सस्नेह नमस्कार,
'सुचेतस आर्टस' ही अभिवाचन, ऑडिओबुक्स, भाषांतर यामधे काम करणारी संस्था आहे.
महाराष्ट्रातील उत्कृष्ट कथासंग्रह / कादंबरी ह्या साहित्यकृतीचा गौरव करावा आणि मराठी साहीत्यिकांना
प्रोत्साहन द्यावे या उद्देशाने ‘सुचेतस आर्ट्स’ ने खालील पुरस्कार देण्याचे योजिले आहे.
१. कै. सर्जेराव माने स्मृती कादंबरी पुरस्कार
२. कै. इंदुमती कोकाटे पाटील (बाबी) कथासंग्रह पुरस्कार
प्रत्येकी रोख रक्कम ११०० रुपये व सन्मानपत्र
ज्या लेखकांचे / प्रकाशकांचे कथासंग्रह व कादंबरी प्रकाशित झालेले आहेत, त्यांच्याकडून पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. आपले साहीत्य खालील निकषावर तपासले जाईल. यासाठी कुठलेही शुल्क नाही.
‘लेखनशैली / शुध्दलेखन (प्रूफ चेकिंग) / धाटणी (जॉनर) / साहीत्याचा दर्जा’
प्रकाशित झालेल्या कथासंग्रह व कादंबरीच्या प्रत्येकी दोन प्रती व आपला अल्प परिचय खालील पत्त्यावर पाठवावे. निवड झालेल्या पुस्तकांच्या लेखकास अथवा प्रकाशकास पत्राद्वारे कळविण्यात येईल. तसेच सुचेतसच्या वेबसाईटवर नावे जाहीर केली जातील. पुरस्कार वितरण ‘सुचेतस आर्टस’ च्या वार्षीक संमेलनात केले जाईल.
प्रकाशन कालावधी – 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023
पुस्तके पाठवण्याचा अंतिम दिनांक – 31 डिसेंबर 2023
पुस्तक पाठवण्यासाठी पत्ता :- श्री अमेय पिसाळ
प्रथमेश पार्क, C - 402, चौथा मजला, तांबे मळा, भारत गॅस गोडाऊन समोरची लेन, मखमलाबाद रोड, नाशिक – 422003 महाराष्ट्र
संपर्क - 'सुचेतस आर्टस' – 9921095542 (Pls WhatsApp if any Query)
Email – suchetasindia.arts@gmail.com Facebook Page - https://www.facebook.com/Suchetasarts
Website – www.suchetasindia.in
प्रतिक्रिया
16 Nov 2023 - 9:28 am | तिता
पुरस्कार रक्कम ११००? फक्त????
16 Nov 2023 - 4:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'सुचेतस आर्टस'चं लेखकांना प्रोत्साहन मिळावं याबातीतचं धोरण उत्तमच आहे , पण पुरस्काराची रक्कम फारच तोकडी आणि लेखकांचीही प्रतिष्ठा घालवणारी आहे असे वाटले. अर्थात ज्यांना कोणत्याही परिस्थितीत पुरस्कार मिळाले पाहिजेच् नाव मिळाले पाहिजेत असे वाटते असे लेखक आपली पुस्तके पाठवतीलही पण खरंच लेखकाचा सन्मानच करायचा तर पुरस्काराची रक्कम वाढवली पाहिजे असे वाटले.
सर्वच चांगली पुस्तके मान्यवर प्रकाशन संस्था प्रकाशित करतातच असे काही म्हणता येत नाही. काहींना पुस्तकासाठी स्वत:च फार मोठा खर्च कारावा लागतो.
भाग्य उजळलेच एखाद्या लेखकाचं तर, तो पुरस्कार किमान सन्मानजन्य असला पाहिजे. लेखकांचा अपमान करणारा तरी किमान नसावा असे माझे स्पष्ट मत आहे.
