शर्यत

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
19 Apr 2025 - 5:00 pm

शर्यत
-------------------------------------------------------------------------------------
‘आक्या, यंदा तुमचा शर्यत जिंकायचा काहीच चान्स नाही ! ‘ राक्या म्हणाला.
तसं आकाशला वाईट वाटलं. खूप वाईट वाटलं कारण त्याचे अप्पा दवाखान्यात होते.
संध्याकाळची वेळ. शाळा सुटलेली . पोरं घोळक्याने घरी चाललेली . त्यावेळची ही चर्चा. आकाश आणि राकेश दोघे एकाच वर्गात होते .आठवी तुकडी क मध्ये.
त्यांचं गाव मध्यम आकारात पसरलेलं होतं. हिरवं, निसर्गसंपन्न आणि शेत जमिनींचं. कडेगाव त्याचं नाव .त्या गावाला बैलगाडा शर्यतीची मोठी परंपरा होती.
आकाशच्या अप्पांना शर्यतीचा भारी नाद ; पण त्यांच्याकडे शर्यतीचे वेगळे बैल नव्हते. त्यांची तेवढी परिस्थितीच नव्हती .जे बैल शेतातले तेच बैल ते शर्यतीला उतरवत. दोन्ही गोष्टींसाठी म्हणून त्यांनी थेट खिल्लारीच बैल पाळलेले होते. खरं म्हणजे बाकीचे लोक असं करत नाहीत .पण एक गोष्ट होती- त्यांची जोडी शेवटचा का होईना नंबर काढायचीच. लोक त्यांचं पळणं पाहून तोंडात बोट घालायचे . कारण शेतकामाचे बैल असून ते शर्यतीत पळायचे. खास तयार केलेल्या शर्यतीच्या बैलांना हरवायचे. कसे ? हे तर आश्चर्यच होतं.
त्यांच्या बैलजोडीचं नाव होतं माणिक -मोती .अन् ते होतेच तसे माणिक मोत्यासारखे. तरणेबांड ,सहा वर्षांचे. देखणे ! त्यांची नावं त्यांच्या रंगाप्रमाणे ठेवलेली होती. माणिक तांबूस रंगाचा तर मोती पांढऱ्या रंगाचा होता. आप्पांच्या एका इशाऱ्यावर ते पळायचे. हरणं त्यांना कधीच मंजूर नसायचं. त्यांचं पळणं पाहून लोक अप्पांना नाव ठेवायचे , खिल्लारी बैलांना शेतीच्या कामाला जुंपतो म्हणून. जर त्यांना कामाला लावलं नाही तर ते शर्यतीत पहिला नंबर नक्की काढतील म्हणून.
पण वाईट वाटलं तरी अप्पा हसून त्या लोकांच्या बोलण्याकङे दुर्लक्ष करायचे.
शर्यतीचे बैल वेगळे असतात. खिल्लार जातीचे. त्यांना शेतकामाला जुंपत नाहीत. त्यांना खाऊपिऊ घालून चांगले तयार करतात. तगडे ! खास शर्यतीसाठी. त्यांना वेगवेगळ्या रंगीबेरंगी मण्या-माळांनी,साजांनी सजवलं जातं. घुंगुरमाळ ,शिंगदोर , गंडा , कंडा वगैरे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालकांचं त्यांच्या या बैलांवर खूप प्रेम असतं . ते त्यांना जिवापाड जपतात. चांगलंचुंगलं खाऊ घालतात.
बैलगाडी वेगळी असते आणि गाडा वेगळा असतो. बैलगाडी ही कामासाठीच वापरली जाते. शर्यतीमध्ये पळताना गाडा वापरला जातो .गाड्याची रचना अशी असते की एक माणूस त्याच्यावर उभं राहून बैलांचा कासरा धरून त्यांना पळवू शकेल. गाडी वेगात पळावी म्हणून त्याचा आकार छोटा असतो आणि तो कमी वजनाचा असतो. बैलगाडी ही मोठी असल्याने तिचं वजन जास्त असतं.
शर्यतीचा खास ट्रॅक केलेला असतो. मातीचा अतिशय रुंद पट्टा ,ज्यावर दहा - बारा बैलगाडे एकाच वेळी पळू शकतील. त्या पट्ट्याला पुढे चढ केलेला असतो. त्याला घाट म्हणतात. काही ठिकाणी तो असतो तर काही ठिकाणी तो नसतोही.
माणिक मोती सपाटीला जाम पळायचे पण घाटावर मात्र ते मागे पडायचे.
शर्यत जवळ आली होती. अप्पा माणिक- मोतीची काळजी घेत होते. आई त्यांना खुराक चारत होती .तर आकाश आणि अंकिता त्यांचा लाड करत होते. त्यांचं त्या दोघांवर खूप प्रेम होतं. जसं त्यांच्या आजीचं त्यांच्यावर होतं.
