वयाचे एकविसावे वर्ष पूर्ण झालेलं होतं आणि नुकताच मतदानाचा अधिकार मिळाला होता (तेव्हा तो 21व्या वर्षी मिळायचा, 18व्या नव्हे). त्यामुळे झालो बाबा आपण एकदाचे प्रौढ, ही मनात सुखद भावना. पदवी शिक्षण शेवटच्या टप्प्यात आलेलं. त्याच दरम्यान लेखन उर्मी अगदी उफाळून आली. तशी ती त्यापूर्वीच्या काही वर्षांत मनात धुमसत होतीच परंतु लेखणीपर्यंत काही पोचत नव्हती. वसतिगृहाच्या एकंदरीत सामाजिक वातावरणातून लेखनाची ठिणगी पडायला चांगली मदत झाली. मग सुरुवातीस वहीतच काही खरडकामे झाली आणि त्यानंतर सार्वजनिक लेखनात पदार्पण केले ते वृत्तपत्रातील वाचकांच्या पत्रांमधून. साधारण दीडशे दोनशे शब्दांत आपले विचार कोंबून बसवायचा तो प्रांत. जोमाने लिहू लागलो आणि ती लेखनगाडी बऱ्यापैकी वेग घेऊ लागली. ते लेखन तसं फुटकळ असायचं आणि त्या वयानुसार फारसं परिपक्व देखील नव्हतं.
माझ्या आसपासच्या विद्यार्थ्यांमध्ये दोन-चार कवी होते आणि ते नित्यनेमाने कॉलेजच्या वार्षिकात लिहित. त्यांची छापलेली कविता पाहिली की अगदी हेवा वाटायचा आणि मग
“च्यामारी, आपणही लिहून पाहिली पाहिजे यार, सात आठ ओळी तर लिहायच्या असतात !” असं मनाशीच म्हणायचो.
मग नवशिक्या कवीप्रमाणे अधूनमधून वहीत छोट्या छोट्या ओळी लिहायला लागलो. पण काव्य लेखनाची अक्कल कुठे होती ? लहान आकाराच्या गद्य ओळी यमक जुळवत लिहिणं एवढीच काय ती तेव्हाची समज. अर्थात त्याकडे गांभीर्याने पाहत देखील नव्हतो. मनातनं लक्षात आले होते की आपला पिंड गद्यलेखनाचाच आहे. त्यामुळे पुढील दहा-बारा वर्षांत पूर्ण स्वरूपातली कविता काही लिहिली गेलीच नाही.
यथावकाश पदवी आणि त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण झाले. पुढे सांसारिक स्थिरता आल्यानंतर बऱ्याच वर्षांनी वैद्यकीय शिक्षणाच्या काळातल्या आठवणी अधूनमधून मनात डोकावू लागल्या. कधीमधी पूर्वीच्या वर्गमित्रांचे संमेलन होई आणि मग स्मरणरंजनात अगदी बुडून जात असू. आता आठवतंय की तो 1994चा सप्टेंबर महिना होता. कुंद पावसाळी वातावरण आणि संध्याकाळच्या वेळेस छान एकांत मिळालेला. एकदा का आपण मनाने आपल्या भूतकाळात गेलो की मग कारकीर्दीच्या पायथ्याशीच जास्त रेंगाळतो हा स्वानुभव. मग गेलो ते थेट एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात. जेमतेम 17 वर्षांचा असेन. इयत्ता बारावीच्या तुलनेत सगळच वातावरण नवखे आणि या कॉलेजचं वातावरण सुद्धा नव्या मुलाला बावरून टाकणारे. तोपर्यंतचे आयुष्य काहीसं दबलेले व दाबलेलेच गेले होते. त्यामुळे या भव्यदिव्य कॉलेजमध्ये अक्षरशः चाचपडत होतो. विभिन्न संस्कृतीची मुलेमुली आता एकत्र आलेली. त्यातली काही तर फाडफाड इंग्लिशवाली. थोड्या श्रीमंत मुलांचा पोशाखी दबदबा. तब्बल दोनशे विद्यार्थ्यांचा वर्ग, तुकडीची भानगड नाही.