-दिलीप बिरुटे
16 Nov 2023 - 5:57 pm | टर्मीनेटर
प्रतिसादातील ह्या वाक्याशीच नाही तर प्रत्येक शब्दाशी सहमत आहे!
पुरस्काराची रक्कम नगण्य आहे तेही एकवेळ ठिक पण ज्यांच्या नावे हे पुरस्कार दिले जाणार आहेत ते 'कै. सर्जेराव माने' आणि 'कै. इंदुमती कोकाटे पाटील (बाबी)' हि महान व्यक्तीमत्वे नक्की आहेत तरी कोण? साहित्य किंवा अन्य कुठ्ल्या क्षेत्रात त्यांनी काय भरिव कामगीरी केली आहे हे देखील स्पष्ट केले असते तर ह्या पुरस्काराला काही प्रतिष्ठा आहे कि नाही हे वाचकांना ठरवता आले असते, तसेच हे पुरस्कार आपल्याला मिळाल्यास आपली प्रतिष्ठा वाढेल असे लेखकांना वाटु शकले असते.
गल्ली बोळात भरणाऱ्या 'अंडरआर्म बॉक्स क्रिकेट' सारख्या टुकार क्रिडा स्पर्धांनाही ५१०००, २१००० आणि ११००० अशी प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देण्यासाठी आयोजकांना प्रसिद्धीलोलुप पुरस्कर्ते सापडण्यास अडचण येत नाही आणि इथे लेखकांनी ११०० रुपयांचा पुरस्कार आणि सन्मानपत्र मिळवण्यासाठी त्यांच्या 'प्रकाशित झालेल्या कथासंग्रह व कादंबरीच्या प्रत्येकी दोन प्रती व आपला अल्प परिचय खालील पत्त्यावर पाठवावे' वगैरे अपेक्षा ठेवणे हे फार विचित्र वाटत आहे.
असो, वर तुम्ही म्हणाला आहात त्याप्रमाणे "ज्यांना कोणत्याही परिस्थितीत पुरस्कार मिळाले पाहिजेच् नाव मिळाले पाहिजेत असे वाटते असे लेखक आपली पुस्तके पाठवतीलही" असे लोक आपल्या प्रवेशिका पाठवतीलही!
16 Nov 2023 - 6:48 pm | गवि
येथील प्रतिसाद वाचून रास्त वाटले.
दोन प्रती समजा २००-२०० रूच्या असतील आणि DTDC किंवा ब्लू डार्टने पाठवल्यास दीडशे दोनशे धरले तर इथेच पाचशे. आणि पुरस्कार घेण्यास कोण्या एका गावाहून दुसऱ्या गावी प्रवास म्हणजे आणखी जास्त. त्यामुळे पुरस्कार रक्कम किंचित जास्त ठेवावी ही अपेक्षा रास्त वाटते.
16 Nov 2023 - 5:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुरस्कारासाठीचे निकष दोन शब्द.
कादंबरीतला वाचकास येणारा अनुभव, कथानक, पात्र, वातावरण, कथनपध्दती व भाषा आणि इतर काही घटकांचा विचार कादंबरीत असतो. कथा - कादंबरी समान असले तरी हे दोन्ही साहित्यप्रकार स्वतंत्र आहेत. कथा हा स्फूट साहित्यप्रकार आहे तर कांदबरी हा दीर्घ साहित्यप्रकार आहे. कथा व कादंबरी यांमधील फरक नुसता दीर्घतेचा, आकाराचा नसून प्रकाराचा आहे. कथेत रचनेचे, अनुभवाचे एककेद्रित्व असते तर कादंबरी ही अनेक केंद्री असते. कादंबरीत अनुभवांच्या अनेकविध घटक असतात, त्यांचा एकमेकांशी संबंध असतो कितीतरी गोष्टी वेगवेगळ्या असतांना एकाच निकषावर दोन्हीतल्या उत्तम प्रकाराची एकाच निकषावर निवड कशी होऊ शकते ?
