या धाग्यावर चर्चा झाल्यामुळे पुण्यात कट्टयाचा प्रस्ताव एका नवीन धाग्यात देत आहे. भक्ती ताई यांनी जमल्यास व अभ्या यांनी नक्की येतो असे सांगितले आहे. टर्मिनेटर यांचा उत्साह तर भारीच आहे. ते उशीरा भेटायचे असेल तर येतो म्हणालेत म्हणून दुपारची वेळ सुचवत आहे. जास्तीत जास्त लोकांना जमावे म्हणून रविवारचा मुहूर्त काढला आहे. मागे कर्नल तपस्वी यांनी पण पुणे कट्टा केल्यास भेटू म्हटले होते. तर खालील स्थळ आणि वेळ सुचवत आहे.
स्थळः वाडेश्वर, डेक्कन
वेळः रविवार २१ डिसेंबर २०२५ दुपारी ठीक ४ ते ६.
वेळेबाबत दुसरा प्रस्ताव असेल तर मी तसा १० ते ४ कधीही येऊ शकेन. इतर उत्साही मिपाकरांना वेळ असेल तर इथे फक्त येतो असा प्रतिसाद द्यावा ही विनंती. आणखी जास्त उत्साही मिपाकराने 'हे आता ठरले' असे जाहीर करावे, कारण शेवटपर्यंत अनिश्चितता नसावी. थोडा प्रवास आहे उद्या त्यामुळे माझा पटकन प्रतिसाद येऊ शकणार नाही पण मी नक्की येणार.
प्रतिक्रिया
19 Dec 2025 - 3:14 pm | प्रचेतस
अरे वा...! खूप दिवसांनी जाहीर पुणे कट्टा, यायला आवडलंच असतो, किंबहुना आलोच असतो पण आजच संध्याकाळो विदर्भात एका अल्पपरिचित ठिकाणी जंगलात भटकण्यासाठी निघत आहे. त्यामुळे येणे शक्य होणार नाही.
20 Dec 2025 - 8:47 am | स्वधर्म
तुंम्हाला भेटण्याची. जंगल सफरीसाठी शुभेच्छा.
19 Dec 2025 - 4:40 pm | चामुंडराय
येतो !
येतो !
Winter Solstice चा मुहूर्त आहे
आणि
सध्या पुणे मुक्कामी आहे.
हा "मिसळ-पाव" असा दुग्धशर्करा योग असल्या कारणाने कट्ट्यास येण्याचे योजिले आहे.
20 Dec 2025 - 8:45 am | स्वधर्म
या जरूर.
20 Dec 2025 - 8:49 am | स्वधर्म
दिसते आहे. व्य नि पाहता येत नाहीत. जर कट्ट्यासंबंधी असेल तर इथेच लिहावे ही विनंती.
20 Dec 2025 - 8:53 am | स्वधर्म
दिसले व्यनि
20 Dec 2025 - 2:48 pm | चौथा कोनाडा
व्यनि दिसत नाहीत ... नविन लेखन सुद्धा गंडलेलं दिसतयं ...
कट्ट्याला येण्याची इच्छा होतीच पण याच दिवशी दुसरा कार्यक्रम असल्याने पुण्यात असून सुद्धा येता येणार नाही याचे शल्य आहे.
असो.
२१ च्या कट्ट्यास मनःपुर्वक शुभेच्छा !
20 Dec 2025 - 10:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपा कट्ट्यास शुभेच्छा....! इंजॉय. तपशीलवार वृत्तांत येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
20 Dec 2025 - 10:39 am | किल्लेदार
येऊ शकतो
20 Dec 2025 - 11:55 am | स्वधर्म
भेट होईल.
20 Dec 2025 - 12:35 pm | टर्मीनेटर
इसे लॉक किया जाएं? की,
हाच उद्देश प्रमाण मानून कोणाला वेळेत काही बदल सुचवायचे आहेत? कारण कोणा एकाच्या सोयीसाठी (अर्थात मीच तो 😀) ठरवलेली वेळ अनेकांसाठी गैरसोयीची ठरणार असेल तर ती बदलणे नक्कीच श्रेयस्कर आहे! सकाळची वेळ पाळायला नाहीच जमले तर अभ्याशेठ किंवा भक्ती ह्यांच्यापैकी कोणालातरी व्हिडीओ कॉल करून व्हर्चुअल उपस्थितीचा पर्याय मला उपलब्ध आहेच.
21 Dec 2025 - 9:39 am | कंजूस
वाडेश्वर नावाचा चौक आहे काय?
21 Dec 2025 - 9:47 am | अभ्या..
नाही,
जागृत देवस्थान आहे.
21 Dec 2025 - 11:48 am | टर्मीनेटर
'नवसाला पावणारे' हे अॅडवायचे राहिले का 😀
अर्थात ह्या 'जागृत देवस्थाना'बद्दल मला पण काल तुझ्याकडूनच समजले, माझा आधी पाताळेश्वर आणि वाडेश्वर मध्येच गोंधळ झाला होता...
21 Dec 2025 - 9:49 am | कुमार१
मी येतोय.
वेळ व ठिकाण वर लिहील्याप्रमाणेच पक्के समजायचे ना?
21 Dec 2025 - 11:38 am | टर्मीनेटर
हो...
21 Dec 2025 - 12:58 pm | स्वधर्म
मिपा नीट दिसत नाही त्यामुळे काही लोकांना नंतरचे प्रतिसाद दिसले नाहीत तरी ज्नायां शक्य आहे त्यांनी अवश्य या ही आग्रहाची विनंती.
21 Dec 2025 - 7:03 pm | कुमार१
21 Dec 2025 - 7:31 pm | कुमार१
मिपा वाडेश्वरी कट्टा
दहा जणांनी धमाल केलेली आहे ! 👌
वृत्तांत आणि फोटो यथावकाश येतीलच
सर्व कट्टेकरींना धन्यवाद !
😀 😀 😀 😀 😀
😀 😀 😀 😀 😀
21 Dec 2025 - 9:16 pm | टर्मीनेटर
माझ्याकडे फक्त 3 फोटोज आहेत त्यातला हा एक...

डावीकडून... चामुंडराय, कुमार सर, अमरेंद्र बाहुबली, अभ्या.., स्वधर्म, अतुल (भक्ती ताईंचे मिस्टर) पुढच्या रांगेत रामचंद्र, भक्ती, आणि त्यांची कन्या गिरीजा...
21 Dec 2025 - 9:33 pm | टर्मीनेटर
BTW.. कट्टेकर्यांनो ज्या हॉटेल मध्ये आपण बसलो होतो ते कोणाचे आहे हे मला आणि अभ्याला नंतर समजले, ती पण एक गंमतच आहे...
21 Dec 2025 - 9:36 pm | अमरेंद्र बाहुबली
कुनाचे?
21 Dec 2025 - 9:48 pm | टर्मीनेटर
च्यामारी ज्या मामेबहिणीकडे जाऊन चेंज करून कट्ट्याला यायचे होते, तिच्या भाच्याच्या सासऱ्यांचे आहे :)
21 Dec 2025 - 9:51 pm | Bhakti
म्हणजे तुमच्याच भावकीच्या मालकीचं आहे की ;)
चला परत इथेच महाकट्टा करू पुढच्या डिसेंबरला !
21 Dec 2025 - 10:07 pm | टर्मीनेटर
येस... जरूर करू...
मागच्या डिसेंबर मध्ये 14 तारखेला कट्टा झाला होता, ह्या डिसेंबर मध्ये 21 ला झाला, आता पुढचा 28 डिसेंबर 2026 ला करूया :)
21 Dec 2025 - 9:47 pm | कुमार१
या वाडेश्वरची मूळ संस्थापक शाखा म्हणजे बाजीराव रोडची. त्याच्या निर्मितीसंबंधीची एक 'कथा' मी सुमारे पंचवीस तीस वर्षांपूर्वी ऐकली होती.
आता प्रस्तुत वाडेश्वर हे त्याच मालकांचे आहे की अन्य कोणी चालवते याची मला कल्पना नाही.
:)
21 Dec 2025 - 9:44 pm | Bhakti
सर्वांचे खरंच धन्यवाद.
उद्या निवांत नेमक्या शब्दांत सांगते :)
तूर्तास कट्टयातील महत्वाची छान गोष्ट सांगते -शेवटी कुमार सरांनी नारीशक्तीसाठी तेंडुलकरांचे सादर केलेले शब्द, खुपच छान वाटले _/\_ त्यासाठी विशेष धन्यवाद!!
21 Dec 2025 - 9:49 pm | टर्मीनेटर
+१
21 Dec 2025 - 10:02 pm | कुमार१
आज दुपारी चारची वेळ आणि रविवार . . . त्यामुळे वाहतूक थोडी तरी बरी असेल अशा आशेने रिक्षाने घरून निघालो. परंतु टिळक रोड - अलका चौक आणि डेक्कनचा परिसर नेहमीचसारखाच गाड्यांच्या रांगांनी भरलेला. हॉटेलजवळ येताच रिक्षातून उतरताना कसेबसे पाय ठेवायला जागा मिळाली आणि वाडेश्वराच्या दारावर दाखल झालो.