अभ्यासाला जाडजूड आकाराचे ठोकळे. दिवसभर निरनिराळी दमवून टाकणारी प्रॅक्टिकल्स. दिवसाचे दोन तास तर प्रेतांच्या सहवासात आणि फॉर्मॅलिनच्या तीव्र भपकाऱ्यात. दिवसाखेर अगदी पिट्टा पडायचा. तारुण्यसुलभ आकर्षणामुळे वर्गातील मुलींबद्दल भलतेच कुतुहल वाटायचे. अर्थात तेव्हा मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत बरीच कमी होती आणि त्यातल्या निम्म्या तर पक्क्या सोज्वळ होत्या. ज्या काही मोजक्या दोन-चार फॅशनेबल होत्या त्यांच्या भोवतीच वर्गातल्या बहुसंख्य मुलांचे डोळे भिरभिरायचे. बघता बघता पहिल्या वर्षाची पहिली टर्म संपली आणि एक परीक्षा झाली. इयत्ता बारावीतील 90टक्यांची नशा अजून उतरायची होती. मात्र त्या पहिल्या चाचणी परीक्षेने सापशिडीच्या अगदी वरच्या टोकापासून धाड्कन खाली आपटायचे काम केले. आता किमान 50 टक्के मिळविल्यासच पास असायचे. मला आठवते त्यानुसार त्या पहिल्या परीक्षेत तब्बल 80 टक्के वर्ग चक्क नापास झालेला होता.
असो. आता मुद्द्यावर येतो.
हे सगळं पहिल्या वर्षीचे वातावरण आता डोक्यामध्ये फार घोंगावू लागलं आणि मग त्यातूनच माझी आयुष्यातली पहिलीवहिली कविता - पाऊल डॉक्टरकीचे - ही कागदावर उमटली.

कविता या शब्दाचा खरा अर्थ आणि आशयबिशय असं काहीही समजत नव्हतं. तरीसुद्धा कसेबसे यमक जुळवलेल्या गद्य ओळी एकाखाली लिहीत गेलो अन् कवितेचा पहिला खर्डा झाला लिहून एकदाचा. पुढे आठवडाभर त्याच्यावर थोडीफार कारागिरी झाली आणि मग माझ्या या पहिल्या काव्य अपत्याकडे येता जाता वही उघडून प्रेमाने बघत बसायचो. कसं का असेना हो, पण ते माझं या प्रांतातलं पहिलं अपत्यच होतं. खऱ्याखुऱ्या पहिल्या बाळाचं जसं आपल्याला नको इतके कोडकौतुक असते ना, तसंच काहीसं या कवितेच्या बाबतीत माझं झालं.
कालांतराने एक वैद्यकीय माजी विद्यार्थी विशेषांक निघाला आणि त्या अंकाला ती कविता पाठवून दिली. त्या लोकांनी ती छापली देखील. एका छोट्याशा व्यासपीठावर का होईना ते बाळ सार्वजनिक झाल्याचे समाधान मिळाले, झाले. या पहिल्या कवितेनंतर पुढच्या नऊ वर्षात अजून पाच कविता प्रसवल्या. त्यापैकी एक कविता ही गदिमांच्या ‘आचंद्र सूर्य नांदो’चे विडंबन आहे. दरम्यान गद्यलेखनात गती चांगली आलेली असल्याने कविता प्रांताकडे दुर्लक्ष होतच होते. तरी देखील सटीसामाशी यमकं जुळवायची खुमखुमी आली की एखादी कविता पाडली जायची. अशाप्रकारे 6 कवितांचे एक षटक वहीत लिहून झालं.
पण . . . यानंतर पुढे असे काहीतरी घडायचे होते की ज्यामुळे मला साहित्यातील दोन प्रमुख मार्गांपैकी माझा खरा मार्ग समजून आला आणि पक्का झाला.
एके दिवशी वाचनालयात अचानक ‘अंतर्नाद’ मासिक नजरेस पडले आणि मग पुढे त्याच्या प्रेमातच पडलो. अनेक साहित्यिक आणि अभ्यासू मंडळी त्यात लिहायची. एकंदरीत ते मासिक गंभीर प्रकृतीचे होते(इति अनिल अवचट). एका अंकात विजया जहागिरदारांचा ‘कविता म्हणजे काय’ या आशयाचा एक अभ्यासपूर्ण लेख आला. त्या लेखात सुरुवातीस त्यांनी समाजात एकंदरीत माजलेल्या कवी आणि कवितांच्या बजबजपुरीवर थोडेफार तिखट भाष्य केले होते. कोणीही उठतो आणि यमकं जुळवून गद्य वाक्येच एकाखाली एक लिहितो हा तर त्यांचा मुख्य आक्षेप होताच, जो मला अगदी मनापासून मान्य होता.
