आम्ही जातो आमुच्या गावा (भाग १- व्याप आवरते घेणे)

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
23 Jan 2023 - 10:50 pm

मित्रहो, आयुष्याची सांजवेळ सामोरी आलेली आहे. दूरदेशीच्या ‘आपुल्या गावा’ कायमचे जाण्यासाठी वळकटी बांधून आता तयार राहिले पाहिजे आणि तिकडे नेणारा दूत आला की हसतमुखाने त्याला सामोरे गेले पाहिजे.
समवयस्क मित्र एकेक करून आपापल्या दूताबरोबर रवाना होत आहेत आणि त्यांच्या तशा जाण्यातून आपलीही वेळ आता फारशी दूर नाही, ही जाणीव प्रबळ होत चालली आहे.
तर आपले एकंदरीत व्याप वगैरे आता तरी आवरते घेतलेच पाहिजेत … आता व्याप म्हटले तर ते कोणकोणते ?
— सध्याचे आपले राहते घर आणि त्याबद्दलची आसक्ती, मोह, सवय (तसेच ते सोडण्यातून कदाचित होणारा पश्चात्ताप, असुरक्षिततेची भावना वगैरे)
— दीर्घकाळापासून आपण रहात असलेला परिसर, त्याचेशी जडलेले भावनिक नाते, तिथे राहण्यातील सोयी - सवयी, तसेच तिथले रहिवासी, मित्र - परिचित इत्यादींशी निर्माण झालेले भावनिक बंध आणि त्यांचेशी आता ताटातूट होणार हा विचार.
— वर्षानुवर्षे खरेदी करून साठलेले सामान : कपडे, अंथरूण - पांघरुणे, फर्निचर, फ्रीज, टीव्ही, पंखे, कूलर, एसी, अलमाऱ्या, ट्रंका, सूटकेसा, स्वयंपाकघरातले सामान, वेळोवेळी मिळालेल्या (- निरुपयोगी असूनही आजवर टाकल्या न गेलेल्या -) भेटवस्तू तसेच आपल्या संसाराच्या अगदी सुरुवातीच्या काळात महत्प्रयासाने बचत करून विकत आणलेल्या पण आता जुनाट झालेल्या विविध वस्तू तसेच खलबत्ता, अडकित्ता, पाटा-वरवंटा, सोरये, विळी, ओगराळे, माठाचे तिकाटणे, चौरंग, कडीच्या झाकणाचा मोठा पितळी कूकर, डबे वगैरे वापराच्या दृष्टीने आता कालबाह्य झालेल्या वस्तू.
— आठवण म्हणून जपलेल्या वस्तू : आजवर जपून ठेवलेली वडिलांची लोखंडी ट्रंक आणि त्यांची डायरी, चित्रकलेतील गुरूंची पत्रे, आपण वीसेक वर्षाचे असताना आईने तिच्या लहानपणापासूनच्या आठवणी लिहून ठेवाव्यात असा आग्रह धरून त्यासाठी मुद्दाम आणून दिलेल्या आणि तिने भरून काढलेल्या वह्या, आपल्या लहानपणीचे चांदोबाचे अंक, सातवीत असताना पहिला नंबर आला म्हणून मिळालेला - आणि त्याकाळी आई ज्याला त्याला कौतुकाने दाखवायची तो करंडक, आता मोठे होऊन परदेशी गेलेल्या मुलांची शाळेतली प्रगतीपुस्तके, त्यांनी साठवलेली कॉमिकं, क्रिकेटची बॅट, खेळात वगैरे मिळवलेली पदके, मुलाचा कुठल्याश्या प्रसिद्ध कंपनीचा स्टेथोस्कोप … आणि अलिकडे नातवंडे येतील तेंव्हा त्यांच्यासाठी म्हणून मुद्दाम आणून ठेवलेली खेळणी, पुस्तके वगैरे, असे चार पिढ्यांचे सामान.
— जुन्या हिशेबाच्या वह्या, पत्रे, रोजनिश्या, दिवाळी अंक, त्या त्या काळात आवश्यक असलेली विविध कागदपत्रे, डिग्र्या, डिप्लोमे, सर्टिफिकेटे, बँकांची पासबुके वगैरे असंख्य कागद आणि कधीकाळी हौसेने जमवलेली, पण आता आपण यापुढे ती वाचू शकणार नाही याची खात्री पटलेली अनेक पुस्तके.
— कधीतरी कामास येतील म्हणून साठवून ठेवलेले सुतळ्यांचे, लाकडांचे, टाईल्सचे तुकडे, वायरची भेंडोळी, खिळे, स्क्रू, नटबोल्ट, तोट्या, बिजागऱ्या, हातोडी, पक्कड, पटाशी, स्क्रू ड्रायव्हर, करवत, हॅकसॉ, पाने, बागकामाची अवजारे, कुंड्या वगैरे वगैरे …

— अश्या असंख्य वस्तूंनी खच्चून भरलेले दोन मजली घर रिकामे करत अगदी गरजेच्या वस्तूच तेवढ्या राहू देणे हे फार मोठे आव्हानच. त्यातून माझ्या चित्रकलेच्या छंदामुळे तर यात आणखी प्रचंड भर पडलेली. कागदावर आणि कॅनव्हासवर केलेली शेकडो रंग - रेखाचित्रे, स्केचबुके, विविध प्रकारचे कागद, कॅनव्हासचे रोल, माउंट बोर्ड, लाकडी फ्रेमा, मुद्दाम बनवून घेतलेले दहा फूट लांबीचे टेबल, ईझल, गेल्या पन्नास वर्षात साठलेले असंख्य ब्रश, रंगांच्या ट्युबा, बाटल्या, पेस्टल, पेन्सिली आणि काय काय.