नेमके आप्पा बाईकवरून बाजारात जाताना पडले आणि त्यांना खूप मार लागला. उजवा हातही फ्रॅक्चर झाला. त्यांना आठवडाभर तरी दवाखान्यात राहावं लागणार होतं आणि त्यानंतरही बरं व्हायला त्यांना बरेच दिवस लागणार होते.
थोडक्यात, ते शर्यतीत भाग घेऊ शकणार नव्हते.
म्हणून तर राकेश म्हणाला होता, यावर्षी तुम्हाला संधी नाही . त्याच गोष्टीचा विचार करत आकाश चालला होता.
मग करायचं काय ?... आपण स्वतःच भाग घ्यायला पाहिजे. गाडा पळवायला पाहिजे. आपण तयारी करायला पाहिजे. आपण जिंकायला पाहिजे. बस !
तो मनाने शर्यतीत पोचला. तो गाड्यावर स्वार झाला होता. माण्या -मोत्या पळा ,असं तो जोरात ओरडत होता .शर्यतीचा थरार अनुभवत. धुरळा उडवत. लोकांचा आरडाओरडा ऐकत. वेगात गाडा पळवत.
अशा विचारात तो घरी पोचला तरी त्याच्या लक्षात आलं नाही .त्याला जाम भूक लागली होती .त्याने हाक मारली, ‘ए आये..’
आतून आईची ओ नाही आणि कोणाचीच नाही .त्याला लक्षात आलं ,आई दवाखान्यात गेली असेल म्हणून .पण मग आजी अन अंकी? …
तो घरात शिरला .मागे परसात गेला. बापरे! तिथे आजी जमिनीवर पडलेली होती. तिचा चेहरा तिच्या वेदना सांगत होत्या . ती अर्धवट शुद्धीत होती. तिच्याजवळ अंकी तिला धरून नुसतीच रडत बसलेली . ती त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान.
अवघड प्रसंग होता ! काय करावं त्याला कळेना .आई अप्पा नाहीत .त्यात त्यांचं घर शेतात. बाकीची घर लांब लांब होती . जवळपास कोणी नाही .
त्याचं डोकं शर्यतीतल्या बैलांसारखं पळायला लागलं . धूम ! तो गोठ्यात गेला. त्याने माणिकमोतीला बाहेर काढून त्यांना बैलगाडीला जुंपलं . ही सगळी कामं तो शिकलेला होताच.
मग त्याने गवताच्या पेंढीतलं गवत काढलं .भरपूर. आणि त्याने बैलगाडीमध्ये चांगली गादी तयार केली. त्यावर एक चादर टाकली . मग त्याने अजून एका चादरीची झोळी केली. त्या झोळीमध्ये आजीला झोपवलं. अंकीच्या मदतीने त्याने ती झोळी बाहेर आणली आणि अंगणात उभ्या असलेल्या बैलगाडीमध्ये त्याने तिला चढवलं. म्हणजे झोपवलंच . लहान असला तरी तो दणकट होता. अंकी बैलगाडीत बसली. आजीला धरून बसायला. तो पुढे चढला . त्याने कासरा धरला. त्याला वेळेचं भान होतं. आजीला लवकरात लवकर दवाखान्यात न्यावं लागणार होतं. तिला काहीतरी जास्तीचा त्रास होतोय ,हे त्याच्या लक्षात आलं होतं.
तो खाली वाकला. माणिकमोतीच्या कानात ओरडला- माण्यामोत्या ! शर्यतीच्या वेळी अप्पा असंच करत. ते त्यांना कधीही चाबूक मारत नसत; पण त्या एका इशाऱ्यावर ते बैल अक्षरशः उधळायचे. मोठी चलाख अन चपळ , प्रेमळ अन समजदार जनावरं !कदाचित त्यांनाही परिस्थिती कळली होती . जनावरांनाही ती एक समज असते . आकाशने त्यांना थोपटलं तेव्हा त्याचा स्पर्श त्यांना कळला असावा. ते निघाले . वाऱ्याच्या वेगाने. त्यांच्या गळ्यातली घुंगरं छनछन वाजू लागली . एका तालात .
त्याला वाटत होतं, जणू तो शर्यतीतला गाडा पळवतोय .रस्ता, झाडं ,दगडधोंडे, शेतं , सारं वेगाने मागे पडतंय. तो पुढे पुढे चाललाय. बेभान !
त्या क्षणाला त्याने पक्कं ठरवूनही टाकलं - तो शर्यतीत भाग घेणार म्हणून. तो पहिला येणार म्हणून. पण आत्ताची जी शर्यत होती, ती मात्र वेळेशी होती.
त्याला मागे आजीकडे पहायची हिंमत होत नव्हती. त्यालाही आजीचं प्रेम होतंच की. माण्या - मोत्या पळतच नाहीयेत असं त्याला वाटत होतं. त्याने पुन्हा एकदा त्यांना आवाज दिला आणि ते अंतिम रेषा जवळ आल्यासारखे पळू लागले. वेगात. सपाटीवरही अन चढावरही. अर्ध्या तासाचा रस्ता होता .तो दहाव्या मिनिटाला गावात पोहोचला आणि तिथून दवाखान्यात.
