तट्टे इडली पोडी

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
4 May 2023 - 10:44 am

तट्ट इडली म्हणजेच ताटलीतली मोठी इडली आणि पोडी /गनपावडर चटणी चणाडाळ, उडीदडाळ,तीळ,सुकी लाल मिरची स्पाईसी चटणी...
इडली
नेहमी प्रमाणेच तांदूळ , उडीदडाळ आणि अर्धी वाटी साबुदाणा रात्री भिजवले.
सकाळी हे सरभरीत वाटून एकत्र ६ तास फरमेंट होऊ दिले.
इडली करताना पीठ वाटणात मीठ टाकून,मोठ्या ताटलीला तेल लावून इडली पीठ टाकले.इडली पात्रात इडली वाफवून घेतली.
पोडी चटणी साठी -१वाटी चणा डाळ,एक वाटी उडीद डाळ खरपूस भाजली.१/२ वाटी तीळ भाजले.सुक्या लाल ७-८मिरच्या भाजल्या.हे सर्व जिन्नस गार झाल्यावर मिक्सरमधून किंचीत जाडसर वाटून घेतले.मीठ घातले.

आता गरमागरम इडली वर आधी साजूक तूप पसरवून घेतले,पोडी चटणी पसरवून घेतली.इडलीचे बारीक तुकडे करून ,आवडत असेल तर तसेच किंवा चटणी/सांबर बरोबर गट्टम् करावी

A

प्रतिक्रिया

वामन देशमुख's picture

4 May 2023 - 11:01 am | वामन देशमुख

इडली म्हणजे माझा जीव की प्राण आहे. आठवड्यातून किमान एकदा तरी घरी सकाळी इडली होतेच.

तुमचे पाकृ सादरीकरण आवडले.

---

नेहमी प्रमाणेच तांदूळ , उडीदडाळ आणि अर्धी वाटी साबुदाणा रात्री भिजवले.

साबुदाणा न घालता इडली करून, इडलीची मूळ चव चाखून पाहीलीय का?

---

कारम पोडी, पल्ली पोडी, पुटाना पोडी इ. पूड चटण्या अनेकांना आवडतात. मी मात्र उगी टाकून देण्यापुरत्याच ताटात घेतो!
;)

आता एवढ्या पोडी शिकायलाच पाहिजे.
मी साबुदाणा नाहीच वापरत, पहिल्यांदा वापरला,पोहे पण वापरतात.

शानबा५१२'s picture

4 May 2023 - 11:33 am | शानबा५१२

ईडली फ्रायची आठवण झाली. बाकी मुलुंडच्या एका फेमस हॉटेलमध्ये सेम असेच ताट वाढले जाते. ती सुकी पाऊडर पहील्यांदा तिथे ईडली सोबत खाल्ली होती. सफेद चटणीला कसलीच तोड नाही हे खरे!

पोडी एकदाच भरपूर करून डब्यात भरून नंतर पण वापरता येते ्

कंजूस's picture

4 May 2023 - 11:43 am | कंजूस

काही सुधारणा सूचना देऊ का?
१)साबूदाणा घालू नये.
२)बाजारात इडली रवा मिळतो. तो वापरावा. हा वापरून हलकी होते.
३)इडलीवर तूप चालण्यापेक्षा पीठ पाण्यात घालण्यापूर्वी तिळाचे तेल दोन चमचे टाकून ढवळून ओतावे.
४)मुळगा पोडीवर (चणाडाळं आणि कढिलिंब पानांची सुकी चटणी) तिळाचं तेल घालून इडली बरोबर छान लागते.

खुप उपयुक्त सुचना.तिळाचं तेल वापरून पाहते.

सुनील's picture

4 May 2023 - 3:21 pm | सुनील

पत्नी उडुपी-मंगलूर कडील असल्यामुळे आमच्याकडे इडली-डोसे वरचेवर होतच असतात. किंचित बदल जे आमच्याकडे होतात ते असे-

इडलीच्या पीठात थोडा शिजवलेला भात घालतात. यामुळे इडली हलकी होते. खेरीज पोडी खोबरेल तेलासोबत मस्त लागते.

Bhakti's picture

4 May 2023 - 7:14 pm | Bhakti

खोबरेल तेल,वाह!

मस्त!
आमच्याकडे जवळपास दर सोमवारी इडली आणि मंगळवारी डोसा असा (त्या दोन दिवशी कांद्याचा वापर टाळण्याची आईची पॉलिसी असल्याने 😀) सकाळच्या नाश्त्याचा मेनू असतो! वर कंकाकांनी म्हंटल्याप्रमाणे आता मात्र तांदुळा ऐवजी इडली रवा, उडदाची डाळ आणि थोडे मेथीचे दाणे भिजवून, वाटून बनवलेली इडली/डोसाच आवडतो!

