मांडुक्य उपनिषद

साहना's picture
साहना in काथ्याकूट
15 Aug 2023 - 1:06 pm
गाभा: 

मांडुक्य उपनिषद - १

हा धागा मी मुद्दाम चर्चा मथळ्याखाली काढत आहे कारण हे उपनिषद आहेच तसे. ह्यातील लेखनावर आम्ही चर्चा करू शकतो.

मांडुक्य उपनिषद हे एक अत्यंत छोटे उपनिषद आहे, पण त्याचे वेळी अत्यंत गहन लेखनापैकी एक आहे. मांडुक्य नावाचा उगम काय ह्यावर अनेक मते आहेत. त्यात मी जात नाही कारण तो मुद्दा नगण्य आहे. मांडुक्य उपनिषदांत फक्त १२ ऋचा आहेत. आणि ह्या १२ ओळींचा भारतीय तत्वज्ञान तसेच जीवनावरील प्रभाव अत्यंत मोठा आहे.

गौडपादाचार्य ह्या ऋषींनी ह्या उपनिषदावर लिहलेली टीका खूप महत्वाची आहे. गोव्यांतील कवळे मठ हा गौडपादाचार्यांच्या परंपरेतील आहेत. त्यानंतर आदिशंकराचार्य ह्यांची अद्वैत वेदान्ताच्या दृष्टिकोनातून लिहिलेली टीका सुद्धा खूप लोकप्रिय आहे. मध्वाचार्य ह्यांनी द्वैत वेदान्ताच्या दृष्टिकोनातून लिहिलेली (ज्यांच्या संप्रदायातून मी आहे) टीका सुद्धा लोकप्रिय आणि महत्वाची आहे. काहींच्या मते गौडपादाचार्यानीच हे उपनिषद लिहिले असावे कारण त्यांच्या टीकेच्या व्यतिरिक्त ह्या उपनिषदांचे लिखित स्वरूपांत काहीही प्रमाण नाही.

टीप : लहानपणी "टीका" ह्याचा अर्थ मला "criticism" असा वाटायचा. त्यामुळे शाळेंत लोकमान्य टिळकांनी गीतेवरील टीका लिहिली अश्या गोष्टी वाचून लोकमान्यांना गीता आवडत नसावी असे माझ्या बाळबोध मनाला वाटायचे. टीका ह्याचा अर्थ "commentary" किंवा "स्पष्टीकरण" असा सुद्धा होतो हे ठाऊक नव्हते.

हिंदू तत्वज्ञानाचा मूळ प्रश्न हा आहे कि आपले अस्तित्वाचे मूळ तत्व काय आहे ? Nature of reality. आधुनिक भौतिक शास्त्रज्ञांनी जसे श्रॉडिंगेर ह्याचे पुस्तक what इस life, डेविड डॉइश ह्यांचे फॅब्रिक ऑफ रिऍलिटी, ह्यांत सुद्धा ह्या प्रश्नांचा उहापोह झाला आहे.

भारतीय तत्वज्ञानात "ब्रम्ह" हि संकल्पना आहे. हीच संकल्पना विविध इतर शब्दांत वर्णित केली गेली आहे इंग्रजी भाषेतून हाच विषय लिहीत असताना "conciousness" (चेतना) हा शब्द वापरला जातो. पण शब्द काहीही असले तरी संकल्पना हि शब्दांच्या आणि वर्णनाच्या पलीकडली आहे असे सुद्धा सर्वच लोक नमूद करतात.

मांडुक्य उपनिषद अश्या साठी महत्वाचे आहे कि ते सरळ विषयाला हात घालते आणि जास्त सोप्या पद्धतीने चेतना किंवा ब्रम्ह हि संकल्पना स्पष्ट करते.

हरिः ओम् । ओमित्येतदक्षरमिदं सर्वं तस्योपव्याख्यानं भूतं भवद्भविष्यदिति सर्वमोङ्कार एव | यच्चान्यत्त्रिकालातीतं तदप्योङ्कार एव ॥ १ ॥

हरी ओम, ओम ह्या अक्षरांत सर्व काही समाविष्ट आहे, भूत वर्तमान आणि भविष्य तिन्ही आणि ह्या तिन्हीच्या पलीकडले सुद्धा
(सर्व भाषांतरे माझी स्वतःची आहेत.)