कोविड काळात आणि नंतर हा सगळा पसारा कमी करायचा, बत्तीस वर्षांपूर्वी प्लॉट घेऊन हौसेने बांधलेले दिल्ली परिसरातले घर विकायचे आणि सध्यापुरते तरी ‘आपुले गाव’ - म्हणजे जिथे जन्मापासूनची पहिली सव्वीस वर्षे घालवली त्या इंदौर शहरात स्थानांतरित व्हायचे असे ठरवले असले, तरी आमचा हा बेत कळल्यावर तिच्या लहानपणापासून एक घर सोडून पलीकडे रहाणारी, आम्हाला भैय्या-भाभी म्हणणारी, ‘पडोसन’ हिच्या गळ्यात पडून रड रड रडली. ‘क्या जरुरत है ये सब करनेकी ? वगैरे नाराजीने म्हणत रोज सांजसकाळ येऊन आमचे मन वळवण्याच्या प्रयत्नाला लागली. तिचा नवरा शर्माजी पण मला विविध उदाहरणे देऊन आमचा हा निर्णय कसा ‘गैरजरूरी’ आणि ‘गलत’ आहे, ‘बाद मे पछताना पडेगा' वगैरे कसोशीने पटवून देण्याच्या प्रयत्नाला लागला.
या आणि अशा अन्य काही कारणांमुळे पुढल्या पाच-सहा महिन्यात आमचा घर विकण्याचा बेत वेळोवेळी बदलत गेला. ‘विकायचे नाही’ या दिशेला लंबक गेला, की घराची दुरुस्ती, रंगरंगोटी, नवीन ग्रील वगैरे बसवणे, गळणाऱ्या टाक्या दुरुस्त करणे, विजेचे काम, अशा अनेक भानगडीत अगदी कावून जाऊ लागलो. मधूनच मनाचा लंबक ‘विकावे’ च्या दिशेने झुकला प्रॉपर्टी डीलरना भेटणे, येणाऱ्या संभावित ग्राहकांना घर दाखवणे, नो ब्रोकर, मॅजिक ब्रिक्स वगैरेंवर जाहिरात- फोटो टाकणे, वगैरेत सगळा वेळ जाऊ लागला.
-- मी जरी ‘विकावे’ या मताचा असलो, तरी बायकोचे तसे नव्हते. त्यातच तिची तब्येत अचानक बिघडून काही दिवस तिला इस्पितळ-निवासी व्हावे लागले. मदतीसाठी अमेरिकेतून मुलगा सून नातवंडे आल्यावर तिला जरा बरे वाटू लागले. आमची एकंदरीत परिस्थिती बघून मुलाने आता उगाच जास्त घोळ न घालता घर विकायला काढावे, आणि सामान अगदी कमी करावे हे कसेबसे तिला पटवून दिले आणि आम्ही त्यामागे लागलो.
एक दिवस घरातली सगळी क्रॉकरी बाहेर काढली. त्यातली अत्यावश्यक बाजूला काढून इतर सगळी घरात झाडू-पोछासाठी येणाऱ्या मुलीला देऊन टाकली. मोठमोठे पितळी डबे, तोट्या, तांब्याच्या कळश्या, लोखंडी खुर्च्या, पलंग वगैरे मोडीत दिले. खूपसे सामान गाडीत भरून अनेक खेपा करून फेकून आलो. कॅनव्हासवरील मोठमोठी चित्रे लाकडी स्ट्रेचर्स वरून उतरवून रोल करून ठेवली आणि उत्तम लाकडाचे ते शंभरएक स्ट्रेचर्स फुकट सुद्धा घेणारे कोणी मिळाले नाही म्हणून तोडून फेकले. एवढेच काय पण दोन-अडीचशे कॅन्व्हासवरील चित्रे पण फेकली. यात एक गम्मत झाली. सुमारे चार फूट रुंदीच्या त्या वजनदार गुंडाळ्या टाकायला एका निर्जन जागी घेऊन गेलो आणि गाडीतून त्या काढणार, तेवढ्यात माझ्या नजरेसमोर एक ‘क्राईम-पॅट्रोल’ छाप दृश्य तरळले…
एक ‘पुळीसवाळा’ त्या जागी उभा राहून आपल्या बॉसला फोन लावत होता - “ जनाब, यां पर मोट्टे कपडे मे लिपटी हुई एक लाश पडी हुई है जी. कपडे पे नाम पता भी लिख्या है जनाब "
च्यामारी आपण टाकलेल्या कॅनव्हासात नंतर असलं कोणी काही गुंडाळलं तर ????
मग आल्या चाकी परत फिरून घरी येऊन प्रत्येक चित्रामागे लिख्या हुवा ‘नाम - पता’ कापून काढून त्या चित्रांचे ‘लाश’च काय, ‘ताश’ पण गुंडाळता येणार नाहीत असे असंख्य लहान तुकडे करून मगच ते टाकले. हां, बाद मे लफडा नई मंगता अपुनको. 'सावधपण सर्वविषयी’.
बाकी असंख्य कागद, माऊंट बोर्ड वगैरे वगैरे सामान कुणा कुणाला दिले/फेकले आणि परिचितांना बोलावू बोलावू खूपशी चित्रे पण दिली.
गेली पन्नास वर्षे जपलेली वडिलांची लोखंडी ट्रंक पण मी फेकायला घेऊन गेलो होतो, पण मुलगा म्हणाला “ बघा हं बाबा, वडिलांची आठवण आहे, परत एकदा विचार करा” - मला अगदी भरून आलं आणि मी ती परत घरी घेऊन आलो.
अशा विविध भानगडीत काही काळ व्यतीत झाल्यावर शेवटी जुलै/ऑगस्ट २०२२ मध्ये घर विकून इंदौरला स्थानांतरित झालो.
घर विकल्यावर मला काही लोक आता अमुक म्यूचुअल फण्डात पैसा गुंतवला तर एवढा वाढेल वगैरे सांगू लागले, त्यांना मी म्हणायचो - बाबांनो, आता मला पैसा वाढवायचा नाही, तर मनमुराद भटकंती आणि छंद पुरे करण्यात खर्च करायचा आहे. उभा जन्म काटकसरीत घालवलेला आहे, आता तरी त्यातून मुक्ती हवी.
– याची सुरुवात म्हणून युरोपातील विविध जागांचा प्रवास करायचा असे ठरवून सप्टेंबरात पॅरीस गाठले, आणि आता सर्वात आधी कुठे जावे याचा शोध घेऊ लागलो….
क्रमशः
आगामी भाग२ : 'रोम' रंगी रंगले मन ...

संस्कृतीजीवनमानप्रकटनलेखअनुभव

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

24 Jan 2023 - 7:14 am | आनन्दा

वाचत आहे..

आनन्दा's picture

24 Jan 2023 - 7:14 am | आनन्दा

वाचत आहे..

चित्रगुप्त's picture

24 Jan 2023 - 1:02 pm | चित्रगुप्त

@आनंदा : लेख वाचला जात आहे हे वाचून समाधान वाटले. अनेक आभार.

चांदणे संदीप's picture

24 Jan 2023 - 1:35 pm | चांदणे संदीप

पण हे कठीण आहे वाचणं आणि वाचून डोक्यातून बाहेर काढणं. :(

सं - दी - प

चित्रगुप्त's picture

24 Jan 2023 - 3:38 pm | चित्रगुप्त

'वाचणे आणि डोक्यातून बाहेर काढणे कठीण' असण्याबद्दल जरा खुलासा केलात तर स्पष्ट होईल. अनेक आभार.

अशासाठी की, परवाच एका जवळच्या मित्राबरोबर त्याच्या वडिलांच्या वृध्दापकाळाने आलेल्या आजारपणाबद्दल चर्चा झाली. थोडक्यात सांगायचे तर त्यांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आलेले आहे जवळच्या माणसांसोबत शेवटचे काही दिवस घालवण्यासाठी. मित्राला म्हणालो, तू जात का नाहीस, तर त्याचे उत्तर जवळपास माझ्या विचारांशी मिळतेजुळते होते. तो म्हणाला, ज्या वडिलांना लहानपणापासून वाघासारखं पाहिलंय त्यांना असं अंथरूणाला खिळलेलं नाही बघवणार. शिवाय, भाऊ तिथे आहे, तो म्हणाला तू येऊन बाकी काही होणार नाही पण आई आणि इतर नातलगांची रडारड आताच सुरू होणार. अजून बरीच चर्चा झाली.

माझी एक सख्खी मावशीही पॅरालाईज होऊन अंथरूणाला खिळून आहे आणि मला शेवटंच बघायचं म्हणतीये. तिलाही बघायला मला जाऊ वाटत नाही कारण, मनात एक भयानक गिल्ट आहे की मी तिला बरी नाही करू शकलो. तिलाही मी लहानपणापासून सार्‍या घराचं, नातलगांचं करताना पाहिलंय, आता त्या अवस्थेत तिला नाही बघवणार.

