तिकोना-फोटोवारी

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
10 Oct 2025 - 12:39 pm

नमस्कार मंडळी
ऑफिसच्या कामाने वैतागलेला मी आणि कॉलेजच्या अभ्यासाने वैतागलेला माझा मुलगा बरेच दिवसापासुन कुठेतरी बाहेर पडायचा प्लॅन करत होतो. पण आज काय घरात साफसफाई, उद्या नवरात्र, परवा पाउस बदाबदा कोसळतोय अश्या कारणांनी ते राहुनच जात होते. पाय उंबरठागड ओलांडायला वळवळत होते. पण मूहूर्त लागत नव्हता. शेवटी एका शनिवारी ठरवले की आता बास, उद्या निघायचे म्हणजे निघायचेच. रविवारी सकाळी साखरझोपेवर मात करुन क्लास आणि भाजी आणणे वगैरे कामे उरकुन आरामात का होइना पण ९ वाजता निघालो. वाटेत जुन्या हायवेला देहुरोड टोल ओलांडुन एका हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि भरल्या पोटाने पुढे चाल केली. कामशेतजवळ डावीकडे वळुन काळे कॉलनीचा रस्ता धरला. लवकरच काळे कॉलनी ओलांडुन वळणावळणाचे रस्ते लागायला लागले आणि प्रथम तुंग चे दर्शन झाले. पण आमचा आजचा प्लॅन तिकोनाचा होता. त्यामुळे तुंगला दुरुनच राम राम केला आणि पुढे झालो. वाटेत बेडसे लेण्यांची पाटी लागली पण उन व्हायच्या आत किल्ला बघु म्हणुन तो मोह टाळुन पुढे निघालो. वाटेत गावातली दोन मुले भेटली त्यांना लिफ्ट दिली. गप्पा मारताना सहज विचारले की बामणोली वरुन तुंग ला जायला लाँच चालु आहे का? पण त्यांना काहीच माहीत नव्हते त्यामुळे तो नाद सोडला. अर्थात ही १५ वर्षांपुर्वीची गोष्ट होती जेव्हा मी तुंग तिकोना जोड ट्रेक केला होता. त्या आठवणी मनात घोळवत तिकोनापेठला पोचलो. मुलांना उतरवले आणि गाडी डावीकडे आत घेतली. गावात काहीतरी भंडारा वगैरे चालु होते त्यामुळे जरासे ट्रॅफिक लागले पण ते लवकरच सुटले आणि निघालो. पायथ्याशी बरीच छोटी हॉटेल्स झाली आहेत आणि त्यांनी पार्किंगचा धंदा सुरु केला आहे. अशाच एका ठिकाणी गाडी लावली आणि आल्यावर झुणका भाकर खाउ असे सांगुन निघालो.

a

सरता पावसाळा असल्याने मस्त फुले उमलली होती. तेरडा, सोनकी, मिकी माउअस,माका आणि काही अनोळखी सुद्धा
a

थोडे वरती आलो आणि विरुद्ध बाजुला एक डोंगरची सोंड धावत गेलेली दिसली. त्या बाजुने थोडे पुढे चालत गेलो पण नंतर रस्ता गवतात हरवल्याने अंदाज येत नव्हता, म्हणुन उगाच स्टंट करत बसण्यापेक्षा परत फिरलो.
a

a

अजुन वरती आलो. उजवीकडे पवना धरणाच्या काठाचे तंबु दिसत होते. आणि मस्त बॅकवॉटर सुद्धा. अजुन उनाचा तडाखा जाणवत नव्हता चक्क.
a

आता एक मारुती मंदीर लागले. त्याला चपेटदान मारुती असे मजेशीर नाव होते. आजुबाजुला भरपुर माकडेही होतीच.
a

a

मला हे सरत्या पावसाळ्यातले ट्रेक फार आवडतात. एकतर सगळी कडे गवत आणि फुले असतात. त्याचा एक मस्त वास आसमंतात असतो. सरडे, साप, फुलपाखरे, खेकडे, पक्षी, गोगलगायी असे काय न काय बघायला मिळते. जुन्या आठवणी जाग्या होतात. ते लोकल आणि एस टीचे प्रवास , बसच्या शेवटच्या सीटवर बसुन घसा खरवडुन गाणी म्हणत म्हणत धुळीने माखुन कुठल्यातरी गावात उतरणे, मग तिथला किल्ला बघुन गुहेत किवा देवळात मुक्काम, रात्रीची चूल पेटवुन खिचडी किवा एखाद्या घरात भाजी भाकरी. मग पुढचा प्रवास, ३-४ दिवसानी रेंज ट्रेक करुन घरी येताना उन्हाने काळवंडलेले चेहरे,खांद्यावर रोप,सॅक, कधीतरी कंबरेला कॅराबिनर, डिसेंडर वगैरे लोंंबताहेत. सॅकमध्ये कुठुन कुठुन आणलेली मश्रुमस, दगड आणि काय काय. अशा अवतारात आलो की आई पहीले म्हणणार पहीले बाथरुम मध्ये जा आणि सगळे कपडे सॅक सकट धुवायला टाक आणि तुही स्वच्छ होउन ये. घरात घाण करु नकोस. मग पुढची काही दिवस जे लोक ट्रेकला येउ शकली नाहीत त्यांच्यासमोर मुद्दाम ते विषय काढुन त्यांना जळवणे वगैरे वगैरे. गेले ते दिवस.......
a