मांडुक्य उपनिषद २४०० ते १८०० वर्षे जुने आहे असे मानले जाते. कुठलेही तत्वज्ञान हे पोकळीतून निर्माण होते नाही. ते त्या आधीच्या तत्वज्ञानावर आधारीत असते. त्यामुळे ह्यातील संकल्पना ह्या बऱ्याच जुन्या आहेत. हा काळ जागतिक इतिहासांतील लोहयुगाचा काळ आहे. घोड्यांचे खोगीर, सुश्रुत संहिता, दक्षिण भारतातील विशेष कार्बन स्टील इत्यादींच्या शोध ह्याच काळांतला.

ओम ह्यांत सर्व काळ आहे म्हणजे नक्की काय ? कि उगाच कवी कल्पना म्हणून ह्या ऋचेला आम्ही वाचून सोडून द्यायचे ? त्यासाठी पुढील ओळी वाचल्या पाहिजेत.

> सर्वं ह्येतद् ब्रह्मायमात्मा ब्रह्म सोऽयमात्मा चतुष्पात् ॥ २ ॥

हेच सर्व ब्रम्ह आहे. हेच आत्मा आहे आणि आत्म्याला ४ पाय आहेत.

ओम जो काळ आणि कालनिरपेक्ष असे दोन्ही आहे तोच ब्रम्ह आणि तोच आत्मा आहेत आणि आत्मा ला ४ पाय आहेत. ब्रह्म समजावून सांगणारी लेखाने कमी आणि त्यांत आम्हाला समजणारी लेखने आणखीन कमी. पण मांडुक्य उपनिषद सरळ विषयाला हात घालून ओम म्हणजे ब्रम्ह म्हणजे आत्मा आणि आत्म्याला ४ पाय असे सांगते. चार पाय म्हटले कि हे पाय काय आहेत हा विचार सहज मनात येतो.

आता थोडे विषयांतर घेऊया. भारतीय तत्वज्ञानात वर मी लिहिलेला प्रश्न महत्वाचा असला तरी त्याचे उत्तर मात्र सोपे आहे. स्वतःची जाणीव, चेतनेची जाणीव होण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे अविद्या जाणे आणि विद्या येणे. ज्ञान येणे. पण ज्ञान कसे यावे ह्याचे मार्ग अनेक आहेत. सांख्य तत्वज्ञान सांगते कि ज्ञान येण्यासाठी आम्ही सर्व ज्ञानाला विविध छोट्या भागांत विभाजित करू शकतो. मग त्या विभागांचा अभ्यास केला तर त्या विभागांचे जे घटक आहेत त्यांना वेगळे अभ्यासायची गरज कमी होते. पाश्चात्य तत्वज्ञानात ह्याला सर्वांत समांतर काही असेल तर ते आहे inductivism.

कावळे हे एक विभाजन आहे. कावळे काळे असतात हे आम्ही अनुभवाने पाहतो. त्यामुळे अमुक पक्षी कावळा आहे आहे असे कुणी सांगतले तर तो काळा असेल असे आम्ही म्हणून शकतो. हे झाले अत्यंत बाळबोध तर्कट. पण प्रत्यक्ष जीवनात, आम्ही ह्या प्रकारच्या ज्ञानाला खूप वापरतो. पाश्चात्य epistemology मध्ये सुद्धा अश्या प्रकारच्या ज्ञानाचा खूप उहापोह झाला आहे.

मानवी मन असे आहे कि आम्हाला सांख्यवादा प्रमाणे enumereted गोष्टी पासून शिकायला आवडते. जेवणाची रेसिपी हि स्टेप्स मध्ये दिली जाते. गणिताची प्रमेये स्टेप्स मध्ये समजावून सांगितली जातात आणि त्याच प्रमाणे विविध गोष्टी समजावताना लोक "अमुक शिकायच्या तीन पद्धती आहेत", "अमुक हे तीन पद्धतीचे असते" अशी विधाने तुम्हाला सर्रास आढळून येतील. रसायन शास्त्रांतील पिरियॉडिक टेबल च्या त्या विशिष्ट पद्धती मुळे सर्व एलेमेंट्स चा अभ्यास किती सुकर होतो हे आम्ही पहिले आहे.