एका उंच्यापुऱ्या व्यक्तीने हात करून, “तुम्हीच ते कुमार काय?“ असे विचारले आणि कट्ट्याला सुरुवात झाली आहे याची झलक मिळाली ! हेच ते चामुंडराय. त्यांची व माझी भेट 2020 साली झालेल्या खास कोविड स्पेशल मिपाच्या ऑनलाइन झूमवरील आंतरराष्ट्रीय कट्ट्यात आभासी रूपाने झालेली होती. आज दोघांनी एकमेकांना याची देही याची डोळा पाहिल्याने अगदी तृप्त झालो.
भोवताली नजर फिरवताच एका कोपऱ्यात दबा धरून आणि हातात मिपा कट्टा असा फलक धरून बसलेले स्वधर्म आणि अभ्या नजरेस पडले मग दोघांनाही त्या कृतीबद्दल सलाम ठोकत आम्ही दोघे त्यांच्यात सामील झालो. बघता बघता क्रमाने इतर कट्टेकरी दाखल झाले आणि रविवारच्या रस्त्यावरील आणि हॉटेलातील तुडुंब गर्दीत आम्ही खुष्कीच्या मार्गाने शिरत दोन टेबले पकडली.
बाकीचा वृत्तांत उद्या . . .
शुभरात्री !
21 Dec 2025 - 11:29 pm | रामचंद्र
कट्ट्यावरचा वेळ अगदी आनंदात गेला. बहुतेक सर्वच मला नवीन असूनही अगदी चिरपरिचित असल्यासारखी मजा आली. खुसखुशीत गप्पांच्या जोडीला भक्तीताईच्या चटपटीत पालकवड्या, ताजा, घरच्या तिळाचा तिळगूळ आणि चामुंडराय सरांनी सढळ हाताने वाटलेल्या 'बाटल्या' (मला Remy Martin मिळाली.) यामुळे आणखीनच मजा आली.
22 Dec 2025 - 5:30 am | टर्मीनेटर
मी थोडा उशिराने कट्टास्थळी पोचल्याने त्या पालकवड्या 'सुगरण भक्तीने' आणल्या होत्या हे तुमचा प्रतिसाद वाचून समजले...
22 Dec 2025 - 1:34 pm | कुमार१
मेथी ऐवजी पालक असल्याने मी तर विशेष आवडीने खाल्ली. एकदम चविष्ट !
बाटली
>>>
मी चामुंडराय यांच्या शेजारीच बसलो असल्याने थोडा वशिला लावून सर्वात सौम्य डोसवाले ‘बाटली चॉकलेट’ आधी काढून घेतले. ते खात असताना त्यातील अल्पस्वल्प ‘तीर्थप्राशनाने’ क्षणभर मजा आली !
त्याचा आकार तर अगदी मोहकच.
22 Dec 2025 - 2:05 pm | अमरेंद्र बाहुबली
हाहा! कट्टा एक नंबर झाला, गप्पा गप्पा नी नुसत्या गप्पा! आधी शंका होती वाडेश्वर वगैरेत जागा मिळेल का वगैरे पण पट्टीच्या मिपाकरानी २ तास वेळ मागून २ टेबल हॉटेलवाल्याशी तह करून मिळवले!
तर झाले असे की शनिवारी रायगडावर टकमक टोकावर दुपारी ३ वाजता उभा असताना व्हॉट्सअप वर रामचंद्र काकांचा खलिता येऊन पडला, “कट्ट्याला येणे करावे.” ५ वाजेपर्यंत किल्ला पाहून रायगड रोपवेच्या मेण्याने गड उतरलो, नि खाली पार्क ह्युंडाई कोरियन कंपनीच्या घोड्याने पुण्याकडे कूच केले, भर रात्री ताम्हिणी घाट ओलांडून पुण्यात प्रवेशलो, दुसऱ्या दिवशी २ वाजता मंडईतून रामचंद्र काकाना उचलून पुस्तक प्रदर्शनात गेलो, काका पुस्तके पाहत होते तो पर्यंत चकटफू मिळत असलेले आनंदमठ घेऊन इकडे तिकडे भटकत असताना एक ओळखीचा चेहरा मोबाईल मध्ये बघत बसलेला दिसला, हा तोच का? हा अंदाज लावत होतो, हिंमत करून विचारलेच आणी काय? त्या मिपाकर भक्तीताईच होत्या, मग काय भक्तीताई त्यांचे मिस्टर आणी मुलगी गिरिजा ह्यांच्याशी भरपूर गप्पा झाल्या. ह्यात अर्धा पाऊण तास गेला तोच ४ वाजले मग रामचंद्र काका, मी आणी ताई वाडेश्वरच्या दिशेने निघालो, मध्ये अभ्याना व्हॉट्सअप वर संपर्क केला नी misalpaav.com कट्टा असा फलक हातात घेतलेले स्वधर्म नी इतर तिघे ह्यांची भेट घडली, मग काय टेबल पटकाऊन गप्पाच गप्पा, सर्वानी सुरुवातीला इंट्रो दिले, स्वधर्म, चामुंडराय, कुमार १ काका, अभ्या, टर्मिनेटर अशे एकापेक्षा एक दिग्गज सोबत भक्तीताई, रामचंद्र काका हे आधी भेटलेले मिपाकर विविध विषय, माहिती, गप्पा, विनोद. ताईने आणलेल्या अतिशय चविष्ट वड्या नी थेट कॅनडाहून चामुंडराय सरानी आणलेले बाटलीवाले चॉकलेट, साखर सोडलेली असूनही ती मोहक बाटली खायची इच्छा आवरू शकलो नाही, अतिशय छान चव! वाडेश्वरचे सॅन्डविच, चहा, कॉफी, वाडेश्वरची वेळ संपली तरीही बाहेर उभे राहून आणखी १ तास गप्पा झाल्या असाव्यात.
22 Dec 2025 - 2:31 pm | किल्लेदार
झकास...येऊ शकलो नाही त्याबद्दल अतिशय दिलगीर आहे.
22 Dec 2025 - 2:38 pm | Nitin Palkar
अतिशय छान वृत्तांत .
अधिक वृत्तांतांची आणि फोटोजची प्रतीक्षा.
22 Dec 2025 - 3:04 pm | कुमार१
स्वधर्म, रामचंद्र, अभ्या आणि भक्ती व कुटुंबीय यांची प्रथमच भेट झाली.
अबा ची भेट पूर्वी पाताळेश्वरावर झालेली होती.
टर्मिनेटर व माझ्या तर आतापर्यंत भेटीच भेटी झालेल्या असल्याने परिचयाची पातळी ओलांडून आम्ही कधीच मैत्रीच्या प्रांतात विहार करीत आहोत.
सर्वांनी आपापला परिचय अतिशय उत्तम रीतीने करून दिल्याने सर्वांना व्यवस्थित जाणून घेता आले. आनंद वाटला.
घराकडे परतीच्या प्रवासात चामुंडराय व मी एका रिक्षाने आल्याने आम्हा दोघांचाही वीस मिनिटांचा छानसा निवांत गप्पांचा कट्टा झाला जो खूप आनंददायी होता.
माझ्या पूर्वीच्या शनिवारवाडा आणि पाताळेश्वर येथील कट्ट्यांप्रमाणेच हा कट्टा देखील रंगतदार आणि संस्मरणीय ठरला.
22 Dec 2025 - 3:11 pm | कंजूस
न येण्याचे कारण संध्याकाळी पुण्यातील कट्टा करून परत जाणे अशक्य असते. पाताळेश्वरला सवा नऊला हजर राहून परत साडेतीनच्या गाडीने जाऊ शकतो. तिकडे तीनवेळा येऊन गेलो आहे. तिकडे झाडाखाली उभ्या उभ्याही कट्टा करता येतो.
छोटा वृत्तान्त आवडला.
22 Dec 2025 - 3:42 pm | Bhakti
रविवारच्या मिपा कट्ट्याची वेळ ४ ते ६ होती पण पुस्तक प्रदर्शनात ३ वाजताच अबा भेटला. आमचा कट्टा एक तासच अगोदर सुरु झाला . मी आबाला कौतुकाने खरेदी केलेल्या पुस्तकांची भरलेली पिशवी दाखवली . तर आमचे हे आणि अबा रखरखीत खान्देश आणि मराठवाड्याचे पाणी ,उद्योगांवर चर्चा करत होते ;)
आबा म्हणाला मी रामचंद्र काकांना शोधून आणतो आणि तो अर्ध्या तासाने परत आला. रामचंद्रकाका आल्यावर आम्ही फर्ग्युसन महाविद्यालय ते वाडेश्वरला गाडीतून वाट काढत निघालो.रस्त्यात ब्रिटिश लायब्ररी (जुनी),टाइम्सचे कार्यालय,रानडे इन्स्टिट्यूट याची इमारत कामकाज सांगितलं ... एक हेरिटेज वॉकच यानिम्मिताने झाला. वाडेश्वरला पोहचल्यावर स्वधर्म मिसळपाव.कॉम चा फलक घेऊन उत्साहाने उभे होते हे छान वाटले. टर्मिनेटर सोडता बाकी सर्व मिपाकर कट्ट्यासाठी हाजीर होते.स्वधर्म,कुमार १ यांचे छायाचित्र आधी पाहिल्याने ते ठाऊक होते पण यापैकी अभ्या आणि चामुंडराय याना प्रथम पाहिले . आता आम्ही टर्मिनेटर यांची वाट पाहत होतो.