अजून एक, फार पूर्वी फिरोज खान नावाच्या एका हिंदी कवीची एक रचना वाचनात आली होती ती इथे देतो.

ये भोर ठंडी है एकदम
जैसे कि ठंडा है
मेरा जिस्म
ठंडी चीजें मर जाती हैं
मैं भी मर जाऊँगा एक रोज
मेरे मरते ही मर जाएगा
ये शहर
ये वतन
ये दुनिया मर जाएगी मेरे मरते ही
स्मृतियाँ मर जाएँगी
मर जाएँगी मेरी प्रेमिकाएँ
मेरी माँ मर जाएगी
जिसके मरने का सताता रहा है डर
वो पिता मर जाएगा
मेरे मरते ही
वे सब मर जाएँगे
जिनके जीने की दुआएँ की थीं
मैं एक खंडहर हूँ
या कि हूँ एक ईश्वर
ढह जाऊँगा एक रोज मैं
मर जाऊँगा
मेरे मरते मर जाएगा
ईश्वर भी

थोडक्यात काय तर, मृत्यू हा विषय अस्वस्थ करणारा असला, नकोसा असला तरी त्याच्या वेळेला तो येतोच. त्याला काय सुख-दु:ख, भाव-भावना, जाणीवा-वेदना असा कसलाही स्पर्श नसतो. ती असते फक्त एक घटना. पण तरीही, मानवी मन त्याला चटकन स्वीकारत नाही. आपल्या रक्ताचे, जवळचे, परिचयातले कोणीही जाते तेव्हा दु:ख हे होतंच. अजून तरी ती पिढी यायचीये पृथ्वीवर जी भावनांवर विजय मिळवून फक्त भविष्याकडे मार्गक्रमण करत राहील. कदाचित, मृत्यूवरही विजय मिळवेल. पण आतातरी आपण सर्वजण सामान्य मानव आहोत. जे भावनांपासून अलिप्त नाही राहू शकत. प्रत्येकाची सहनशक्ती वेगवेगळी असू शकते कदाचित.

म्हणूनच एक सामान्य माणूस म्हणून मी विचार करतो. मी फार वर्षांपासून तुम्हांला मिपावर बघत आलो. तुमचे वैविध्यपूर्ण लेखन आणि चित्रकला यांचा आस्वाद घेत आलो. तुमच्या वजन कमी करायच्या एका प्रयोगाला फॉलो करून मीही जवळपास तीसेक किलो कमी केले होते काही वर्षापूर्वी. म्हणूनच तुम्ही जेव्हा असे म्हणाल, "आम्ही जातो आमच्या गावा" तेव्हा कुठेतरी एक कळ उठणारच. ती तशी उठली म्हणूनच तसा प्रतिसाद दिला. आपण कधीही न भेटूनही माझ्या वतीने एक अनामिक नाते मी गुंफलेले आहे. ते कुठेतरी सुटतेय की काय ही जाणीव त्रासदायक आहे. तुम्हांला काही वेगळं वाटलं असेल तर तो माझा लेखनदोष आहे. मी कितीही तुमच्या, माझ्या आईवडिलांच्या, स्वतःच्या किंवा आणखी कुणाच्या दीर्घायुष्याची कामना केली तरी त्यालाही मर्यादा आहेत हेही मी जाणून आहे. पण कुणाचेही जाणे किंवा त्याबद्दल कल्पना करणेही काही काळापुरते का होईना क्लेषकारक असते. एकूणच काय मृत्यूसारख्या भयकारी आणि नकोशा वाटणार्‍या विषयाचे चक्र डोक्यात सुरू झाले.

सं - दी - प

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Jan 2023 - 7:27 am | राजेंद्र मेहेंदळे

लेखाएव्हढाच प्रतिसाद प्रचंड आवडला आहे.

सस्नेह's picture

25 Jan 2023 - 7:36 pm | सस्नेह

मृत्यू नकोसा भयकारी, अस्वस्थ करणारा ही संकल्पना सोडली पाहिजे. मृत्यू हे खरोखर वरदान आहे, अपंग, आजारी, परावलंबी, अंथरुणाला खिळलेल्या जीवनापेक्षा.
सुरेश भटांचे शब्द अगदी चपखल आहेत
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते..
चित्रगुप्त यांचा लेख अगदी उचित आहे. व्याप कमी करणे, वानप्रस्थाश्रम स्वीकारणे हे मृत्यूला हलक्या मोकळ्या मनाने सामोरे जाण्यासाठी आवश्यकच आहे.

तरुणपणी मृत्यू हे सुंदर काव्य असतं.

उतारवयात ते एक रुक्ष आणि भीतीदायक असे गद्य होऊन जाते

श्री व्यंकटेश माडगूळकर

संदीपभौ, तुमच्या मित्राने मृत्युशय्येवरील वडिलांना भेटायला न जाणे, आणि अंथरुणाला खिळलेली मावशी - जिला तुम्हाला भेटायची इच्छा आहे - तिला भेटायला न जाणं हे कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाही.

--- वडील वाघासारखे होते त्यांना विकलांग परिस्थितीत बघण्यास त्रास होतो हे जरी खरे असले तरी वडीलांना आपण जवळ असण्याने किती बरे,समाधान वाटेल, त्यांना आता आपल्या मदतीची गरज आहे. या गोष्टी नाकारता येत नाही.
भाऊ आहे,इतर नातेवाईक आहेत तू येऊन काय वेगळे करणार आहेस हे सुद्धा बरोबर असले तरी अंतिम समयी मी अमुक एक गोष्ट करायला हवी होती याची टोचणी उर्वरित आयुष्यात त्रासदायक होऊ शकते. याचीच एक काळी बाजू , आम्हीच वडीलांचे सर्व केले असे बाकीचे म्हणतील त्याचे काय?

कर्नल तपस्वी यांच्या वरील प्रतिसादाशी मी शतप्रतिशत सहमत आहे. तुम्ही तुमच्या मावशीला भेटायला जाऊन - तुमच्या लहानपणापासून सार्‍या घराचं, नातलगांचं करताना तिला पाहिलंय, आणि तिच्या आपुलकीमुळे, कष्टांमुळे सगळ्यांचे कसे भले झाले वगैरे - तिला नक्की सांगा. त्या माऊलीला जे समाधान वाटेल, त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.
-- तुमच्या मित्राच्या बाबतीत तपस्वींनी माडलेली 'काळी बाजू' माझ्या लक्षात आली नव्हती, पण ती एक वस्तुस्थिती आहे.

भाऊ तिथे आहे, तो म्हणाला तू येऊन बाकी काही होणार नाही पण आई आणि इतर नातलगांची रडारड आताच सुरू होणार.

'बाकी' काय व्हायचे असते ? अशा वेळी आई-वडिलांना मिठी मारून रडणे, हेच महत्वाचे असते. रडारड होणे यात काहीही गैर नाही, व्यक्त व्हा, मुक्त व्हा.

मी फार वर्षांपासून तुम्हांला मिपावर बघत आलो. तुमचे वैविध्यपूर्ण लेखन आणि चित्रकला यांचा आस्वाद घेत आलो. तुमच्या वजन कमी करायच्या एका प्रयोगाला फॉलो करून मीही जवळपास तीसेक किलो कमी केले होते काही वर्षापूर्वी. म्हणूनच तुम्ही जेव्हा असे म्हणाल, "आम्ही जातो आमच्या गावा" तेव्हा कुठेतरी एक कळ उठणारच. ती तशी उठली म्हणूनच तसा प्रतिसाद दिला. आपण कधीही न भेटूनही माझ्या वतीने एक अनामिक नाते मी गुंफलेले आहे. ते कुठेतरी सुटतेय की काय ही जाणीव त्रासदायक आहे.

