शुद्ध आली तेव्हा त्याचा हात पानांमध्ये गुंडाळलेला होता. त्याच्या शेजारी ती व्रणदार स्त्री शांत बसली होती. तो धडपडून उठू लागला. त्या स्त्रीने काठीनं त्याला पुन्हा खाली जमिनीनवर ढकललं.

“आपण जाऊ,“ तो बोट दाखवत चारचत म्हणाला.

ती डोळे न मिचकावता त्याच्याकडे पाहत राहिली.

“ती मांस नाही,“ तो म्हणाला. “ती माझी…” तो थांबला. पत्नी हा शब्द दुसऱ्या जगातला होता. “मीरा आहे.”

“काटेरी भाले, माणूस घेऊन जातात,” ती स्त्री साध्या शब्दांत म्हणाली. “ते परत करतात. आपण जगतो.”

“नाही, आपण त्यांच्या मागावर जाऊ!” तो कळवळून उठू लागला पण त्याचे सबंध शरीर थरथरत होते. तो कसाबसा उठून उभा राहिला.

ती शांत बसून राहिली.

“मी जाईन”, तो म्हणाला.

“तू मर”, ती म्हणाली.

“तिला शोधत शोधत मरेन.”

तो काटेरी भाल्यांच्या मागावर निघाला. हल्लेखोर नेहमी वेगाने जातात आणि फारसं लपत बसत नाहीत. तो त्यांच्या पावलांचा, ओघळलेल्या रक्ताच्या थेंबाचा माग काढू लागला.

एका दगडाखालच्या झऱ्यातून तो पाणी प्याला. त्याने मुंग्यांनी साठवलेले दाणे खाल्ले. हातातली कळ सळकन उसळून येई. मात्र तो वेदना सहन करायला शिकला.

मगजासाठी व्यवस्थित फोडलेली नीलगाईची हाडे त्याने ओलांडली. तरसाच्या दातांचे व्रण त्यांवर होते.

त्याच्या डोक्यावर उंचावर दोन दिवे त्याला दिसणार नाहीत असा त्याचा पाठलाग करत होते. त्या रात्री झोपताना पुन्हा त्याला ते दिसले.

एका उंचवट्यावर त्याला काट्यांमध्ये केस सापडले. बाजूच्या सपाट दगडावर लाल डाग. त्याला आठवली काही दशकांपूर्वी जगात कुठेकुठे शिल्लक असलेली धर्म नावाची कल्पना. कुणाचा बळी दिला असेल इथे? नाव गाव काही नाही. पण केसांवरून माणसाच्याच दिला असावा.

तिसऱ्या संध्याकाळी अर्जुनने त्यांना एका उथळ दरीत पाहिलं: 'काटेरी भाले'. बारा पंधरा जण. एकटा एक गाठोडं घेऊन जात होता. तो तसाच टेकाडावर पडून राहिला. त्यांना नकळत सावधपणे तो त्यांच्याभोवती हळूहळू एक वर्तुळ फिरला. त्याला त्यांच्या तळाच्या कडेला काटेरी फांद्यांचे एक कच्चं कुंपण दिसलं. त्या कुंपणाच्या बाहेरच्या बाजूला एका झुडुपात तो लपून बसला. आत एक मूल अंगठा चोखत झोपलं होतं; आणि मीरा, ताठ बसलेली.

“मीरा,” तो कुजबुजला.

“तुला उशीर झाला” ती किंचाळली. त्याला हसावं की रडावं ते कळेना. तो काकुळतीला येऊन म्हणाला, “हळू बोल”. ती पुन्हा किंचाळून म्हणाली, “त्यांना कळत नाही! मी कालपासून किंचाळत आहे. त्यांना मी किंचाळत राहणं अपेक्षित आहे. नाहीतर ते तपासायला येतील. लवकर या कुंपणाला एक भोक पाड.”

काटे टोकदार होते, तो काळजीपूर्वक ते सोडवून तो त्या कुंपणात एक छिद्र करू लागला. मूल जागं झालं पण रडलं नाही. मीराने त्याला चिमटा काढला आणि ते रडू लागले. त्याच्यावर मीरा जोरात खेकसली. नंतर त्याला हळूच त्या कुंपणातून बाहेर सारू लागली.

अर्जुनने त्या पोराला जवळ घेतले. मीरा त्या भोकातून सरपटत बाहेर आली. तीक्ष्ण काट्यांनी तिच्या पिंडरया फाडल्या.