काही मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर एक टेबल मिळाल्यावर मिसळपाव कट्टा रंगायला सुरु झाला. आणि मग थोड्याच वेळात टर्मिनेटर यांचे आगमन झाले...आता जे येणार त्यापैकी सर्वजण आले पण 'येऊ शकतो' यातले 'किल्लेदार' मिपाकर राहिले हे समजले.
सर्वांच्या ओळखी सुरु झाल्या . मला तेव्हा समजले आजचे सर्वच मिपाकर आपल्या व्यावसायिक क्षेत्रातही धुरंधर आहेत. विशेष म्हणजे प्रत्येकाचे क्षेत्रातले अनुभव ऐकण्यासारखे होते. मधेच वेटर मिसळपाव. कॉम फलक पाहून मिसळपावचे ऑर्डर देणार का हे गंमातीने म्हणाला आणि एकाच हशा पिकला ... हायला पुण्याचे वेटरही हजरजबाबी आहेत कि अस मला वाटलं :)
पलिकडच्या टेबलाची चर्चा मला ऐकू नव्हती ,पण कुमार १ ,चामुंडराय ,स्वधर्म यांच्याशी मी त्यांच्या -माझ्या लेखनाविषयी ,मतांविषयी अल्प बातचीत केली. मग आंतरजालावरच्या इतर चांगल्या गोष्टींची चर्चा झाली ,सर्वात सुंदर ,वापरायला सुंदर संस्थळ मिपाच आहे याबाबत सर्वांना मिपाकर असल्याचा आनंद समाधान आहे हे जाणवलं पण सर्व्हर ,इथली कमी लोकसंख्या अनेकदा रसोभंग करतो याबाबत थोडी नाराजी वाटते हेही एकमत झाले.
सॅन्डविचवर माझ्या लेकीने चांगला ताव मारला ,स्वधर्म यांचेही सँडविच तिने फस्त केले. चामुंडराय यांनी आणलेलया 'तीर्थ' मिश्रित चॉकलेट बाटल्या भारीच दिसत होत्या. पाच वर्षांपूर्वी माझ्या एका विद्यार्थ्याचा सुरु वाईनचा प्रोजेक्ट होता तेव्हा मी आणि मैत्रिणी सॅम्पल टेस्टिंग नावाखाली चढेपर्यंत वाईन प्यायलो होतो.पण आज अहोंसमोरच हे तीर्थ पिताना आता घरी निदान वाईनची बाटली आणायला हरकत नाही असे वाटतंय :)
मी आणलेली पालक शंकरपाळी,तिळगुळ वड्या व माझ्या इतरहि अनेक पाककृतींचे सर्वानी कौतुक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.. मी मटार करंज्याही बनवून आणल्या होत्या पण घरी पुण्यात त्या सगळ्यांना आवडल्याने संपुन गेल्या..
इकडे आमच्या यांना आधीच तंबी दिल्याने त्यांनी श्रोता होण्याचे स्वीकारले :) गिरीजाला मात्र हे काका मला कसे ओळखतात याचे आश्चर्य वाटत राहिले.
अखेर कट्टा समारोपाकडे वळाला तेव्हा कुमार १ यांनी तेंडुलकरांचे स्त्रीचे आयुष्यातले मोलाचे स्थान अशा आशयाचे खूप सुंदर शब्दांचे सादरीकरण केले ...
हळू हळू आम्ही डेक्कनच्या गर्दीत कट्ट्याच्या आठवणी घेत विरून गेलो... जय मिपा :)
चामुंडराय ,कुमार १,अबा,टर्मिनेटर,अभ्या,रामचंद्र ,स्वधर्म,अतुल,मी,छोटी गिरिजा

पुणे बुक फेस्टला अबा,मी (भक्ती),रामचंद्र ..

हाच तो खाऊ बातलि विथ चकणा

22 Dec 2025 - 4:37 pm | रामचंद्र
पालकवड्यांसारखाच खुसखुशीत वृत्तांत!
23 Dec 2025 - 4:23 am | जुइ
झक्कासं कट्टा आणि खादाडीचे फोटो आवडले! बर्याच काळानंतर पुण्यात जाहीर कट्टा झाला ते पाहूण चांगले वाटले.
23 Dec 2025 - 12:06 pm | टर्मीनेटर
रामचंद्र, कुमार१, अमरेंद्र बाहुबली, भक्ती ह्या कट्टेकर्यांचे लघु, मध्यम, दिर्घ अशा विविध स्वरुपातले 'कट्टा वृत्तांत' वाचुन प्रत्यक्ष कट्ट्याएवढीच मजा आली 👍
आता उत्सवमुर्ती 'स्वधर्म, चामुंडराय आणि अभ्या' ह्या त्रिमुर्तींच्या वृत्तांतांची वाट बघतोय. मलाही चार(?) ओळी लिहायची इच्छा आहेच, परंतु माझा 'टंकन वेग' गिनेस किंवा गेला बाजार लिमका बुक्ने तरी दखल घ्यावी इतका जास्ती असल्याने अत्ता लिहायला घेतला तर संध्याकाळ्/रात्री पर्यंत कदचित तो लिहुन पुर्ण होईल असा प्रथमिक अंदाज आहे 😀
30 Dec 2025 - 5:54 am | चामुंडराय
**** मलाही चार(?) ओळी लिहायची इच्छा आहेच ****
वृतांताच्या प्रतीक्षेत.
30 Dec 2025 - 11:54 am | अमरेंद्र बाहुबली
+७८६
23 Dec 2025 - 12:41 pm | अभ्या..
दिग्गज व्हायला बहुतेक मिपावर एका आयडी ने एक तप तरी पूर्ण करावे लागते म्हणे. तपपूर्तीनंतर दोन तीन वर्षांनीही कुणी मिपावर दिग्गज म्हणून संबोधन देईना तेव्हा म्हणाले एक कट्टा करावाच.

तसे आधीही तीन चार पाताळेश्र्वर वगैरे स्थाने कट्टा निमित्ताने पाहिलेले होती. तेव्हा सोलापूर हून येण्याचा उत्साह होता. पुण्यात आल्यानंतर काही पिंची करांच्या गाठीभेटी होत राहिल्या पण अधिकृत मीपा कट्टा मात्र पुणे सोडल्यानंतर योग आला. असो.
स्वधर्म शेठ सोत्री नानाला भेटल्यानंतर भारतात डिसेंबरात भेटू म्हणाले. तेव्हा बऱ्याच अडचणी चालू होत्या. पण शनिवारी रात्री पुण्यात आलो आणि रविवारच्या कट्ट्याला येणे जमेल असे वाटू लागले. सौदागराला गणेशाला भेटलो पण साहेब बीजी असल्याने एकटाच फर्गसन रोडला निघालो.
प्रचेटस सर काही अनवट ठिकाणी जायचे आहे म्हणून कट्ट्याल टांग मारीत झाले. बाकी मिपावर अधून सर्वर नाराज असल्याने कट्ट्याची प्रसिद्धी होते आहे नाही हा विचार आलेला. विरोधी पक्षाचे तीनचार लोक असल्यानं मिपाने माईक बंद करण्याची संसदीय नीती वापरली की काय असाही दुष्ट विचार मनी आला पण संविधानतकीच श्रद्धा नीलकांत मालकावर असल्याने तो विचार झटकला.
आधी घड्याळाला कोलायची सवय जर्मनीत मात्र सोडावी लागली होती तेव्हा शार्प 3.55 ला वाडेहश्वर समोर उभे राहून स्वधर्म यांना कॉल केला व पार्किंग प्लस हॉटेलात जागा मिळते का ह्याची चिंता व्यक्त केली. तेही सांगलीकर पुणेकर आणि लंडन कर असे फिरलेले असल्याने म्हणाले करू आपण मानेज.
मिसळपावाचा कट्टा असे ए 4 प्रिंटआउट घेऊन उभे असता कुमार डॉक्टर दिसले. त्यांना आधीच्या कट्टा फोटोमुळे ओळखत होतोच. त्यांच्यासोबत चामुंडाराय् होतेच. इतक्या वेळात टर्मिनेटर लोणावळ्याला आलोय. शिवाजी नगर ला बसलोय, शनिवार पेठेत जाऊ म्हणतोय असा उपदेत देत होतेच त्याचेही आगमन झाले. बाहुबली संपर्कात होते ते येताना रामचंद्र काका आणि भक्ती ताई ह्यांना घेऊनच आले. भक्तीताईची गोंडस कन्या आणि साहेब सोबत होतेच. भावकीतले रेफरन्स थोडेसे उकरले आणि 6 अधिक 4 अशा दहा खुर्च्या व दोन टेबल इतक्या जागेवर कट्टा सुरू झाला.