त्यामुळे आत्म्याला ४ पाय आहेत असे म्हटल्यावर अचानक आमच्या मनाचे कुतूहल जागृत होते. पण ४ पाय असे का म्हटले जाते ? ४ अवस्था का नाही ? कारण तुम्ही संस्कृत विद्वानांच्या दृष्टिकोनातून पहा. गुगल, पुस्तके सुद्धा नाहीत तेंव्हा आठवण ठेवण्यासाठी "पाय" सोपे आहे कारण पाय एक तर २ किंवा ४ असतात. अवस्था कितीही असू शकतात. संस्कृत भाषेंत म्हणून तुम्हाला असे शब्दप्रयोग सर्रास आढळून येतील. पण शंकरांच्या मते पाद हा गायीचा पाय अश्या पद्धतीचा पाद नसून एक चतुर्थांश असा घेतला पाहिजे. मला वाटते फरक पडत नाही.

जागरितस्थानो बहिष्प्रज्ञः सप्ताङ्ग एकोनविंशतिमुखः स्थूलभुग्वैश्वानरः प्रथमः पादः ॥ ३ ॥

प्रथम पाद हा वैश्वानर आहे ज्याला ७ हात आणि १९ मुख आहेत आणि हा जागृत अवस्थेत बाहेरील जगाला समजून त्यांच्याशी संबंध जोडणारा आहे.

जागृत आणि बाहेरील जगाची जाणीव ठेवणारा म्हणजे काय ? तर स्थूल शरीर वापरून आम्ही आमच्या बाहेरील वस्तूंचे अस्तित्व जाणून घेतो. ह्या साठी आम्ही जागृत असणे गरजेचे आहे. कारण शरीर निद्रा अवस्थेत असताना आम्हाला शरीर असले तरी बाहेरील जगाशी आपला संबंध तुटतो. ७ हात आणि १९ मुखे म्हणजे काय ? तर ह्यावर अनेक टीकाकारांनी भाष्य लिहिले आहे. ७ हाथ म्हणजे पंचमहाभूते आणि सूर्य अग्नी इत्यादी. मानवी जीवन ह्यामुळे साध्य झाले आहे आणि बाह्य जगाशी संबंध ठेवण्यासाठी ह्यांचे अस्तित्व महत्वाचे आहे असे ह्यांचा अर्थ आहे. १९ मुख म्हणजे ५ ज्ञानेंद्रिये, ५ कर्मेंद्रिये, ५ प्रकारचे प्राण आणि मनाच्या ४ अवस्था. हे आपले बाह्य जग समजण्याचे "सेन्सर्स" आहेत. असे शंकर लिहितात.

ह्यावर जास्त लिहिण्याच्या आधी आम्ही इतर ३ पाद पाहू.

स्वप्नस्थानोऽन्तः प्रज्ञाः सप्ताङ्ग एकोनविंशतिमुखः प्रविविक्तभुक्तैजसो द्वितीयः पादः ॥ ४ ॥

दुसरा पाद हि स्वप्नस्थिती आहे आणि ह्याचे नाव तैजस असे आहे. ह्याची दुनिया स्वप्नातील दुनिया असून ह्याला फक्त अंतर्गत संकल्पनांची जाणीव आहे आणि स्थूल जीवनाशी त्याचा संबंध येत नाही. ह्याला सुद्धा ७ हात आणि १९ तोंडे आहेत.

स्वप्न स्थिती वर आधुनिक विज्ञानाने सुद्धा अभ्यास केला आहे. प्रथम पाद म्हणजे वैश्वानराने बाह्य जगाशी जो संबंध निर्माण केला त्याचे प्रतिबिंब मनांत आंत निर्माण होते. ह्या प्रतिबिंबाशी खेळ करू शकतो तो तैजस. आधुनिक विज्ञानाचे सुद्धा हेच मत आहे. स्वप्ने किंवा कल्पनेसाठी मानवी मन फक्त ज्या गोष्टी आधी पहिल्या आहेत त्यांनाच तोडून मोडून नवीन कल्पना निर्माण करू शकते.

वैश्वानर ह्यांतील वैश्व हा शब्द विश्वासही संबंधित आहे कारण बाह्य जगाशी संबंध विश्व् अस्तित्वांत असल्यामुळेच येऊ शकतो. पण स्वप्न स्थितीतील जग हे निव्वळ प्रकाशपद्धतीचे असल्याने त्याला "तैजस" असे म्हटले आहे. कारण हे सूक्ष्मातील आहे. आधुनिक भाषेंत सांगायचे झाले तर मेंदूतील न्यूरॉन्स मधील विजेमुळे निर्माण झालेले आहे.