“पळायचं?“ त्याने रोखून धरलेला श्वास सोडला.

“हो,” तिने ओठ हलवले, “कुठे?”

त्याने यापुढचा विचारच केला नव्हता..

“मागे” तो म्हणाला.

तिने त्याच्या हाताकडे, पायांकडे, आणि दूर टेकाडावर मावळणाऱ्या सूर्याकडे पाहिले. “नाही, हे हल्लेखोर पुन्हा हल्ल्याला निघतील. पहाटेपर्यंत आपण त्यांच्या कडेकडेने जाऊ, त्यांच्याच मागावर. उरलेल्यांना आपण पळून गेल्याचे कळेल तेव्हा ते उलट शोधत जातील, हल्लेखोरांच्या मागे जाणार नाहीत.”

“आणि या पोराचे काय करायचे?”

अर्जुनला बिलगून घाबरून बसलेल्या पोराने त्याची मूठ दाबली.

“याचे तोंड दाबून याला आता घेऊन जा आणि पलीकडच्या टेकडी मागे सोड. उद्या सकाळपर्यंत याला कुठल्या जनावराने खेचून नेलं नाही तर उद्या सकाळच्या शोधकांना हा सापडेल” मीराने थंड डोक्याने पण घाईत सूचना दिली.

अर्जुनने आवंढा गिळला.

“गडबड कर, या पोराला काही होणार नाही, त्याला ते दुधाला घेऊन जायचे, ते याला मारणार नाहीत” मीराने घाम पुसला.

सकाळ झाली. आरडाओरडा सुरू झाला. एका माणसाला काट्यांच्या कुंपणातील छेद दिसला. त्याने एक विचित्र आवाज काढून हाळी दिली. शिकारधावा सुरू झाला. काही दिवसांपूर्वी हल्ला केला त्या टोळीच्या दिशेने पूर्वेकडे काही तरुण पळाले.

अर्जुन आणि मीरा मात्र हल्लेखोरांच्या दुसऱ्या तुकडीमागे धावले नाहीत. वेगात पण ठामपणे चालू लागले. प्राचीन जुन्या समुद्राच्या लाटा ज्या टेकड्यांमध्ये गोठल्या होत्या त्या भूभागाचा ढालीसारखा वापर त्यांनी केला. ते झऱ्यांमधून पाणी प्यायले, सापडेल ते खात राहिले. उष्णता वाढत असताना ते एका घळीजवळ पोहोचले.

त्या घळीत अनेकविध हाडं पडली होती. कुणाची भूक आणि कुणाचं नशीब यांच्या अगतिक भेटींची साक्ष सांगणारी. इतक्यात बाजूच्या ओघळीतून आरडाओरडा ऐकू आला. ते सावध होऊन दगडांच्या सावलीत लपले.

एक 'काटेरी भाला' उंचवट्यावर चढला. त्याने लक्षपूर्वक सगळ्या घळीवर नजर टाकली. दोन मानवी आकृत्या दिसताच त्याने जोरात त्याची विशिष्ट शिट्टी वाजवली. तो इशारा घेऊन उरलेले सगळे त्या घळीच्या दाराशी येऊन उभे राहिले.

“खाली बस, मान झुकव”, मीरा म्हणाली, “अजिबात प्रतिकार करू नकोस.” तिच्या भोवती पिंगा घालणाऱ्या एका ‘काटेरी भाल्याला’ तिनं बरोबर ओळखलं. तिला मीराने हातानं तिचं ओटीपोट दाखवलं.

अर्जुनने मान झुकवून गुढघे टेकवताच त्याला दगडाचा भाला टोचवून उभं केलं गेलं. त्या दोघांना कच्चे दोर गुंडाळले गेले. त्यांना घेऊन तो गट पुन्हा त्यांच्या वस्तीवर जाण्याच्या आवेशात होता.

मीराने तिच्या हाताने भाल्याचा दांडा बाजूला ढकलला. तिला तरीही एक ओरखडा बसला. तिच्या शरीराने वेदनेची नोंदच घेतली नाही. अर्जुन मात्र त्या धक्क्याने एका ‘काटेरी भाल्या’वर आदळला. तोवर दुसऱ्या एकाने त्याच्या मानेभोवती हात आवळला आणि त्याला पुन्हा बेशुद्ध केले गेले.