स्वधर्म ह्यांनी ओळखीचा प्रस्ताव मांडला व सुरुवात माझ्यापासून करावी लागली. भक्तीताईनी सोबत आणलेल्या पालक मठरी आणि तीळ वड्या वाटप केल्या. चामुणदराय ह्यांनी सुंदर वाइन चॉकलेट्स आणलेली होती. हळूहळू टेबलाच्या दोन्ही साइडला दोन गट पडून दोन चर्चा सुरू झाल्या. माझ्या बाजूला बाहुबली रामचंद्र काका आणि समोर टर्मिनेटर असल्याने फारसा राजकीय चर्चेला वाव ठेवलाच नाही. समोरही तीच परिस्थिती होती. बाहुबली ह्यांची युरोपाबद्दल उत्सुकता, रामचंद्र काकांचा दांडगा अनुभव आणि चौफेर ज्ञान पहाता जेवढे जमेल तितके बोलणे पत्करले.
समोर ज्ञान सागर कुमार डॉक्टर आणि तितकाच अनुभव असणारे चामुंदराय होते. स्वधर्म शेठ चामुंदराय ह्यांची वेगळ्याच क्षेत्रातली मुशाफिरी चकित करणारी होती. भक्ती ताईंनी बहुधा पुस्तक प्रदर्शनाचे डिटेल्स दिल्या पण तेव्हा आमची ऑर्डर देण्यासंबंधी चर्चा चालू होती.
थोडासा अल्पोपहार करून सांगता करताना कुमार डॉक्टरांनी सुंदर कविता ऐकवून एकप्रकारे भक्तीताईना मिपातर्फे मानवंदना दिली.
बाहेर फोटोसेशन करताना (जो सगळ्यात नावडता भाग माझा) एकमेकांना विनंत्या करून मोबाईल आडवे केले गेले आणखी निरोप समारंभ सुरू झाला.
स्वधर्म शेठ काही कामानिमित्त पटकन निघाले. बाकी एकेक निघताना ही बरेच खुमासदार डिटेल्स निघत गेले. शेवटी राहिलेल्या टर्मिनेटर भाऊंना पद्मावती ला सोडण्याची जबाबदारी पत्करून आम्हीही प्रस्थान केले.
कट्ट्याच वृत्तांत द्यावा म्हणाले तर मिपावर सर्वर डाऊन.
हळूहळू तोही पूर्व स्थितीत आल्यावर एकेकेक वृत्तांत वाचले. म्हणले नवीन काय लिहावे पण आता इतक टायपल ते वाया जायला नको म्हणून ..........
30 Dec 2025 - 1:05 pm | अभ्या..
फोटोतले डावीकडून
अमरेन्द्रा बाहुबली, टर्मिनेटर, डॉ. कुमार, चामुंडराय, स्वधर्म, श्रीयुत भक्ती, भक्तीपुत्री गिरिजा, भक्तीताई, रामचन्द्रकाका, अस्मादिक....
23 Dec 2025 - 1:00 pm | राजेंद्र मेहेंदळे
झकास झाला की कट्टा!!
घरी पाव्हण्यांबरोबर बार्बेक्यु चा कार्यक्रम ठरल्याने सामान आणणे व ईतर लुडबुड करण्यात वेळ गेल्याने कट्ट्याला येता आले नाही. पण व्रुत्तांत वाचुन छान वाटले.
23 Dec 2025 - 1:15 pm | गवि
कट्टा वृत्तांत आवडला. असेच कट्टे जागोजागी होत राहोत आणि मिपा धर्म जागृत आणि वाढत राहो.
23 Dec 2025 - 3:38 pm | शाम भागवत
+१
23 Dec 2025 - 5:49 pm | चौथा कोनाडा
झकास कट्टा ..... फर्मास वृतांत !
प्रतिसाद ही एकसेएक !
24 Dec 2025 - 9:56 am | प्रचेतस
पुणे कट्ट्याला ह्यावेळी प्रथमच मुकलो.
ह्यावेळी पूर्वनियोजित कामांमुळे पुस्तक महोत्सव घाईघाईत एकदाच थोडासा बघता आला. तसेच कट्ट्यालाही येता आले नाही. पण मिपाकरांचा कट्टा मात्र जोरदार झालेला दिसतोय. चामुंडराय ह्यांना प्रथमच पाहिले. सर्वच कट्टेकर्यांचे कौतुक. लवकरात लवकर पुन्हा कट्टा घडवून आणा. उपस्थिती राहिलच.
24 Dec 2025 - 12:43 pm | सोत्रि
मस्त कट्टा आणि कट्टा वृत्तांत!!
- (कट्टेकरी) सोकाजी
24 Dec 2025 - 9:12 pm | स्वधर्म
सुगंधी कट्टा नावाचा सिनेमा होता म्हणे. पण आपला दिवस सुगंधी करणारा कट्टा आपल्या ऑनलाईन घसटीतल्या लोकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवण्याचा सोनेरी योग रविवार २१ डिसेंबरला २०२५ आला. जालावर आपल्याला मर्यादित माणूस कळतो पण तासाभराच्या प्रत्यक्ष गप्पांमध्ये प्रत्येक मिपाकर आपआपल्या क्षेत्रात किती पोचलेला आहे हे समजले. एकेका आसामीबद्दल केवढे तरी लिहिता येईल अशी बहुमोल माणसे भेटली. आता महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावात आपला मिपा मित्र असणार असे वाटण्याएवढी जवळीक या दोन तासांनी दिली. आपण सगळेच धाग्यावर केवढे तरी बौध्दिक पाहतो पण ही सगळी मधुर माणसे आहेत आपल्याशी त्यांचे ऋणानुबंधा जुळलेच हे फिलींग सुखद आहे.
बाकी ठळक बातम्या आधीच दिलेल्या आहेत आणि मला कामं उरकण्याची गडबड असल्याने वृत्तांत लिहायला जरा उशीर झालाय पण सगळ्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे कट्ट्याचे हायलाईटस दिलेच आहेत. काही खास मिपाकर पुणेकर जरी येऊ शकले नाहीत तरी पुन्हा जिथे संधी मिळेल तिथे त्यांना भेटायची इच्छा नक्की पूर्ण करणार.
जय मिपा, जय मिपाकर.
25 Dec 2025 - 7:05 pm | चामुंडराय
केवळ एका धाग्यावर आणि स्थळ, काळ, वेळ ह्या बद्दल कोणतीही भवती न भवती होता, अतिशय शॉर्ट नोटिसवर पुणेरी कट्टा यशस्वीरीत्या पार पडला. कट्टा आयोजनासाठी स्वधर्म ह्यांचे आणि सर्व उपस्थित मिपाकरांचे आभार.
मी पहिलटकर (first time) कट्टेकरी असल्याने आणि कुठल्याच मिपाकरास व्यक्तिगतरित्या ओळखत नसल्याने थोडासा साशंक होतो परंतु सगळ्यांनी लगेचच आपलेसे केले आणि जुनी ओळख असल्यासारख्या गप्पा सुरु झाल्या.
मिपा सदस्यत्व घेण्याच्या आधी पासूनच कट्टा किंवा गटग बद्दल नेहेमी उत्सुकता होती परंतु प्रत्यक्ष कट्ट्यात सहभाग घेतला नव्हता. नाही म्हणायला चीनच्या वूहान व्हायरसच्या कोविड काळात एका ऑन-लाईन कट्ट्यास उपस्थिती लावली होती.
नेमके त्या दरम्यान मिपा साईटला काही प्रॉब्लेम असल्याने संपर्क होत नव्हता परंतु स्थळ आणि वेळ लक्षात होती तेव्हा अंदाजाने उपस्थित मिपाकरांची संख्या लक्षात घेऊन वाडेश्वर देवस्थानाकडे कूच केले.
चारचाकी रथ घेतला तर कट्ट्यास उशीर होईल हे लक्षात आल्याने पुतण्याने द्विचाकी स्वयंचलित अश्व भरधाव फेकला आणि अस्मादिक त्यावर पिलीयन रायडर म्हणून स्थानापन्न झाले. इंच इंच लढवत आणि असंख्य वेडीवाकडी वळणे घेत वेळेवर वाडेश्वरी पोहोचलो (दोन, तीन आणि चार चाकी वाहने हाकण्याचे पुणेकरांचे कौशल्य वादातीत आहे) परंतु मिपाकर सदृश्य कोणी दिसेना, आत एक चक्कर मारली. बाहेर एक शुभ्र दाढीधारी सद्गृहस्थ बऱ्याच वेळ भ्रमणध्वनीवर बोलत उभे होते. त्यांचे बोलणे झाल्यावर त्यांच्या कडे मिसळपाव कट्ट्याबद्दल पृच्छा केली तर ते मला चांगली मिसळपाव मिळणाऱ्या हॉटेलचा पत्ता सांगायला लागले. त्यांना कट्ट्याबद्दल सांगितल्यावर त्यांनी मी येथील व्यवस्थापक आणि वेटर्सना ओळखतो, त्यांच्या कडे चौकशी करतो असे सांगितले. एक पुणेकर एव्हढ्या आस्थेने मदत करतो आहे हे बघून माजी पुणेकर असलेल्या मला खरेतर आश्चर्यच वाटले परंतु तेथे कोणासही कट्ट्याबद्दल कल्पना नाही असे निष्पन्न झाले. मी त्या सद्गृहस्थांचे आभार मानले परंतु माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला. इतकावेळ माझा पुतण्या तेथे थांबला होता. आधी कधीच न भेटलेल्या, न ओळखणाऱ्या लोकांना मी भेटणार आहे हे ऐकल्यावर त्याला कुतूहल मिश्रित आश्चर्य वाटले होते.
