पुस्तक परिचय: लॉक ग्रिफिन --लेखक -वसंत वसंत लिमये

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
1 Dec 2022 - 6:28 pm

नमस्कार मंडळी
बऱ्याच दिवसांनी एक पुस्तक हाती आले आणि अतिशय रंजक असल्याने आठवड्याभरात वाचूनही झाले. त्याचीच ही ओळख. पुस्तकाचे लेखक वसंत लिमये हे माझ्यामते काही पेशाने लेखक नव्हेत. ते आय आय टी मुंबईचे मेकॅनिकल इंजिनीयर आहेत आणि पुण्यात हाय प्लेसेस नावाची ट्रेकिंग संदर्भातील एक कंपनी चालवतात. ताम्हिणी घाटात गरुड माची नावाची कॅम्प साईटही त्यांनी बनवली आहे जिथे कॉर्पोरेट ट्रेनिंग वगैरे दिली जातात. पण त्या व्यापातून वेळ काढून त्यांनी लिहिलेले हे पुस्तक केवळ अप्रतिम म्हणावे असेच आहे.

तर पुस्तकाची मध्यवर्ती पात्रे म्हणजे सौभद्र कानिटकर, म्हणजे भद्रा हा आय आय टी मध्ये शिकणारा मुलगा, रघुनाथ /जानकी हे त्याचे आई वडील , धनंजय /नेहा हे त्याचे अमेरिकेत स्थायिक झालेले काका काकू आणि भद्राची मैत्रीण ज्युलिया. २५ ते ३० जून २००० या काळात भद्राच्या आयुष्यात बरीच उलथापालथ झाली आहे. मध्यमवर्गीय डोंबिवलीकर घरातल्या आणि आता आय आय टीत शिकणाऱ्या भद्राला एक दिवस भायखळा पोलीस स्टेशनवरून फोन येतो की त्याच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला असून बॉडी ताब्यात घेण्यासाठी त्याने के इ एम इस्पितळात यावे. रस्त्यात काही गुंडानी त्यांना मारहाण केल्याच्या खुणा अंगावर असतात. अचानक बसलेल्या या हादऱ्यामुळे कोलमडलेला भद्रा मित्र अजयला बरोबर घेऊन तिथे पोचतो आणि सगळे सोपस्कार पार पाडून वडिलांचा मृतदेह ताब्यात घेतो. यथावकाश डोंबिवलीच्या घरी सगळे नातेवाईक जमून अंत्यविधी सुरु असतात तोवरच तिथे अजून एक बातमी येऊन थडकते. नैनितालच्या दरीत एका अवघड वळणावर त्याच्या धना काका आणि नेहा काकूंचा अपघाती मृत्यू झालेला असतो आणि तिकडचे सोपस्कार पार पडायला त्याला तातडीने तिकडे बोलावले असते. आपले काका काकू अमेरिकेत होते ते नैनितालला कसे पोचले ? त्यांनी भारतात येण्याअगोदर कोणालाच कसे कळवले नाही? असे सगळे प्रश्नांचे भुंगे डोक्यात घेऊन भद्रा तडक नैनितालला पोचतो आणि तिकडच्या पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर वगैरे यांना भेटून सगळ्या फॉर्मॅलिटी पार पाडतो. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने फार काळ ठेवणे शक्यच नसते त्यामुळे भद्रा तिथेच एक पंडित गाठून काका काकूंचे अंत्यविधी करतो आणि घरी परत येतो. अशा तऱ्हेने आठवडयाभरात एका मध्यमवर्गीय कुटुंबाची वाताहत होते. भद्रा पुन्हा आय आय टीत परत जातो, त्याची आई माहेरी नाशिकला तर आजोबा डोंबिवलीतच राहतात.