तुमच्या मनातील माझ्याविषयीच्या भावना तुम्ही व्यक्त केल्यात, हे खरोखर माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत. आपण वृद्धपणी सुद्धा कुणालातरी हवेसे वाटतो, हा केवढा मोठा दिलासा असतो, हे त्या स्थितीत आल्यावरच समजते. अनेक अनेक आभार.
इथे मला आपले मिपाकर 'चौकटराजा' आठवतात. त्यांचे अकाली जाणे अनेकांना चटका लावून गेले. 'मरावे तरी कीर्तीरूपे उरावे' याचे उदाहरण.

प्रत्यक्ष मृत्युपेक्षाही त्यापूर्वीच्या काळात अनेकांची झालेली विविध प्रकारची दुर्दशा आपण ऐकलेली-पाहिलेली असते, त्यातून मृत्युविषयक भिती उपजते, असे मला वाटते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 Jan 2023 - 2:28 pm | राजेंद्र मेहेंदळे

तुम्हाला पसारा आवरायला शुभेच्छा!!

या निमित्ताने आम्हाला अजुन एक छान लेखमाला वाचायला मिळो अशी अपेक्षा!!

पसारा आवरला गेला पंत. त्यातून मुक्त झालो आहे. लेखातील शेवटल्या काही परिच्छेदात त्याविषयी लिहीलेच आहे.
आवश्यक सामान इंदौरच्या घरात नेऊन ठेवलेले असले तरी त्याबद्दल आता मनात काहीही मोह उरलेला नाही. (ते सगळे चोरीला गेले तरी काही वाटणार नाही, अश्या अवस्थेला पोचलो आहे.)
अनेक आभार.

श्वेता व्यास's picture

24 Jan 2023 - 2:37 pm | श्वेता व्यास

असा पसारा आवरणं हे कठीण काम आहे.
''रोम' रंगी रंगले मन' च्या प्रतीक्षेत!

सौंदाळा's picture

24 Jan 2023 - 2:52 pm | सौंदाळा

भावना समजू शकतो.
भरपूर फिरा, मज्जा करा आणि ईकडे लिहा.

Bhakti's picture

24 Jan 2023 - 2:58 pm | Bhakti

मावळतीच्या रंगात मनासारखे चित्र साकरणारे हळूवार लिहिले आहे.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

24 Jan 2023 - 3:59 pm | हणमंतअण्णा शंकर...

माझ्या मते तुम्ही तुमच्या पश्चात तुमच्या सहचारिणीला किंवा तुमच्या वारसदारांना काही महत्त्वाच्या गोष्टींचा त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी, तुम्ही ती घेतच असाल. तुम्हाला आणि इतरांना मी या गोष्टी सुचवतो. तुम्ही तुमच्या सामानाची विल्हेवाट लावतच आहात त्याला पूरक अशा मी आणखी दोन गोष्टी सुचवतो. माझ्या औधत्याबद्दल आणि आगावूपणाबद्दल क्षमा असावी.

ब्लॅक बुक / <तुमचा आवडता रंग> बुक :

माझ्या मते तुम्ही तुमच्या पश्चात संबंधित सर्व आप्तांना आणि विशेषतः सहचारिणी/जोडीदारांना कळेल अशा साध्या सोप्या भाषेत काही गोष्टी नमूद करून ठेवाव्यात. कृपया हे ध्यानात घ्या की तुमचा जोडीदार विनासायास या गोष्टी वाचून समजून घेऊ शकेल अशी स्पष्ट आणि विस्तृत पण साध्या सोप्या भाषेत हे वाचणार आहे. मृत्यूपत्र हे लीगल डॉक्युमेंट झाले. ते कोणाकडूनतरी वाचून घ्यावयाचे असते. त्याचा अर्थ हे तज्ञ लावतात. (म्हणजे वकील). हे ब्लॅक बुक हे मृत्यूपत्र नसावे तर त्याला पूरक अशी माहिती साध्या सोप्या शब्दात कळेल अशी आणि जी माहिती मुत्यूपत्रात येऊ शकत नाही अशी पण महत्त्वाची माहिती संकलित करणारे असावे. हे बुक हार्ड म्हणजे लिखित/छापील स्वरूपात असावे. फक्त डिजीटल स्वरूपात नको. छापील+ डिजीटल असेल तर चांगलेच! यामध्ये फक्त फॅक्चुअल माहिती ठेवावी. भावनिक आणि वैयक्तिक नको. काही उदाहरणे -

१. तुम्ही जो इमेल अ‍ॅड्रेस अनेक लीगल कामांसाठी वापरला आहे त्याचा पासवर्ड. तो इमेल अ‍ॅड्रेस डिअ‍ॅक्टिवेट करण्यासंबंधी सूचना
२. तुमच्या सगळ्या अ‍ॅसेट्स (स्थावर जंगम, वाहने इत्यादी) यांची यादी. त्यासंबंधीची महत्त्वाची डॉक्युमेंट्स कुठे आणि कसे स्टोअर केले आहेत त्याची पूर्ण यादी.
३. तुमच्या सगळ्या लाअ‍ॅबिलिटीज ( कर्ज, उधारी-उसनवारी, नवस-सायास, दानधर्म, सेवा) यांची यादी आणि अर्थातच त्यांची कागदपत्रे, परतफेड करण्यासंबंधी सूचना इत्यादी.
४. तुमच्या सगळ्या सर्जनात्मक कामाची यादी. उदा. तुमचे पेंटिंग्ज. त्यांचे स्वामित्व हक्क आणि त्यासंबंधीच्या सूचना, कागदपत्रे यांची यादी. ( कृपया हे हलक्यात घेऊ नका. तुमच्या पश्चात तुमच्या आप्तांना या गोष्टींशी डील करावे लागणार आहे हे नेहमी लक्षात घ्या )
५. सर्वात महत्त्वाचे - तुमच्या सर्व विम्यांची माहिती. त्यांचे नॉमिनीज. त्या त्या ऑनलाईन अकांऊंट्स चे पासवर्ड.
६. इतर महत्त्वाच्या ऑनलाईन अकांऊंट्सची माहिती. त्यांवरील तुम्ही लिहीलेल्या अनेकविध सर्जनात्मक कामाची प्राथमिक माहिती.
७. तुमची वैयक्तिक कागदपत्रे कशी आणि कुठे आहेत यांची सुस्पष्ट माहिती
८. ज्या गोष्टी तुमच्या वारसदारांनी पुढे चालवाव्यात अशा पारंपारिक गोष्टी. उदा. तुमचे घड्याळ जे तुम्हाला वंशपरंपरेने मिळाले आहे. एखादे फर्निचर, किचनवेअर जे पुढच्या पिढ्यांनी वापराव्यात, एखादी साधी पण कुटुंबासाठी मौल्यवान असलेली गोष्ट. उदा. तुळजाभवानीची परडी + कवड्यांची माळ
९. मृत्यूपश्चातल्या सूचना - विशेषतः अंतिम संस्कार आणि तशा सूचना. विद्युतवाहिनी इत्यादी. किंवा तुम्हाला तुमच्या अस्थी नद्यांमध्ये विसर्जित करू द्यायच्या नाहीत. किंवा तुम्हाला तुमची समाधि बांधणे नको आहे. किंवा तुम्हाला तुमच्या नावाने तुमच्या मुलांनी महावृक्ष लावावेत असे वाटत असेल तर. खूपदा आपण आयुष्यभर काही मूल्ये धरून आणि जमेल तशी पाळून आयुष्य कंठतो. परंतु परंपरेच्या नावाखाली आणि इतर सामाजिक दबावाखाली आपले वारसदार/पश्चातकुटुंब त्या मूल्यांविरोधी नकळत (त्यांचा दोष नसतो ) कृती करतात. तसे होऊ नये आणि तुमच्या मूल्यांचे पावित्र्य जपले जावे अशा सूचना.