बाय दे वे, पुरस्कार देणारे आपण आहात तेव्हा त्याचे स्वरूप कसे असावे निकष कसे असावे ते आपणच ठरवाल तेही मान्य तो आपलाच अधिकार हेही मान्य.
पण एका मिपाकराचा जो स्वभाव आहे त्याला जागावे लागते. आपण हर्ट झाला असाल तर दिलगिरी आहेच.
आपणास दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
16 Nov 2023 - 6:18 pm | चौथा कोनाडा
निवेदनासाठी धन्यवाद !
पुरस्कार प्रक्रिया आणी पुरस्कारार्थी महोदयांना आगाऊ हार्दिक शुभेच्छा !
आपण नमुद केलेली व्यक्तिमत्वे कै. सर्जेराव माने आणि कै. इंदुमती कोकाटे पाटील (बाबी) यांच्या साहित्याचा आम्हा सामान्य वाचकांना परिचय नाही.
तेव्हा यांच्या कार्किर्दीचा आणि साहित्याचा परिचय करुन दिल्यास खुपच समर्पक राहिल.
पुनश्च आभार !
(अवांतर : वरिल महोदयांच्या साहित्यावर कुणी रसग्रहणात्मक अथवा विश्लेषणात्मक लिहिले असेल तर ते ही वाचायला आवडेल !)
16 Nov 2023 - 10:34 pm | विनिता००२
मिसळपाव ही साहीत्याशी सबन्धित वेब साईट आहे असे वाटुन मी हे निवेदन इथे दिले होते.. पण जी मुक्ताफळे इथे उधळली गेली आहेत ते पहाता एखाद्या पुरस्काराची किंमत केवळ त्याच्या रकमेवरुन किंवा ज्यांच्या नावाने पुरस्कार दिले जात आहेत त्यावरुन ठरवावी ?? ते पण त्यांची काहीही माहीती नसतांना??
सर्जेराव माने माझे वडिल होते. त्यांना वाचनाची फार आवड होती. तसेच मला लिहीण्याची प्रेरणा जिच्याकडुन मिळाली ती माझी बाल विधवा मावशी बाबी होती. अर्थात त्यांच्यासाठी मला जे काही करता येत आहे ते मी करते आहे. पुरस्कार नक्कीच चान्गल्या लेखकाला मिळेल, ते पण नाव किंवा चेहरा पाहुन नाही तर साहीत्याचा दर्जा पाहुन...पैसे भरुन जे पुरस्कार मिळतात त्यातच तुम्हांला आनंद वाटतो आहे असे एकंदरीत दिसते आहे.
तसेच दारोदार देणग्यांची भीक मागुन दिले जाणारे पुरस्कार तुम्हांला भुषण वाटत असतील कदाचित....मला नाही..जी रक्कम दिली जाणार आहे ती माझा कष्टाच्या कमाईतुन दिली जाणार आहे. माझ्या आणि एका चान्गल्या लेखकासाठी दर्जा पहुन मिळालेला पुरस्कार नक्कीच गौरवास्पद असेल.
बाकी तुमच्या कुठल्याही अर्थहीन कमेंट्ना उत्तर द्यायची मला गरज वाटत नाही.
