दोन-तीन महिन्यांत १२००-२००० वर्षे जुनं पुरातन काळ्या पाषाणात कोरलेल्या,सहज नैसर्गिक भावमुद्रेत अनंत काळापासून उभ्या मूर्ती पाहिल्या नाही की काळाच चक्र", पुढेच जात आहे ,जरा मागे डोकावून पहायला हवं असं वाटतं. तेव्हा आज परत धर्मवीर गड-पेडगाव, भीमेच्या काठावरचे सौंदर्य पाहायला गेले.
श्रीगोंदा पासून १२ कि. मी अंतरावर धर्मवीरगड आहे.
इ.स.१३ व्या शतकात यादव काळात किल्ल्याचे भुईकोट स्वरूपात असे याचे बांधकाम झाले,तेव्हा याचे नाव पांडे- पेडगाव ओळखले जायचे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे पणजोबा वेरूळचे बाबाजीराजे भोसले हे देऊळगाव राजे येथे वास्तव्यास असताना
त्यांच्याकडे हा भुईकोट गड देखभालीसाठी) होता. त्यानंतर निजामशाहीची सत्ता कालांतराने मोगलांच्या ताब्यात हा किल्ला गेला. औरंगजेबाचा दुधभाऊ बहादुरखान कोकलताश हा वा किल्याचा त्यावेळी किल्लेदार होता. त्यास त्याने किल्याची काही प्रमाणात डागडुजी केली व किल्ल्यास स्वतःचे नाव -'बहादूरगड' दिले. छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वरला पकडल्यानंतर औरंगजेबाने आपली स्वतःची अकलुजला असलेली छावणी पेडगावला आणली. याच किल्यावर छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर हजर करण्यात आले. औरंगजेबाच्या मागण्या छत्रपती संभाजी महाराजांनी नाकारल्या नंतर त्यांचा व कवी कलश यांचा अनन्वीत छळ याच ठिकाणी करण्यात आला.
हा किल्ला भिमानदीच्या काठावर असुन याची दक्षिणेकडील तटबंदी भिमानदीला समांतर अशी आहे. साधारण आयताकृती आकाराच्या धर्मवीर गडाच्या भोवती साधारणता सहा ते सात वेशी स्वस्थितीला पहावयास मिळतात. मुख्य प्रवेश मार्ग गावाच्या बाजुला आहे. किल्यामध्ये असलेल्या अनेक वास्तु आज उद्ध्वस्त झालेल्या आहेत. तटबंदी बऱ्यापैकी उभी आहे. किल्यावरील दुमजली इमारतीच्या खिडक्यांमधुन भिमानदीचा देखावा सुंदर दिसतो. किल्ल्यामध्ये सुबक नक्षीकाम केलेली पाच मंदिरे आहेत. या मंदिरांपैकी लक्ष्मी नारायण मंदिर चांगल्या अवस्थेमध्ये आहे. या मंदिरांमध्ये अलंकृत स्तंभ तसेच बाहेरील मूर्ती सुंदर आहेत. साधारणता ११० एकरावर हा किल्ला पसरला आहे.
या किल्ल्यावरील काही ऐतिहासिक घटनांनी मराठीला दोन म्हणी देखील दिल्या -"आले मोठे पेडगावाचे शहाणे" आणि "येड पांघरूण पेडगावला जाणे"
त्याची कथा अशी की-
पेडगावचे शहाणे*
*६ जून १६७४,ला शिवराज्याभिषेक संपन्न झाला. ह्या अद्वितीय सोहळ्या साठी एकूण साधारण १ कोटी रुपये खर्च आला. हा खर्च राजांनी मुघलांकडून कसा वसूल केला ?*
*त्याची ही गमतीशीर हकीगत आणि गनिमीकाव्याचे एक उत्कृष्ट उदाहरण
*अहमदनगर जिल्ह्यात 'पेडगाव' नावाचं एक गाव आहे. तिथे बहादुरखान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा महामुजोर सुभेदार होता. आपल्या शिवाजी महाराजांना अशी खबर मिळाली की २०० उच्च प्रतीचे अरबी घोडे आणि साधारण १ कोटी रुपये (तेव्हा होन ही मुद्रा होती, रुपये नव्हते) बहादुरगडावर आले आहेत. आणि तिच्या रक्षणासाठी मोठी फौजही तैनात आहे. ही सगळी मालमत्ता लवकरच दिल्लीस रवाना होणार आहे. आता महाराजांनी आज्ञा दिली की २००० चं सैन्य बहादुरगडावर चढाई करेल आणि ही सर्व लूट लुटून आणेल (बलाढ्य ऐवज आणि ते २०० उमदा अरबी घोडे).*