इत्यादी इत्यादी.. यादी वाढवता येईल. पण महत्त्वाचे म्हणजे या नोटबुक मध्ये फक्त माहिती आणि सूचना ठेवाव्यात.

व्हाईट बुक/ <तुमचा आवडता दुसरा रंग> बुक :

या मध्ये तुम्ही वैयक्तिक गोष्टी ज्या तुमच्या जोडीदाराने वारसदारांनी समजून घ्याव्यात अशा जिव्हाळ्याच्या गोष्टी. राग लोभांचे निराकरण, इच्छा आकांक्षांचा आढावा, कुटुंबाकडून असलेल्या तुमच्या अपेक्षा, त्यांना आशीर्वाद, सदिच्छा अशा भावनिक गोष्टी लिहून ठेवाव्यात. जी गुपिते तुमच्याबरोबरच जातील अशी गुपिते लिहिली नाहीत तरी चालतील. परंतू उद्या तुमच्या पार्टनरला/वारसदारांना ती अचानक कळाली तर त्यांना धक्का बसू नये म्हणून शक्यतो मनमोकळेपणाने लिहावे. उदा. तुम्ही दोन महिने रॉ मध्ये अंडरकव्हर एजंट होता इत्यादी! जोक्स अपार्ट, काही गैरसमज तुमच्या माघारी इतरांना छळू नयेत अशी काळजी घेण्यासाठी हा प्रपंच!

नेहमीप्रमाणे, तुम्हाला आनंद लाभो हीच सदीच्छा!

@ हणमंतअण्णा: उपयुक्त आणि मौल्यवान सूचना आणि सदिच्छेबद्दल अनेक आभार.
कायदेशीर 'इच्छापत्रा'खेरीज आणखी दोन वेगवेगळी पत्रे करून ठेवणेही तितकेच महत्वाचे, गरजेचे आणि उपयुक्त आहे हे अगदी खरे. ढोबळपणे तसे थोडे केलेले असले, तरी हा प्रतिसाद वाचून ते काटेकोरपणे आत्ताच करून ठेवायला हवे हे जाणवले.

कंजूस's picture

24 Jan 2023 - 4:47 pm | कंजूस

मीही त्यातलाच हे अगदी थोडक्यात म्हणेन.
भरपूर सामान छंदापायी जमवलं आहे. विल्हेवाट कशी लावायची ते माहीत नाही.
रोज बोलणी खावी लागतात.

@ कंजूसः छंदापायी तुम्ही जमवलेलं सामान बघायला यायला हवं तुमच्याकडे. मला असं काही बघायला, त्याविषयी बोलायला खूप आवडतं. येत्या नोहेंबराच्या सुमारास मुंबई-पुणे प्रवास करायचा विचार आहे. त्यापूर्वी 'विल्हेवाट' लावू नका.

सुबोध खरे's picture

24 Jan 2023 - 7:51 pm | सुबोध खरे

व्याप आवरते घेणे

पाच वर्षांपूर्वी आमच्या सासूबाई अचानक हृदयविकाराने गेल्या. त्यानंतर आम्ही सासर्यांना एकटे राहू नका म्हणून सुचवल्यावर ते आपला बंगला विकून पुण्यात मुलाबरोबर स्थायिक होण्यासाठी गेले. त्यावेळेस आमच्या सासूबाईंनी जमवलेली अशी प्रचंड सामग्रीची आम्हाला चक्क विल्हेवाट लावावी लागली.

त्यात स्वतः भरतकाम केलेल्या भरजरी साड्या, हौसेने जमवलेली भांडीकुंडी, कपडे इ होते जे आमच्या मुंबई पुण्यातील छोट्या घरात मावणे शक्य नव्हते. तुमच्या कितीही भावना गुंतल्या असल्या तरी ५०-६० साड्या मोठी मोठी पितळेची भांडी घरी नेणे शक्यच नव्हते. आणि ज्यांना दिल्या त्यांना त्याच्या मागची भावना समजू शकलीच नसती. त्यांच्या दृष्टीने त्या सर्व वापरलेल्या गोष्टी होत्या. अर्थात बऱ्याच गोष्टी आम्ही परित्यक्ता, अनाथ महिलाश्रम अशा ठिकाणीच दिल्या तरीही आपल्या भावना गुंतलेल्या गोष्टी देऊन टाकणे अतिशय कठीण असते.

यास्तव आपण या गुंत्यातून आपला पाय वेळेत बाहेर काढणे हा विचार तेंव्हा पासून माझ्या मनात आहे.

गेल्या वर्षी आमचे वडील पक्षाघाताने अचानक निवर्तले परंतु त्यांनी आपली संपूर्ण व्यवस्था इतक्या उत्तम रीतीने लावलेली होती इतकी कि जायच्या आदल्या महिन्यापर्यंत प्रत्येक गुंतवणुकीचा तपशील त्यांनी आपल्या संगणकात अद्ययावत करून ठेवलेला होता.
आपले मृत्युपत्र करून सर्व मालमत्ता आमच्या आईच्या नावाने आणि त्यानंतर मी आणि माझा भाऊ यांच्याकडे कशी जाईल हे संपूर्ण लिखित स्वरूपात ठेवलेले होते.
सगळ्याच्या सगळ्या गुंतवणूकीत आईचे एकत्र नाव असूनहि मुलं सुना नातवंडापैकी कुणाचे तरी नामांकनहि केलेले होते.

यामुळे त्यांची सर्व मालमत्ता आणि वस्तू वारसाहक्काने येण्यासाठी आम्हाला वकिलाची सुद्धा गरज पडली नाही कि न्यायालयात प्रोबेट करण्यासाठी पायरी चढावी लागली नाही. ८६ व्या वर्षी जायच्या आदल्या दिवसापर्यंत बुद्धी उत्तम चालत होती आणि जीवन सुखासमाधानाने जगताना कोणतीही आसक्ती सुद्धा नव्हती.

या दोन्ही अनुभवातून गेल्यामुळे अजून साठी झालेली नसली तरी जीवनाबद्दल आसक्ती राहिलेली नाही.

आतापर्यंत जीवन सुखात जगत आलो आहे तसेच शेवटच्या दिवसापर्यंत काम करीत राहणे आणि कोणत्याही गोष्टी बद्दल तृष्णा नसणे हि आता माझी इच्छा आहे.