यत्र सुप्तो न कञ्चन कामं कामयते न कञ्चन स्वप्नं पश्यति तत्सुषुप्तम् । सुषुप्तस्थान एकीभूतः प्रज्ञानघन एवाऽऽनन्दमयो ह्यानन्दभुक् चेतोमुखः प्राज्ञस्तृतीयः पादः ॥ ५ ॥

जो अत्यंत गाढ झोपेंत आहेत ज्याला कसलीही "कामना" नाही आणि जो काही स्वप्नही पाहत नाही. ह्या अत्यंत गाढ झोपेंत जो झोपला आहे त्याला कसल्याही अनुभवांत फरक जाणवत नाही. त्याच्यासाठी सर्व काही समान आहे. एक आनंदमयी अवस्थेंत तो आहे त्याचे नाव प्राज्ञ असे आहे. इथे एकीभूत आणि सुषुप्ती हे शब्द वापरले गेले आहेत.

शंकरभाष्य अत्यंत वाचनीय आहे. जेंव्हा काळोख होतो तेंव्हा काय होते ? तर आम्हाला काहीही दिसत नाही. त्यामुळे आजूबाजूला जे काही आकार आहेत ते सर्व काही एकच किंवा एकीभूत वाटतात. गडद अंधारात बाजूला वाघ असो वा आणखीन कुणी, काहीही फरक पडत नाही कारण डोळ्यांना ते दिसत नाही.

पण प्राज्ञ स्थितीत, प्रत्यक्ष बाह्य जगाचाही प्रकाश नसतो आणि तैजस प्रमाणे मनाचा प्रकाश सुद्धा नसतो. त्यामुळे एक वेगळ्या सूक्ष्म पातळीवरील अंधार असतो जिथे सर्व अस्तित्वावर एक प्रकारच्या काळोखाचा पडदा पडतो. फक्त डोळयांपुढे अंधार असला म्हणून मन शांत होत नाही. काळोखांत आपले मन विविध विचार करते आणि आम्हाला अस्वस्थ करू शकते पण इथे मन सुद्धा निद्रा अवस्थेत असल्याने सर्व काही आम्हाला समान असते. ह्या स्थितीला मांडुक्य उपनिषद आणि शंकर त्यांच्या भाष्यांत "आनंदमयी" अवस्था असे म्हणतात. बाह्य जगाचे अस्तित्वच संपल्याने तुम्हाला इथे सामान्य असे कुठलेही भय चिंता सतावत नाही.

आम्ही वैश्वानर आणि तैजस चा अनुभव नेहमीच घेतो पण प्रज्ञा अवस्थेचा अनुभव आम्ही नेहमी घेऊ शंकत नाही. ह्या अनुभवासाठी साधना महत्वाची आहे. साधना नाही तरी निव्वळ योगायोगाने तुम्हाला हा अनुभव येऊ शकतो कधी कधी गाढ झोपेच्या गोळ्या, general ऍनेस्थेशिया, इतर प्रकारचे ड्रग्स इत्यादींनी ह्या अनुभवांना आम्ही प्राप्त करू शकतो.

एष सर्वेश्वरः एष सर्वज्ञ एषोऽन्तर्याम्येष योनिः सर्वस्य प्रभवाप्ययौ हि भूतानाम् ॥ ६ ॥

हा सर्वांचा ईश्वर आहे जो आंत राहून सारणाचे संचालन करतो, जो सर्वज्ञानी आहे आणि ज्यांतून सर्वांचा उगम होतो आणि सर्वांचा अंत ज्यांत होतो तो ईश्वर ! ह्या चतुर्थ अवस्थेला गौडपादाचार्यानी तुर्या असे सुद्धा नाव दिले आहे.

हा सर्वांत समान आहे. आम्ही हेच आहोत You are that हे समजणे म्हणजेच ब्रम्हज्ञान आहे.

पहिल्या दोन अवस्था आम्ही स्वतः दररोज अनुभवतो त्यामुळे आम्हाला त्या सहज मान्य आहेत. प्रज्ञा अवस्था कठीण असली तरी विविध मार्गानी काही क्षणापुरती का असेना आम्ही क्वचित हि अवस्था प्राप्त करू शकतो. मी स्वतः हि आनंद अवस्था अनुभवली आहे त्यामुळे ह्यांत तथ्य आहे हे मी स्वतः ठाम पणे सांगू शकते.