काळ पुढे सरकतो. दहा वर्षे होतात. आता भद्रा गुरगावमध्ये नोकरीला लागला आहे आणि १९९७ साली अमेरिकेत धना काकाकडे पार्टीत भेटलेली त्याची अमेरिकन मैत्रीण ज्युलिया तिच्या वडिलांच्या नोकरीनिमित्ताने दिल्लीत राहायला आली आहे. भद्राला दर थोडे दिवसांनी आपल्या वडील आणि काकाच्या मृत्यू संदर्भात एक वाईट स्वप्न पडते आणि तो अस्वस्थ होतो, हे ज्युलियाच्या लक्षात येते आणि ती भद्राला या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याबद्दल प्रवृत्त करते. मग भद्राही प्रथम नाशिकला जाऊन आई , मग डोंबिवलीला आजोबांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणाबद्दल विचारतो, पण त्यांच्याकडून त्याला फारच मोघम माहिती मिळते आणि अधिक शोध घ्यायचा त्याचा विचार पक्का होत जातो. धनाकाका बरोबर अमेरिकेत राहत असलेले अमिताभ आणि गीता हे दाम्पत्य आता दिल्लीत स्थायिक झाले आहे आणि अमिताभ रॉकेट लॉन्चिंग च्या संदर्भात एका सरकारी गुप्त प्रोजेक्ट वर काम करत आहेत. दादासाहेब आपटे हे भद्राच्या आजोबांचे आर एस एस मधील मित्र ,दिल्लीत माजी पंतप्रधान भीष्मराज सिंह यांचे सहायक म्हणून काम करत आहेत. विजय पवार हे दिल्लीत अनेक वर्ष पत्रकारिता करत आहेत तर भद्राचा मित्र अजय आता फिल्म लाईनमध्ये स्थिरावला आहे.

गोष्ट या सर्व व्यक्तिरेखांभोवती फिरत राहते. भद्रा प्रथम अजयच्या मदतीने भायखळा पोलीस स्टेशन गाठून काही माहिती मिळते आहे का बघतो, पण तिथेही फारसे काही हाती लागत नाही. मात्र त्या वेळी हे प्रकरण हाताळणारा पोलीस इन्स्पेक्टर निवृत्तीनंतर साताऱ्याला राहतो हे त्याला कळते. मग भद्रा आणि अजय तिकडे जाऊन त्याला भेटतात. आणि तो माणूसही भद्राला जमेल तेव्हढी मदत करायचे आश्वासन देतो. नुसते देतच नाही तर पुढच्या काही दिवसात आपल्या डिपार्टमेंट मधील ओळखी वापरून भद्राच्या वडिलांचा खुनी येडा सुलेमानला उडवतो. हा येडा सुलेमान टी इ जी ग्रुपच्या इशाऱ्यावर काम करणारा गुंड आहे आणि अजयची प्रोडक्शन कंपनी टी इ जी ग्रुपची आहे.

पुढे भद्रा ज्युलियासोबत नैनितालला जाऊन चौकशी करतो आणि तिथेही त्यावेळेस केस हाताळणाऱ्या इन्स्पेक्टर ला भेटून थोडीफार माहिती मिळवतो. त्या माहितीवरून धना काका दिल्लीला ली मेरिडियन हॉटेलमध्ये राहिला आणि तेथून त्याने फ्लायविंग ट्रॅव्हल्स ची गाडी भाड्याने घेतली वा तो नैनितालला गेला हे त्याला समजते. तसेच नारायणन नावाच्या हाय ऑथॉरिटी व्यक्तीकडून आपल्याला केस क्लोज करण्याची सूचना मिळाली हेही तो सांगतो. तरीही धना काका अमेरिकेहून कोणाला न सांगता भारतात का आला आणि मुंबईला न येत प्रथम दिल्ली आणि नंतर नैनितालला का गेला हे कोडे तसेच असते. मग भद्रा ली मेरिडियन हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका जुन्या मॅनेजरची ओळख काढतो आणि अजून माहिती मिळतेय का ते बघतो. त्यात त्याला धना काकाच्या खोट्या नावाने रूम बुक करण्याबद्दल आणि फ्लायविंग ट्रॅव्हलला जळालेल्या गाडीची भरपाई म्हणून इन्शुरन्स क्लेम न करता नवीकोरी गाडी देऊन प्रकरण दाबल्याबद्दल समजते. एकूणच या प्रकरणात भारत सरकारचा काहीतरी हात असल्याचे संकेत मिळत असतात. या वेळेपर्यंत भद्रा वेळोवेळी अमिताभ ,दादासाहेब,भीष्मराज सिंह, नारायणन या सगळ्या लोकांशी बोलत असतो पण त्याचबरोबर हे लोक आपल्यापासून काहीतरी दडवत आहेत असाही त्याला संशय येऊ लागतो. हे सर्वजण आणि भरीला ज्युलियाचे वडील स्टीव्ह सुद्धा त्याला या प्रकरणापासून दूर राहायचा, जपून राहायचा सल्ला वेळोवेळी देत राहतात, पण भद्रा अर्थातच तो काना आड करतो आणि आपले काम चालू ठेवतो.