विचारातच वरती आलो आणि तळे आणि गुहा लागली. ईथे एक स्वामीजी बहुतेक नाथपंथी असावेत, राहतात. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या आणि पुढे झालो. वाटेत चुन्याची घाणी लागली. नुकताच दसरा होउन गेल्याने छान फुले वगैरे वाहीलेली दिसत होती.
a
आता बालेकिल्याचा चढाईचा मार्ग सुरु झाला.
a

पाठी पवनेचे बॅकवॉटर
a

a

किल्ल्यावर बरेच अवशेष टिकुन आहेत. बुरुज, जंग्या, तटबंदी ,दरवाजे वगैरे
a

पाण्याचीही भरपूर सोय आहे. खांबटाकी, जोड टाकी, दुहेरी टाकी(एकात एक) आहेत.
a

a

a

वरती आलो आणि मंदिरात बसलेल्या मावळच्या देवाचे दर्शन घेतले. याने मागच्या काही शतकांपासुन जे बघितले ते सांगायला सुरुवात केली तर? असा एक मजेशीर विचार मनात आला
a

मंदिरातुन दिसणारे मावळ खोरे. मनात गाणॅ गुणगुणु लागलो "ही शांत निजे बारा मावळ पेठ, शिवनेरी जुन्नर थेट"

a

गडाची वैशिष्ट्यपुर्ण तटबंदी
a

तिकोन्याच्या टोकावरुन समोर दिसणारा, पवनेच्या पाण्यात प्रतिबिंब पाहणारा तुंग
a

a

तलाव
a

पॅनोरमा फोटो

a

आता भुकेची जाणॅएव होउ लागली होती म्हणुन आवरते घेतले आणि खाली निघालो. समोर दिसणारा वेगळ्या कोनातला तुंग
a

झुणका भाकरी खाल्ली आणि बेडसे लेण्यांकडे मोर्चा वळवला. हाशहुश करत पायर्‍या चढलो कारण आता उन झाले होते.
a

कॉलिंग प्रचेतस
a

a

स्तूप आणि हर्मिका(?)
a

a

a

a

ही एक मूर्ती ह्या सगळ्या डिझाईनमध्ये विसंगत होती, गरबा खेळणार्या माणसा सारखी, पण कारण कळाले नाही.

a

एक स्तूप अर्धवट सोडला होता.
a

३ वाजत आले होते. पण मन भरत नव्हते. तुंग ला जाण्याएव्ह्ढा वेळ हातात नव्हता. त्यासाठी सकाळी ६ ला निघावे लागेल असे मनाला बजावुन शेवटी नाइलाजाने काढता पाय घेतला. खाली उतरलो. हायवेला चहाचा थांबा घेतला आणि घरचा रस्ता पकडला.(समाप्त)

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

10 Oct 2025 - 2:07 pm | चौथा कोनाडा

सुंदर सुंदर निसर्ग दृष्यांची नयनरम्य मेजवानी !
तिकोन्याचे प्रचि झकास !
,,, आणी बेडसे लेणींचे फोटो खासच !