17 Nov 2023 - 9:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आम्ही म्हणजे मी आणि काही मिपाकरांनी लेखकांच्या बाजूने लिहिले आणि काही अपेक्षा व्यक्त केल्या त्यामुळे ती जरी 'मुक्ताफळे' असली तरी त्यावरुन नाराज होऊ नका. आपल्या संस्थेचा व्याप मोठा असेल असे वाटल्यामुळे ती रक्कम मोठी असली पाहिजे, अशी एक अपेक्षा होती कदाचित ती चुकही असू शकते. उलट आपण ज्यांचे स्मरण व्हावे म्हणून 'अकराशे' रुपये ठेवत आहात त्या व्यक्ती आपल्यासाठी सर्वोच्च आहे, ते कळल्यामुळे तर आता खरंच ती रक्कम कमी वाटली आहे, ही रक्कम अजून काही काळ वाट पाहून अधिक करता आलीही असती, करताही येईल. रक्कम महत्वाची नसली तरी 'सन्मान' हा दोन्ही बाजूंनी 'मोठा' वाटला पाहिजे. आपल्या सर्वांचेच पैसे मेहनतीचे असतात. बाकी, कधी कधी देणग्याही महत्वाच्याच असतात. देणग्यांमुळे पुरस्काराची रक्कम वाढणार असेल आणि कोणी देणगी देणार असाल तर, तर देणगी नक्की घ्या असे एक वाचक म्हणून सुचवतो. भले आपण त्याला 'भिक' म्हणत असला तरी सार्वजनिक उपक्रमात आणि असे साहित्यिक उपक्रम यशस्वी व्हावे यासाठी अशी मदत लागतच असते त्यामुळे आपली भाषा योग्य वाटत नसली तरी आपल्या मताबद्दल आदर आहे. अर्थहीन कमेंट्सना आपण उत्तरे देऊ नका. पण मी आणि इतर वाचकांनी मांडलेली मतं इतकीही गैर नाहीत, तेव्हा करता आला तर सकारात्मक विचार करा किंवा सोडून द्या. रागावू नका.
इतकीच नम्र विनंती.
-दिलीप बिरुटे
17 Nov 2023 - 10:14 am | गवि
शब्दा शब्दाशी सहमत. काही सूचना सकारात्मक घेतल्याने लेखकांसाठी हा पुरस्कार अनुभव अधिक आनंददायक करण्याची संधी अशा वेळी मिळून जाते. तसे न करता दुखावून निघून जाणे आणि त्या सल्ल्यांचे मूल्य गमावणे असे करू नये अशी विनंती. बाकी नकळत काही दुखावले गेले असल्यास दिलगिरी आहेच.
काही मोठ्या संस्था काहीही मानधन न देता केवळ मानद पुरस्कार किंवा व्याख्यान देण्यास निमंत्रित करतात. तिथे बोलावले हाच सन्मान असतो. पण हे एखाद्या संस्थेच्या सुरुवातीच्या काळात सहसा नसते. अनेक दशके आपला ठसा निर्माण करून हे शक्य होते (उदा रोटरी किंवा तत्सम). अशा प्रकारच्या संस्थेइतकी तुमची संस्थाही भविष्यात नावारूपास येवो अशी सदिच्छा.
19 Nov 2023 - 6:16 pm | विनिता००२
डॉक्टर, तुमच्याबद्दल आदर आहे, म्हणून उत्तर देते आहे. हे ह्या उपक्रमाचे पहिले वर्ष आहे, यात अजुन सुधारणा नक्कीच होईल.
आत्ता इतर सदस्यांचे जे प्रतिसाद आले आहेत, तो विचार आधीच्या प्रतिसादा आधी केला असता तर मला जो त्रास झाला तो झाला नसता. सजेशन मी नक्कीच स्वागतार्ह मानते, पण ते सांगण्याची एक पध्दत असते. दुसर्यांच्या भावनांचा अपमान करुन, त्यांना कष्टी करुन, तुम्ही अपेक्षा कराल तर ते होणार नाही.
जाहीर केलेली रक्कम माझ्या दृष्टीने रास्त आहे. ऋण काढुन सण करायचा नाही हे मी वडिलांकडुनच शिकले आहे. मला जेवढे झेपेल तेवढेच ओझे मी उचलते. त्याचा भार होउ नये.. नाहीतर त्यातली मजा, आनंद निघुन जातो. बाकी पुरस्कार जाहीर करुन, मग सभासद फी मागणे, एक रक्कम जाहीर करुन कमी रक्कम पाकीटात देणे असले प्रकार माझ्या संस्थेत होणार नाहीत.