पण ४ अवस्था जी आहे ती मात्र आम्ही सहजा सहजी प्राप्र्त करू शकत नाही किंबहुना एकदा त्या स्थितीत पोचल्यानंतर इतर तिन्ही अवस्था आम्हाला लागू होत नाहीत.

मांडुक्य उपनिषद चे राहिलेल्या ऋचा आम्हाला ओम आणि ह्या ४ पादांचा संबंध सांगतात.

ओम शब्द
अ उ आणि म ह्या उच्चरां पासून बनलेला आहे आणि अ म्हणजे वैश्वानर, उ म्हणजे तैजस आणि म म्हणजे प्राज्ञ आणि तिन्ही मिळून ओम बनतो. पण ओम च्या पलीकडे असलेली तुर्या अवस्था हि उच्चारातीत आहे.

प्राज्ञ स्थती हि इतर पूर्वीच्या दोन पादांची बेसिस आहे.

म्हणजे असे पाहू शकतो.

- वैश्वानर बाह्य जगाशी संबंध ठेवतो. त्यातून मनांत विविध आठवणी आणि अनुभव निर्माण होतात.
- तैजस बाह्य जगांत पाहत नाही पण स्वतःच्या आंत पाहतो. इथे आठवणी आणि अनुभव असतातच पण त्या शिवाय मनाच्या इच्छा आणि कामना सुद्धा असतात. ह्या सर्वांची सांगड घालून मनरूपी प्रकाशाने तैजस आपले एक विश्व निर्माण करतो. एकाअर्थी, वैश्वानराचे संपूर्ण अस्तित्व त्यामुळे तैजस चा सबसेट आहे असे आम्ही समजू शकतो.
- पण प्राज्ञ मध्ये दोन्ही वैश्वानर आणि तैजस समाविष्ट आहेत. प्रज्ञा मधून आम्ही जागृत होतो तेंव्हा हळू हळू आपली स्वप्नस्थिती आणि बाहय जगाचे अनुभव आणि आठवणी पुन्हा आमच्या जाणिवेत येतात. त्याच प्रमाणे आम्ही गाढ झोपेंत म्हणजे प्रज्ञा मध्ये जातो तेंव्हा हीच स्वप्ने आणि आठवणी त्यांत विलीन होतात.

मांडुक्य उपनिषद म्हणते कि ओम आम्ही वेगाने म्हटले असता आवाज फक्त म कार ऐकू येतो ओ आणि म असे दोन वेगळे आवाज ऐकू येत नाहीत.

ज्या व्यक्तीला प्राज्ञ स्थिती समजते त्या व्यक्तीला इतर दोन्ही स्थिती आणि पर्यायाने संपूर्ण अस्तित्व समजू शकते. पण तयारीस सुद्धा प्राज्ञ स्थिती हि जागृत आणि स्वप्न अवस्था आणि पर्यायाने "माया" चा दरवाजा आहे. प्राज्ञ स्थितीत आत्मा ची जाणीव नसते. आपणच आत्मा आणि ब्रह्म आहोत है ज्ञान नसते.

ह्या प्राज्ञ निद्रा अवस्थेला सुद्धा जेंव्हा आम्ही खोटी अवस्था म्हणून समजतो तेंव्हा आम्ही "तुर्या" अवस्थेत पोचतो. काश्मिरी शैव पद्धतीत तुर्या चे ६ स्टेजेस सांगितले आहेत पण त्यावर आणखीन कधी लिहू.

तुर्या चा एक महत्वाचा मुद्दा राहिला. गौडपादानी सांगितले आहे कि तुर्या हि चतुर्थ पाद म्हणून वेगळी न पाहता इतर तिन्ही पादांची मूळ म्हणून पहिली पाहिजे. उदाहरणार्थ स्वामी सर्वप्रियानंद सांगतात कि आम्ही जेंव्हा चित्रपट पाहतो तो प्रत्यक्षांत एका पांढर्या पडद्यावर प्रकाशित केला जातो. तो पडदा तिथे नेहमीच असतो पण आम्हाला त्याची जाणीव नसते.

प्रतिक्रिया

समजत नाही म्हणून प्रश्न नाहीत.

प्रसाद गोडबोले's picture

16 Aug 2023 - 12:30 am | प्रसाद गोडबोले

समजले आहे , संदेहच नाही , म्हणुनही प्रश्न नाहीत !