मला हे सरत्या पावसाळ्यातले ट्रेक फार आवडतात. एकतर सगळी कडे गवत आणि फुले असतात. त्याचा एक मस्त वास आसमंतात असतो. सरडे, साप, फुलपाखरे, खेकडे, पक्षी, गोगलगायी असे काय न काय बघायला मिळते. जुन्या आठवणी जाग्या होतात. ते लोकल आणि एस टीचे प्रवास , बसच्या शेवटच्या सीटवर बसुन घसा खरवडुन गाणी म्हणत म्हणत धुळीने माखुन कुठल्यातरी गावात उतरणे, मग तिथला किल्ला बघुन गुहेत किवा देवळात मुक्काम, रात्रीची चूल पेटवुन खिचडी किवा एखाद्या घरात भाजी भाकरी. मग पुढचा प्रवास, ३-४ दिवसानी रेंज ट्रेक करुन घरी येताना उन्हाने काळवंडलेले चेहरे,खांद्यावर रोप,सॅक, कधीतरी कंबरेला कॅराबिनर, डिसेंडर वगैरे लोंंबताहेत. सॅकमध्ये कुठुन कुठुन आणलेली मश्रुमस, दगड आणि काय काय. अशा अवतारात आलो की आई पहीले म्हणणार पहीले बाथरुम मध्ये जा आणि सगळे कपडे सॅक सकट धुवायला टाक आणि तुही स्वच्छ होउन ये. घरात घाण करु नकोस. मग पुढची काही दिवस जे लोक ट्रेकला येउ शकली नाहीत त्यांच्यासमोर मुद्दाम ते विषय काढुन त्यांना जळवणे वगैरे वगैरे. गेले ते दिवस.......

हे तर खासच .. असेच काही क्षण कधीमधी अनुभवलेला मी !

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Oct 2025 - 2:46 pm | अमरेंद्र बाहुबली

खूप छान! सुंदर फोटो नी भ्रमंती!

अनन्त्_यात्री's picture

10 Oct 2025 - 3:09 pm | अनन्त्_यात्री

सुंदर प्र चि आणि लेखन.

विशेषतः मिपावरील "भटकंत्यांचे" सर्वमान्य गुणविशेष ( नाश्त्याचे फोटू, सहकुटुंब सहपरिवार सुहास्य पोज, संस्कृत_व्यासंग_दर्शन इ. इ...) नसल्याने खास आवडले.

अभ्या..'s picture

10 Oct 2025 - 3:39 pm | अभ्या..

अगगागा,
फारच जुन्या जीर्ण पंच्याला हात घातलात.
सोबत बालकवींच्या हरितत्रुणाची पखरण, तुडुंब देशप्रेमाचे मावळेपण टाईमटीबलांचे मटकाचार्ट आणि पाहून वाहून घेतलेली फुले राहिली.

इकडे जाऊन वीस वर्षे झाली.

गेलो होतो आकाशदर्शन होते का पाहण्यासाठी. पण हायवेच्या वाहनांचे दिवे आणि कामशेत गावातील लखलखाट यामुळे बारीक तारे दिसले नाहीत.रात्री गडावर एकटाच होतो. चंद्र दहाला उगवला.छान उजेड पडला आणि धरणाच्या पाण्यात पाय सोडून बसलेला तुंग डोंगर खुणावत होता.

पाय उंबरठागड ओलांडायला वळवळत होते.

... हं.
पॅनोरमा फोटो भारी आला आहे. फुलांचे फोटोही आवडले. मिनी भटकंती आवडली.

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Oct 2025 - 11:21 pm | राजेंद्र मेहेंदळे

सर्व वाचकांचे धन्यवाद

प्रचेतस's picture

13 Oct 2025 - 11:44 am | प्रचेतस

मस्त फोटोवारी.
माझ्यादेखील तुंग तिकोन्याच्या आठवणी जाग्या झाल्या. आदल्या दिवशी तिकोना पेठेत रात्री मुक्काम करुन सकाळी लाँच पकडली आणि तुंग केला. येताना परतीची लॉंच पकडण्यासाठी पळत पळतच पोहोचावे लागले होते. आता वाहतुकीची साधने देखील भरपूर आहेत आणि गाड्या थेट तुंगच्या पायथ्यापर्यंत जातात. तिकोन्यावर तर खूपच सुधारणा आहेत.

गोरगावलेकर's picture

13 Oct 2025 - 5:38 pm | गोरगावलेकर

तिकोना पहिला नाही पण आपल्या फोटोंमधून त्याचे सुंदर दर्शन झाले . या ४ -५ वर्षात बेडसे लेणीला दोन वेळा भेट दिली होती, त्या आठवणींना उजाळा मिळाला .

सुरेख भटकंती ! हिरवाई, निसर्ग सौंदर्य, ऐतिहासिक स्थळं या सर्वांनीच भुरळ पाडली. डिसेंबरमधील भारतवारीत तिकोना-बेडसे लेणीला नक्की भेट देणार.

सौंदाळा's picture

15 Oct 2025 - 11:37 am | सौंदाळा

सुंदर भटकंती आणि फोटो
इकडे जाऊन आत इतका काळ लोटला आहे की मागच्या जन्मात गेलो होतो असे वाटत आहे.

श्वेता२४'s picture

19 Oct 2025 - 5:46 pm | श्वेता२४

आताशा मुद्दामून वेळ काढल्याशिवाय असे छोटे ट्रेक करता येत नाही