देणग्यांचे म्हणाल तर त्यासाठी संस्थांनी लोकांचे उंबरे झिजवलेले मी पाहीले आहे, पाहते आहे. वर्षात एकदा मिळणार्या काही नोटांच्या बदल्यात आयुष्यभराची मिधेंगिरी घ्यावी लागते. पिंपरी चिंचवड मधील सर्व संस्थांचे कामकाज मी पाहीलेले आहे. मला ते जमणार नाही.
आपल्या साहीत्याला कुठल्याही वशिल्या शिवाय पुरस्कार मिळतो याचा आनंद एक मनस्वी लेखकच समजु शकतो. त्याचा आनंद मला अनुभवायचा आहे. बरेच चांगले लेखक ह्या उपक्रमाची दखल घेत आहेत याचा आनंद आहे.
मागिल दोन वर्शात मी बर्यापैकी कामे सुरु केली आहेत. आमचा दर्जा आणि कामाची पध्दत याची पोचपावती मला मिळते आहे.
20 Nov 2023 - 2:03 pm | नठ्यारा
विनिता००२,
बिनपैशांचा म्हणजे मानद स्वरूपाचा पुरस्कार देता येईल काय? पैसे म्हंटले की काही अपेक्षा जागृत होतात.
हे मी काय लिहिलंय ते मला नेमकं समजावून सांगता येत नाही. पण कोणाला तरी हे समजेल असं मला वाटतं. मी या क्षेत्रातला तत्ज्ञ नाही. मला साहित्य आणि पुरस्कार वगैरे विषयांत अजिबात गती नाही. मी कुठलीही संस्था चालवलेली नाही. मी सर्वार्थाने तृतीयपक्षी बघ्या आहे. पैसे म्हंटल्यावर अपेक्षा जागृत होणे हे अशाच एका बघेपणाचं लक्षण आहे.
-नाठाळ नठ्या
19 Nov 2023 - 9:34 pm | रामचंद्र
या पुरस्कारासाठी फक्त कामगार/नोकरी करणाऱ्या महिला/अविकसित ग्रामीण भागातील/प्रथमच प्रकाशित इ. अशांपैकीच साहित्यिकांच्या साहित्यातूनच निवड करून पुरस्कार जाहीर केला तर बक्षिसाची रक्कम अल्प असूनही किमान प्रसिद्धी मिळून त्यांच्या पुढील साहित्यप्रवासाला कौतुकाचे दोन शब्द लाभल्यासारखं तरी साध्य होईल असे वाटते. इंटरनेट, फेसबुकमुळे प्रसिद्धी अप्राप्य राहिली नसली तरी मिपासारख्या संकेतस्थळांवरून जाणकार वाचकांपर्यंत पोहोचता येईल हा लाभ काही कमी नाही. आणि खरोखरच चांगली निवड असेल तर आपल्या उपक्रमाचीही योग्य दखल नक्कीच घेतली जाईल.
20 Nov 2023 - 3:14 pm | चौथा कोनाडा
कल्पना स्वागतार्ह, पण पुस्तक व्यवहार हा सध्या छापील माध्यमांशी जास्त संबंधीत आहे. अशी उदाहरणे आहेत की लेखक आधी मिपावर लिहितात आणि मग प्रकाशित (छापील माध्यमांद्वारे) करतात. मिपासारख्या संकेतस्थळांवरून वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी या स्पर्धेचा वापर कितपत करतील ही शंका वाटते.
22 Nov 2023 - 11:11 pm | रामचंद्र
पुस्तक व्यवहार हा सध्या छापील माध्यमांशी जास्त संबंधित आहे...
खरं आहे. याबाबत मिपाकरांकडून काही उपयुक्त आणि अभिनव कल्पना सुचवल्या जातील अशी अपेक्षा.