आता भद्राला अजून एक संधी चालून येते. भद्राची कंपनी त्याला काही कामासाठी अमेरिकेत पाठवणार असते आणि आपली चौकशी तिथेही चालू ठेवण्याची संधी त्याला मिळणार असते. त्याचे काम संपताच त्याला येऊन भेटायचे ज्युलिया कबूल करते आणि अमिताभ अंकल त्याला अमेरिकेतील काही लोकांचे पत्ते देतात जे त्यावेळी धना काकाच्या आसपास होते. आता पुढची गोष्ट अमेरिकेत घडते. भद्रा अमेरिकेत त्या लोकांना भेटतोच पण पुढे जाऊन काकाच्या जळालेल्या सामानात त्याला काही पावत्या मिळालेल्या असतात त्यावरून त्याचा शोध प्रवास वॉशिंग्टन, शॅनॉनडोह, लेक ऑंटेरियो, सेंट लॉरेन्स नदी असा पुढे जातो. या सगळ्या चौकशीतून धना काकाच्या मागे सी .आय .ए. ही जबरदस्त सरकारी संघटना लागली होती आणि त्यामुळे तो जीव घेऊन पळत सुटला होता हे त्याच्या लक्षात येते. शिवाय त्याचा प्रवास पुढे ओटावा, स्कॉटलंड,लंडन,दिल्ली,नैनिताल असा झाला आहे हेही त्याला समजते.

पुढे भारतात परतल्यावर त्याची गाठ योगायोगाने २००० साली लंडनमध्ये भारतीय एम्बसीत मोठ्या पदावर काम करणाऱ्या श्री. अमर कौल यांच्याशी पडते आणि अजून एक धागा जुळतो. धना काकाच्या लंडन मधील जयदीप प्रधान या मित्राने त्याला अमर कौल यांच्याकडे नेलेले असते आणि त्याची तात्पुरत्या कागदपत्रांची व्यवस्था करून दिलेली असते त्याच्या जोरावर तो भारतात परतलेला असतो. या टप्प्यावर आता भद्राकडे बरीच माहिती गोळा झालेली असते पण ती जिगसॉ पझल सारखी तुकड्या तुकड्यात असते. ते तुकडे जुळवायचा अजून एक शेवटचा उपाय म्हणून तो पुण्यात येऊन जयदीप प्रधानांची भेट घेतो आणि त्याच्या हाती अनपेक्षितपणे एक मोठे घबाड लागते. ते म्हणजे भारतात यायच्या आधी शेवटचा मुक्काम लंडनला प्रधानांच्या घरी असताना धना काकाने त्यांना आपल्यावर ओढवलेल्या संकटाची पूर्ण माहिती दिलेली असते आणि प्रधानांनी ती तारीखवार लिहून ठेवलेली असते. भद्रा आणि ज्युलिया ते बाड पूर्ण वाचून काढतात आणि त्यांना सगळा उलगडा होतो.

धनाकाकाच्या रातोरात अमेरिकेतून भारतात तेही लांबचा वळसा घेऊन पळून येण्यामागे काय रहस्य असते? सी. आय. ए. त्याच्या जीवावर का उठली असते? भीष्मराज सिंह, दादासाहेब,नारायणन, ज्युलियाचे वडील स्टीव्ह, अमिताभ अंकल यांची या प्रकरणात काय भूमिका असते? आणि सरतेशेवटी ज्यावरून पुस्तकाचे नाव ठेवले आहे ते लॉक ग्रिफिन काय आहे? हे सगळे जाणून घेण्यासाठी पूर्ण पुस्तकच वाचावे लागेल.