कोणीतरी मिपाकर येईल अशा प्रतीक्षेत मी वाडेश्वरच्या दरवाजाजवळ उभा होतो. FC रोडच्या साईडवॉकवर (मराठीत फुटपाथ) प्रचंड गर्दी होती. असंख्य बुरखेधारी व्यक्ती दिसत होत्या ते बघून प्रदूषणाच्या दुष्परिणामांची कल्पना आली आणि मला आनंदाला पारखे करणाऱ्या प्रदूषणाचा तीव्र संताप आला. तेव्हढ्यात एक दुचाकीस्वार तेथे थांबून असलेल्या माझ्या पुतण्याकडे काही विचारणा करताना दिसला. दुचाकी पार्क करून तो कोठेतरी गेला आणि थोड्यावेळाने दुसरा एक मोटार सायकल स्वार एव्हढ्या तुफान ट्रॅफिकमध्ये कौशल्याने "रिव्हर्स" येताना आणि पहिला दुचाकीस्वार त्याला "आन्दे, आन्दे" अशी साद घालत मार्गदर्शन करताना दिसला. दुसऱ्या मोटार सायकलस्वाराने मोटारसायकल पार्क केल्यावर हे दोघे मिपाकर तर नसतील अशी शंका आली परंतु त्यांनी तोपर्यंत "मिपा कट्टा" चा बॅनर काढला नव्हता. तेव्हढ्यात मला कुमार१ सर येताना दिसले. कट्ट्यातील फोटोंमध्ये त्यांना बराच वेळा बघितले असल्याने तात्काळ ओळखले आणि कट्टा होणार असल्याची खात्री पटली. पुतण्याला आता तू घरी जा असे सांगून वळलो तर "मिपा कट्टा" A4 साईझचे बॅनर घेतलेले दोघे दिसले. ते वर उल्लेख केलेले दोन दुचाकीस्वार - स्वधर्म आणि अभ्या.. आहेत अशी ओळख झाली.
हा कट्टा पूर्व वृत्तांत, बाकीचा वृत्तांत इतर मिपाकरांनी दिला आहेच.
कुमार१ सरांनी आग्रहाने प्रत्येकाला ओळख करून द्यायला लावली. मिपाकर आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ असून, उच्चशिक्षित आणि प्रथितयश आहेत हे लक्षात आले आणि सगळ्यांना भेटून आनंद वाटला.
नेमके किती मिपाकर येणार आहेत ह्याची कल्पना नसल्याने मद्यधारक चॉकलेट्स कमी पडली आणि स्वधर्म ह्यांना मिळाले नाही. भक्ती ताईंची मुलगी येणार असल्याची कल्पना नव्हती त्यामुळे साधे चॉकलेट्स आणले नव्हते त्या बद्दल क्षमस्व. भक्ती ताईंच्या पालक शंकरपाळ्या, तिळगुळ वड्या आणि वाडेश्वरच्या फिल्टर कॉफीची चव जिभेवर दीर्घकाळ रेंगाळत राहील ह्यात शंका नाही. मिपा सारख्या साईट्स वर आपण बोलण्याऐवजी लिहीत असतो त्यामुळे "तिळगुळ घ्या आणि गोड गोड लिहा" असे म्हणायला हरकत नसावी. इथे तुम्हाला वेगवेगळ्या वयोगटातील आणि क्षेत्रातील मित्र मिळतात हा एक महत्वाचा फायदा.
कट्टा झाल्यावर कार्यबाहुल्यामुळे आणि त्यात इंडिगो व दिल्लीतील धुरक्याच्या (smog) प्रदूषणाच्या काळजीची भर पडल्याने वृत्तांत लगेचच लिहायला वेळ मिळाला नाही. जवळपास ३६ तासांच्या होम-टू-होम टॉर्चरअ्स प्रवासानंतर घरी पोहोचल्यावर लगेचच वृत्तांत लिहून काढला (ह्यातील बराचसा भाग "पारी" विमानतळावरच्या लेओव्हरच्या काळात लिहून वेळ सत्कारणी लावला!). पुढच्या पुणे भेटीत कट्ट्यात सहभागी होण्याची संधी मिळो ही सदिच्छा.
यदा यदा हि नॉस्टेल्जीक होतसे अस्मादिक ।
भेटण्या आप्त, मित्रानाम् सम्भवामि वर्षे वर्षे ॥
ह्या नोट वर आपली रजा घेतो.
आपला दर्शनाभिलाषी - चामुंडराय
25 Dec 2025 - 10:52 pm | रामचंद्र
खमंग आणि खुसखुशीत!
<आणि मला आनंदाला पारखे करणाऱ्या प्रदूषणाचा तीव्र संताप आला.>
'रसिक'राज चामुंडराय!
26 Dec 2025 - 3:09 am | कंजूस
सगळे वृत्तांत वाचले. एकूण दणदणीत झाला कट्टा.
दुरुस्ती *ज्ञान सागर कुमार डॉक्टर*
ज्ञान सागर वाटप करणारे कुमार डॉक्टर.
31 Dec 2025 - 9:08 pm | बिपीन सुरेश सांगळे
कट्टा छान झालाय ! मी मिस केला . कट्ट्याला यायला आणि मेम्बरांना भेटायला नक्कीच आवडलं असतं .
खरं तर त्या वेळी मी पुस्तक महोत्सवामध्येच होतो . पण काही गाठी भेटी बाकी होत्या . त्यामुळे नाईलाज होता . खूप अवघड वाटत होतं . कारण तिथून दोन चौक तर पलीकडे वाडेश्वर .
पुन्हा कधी .
काही जणांना पहिल्यांदाच भेटता आलं असतं . अबा आणि कुमार सोडता सगळे नवीन
खास म्हणजे छोटी गिरीजा
1 Jan 2026 - 9:19 pm | टर्मीनेटर
स्वधर्म, चामुंडराय आणि अभ्या ह्या तीनही उत्सवमूर्तींचे वृत्तांत, त्यातले मर्म आणि पंचेस लै भारी 👍
माझ्याही चार (की चारशे) ओळी लिहून झाल्या आहेत, पण 'कैच्याकै' लांबलचक असा टेराबाईटी झालेला वृत्तांत त्यात थोडी काटछाट करून 'गिगाबाईटी' (कुमारसरांच्या शब्दात 'प्रबंध') स्वरूपात खाली पेस्टवतो 😀
1 Jan 2026 - 9:52 pm | टर्मीनेटर
चॅप्टर १ - "द फ्रुट ऑफ फेथ"
सप्टेंबर महिन्यात सोकाजीनानांच्या 'लंडनस्थित मिपाकर' ह्या धाग्यावरील चर्चेदरम्यान 'स्वधर्म' साहेबांनी डिसेंबरमधल्या 'पुणे कट्ट्याचे' सूतोवाच करताना अभ्याही त्यावेळी पुण्यात असेल असे लिहिले होते. त्यांच्या ह्या कट्टा प्रस्तावास कर्नलतपस्वी आणि चौथा कोनाडा आदी मान्यवरांनी अनुमोदनही दिले होते. डिसेंबरच्या सुरुवातीला राजेंद्र मेहेंदळे साहेबांनी कट्ट्याची तारीख, वेळ, ठिकाणाविषयी पृच्छा केल्यावर जवळपास महिन्याभराने पुन्हा हा विषय ऐरणीवर आला.
गेल्या महिन्यात एका लहानशा अपघातात आमच्या पिताश्रींचा डावा पाय फ्रॅक्चर झाल्यावर केलेल्या तपासण्यांचे अहवाल,अस्थिभंगाचे स्वरूप, रुग्णाचे वय आणि हवामान असे विविध घटक विचारात घेऊन "त्यांना पुन्हा स्वतःच्या पायांवर उभे राहाण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागेल" असा निष्कर्ष त्यांच्यावर उपचार करणाऱ्या अस्थिरोग तज्ज्ञांनी जाहीर केला. अचानक उद्भवलेल्या ह्या परिस्थितीला सामोरे जात नोव्हेंबरच्या मध्यापासून ते वर्षअखेर आणि नववर्षस्वागत निमित्ताने आधी ठरवलेले व्यावसायिक आणि पर्यटनाशी संबंधित सर्व दौरे रद्द केले होते. त्यामुळे दुपारची वेळ ठरल्यास तीन-चार तासांचा प्रवास करून २० किंवा २१ डिसेंबरला होणाऱ्या कट्ट्यास उपस्थित राहणे शक्य असल्याने मी पण कट्ट्याला येऊ शकत असल्याचे कळवले आणि भक्तीताईं पण "जमल्यास चक्कर मारते" असे म्हणाल्या होत्या.
१९ डिसेंबर रोजी 'हा' धागा आला आणि त्यात,
स्थळः वाडेश्वर, डेक्कन
वेळः रविवार २१ डिसेंबर २०२५ दुपारी ठीक ४ ते ६.
अशी पुणे कट्ट्याच्या तारीख, वार आणि वेळेची अधिकृत घोषणा झाली!