अर्थात जोवर मेंदू काम करत आहे तोवर डॉक्टरी करत राहणे हे मी नक्कीच करणार आहेआणि जेंव्हा पैसा पुरेसा आहे असे वाटेल तेंव्हा सरळ धर्मार्थ काम करत राहणार पण निवृत्त होऊन घरी वेळ फुकट घालवणे नक्कीच करणार नाही.

असे करणे म्हणजे राष्ट्राच्या बहुमूल्य संपत्तीचा अपव्यय करणे असे माझे मत आहे

मनाने मी कदाचित निवृत्तीच्या जवळ पोचत आहे.

@ डॉ.सुबोध खरे- वृद्धत्व आणि मृत्यु यांचे अनेकरंगी पदर या धाग्याचे निमित्ताने इथे उलगडले जात आहेत, हे सर्व वाचकांसाठी चांगलेच. तुमच्या सासूबाई, वडील यांच्याविषयी तुम्ही जसे लिहीलेत, तसे अन्य मिपाकरही लिहीतील, तर या धागा अधिक मूल्यवान होईल असे वाटते.

आता मला पैसा वाढवायचा नाही, तर मनमुराद भटकंती आणि छंद पुरे करण्यात खर्च करायचा आहे. उभा जन्म काटकसरीत घालवलेला आहे, आता तरी त्यातून मुक्ती हवी.

कलंदर मानसिकतेचे लोकच असे करू शकतील. बाकीचे ठरवतील पण ऐनवेळी खर्च करायला कचरतील...
अंतर्मुख करणारा लेख. टप्पा २ काय म्हणतोय ते वाचायला उत्सुक आहे.

तुषार काळभोर's picture

24 Jan 2023 - 9:45 pm | तुषार काळभोर

आवरतं घेता येणं, आपलं मन त्या स्थितीत नेता येणं, यासाठी जबरदस्त ताकद लावावी लागणार आहे. (थोडा जनरालयझेशनचा धोका पत्करून) महिला अशा बाबतीत जास्त हळव्या असतात. त्यामुळे असं करताना आपल्या अर्धांगाची समजूत घालणं हे थोडं जड जाऊ शकतं.

१. हणमंतअण्णा यांच्या प्रतिसादासंबंधी -
मी एक फाईल बनवली आहे. त्यात सगळ्या ऑनलाइन अकाउंट्सचे युजर आयडी आणि पासवर्ड, सगळ्या गुंतवणुकीची माहिती, विम्याची माहिती, यातील कोणत्या गोष्टीसाठी (गरज लागल्यास) कोणाची मदत घ्यावी हे आहे. (त्या त्या व्यक्तींना, तुम्हाला अशी मदत मागितली जाऊ शकते याची कल्पना देऊन ठेवली आहे). यात एक मेख अशी आहे, की अशी ऑनलाइन खाती (ईमेल पासून ते ऑनलाइन बँकिंग आणि डिमॅट पर्यंत) आपल्या अगदी कायदेशीर वारसदाराने (आपणच सांगितलेला) पासवर्ड वापरून ॲक्सेस करणं हे कितपत कायदेशीर आहे, याची एकदा शक्यता बघायला हवी. काही वर्षांपूर्वी एक बातमी वाचली होती, की पत्नी डिलीव्हरीसाठी रुग्णालयात दाखल असताना, पतीने तिच्या खात्यातून, तिचे atm card वापरून पैसे काढायचा प्रयत्न केला, तो बेकायदेशीर असल्याचा दावा बँकेने केला होता (आणि बहुधा न्यायालयाने तो उचलून धरला होता).
२. @ डॉ, सुबोध खरे,

जोवर मेंदू काम करत आहे तोवर डॉक्टरी करत राहणे हे मी नक्कीच करणार आहेआणि जेंव्हा पैसा पुरेसा आहे असे वाटेल तेंव्हा सरळ धर्मार्थ काम करत राहणार पण निवृत्त होऊन घरी वेळ फुकट घालवणे नक्कीच करणार नाही.

हे प्रचंड आवडलंय. हे मला जमावं, अशी इच्छा आहे.

विचारांना चालना देणारा लेख म्हणून पाहतो.

केवळ वयस्कर लोकांसाठी नसून तरुण पिढीसाठीही योग्य ठरावे.
म्हणजे कोणत्या वस्तू घ्यायच्या हो/नाही.
१)पर्यटनातील खरेदी ?
२)महागडी घड्याळे? -वेळ दाखवणारे यंत्र दोनशे रुपयांत मिळते
३)साड्या - शालू ,पैठणी,भरतकाम केलेल्या. पुढची पिढीच कशाला एकदा वापरून कपाटात ठेवण्यासाठी?
४)देवपुजा सामान व भांडी- भाविकपणा टिकणार का?
५) पुस्तके.- कथा कादंबऱ्या विकत आणणे?

आम्हांसाठीही मार्गदर्शक असा लेख.
पुढच्या भागाची वाट पाहत आहेच.

लेख उत्कृष्ट, प्रतिसादही उत्कृष्ट. पुभाप्र.

पुन्हा वाचल्यावर एक विचार मनात आला. केवळ ऑन अ लाईटर नोट..

फार निरानिपटी आवरून जाऊ नये. पोरांसाठी काहीतरी शिल्लक ठेवावा व्याप, प्रोसिजर.

आदर्श सोयीस्कर करून ठेवलं की पोरं आपल्या आठवणीने सारखी अधिकच दुःखी होतील.

त्यापेक्षा, "म्हाताऱ्याला हयातीतच हे सगळं करून ठेवायला काय झालं होतं. शिंची कटकट सोडून गेला" असं नावं ठेवत आपल्याला मागे टाकून पुढे जगणं त्यांना सोपं पडतं. आणि त्यांनाही जरा सराव हवा की .. :-))

कर्नलतपस्वी's picture

25 Jan 2023 - 10:42 am | कर्नलतपस्वी

माझ्या कुटुंबा पुरता मी काय विचार करतो हे मी सांगू शकतो इतरांनी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी म्हणून काही गोष्टी व्यक्तिगत असू शकतात पण बर्‍याच गोष्टी लेखात,प्रतिसादात मांडल्या आहेत त्या सर्वांनाच लागू पडतात.

मृत्यूची ओळख वय वर्ष बारा असतानाच झाली.वडील गेले,कर्तेधर्ते,त्यांच्या जाण्यामुळे मागे राहाणाऱ्या आप्त स्वकीय यांना भोगाव्या लागणाऱ्या अडचणी तेव्हांच लक्षात आल्या,अनुभवल्या व त्यातून बाहेर पडलो.एक गोष्ट मात्र अजूनही करू शकत नाही ती म्हणजे. ती मृतव्यक्ती पुन्हा कधीच दिसणार नाही यामुळे होणारी पिडा.

लवकर मेला बाप
म्हणून दृष्टी झाली साफ
कोण सुखाचे कोण फुकाचे
कळले सारे अर्थ नात्याचे

ना लोटा ना थाली
सारेच कमंडल खाली
नाही कुणाची साथ
आपणच आपला जगन्नाथ

पुढे सैन्यात निवृत्तीवेतन विभागात काम करताना विधवा, आईवडील मुले यांना सैनिकांच्या मृत्यूनंतर होणारा त्रास याच्याशी संबध आल्यामुळे आपण गेल्यावर पाठीमागील लोकांना काय त्रास होऊ शकतो याची साधारण कल्पना आहे. व तो होऊ नये या साठी आगोदरच पावले उचलली आहेत. सर्व छोट्या छोट्या गोष्टी लिहून ठेवल्या/ठेवत आहे. नामांकन सर्व ठिकाणी केले आहे.वैयक्तिक नावावर असलेली संपत्ती व कर्ज याची विल्हेवाट लावली आहे, थोडेफार बाकी आहे त्याच्यावर कारवाई सुरू आहे. ही एक न संपणारी गोष्ट आहे पण याचा दायरा,परीघ कमी करण्याचा प्रयत्न चालूच आहे.

