अविभाज्य अमेझोनचा (Amezon Prime) सन्माननीय सदस्य म्हणून कंपनीने सुचना पाठवली की भोला सिनेमा आपण चकटफू बघू शकता.
हल्ली ही कंपनी सुद्धा भारी लब्बाड झालीयं.सिनेमे भाड्या ने(मुळ शब्द भाडे याचे ब.व.,घराचे भाडे,बसचे भाडे सारखे) किंवा विकतही देतात. पहिल्यांदा असे काही नव्हते.अ.प्रा वर पुर्व प्रकाशित २१ सरफरोश मी फुकट पाहीला पण आता मात्र पैसे मोजावे लागतात.(बरे झाले मी लवकर पाहीला)
साX, विपणन तज्ञ (Marketing Expert) सुद्धा एक भारीच जमात आहे.आपला ढोल आणी ग्राहकाचा बॅण्ड कसा जोरात वाजवायचा यांना बरोबर समजते.
खुल्या चित्रपटगृहाची सवय, बंद चित्रपटगृहांत बसवत नाही.आता अंतरजालावर सोईस्कर वाटते. ना ड्रेस कोड,ना वाहातूक कोंडीचा झोल,ना समय की पाबंदी.गाजराची पुंगी,आवडला तर ठीक, बघायचा नाही तर यादीतून काढून टाकायचा. खूप आवडला तर एकाच बैठकीत नाहीतर मग सवडी नुसार,तुकड्या तुकड्यांनी.
दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी, तत्पूर्वी थोडावेळ अ.प्रा.बघणे हा खरं पाहिलं तर नित्यक्रम.भोला चित्रपट बघावा म्हणून टिचकी मारली.तसा हा चित्रपट मार्च मधेच सिनेमागृहात प्रकाशीत झाला होता पण अ प्रा वर आताच आलायं.
Bholaa, an ex convict endeavours to meet his daughter for the first time...... Blah,Blah
गणमान्य सितारे,अजय देवगण, तब्बू ,कनिश्ठ बच्चन (गेश्ठ आपियरन्स) मधे वगैरे वगैरे वाचून वाटले आजची दुपार चांगली जाणार असे वाटले.
वाटलं,राजश्री पिक्चर्स सारखी एखादी कौटुंबिक इश्टोरी असावी. म्हंजे असं बघा की,एक हॅप्पीली मॅरीड कपल,हम दो हमारा दो,असं म्हंजे सगळं काही मस्त आनंदात वगैरे चाललं असताना म्हंजे मधेच काहीतरी लोचा होणार वगैरे,म्हंजे बघा की कसे,नवरा लाच खाण्याच्या खोट्या आरोपात, किंवा खोट्या खुनाच्या आरोपात तुरूंगात वगैरे असे काही तरी. (इथे तुम्हाला कदाचित हास्यकवी नायगावकर काकांची आठवण येऊ शकते). पण असे काहीच नाहीये. थांबा सांगतो पण थोडं हं.
चित्रपटाची सुरवातच लई भारी,
हिरोईन,जांबाज पोलीस अफसर. टिप (सुचना) मीळते म्हणून हेरॉईन का काय ते पकडायला फोर्स घेऊन पाठलाग करतेयं,कधी बदमाश पुढे, कधी पोलीस मागे,कधी पोलीस मागे तर बदमाश...
बदमाशांचा ट्रक महामार्गा वरून भरधाव पळतोयं पण रस्त्यावर इतर कुठल्याच गाड्या दिसत नाही. फक्त ट्रक व पोलिसांच्या आठ दहा आर्मडा, एका मागोमाग होत ट्रकला घेरण्याचा प्रयत्न करतात.दोन्ही बाजुने अंदाधुंद गोळीबार चालू , अगदी फार्मुला वन सारखी शर्यत बघायला मीळते.