"अरे बापरे... हा जंगली माणूस पण येणार आहे का? ह्याला भेटण्यापेक्षा खरोखरच्या वन्यजीवांना भेटायला विदर्भातल्या एखाद्या जंगलात गेलेले बरे" असा विचार करून मला टाळण्यासाठी प्रचेतसबुवांनी त्वरित आपली अनुपस्थिती नोंदवल्याची बातमी काही '(अ)विश्वसनीय सूत्रांकडून' लगेचच माझ्यापर्यंत आली होती, पण तिच्या सत्यतेविषयीची खातरजमा मात्र अद्याप झालेली नाही 😀
ह्यातला गमतीचा भाग बाजूला ठेऊ, पण मला प्रचेतस ह्यांचा प्रामाणिक स्वभाव चांगला माहिती आहे आणि मुळातच डिसेंबर हा सुट्ट्यांचा महिना असल्याने अनेकांचे पूर्वनियोजित कार्यक्रम खूप आधीपासून ठरलेले असतात ह्याची पूर्ण कल्पना असल्याने केवळ तेच नाहीत तर बाकीही काही मिपाकर इच्छा असूनही कट्ट्याला उपस्थित राहू शकले नसावेत हे समजू शकतो.
प्रचेतस येणार नसल्याचे कळल्यावर आता 'वाडेश्वर' लेण्यांचा इतिहास, तिथल्या शिल्पांची सविस्तर माहिती मिळण्याला आपण मुकणार अशा विचाराने थोडे निराशेचे मळभ आले होते पण पुढे आपल्या दर्जेदार लेखनातून परिचयाचे झालेले 'योगाचार्य' चामुंडराय आणि 'रॉय'बहादूर किल्लेदार हे दोघेही येणार असल्याचे कळल्यावर कट्टा आता कल्पनेपेक्षा जास्त रंगतदार होणार ह्याची खात्री पटत गेली!
कट्ट्याचे स्थळ-काळ-वेळ सगळे ठरले होते आणि किमान ७-८ मिपाकर तरी कट्ट्याला उपस्थित राहाणार असा ठाम विश्वास निर्माण झाला होता,
चॅप्टर २ - "स्ट्रेंजर इन द लँड ऑफ लेजेंड्स"
कट्ट्याचे स्थळ-काळ-वेळ सगळे ठरले होते आणि किमान ७-८ मिपाकर तरी कट्ट्याला उपस्थित राहाणार असा ठाम विश्वास निर्माण झाला होता, पण... कट्ट्याविषयीचे काय अपडेट्स आहेत हे बघायला मिपावर यायचो तेव्हा...
'500' आणि '504' हे अधून-मधून शिफ्ट ड्युटीवर येणारे मिपाचे 'नंबरकरी' द्वारपाल प्रवेश नाकारायला सज्ज असायचे. त्यातला 504 नंबरी जरासा सहृदय होता, त्याला एक-दोन वेळा 'टॅब रिफ्रेश'ची विनंती केल्यास तो आत तरी जाऊ द्यायचा. पण 500 नंबरी मात्र एकदम पाषाणहृदयी होता. कुठल्याही वशिल्याला दाद न देता निर्दयीपणे तो कोणालाच आत प्रवेश करू देत नसल्यामुळे नवीन काही कळायलाच मार्ग नव्हता.
२० तारखेला रात्री 'सगळे ठरल्याप्रमाणे आहे ना?' हे विचारायला अभ्याला फोन केल्यावर सगळे काही तसेच असून तो आणि स्वधर्म चारच्या काही मिनिटे आधीच कट्टास्थळी पोचणार असल्याचे कळले,'वाडेश्वर' आणि 'पाताळेश्वर' मध्ये माझा झालेला संभ्रमही मिटला आणि 'वाडेश्वर' हे मंदिर/लेणी नसून 'रेस्टोरंट' आहे हे समजल्यावर माझा एक गोड गैरसमजही दूर झाला!
२१ तारखेचा पूर्ण दिवस बाहेर रहावे लागणार असल्याने तात्पुरते परावलंबित्व आलेल्या वडलांच्या मदतीसाठी भाच्याला बोलावून घेतले होते त्यामुळे सकाळी तो येईपर्यंत मला घराबाहेर पडणे शक्य नव्हते. नाईट ड्रायव्हिंग आता बंद केल्याने आपले वाहन घेऊन जाण्याचा पर्यायही बाद झाला होता आणि सकाळी निघायची नक्की वेळच माहिती नसल्याने रेल्वे किंवा बसचे बुकिंगही आधीपासून केलेले नव्हते. अचानक एकट्यानेच पुण्याला जायचा प्रसंग ह्याआधीही २-३ वेळा आला होता तेव्हा वापरलेला प्रवासाचा एक 'हायबब्रिड' प्रकार आताही वापरून दुपारी तीन-सव्वातीन वाजेपर्यंत पद्मावतीला राहणाऱ्या मामेबहिणीकडे जाऊन, कपडे बदलून कट्टास्थळी पोचतो असे अभ्याला सांगितले होते.
मी सांगितलेल्या वेळी पद्मावतीला पोचलो तर त्यावेळी तिथून जवळच असलेल्या बिबवेवाडीहुन अभ्या मला पिकअप करेल आणि मला पोचायला उशीर झाला तर मी रिक्षा किंवा कॅबने वाडेश्वरला येईन असे आमचे ठरले होते. कुमार सर पुण्याबाहेर असल्याचे माहिती असल्याने उद्या सकाळी निघण्याआधी मेसेज किंवा फोन करून त्यांच्या उपस्थितीविषयी विचारू असा विचार केला होता पण सकाळी सात वाजता त्यांचाच मेसेज आला आणि ते काल रात्री उशिरा पुण्याला परतल्याचे आणि कट्ट्याला येणार असल्याचेही कळले होते.
सी.एस.एम.टी. ते खोपोली थेट लोकल ट्रेनला बराच वेळ होता म्हणून कर्जतपर्यंत एक आणि कर्जतहून तिला कनेक्टेड दुसरी लोकल ट्रेन पकडून साडेबाराला खोपोलीला पोचलो. नेमके त्याच दिवशी महाराष्ट्रातल्या २००+ नगरपालिका/परिषदांचे निवडणूक निकाल जाहीर झाल्याने खोपोली स्टेशनबाहेर विजयी उमेदवारांच्या रस्ता अडवणाऱ्या मिरवणुकांमधून वाट काढत एकदाचा जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर आलो आणि एकाच प्रवाशासाठी आधी बसलेल्या बाकीच्या प्रवाशांचा खोळंबा करत थांबलेल्या वडापच्या फोर्स ट्रॅक्स क्रूझरने दीडच्या थोडेसे आधीच लोणावळा स्टेशनला पोचलो. आतापर्यंत सर्वकाही अपेक्षेप्रमाणे चालले होते पण इथून पुढे वेळेचे गणित बिघडण्यास सुरुवात झाली.
स्टेशनवर लोकल आणि एक्स्प्रेसची वेळापत्रके बघितली तर लोणावळा-पुणे लोकल २:५० आणि एक्स्प्रेस ३:१० ला असल्याचे दिसले. दीडेक तास तिथे थांबून राहण्यात काही अर्थ नव्हता म्हणून परत बाहेर येताना अभ्याला फोन करून मी लोणावळ्याला पोचलो असून आधी ठरलेल्या वेळेवर पद्मावती-बिबवेवाडीला पोचू शकत नसल्याचे कळवले. बाहेर पडल्यावर पी.एम.पी.एल.च्या निगडीहुन लोणावळा स्टेशनला नुकत्याच आलेल्या मिनीबसमधून उतरणारे प्रवासी आणि ड्रायव्हर-कंडक्टर दिसले. कंडक्टरकडे चौकशी केल्यावर त्याने अर्ध्या तासाने पुन्हा निगडीला जाणार असलेल्या ह्या बसनी भक्ती-शक्ती चौकापर्यंत जाऊन तिथून कात्रजमार्गे जाणाऱ्या ४२ क्रमांकाच्या बसने मला पद्मावतीला जाता येईल अशी माहिती तर दिलीच, वर सदर बस तळेगाव रेल्वे स्टेशन वगैरे करत फिरत फिरत जाणार असल्याने पोचण्याची घाई असेल तर लोणावळा एस.टी. स्टँडवरून स्वारगेटला जाणारी एखादी जलद बस पकडा किंवा हायवेवरून दुसरे कुठले वाहन मिळते का बघा असा चांगला सल्लाही दिला!
वरीलपैकी कुठलाही पर्याय निवडला तरी आपण चार वाजेपर्यंत कट्टास्थळी पोहोचू शकत नसल्याचे लक्षात आले होते पण ते म्हणतात ना, "कहते हैं अगर किसी चीज़ को दिल से चाहो... तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है" ह्याची प्रचिती येत स्वारगेटहून प्रवासी घेऊन आलेले एक रिक्षावाले काका 'स्वारगेट-शिवाजीनगर?... स्वारगेट-शिवाजीनगर?' असे विचारत शेजारी येऊन थांबले. वेळ महत्वाची असल्याने अजून कुठल्या पर्यायाचा विचार करत न बसता त्या रिक्षानेच पुण्यनगरीच्या दिशेने मार्गक्रमण सुरु केले.
