तेरी नजरो से आज नजर मिलाना चाहती हुं....

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
22 Dec 2025 - 5:58 pm

दार लाव गं जरा... गोपिकाबाई करवादतात. त्यांना स्वतःलाच त्याचा आवाज परका वाटतो. कुठूनतरी दुरुन आल्यासारखा , कोणातरी दुसर्‍याचाच.
इतका परका की त्यानाच कोणीतरी दार लावायला सांगितले असावे असा. क्षणभर अचंभीत व्हायला होते. कोण आलंय या वेळेला म्हणून त्या इकडे तिकडे पहातात.
खोलीमधे एक टेबल. त्यावर पाण्याचा जग. सभोवताली औषधांची पिलावळ. गोपीकाबाईना ती औषधाची बाटली आनि तीच्याभोवती असलेल्या छोट्या बाटल्या पाहून उगाचंच जीवतीची आथवण होते.असेच असते ना जीवती मातेचे चित्र. एक स्त्री पिलाबाळांनी लगडलेली. फणसाच्या झाडाला फणस लगडलेले असावे तशी पोरे तीच्या अंगाखाड्यावर लगडलेले असतात. पायाला घट्ट मिठ्या मारलेली दोन. कडेवर एक उजव्या डाव्या हाताला लोंबकळणारी एक दोन. खांद्यावर एक आणि पदराला झोंबणारी एक दोन. पंधरा वीस तरी असतील. कसं काय जमत असेल ना त्या जीवतीला इकते सगळे लेंढार सांभाळायला. बिच्चारी.... गोपिकाबाईना जीवतीमातेची दया येते.
त्या स्वतःशीच विचार करायला लागतात. आपली अशी परिस्थिती असती तर? नुसत्या कल्पनेनेच अंगावर शहारा येतो. इतकी सगळी मुले त्याम्ना सांभाळायचे. त्यांचे हागणे मुतणे धू पूस पहायची. खाणेपिणे साम्भाळायचे दिवसभर अंगाचा नुसता पिट्ट्या पडत असेल. त्या शिवाय घरच्यांचा स्वयंपाक वगैरे करून जीव शिणून जाणार. झोपताना अंगात त्राण आहे की नाही प्रश्न पडणार. आणि हे कमी की काय म्हणूण जरा कुठे दमून झोपावे म्हंटले की आहेच नवर्‍याचा अधिकार ... इच्छा असो की नसो.... त्याला सामोरे जायचेच. इच्छा कसली असणार. तिटकाराच म्हणायला हवे. दमलेल्या शरीराला विश्रांती हवी असते. मनाचा विचारच करायचा नाही. इच्छेविरुद्ध काहीही केले की त्याला बळजबरी म्हणतात. श्रुंगार नाही म्हणत. नवर्‍याने केलेल्या बलात्काराला श्रुंगार तरी कसे म्हणायचे. आपल्या पिढीतल्या कितीतरी बायका. त्यांच्या मनात असायचे की नाही कोण जाणे. मुळात त्याकाळी लग्नेच कितीतरी लहानपणी व्ह्यायची. सातव्या आठव्या वर्षी, नहाण यायच्या आतच सगळे शरीराचे सोपस्कार झालेले असायचे.
जे घडतेय त्याला काय म्हणतात हे माहीत व्हायच्या अगोदरच ते घडून गेलेले असायचे.
बारा चौदाव्या वर्षी अक्कट दुक्कट खेळायच्या वयात कडेवर मूल असायचे. काहीजणी तर मूल कडेवर घेऊअन्च उड्या मारायच्या.
त्या सगळ्या आठवणी गोपिका बाईंच्या नजरेसमोरून तरळून गेल्या. नको असलेला पाऊस अंग भिजवून जातो. तुम्ही चरफडण्याशिवाय काही करू शकत नाही. पावसाला चार शिव्या हासडणे इतकेच काय ते तुमच्या हातात. असते. नवर्‍याने शरीराचा भोग घेतल्यावर तो नामानिराळा होतो. आणि एका कुशीवर पहुडतो. तेंव्हा तुम्ही दुसरे तरी काय करता. पाऊस धरतीत बियाणे रुजवून जातो. नवरा तुमच्या शरीरात. बियाणे अंकुरते तेंव्हा सगळे पावसाला दुवा देतात. वैशाख वणव्याने धरित्री आसुसलेली असते तेंव्हा आलेला पाऊस धरीत्रीलाही सुखावून जातो. पण भाद्रपदातला पाऊस नको असताना आलेला धरित्रीला तीच्यातील उगवणीला मारकच होतो. तो निदान भाद्रपदात तरी येतो. बायकांच्या नशीबी मेला सदा न कदा भाद्रपदच असतो त्या बाबतीत. वैशाख वणवा वगैरे चित्रपटातच. परवा तो चित्रपट लागला होता त्यातली ती नटी प्रियकराला आर्त साद घालत होती. कितीतरी दिवस झाले तू आला नाहीस. वाट पहातेय रे सखया तुझी मी. ये ना रे. या मातीला सुगंध लाभेल. तुझ्यामुळे मी बहरेन. फुलेन. फुलाला येईन. वाटले की जन्मभराची गुलाम होऊ नकोस. सूख तरी कशासाठी म्हणायचे त्याला. अंग अंग पार चिरडून जाते त्या घुसमटात. वेदनेने शरीर पार पिळवटॄन जाते. आगीचा डोंब उठतो ओटीपोटातून. ओरडायची चोरी , रडायची चोरी. आणि त्याला सूख म्हणायचे? हे म्हणजे बकरीने मानेवर फिरणारी खाटकाची सुरी, गुदगुल्या करते असे म्हणण्यासारखे आहे. बाई तुझा जीवच जातो त्यात.