तो जागा झाला तेव्हा तोंडात खडी होती. डोळ्यापुढे पांढरं आकाश होतं. आजूबाजूला पावलांच्या ठेक्याचा आवाज. त्याच्या भोवती एक वर्तुळ तयार झालं होतं. शरीरं नियम आखत होती. मीराला पुन्हा त्या कुंपणात ढकललं गेलं होतं. त्या कुंपणात मात्र आता ती एकटीच होती.

अर्जुन भोवती जमलेल्या घोळक्यातून त्या टोळीतली एक स्त्री पुढे आली. लांब केसांचा विणलेल्या गळपट्टा तिने गळ्याभोवती गुंडाळला होता. तिच्या उघड्या अंगावर रक्ताचे चट्टे ओढले होते. तिच्या स्तनांना माती फासलेली होती. वाहून आणलेल्या निखाऱ्यांमधून जाळ भडकू लागले. कातडी अंथरली गेली. त्या गळपट्टा घातलेल्या स्त्रीने हात उचलून अर्जुनच्या मानेला स्पर्श केला, त्याचा ताप तपासाला. थंड व्यावहारिक तळहात. त्याला संपूर्ण नग्न करून त्याचा प्रत्येक अवयव न्याहाळला गेला. बघता बघता ती मोठ्याने ओरडून अवयवांची वाटणी करत होती.

त्यांनी त्याला मोठ्या आगीजवळच्या एका सपाट दगडाकडे नेलं. तिथून एक जुनी भेग गेली होती, जिथून अनेकदा चरबी वाहिली होती. त्यांनी त्याला खाली बसवलं. त्याचं डोकं दगडावर ठेवलं.

एक माणूस जड दगड घेऊन गुडघ्यावर बसला.

ज्यांनी जास्त धोका पत्करला होता त्यांना पहिला घास मिळणार होता. मगजासाठी हाडं फोडली गेली. एक तुकडा आगीत गेला. धूर वर गेला. त्या स्त्रीने काही शब्द उच्चारले - कदाचित आकडे, कदाचित या कामाची नोंद, कदाचित आशिर्वचन, कदाचित कामांची वाटणी. त्यांनी मेंदू फेकून दिला. कारण एकदा कुणीतरी तो खाल्ला होता आणि त्याला वाईट स्वप्नं पडली होती.

त्यांच्या डोक्यावर आकाशात विहरणाऱ्या त्या पांढऱ्या ड्रोनने सगळा तपशील मुख्यालयात कळवला. तिथे एका पडद्यावर तो झळकत होता.

“सब्जेक्ट १७: पुरुष: सामावून घेण्याची प्रक्रिया संपली. कोड ३४२ वर मृत. प्रोटीनरूपात पुनर्ग्रहण. टोळीचा धर्मनियम कायम.

सब्जेक्ट १८ : स्त्री. एकीकरण पूर्ण. समाज-अनुकूल वर्तन मजबूत. प्रजननाची शक्यता जास्त मात्र संगोपनाची जबाबदारी स्वेच्छेने. नरनिवड पूर्ण. गटावरील ताण मध्यम. समाजनियमांचा असहाय्य स्वीकार, आहाराची अनैच्छिक निवड”

शेजारुन पडदा पाहणाऱ्या एकाने आपल्या सहकाऱ्याला सूचना केली : “गर्भधारणेच्या कलमावर खूण करा. कायदेशीर विभागाला कळवा. कोणताही नैसर्गिक जन्म हा रिसॉर्टच्या मालकीचा आहे त्यामुळे, सब्जेक्ट १८ ने केलेल्या सह्या तपासून घ्या”

मीरा एके रात्री त्या टोळीतून पळत पुन्हा जुन्या टोळीत परत गेली. सूर्योदय आणि सूर्यास्त मोजत तिने वर्ष पूर्ण केले.

आकाशातून पंख असलेला एक खूप मोठा पक्षी खाली आला.

तिला चॉईस दिला गेला. स्मृतीनाश करून इथेच राहायचे, अथवा पुन्हा जुन्या जगात परतायचे. तिचा निर्णय कधीच झाला होता. ओटीपोटावर हात ठेवून ती परतण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक क्वाडकॉप्टर मधे चढली.

----------------- एक वर्षापूर्वी -----------------

“काहीतरी थ्रिल हवे आहे आपल्याला, नाहीतर आपण इथेच भांडत बसू” मीरा वैतागून म्हणाली.