*कोणासठाऊक कशी पण खानाला ही बातमी समजली , तेव्हा तो मजूर्डा चेष्टेने हसत म्हणाला, "सिर्फ २००० मराठा मावळे ! उनके लिये तो किले के दरवाजे खोल दो. अंदर आतेही खदेड देंगे,काट देंगे."*
*तारीख १६ जुलै १६७४, पेडगावच्या त्या बहादुरगडातून मुघल सैन्याला दूरवर धूळ उडताना दिसली. घोडदौड येत आहे हे त्यांच्या लक्षात आले. धोक्याच्या तुताऱ्या वाजल्या आणि गडावर, आधीच तयार असलेली खानाची प्रचंड सेना सज्ज झाली. त्यांनी किल्ल्याचे दरवाजेही उघडले. जसे गाफील मावळे जवळ आले, तो लगेच खानाच्या सेनापतीने चढाईचा हुकूम दिला. अनपेक्षित पणे झालेल्या या प्रतिकाराने सगळे २००० मावळे बिथरले आणि जीव वाचवायला ते मागे फिरले पण त्यांचे घोडे जोरच पकडत नव्हते. मात्र खानाची संपूर्ण फौज जशी जवळ येऊ लागली, खूप जवळ आली तशी त्यांचे नशीबा बलवत्तर म्हणून घोड्यांनी वेग पकडला आणि मावळ्यांनी पाठ दाखवून मागे धूम ठोकली. बहादुरखान स्वतः त्यांच्या समाचारस मुघल सैन्याच्या पुढे होता. अनेक कोस ही घोडदौड चालत राहिली. कारण मावळ्यांच्या घोडदौडीतली भीती बहादूरखानास चेव आणीत होती. शेवटी मावळे पार पसार झाले, संपूर्ण २०००ची फौज वाचली खरी, पण आपले शिवबा हरले रे !*
*खानाच्या फौजेत एकच जल्लोष झाला. शिवाजीच्या फौजेला हरवून पळायला लावलं हे काही छोट काम नाहीच. शिवबांची फौज हरली, पळ काढला! ही जीत औरंगजेबास कळाल्यावर आपल्याला केवढे इनाम मिळेल ? ह्या आनंदात बहादूरखान छाती फुगवून घोड्यावरून डौलत डौलत परतत होता. तितक्यात सगळं सैन्य एकदम शांत झालं आणि डोळे विस्फारून दूरवर असलेल्या बहादुगडाकडे बघू लागलं. धुराचे मोठ मोठे लोट किल्ल्यातून बाहेर पडताना दिसत होते. खानाने भीतीने आवंढा गिळत किल्लेदाराला विचारलं, "अगर हम सब यहाँ हैं, तो किलेपर कौन है?" "कोई नही जहांपन्हा. आपकाही हुकुम था की सबने मिलकर शिवाजी के उन २००० मावलों पर चढ़ाई करनी है ". आता किल्लेदार, सेनापती, आणि स्वतः खानाचे धाबे दणाणले. कारण काय आक्रित झालं असणार ह्याचा त्यांना अंदाज आला. आणि त्याच सोबत छत्रपती शिवाजीराजे ही काय चीज आहे हे ही ध्यानात आलं.* *आणि ज्याची भीती खरी ठरली. एक घोडेस्वार दौडत आला, आणि , "हुज़ूर, गज़ब हो गया, हम सब लुट गए, बर्बाद हो गए. आप सब वहां २००० मराठाओं के पीछे दौड़े, और यहाँ किलेपर ७००० मराठाओंने हमला करके सब लूट लेके चले गए हुज़ूर!".*
याशिवाय, ह्याच बहादूरखानाला महाराजांनी तहाची बोलणी झुलवले होते, औरंगजेबाचे शाही फर्मान येईपर्यंत महाराजांनी आपले गडकोट मजबूत करुन ठेवले, राज्याभिषेक पार पाडला आणि फर्मान आल्यानंतर बहादूरखानाने महाराजांना सांगावा धाडल्यावर तुझी पात्रता ती काय असे म्हणत चांगलेच फटकारले होते.