कधी बदमाशांचा नेम बरोबर तर कधी पोलिसांची गोळी किसी बदनसिब बदमाश का सिना छलनी करताना दिसते.बदमाशाची एक गोळी हिरॉईनच्या खांद्याला चाटून जाते ( काश मै वो काडतूस होता. असा एक फडतूस विचार क्षणभर मनाला चाटून गेला. आता मनाचं काय हो! सुधीर मोघे म्हणतात, मन गरगरते आवर्त, मन रानभूल मन चकवा...).बहादूर हिरोईन अस्पताल जात नाही पण आर्म स्लिंग पट्टी (हात लटकवायची पट्टी) कुठूनतरी, कोणीतरी आणून देते ( काय की बुवा, स्पाॅट ब्वाय,मेकप मॅन).हायला खांदा जखमी झाला तर फिगर ऑफ एट्ट पट्टी बांधायला हवी पण आर्म स्लिंग पट्टी का दिली असावी हे अजूनही मला कळाले नाही.जाऊ द्या आपल्याला काय करायचंय.शेवटी काळा चश्मा घातलेली जखमी बहादूर हिरोईन आपली गाडी ट्रकच्या समोर आणते व समोरून ड्रायव्हरला गोळी घालते.
मग पुढे दोन तास,एकुण साठ (५९) मिनीटे हिरोईनचा हात पट्टी मधेच लटकलेला तो सुद्धा उजवा.
हिरोईनचा एक खांदा जायबंदी असल्याने इकडून तीकडे पळा पळीचे नृत्य किंवा झाडाला लपेटत गाणे म्हणणे वगैरे असे काही प्रसंग चित्रीत केलेले दिसत नाही (Very original नं).
बदमाशांचा ट्रक ताब्यात घेण्यात पोलीस यशस्वी होतात.कमिशनर खुश, घरी जंगी पार्टी वगैरे. ट्रक मधले सामान पोलीस चौकीत. चौकी बहुदा साहेबांच्या म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील.
पोलिसांचा खबरी डाॅनच्या गोटात पण डाॅनचा खबरी,बदमाश पोलीस मात्र पोलिसांच्याच गोटात .
असो, कोणीतरी,माहीत नाही कोणी पार्टीच्या दारू मधे झोपेचे औषध मिसळतो.एन्टीबायोटीक घेतले असल्याने हिरोईन मद्यपान करत नाही व बाकीचे पोलीस तीस एम एल मधेच आडवे पडतात व झोपेची एक्टींग मस्त करतात.(हायला आम्हाला पण झोपेची एक्टिंग भारी येते. दुपारी झोप येत नाही पण दुपारचा चहा बनवायचा असेल तर....).
अरे, सगळी ईश्टोरी सांगीतली तर तुम्ही शिणेमा कशाला बघाल.पण तरी थोडीशी सांगतो, इथेच आपल्या हिरोची (भोला)हिरोईनशी भेट होते. हिरोची जन्मठेप सद्वर्तनामुळे चार वर्ष माफ होते. मग तो आपल्या घरी जायच्या ऐवजी कमिशनरच्या बंगल्या जवळ कसा काय,जानने के लिये....
हिरो, ज्याचं नाव भोला,म्हणजे तसला भोला (मी बाई भोळा ग भोळा खातो पुरणाचा गोळा) नाही तर भोला भंडारी (शंकर),एका प्रसंगात एकटाच सत्तर बदमाशांची वाट लावतो.ज्युडो,कराटे,ताई का वांडू सग्गळ सग्गळ कौशल्य हिरो पणाला लावतो.आता तुम्हाला शंका येईल, खरेच सत्तर का? तर मी म्हणेन शंकानिरसन करून घ्याची असेल तर शिणेमा बघण्याची जोखीम पत्करावी.(नाहीतर मित्रावर विश्वास ठेवा)
अरे हो,एक सांगायचे राहिलेच की, कोणत्या बी मारामारीच्या आदुगर हिरो खिशातून एक पुडी काढतो (चुकीचा अर्थ काढू नका,ड्रग्ज नाही) त्यातले भस्म कपाळभर चोपडतो, अगदी मळवट भरल्यागत, मग म्हणे यमाचा बाप सुद्धा त्याचे शष्प( शब्द समृधी मिपा मुळेच बरं का!) सुद्धा वाकडे करू शकत नाही.आता नाव भोला म्हणलं की भस्म,त्रिशूल,गंगा की धारा वगैरे सर्व हवेच ना!
