म्युच्युअल फंड या विषयावर सोशल मिडिया आणि युट्युब यावर खूप माहिती मिळत असते. काहींच्या मते हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मार्ग आहे तर काही याला खूप नावं ठेवतात आणि स्वतः शेअर मार्केट मध्ये गुंतवुन त्यात जास्त फायदा कसा आहे ते सांगतात. या सर्व मत-मतान्तरात मी माझा अनुभव सांगतो.
मी सुमारे ५ वर्षांपूर्वी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीला सुरुवात केली. अर्थात ५ वर्ष हा काही इक्विटी म्युच्युअल फंड मधील गुंतवणुकीच्या दृष्टीने फार मोठा कालावधी नाही. तरीही या ५ वर्षात मार्केट मध्ये खूप उतार चढाव आले त्यामुळे 'मार्केट सायकल' या प्रकाराचा खूप चांगला अनुभव या काळात आला.
जानेवारी २०१९ मध्ये एक्सिस लॉन्ग टर्म इक्विटी फंड (८ हजार प्रति माह), निप्पोन ग्रोथ फंड ( ३ हजार प्रति माह) आणि निप्पोन लार्ज कॅप फंड (२ हजार प्रति माह ) असे एकूण १३ हजार प्रति महिना गुंतवायला सुरुवात केली. निप्पोन फंडचं तेव्हाच नाव रिलायन्स असं होतं.
एकूणच शेअर मार्केट या प्रकाराबद्दल उत्सुकता वाढू लागली. काही महिन्यानंतर स्टॉक मध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट साठी डी मॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट देखील काढलं आणि डायरेक्ट स्टॉक मध्ये गुंवणूक मे २०१९ पासून सुरुवात केली. त्यात अगदी पेनी स्टॉक पासून हाय क्वालिटी लार्ज कॅप पर्यंत सगळ्या प्रकारात उलाढाल करायला सुरुवात केली. युट्युब वरील तथाकथित एक्सपर्टचा सल्ला आणि टिप्स घेऊन स्टॉक ची खरेदी विक्री सुरु केली. याचबरोबर म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक सुद्धा खंड न पडता चालू होती.
पहिल्या एक वर्षांमध्ये थोडे फार उतार चढाव सोडले तर मार्केट तसं स्टेबल होतं. फेब्रूवारी २०२० पासून मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण सुरु झाली. पुढे येणाऱ्या मोठ्या घडामोडींची चाहूल मार्केटला आधीच लागते असं म्हणतात. कोरोनाच्या संकटाची सुरुवात झाल्यामुळे मार्केट खाली येत होतं. त्यामुळे वर्षभरात पोर्टफोलिओ मध्ये जमा झालेले प्रॉफिट अक्षरशः काही दिवसात निघून गेले. मार्चला सुरुवात झाली तेव्हा मार्केट रोज नवीन तळ गाठत होतं. आता स्टॉक आणि म्युच्युअल फंड दोन्हीचा पोर्टफोलिओ नेगेटिव्ह होऊन लाल दिसू लागला होता. आणि दिवसागणिक नुकसान वाढत होते. काही तज्ञ सांगत होते कि रोज उठून पोर्टफोलिओ बघू नका मार्केट डाउन ट्रेंड मध्ये आहे तरीही 'आदत से मजबूर' मी मात्र रोज पोर्टफोलिओ बघत होतो. रोज वाढत जाणारे नुकसान बघून वाटू लागलं होतं यापेक्षा बँकेत FD किंवा RD केली असती तर बरं झालं असतं. तरीही म्युच्युअल फंड SIP बंद करून पैसे काढून घ्यायचा विचार नाही केला. SIP तशीच चालू ठेवली.