*अशा प्रकारे राज्याभिषेकाचा खर्च एक कोटी ही वसूल, शिवाय २०० उच्चप्रतीचे अरबी घोडे छत्रपतींच्या ताफ्यात. आणि हे सगळ नाट्य घडलं एकही मावळा न गमावता, रक्ताचा एक थेंबही नसांडता.*
आता लक्षात आलं का ? की हे सगळं नाट्य घडलं कुठे, तर पेडगावला. खानाला वेड बनवलं ते त्या पेडगावात. आणि म्हणून, पेडगावचे शहाणे
आणि वेड पांघरून पेडगावला जाणे.(सौजन्य -आंतरजाल , आपलं मिपा)
अशा या काळजाला यातना देणाऱ्या गडावर एक मंदिरही भारताच्या ऐतिहासिकपणाची साक्ष देत उभे आहे.'लक्ष्मीनारायणाचे मंदिर"!मंदिराच्या बाह्यभागातील कोरीव काम पाहूनच डोळ्याचे पारणं फिटले. खिडक्यांवरची विविध आकाराची नक्षी खुपच मोहक आहे. मंदिराभोवती भिंतीवर अनेक वराह, नृसिंह अवतार,विष्णू,भैरव व अग्नी ,वायू देव या मूर्तीही कोरल्या आहेत. अगदी भिंतीवरच्या इंच न इंच पूर्ण भरीव कोरीव मूर्तींनी भरलेला आहेत. मंदिराला तीन मोठमोठे,पायऱ्यांनी सजलेले प्रवेशद्वार आहेत. मंदिराच्या आतील चार खांब चौरंग, गोल, आयतकृती, तोरण असे वेगवेगळे आकार एकमेकांवर कोरीव कामासह साकार झाले आहे .गाभऱ्यात कोणतीच मूर्ती मात्र नाही.
सतीशीळा
या मंदिरासमोरच शंकराचे कोरीव सभामंडप असलेले सुंदर मंदिर आहे. भीमेच्या तटावर चाफ्याच्या सुवासात मंदिरातील 'शिवलिंग ध्यानस्त.भासत भासते.
भीमा नदीवर सध्या मात्र जलपर्णीची अवास्तव वाढ झाली आहे.
याच मंदिर परिसरात पुढे मल्लिकार्जुन हेही पुरातन मंदिर आहे. तसेच या भाग विविध मंदिरात अनेक वीरगळ, सतीशीळा आहेत.
अशा पद्धतीने मनाला त्या ५००-८००वर्षांच्या जुन्या दगडांचा श्वास ऐकल्यावर प्रफुल्लित वाटले. परतीच्या वाटेवर असताना आता नेत्रकमळांनी चैत्र वैभव टिपायला नकळत सुरुवात केली. उन्हात-चांदणं टिपायला सुरुवात केली.
गुलाबी, शुभ्र पंचपाकळ्यांचा देवचाफा फांद्या फांद्यांवर गच्च फूलले होते. बहव्याचे पिवळे झुंबर वाऱ्याच्या झुळकीने डोलत राहिलेले. गुलमोहराच्या, पळसाच्या रक्तवर्ण शलाका उन्हाच्या धगीला सोबत करीत पसरल्या होत्या. शेवग्याचा बहर, लांब सडसडीत हिरव्या शेंगा झाडाला लटकून एकमेकांशी गप्पा मारत होत्या.
बहवा
अशा फुलांच्या उत्सवात फळांचा गोडसर शाहीथाटही कमी नव्हता. श्रीगोंद्यातील पारगाव हे 'द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे. द्राक्षांच्या मांडवात
ऊन सावलीच्या नक्षीदार गालीचा पसरलेला असताना द्राक्षांच्या घडांनी वेली लगडलेल्या होत्या. वेलीवर निसर्गाची गोड किमया खुप आनंदित करुन गेली.
भक्तीला द्राक्षे ग्गोड :)
डाळिंबाची झाडे, कसलस पांढरं कापड पांघरून वर ओढून होती. कदाचित उन्हापासून संरक्षणासाठी ते असेल .आंब्यासा झाडांची - त्यांच्यावर पिकणाऱ्या पाडाची तर मोजदातच करता येणार नाही .उन्हाळ्याचा राजा' आंबा काही काळातच आता जोमात सगळीकडे मिरवणार, उन्हाळ्याचे वैभव आता शिगेला पोहचणार..
-भक्ती
प्रतिक्रिया
18 Apr 2025 - 11:17 pm | मुक्त विहारि
मस्त...
19 Apr 2025 - 10:23 am | प्रचेतस
सुरेख लिहिलंय.
किल्ल्यातील सर्वच मंदिरे अतिशय सुंदर आहेत. हल्ली बराचसा जीर्णोद्धार झालेला दिसतोय.
19 Apr 2025 - 12:17 pm | Bhakti
हो,बदल श्री.शिवदूर्ग संवर्धन ही संस्था करीत आहे.पुरातत्व खात्याचेही मंदिराचे संवर्धन सुरू ठेवले आहे.मागच्या वेळी इथे गडपाल होते, त्यांनी चांगली माहिती दिली.पण यावेळी ते नव्हते.