“भांडत का बसायचं? असं आयुष्य नाही काढायचं मला, काहीतरी मार्ग काढू” चिडून अर्जुनही पुन्हा गॅलरी मधे आला. गॅलरीचा पडदा सांयकाळच्या उन्हाने उजळला होता.

“मार्ग? म्हणजे? सरळ सरळ का सांगत नाहीस?”

“मला या विषयावर आत्ता बोलायचं नाही. मी आधीच ताणात आहे ‘अभिमन्यू’चे उद्या मला एक मोठे रिलीज आहे. मला त्रास नको देऊस.” घराच्या भिंतींचा रंग शांत पिवळट होऊ लागला. हळू हळू गोड बासरीचा मंजूळ आवाज आणि पक्ष्यांची किलबिल ऐकू येऊ लागली.

“काय वैताग आहे”, ‘अभिमन्यू’ हा शब्द ऐकताच मीराने तिच्या समोरचा काचेचा फ्लॉवरपॉट शेजारच्या मतिबॉक्सवर आदळला. आणि ती तशीच धुसमुसत दुसऱ्या खोलीत निघून गेली.

तिला अर्जुनसोबत राहायची काडीचीही इच्छा नव्हती. उरले सुरले प्रेम चारपाच वर्षांपूर्वीच आटून गेले होते. तिची एकच अडचण होती. लग्नापूर्वी करारपत्रे केली होती आणि तिने स्वतः होऊन त्याला सोडचिठ्ठी दिली असती तर तिला अर्जुनच्या समभागांपैकी एक समभाग देखील मिळणार नव्हता. तिला हे घरही सोडावे लागले असते आणि सरकारी बूथ वरती राहावे लागले असते. सुवर्णजातीचा दर्जा मिळाल्यावर काढलेली अंतर्चिप देखील पुन्हा बसवावी लागली असती. तिच्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा तर झालाच होता मात्र तिचे भविष्यही तिच्या हातून निसटत चालले आहे म्हणून तिला घाम फुटत होता. कुरतडून कुरतडून एका बोटाचे तिने जवळ जवळ अर्धे नख खाऊन टाकले होते.

पाच वर्षांपूर्वीचा तो प्रसंग आठवून तिला परत परत शहारे येत, अजून तो डोळ्यासमोर घडत आहे हे जाणवत होते. त्यानंतरचा क्षण अन क्षण ती मोजत होती. काहीतरी आखत होती.

त्या रात्री अर्जुनच्या शेजारी ती मुद्दाम झोपली. त्याच्या कानात हळूच म्हणाली “सॉरी!”

अर्जुनवरचा ताण कमी झाला. नंतर त्याला ती बिलगून झोपली.

सकाळी तिने लवकर उठून अर्जुनसाठी नाश्ता केला. ती गाडी घेऊन मैत्रिणीकडे गेली. संध्याकाळी पुन्हा त्याला कामाविषयी विचारलं. अर्जुन खुशीत होता. रात्री ते उत्कटतेने एकमेकांत मिसळले. अर्जुनसाठी तिने पुनः पुन्हा खोटे खोटे मोनिंग केले. त्याच्या पाठीवर हात फिरवत त्याला पॅट्रोनाइज केले.

पुढे अशा अनेक रात्री ती त्याला कुरवाळत राहिली.

एके दिवशी तिने अर्जुनला माणदेश पार्क विषयी सांगितले. म्हणाली, “आपण इथे जाऊया!”

“वेड लागलेय का? एक वर्षभर तिथे काढायचे तेही हंटर गॅदरर होऊन?”

“का काय झालं, किती थरारक अनुभव असेल!”

“जीवाचं बरं वाईट झालं तर?”

“या डिजीभिंतीत मरण्यापेक्षा तिथे कंदमुळे खाऊन मरू. माझी मैत्रीण काही वर्षांपूर्वी गेली ती पुन्हा परत आलीच नाही, किती रोमांचक आयुष्य असेल तीचं. अगदी खरं खुरं. तुला त्या “अभिमन्यू”तच आयुष्य काढायचं असेल तर मग काय बोलायचं. खायला विटामिन्स, प्यायला जीवरस. खऱ्या नरा सारखं अनवाणी पन्नासेक मीटर्स तरी धावून दाखव..”

“तू दोन दिवस तरी राहशील का तिथे?”