चित्रपटात सारखं हॅपनिंग आहे. प्रेक्षक खुर्चीला चिटकून रहायचा प्रयत्न करतो.पो. चौकीवर बदमाशांचा हमला.चौकीतले बचे खुचे पोलीस पळून जातात. बाकी पोलीस अस्पताल मधे भरती.आता चौकीत फक्त सौरभ शुक्ला (हा नट मला फार आवडतो. याचा कुठलाच पिच्चर मी सोडत नसतोय बघा),एक मुलगी व तीन मुले कुठल्या तरी आरोपात पकडलेली,काही कच्चे कैदी (चौकीत म्हंजे कच्चेच ना पण पक्के बी असू शकतील!)एस. पी.डायना,(हिरोईन), (सुपारीटेंडर, हायला एटो करेक्ट,लई बेक्कार क्रियेटीव्हीटी. मला म्हणायचंय सुप्रीटेण्डट ऑफ पोलीस ) सुरूवातीला डायन असेच ऐकू आले.काय करणार वय झालंय, आणी आपला हिरो.एकटा हिरोच जे काय करायचंय ते करतो बाकी सारे तळघरात.
काय सांगू तुम्हाला,एक अद्भुत शस्त्र कधीच बघीतले नाही.एकटा हिरो त्या स्वयंचलित शस्त्राने हजारभर बदमाशांना सहज ठार मारतो. तुम्हाला म्हणून सांगतो त्या शस्त्रा सोबत गोळ्यांचा पट्टा (Ammunition Strip) एवढा मोठ्ठा की जशी मारूतीची शेपटी. संपतच नाही. म्हणतात ऋषीचं कुळ,नदीचं मुळ कधी शोधू नये तसाचं हा पट्ट् सुद्धा कुठवरं वळवळतो ते पण शोधू नये. हिरोला काहीही होत नाही, झाले तरी सेल्फ हिलींग सिस्टीम एवढी भारी की चाकूने फाटलेला शर्ट सुद्धा आपोआप .......
बदमाश असले की आयटम साँग होनाच मांगताय ना.चार गाणे आहेत पण पेशाने सैनीक असल्यामुळे बंदुकीच्या गोळीच्या आवाजापुढे सगळी गाणीच काय पण सरगम सुद्धा फिक्की वाटते. काय बंदुकीचे संगीत आसतयं बघा......थड् थड्,सुइंग......छ्या शब्दात बांधताच येणार नाय!सोत्ताच ऐकायला हवं.
असो, हा सुदंर सीनेमा दाक्षिणात्य कैथी सिनेमाचा भाऊ( कैथी,भोला.....आता नाव भोला म्हणजे कैथीचा भाऊच ना), क्षमा करा काॅपी केला असे नाही म्हणता येणार तो हिन्दी भाषेत पुनर्गठीत (Remake) केला असे म्हणू या.
चित्रपटाच्या काही विशेष गोष्टी.
या सिनेमात एवढ्या गोळ्या झाडल्या आहेत की सेनेची एक रेजिमेंट इतक्या गोळ्या, वर्षीक गोळीबार सरावा (Annual Range Classification) साठी सुद्धा वापरत नसावी.
दुसरी गोष्ट आवडली ती अशी की जंगल युद्धाची(Jungle Warfare) झलक.
तीसरी गोष्ट म्हणजे धुवांधार गोळीबारी (Heavy shelling) होत असताना सुद्धा गाडी कशी चालवायची.
गोळ्या संपल्यावर खुखरी,चाकू, डंडा याने किंवा विना शस्त्र कसे लढायचे याची मस्त कल्पनेची आयडिया येते.
