४) भारतीय विचार - सुधारक (progressive) विचार आणि भारतीय अध्यात्म
सुधारक (progressive) विचार आणि भारतीय अध्यात्म यात मूळ दोन मुद्दे आहेत. हे मुद्दे मांडण्यासाठी थोडी पार्श्वभूमी गरजेची आहे. युरोपियन रेनेसां (वैचारिक क्रांती) मुळं ‘Age of reasoning’ आणि ‘Enlightenment’ मधून मनुष्य समाजात मूलभूत बदल झाले. त्याचा परिपाक पुढे औद्योगिक क्रांती होण्यात झाला. यातून व्यक्तीच्या आणि समाजाच्या विकासासाठी स्वातंत्र्य, समता, लोकशाही ही मुल्ये विकसीत झाली. या आधुनिकतेनं (Modernity) मानवी जीवनात न-भूतो असे बदल केले. कोट्यवधि लोकांचे दारिद्र्य यातून कमी झाले, सुबत्ता आली आणि ज्या मुक्तीची मानव अपेक्षा करीत होता ती मुक्ती देण्याची क्षमता केवळ आधुनिकतेत (Modernity) आहे हाच विचार दृढ होत आहे आणि त्यात काही चुकीचं नाही. आपण सगळेच या बदलाला साक्षी आहोत आणि हे अनुभवत आहोत. युरोपियन आधुनिकतेच्या विचारात मानवी विवेक बुद्धीची उत्क्रांती कशी होत गेली आणि मॉडर्न जग हेच मनुष्याच्या विवेक बुद्धीचे सर्वात परिष्कृत गंतव्य स्थान आहे अशा ऐतिहासिकरणाची (historicization) प्रक्रिया सुरू झाली. इथेच हेही नमूद करून ठेवतो की वेदांतातला विवेक आणि आधुनिक विचारातला विवेक यात काही मूलभूत फरक आहेत. कांट-हेगेल-मार्क्स प्रभूतींनी शब्द प्रामाण्याचा (revelations) उच्छेद केला. अर्थात तो ख्रिश्चन धर्माच्या आणि बायबल संदर्भात होता. या पार्श्वभूमीवर भारतावर फ्रेंच-इंग्रज वसाहतवादाचं आणि जर्मन विचाराचं प्राबल्य निर्माण झालं. परकीय आक्रमणं भारतावर झाली आणि त्या पाठोपाठ औद्योगिक क्रांतिमुळे उत्पादनाचे-वितरणाचे नवे प्रकार अस्तित्वात आले. नवी अर्थव्यवस्था निर्माण झाली, पारंपरिक भारतीय समाज व्यवस्था हादरून गेली आणि तत्कालीन भारत एका नव्या प्रकारच्या आर्थिक पारतंत्र्यात गेला. धर्म-अर्थ-काम-मोक्ष ही पुरूषार्थ सांगणारा भारतीय विचार पूर्णपणे झाकोळला गेला. पुढे मार्क्स च्या विचाराने भारतात जाती-व्यवस्थेमध्ये जे दोष निर्माण झाले होते त्यांना ‘स्वातंत्र्य आणि समता’ यामुळे नवी परिभाषा व परिप्रेक्ष मिळाले. वर्ग व्यवस्था हा एकच मापदंड वापरून सर्व प्रचलित व्यवस्थांचा विचार सुरू झाला. भारतीय विचारवंतांनी ‘आपण का हरलो’ याचा विचार साहजिकच सुरू केला आणि युरोपियन नवविचारवादाचा भारतीय प्रवाह सुरू झाला. यालाच आपण भारतात आधुनिकतेचं युग सुरू झालं असं म्हणतो. आधुनिकता आणि ऐतिहासिकरण (modernity & historicization) यामुळे आपल्या दृष्टीत एक मूलभूत बदल झाला आहे आणि तो म्हणजे, ‘जो कोणी शब्द प्रामाण्य (revelations) हेही ज्ञानाचे साधन मानतो तो मनुष्य मागासलेल्या विचारांचा आहे.’ याची अर्थापत्ति (corollary) म्हणजे ‘असे शब्दप्रामाण्यवादी सर्व विचार टाकावू आहेत आणि ते सोडून दिले तरच मनुष्याचं अंतिम साध्य शक्य आहे.’ याचाच साधा अर्थ म्हणजे आधुनिक बनणे.