“मी नाही तुझ्यासारखी पुस.,” चाचरत मीरा म्हणाली, “ तुला नाही ठाऊक, मी तर अर्धा फॉर्म देखील भरलाय. शिवाय आपले स्टेमसेल्स आणि क्रायोजेनेबल्स तसेही सुरक्षित ठेवलेच आहेत. उद्या काही झालं समजा, आपल्याला एक मार्ग आहेच, आता नसेल ते शक्य पण अजून एखाद्या दशकाने कदाचित”

“ठीक आहे, मी तयार आहे”

“आपल्या दोघांमध्ये पुन्हा तेच सगळं रिकिंडल होईल अर्जुन!”

------------- पाच वर्षांपूर्वी ------------

इ.स. २०७० नंतर, माणसाचा जन्म हळूहळू शरीराच्या बाहेर घडू लागला होता.

यासाठी कोणताही एकच एक मोठा कायदा झाला नाही. कोणतीही विशेष क्रांती झाली नाही. फक्त सुधारणा होत गेल्या. टप्प्याटप्प्याने. सुरुवात झाली आंशिक बहिर्गर्भधारणेपासून. २२व्या आठवड्यानंतर गर्भ वाढवू शकणाऱ्या कृत्रिम गर्भाशयांपासून. मूळ उद्देश होता अकाली जन्मलेल्या बाळांचे प्राण वाचवणे.

मग आले कृत्रिम नाळजाळे (synthetic placental scaffolds). बहुशक्ती नाळपेशींमधूनच (iPSCs) वाढवलेले. हे जाळे हार्मोन्सची देवाणघेवाण करत असे, ऑक्सिजन पोहोचवत असे, प्रतिकारशक्तीचे संकेत देत असे, आणि गर्भाशयातील सौम्य ताणतणावही सुधारत असे - जणू आईच्या पोटातील आकुंचनच.

हळूहळू, संपूर्ण गर्भधारणा मानवी शरीराच्या बाहेर शक्य झाली. कृत्रिम गर्भाशये म्हणजे अँथ्रोपॉड्स सर्वमान्य सहज उपलब्ध होत गेली. एका पिढीच्या काळातच. ती केवळ कृत्रिम नव्हती, ती ‘वाढवली’ जात. ती ‘जिवंत’ होती.

प्रत्येक अँथ्रोपॉड म्हणजे गर्भार स्त्रीची शरीर प्रतिकृती. मूलपेशींमधून तयार झालेले रक्तवाहिन्यांचे जाळे, गर्भाच्या हालचालींना प्रतिसाद देणारे मज्जातंतूंचे नेक्सस, दिवस आणि रात्रीची नैसर्गिक शारीरिक लय, ताण-हार्मोन्स, आईचा आवाज, अगदी भावनिक स्थितीशी निगडित रक्तरसायनातील सूक्ष्म बदलसुद्धा टिपणारे एक अत्यंत प्रगत असे बायोएंजिनरिंग.

प्रत्येक अँथ्रोपॉडसोबत जोडलेली असे डिजिटल मातृप्रतिमा. त्या बाळाच्या आईच्या शरीरक्रिया, मानसशास्त्र आणि एपिजेनेटिक रचनेवर आधारित रियल टाइम चालणारी एक संगणकीय प्रणाली. आणि अगदी प्रगत AIचे नानाविध अपग्रेड्स असणारे.

काहीतरी हरवले आहे हे मानवांना उमगायच्या आधीच ते सगळे सामान्य आणि समाजमान्य झाले होते.

मीरा सत्तावीस वर्षांची होती. आई होण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या पूर्णपणे निरोगी. कायदेशीर दृष्ट्या? नाही.

पर्यावरणातील विषारी घटक, स्वयंप्रतिकार करणारे सुपरबग्स आणि त्यांचे आजार, आणि उशिरा होणारे मातृत्व या सगळ्यांमुळे अनेक देशांनी प्रजनन कायदे लागू केले होते.

एका स्त्रीकडून किती बीजांडे काढता येतील, किती फलित करता येतील, आणि किती गर्भधारणा कायदेशीर ठरतील, हे सगळे लोकसंख्येच्या गणितावर आणि आरोग्यखर्चावर ठरवले जात होते. आणि त्यात एखादे बीजांड गर्भधारणेत अयशस्वी झाले की ते वायाच गेलेले समजले जाई.