लोणावळ्यातून बाहेर पडेपर्यंतचा प्रवास मात्र फारच कंटाळवाणा झाला. त्या संपूर्ण रस्त्यात ठिकठिकाणी निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांच्या मिरवणुकांत नाचणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांची बेशिस्त गर्दी, लांबलचक फटाक्यांच्या माळा वगैरेंमुळे रस्त्यावर वाहने कमी असूनही वाहतुकीचा खोळंबा होत होता, परंतु पूर्वी 'मिरवणूक आणि गुलाल' असे जे समीकरण होते त्यात झालेला एक मोठा बदल ठळकपणे जाणवला. आता राजकीय विजयी मिरवणुकांमध्ये उधळला जाणारा तथाकथित 'गुलाल' हा लालसर गुलाबी रंगाचा राहिला नसून त्यालाही उमेदवाराची धार्मिक पार्शवभूमी किंवा राजकीय विचारसरणीनुसार भगवा, निळा, हिरवा, पिवळा अशा विविध रंगछटा प्राप्त झाल्याचे खोपोली आणि लोणावळ्यात दिसले.
असो... रस्त्यात मधेच कुठेतरी बसलेल्या एका प्रवाशाला उतरवण्यासाठी रिक्षा वाकडेवाडी बस स्टँडवर थांबली असताना अभ्याचा कुठपर्यंत पोचलो हे विचारायला फोन आला. मी शिवाजीनगरला पोचलो असून आता आधी ठरवल्याप्रमाणे पद्मावतीला जाऊन मग डेक्कनला येतो असे त्याला सांगितल्यावर, मला इथून तिथे जाऊन परत यायलाच सहा वाजून जातील असे त्याचे मत पडले. आमच्या ह्या वार्तालापातले माझे बोलणे रिक्षावाल्या काकांनीही ऐकल्याने त्यांनी सुद्धा हेच मत मांडले आणि "मी तुम्हाला शनिवार पेठेत सोडतो, तिथून दुसऱ्या रिक्षेने तुम्ही डेक्कनला लवकर पोहोचाल" असा सल्ला दिला.
एकूणच माझे पुण्याविषयीचे भौगोलिक ज्ञान पुलंच्या भाषेत "ती पानपताची लढाई म्हणतात ती पुण्यात नक्की कुठेशी झाली हो?" अशा 'अगाध' वगैरे पातळीवरचे असल्याने आणखीन काही आगाऊपणा न करता निमूटपणे ह्या दोन 'माहितगार' मंडळींचे ऐकून त्याप्रमाणेच करायचे ठरवून शनिवार पेठेत एका रिक्षेतून उतरत समोरच्या दुसऱ्या रिक्षेत बसत 'कॉल लॉग'च्या अनुसार फायनली चार वाजून सदोतीस मिनिटे झाली असताना वाडेश्वरला पोचलो...
चॅप्टर ३ - "द नोबल पीपल ऑफ मिपा"
वर म्हंटल्याप्रमाणे ४:३७ला तुडुंब भरलेल्या रेस्टोरंटच्या बाहेरून कुमारसरांना मी अड्ड्यावर पोचलो असून धूळ-माती खात केलेल्या प्रवासातले कपडे इथे कुठे बदलता येतील हे विचारायला कॉल केल्यावर ते बाहेर आले आणि 'आधी आपण वॉशरूम कशी आहे ते बघू आणि मग काय ते ठरवू' म्हणाले. बाहेरून वॉशरूम बऱ्यापैकी मोठी वाटल्याने आपले काम होईल असे आधी वाटले होते पण तिची 'मल्टीपर्पज' अंतर्गत रचना आणि ओलेकच्च फ्लोरिंग बघितल्यावर ते अशक्य असल्याचे लक्षात आल्याने तो विचार बाजूला सारत सरळ गप्पांमध्ये रममाण झालेल्या मिपाकरांचे टेबल गाठले.
ह्याठिकाणी जमलेल्या मान्यवरांपैकी कुमार१, भक्ती आणि गिरीजा ह्यांना आधी प्रत्यक्ष भेटलो होतो आणि अभ्याशी गेल्या अनेक वर्षांपासून व्य.नि, व्हॉट्सअॅप, फोनवर संपर्कात होतो, अबा, स्वधर्म आणि रामचंद्र साहेबांना आधी फोटोत पाहिले होते त्यामुळे भक्तीताईंचे मिस्टर 'अतुल' आणि केवळ लेखनातून परिचयाचे असलेले 'चामुंडराय' हे प्रत्यक्षात किंवा फोटोत पाहिले नसलेले दोन चेहरे तेव्हढे माझ्यासाठी नवीन होते.
.
चॅप्टर ४ - "स्नॅक्स अँड लिकर चॉकलेट्स"
भक्तीताईंनी आणलेल्या पालकवड्या आणि तिळगुळाच्या वड्यांचा आस्वाद घेत गप्पांमध्ये रममाण झालेल्या ह्या सर्व मंडळींशी भेट झाल्यावर कुमारसरांच्या सूचनेप्रमाणे प्रत्येकाने आपली छान ओळख करून दिली ज्यातून इथे जमलेले सगळे मिपाकर वेगवेगळ्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत असल्याचे समजले आणि प्रत्येकाच्या बोलण्यात आलेल्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी थेट रिलेट होता आल्याने नव्याने भेटलेल्या सर्वांशी सूरही पटकन जुळले.
एकीकडे वेगवेगळ्या विषयांवरील गप्पांना सुरुवात होत असताना दुसरीकडे अभ्या आणि अबाचे ऑर्डर काय द्यायची ह्या गहन विषयावर एकमत होऊन ती दिली जात असताना चामुंडराय साहेबांनी एका सुंदरश्या पिशवीतून आणलेली 'लिकर चॉकलेट्स' प्रत्येकाला द्यायला सुरुवात केली. एकतर 'व्हाईट असो कि डार्क', चॉकलेटचा कुठलाही प्रकार मला प्रचंड आवडतो, त्याला लिकर चॉकलेट अपवाद असूच शकत नाही. परंतु ते खाल्ल्यानंतर उफाळून येणारी पुढची 'तृष्णा' कट्ट्याच्या ठिकाणी शांत होणे अशक्य असल्याने ते आत्ता खाऊ कि नको अशा विचारात पडल्याने आधी बराचवेळ हातात धरून ठेवले होते आणि नंतर सँडविच संपेपर्यंत समोरच्या प्लेटमध्येच ठेवले होते ते चहा प्यायल्यानंतर तोंडात टाकून कचाकच चावून त्यातले 'गर्भीत द्रव्य' चवीने अनुभवले आणि पुन्हा गप्पांमध्ये सहभागी झालो...
चॅप्टर ५ - "फ्री डायलॉग"
एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असे वेगवेगळे विषय निघत होते आणि त्यावर माहितीपूर्ण परिसंवाद घडत होते. मध्येच रेस्टोरंटमध्ये नव्याने प्रवेशकर्ता झालेला कोणी उभ्या उभ्या इकडेतिकडे बघताना दिसला की "हा कोणी उशिरा पोचलेला मिपाकर असावा काय" असा प्रश्न उपस्थित व्हायचा आणि ऐनवेळी धागा वाचून अचानक कोणी पुण्यातला मिपाकर ४ ते ६ ह्या कट्ट्याच्या ठरलेल्या वेळेत हजर होण्याची शक्यता असल्याने सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळायच्या. बाकी 'येऊ शकतो' असे कळवलेले एक 'किल्लेदार' तेवढे अजून आलेले नव्हते पण ते उशिरा आले, आणि चेहरे अनोळखी असले तरी Gucci Flora चा सुगंध ओळखणारा हा 'गंधप्रेमी' मिपाकर बरोब्बर कट्टेकऱ्यांच्या टेबलला येईल ह्याची खात्री होती!
बँकिंग प्रणालीतला AI चा वापर, कॉम्प्रेसर, पंपिंग सिस्टम्स, वाहन आणि त्यासाठी लागणाऱ्या सुट्याभागांचा निर्मिती उद्योग आणि त्यावर आधारित ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था, पवनचक्क्या, त्यांची देखभाल, एक्स्प्रेस ग्रुप अशा अनेक विषयांच्या जोडीला एवढे मिपाकर एकत्र जमलेत म्हंटल्यावर मिपाचा, तिथल्या लेखनाचा, तांत्रिक समस्यांचा विषय निघाला नसता तरच नवल होते.
विषय भरपूर होते पण त्यावरच्या 'बैठ्या' चर्चेसाठी वेळ मात्र कमी पडला...
चॅप्टर ६ - "द वॉकवे चॅट्स"
एकतर रविवारची संध्याकाळ, त्यात तिथून जवळच सुरु असलेल्या पुस्तक महोत्सवाचा अखेरचा दिवस असल्याने पुणेकर आणि खास तिथल्या प्रदर्शनासाठी लांब-लांबच्या ठिकाणांहून आलेल्या वाचनप्रेमींची तुफान गर्दी, असे असूनही मिपा कट्ट्यासाठी चार ते सहा अशा दोन तासांसाठी दोन टेबले वाडेश्वरच्या मालक/व्यवस्थापकांकडून मिळवण्यात स्वधर्म साहेबांनी यश मिळवले हे फार आश्चर्यकारक आणि कौतुकास्पद आहे!
