३- तेरी नजरो से आज नजर मिलाना चाहती हु

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
26 Dec 2025 - 6:43 am

तोच विचार होता अगोदर. आणि तेच केलं असते पण वैकुंठरावाना गोपीकाबाई च आवडल्या . त्यामुळे यावं लागलं इकडे. आतोबा हसतात.
क्रमशः
मागील दुवा https://www.misalpav.com/node/53380
अगे कौसल्ये असे कसे म्हणतेस. समोरून चालून स्थळ आलंय तर नको का म्हणतेस. दुर्गा आज्ज्जी आता या बोलण्यात पुढे आली. जोडा कसा राम सीतेसारखा शोभेल.
मला कळतंच नव्हते काय चाललंय ते. जोडा आणि सोयरीक हे दोन नवीन शब्द माहीत झाले इतकेच. बैलजोडी माहीत होती. पण जोडा हे काहितरी नवीनच.
घरात का ठेवणार आहेस. मुलीला, मी या वयाची होते तेंव्हा सासूबाईच्या हाताखाली स्वयंपाक शिकत होते. आडाचे पाणी शेंदायचे, दोन दोन खंडी ज्वारीचे पीठ दळायचे. तीस तीस माणसांचा गाडा चालवत होते. दुर्गा आज्जीला साधी बैलगाडी चालवता येत नाही. ती गाडा काय चालवणार.
तेच करायचं नाहिय्ये मला. गोपिकेला शिकवायचे आहे. गोपिकेचे गणीत आणि संस्कृत चांगले आहे. गाण्यातही गती आहे.
त्याने काय होणार. शिकून बालिस्टर झाली तरी शेवटी मुलेबाळे आणि स्वयंपाकघर हेच बाईचे कार्यक्षेत्र. गाण्या बजावण्याचे म्हणाल तर ते सोडाच. कसली ती थेरं. भजन आरत्या बडवून कुणाचा उद्धार झालाय. आतोबांच्या या बोलण्यावर बाबा काहीच बोलत नाहीत.
शिकवू हो आम्ही मुलीला. गोपिकाबाईना. हवं तर वचन देतो तसे.आमच्या मुलीत कोणी शिकल्या नाही. पण या शिकतील. ते मिशाळ काका एकदम उभे रहात म्हणाले.
झाले समाधान तुझे. इतके म्हणताहेत तर शिकवतील हो गोपिकेला.... दुर्गाआज्जी ने त्या काकांची री ओढली. आमच्या वेळेला नव्हती हो असली थेरं. मी पाच वर्षाचे असेन अजून परकरीही नव्हती माझे लग्न झाले.
अहो पण वैकुंठरावांबद्दल आपल्याला कुठे काही माहिती आहे.
काय करायचे आहे माहिती घेऊन. खोती आहे. जमीनजुमला आहे अजून काय हवे आहे तुला.
पण त्यांचे शिक्षण वय वगैरे.
पुरुषांच्या जातीला वय विचारायचे नसते.आणि खोती असल्यावर शिक्षण कशाला हवे.
दुर्गाआज्जीच्या या बोलण्यावर माई गप्प बसली खरी पण काहितरी तीच्या मनाविरुद्ध होत आहे हे मला त्यावेळी जाणवायचे वयच नव्हते.
लच्छी आत्याने मला कपाळावर कुंकू लावले. माझ्या ओच्यात एक छानसा खण, पैठणी आणि मोत्याची माळ ठेवली.आणि म्हणाली नशीब काढलेस ग पोरी . एकदम छान सोयरीक मिळाली तुला. अष्टपुत्र सौभाग्यवती होशील.
मला काहितरी एकदम भारीच वाटायला लागले.
कसल्याशा मुहूर्तावर आपले लग्न लागले. अंगाला हळद चोळताना बायका गाणी म्हणत होत्या माई मात्र गप्पच होती. भटजी काहितरी मंत्र म्हणत होते. अंतरपाटा पलीकडे वकुंठरावांचे पायच दिसत होते. त्यावरून मी ते कसे दिसत असतील याची कल्पना करत होते. पायावरून वयाचा अंदाज थोडाच येतो. शुभमंगल सावधान म्हणत गुरुजीनी अंतरपाट दूर केला. मी समोर पाहिले. माझ्यासमोर वैकुंठराव उभे होते. पंधरा एक वर्षाचे असतील मी. धोतर कोट उपरणे डोक्याला पुणेरी पगडी. एकदम दिपोटीसारखे दिसत होते. मग वाजतगाजत बैलगाडीत बसून मंडणगडला गेलो. लच्छी आत्याही सोबत होती. तीने एका बाईंची ओळख करून दिली. पाया पड नीट . या तुझ्या सासुबाई रत्नाबाई. याना आत्या म्हणायचे .मी पाया पडायला खाली वाकले. बाईनी माझ्यावरून मीठ मोहर्‍या ओवाळून टाकल्या. अगं पदर सावरायला शीक आता जरा. मला त्या पैठणीचा गोळच सावरता येत नव्हता. पायात अडकून पडेन असे वाटत होते. त्यात आता ही डोक्यावरून पदर नावाची नवी भानगड डोक्यावर बसली.सगळे छान कौतूकाने हसले.
गोपिकाबाईच्या डोळ्यासमोर त्या दिवसाचे दृष्य आजही तितक्याच स्पष्टपणे उभे रहाते.पण त्या आठवणीबरोबर लगेचच एक कटू आठवण त्याच्या विचारांचा ताबा घेते.
त्या दिवशी सगळ्या पूजा विधी वगैरे संपल्यानंतर त्या सासूबाईनी दुधाचा एक मोठा गडवा हातात दिला. म्हणाल्या हे दूध घे. सगळं व्यवस्थित होईल.दूधात बदाम वेलदोडे साखर गुलाबाच्या पाकळ्या असे कायकाय होते. जायफळाचा गडद स्वाद होता. मी तर इतके छान दूध कधीच प्याले नव्ह्ते. आणि इतके सगळे तर नाहीच.दूध प्याल्यावर मला गाढ झोप आली. सकाळी उठले . मी एका मोठ्ठ्या पलंगावर होते.अख्खे अंग ठणकत होते. कपडे अस्ताव्यस्त होते. दोन्ही मांड्यात खूप आग आग होत होती. मांड्या रक्तालल्या होत्या. ओठ मधमाशीने डंख मारावा तसे सुजले होते. मला उमगेच ना काय झाले ते. मला तर रडू यायला होते. इथे या परक्या घरात हे असे काय घडतय. माईची खूप आठवण यायला लागली. हमसून रडायला लागले. माझे हुंदके ऐकून असेल सासूबाई आत आल्या . वैकुंठराव अगोदरच कुठेतरी निघून गेले होते. सासुबाईंनी ओठावर लावायला सायीची वाटी दिली. म्हणल्या हे लाव.तोंडावर. आणि सगळं आवरून मगच ये बाहेर. भरल्या घरात असलं रडव्या तोंडाने नांदायचे नसते. लक्ष्मी बाहेर निघून जाते अशाने.
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

26 Dec 2025 - 7:17 pm | योगेश लक्ष्मण बोरोले

विजुभाउ, ओघवती व कालसुसन्ग्त भाषा, चित्र डोळ्या समोर उभे राहते. शुभेछा!

विजुभाऊ's picture

27 Dec 2025 - 11:54 pm | विजुभाऊ