मीराकडे फक्त एकच कायदेशीर बीजांड उरले होते. सुवर्णजातीची असल्याने बोनस मिळूनही.

ते काढण्याची प्रक्रिया शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर अत्यंत कठोर होती. तिच्या अंडाशयांचे संपूर्ण संकलन झाले. एपिजेनेटिक ठसे नोंदवले गेले.

ते शेवटचे बीजांड सुदैवाने फलित झाले. आणि डेल्टा-९ गर्भसंवर्धन केंद्रात एका अँथ्रोपॉडमध्ये ते ठेवले गेले.

मीराच्या आनंदाला पारावर उरला नाही. अर्जुन अजूनही ताणात होता पण त्यालाही आनंद झालाच होता.

सर्व तपसण्यांमध्ये गर्भ पूर्णपणे सक्षम निपजत होता. अगदी परिपूर्ण. मुलगा.

मात्र मीराचे दुर्दैव इथेच थांबले नाही. ज्या दिवशी गर्भाने मज्जाविकसनाचा तिसरा टप्पा गाठला जेव्हा मेंदूची जटिल रचना झपाट्याने घडते, त्या दिवशी जागतिक आंतरजाल काही काळासाठी थबकलं.

UTC मध्यरात्री वेळेनुसार पूर्णतः अंतर्चीपेशी जोडलेली एक आभासी गेम रिलीज झाली.

त्या गेमचे नाव होते अभिमन्यू. वेगवेगळ्या जटील व्यूहातून बाहेर पडणारा नायक असलेली. पुराणकथांवर आधारित युद्धसिम्युलेशन. स्वतः कथा घडवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता.नैतिक निर्णय बदलणारी यंत्रणा. आणि सर्व इंद्रियांना व्यापणारा अनुभव. अर्जुनच्या कंपनीनेच ती विकसित केलेली होती.

कोट्यवधी लोक एकाच वेळी लॉगिन झाले. शहरे मंदावली. वीजजाळ्यांवर ताण आला. डेटा केंद्रे तापली. शीतकरण यंत्रणा अपयशी ठरल्या. बॅकअप सर्व्हर कमी क्षमतेच्या नोड्सवर गेले. जे कधीच इतक्या व्यापक लोडसाठी तपासले गेले नव्हते. ज्या क्लाउड प्रणालीवर ती गेम चालत होती, डेल्टा-९ केंद्र तीच क्लाउड प्रणाली वापरत होते.

सत्त्याण्णव सेकंदांसाठी अँथ्रोपॉड क्रमांक A-४२ मीराच्या डिजिटल मातृप्रतिमेच्या संपर्कातून बाहेर पडले.

सत्त्याण्णव सेकंद पुरेसे होते. हार्मोन्सचा ताळमेळ ढासळायला. ऑक्सिजन प्रवाह अंशतः कमी व्हायला. मेंदूतील संकेतांची लय तुटायला. अगदी महत्त्वाच्या टप्प्यावर.

प्रणालीने स्वतःला सावरले. पण उशीर झाला. बाळ कोमा मधे गेले. आता बाळ वाचण्याची शक्यता जवळ जवळ संपली होती.

यावर एक उपाय होता. या संपूर्ण तंत्रोत्तपत जगात कोणता ना कोणता उपाय नेहमीच असतो.

अँथ्रोपॉडच्या रक्तप्रवाहात दिली जाणारे नॅनोबॉटसचे एक प्रगत जनुकीय इंजेक्शन. ते नॅनोबॉटस एपिजेनेटिक पुनर्लेखन करून गुणसूत्रांची बिघडलेली रचना पुन्हा जुळवू शकत. यशाचा दर होता—९२.७ टक्के.

पण हा उपाय होता हीरकजातीच्या लोकांना परवडेल असाच. सार्वजनिक अथवा खाजगी विम्याच्या बाहेर. ज्याला कोणतेही अनुदान नाही. कोणतीही मानवी सामाजिक तडजोड नाही.

दुर्मिळतेमुळे आणि परिणामकारकतेमुळे या उपायाची किंमत मात्र प्रचंड होती.

घर, गुंतवणूक, पेन्शन, कदाचित स्वतःच्या हाडांमधला मगज देखील सगळे विकून रक्कम उभी करावी लागणार होती.

डॉक्टर शांतपणे बोलत होते. एआय सल्लागार अचूकपणे काय काय लिक्विडेट करता येईल याची यादी देत होते.