कट्ट्यासाठी आम्हाला मिळालेली वेळ संपली होती आणि बाहेर टेबल रिकामे होण्याची प्रतीक्षा करत उभ्या असलेल्या ग्राहकांची गर्दीही दिसत होती त्यामुळे 'आता उठा' असे खास पुणेरी शैलीत कोणीतरी सांगायला यायच्या आत आम्ही सगळेजण बाहेर पडलो. त्यानंतरच्या फोटोसेशन बद्दल अभ्याने आधीच लिहिले असल्याने पुनरावृत्ती टाळतो.
कट्ट्याला खूप मजा आली. आतमध्ये बसून झालेल्या गप्पांना विषय भरपूर असले तरी वेळ मात्र कमी पडल्याने आत अर्धवट राहिलेल्या आणि काही नवीन विषयांवर बाहेर उभ्या उभ्या गप्पासत्र सुरु झाले. अख्ख्या कट्ट्याचे 'फलित' ह्या गप्पासत्रात सामावलेले आहे ते म्हणजे अबांनी म्हणजेच अमरेंद्र बाहुबली ह्यांनी ते आता राजकीय चर्चांमध्ये भाग घेत नसून आता ललित लेखनावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले, हे खूपच आनंददायक आहे!
चॅप्टर ७ - "लिव्हिंग द व्हेन्यू - द नेक्स्ट स्टेप"
आप-आपली डेस्टिनेशन्स योग्यवेळी गाठण्यासाठी 'आता मात्र निघालेच पाहिजे' असे फर्मान एकेकांच्या मेंदूकडून येईपर्यंत सुमारे सव्वा ते दीड तास हे 'खडे' गप्पासत्र चालले. शेवटी अबा आणि रामचंद्र साहेब मंडईच्या दिशेने आणि मी आणि अभ्या त्याच्या बुलेटवरून पद्मावतीच्या दिशेने निघालो. रेस्टोरंटपासून पद्मावतीपर्यंतचा रस्ता ह्या माजी पुणेकराला माहिती नसल्याने एखाद दोन किलोमीटर नंतर एके ठिकाणी गुगल मॅप सुरु करावा लागला तेव्हा त्यावर पुढे नऊ किलोमीटरचा प्रवास असल्याचे दाखवत होते. बुलेटच्या आणि आजूबाजूच्या रहदारीच्या आवाजावर ताण करत आमच्या काही वेगळ्याच विषयांवर गप्पा सुरु असल्याने माझे फोनकडे लक्षच नसायचे आणि बहुतेक ओलांडलेल्या प्रत्येक वळणानंतर मॅपला री रूट करून दाखवावे लागत होते. आपणही आपल्या को-ड्रायव्हर/रायडरवर मॅप कडे लक्ष नसल्याबद्दल वैतागतो पण असे वागणे किती चुकीचे आहे ह्यावर आमचे दोघांचे एकमत झाले.
घरी पोचायला मध्यरात्र/पहाटेचे किती का वाजेनात मला त्याची काही पर्वा नव्हती पण... "दुपारी तीन-सव्वातीन पर्यंत तुझ्याकडे येतोय" असे काल रात्रीच सांगून ठेवल्यामुळे अजून वाट बघत बसलेल्या मामेबहिणीकडे पाच मिनिटांसाठी का होईना पण तोंड दाखवून मग स्वारगेटहून ठाण्याला जाणाऱ्या शिवनेरीने परतीच्या प्रवासाला लागायचे होते...
चॅप्टर ८ - "माइल्स बिटवीन, मेमरीज विदीन"
माझ्यासारखा होपलेस नेव्हीगेटर लाभल्याने पद्मावती पर्यंतच्या प्रवासाला गरजेपेक्षा किमान १५ मिनिटांनी तरी जास्त वेळ खर्ची पडला त्यामुळे सिटी प्राईडच्या समोर पोचल्यावर तिथून रस्ता माहितीचा असल्याने बहिणीला फोन करून "आता वर यायला वेळ नाही तेव्हा तूच खाली सोसायटीच्या गेटवर ये आणि मला स्वारगेटला सोडायला भाच्यालाही बरोबर घेऊन ये" असे सांगितले.
गेटच्या जवळच सुमारे दहा-बारा मिनिटे उभ्या-उभ्याच वार्तालाप झाल्यावर तिने घरी द्यायला दिलेले कसलेतरी पार्सल सॅक मध्ये टाकत एकमेकांचा निरोप घेऊन अभ्या त्याच्या मुक्कामाच्या दिशेने आणि मी आणि भाचा स्वारगेट्च्या दिशेने मार्गस्थ झालो. शेवटची शिवनेरी साडे दहाची होती आणि स्वारगेटला पोचलो तेव्हा वाजले होते पावणे नऊ. पुण्याच्या हवेत भूकही रोजच्यापेक्षा लवकर लागण्याची चिन्हे जाणवू लागली होती, मग आहे वेळ हातात तर आधी जेवून घेऊ आणि मग निघू असा विचार करून भाच्याला मला समोरच्या 'नटराज'मध्ये सोडायला सांगून घरी पाठवून दिले.
नटराजमध्ये स्थानापन्न झालो. चामुंडरायांच्या लिकर चॉक्लेटमुळे 'शेर के मुह मी खून तो लग ही गया था' मग तृष्णाशांती साठीची ऑर्डर दिली आणि "साडे दहापर्यंत इथून निघून दोन-अडीच वाजेपर्यंत येतो" असे कळवायला घरी फोन केला तर कशाला एवढ्या लेट येतो त्यापेक्षा उद्या सकाळी उठून ये आरामात, मी थांबतो तू येईपर्यंत असे भाच्याने सांगितल्यावर "बघतो इथून निघायला किती वाजतात ते कंटाळा आला तर मग उद्या येतो." असे सांगून फोन ठेवला.
हेडसेटवर आवडीची गाणी ऐकत व्होडकाचे दोन पेग्ज आणि त्यानंतर मस्तपैकी जेवण होईस्तोवर सव्वा दहा वाजले होते. आता मात्र प्रवासापेक्षा आराम हवासा वाटू लागल्याने इथेच रूम घेऊन ताणून द्यावी आणि उद्या सकाळीच निघावे असे ठरवले. त्यांच्याकडे रूम उपलब्ध नसल्याने व्यवस्थापकानेच सुचवलेल्या जवळच्याच हॉटेल अवंती मध्ये मुक्काम ठोकला.
रुमध्ये आराम चांगला मिळाला पण पहाटेपर्यंत झोप काही लागायला तयार नव्हती. पहाटे साडेपाचच्या सुमारास मिपावर एक प्रतिसाद दिला त्यानंतर कधीतरी झोप लागल्यावर डायरेक्ट सकाळी साडे-दहालाच उठलो. अकराच्या सुमारास चेक-आऊट करून न्याहारीसाठी नटराजच्या दुसऱ्या सेक्शनमध्ये आलो. तिथे चहा-नाश्ता उरकून स्वारगेट स्टँडवर आलो तर कळवामार्गे ठाण्याला जाणाऱ्या शिवनेरीला अजून वीस-पंचवीस मिनिटे बाकी असल्याचे कळले. त्याआधी खोपोली किंवा कर्जत अशा सेंट्रल लाईनवरच्या स्टेशनजवळ जाणारी कुठली बस आहे का अशी चौकशी केल्यावर जुन्या हायवेवरून खोपोली फाटा मार्गे पालीला जाणारी बस मागच्या बाजूला लागल्याचे समजले.
मागे जाऊन बघितले तर खरंच बस उभी होती आणि बऱ्यापैकी रिमामी असल्याने विंडोसीटही मिळाली. धुरंधरचे 'इष्क जलाकर' हे गाणे रिपीट मोडवर ऐकत, खिडकीतून बाहेरची दृश्ये बघत प्रवास मजेत सुरु होता. कासारवाडीला 'अॅटलास काँपको आणि अल्फा लवल' ह्या कंपन्या दृष्टीस पडल्यावर काल संध्याकाळी चामुंडराय, रामचंद्र, अभ्या आणि अबाच्या बोलण्यात ह्या दोन कंपन्यांचा स्पष्ट नामोल्लेख आला असल्याने कट्ट्यावरच्या गप्पांची क्षणचित्रे डोळ्यांसमोर तरळू लागली आणि घरी पोहोचल्यावर देखील त्यात खंड पडला नाही...
2 Jan 2026 - 1:14 am | स्वधर्म
टर्मिनेटर यांनी काय काय प्रयास केले आहेत हे थोडक्यात कट्ट्याच्या टेबलावर कळले होते, पण हे इतके सारे करून हा माणूस केवळ मिपाकरांना भेटण्यासाठी इतके कष्ट घेतो हे वाचून अक्षरश: थक्क व्हायला झाले. बरं कट्ट्याचा वृत्तांतही अगदी तपशीलवार, की ज्यांना जमले नाही त्यांना वाटावे खरंच आपणसुध्दा जमवायला हवे होते.
टर्मिनेटर भाऊंना दं ड व त _/\_