सुरुवातीला जनता कर्फ्यू आणि मग २५ मार्च पासून सुरु झालेलं लॉकडाउन यामुळे मार्केट ने तळ गाठला. अजून किती खाली जाईल याचा कुणालाच काहीच अंदाज नव्हता युट्युब वरील तज्ज्ञ देखील काहीच सांगू शकत नव्हते अर्थात परिस्थतीच तशी गंभीर होती. या कठीण काळात एकच जमेची बाजू म्हणजे माझं वर्क फ्रॉम होम सुरु झालं आणि पगार बंद झाला नाही त्यामुळे SIP चालू ठेऊ शकलो. एका मागून एक लॉकडाउन वाढत होते तरीही मार्केट खाली यायचं थांबलं. हळूहळू मार्केट वर येऊ लागलं आणि दिवसागणिक नुकसानीचा आकडा कमी कमी होऊ लागला. ६ महिन्यानंतर सप्टेंबर २०२० प्रथमच पोर्टफोलिओ पॉझिटिव्ह दिसू लागला. त्यानंतर मार्केटने २०२१ मध्ये एकदा २०२२ मध्ये २ वेळा आणि २०२३ मध्ये २ वेळा असे थोडे धक्के दिले तरीही एकंदर मार्केट अपट्रेन्ड होते.
या दरम्यान स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंग साठी असंख्य युट्युब व्हिडिओ पहिले काही पुस्तके विकत घेतली आणि काही पेड कोर्स केले. फ्युचर अँड ऑपशन आणि स्विंग ट्रेडिंग देखील केले. पण एकंदरीत त्यामध्ये नफ्यापेक्षा तोटाच अधिक झाला. याचा अर्थ ती पुस्तके आणि कोर्सेस वाईट होते असं नाही पण एकंदरीतच ते मला जमलं नाही. त्यातच SEBI ने एक अहवाल सादर केला त्यात असं दिलं होतं कि FY २२ मध्ये ८९% ट्रेडर लॉस मध्ये आहेत त्यातही सरासरी नुकसान १ लाखाचं आहे. केवळ ११% ट्रेडर्स फायद्यात आहेत आणि सरासरी फायदा १.५ लाख आहे.
पण या सगळयात एक गोष्ट अखंड चालू होती ती म्हणजे म्युच्युअल फंड SIP. आता या सातत्यपूर्ण गुंतवणुकीचा काय फायदा झाला ते बघू.
निप्पोन लार्ज कॅप फंड मध्ये १२०००० गुंतवले गेले आणि त्याचे सध्याचे मूल्य २१८०००/- आहे म्हणजे सरासरी वार्षिक वृद्धी (CAGR) २४.२%.
निप्पोन ग्रोथ फंड मध्ये एकूण १८०००० गुंतवले गेले आणि त्याचे सध्याचे मूल्य ३९१०००/- आहे म्हणजे सरासरी वार्षिक वृद्धी (CAGR) ३१.८%.
एक्सिस लॉन्ग टर्म इक्विटी फंड मध्ये ४८०००० गुंतवले गेले आणि त्याचे सध्याचे मूल्य ६९१०००/- आहे म्हणजे सरासरी वार्षिक वृद्धी (CAGR) १४.६१%.
अर्थात सध्या मार्केट अपट्रेन्ड मध्ये आहे त्यामुळे फायदा जास्त दिसत आहे तरीही जेव्हा युद्ध परिस्थितीत काही काळ मार्केट मार्केट डाउन होता तेव्हाही परतावा RD आणि FD च्या तुलनेत खूप चांगला होता.
आता मी हेच ३ फंड त्यावेळी का निवडले तर ते माझ्या रिस्क प्रोफाइल आणि उद्दिष्ट यांना साजेसे होते म्हणून. आणि मी वेळोवेळी फंड बदलत राहिलो नाही. काही फंड या कालावधी मध्ये काही काळ अंडर परफॉर्मर होते पण तरीही मी दुसऱ्या फंड मध्ये स्विच न करता नेटाने याच फंड मध्ये गुंतवणूक चालू ठेवली.
हे सगळं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे कि हल्लीच्या सोशल मीडियाच्या युगात स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड याविषयी प्रचंड माहिती उपलब्ध आहे त्यामुळे गुंतवणुकी बाबत निवड करताना गोंधळ होऊ शकतो.