बायकोला व मुलींना जरी हा विषय आवडत नसला तरी वेळोवेळी यावर समुपदेशन करत राहातो.

वडीलांनतर आलेल्या कौटुंबिक जबाबदारी मुळे देण्याची सवय जास्त म्हणून मोह फारसा कुठल्याच गोष्टीचा नाही.

सर्कंश्री कंजूस ,हणमंत अण्णा यांनी व इतर वाचकांचे प्रतिसाद लेखनास पुरक आहेत.

संदीप चांदणे यांचा प्रतिसाद खुप भाऊक आहे,आवडला पण यांचे म्हणणे पटत नाही.वडील वाघासारखे होते त्यांना विकलांग परिस्थितीत बघण्यास त्रास होतो हे जरी खरे असले तरी वडीलांना आपण जवळ असण्याने किती बरे,समाधान वाटेल,त्यांना आता आपल्या मदतीची गरज आहे. या गोष्टी नाकारता येत नाही.

भाऊ आहे,इतर नातेवाईक आहेत तू येऊन काय वेगळे करणार आहेस हे सुद्धा बरोबर असले तरी अंतिम समयी मी अमुक एक गोष्ट करायला हवी होती याची टोचणी उर्वरित आयुष्यात त्रासदायक होऊ शकते. याचीच एक काळी बाजू ,आम्हीच वडीलांचे सर्व केले असे बाकीचे म्हणतील त्याचे काय? संपत्ती असेल तर.... ( हे कटू सत्य आहे ते रोजच्या व्यवहारात आपण बघतोच.). पैतृक संपत्ती व मनुष्यस्वभाव यावर एक वेगळा लेख होऊ शकतो.

मृत्यूची भिती वाटत नाही असे नाही पण तो येणारच आहे हे त्रिकालाबाधित सत्य मनावर बिंबवण्याचा प्रयत्न सतत करतो.

काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ ll
अशी उन्मनी स्थिती नसली तरी पुढील प्रवासाची तयारी चालू आहे.

माझ्या हातात आहे तेवढे मी करणार बाकी मागे सुटलेले व त्यांचे नशीब.

अनिंद्य's picture

25 Jan 2023 - 11:41 am | अनिंद्य

उत्तम संकल्प केलात आणि तो तडीस नेलात, शतवार अभिनंदन !!! So inspiring for all !

माझ्या "Döstädning उर्फ मोकळे हात" धाग्यावर तुमच्या प्रतिसादावरून तुम्ही यावर काम करता आहात याची कल्पना होती. पेन्टिंग्स कचरापेटीत टाकून द्यावी लागली याचे दुःख झाले, पण एकूण व्याप कमी केला हे फार आवडले.

प्रवासात ओझे कमी असले तर मजा जास्त घेता येते, तुम्हाला उत्तम आरोग्य आणि इच्छापूर्तीसाठी शुभेच्छा. तुमच्या पुढील लेखांची वाट बघत आहे.

टर्मीनेटर's picture

25 Jan 2023 - 2:15 pm | टर्मीनेटर

लेख आवडला! अशाच विषयावर मागे अनिंद्य साहेबांचा एक लेखही वाचनात आला होता आणि (जरी त्यातल्या विचारांशी सहमत नसलो तरी) तो ही एक लेख म्हणुन नक्कीच आवडला होता!
"अनिश्चित भविष्याची काळजी करत वर्तमानात आनंदाने जगण्याकडे होणारे दुर्लक्ष" दोन्ही लेखांतून अधोरेखित झाले. अर्थात हे माझे वैयक्तिक मत, त्याच्याशी कोणी सहमत असावे अशी माझी अपेक्षाही नाही!

पेंटिंग्स ची विल्हेवाट लावतानाचा किस्सा भारीच 👍
'रोम रंगीं रंगले' हे आवडत्या छंदा विषयीचे लेखन वाचण्यात खूप रस असल्याने पुढील भागाच्या प्रतीक्षेत...

तयारी करत राहायची पण वाच्यता नको. " मरायच्या गोष्टी करू नका"

विवेकपटाईत's picture

25 Jan 2023 - 6:53 pm | विवेकपटाईत

ही दिल्लीत राहणार्‍या 60 च्या वरच्या 90 टक्के लोकांची व्यथा आहे. द्वितीय युद्धाच्या काळात घरातून पळून/ सहमतीने अनेक मराठी लोक सैन्यात भर्ती झाले. युद्धांनंतर त्यांना सरकारी नौकर्‍य लागल्या. (माझ्या मोठ्या भावाचे आणि बहिणीचे सासरे यात यादीत). त्यांची पुढची पिढीही सरकारी नौकरीत आली. (1950 मध्ये दिल्लीत आलेल्या लोकांच्या पुढच्या पिढी सरकारी नौकरीत आल्या उदा. आमचा परिवार). 1970 मध्ये जनकपुरीत, हरी नगर, विकास पुरी किमान 150 लोकांनी स्वत:चे घर बांधले किंवा DDA फ्लॅट मध्ये आले. भाड्यावर राहणारे ही मोठ्या संख्येत होते. 1977 मध्ये एका प्लॉट वर दत्त विनायक मंदिर ही बांधले . मंदिर मुख्य रस्त्यावर नाही. 1980 मध्ये जनकपुरी (उत्तम नगर) आलो. रोज रात्री मंदिरात वर्दळ राहत होते. गणेश उत्सवाच्या भंडार्‍यात 400 ते 500 लोक सहज होत होते. शनिवार-रविवार तर मंदिराच्या हाल मध्ये दिवसभर केरम टीटी आणि शेजारच्या बगीच्यात बॅडमिंटन इत्यादि. मंदिराच्या पुस्तकालायत 4 ते 5 हजार पुस्तके होते. 100 दिवाळी अंक ही याचे. तिसर्‍या पिढीत अधिकान्श मुले इंजीनियर इत्यादि झाली. त्यांना बंगलोर, पुणे किंवा विदेशात नौकर्‍या मिळाल्या. 1996 खांडेकर नावाचे सज्जन पहिल्यांदा फ्लॅट विकून महाराष्ट्रात गेले. त्यानंतर निवृती नंतर किमान 50 परिवार पुण्यात स्थायी झाले असेल. गेल्या 20 वर्षांत 90 टक्के लोक हा भाग सोडून इतर महाराष्ट्र, इंदूर इत्यादि ठिकाणी गेले. (अधिकान्श परिवारात एकच मूल होते). आज पाच परिवार जनकपुरीत राहत नाही. जे उरले आहेत त्यांची मुले ही दिल्लीत नाही. मंदिराच्या कार्यक्रमांत 50 लोक येत नाही. गणेश उत्सवाच्या भंडार्‍यात 100 ते 150. त्यातले अधिकान्श 60 + आहेत. मंदिरात येणारे अधिकान्श दक्षिण भारतीय होते. जनकपूरित ते ही मोठ्या संख्येने राहत होते. दर शुक्रवारी मंदिरात त्यांच्या श्री सूक्तचा कार्यक्रम व्हायचा. 100 एक लोक राहायचे. मंदिराचा खर्च (पुजारी सेवादार यांचे वेतन, पूजेचे पूजेचे वीज पाण्याच्या खर्च निघून जायचा). तो ही 3 वर्षांपूर्वी बंद पडला कारण तीन चार म्हातारेच उरले होते. आज मंदिराचा खर्च 30,000 रु महिना आहे. मंदिराच्या दानपेटीत 3000 रुपये ही येत नाही. त्यात शिखरासहित मंदिराची मोठी दुरूस्ती करणे भाग आहे. असो. घर सोडून जाताना सर्वांनाच त्रास होतो. माझ्या मुलाने ही ग्रेटर नोएडात एक फ्लॅट बुक केला आहे. मी ही किती काळ भागात राहणार सांगता येत नाही. बाकी दिल्लीतून महाराष्ट्रात परतलेले अनेक वृद्ध तिथेही एकटेच आहे. नव्या लोकांशी जुळविणे त्यांना ही शक्य होत नाही. नातेवाईक ही उदासीन राहतात. दिल्लीत किमान परिचित शेजारी तर होते.