मीराला आणि अर्जुनला वेळ मर्यादा दिली: दीड तास.

अर्जुनकडे कंपनीचे शेअर्स होते, अभिमन्यूच्या रिलीज नंतर त्यांनी जबरदस्त उसळी घेतली होती. मात्र लॉगिनच्या अडचणी आणि सर्वर मेल्टडाउनचे रिपोर्ट येत होते तस तसे ते कोसळू लागले होते. मार्केट चालवणारे, ट्रेड्स करणारे AI देखील भावनिक होऊ लागले होते. क्षणा क्षणाला बदलणाऱ्या डेटानुसार किमती वर खाली होत.

“यश किती नक्की?”
“दीर्घकालीन परिणाम काय?”
“बाळ वाचले, पण अपंग राहिले तर?”
“आपल्या आर्थिक भवितव्याचे काय?”

उलट सुलट प्रश्नाची सरबत्ती झाली.

“मीरा, मी शेअर्स लिक्विडेट करू शकत नाही, आपल्याकडे तेवढीच एक आर्थिक शाश्वती आहे, नाहीतर आपण सुवर्णजातीतून देखील बेदखल होऊ. आपल्याला थांबावे लागेल”, अर्जुन रडत मीराचा हात हातात घेऊन म्हणाला.

मीराने त्याला थपडा लगावल्या. ती जोर जोराने किंचाळू लागली, सैरभर झाली. छताकडे पाहून ओरडू लागली. तिच्या शोकाला पारावर उरला नाही. तिला तिच्याच डिजिटल मातृप्रतिमेपासून संपूर्ण डिसकनेक्ट केले गेले. तिला शांत करण्यासाठी औषधांचे माइक्रोडोसेस अत्यंत अचूक प्रमाणात दिले गेले.

ती शांत झाली ती पाच वर्षांनंतर माणदेश पार्कच्या गेट पर्यंत शांतच होती. अर्जुनला कायदेशीररित्या संपवण्याचा हाच एक मार्ग तिला मध्यंतरात सुचणार होता.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

23 Dec 2025 - 4:56 pm | अभ्या..

अप्रतिम, केवळ अप्रतिम.
अदभुत व्हिज्युलायझेशन.
आदिम ओढीचे शाश्वत लढे..
.
खूप दिवसांनी चांगले काहीतरी वाचायला मिळाले आहे.

खुप छान!खुपचं बारकाईने कथा लिहिली आहे.
आधी वाटले रोमॅंटिक कथा आहे पण नंतर वेगळेच वळण मिळाले .तंत्रज्ञान मानवी भावनांना परिपूर्ण ओळखू शकणारच, त्यांची जागा घेऊही शकणार नाही हे मात्र वाटतं राहते.

सोत्रि's picture

24 Dec 2025 - 5:18 am | सोत्रि

डिटेलिंग मस्त जमून आलं आहे!

- (कथा आवडलेला) सोकाजी

अनामिक सदस्य's picture

25 Dec 2025 - 8:59 am | अनामिक सदस्य

तो फट्टू, ती हुश्शार.
त्याच्याकडे कुठले स्किल नाही पण तिने एकदा बघून आग पेटवणे शिकून घेतले.
तो हळू हळू शिकत होता, ती मात्र पटपट शिकत होती.
“जो पुरुष मला हवाय असं तुला वाटतं तो तू व्हायचा आटोकाट प्रयत्न करतो आहेस. मात्र तो पुरुष सतत विझत राहतो."
अहंकार पाय निकामी करण्याआधी थांबायचं. अर्थात त्याला ते जमलं नाही.

आजकाल अनेक ठिकणी किती सहजरित्या 'तो' मूर्ख तरी नाहीतर नालायक तरी दाखवला जातो, आणि 'ती' मात्र हुशार, सर्वगुणसम्प्नन्न. हेच उलट झाले तर ते चालते का?

TV वरच्या जाहिराती बघा कधी, किन्वा पुणे मेट्रो मधील Do's and Don'ts ची पोस्टर्स. योग्य वागणारी ती, चुकीचे वागणारा तो.

हे कोणाला जाणवतेय का?
तो फट्टू, ती हुश्शार.