मी काही गुंतवणूक सल्लागार नाही पण तरीही या छोट्याश्या अनुभवातून लक्षात आलेलं मर्म म्हणजे 'सातत्यपूर्ण गुंतवणूक' हाच आहे. मार्केट वर जात असेल, खाली येत असेल किंवा स्टेबल असेल तरीही दर महिन्याला ठराविक रक्कम SIP करून गुंतवावी म्हणजे दीर्घ कालावधी नंतर त्याचा फायदा दिसू लागतो.
Disclaimer: Mutual fund investments are subject to market risk. Mutual funds do not offer guaranteed returns.
प्रतिक्रिया
29 Dec 2023 - 6:48 pm | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद..
29 Dec 2023 - 8:13 pm | अमरेंद्र बाहुबली
चांगली माहीती.
30 Dec 2023 - 10:02 am | विअर्ड विक्स
तिन्ही फंड चांगले आहेत . निप्पोन स्मॉल कॅप मध्ये गुंतवले असते तर अजून अधिक परतावा मिळवला असता आजच्या घडीला . स्मॉल कॅप ने हौदोस घातला यावर्षी ;)
sip करतांना पण स्मॉल कॅप चे थोडे एक्सपोजर ठेवा, वयागणिक प्रमाण कमी करणे .
30 Dec 2023 - 11:05 am | सुबोध खरे
वयागणिक प्रमाण कमी करणे .
बहुसंख्य अर्थ सल्लागारांचा हाच झापडबंद सल्ला असतो.
माझी समभागात गुंतवणूक ९९ .९% आहे आणि केवळ एक प्रयोग म्हणून मी दोन महिन्यांपूर्वी म्युच्युअल फंडात थोडेसे पैसे गुंतवले आहेत.
माझे निवृत्त झालेले मित्र ज्यांना महिना लाखभर रुपये निवृत्तीवेतन आहे आणिआयुष्यभर वैद्यकीय सुविधा आहे त्यांना पण सर्व अर्थ सल्लागारांचा असाच सल्ला मिळताना पाहून आश्चर्य वाटते. ( त्यांचे पोट कसे चालेल याप्रमाणे बरेच अर्थ सल्लागार सल्ला देताना आढळतात)
मला एक रुपया सुद्धा निवृत्तीवेतन नसताना मी ९९% गुंतवणूक समभागातच केलेली आहे. यासाठी धीर धरणे आवश्यक असते. मार्च २०२० मध्ये बाजार पडलेला असताना माझी गुंतवणूक मूळ मुदलाच्या ३० % वर आलेली होती. त्यावेळेस मी मोठ्या प्रमाणावर ब्लू चिप मध्ये गुंतवणूक केली. आज हीच गुंतवणूक तीन वर्षात चौपटीपेक्षा जास्त झालेली आहे. उदा. टी सी एस, एल अँड टी, स्टेट बँक ऑफ इंडिया
सध्या बाजार फार उच्ची वर आहे त्यामुळे गेल्या तीन महिन्यात मी जवळजवळ ३० % गुंतवणूक काढून घेतली आहे आणि पुढच्या वर्षभरात (किंवा दोन वर्षात) जेंव्हा बाजार पडेल तेंव्हा हेच पैसे मी उत्तम समभागात गुंतवेन.
बाजारात भय आणि लोभ या दोन गोष्टीमुळे गुंतवणूकदारांचे सर्वाधिक नुकसान होत असते.
गेल्या १५ वर्षात मी बाजाराची तीन आवर्तने पाहिली आहेत यात मला सर्वात जास्त नफा २००८ च्या आणि २०२०च्या पडझडीत झालेला आहे. अशा वेळेस जेंव्हा बाजार खड्ड्यात असतो अशा वेळेस उत्तम समभागात केलेली गुंतवणूक हि सर्वात फायद्याची ठरते हा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे.
सर्व अर्थ सल्लागार dont try to time the market हाच सल्ला देताना आढळतात.
दुसर्यांनी दिलेल्या सल्ल्यामध्ये माझे सर्वात जास्त नुकसान झालेले आहे. यामुळे गेली ६-७ वर्षे मी कुणीही दिलेला कोणताही सल्ला लक्षात घेत नाही.