आजीला हृदयविकाराचा झटका आला होता. तिच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. त्या प्रसंगातून आजी वाचली .डॉक्टर म्हणाले , ' वेळेवर आणलं म्हणून वाचली म्हातारी . नाहीतर अवघड होतं .’
ही शर्यत माणिकमोतीने जिंकली होती .
आप्पा तिथेच तर ऍडमिट होते आणि आईसुद्धा तिथेच होती . लोकांची गडबड उडाली . आई तिथे आली .सगळे पोराचे कौतुक करत होते .अंकी आईला चिकटली ; तर आई देवाला हात जोडत होती.
मग ते अप्पांकडे गेले . आप्पांच्या नजरेत कौतुक होतं. त्यांच्या उजव्या हाताला प्लास्टर होतं म्हणून काय ? त्यांनी डाव्या हाताने पोराला जवळ घेतलं. आकाशने खूप मोठं काम केलं होतं .
पण अजून शर्यत तर बाकी होती …
थोडे दिवस मध्ये गेले. शर्यतीचा दिवस .लख्ख उन्हात मैदान गाड्यांची वाट पहात होतं. लोकांची गर्दी ,गडबड. शर्यतींचे गाडे, बैल, तोरणं ,ट्रॅक अन घाट आणि वेळ मोजायला डिजिटल घड्याळ , ही अलीकडची खास गोष्ट .
भाग घेणाऱ्या गाड्यांमध्ये राकेशचाही गाडा होता .आणि तो फुशारकी मारत होता .त्याचे वडील गाड्यावर उभे होते. पण आकाश ,त्याचा गाडा आणि अप्पा - ते कुठे होते ?... शर्यतीत त्यांचा सहभाग नव्हता.
अप्पा भाग घेऊ शकत नव्हते. तर आकाश ?... लहान मुलांना शर्यतीची परवानगी नव्हती. गाडा शर्यत हा तसा धाडसी खेळ. क्वचित धोकादायकही.
पण असं असलं तरीही आकाश आणि अप्पा शर्यत बघायला आले होते.स्वतः भाग घेतला नाही म्हणून काय ? इतरांचा हुरूप तर वाढवायला पाहिजे ना .अप्पा त्यांच्या एका मित्राला हात दाखवत होते, तर आकाश राकेशला.
शर्यत सुटली. टाळ्या, शिट्ट्या आणि उडालेला एकच गलका. हवेत उडालेल्या पांढऱ्या टोप्या.
आकाशच्या डोळ्यांसमोर त्याचा गाडा आणि माणिक मोती होते. गाडा पळवताना त्याला एकदा तो स्वतः दिसत होता ,तर एकदा अप्पा .
इशारा झाला . शर्यत सुटली .
सगळे बैल जीव खाऊन पळायला लागले. साधारण एक किलोमीटर अंतर होतं. बघता बघता चुरशीच्या त्या शर्यतीत राकेशचा गाडा जिंकला. त्याची बैलजोडी घाटाचा राजाही ठरली.
शर्यत संपली तेव्हा आकाश भानावर आला.
बांधलेल्या स्टेजवर बक्षीस समारंभ सुरु झाला . एकेक नाव पुकारलं जात होतं .
आणि शेवटी एक नाव पुकारलं गेलं- आकाश. सगळे लोक आश्चर्याने त्याला गर्दीत शोधू लागले. कशासाठी ? अप्पा अन आकाशलाही काही कळेना. हा एक आश्चर्याचा धक्काच होता.
शर्यत समितीने, त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल त्याचा खास सत्कार केला होता. अप्पांनी डोळे पुसले .शर्यत जिंकण्यापेक्षा हे काहीतरी वेगळं होतं.भारी होतं.
ते घरी आले. आजी माणिक- मोतीला पुरण पोळी खाऊ घालत होती . अगदी प्रेमाने. तिचा मायेचा घास !
तेव्हा आकाश माणिक- मोतीच्या गळ्यात पडला. त्याच्या मते खरे हिरो तर तेच होते.
तो त्यांच्या कानात म्हणाला,’ माण्या -मोत्या ,एक दिवस असा येईल जेव्हा गाड्यावर मी उभा असेन आणि तुम्ही मला पहिलं बक्षीस मिळवून द्यायचं आहे , कळलं ?’
त्यावर त्या दोघांनी त्यांचं डोकं असं हलवलं की जणू काही ते त्याला वचनच देत होते.
त्यांच्या मोठाल्या काळ्याभोर डोळ्यांत फक्त प्रेमच होतं.
------------------------//--------------------------------------//-----------------------------------------