मागेही याच आयडीकडून मराठी साहित्य वाचनासाठी ऑडिओ संदर्भात काही विचारणा केली होती असं आठवतं. त्याबाबत मिपाचा किंवा अन्य कुठला कसा अनुभव होता, काही शिकायला मिळालं का, अशी माहिती इथं प्रसिद्ध केली तर तीही उद्बोधक असेल. कारण साहित्यसंबंधी वेगवेगळ्या उपक्रमांच्या बऱ्यावाईट अनुभवांवर इथं चर्चा होत असते.
23 Nov 2023 - 12:49 pm | चौथा कोनाडा
अतिशय छान सुचवणी +१
अश्या माहितीचे हार्दिक स्वागत !
16 Nov 2023 - 10:37 pm | विनिता००२
अॅड्मिन, कृपया हे निवेदन डिलीट करावे ही विनंती
परत कधी ह्या साईटवर मी परत येणार नाही याची खात्री बाळगावी.
17 Nov 2023 - 1:14 pm | चौथा कोनाडा
अॅड्मिन, कृपया हे निवेदन अजिबात डिलीट करू नये ही कळकळीची विनंती !
मिपा हे मराठी मनं व्यक्त होण्यासाठीचं खुलं व्यासपीठ आहे. इथं वेळोवेळी विविध विषयांवर वैचारिक अभिसरण होत असतं !
प्रस्तुत निवेदन काही सभासदांना खटकलं ! त्यांनी मांडलेले मुद्दे रास्त वाटले, निवेदनकर्त्याने त्यांची बाजू मांडली. तीही प्रांजळ वाटली आपल्या सहस्वासातील सहवासातील साहित्य प्रेमींच्या नावे असा पुरस्कार देणे हे खरंच कौतुकास्पद आहे त्याबद्दल त्या अभिनंदनस पात्र आहेत ! किंबहुना हा आदर्श आपण डोळ्यांसमोर ठेवून असे उपक्रम आयोजित करू शकतो किंवा अशा उपक्रमात सहभागी होऊ शकतो !
त्यांची बाजू मारताना त्या पुरस्कारांची व्यवहार्य बाजूचा फारसा विचार केलेला दिसत नाहीये असे जाणवले, आणि तेच मुद्दे सभासदांनी मांडले.
असो.
निवेदनकर्त्याने इथे येऊन त्यांची बाजू मांडली हे मला सभासद म्हणून खूपच छान आणि अतिशय महत्त्वाचे वाटले. त्यांनी इथे येऊन त्यांची बाजू मांडली नसती तर एकतर्फी चर्चा झाली असती
मी मिपाकर असल्याचा सार्थ अभिमान वाटला !
(फक्त माझे वैयक्तिक मत असे की निवेदनकर्त्याने त्यांची बाजू मांडताना असा फणकाला दाखवायला नको होता. आणि मिपा साइटवर परत कधी येणार नाही असा विचार व्यक्त करायला नको होता ! अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे)
त्यामुळे एडमिनला नम्र विनंती एक रुपया हा धागा कृपया डिलीट करू नये !
निवेदनकर्त्याने देखील मिपा सोडून जाण्याची भाषा करू नये, उलट या क्षेत्रात मिपाद्वारे कसा सहभाग आणखी वाढवता येईल हे बघावे ही नम्र विनंती !
अशा उपक्रमात मिपाकरांचा सहभाग आणि सल्ला मिळाला तर निवेदनकर्त्याचा उपक्रम आणखी मोठा होईल आणि आणखी मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल असे वाटते.
उपक्रमास मनापासून हार्दिक शुभेच्छा !
21 Nov 2023 - 10:41 pm | अमरेंद्र बाहुबली
त्यामुळे एडमिनला नम्र विनंती एक रुपया हा धागा कृपया डिलीट करू नये !
एडमीनना एक रूपया देऊन धागा डिलीट करू नये अशी विनंती करताय?? एक रूपया फक्त?16 Nov 2023 - 11:01 pm | टर्मीनेटर
निवेदनच नाही तर हा मिपाच्या धोरणात न बसणारा जाहिरातपर धागाच डिलीट करावा ही मी अॅडमीनला विनंती करतो!