अगदी अगदी. एव्हढेच माहित आहे कि आत्मू अमर आहे. पु ल वाचा. गुर्द्यावर विश्वास ठेवा. प्रश्न विचारायचे नाहीत. बुद्धि काढून बाधून बाजूला ठेवा.
हे सगळ केलं. पण समजलं नाही. आपण करंटे म्हणून सोडून द्यायचे.

प्रसाद गोडबोले's picture

16 Aug 2023 - 12:45 am | प्रसाद गोडबोले

उत्तम लेखन !
मला आजकाल उपनिषदांविषयी काहीही वाचले की अमृतानुभवातील ही ओवी आठवते :

म्हणोनि उपनिषदें । दशे येति निंदे ।
निंदाचि विशदें । स्तोत्रें होती ॥ ९-५१ ॥

आत्मतत्वाचे कितीही वर्णन करायला जावा , जितके बोलाल तितके ते अपुर्ण आहे ,अनृत आहे, असत्य आहे , "The moment truth is asserted, it becomes false." म्हणुन उपनिषदे जितके जितके म्हणुन वर्णन करायला जात आहेत तितके तितके अपुर्ण असल्याने निंदा केल्या सारखेच आहे. आणि मग शेवटी उपनिषदे नेति नेति अर्थात हे नाही हे नाही अशी एक प्रकारे निंदा करत आहेत तेच आत्मतत्वाविषयीचे स्तोत्र होत आहे !

घालिता अव्हासव्हा पाय । शिवयात्राचि होतु जाय ।
शिवा गेलियाही नोहे । केंही जाणें ॥ ९-५३ ॥

एकदा ब्रह्मस्वरुप शिवस्वरुप झालेल्या माणासाने कोठेही पाय उचलला तरी ती शिवयात्रा केल्यासरखेच आहे कारण त्याच्या लेखी सर्वं खल्विदं ब्रह्म च आहे , आणि मग तो शिवदर्शनाला गेला तरी कोठेही न गेल्यासारखेच आहे कारण सर्वत्रच शिव आहे आणि येणे जाणे आणि येणारा जाणारा हे देखील शिव च आहे तर मग सर्वकाही करुन न केल्यासारखेच आहे !

- लेखनाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद !

अभिजीत's picture

16 Aug 2023 - 9:56 pm | अभिजीत

अतिशय सुंदर लिहिलंय.
एकूण बारा श्लोकातील पहिले सहा लेखात आलेत. अर्थात उरलेले सहा नाहीत म्हणून लेख अजिबात अपूर्ण वाटत नाही.

मोक्ष-मुक्ती या पारलौकिक संकल्पना आहेत असा बऱ्याचदा समाज असतो. मोक्ष म्हणजे पुनर्जन्म नाही त्यामुळे मोक्ष मानवी जीवन संपल्यानंतर तर त्यावर विश्वास ठेवून आयुष्य जगणे हे आधुनिकतेच्या काळात अवघडच आहे. या पार्श्वभूमीवर मांडुक्य उपनिषद मानवी आयुष्यात जिवंतपणी मोक्षाचा मार्ग दाखवते. अशा जीवनमुक्ती नंतर आयुष्यात येणाऱ्या परिस्थितीला स्थितप्रज्ञ वृत्तीने तोंड देत कृतकृत्य आयुष्य जगण्याचा मार्ग सर्वच उपनिषदं दाखवतात.

गणपती अर्थवशीर्षात ‘त्वं अवस्थात्रयातीत:’ हा मंत्र म्हणजे मांडुक्य उपनिषदाचं सारच आहे. ईश्वरप्राप्तीचे विविध मार्ग उपनिषदांनी दिले आहेत. ‘अवस्थात्रयविवेक’ हा असाच एक मार्ग (methodology) जो मांडुक्याने शिकवलेला आहे.

‘ईश्वराचं अस्तित्व सिद्ध होत नाही म्हणून आम्ही aethist किंवा agnostic!’ किंवा ‘आधुनिक शास्त्रात (science) जसे प्रयोग करून सिद्धता मिळवता येते तशी सिद्धता आध्यात्मात नाही’ वगैरे वाद-प्रतिवाद (arguments याअर्थी) आपण नेहमीच बघतो. उपनिषदांनी अनेक methodologies दिलेल्या आहेत. या methodologies हजारो वर्षं शिकवल्या गेल्या आणि त्या शिक्षणाचा फायदा त्या त्या काळच्या सर्व पिढ्यांना झाला. कारण आजच्या काळातही ही परंपरा सुरू आहे. या methodologies successful होतात म्हणूनच हे ज्ञान सनातन (नित्यनूतन आणि चिरंतन) आहे आणि हजारो वर्षं त्यात वृद्धी होत आहे. अन्यथा कालौघात हे ज्ञान विस्मृतीत गेलं असतं.