पुढे लेखात त्यांनी कवितेची काही मूलभूत लक्षणे दिली होती आणि तत्कालीन बहुसंख्य कवितांमध्ये त्या काव्यगुणांचा अभाव असल्याचे म्हटले होते. ते सगळे गुण आता मला काही आठवत नाहीत, पण दोन अगदी कायमचे लक्षात राहिलेत ते म्हणजे - अल्पाक्षरमणीयता आणि गेयता. (अर्थात गेयता या मुद्याबाबत मतभिन्नता असू शकते). कमी शब्दांत मोठा आशय सामावणे हा तर कवितेचा आत्माच. तसेच मुक्तछंद म्हणजे काही स्वैरलेखन नाही असेही त्या लेखातले प्रतिपादन होते.
तो लेख अक्षरशः मनाला आतून ड्रिल मारल्यागत भिडला. त्यातून कविता म्हणजे काय याचे लख्ख आकलन झाले आणि . . . त्याच क्षणी निर्णय घेतला की आता आपलं हे गद्यरूप काव्यलेखन कायमचे बासनात गुंडाळून ठेवावे हे बरे. डोळ्यात अंजन घालणाऱ्या त्या विदुषींच्या लेखाने खाडकन भानावर आलो आणि पद्यलेखन हा आपला प्रांत नाही यावर मनोमन शिक्कामोर्तब करून टाकले. त्यानंतर कवी अनिल आणि अन्य काही ज्येष्ठ कवींचेही मार्गदर्शक लेख वाचनात आले. त्या सगळ्यांचा आशय असा होता की जातिवंत कवीने फक्त कविताच करायच्या असतात; इतर कुठल्याही साहित्यप्रकारांमध्ये हातपाय मारत बसायचे नसते (म्हणजेच या विधानाचा व्यत्यास देखील आपण योग्य समजायला हरकत नाही). माझ्या पुसट आठवणीनुसार बहुधा पु ल देशपांडे आणि विजय तेंडुलकरांनी देखील मुलाखतींमध्ये अथवा लेखनात ही खंत व्यक्त केली होती की, आयुष्यात बरंच काही लिहून झालं पण आम्हाला कवी काही होता आलं नाही !
या सर्व सकस वाचनातून जे काही मंथन झालं त्यातून आपण देखील गद्यलेखनाचेच वारकरी आहोत आणि पद्यलेखनाच्या उंच व खडतर मार्गावर आपल्याला प्रवेश बंद आहे, किंबहुना तो आपणच बंद केलेला बरा, हे अगदी आतून पटले. अशा तऱ्हेने जून 2003नंतर माझ्या अल्पजीवी काव्यप्रवासाला कायमचे कुलूप लागले. अर्थात एखाद्या प्रांतात आपल्याला मुशाफिरी करावीशी वाटत असेल तर घाबरून त्यात पाऊलच न टाकण्यापेक्षा त्यात प्रयत्न करून अपयश आलेले केव्हाही चांगलेच. ते अपयश देखील आपल्याला बरंच काही शिकवते आणि स्वतःकडे बघण्याची एक निकोप नवदृष्टी देते.
मित्रांनो,
अशा त्या बासनात गुंडाळलेल्या माझ्या काव्य-षटकातून माझी पहिलीवहिली कविता मात्र तुमच्यापुढे सादर करण्याचा आज मोह होतोय. इथल्या कविता विभागात शिरण्याची देखील माझी पात्रता नाही. म्हणूनच या गद्य चिंतनाच्या निमित्ताने इथेच उरकून घेतो. त्यातून तुम्हाला मेडिकल कॉलेजच्या आवारात सहज गंमत म्हणून एक चक्कर मारून आल्याचे जरी वाटले तरी खूप झाले.
सादर आहे कविता . . .
पाऊल डॉक्टरकीचे
नव्वद टक्के मार्क मिळाले टेचात आलो मेडिकलला
टेस्ट आणि ट्यूट झाले सुरू अन् गाडी लागली घसरायला
प्रेतं दिसली टेबलावरती सुरी गेलो चालवायला
चरबीचा तर पत्ताच नाही हाडंच लागली हाताला
बर्नरवरती टेस्ट ट्यूब धरुनी हातच लागलाय दुखायला
पण सोल्युशन तर तयार नाही रंगच त्याचा बदलायला
प्रॅक्टिकलची पार्टनर मैत्रिण बघत होती चिकटायला
जर्नल गेलो मागायला तर लागलीय कशी कटवायला
गोरी नटवी मॅडम दिसली शंका गेलो विचारायला
का रे मेल्या मलाच विचारतोस, असंच लागली चोपायला
टर्म संपली, मिसरुड फुटले, मन लागले हो प्रेमात पडायला
होस्टेलवरती राहता राहता ‘सगळं काही’ लागले समजायला !