17 Nov 2023 - 10:57 am | सर टोबी
बिरुटे सर आणि गवि या धाग्यावर उपस्थित असतांना धागाच डिलिट करावा ही सुचना आगाऊपणाची आणि खासकरून महिला सदस्याचा उपमर्द करणारी वाटते.
17 Nov 2023 - 12:10 pm | टर्मीनेटर
Lol... निवेदन डिलिट करावे अशी विनंती खुद्द त्या महिला सदस्यानेच केली आहे.
तरीही त्या विनंतीला दुजोरा देत मी केलेली विनंती आपल्याला 'आगाऊपणाची' सुचना आणि 'महिला सदस्याचा उपमर्द करणारी' वगैरे वाटली असल्यास वैचारिक स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता/समर्थक असल्याने मला त्यातही काही गैर वाटले नाही 😀
17 Nov 2023 - 1:35 pm | नठ्यारा
अवांतर :
एक व्याकरणीय शंका आहे. एखाद्या स्त्रीचा वा सदस्यानामाचा उपमर्द कसाकाय होऊ शकतो? तिची उपस्त्री अथवा उप + औरत = उपावरत होईल ना?
-नाठाळ नठ्या
17 Nov 2023 - 2:23 pm | सर टोबी
सहसा ज्यांना माझा प्रतिसाद पटत नाही त्यांना काही समजावण्याच्या अथवा पटवून देण्याच्या फंदात मी पडत नाही. आपापल्या भूमिकेवर ठाम असण्यात काही गैर नसते. पण इथे संपादक मंडळ हि नियामक जबाबदारी आहे कि प्रशासकीय जबाबदारी आहे हा समजुतीचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसते. माझ्या मते संपादन करणे नि नियामक जबाबदारी आहे आणि सदस्य एखादा धागा अथवा प्रतिसाद 'नियमबाह्य' आहे कि नाही ते तपासण्याची विनंती करू शकतात. इथे अमुक एक गोष्ट नियमात बसत नाही असा निर्देश दिल्याबद्दल झाला प्रकार आगाऊपणाचा आहे असे मी म्हटले. तसेच धागा काढून टाका असे सांगण्यामध्ये कुणाचा तरी सन्मान तर नक्कीच नसतो त्यामुळे संबंधित प्रतिसाद चांगला नाही असे समजण्यात अडचण नसावी.
धोरणं हे सर्वसाधारण निर्देशक असतात आणि चालू परिस्थिती कधी कधी धोरणांच्या सीमांचा आपण पुनर्विचार करावा याची आपल्याला जाणीव करून देत असते. त्यामुळे अव्यावसायिक आणि साहित्याशी संबंधित एखाद्या कामाला आपण जाहिरात म्हणणार आहोत का हेही यानिमित्ताने ठरविले जावे.
21 Nov 2023 - 10:51 pm | अमरेंद्र बाहुबली
मला आधी ११०० वाचून वाटलं होतं की चुकून एक शून्य द्यायचा राहीला असावा. पण खाली विनीता मानेंचं स्टेटमेंट पाहून कळालं की ११०० च आहेत. पुरस्काराची रक्कम फारच तोकडी आहे. वडीलांसाठी नी आपल्या मावशीसाठी फक्त ११०० रूपयांचं बक्षीस ठेवावं हे काही पटलं नाही. कुणी खरंच कादंबरी पाठवेल का ही देखील शंका आहे. किंवा २२०० रूपयांत आठ दहा हजारांच्या कथा कादंबर्या जमा कराव्यात नी वाचाव्यात अशी आयड्या वापरली गेली असावी का? असेही वाटतेय. असो. माझी ना कथा प्रसिध्द झालीय ना कादंबरी. माझ्या नशीबात २२०० रूपयांचं भरघोस बक्षीस नाही. :(
- अमरेंद्र बाहुबली (फाॅरेन रिटर्न)
23 Nov 2023 - 11:21 am | विजुभाऊ
एका गृहस्थानी दिवाळी अंक स्पर्धा जाहीर केली होती ( मी मुद्दामच नाव घेत नाहिय्ये)
त्यानी दहा हजार रुपये ( पाच, तीन आणि दोन हजार ) रोख आणि मानपत्र असे पुरस्कार जाहीर केले.