चित्रगुप्त's picture

27 Jan 2023 - 12:04 am | चित्रगुप्त

मिपाबाहेरील जगातही या लेखात मांडलेल्या अनुभवाचे पदसाद उमटत असल्याची ग्वाही आत्ताच मिळाली. या लेखाचा दुवा मी काही मित्रांना, परिचितांना पाठवला होता. त्यापैकी एकाचा आत्ता फोन आला. त्यांचेही फरीदाबादमधेच घर असून पाच-सात वर्षांपूर्वी नोकरीतून निवृत्त होऊन आता कधी पुण्याला मुलाकडे, कधी फरिदाबादला असे वास्तव्य करत आहेत.
लेख वाचून त्यांनी घर विकणे वगैरे संबंधात चवकशी केली. त्यांचाही आता तोच विचार होत आहे, आणि आमच्याप्रमाणेच मनाचा लंबक कधी इकडे, कधी तिकडे झुलत आहे, घरातला पसारा अगदी सेम आहे वगैरे सांगितले. त्यांना वेगवेगळे लोक घर विकून येणार्‍या रकमेत पुण्यात दोन फ्लॅट घ्या, दुकान घेऊन भाड्याने वगैरे सल्ले देत आहेत, त्यामुळेही ते गोंधळून गेलेले आहेत.
त्यांना मी या लेखाच्या परिधीबाहेर असलेल्या अनेक बारीक सारीक गोष्टींसकट एक मोठाच पट उलगडून दाखवत काही सल्ले दिले. त्यांनी कबूल केले की असे त्यांना कुणीही सांगितलेले नव्हते, आणि आता आपण काय करायला हवे आहे याची स्वच्छ कल्पना त्यांना आलेली आहे.
असो. माझा अनुभव इतरांच्याही कामास येतो आहे, याचे समाधान वाटत आहे.

चौकस२१२'s picture

27 Jan 2023 - 3:07 pm | चौकस२१२

वेळ आली कि हा वयाप आवरत घेणे हे केले पाहिजेच पण ते वय होण्याआधी पण २-३ गोष्टी करणे जरुरीचे आहे
१) मृत्यूपत्र
२) सोप्या शब्दात ( ब्लॅक बुक ) सर्व महत्वाची माहिती लिहून ठेवणे

आणि तिसरे म्हणजे मध्य वयातच फाफट पसारा न वाढवणे ... ( कळतंय पण वळत नाही असे )
कधी कधी वाटत कि अक्षरशः २ -३ ब्यागेत भरेल एवढे सामान असावे म्हणजे कधी हि कोठेही जाण्यास बंधने नकोत ( जणू काही आपण मल्या किंवा निरव मोदी आहोत आणि कधीही देश सोडवा लागेल तर ! )

मरणार मरणार अशी वाच्यता वारंवार करून मुलांना दुखवायचं नाही.
उद्या सकाळपासून काय काय करायचं हा विचार येणे बंद झाले की मनुष्य मेल्यातच जमा होतो. ते जाहीर करावं लागतं नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jan 2023 - 10:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख उत्तम आवडला. प्रतिसादही. वाचत आहे. सालं निरोपाचं सगळं कठीणच असतं. मन गुंतत राहतच असते माणसं असो की वस्तू.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

9 Aug 2023 - 6:23 pm | चौथा कोनाडा

"आवरते व्हा" विषयी सुंदर लेख !

समवयस्क मित्र एकेक करून आपापल्या दूताबरोबर रवाना होत आहेत आणि त्यांच्या तशा जाण्यातून आपलीही वेळ आता फारशी दूर नाही,

ही लेखाची सुरुवात वाचून मन कातर झाले. काही लोक जात्यात असतात, आपण सुपात असतो ही जाणीव तीव्र होते. स्वतःलाही "आवरते व्हा" हे आपोआपच जाणवायला लागते !
आवडलेली चित्रे, पेंटिग्ज, मासिके, कात्रणे, कॅलेन्डर्स प्रचंड प्रमाणात जमवायला लागलो होतो ... संग्रह कुठे ठेवायचा हा प्रश्न सुरु झालाच होता. त्यवेळी अगदी जवळचे वयस्क चित्रकार (त्यावेळी त्यांचे वय ७० वर्षे होते) त्यांच्या अवाढव्य संग्रहाचा, जागेचा, साठवणूकीचा आणी हाताळण्याचा प्रचंड त्रास सुरु झाला हे पाहून मनोमन ठरवले आपण संग्रह करायचा नाही ... त्या मुळे वयाच्या ३५शीत अपॉप "अपरिग्रह" अंगी बाणवला गेला !

गेल्या काही वरर्षांपासून "कोनमारी पद्धत बरीच चर्चली जाऊ लागली आहे !

चांदणे संदीप, सस्नेह, सुबोध खरे, Bhakti, हणमंतअण्णा शंकर..., कंजूस, तुषार काळभोर, कर्नलतपस्वी इत्यादि मिपाकरांनी खरंच खूप सुंदर प्रतिसाद लिहिलेत !

पेंटीग्जचे तुकडे करून मगच फेकले हा किस्सा खुसखुशीत आहे !

धन्यवाद, चित्रगुप्त जी ! आता पुढचा भाग वाचायला घेतो.

चौथा कोनाडा's picture

30 Jan 2024 - 2:43 pm | चौथा कोनाडा

या लेखाचा पुढचा भाग 'रोम' रंगी रंगले मन - 'तिवोली' आणि रोमचा 'किल्ला' हा लेख वाचायला सुरुवात केला आणि हा धागा वाचला असल्याचे आठवले (त्या वेळी प्रतिसाद द्यायचा राहीला बहुधा) पुन्हा वाचायला आलो.

सुंदर लेख आणी प्रतिक्रियाही तितक्याच सुंदर !
स्वतःचा व्याप आवरता घेऊन निरोप घेणे खुपच सुंदर ! (इथं मला कालावश वैगरे शब्द आठवताहेत ! )
धन्यवाद चित्रगुप्त !