शेवटी हिरो मुलीला भेटतो का?हिरोईनचे काय होते?खांद्याचे ऑपरेशन होते का? ज्युनियर बच्चन केव्हा एन्ट्री मारतात? असे व इतर अनेक प्रश्न पण या सर्वांची उत्तरे सिनेमा बघितल्यावरच कळतील. मी एवढचं म्हणेन.....
आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना!
कुत्ते कमीने....
गर मिल जाये वह भसम की पुडीया ...
कसमसे,कारगिल,गलवान निपटलू अकेला.....
भन्नाट शिणेमा.क्वामेडी,आयटम साँग, थोडा फॅमिली ड्रामा,फुल २ धमाल.जबरदस्त ब्रेन क्वेकींग, आपलं अर्थक्वेकींग सारखं.U/A 13+ बिनधास्त फॅमीली बरोबर बघू शकता.
माझं पाहून/लिहून झालं.
पण चित्रपटाच्या शेवटी,
The End न लिहीता...
To be continued......असे लिहीलयं.
लगेच मला सई ताम्हणकरचं गाणं आठवलं.
जरा जपून जपून चाल(बघ), पुढे धोका आहे
हा.का.ना.का.
प्रतिक्रिया
28 May 2023 - 3:45 pm | तुषार काळभोर
शिवाय बघितल्यानंतर परत तसलाच भोला बघण्याची सहनशक्ती नाहीये.
बऱ्याचदा परीक्षण लेखानंतर प्रतिसाद आता बघायलाच हवा, आजच संध्याकाळी बघतो असे काहीसे असतात. पण आपण थेट सांगतो, हा चित्रपट आपण काय बघणार नाही. त्यापेक्षा funcho चे शॉर्ट्स बघत बसेल!
शष्प : काहीही हं, श्री...
28 May 2023 - 4:34 pm | टर्मीनेटर
तुकाशेठ तुम्ही 'शिवाय' संपूर्ण पाहिला आहे?
मग तुम्हाला संतपद प्राप्त झाले आहे असे मानण्यास हरकत नाही 😀
यापुढे माझ्याकडून तुमचा उल्लेख केवळ 'तुकाशेठ' असा न करता "संत तुकाशेठ"असा करण्यात येईल असे मी ह्याठिकाणी जाहीर करतो 🙏
29 May 2023 - 1:25 pm | तुषार काळभोर
कधी कधी बुद्धी भ्रष्ट होऊन असल्या गोष्टी बघितल्या जातात.
28 May 2023 - 5:13 pm | कर्नलतपस्वी
पण नाही बघाल तर पस्तावा असे नंतर म्हणायचे नाही.
28 May 2023 - 4:19 pm | कुमार१
चित्रपटाच्या जाहिरातीतला चेहरा पाहूनच ठरवलं होतं की चुकून सुद्धा त्याच्यावर टिचकी मारणार नाही.
बरं झालं सांगितलंत !
कित्येक महिन्यात प्राईमवर माझ्या आवडीचा हिंदी/ मराठी मला अजिबात बघायला मिळालेला नाही. यावर्षी प्रथमच असे वाटले, की कशाला आपण त्याची वर्गणी भरत आहोत ?
( या उलट युट्युबवरील मनोरंजनाने तृप्त केले आहे).
28 May 2023 - 5:16 pm | कर्नलतपस्वी
सर असे नका करू. नाहीतर पुढे पैसे मोजावे लागतील.
28 May 2023 - 4:24 pm | टर्मीनेटर
वरिजनल तामिळ चित्रपट 'काईथी' (हिंदी डब्ड) पाहिला असल्याने 'भोला' बघण्याचा कोणताही विचार नव्हताच! आणि आता हे परीक्षण वाचल्यावर चुकून-माकून कधीतरी बघितला जाण्याची जी काही ०.०००००००००१% शक्यता उरली होती ती पण मावळली 😀
28 May 2023 - 5:15 pm | कर्नलतपस्वी
हाच तर लोचा आहे.सगळं कस भारी भारी लागतं.
कहानी है,ड्रामा है, एक्शन है, इ-मोशन है तरच चित्रपट चांगला.....