हे ठिकाण

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

19 Apr 2025 - 10:29 pm | कर्नलतपस्वी

आम्हांला असाच लहानपणी मराठीत धडा होता.

बैलांच्या बैलांना आंघोळ घालतात चांगलं चुकलं खायला घालतात. त्यांना कामाला जुंपत नसे. गावच्या पाटलाला तालुकायाला जायचे असते. तो बळीला म्हणतो गाडी जुंप. बळी नाही म्हणतो.पाटलाला राग येतो नंतर गावातले कुणी तरी जखमी होते. बळी पटकन गाडी जुंपून त्या जखमीला तालुक्याला नेतो. ......

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Apr 2025 - 10:45 pm | अमरेंद्र बाहुबली

हा धडा मलाही होता, म्हणजे किती पिढ्या एकच धडा होता?

कर्नलतपस्वी's picture

19 Apr 2025 - 10:30 pm | कर्नलतपस्वी

कथा आवडली.
शेतकरी आणी बैल हे वेगळेच समीकरण आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Apr 2025 - 10:45 pm | अमरेंद्र बाहुबली

गाड्याची माहिती छान, पण कथा रोचक वाटली नाही.

प्रसाद गोडबोले's picture

20 Apr 2025 - 12:19 am | प्रसाद गोडबोले

बैलगाडा शर्यतीचा मनस्वी तिरस्कार असल्याने कथा आवडली नाही.

माणूसगाडा शर्यतीत आकाश आणि आप्पांनी एकत्र मिळून गाडा जीवाच्या आकांताने पळवला , अन् शेवटी बक्षीस स्वीकारताना स्टेजवर दोघेही रक्त ओकून मेले अशी काहीशी कथा असती तर आवडले असते !

श्रीगुरुजी's picture

20 Apr 2025 - 2:21 pm | श्रीगुरुजी

+ १

स्वत:च्या मजेसाठी मुक्या प्राण्यांचे कोणत्याही प्रकारचे हाल करणाऱ्यांचा तिटकारा वाटतो. बैलांना जोरात पळण्यासाठी दारू पाजणे, कानात लाल मुंग्या सोडणे, शेपटी पिरगाळणे, शेपटीला चावणे, खिळे असलेला चाबूक मारणे, दाभण टोचणे असे अत्याचार केले जातात.

सुक्या's picture

20 Apr 2025 - 1:50 am | सुक्या

छान कथा. बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवला आहे.
जबाबदारी अंगावर आली की लहान वयातही प्रसंगवधान ठेउन कमालीचे काम लहान मुले करतात.

वकील साहेब's picture

20 Apr 2025 - 12:37 pm | वकील साहेब

दौलत अस नाव होत त्या धड्याच.

बिपीन सुरेश सांगळे's picture

21 Apr 2025 - 12:04 pm | बिपीन सुरेश सांगळे

वाचक मंडळी
नेहमीप्रमाणे आपले सगळ्यांचे खूप आभार

बिपीन सुरेश सांगळे's picture

21 Apr 2025 - 12:05 pm | बिपीन सुरेश सांगळे

माणूसगाडा शर्यतीत आकाश आणि आप्पांनी एकत्र मिळून गाडा जीवाच्या आकांताने पळवला , अन् शेवटी बक्षीस स्वीकारताना स्टेजवर दोघेही रक्त ओकून मेले अशी काहीशी कथा असती तर आवडले असते !
???...

प्रसाद गोडबोले's picture

21 Apr 2025 - 6:08 pm | प्रसाद गोडबोले

माणूसगाडा शर्यत म्हणजे बैलाला आरामात उभे राहता येईल एवढा एक गाडा तयार करायचा अन् तो ओढायला माणसांना जुंपायचे, त्यां माणसांच्या मानगुटीवर त्या गाड्यांचे ओझे लादून त्यांना पळायला लावायचे तेही पायात चप्पल न घालता.

काय सुंदर मनोरंजन होईल ना

बैलांचे !!

सौंदाळा's picture

25 Apr 2025 - 12:17 pm | सौंदाळा

कथा आवडली.