जाता जाता - गोष्ट ज्या ज्या ठिकाणी फिरते त्या त्या ठिकाणचे तपशील लेखकाने खूप मेहनतीने जमवले आहेत हे जाणवते. मग ते डोंबिवली,नाशिक,दिल्ली,नैनिताल असो किंवा वॉशिंग्टन , स्कॉटलंड , नायगारा असो. तिथले रस्ते, दुकाने,हॉटेल्स व त्यात मिळणारे पदार्थ,उंची दारू,हवामान हे सगळे हुबेहूब वाचकांसमोर उभे करण्यात लेखक यशस्वी झाला आहे. काही काही ठिकाणी ते वर्णन अनाठायी वा लांबलचक वाटू शकते पण त्यामुळे एकूण वातावरण निर्मिती चांगली होते. त्यावेळची राजकीय पार्श्वभूमी, इंदिरा गांधींची हत्या,राजीव गांधींचा उदय वा हत्या, व्ही. प्रभाकरणची लिट्टे संघटना, अटलबिहारी वाजपेयींची सत्ता,२६/११ चा मुंबईवरील हल्ला याचेही तपशील कधी नावानिशी तर कधी नाव बदलून कथेत येत राहतात. त्यामुळे कथा पुढे सरकण्यास मदत होते. एकूणच एकदा जरूर वाचावे असे पुस्तक आहे असे मत मांडून हि ओळख संपवतो.

वाङ्मयप्रकटन

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

1 Dec 2022 - 6:44 pm | सौंदाळा

भारीच, पुस्तक आणि लेखक अर्थातच माहिती आहेत पण अजुन वाचायचा योग आला नाही.
वसंत वसंत लिमये यांचे 'विश्वस्त' हेसुद्धा प्रसिद्ध आणि रंजक पुस्तक आहे.
त्यांची लिहायची धाटणी बरीच पाश्चात्य लेखकांप्रमाणे आहे. मोठे मुख्य कथानक, त्यात उपकथानके, हे सर्व बर्याच शहरात, देशात वगैरे आणि जोडीला सस्पेन्स, थ्रीलर.
मला अशी पुस्तके खूपच आवडतात.
तुमच्या सुंदर परिक्षणाने आता उत्सुकता चाळवली आहे. लवकरच हे पुस्तक वाचेन.

कुमार१'s picture

1 Dec 2022 - 7:28 pm | कुमार१

परिचय आवडला

कर्नलतपस्वी's picture

3 Dec 2022 - 8:36 pm | कर्नलतपस्वी

शितावरून भाताची परीक्षा.

परीक्षण इतके भारी तर पुस्तक किती.....

सस्नेह's picture

3 Dec 2022 - 9:00 pm | सस्नेह

आणि उत्सुकता वाढवणारा. कथानक इंटरेस्टिंग आहे.

२०२० डिसेंबर महिन्यात माझ्या पुस्तक प्रकाशन समारंभात लिमये भेटले होते, नाव अर्थातच लक्षात राहणारे असल्याने माझ्या आठवणीत राहिले आहे. ते पुण्यातच असतात.

चौथा कोनाडा's picture

4 Dec 2022 - 5:20 pm | चौथा कोनाडा

अ ति शय रोचक पुस्तक परिचय ! उत्कंठा वाढवणारा !
लेखन आवडले !

श्वेता व्यास's picture

9 Dec 2022 - 11:58 am | श्वेता व्यास

पुस्तक कथा रोचक वाटते आहे. छान परिचय.

प्रचेतस's picture

9 Dec 2022 - 12:44 pm | प्रचेतस

उत्तम परीचय. हे पुस्तक वाचायला हवे.
लिमये यांचे विश्वस्त वाचले होते, संग्रही आहेच पण अत्यंत रटाळ पुस्तक वाटले.
बाकी ग्रीफिन म्हणजे सिंहाचे शरीर आणि गरुडाचे डोके आणि पंख असलेला काल्पनिक ग्रीक पशू. नाशिक लेण्यात ग्रीफिन शिल्पे आढळतात.

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Dec 2022 - 3:33 pm | ज्ञानोबाचे पैजार

बुकगंगावर या पुस्तका बद्दलच्या कॉमेंट्स काही फार चांगल्या नाहीत.
काय ब्रे करावे?
पैजारबुवा,

श्वेता२४'s picture

9 Dec 2022 - 2:30 pm | श्वेता२४

हे पुस्तक वाचायचे बकेट लिस्ट मध्ये समाविष्ट केले.

MipaPremiYogesh's picture

12 Dec 2022 - 2:57 pm | MipaPremiYogesh

मस्तच परिचय लिहिला आहे राजेंद्र. मला पण वाचायचे आहे हे पुस्तक. विश्वस्त पण वाचायचे आहे..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Dec 2022 - 3:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुस्तक ओळख आवडली.

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

12 Dec 2022 - 9:55 pm | मुक्त विहारि

पुस्तक नक्कीच वाचीन