आता ओरडणार कुणाला. त्या चित्रपटातील मुलीला तीचा तो सैंय्या की बलमा, आकाश दाखवणार आहे ,चंद्र तारे दाखवणार आहे. तीच्या ओठावरचे अमृत त्याला जीवनदान देणार आहे म्हणे. तोंड बघ ग त्याचे. त्याला स्वतःचा शर्ट हाताने घडी करता येत नाही. त्याच्या आईला शिलाई मशीनवर बसून शिवणकम करावे लागते तेंव्हा कुठे तीची चूल पेटते. जो स्वतः दोन वेळचे कमवून आणत नाही. जो स्वतःच्या आईला म्हातारपणीही कष्ट करायला लावतो तो कसला आणून देणार तुला चंद्र आणि तारे. लाथ मारेन तिथे पाणी काढेन अशी जिद्द ठेवायला हरकत नाही पण ती लाथ मारण्यासाठी स्वतःचे पाऊल स्वतःच उचलावे लागते हे त्याला समजावून सांग जरा.
इतके सगळे मनातल्यामनात बोलूनही गोपीकाबाईना शोष पडतो. टेबलावरचा तांब्या घेण्यासाठी त्याना उठावे लागते. आतशा तांब्याही जवळ हाताला येणार नाही इतक्या दूर ठेवतात हे लोक. त्या मनातल्यामनात चरफडतात. हात लांबवून ताम्ब्या घ्यायचा प्रयत्न करतात. तसे करताना ताम्ब्या शेजारी ठेवलेले फुलपात्र हाताच्या धक्क्याने खाली पडते. घरंघळत दूरवर जाऊन स्थिरावते. थरथरत्या हातानीच त्या ताम्ब्या उचलतात. त्यातले घोटभर पाणी पितात. तांब्या पुन्हा जागेवर ठेवतात. खरेतर तो फेकून द्यावा असे वाटतंय पण जमत नाही. सगळ्या जगावर राग काढावा असं वाटतंय.पण ते शक्य नाही. जगावर राग काढून जाणार तरी कुठे. उद्या पाणी द्यायला जनाबाई येणार , तीच्यावर राग काढला की ती पाणी वेळेत देणार नाही. सकाळी स्पंजिंग करायला येणारी सिस्टर मापालीसा. गोड मुलगी आहे . तीच्या कडे पाहिले की रागवावेसेच वाटत नाही. चुणचुणीत आहे. औषध घेतले नाही की रागावते. तक्रार करते. मग गोळ्या मोजून काढून ठेवते.
आणि गोड हसते. सावळीच आहे पण काळेभोर डोळे काजळ घातलेले रेखीव , हसली की तीचे डोळे आणि आणि पांढरेशुभ्र एका रेशेतले दात एकदमच चमकतात. एकदम भुलून जायला होते.गोकुळातला तो सावळा कृष्ण हसल्यावर गोपीकांना असेच होत असेल नाही.
गोपीकाबाई चमकतात. त्याना स्वतःच्या त्या कृष्णाच्या उपमेचे हसू येते. आता आपल्याला सगळीकडे कृष्णच दिसायला लागलाय. काय तर म्हणे त्या मापालीसाचे हसणे कृष्णासारखे आहे.
काय हरकत आहे . जे चांगले ते चांगले म्हणायला.
कृष्णाच्या आठवणीने गोपीकाबाईंचा मघाचा तो राग कुठे नाहीसा झाला. कृष्ण आपला बाळकृष्ण. लहान होता त्याचे ते मऊसूत जावळ गोबरे गाल इतके गोबरे की नाक आणि डोळेसुद्धा झाकले जायचे त्याने. त्याला पहिल्यांदा पाहिले तेंव्हा हसूच आले होते. तो दोन वीताचा जीव पाहून एकदम गलबलून आले. हा इवलासा जीव आपल्या देहात वाढला. आपलाच अंश. पहिल्यांदा तर हातात घ्यायचीही भीती वाटली होती. न जाणो आपल्या हातानेही त्याच्य नाजूक त्वचेला खरचटंचायचं.
मग जेंव्हा त्याच्या हाताचा स्पर्ष झाला. त्याची इवलीशी बोटे. त्या बोटानी आपले बोट मुठीत घट्ट धरले होते. हरखून गेलो होतो आपण.कितीतरीवेळ पहातच राहिलो त्याच्याकडे. मग तोच हसला आपल्याकडे पहात. भास होता की काय माहीत नाही. पण आपल्याला वाटले की त्या जीवाला आईची ओळख पटली. कितीतरी जन्माची ओळख असावी तसे ओळखीचे हसू. अर्ध्या तासापूर्वी झालेल्या त्या सगळ्या मरणप्राय प्रसव वेदनांचा विसर पडला तोंडाचे बोळके दाखवणार्‍या निष्पाप हसण्याने. जणू माझाच जन्म झाला असावा असे वाटले. डोळ्यातून अश्रुंच्या धारा लागल्या होत्या. अनहद असा एक नाद असतो म्हणे. देवांच्या वाद्यांचा. कशावरही आघात न करता हा नाद होतो. तसा नाद कुठेतरी उमटला. तो तसा अनुभव येत असेल तर काहीही करायला तयार होऊ आपण.
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

22 Dec 2025 - 6:00 pm | विजुभाऊ

शेवटचे वाक्य असे वाचावे

तो तसा अनुभव येत असेल तर काहीही करायला तयार होऊ आपण

विजुभाऊ's picture

27 Dec 2025 - 11:55 pm | विजुभाऊ

पुढचा दुवा https://www.misalpav.com/node/53380