+१
मी हे लिहिणार होते की नायक फारच साधाभोळा वाटतोय.पण आजूबाजूला असतात की असेही पुरूष! त्यामुळे लिहिले नाही :)
पण स्त्रीया डॅशिंग असणाऱ्या कथा, सिनेमे,मालिका जास्त लोकप्रिय ठरतात,हेही खरं!
कारण हे असावं की अशा स्त्रिया घडायची प्रोसेस अनेक काळापासून खुप संथ आहे.

अनामिक सदस्य's picture

27 Dec 2025 - 9:36 pm | अनामिक सदस्य

स्त्रीया डॅशिंग असु देत ना पण म्हणून पुरुश एकतर बावळट नाहीतर नालायक का दाखवले जातात, हा प्रश्न आहे.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

25 Dec 2025 - 3:38 pm | हणमंतअण्णा शंकर...

हंटर गॅदरर म्हणून तो दुबळा आहे आणि निर्बुद्ध आहे.
तरीही तो तिला वाचवायला जातो आणि हातातले पोर जनावरांच्या साठी सोडताना आवंढा गिळतो इतका तो सहृदय आहे. तेच मूल सहज सोडून देणारी ती मात्र सर्वगुणसंपन्न वाटली तुम्हाला?

अभिमन्यू नावाच्या एका प्रचंड प्रगत गेमचा एक कोडर म्हणून मात्र तो प्रचंड हुशार आहे. मात्र एक गर्भ वाचावा म्हणून आपली सगळी कमाई पणाला न लावणारा एक कठोर व्यवहारी पुरुष देखील आहे, यावरून तो किती रिस्क अवर्स आहे हे लक्षात यावे.

आयुर्वेदात किंवा आपल्या शास्त्रांत या प्रकारच्या बुद्धिला व्यवसायित्मिका बुद्धी असे म्हंटले आहे. जी स्किल बेस्ड बुद्धी आहे. आणि आपण जगात विशेषत: आजच्या जगात अशा बुद्धीवरुनच माणसांचे पगार ठरतात.

दोन जगांतील द्वंद्व दाखवण्याचा एक प्रयत्न होता मात्र कुणीच वाचत नसल्याने तो फसला असे वाटते.

हा एक उत्तम प्रयोग आहे आणि खूपच आवडला. असेच काहीतरी वेगळ्या वाटेवरचे लेखन येत रहावे.

कोणालाच पूर्ण चांगले किंवा वाईट, उदात्त किंवा क्षुद्र, लायक अथवा नालायक असे न दाखवता माणसं जशी असतात तशी दाखवणं आवडलं. विश्व कितीही बदलो. AI चे जग येवो वा पुन्हा एकदा फिरून अश्मयुग येवो. माणसांचे हे पीळ सुंभ कितीही जळला तरी नाहीसे होणार नाहीत.

बाकी जाता जाता.. जे आदिम युग आणि जीवनमान या कथेत दाखवले आहे ते पुन्हा एकदा कृत्रिमरित्या वसवले जाणे आणि काळाचे चक्र नाकारून उलटे फिरण्याचे प्रचंड आकर्षण तयार होणे, आणि त्याला प्रचंड किंमत येणे हे वाटते तितके काल्पनिक नाही. इट्स अ मॅटर ऑफ टाईम.

ता. क. या निमित्ताने तुम्ही मिरजेजवळच्या दंडोबा परिसराची मानसिक सफर घडवून आणलीत. खूप दशकांनी. :-)

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Dec 2025 - 1:41 pm | राजेंद्र मेहेंदळे

जरा जरा कळाली, पण बरीच डोक्यावरुन गेली :(

टर्मीनेटर's picture

26 Dec 2025 - 4:33 pm | टर्मीनेटर

हे कोणाला जाणवतेय का?

@ अनामिक सदस्य
'तुम उडते पंछी के पर गिनने वाले लोग हो' वगैरे सारख्या हिंदी म्हणी तुम्ही ऐकल्या असतील, पण 'तुम उडते पंछी के झाX गिनने वाले लोग' हो अशी म्हण आम्ही आमच्या बाबतीत लोकांना म्हणताना ऐकले आहे 😂
आत्मस्तुती वगैरे वाटेल पण 'असल्या लोकांना' आजपर्यंत फक्त पेललेच नाही तर रेललेले आहे.. भोळी भाबडी जनता त्यांच्या अजेंडा/प्रोपगंडाला फसते पण सगळेच वाचक तेवढे बावळट नसतात हे तुम्ही आपल्या प्रतिसादातून दाखवून दिले आहे 👍 हॅट्सऑफ बॉस...