आमच्या पिढीचे बघा अन्न हे पुर्ण ब्रह्म समजून जे समोर येईल ते आनंदाने ग्रहण करायचे.
जेव्हढ्या तन्मयतेने किस्सा कुर्सी का,पार,पार्टी,पोस्टर,जय संतोषी माॅ बघीतले तेव्हढ्याच भक्तिभावाने तिस्मारखाॅ,शिवाय, भोला सारखे आता बघतो.
फाईट मास्तर, स्टंट मास्तर,स्पाॅट बाईज,सिनेमॅटोग्राफर, एडिटर हे पण तर कलाकार आहेत. जरा त्यांचा विचार करा.
28 May 2023 - 5:29 pm | धर्मराजमुटके
तुमच्याविषयी पुर्ण आदर ठेऊन सांगावेसे वाटते की तुमची गाडी मुळ रस्ता सोडून बरीच आडवी तिडवी धावते. त्यामुळे "भाई, कहना क्या चाहते हो? " असे विचारावे लागते. अवांतर लिखाण यामुळे लेख वाचण्यात नीरसता येण्याचा धोका असतो त्यामुळे काही करता आलं तर बघा.
कळावे. लोभ असावा.
28 May 2023 - 5:35 pm | कर्नलतपस्वी
लोभ आहेच,वृद्धी व्हावी.
28 May 2023 - 5:37 pm | मुक्त विहारि
परिक्षण आवडले ....
28 May 2023 - 5:44 pm | प्रचेतस
अरारारा, सालटी काढली आहेत चित्रपटाची =)), चित्रपट खरेतर आजच बघणार होतो पण बरे झाले तुमचे परिक्षण आले. वेळ वाचला.
29 May 2023 - 3:19 am | यश राज
भारीच लिहिलंय.
मी सुद्धा वेळ जात नव्हता म्हणून प्राईम वर पळवून पहिला. तंतोतंत बरोबर लिहिलंय.
फक्त एकच करेक्शन .. सौरभ शुक्ला च्या जागी संजय शुक्ला असे करावे. खरच अवलिया कलाकार .
29 May 2023 - 7:44 am | कर्नलतपस्वी
चुक निदर्शनास आणल्याबद्दल धन्यवाद. हे डोक्यात होते पण दुरूस्त करणे राहून गेले.
संजय शुक्ला व निना गुप्ता यांचा वध चित्रपट बघीतला का?
खुपच सहज आणी सुदंर अभिनय दोन्ही कसलेल्या कलाकारांनी केला आहे.
धन्यवाद.
29 May 2023 - 12:36 pm | Vichar Manus
संजय मिश्रा आहेत ते
29 May 2023 - 4:54 pm | यश राज
धन्यवाद,
माझ्याकडून ही चूक झाली. ते संजय मिश्रा आहेत :)
29 May 2023 - 7:28 am | सुखी
अगदी पहिल्या चेंडू पासून षटकार लावले आहेत... छान लिहिलंय परीक्षण
29 May 2023 - 7:46 am | कर्नलतपस्वी
तसा माझा पहिलाच प्रयत्न. कदाचित चित्रपट बघतानाच शब्दांची जुळवाजुळव झाली असावी. एकाच बैठकीत लिहीले. अजून थोडे लिहायचे होते पण विस्तारभयास्तव आवरते घेतले.
29 May 2023 - 8:03 am | सुखी
असे भय वाटून न घेता लिहा :D मी तरी नक्की वाचेन
29 May 2023 - 9:12 am | सर टोबी
काव्य पंक्तीची पखरण कमी पडलीय या वेळेस असे एक निरीक्षण.
29 May 2023 - 10:06 am | कर्नलतपस्वी
धन्यवाद.
चित्रपट पाहत असताना राहून राहून सैन्यातल्या फिल्ड क्राफ्ट, बॅटल इन्याकुलेशन टेस्ट, वार्षिक गोळीबारीचा सराव,फिल्ड फायरिंग इत्यादीबद्दल गमतीदार आठवणी जाग्या झाल्या आणी कवीता पार विसरलो.