त्यांच्या कडे स्पर्धे साठी असे दोनशे पंधरा दिवाळी अंक आले. यात अनेक मान्यवर दिवाळी अंक देखील होते.
एकूण छापील रक्कम पाहिली तर वीस हजाराच्या वर त्या दिवाळी अंकांची किम्मत जात होती ( तो वेगळा मुद्दा आहे)
स्पर्धेचे निकाल जाहीर झाले. ते व्हॅट्स अॅप वर आले. ज्या दिवाळी अंकाना बक्षीसे मिळाली ती ( वडाचा कोंड जिल्हा रत्नागिरी , नंदूरबार आणि भिवडी ( वणी चंद्रपूर ) या गावांतून प्रकाशीत ( ?) झालेले होते अंकांची नावे कधी ऐकिवाताली नव्हती . ज्याना मानपत्र पुरस्कार मिळाले ती नावे ऐकण्यातली होती.
पण अशा रितीने त्या गृहस्थांस दोनशे पंधरा दिवाळी अंक किरकोळ पैसे ( मानपत्र छापण्याचे ) खर्चून घरपोच वाचावयास मिळाले.
तसेच त्या नंतर त्यानी दिवाळी अंकाची लायब्ररी देखील सुरू केली होती
( ही कल्पना वाटली तरी ती प्रत्यक्षात आलेली आहे )
23 Jan 2024 - 5:24 pm | चौथा कोनाडा
राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी आवाहन.....
------------------------------------------------------
राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी लेखक व प्रकाशक यांचेकडून पुस्तके मागवणेत येत आहेत. कादंबरी, कथासंग्रह व बालसाहित्य या तीन साहित्य प्रकारांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार
1) सदाशिव धों. जठार यांचे स्मरणार्थ
(₹ 2001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह)
2) आकुबाई स. जठार यांचे स्मरणार्थ
(₹ 1501, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह)
3) दोन विशेष पुरस्कार
(शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह)
राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार
1) यशवंत आ. इंदुलकर यांचे स्मरणार्थ
(₹ 2001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह)
2) सरस्वती य. इंदुलकर यांचे स्मरणार्थ
(₹ 1501, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह)
3) दोन विशेष पुरस्कार
(शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह)
राज्यस्तरीय उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार
1) दत्तात्रय स. जठार यांचे स्मरणार्थ
(₹ 1001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह)
2) तातोबा द. पोवार यांचे स्मरणार्थ
(₹ 1001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह)
3) आकुबाई स. जठार यांचे स्मरणार्थ
(₹ 1001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह)
4) तीन विशेष पुरस्कार
(शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह)
------------------------------------------------------
* पुरस्कार वितरण *
20/5/2024 इ. रोजी होईल.
------------------------------------------------------
लेखक, प्रकाशक यांनी 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती व लेखकाचा अल्पपरिचय दि. 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोहोचतील अशा रितीने खालील पत्यावर पाठवाव्यात.
अधिक माहितीसाठी संपर्क
लेखक - बा. स. जठार
98 50 39 39 96
94 20 43 62 56
------------------------------------------------------
पुस्तके पाठवणेचा पत्ता
सौ. रंजना बा. जठार
विद्यासागर निवास, शिंदेवाडी रोड,
गारगोटी, ता. भुदरगड,
जि. कोल्हापूर - 416209
------------------------------------------------------
(कृपया सदर आवाहन इतर ग्रुपवर प्रसिद्ध करावे.)