पोडी तर आमच्या घरी दर महिन्याला किलोच्या हिशोबात (दोन प्रकारे) बनवली जाते, अर्थात त्यातली एका प्रकारची फार थोडी आमच्या घरासाठी आणि बरीचशी मावशीच्या दोन मुलांसाठी! ते दोन महाभाग रोजच्या जेवणात भाजी-पोळी बरोबर तोंडी लावणे म्हणून तेल घालून पोडी खातात 😀
पण मला पोडी फक्त डोशा बरोबर खायला आवडते, ती पण अर्थात तिळाचे तेल घालूनच! इडली मात्र खोबऱ्याची चटणी आणि असल्यास सांबार बरोबरच खायला आवडते.
मावशीची मुले कमी तिखट खात असल्याने त्यांच्यासाठी बनवलेल्या पोडीत आई ती वाटताना लाल मिरच्या कमी घालते तर आमच्यासाठीच्या पोडीत भरपूर लाल मिरच्या आणि मला आवडतात म्हणुन तळलेली (किंवा सुकलेली) कढीपत्त्याची पाने घालून ती वाटते.

पोडी तर आमच्या घरी दर महिन्याला किलोच्या हिशोबात (दोन प्रकारे) बनवली जाते
अरे बापरे!मी पहिल्यांदाच खाल्ली.सवय जडावी असाच खमंग प्रकार आहे.भाऊ चेन्नईला होता त्यानंतर खुप वर्षांनी त्याने परत खाल्ली.मग इडली कशी पोडीबरोबर चेन्नईला कुस्करून खायचा याच प्रात्यक्षिक दिलं :)

सरिता बांदेकर's picture

4 May 2023 - 10:06 pm | सरिता बांदेकर

छान झालीय इडली. मी पोडी बरोबर इडली मैत्रीणीच्या डब्यातली खाल्ली आहे.
सकाळी इडली पोडीमध्ये डुबवली कि दुपारपर्यंत ती मस्त मुरलेली असायची.
आणि माझी इडली कधीच चांगली होत नाही त्यामुळे भक्ती तुमची ही रेसीपी नाही करणार.
माझी मैत्रीण म्हणायची हातानी ढवळू नको पीठ.तुझ्या हाताला चव नसेल.
तिचा सल्ला शिरसावंद्य मानून उडप्याकडे जाऊन इडली खाते.
हा हा हा

माझी मैत्रीण म्हणायची हातानी ढवळू नको पीठ.तुझ्या हाताला चव नसेल.
तिचा सल्ला शिरसावंद्य मानून उडप्याकडे जाऊन इडली खाते

हा हा!
नाही पण सध्या उन्हाळा आहे तर कराच कारण भिजवायचे ८ तास सोडून सहा एक तासात छान आंबवते पीठ होतं.

गंमत अशी की माझं लग्न नवीनच होतं, हे असं डाळी धुवून त्या इतक्या वेळ भिजवायच्या आणि रात्री १० वाजता आठवायचं अरे डाळी वाटल्याच नाही मग एवढ्या रात्री त्या मिक्सरमधून वाटायच्या(आणि मी एक वाटी दोन वाटी नाही चांगल्या १/२ किलो अशा डाळी भिजवायचे).नवर्याला खुप कीव यायची म्हणायचा ,एवढे कुटाणे करण्यापेक्षा बाहेर जाऊन खाऊया :)

सरिता बांदेकर's picture

5 May 2023 - 2:23 pm | सरिता बांदेकर

त्यापेक्शा तुमच्याकडेच येते

या की, कडीपत्ता पोडी :)
ढ

प्रचेतस's picture

5 May 2023 - 8:46 am | प्रचेतस

भारीच झालीय की इडली.

Bhakti's picture

5 May 2023 - 12:29 pm | Bhakti

:)

कर्नलतपस्वी's picture

5 May 2023 - 12:39 pm | कर्नलतपस्वी

की समजायचं पुढे दोन तीन दिवस काय मिळणार.

इडली चटणी
इडली सांबार
दोसा चटणी
कट डोसा
मसाला डोसा
उत्तपम चटणी
इडली फ्राय
मिक्स व्हेज इडली
सर्वात शेवटी अप्पे.

चटण्या मधे...
ओल्या नारळाची,उडीद डाळ चटणी,लाल,हिरवी मिर्ची घालून ,दाण्याचे कुट आणी दही, वर मोहरीची फोडणी.

तीन दिवसा नंतर पोळी किंवा भाकरीचे दर्शन होते. जसे श्रावणात संततधार नंतर होणारे सूर्यदर्शन.

दर वेळेस म्हणायचे.....