. . .
. . .
या तथाकथित कवितेकडे माझे मारून मुटकून जमवलेले पहिले काव्य म्हणून पाहावे या विनंतीसह पूर्णविराम.
*************************************************************************************
प्रतिक्रिया
25 Dec 2025 - 10:24 am | युयुत्सु
बरी आहे!
26 Dec 2025 - 11:59 pm | चामुंडराय
छान, कविता आवडली.
कुमार१ सर, तुम्ही खरेतर गद्य लिखाणाबरोबरीने पद्य - कवितेच्या क्षेत्रात देखील मुशाफिरी करायला हवी होती आणि अजूनही करायला हरकत नाही.
कविता वाचून महाविद्यालयीन जीवनातील सोनेरी दिवस आठवले. त्या स्वप्नाळू काळातील शिरस्त्या प्रमाणे र ला ट जुळवून यमक साधत काही कविता केल्या होत्या खऱ्या परंतु पुढे व्यावसायिक आणिक प्रापंचिक जबाबदाऱ्यांच्या दबडघ्यात त्या मागे पडल्या आणि ते कवितांचे बाड कालौघात नष्ट झाले व मराठी साहित्य एका उदयोन्मुख कवीला मुकले. मराठी सारस्वताचे दुर्दैव (आणि वाचकांचे सुदैव), दुसरे काय?
पुढे मिपा चे सदस्यत्व घेतल्यावर कविता ह्या प्रकाराला फारसा ट्यार्रपी नाही असे लक्षात आले. मग काही प्रसिद्ध कवितांचे विडंबन करण्याचा प्रयत्न केला खरा परंतु ती केवळ शाब्दिक मोडतोड ठरली.
27 Dec 2025 - 7:48 am | कुमार१
प्रयत्न केला हे महत्त्वाचे !
येऊ द्यात अजूनही एखादी कविता. स्वागत असेल :)
27 Dec 2025 - 8:24 pm | चामुंडराय
पेश हैं -
भारतातील ख्रिसमस आणि सांताक्लॉज बद्दलची hype बघता भारतीयांच्या सर्वसमावेशकतेनुसार ते सांताक्लॉजची आरती करायला लागले तर आश्चर्य वाटायला नको.
डिसेंम्बरा डिसेंम्बरा ख्रिसमस सांता डिसेंम्बरा ।
सांताबाबाचे नाम स्मरा हो सांताबाबाचे भजन करा ।
27 Dec 2025 - 9:02 pm | कुमार१
भजन झकास हो !
लोक लागले भजनी . . .
27 Dec 2025 - 1:47 pm | Bhakti
खुप छान मनोगत लिहिले आहे.खरच यमक उत्तम जुळवलि आहेत ;) ;)
मला निम्म्या आयुष्यभर कविताच सुचल्या :)माझा ब्लोग २००७-२०१४ पर्यन्त माझ्या कविता, त्याच्या रसग्रहणाने सम्पन्न आहे.
मला आजही ओळ्खीचे भेटले कि कविता करते की नाही असे कौतुकमिश्रित विचारतात.आता माझी कविता काहिशी विझली आहे,ठरवुनच विझवलि आहे !!
त्या सगळ्यांचा आशय असा होता की जातिवंत कवीने फक्त कविताच करायच्या असतात; इतर कुठल्याही साहित्यप्रकारांमध्ये हातपाय मारत बसायचे नसते+११११
जेव्हा तुम्ही खरच कवितेच्या प्रेमात्,प्रान्तात मनापासुन असता ना,तेव्हा फक्त कविताच सुचतात..इतक गोड ,जीवनाला पुरेल अस स्वप्न आहे कविता.
27 Dec 2025 - 4:29 pm | कुमार१
२००७-२०१४ पर्यन्त माझ्या कविता, त्याच्या रसग्रहणाने सम्पन्न आहे.
अरे वा ! अभिनंदन
. .
इतक गोड ,जीवनाला पुरेल अस स्वप्न आहे कविता.
अगदी ! छान काव्यमय प्रतिसाद.