बाजारात अनेक लोक स्वतःच्या फायद्यासाठी अशा अनेक कंड्या पिकवत असतात. उदा शेअर खान या सल्लागार कंपनीनें २०२१ मध्ये लॉरस लॅब मध्ये पैसे गुंतवा हा समभाग ८०० च्या वर जाईल असा सल्ला दिला आणि आपल्या ग्राहकांना ७०० च्या पातळीला समभाग विका असा सल्ला दिला होता. हा समभाग जास्तीत जास्त ७२३ पर्यंत जाऊन मग आपटला होता. यानंतर या कंपनीने ७०० ची पातळी आजतागायत गाठलेली नाही.
एक तर स्वतः अभ्यास करा किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा असेच माझे म्हणणे आहे.
चार पैसे गाठीशी बांधून कोणतेही कष्ट न करता बक्कळ नफा मिळवावा याच हेतूने सर्व बाजारात आलेले असतात हि वस्तुस्थिती आहे.
पण there is no free lunch. व्यवस्थित अभ्यास करा आणि विचार र्पूर्वक गुंतवणूक करा.
जाता जाता नाक्यावर दिलेल्या सल्ल्यावर अवलंबून गुंतवणूक केल्यास नुकसान नक्की.
5 Jan 2024 - 3:23 am | मनो
> अशा वेळेस जेंव्हा बाजार खड्ड्यात असतो अशा वेळेस उत्तम समभागात केलेली गुंतवणूक हि सर्वात फायद्याची ठरते हा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे.
१००% खरे आहे :-)
नव्वदच्या दशकात वय १६ वर्षे असताना कागदी सर्टिफिकेट असणारे शेअर घेतले होते, त्यात रिलायन्स होता. त्यातले काही पैसे लागतील त्यावेळी विकले. उरलेल्याचा परतावा कित्येक पटीत आहे. २००२, २००८, २०२० साली घेतलेले शेअर अजूनही आहेत.
30 Dec 2023 - 11:46 am | धर्मराजमुटके
याबाबतीत माझा देखील अनुभव चांगला आहे. शेअर मार्केट मधून पैसा कमविण्यासाठी अभ्यास आणि पैसा दोहोंची आवश्यकता आहे. ज्यांच्याकडे जास्त अभ्यासासाठी वेळ नाही किंवा गती नाही त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड गुंतवणूक उत्तम पर्याय आहे.
30 Dec 2023 - 2:49 pm | सिरुसेरि
एक निरिक्षण - कोविडच्या काळात अनेक लार्ज कॅप फंड हे नुकसान दाखवित होते . पण त्या तुलनेत मिड कॅप फंड हे तग धरुन होते .
5 Jan 2024 - 3:28 am | मनो
कागदी परतावा आणि प्रत्यक्ष मिळालेला यात फार फरक असू शकतो, त्यामुळे सतत परतावा पहात राहू नये. त्याने उगाच anxiety शिवाय फार काही मिळत नाही. गरज असेल त्याच वेळी विक्रीच्या अगोदर काही दिवस जरूर पहावा.
4 Jan 2024 - 7:52 pm | राजेंद्र मेहेंदळे
म्युचुअल फंड
मागच्या १-२ वर्षात स्मॉल कॅप आणि इन्फ्रा फंड्स दोन्ही कॅटेगरी जबरदस्त धावत आहेत. कोणतेही फंड घराणे पहा.
खालील दुवा वापरुन आपण एकेक फंड घराणे सिलेक्ट करुन शेवटचा कॉलम सॉर्ट करुन प्रत्येक घराण्याचे टॉप फंड्स बघु शकता.
होम
अॅम्फि च्या वेबसाईटवर जाउन कुठल्याही फंडाची नेट अॅसेट व्हॅल्यु बघु शकता
दुवा
शेअर्स-
खालील प्रत्येक क्षेत्रातील टॉपच्या ३-४ कंपन्या निवडुन त्यात पैसे गुंतवु शकता.
आय टी
बँक
फार्मा
एफ एम सी जी
एनर्जी
शेवटी काय? एफ डी पेक्षा आणि इन्फ्लेशन रेट पेक्षा जास्त परतावा मिळाल्याशी मतलब.(टॅक्स, ब्रोकरेज वगैरे वगळुन)