कित्ती इडली साॅफ्ट झालीयं,

सांबार मसाला घरचाच, बादशाहा,एम डि एच च्या थोबाडीत मारेल असा.

मी आपला बारीक शेव,जिलबी व इमरती आणून ठेवतो.

सरिता बांदेकर's picture

5 May 2023 - 2:22 pm | सरिता बांदेकर

तुमच्या यादित आणखीन भर घालते.
१)इडली उपमा
इडली छान हलकी झाली तर कुस्करायची आणि दडदडीत असेल तर छोटे छोटे तुकडे करायचे. आणि उडीद डाळ,भरपूर कढीपत्ता घालून उपमा करायचा.
कांदा घालायचा नाही, कढीपत्त्याचा घमघमाट आणि मध्ये चावताना खरपूस उडीद डाळ लागली पाहिजे.
२) शिरा
हे फक्त इडली छान फुललेली असेल तरच चांगलं लागतं.
इडली कुस्करून त्यात किसलेले खोबरे आणि गूळ किंवा साखर घालून एक वाफ द्यावी,माझी मैत्रीण व्हॅनिला इसेन्स घालायची.
छान लागतं दोन्ही.

सांबार मसाला घरचाच, बादशाहा,एम डि एच च्या थोबाडीत मारेल असा.
रेसिपी प्लीज...

तुषार काळभोर's picture

6 May 2023 - 8:13 am | तुषार काळभोर

इडली ही सांबार मध्ये कुस्कुरूनच खावी.
अगदी मटणाचा रस्सा आणि भाकरी किंवा वरण भात टाईप.
मद्रदेशी ही सवय लागली. त्याआधी घरी चमच्याने खाल्ली जायची. सुट्टीत घरी आल्यावर पहिल्यांदा अण्णा स्टाईलने खाल्ली तर घरच्यांनी अतिशय तुच्छतेने माझ्याकडे पाहिले होते :(

इडली हा सौथिंडीयन खाण्याचा कल्पतरू आहे. कशीही करता येते आणि कशीही खाता येते.

होय होय कार्ब आणि प्रोटीन याचा उत्तम मिलाप .

तनमयी's picture

6 May 2023 - 4:50 pm | तनमयी

सामग्री
▢2 टेबल स्पून तिल
▢1 टी स्पून तेल
▢¼ कप उरद दाल
▢¼ कप चना दाल
▢6 सूखे लाल मिर्च
▢कुछ करी पत्तियां
▢2 टेबल स्पून सूखी नारियल / कोपरा (कटा हुआ)
▢छोटी गेंद के आकार का इमली
▢¼ टी स्पून हल्दी
▢पिंच हींग
▢1 टी स्पून नमक
अनुदेश
सबसे पहले, एक बड़े तवा में कम फ्लेम पर 2 टेबलस्पून तिल को ड्राई रोस्ट करें।
ब्लेंडर में स्थानांतरण करें और एक तरफ रखें।
उसी तवा में 1 टीस्पून तेल गर्म करें और ¼ कप उरद दाल, ¼ कप चना दाल डालें।
लेंटिल को जलाने के बिना, कम फ्लेम पर भुने।
इसके अलावा, 6 सूखे लाल मिर्च और कुछ करी पत्तियों को डालें। कम फ्लेम पर भूनें।
अब 2 टेबलस्पून सूखा नारियल डालें और जब तक नारियल सुनहरा नहीं होता है, तब तक भूनें।
मिश्रण को पूरी तरह से ठंडा करें, और मिक्सी में स्थानांतरण करें।
इसके अलावा, छोटे गेंद के आकार का इमली, ¼ टीस्पून हल्दी, चुटकी हींग और 1 टीस्पून नमक डालें।
बिना पानी जोड़े मोटे पाउडर के लिए ब्लेंड करें। डोसा पोडी एक एयर टाइट कंटेनर में स्टोर करें या डोसा तैयार करने के लिए उपयोग करें।
डोसा तैयार करने के लिए, डोसा बैटर तवा में डालें। मैंने स्टीम्ड डोसा के लिए उपयोग किए जाने वाले बैटर का उपयोग किया है।
कवर करें और 1 मिनट के लिए या जब तक डोसा आंशिक रूप से नहीं पक जाता है, तब तक पकाएं।
एक बार डोसा आंशिक रूप से पकाया जाता है, तैयार पोडी को स्प्रिंकल करें।
1-2 टीस्पून घी को समान रूप से डोसा पर फैलाएं।
कवर करें और 30 सेकंड के लिए या जब तक डोसा पूरी तरह से नहीं पकाया जाता है, तब तक उबाल लें।
अंत में, चटनी और सांभर के साथ पोडी डोसा का आनंद लें।

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 May 2023 - 10:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लै भारी अजून येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

8 May 2023 - 8:23 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/super-hungry.png