ॐ तत् सत्

मांडुक्योपनिषदातील प्रथम पाद आणि सांख्यांची तत्वे बरीचशी समान दिसतात.

यं त्रिधात्नानमात्मस्थं वृतं षोडषभिर्गुर्णै |
प्राहु:सप्तदशं सांख्यास्तमै सांख्यात्मने नमः|
यातले १६ गुण म्हणजे पंचमहाभूते, ५ ज्ञानेंद्रिये आणि ५ कर्मेंद्रिये आणि १६ वा गुण म्हणजे मन.

मात्र मूळतत्वे समान असूनही सांख्य उघडपणे निरिश्वरवादी असून मांडुक्योपनिषद एष सर्वेश्वरः म्हणत आपला भिन्नपणा स्पष्टपणे दाखवते असे दिसते.

यातले १६ गुण म्हणजे पंचमहाभूते, ५ ज्ञानेंद्रिये आणि ५ कर्मेंद्रिये आणि १६ वा गुण म्हणजे मन.

'गुण' म्हटले की आधी सत्व-रज-तम हे त्रिगुण आठवतात. अष्टधा प्रकृती म्हणजे पंच-महाभूते आणि तीन गुण, आणि या प्रकृतीचे मूळ रूप 'कल्पना' हे आहे:

निश्चळामधें चंचळ । ते चि कल्पना केवळ ।
अष्टधा प्रकृतीचें मूळ । कल्पनारूप ॥ ५ ॥
कल्पना तेचि अष्टधा प्रकृति । अष्टधा तेचि कल्पनामुर्ती ।
मुळाग्रापासून उत्पत्ति । अष्टधा जाणावी ॥ ६ ॥
पांच भूतें तीन गुण । आठ जालीं दोनी मिळोन ।
म्हणौनि अष्टधा प्रकृति जाण । बोलिजेते ॥ ७ ॥
(श्री दासबोधः दशक अकरावा, समास पहिला)

(कबीरः "आठ कँवल दल चरखा डोलै।
पाँच तत्त्व, गुन तीनी चदरिया॥)

-- सांख्यदर्शनात 'सोळा गुण' म्हटले असून त्यात पंचमहाभूते आहेत, पण 'त्रिगुण' नाहीत ?

प्रचेतस's picture

17 Aug 2023 - 2:40 pm | प्रचेतस

त्रिगुण तर अर्थातच आहेत. सांख्यांची पुरुष आणि प्रकृती ही दोन मूलतत्त्वे. साहजिकच सांख्य निरीश्वरवादी गणले गेले. प्रकृती ही सत्व, रज आणि तमोगुणांची मिळून बनलेली आहे.

ह्याखेरीज सांख्यांमध्ये अधिकाधिक तत्वेही समाविष्ट होत गेली त ती येणेप्रमाणे-

आत्मा (पुरुष)
प्रकृती (त्रिगुण)
पाच ज्ञानेंद्रिये ( नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान)
पाच कर्मेंद्रिये (हात, पाय, तोंड, गुद आणि गुप्तेन्द्रिय)
पाच जाणिवा (गंध, रस, रूप, स्पर्श, शब्द)
पाच महाभूते (पृथ्वी, जल, आकाश, तेज, वायू)
तीन अंत:करणे (मन, बुद्धी, अहंकार)

ह्याखेरीज सांख्यांत अधिकची सहा तत्वेही नंतर समाविष्ट झाली.

श्वेता व्यास's picture

17 Aug 2023 - 12:32 pm | श्वेता व्यास

अतिशय सुंदर विवेचन!

अहिरावण's picture

17 Aug 2023 - 1:52 pm | अहिरावण

छान लेखन

कर्नलतपस्वी's picture

17 Aug 2023 - 2:51 pm | कर्नलतपस्वी

ज्ञानात भर पडत आहे.

लेख, प्रतिसाद दोन्ही उत्तम.
धन्यवाद.

सस्नेह's picture

18 Aug 2023 - 10:33 pm | सस्नेह

लेख आवडला.
लेखकाचे नाव नीट डोळे उघडून दोनदा पाहिले.
साहनातै गल्ली चुकल्या की काय, वाटलं.