या आधुनिकतेच्या विचारालाच आपण वैज्ञानिक विचार म्हणतो. ‘देवाचे अस्तित्व आहे का? (Does God exist?’), ‘धर्म विरुद्ध शास्त्र (religion vs science)’, ‘आस्तिक-नास्तिक’, ‘पुरोगामी-सनातनी’ हे वाद याचीच काही प्रातिनिधिक उदाहरणे! या वादात सहसा कुणी दर्शन शास्त्रांच्या संदर्भात विचार करीत नाही. बहुतेक सनातनी म्हणवणाऱ्यांचा राग पुरोगामी वर्गांकडून कर्म-कांडाला होणार विरोध याला असतो. पुरोगामी वर्ग हा वर्गव्यवस्था मानणारा असल्याने त्यांना सगळीकडे ‘शोषित-शोषणकर्ते-शोषण’ हेच दिसतात. त्यात आधुनिक विवेक म्हणजे शब्द प्रामाण्य नाकारणे हे प्रमुख असल्याने वैचारिक असणे म्हणजे वेद-शास्त्र-पुराणे थोतांड आहेत अशी एका टोकाची किंवा वेद-शास्त्र-पुराणे सध्याच्या आधुनिक काळात आता अप्रस्तुत (irrelevant) आहेत अशी मवाळ भूमिका घेणे. भारतीय दर्शन शास्त्रांचा उगम आणि विकास झालाय आणि अजूनही होतोय त्याच्या मुळाशी असलेला मूळ प्रश्न हा ‘आत्यंतिक दु:ख निवृत्ति आणि शाश्वत सुख प्राप्ती साठी योग्य मार्ग कोणता?’ हा आहे. आधुनिक वैचारिक बैठक असणाऱ्या लोकांनी याचा अभ्यास केला पाहिजे.
भारतीय विचारात जीवनाचा समग्र विचार करताना व्यक्तीचा आणि समाजाचा अग्रक्रम ‘धर्म-अर्थ-काम-मोक्ष’ असा ठरवला आहे. म्हणजे अर्थ आणि काम ही पुरुषार्थ धर्म आणि मोक्ष यांच्या कक्षेत असावे लागतात. आता आधुनिक विचारात हा अग्रक्रम कसं बदलला ते पाहू. अब्राहम मास्लोनं ‘मानवी गरजांची उतरंड (Maslow's hierarchy of needs) बनवली. प्रथम मनुष्याला मूलभूत गरजा (अन्न, पाणी, निवारा आणि बॅंडविड्थ) पूर्ण कराव्या लागतात, मग मानसिक गरजा (प्रेम, यश, प्रसिद्धी वगैरे) आणि शेवटी आत्मभान येण्याची गरज भासते. या मांडणीचा सर्व जगभर पुरस्कार झालेला आहे आणि मानवी आयुष्यावर खोलवर परिणाम झाला आहे. Upward mobility हेच आधुनिक मानवाचे ध्येय बनले आहे. भारतीय विचारातून मासलोच्या hierarchy of needs चा बारकाईने विचार केला तर लक्षात येतं की इथं पुरुषार्थाचा अग्रक्रम बदललाय, तो अग्रक्रम आता आहे – ‘अर्थ-काम-धर्म-मोक्ष’. म्हणजे धर्म आणि मोक्ष यांचा विचार अर्थ आणि काम साध्य झाल्यानंतर करायचं आहे. अर्थ आणि काम हे कधीच पूर्ण साध्य होत नाहीत, अपूर्णता तशीच राहते व आधुनिक मनुष्य धर्म आणि मोक्ष यापासून दूरच राहतो. साध्या मराठीत सांगायचं तर – ‘आधी पोटोबा आणि मग विठोबा!’. या बदललेल्या अग्रक्रमामुळे माणूस विरुद्ध निसर्ग ही दुफळी निर्माण झाली आहे. वातावरण बदल आणि शाश्वत विकास याबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज त्यातूनच निर्माण झाली आहे.
दोन-तीनशे वर्षांपूर्वीचा समाज आणि सध्याचा समाज यांची तुलना करता साहजिकच हे लक्षात येते की वैज्ञानिक दृष्टीची प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे, लौकिकार्थाने सुबत्ता वाढत आहे आणि अर्थातच काही नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. समाजाला ‘शहाणं’ करण्यासाठी सुरू झालेल्या सुधारक चळवळींची शंभर-दीडशे वर्षांपूर्वीची उद्दिष्टे बरीचशी साध्य झाली आहेत. तथापि ‘आत्यंतिक दु:ख निवृत्ती व शाश्वत सुख निर्मिती’ हा प्रश्न जसा शेकडो वर्षे त्या-त्या पिढीसमोर होता तसाच तो सध्याही आहे आणि तो प्रश्न पुढच्या काळातही तसाच असणार आहे. आजच्या काळात सुसंगत विचार करून जीवनात अपेक्षित असलेले सुख प्राप्त करता यावे यासाठी हिंदू दर्शनांचा अभ्यास ज्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन (Scientific temperament) आहे, अशा सर्वांनी करावा व परंपरेने आलेली विवेकबुद्धी आचरणात आणावी.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कोणत्या ग्रंथांमधील नेमकी कोणकोणती वाक्ये आहेत ??
'धर्म-अर्थ-काम-मोक्ष' पुरुषार्थ
भारतीय दर्शनातील कोणत्या
लेख आवडला.
धर्म - अर्थ - काम - मोक्ष अशी
खुप छान लेख
धन्यवाद
Enlightenment हा युरोपिअन
आपल्या मताशी काही प्रमाणात