/* Global */
body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;}
hr{border:0;border-top:1px solid #ddd;margin:20px 0}
/* Typography */
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;}
.col-sm-9 p, .field-item even p, .col-sm-9 li {font-family: 'Poppins', sans-serif; font-size:15px ! important;}
.col-sm-9 p {text-align:justify;} .samas {text-align: justify; text-indent: 16px;}
.first-letter { font-size: 200%; font-weight:700; color: rgba(2,90,93,2); text-shadow: 1px 2px rgb(0,0,0,0.3);}
/* System */
.navbar-fixed-top {background: radial-gradient(ellipse farthest-corner at left top, #FEDB37 0%, #FDB931 8%, #9f7928 30%, #8A6E2F 40%, transparent 80%), radial-gradient(ellipse farthest-corner at right bottom, #FFFFFF 0%, #FFFFAC 8%, #D1B464 25%, #5d4a1f 62.5%, #5d4a1f 100%);margin-bottom:36px;
border-bottom:1px solid #333;border-style: groove;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}
.row {margin-top: 16px;}.col-sm-9{padding:16px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}
.node header {border-bottom: 1px solid #ff8000;}
.node-info, .node footer{padding:8px;border-left:4px solid #FF5F15;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 4px 0 rgba(0,0,0,.12);}
.node footer ul.links li{border:1px solid rgba(0, 128, 128, .2);background-color:#fff}
.panel-default>.panel-heading{color:#111;background-color:#FEFEFA;border-color:#333;border-bottom-color:#008080;}.panel{background-color:#fff} .region-sidebar-second .block-menu ul.menu > li {
border-bottom: 1px solid rgba(0, 128, 128, .2);}
.jumbotron{display:none} .input-group{display:none!important}
.page-header{
padding-top:16px!important;
text-align:center;border:
background-color: #50C878;
color: #ffffff;
animation-name: mipa;
animation-duration: 8s;
animation-delay: 0s;
animation-timing-function:ease-in-out;
animation-iteration-count: infinite;}
@keyframes mipa {
from {background-color: #0F52BA;}
to {background-color: #FF5F15;}
}
.field-items img{background-color:#fff;border:1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 10px 0 rgba(0,0,0,.12);max-width:100%;height:auto!important}.author-type-posted,.field-items a:link{color:#600}
.nav > li > a {font-size:16px;} .col-sm-3 a, .panel-body p, .panel-body li {font-size:16px;font-family: 'Noto Sans',sans-serif;}
.navbar-header .logo > img { border-radius: 50%;}
/* bottom borders */
.node header, .nav-tabs, .nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {border-bottom: 1px solid #008080;}
.nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {color: #000;cursor: default;background-color: #fff;border: 1px solid #008080;border-bottom-color: transparent;}
.col-sm-9 a, .col-sm-3 a, .nav > li > a {color: #004d4d;} .nav-tabs {margin-top:48px;)}
समजा, तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर ब्रॉडवेवरून चालत निघालात. हातातली सिगारेट संपेपर्यंतच्या दहा मिनिटांत तुम्हांला ठरवायचं आहे.. आता एखादं दुःखान्त नाटक पाहावं, की गंभीर संगीतिका? एवढ्यात अचानक तुमच्या हातावर कोणीतरी हात ठेवतं. तुम्ही वळून पाहता. हिऱ्यांनी मढलेल्या, रशियन फरचा कोट घातलेल्या एका अतिशय सुंदर स्त्रीची नजर तुमच्या नजरेला भिडते. लोणी लावलेला एक गरम पाव ती घाईने तुमच्या हातात कोंबते. पट्कन एक छोटीशी कातर काढते आणि तुमच्या ओव्हरकोटाचं दुसरं बटन उडवते. गंभीरपणे दोन शब्द फेकते, "समांतरभुज चौकोन." मग समोरच्या रस्त्यावरून भर्रकन जाता जाता भेदरल्या नजरेने मागे वळून पाहते.
हे खरं साहस! आवडेल का तुम्हांला? छे, नाही आवडणार. शरमेने तुमचे गाल लाल होतील. तुम्ही बावळटासारखा तो पाव खाली टाकून द्याल आणि पुढे चालत राहाल. तुटलेल्या बटणाच्या जागेवर हळूच चाचपडत राहाल. साहसी वृत्ती अंगात खेळणाऱ्या काही मोजक्या भाग्यवान लोकांपैकी नसलात, तर हे असंच वागणार तुम्ही.
आजवरच्या इतिहासात सच्चे साहसवीर मोठ्या संख्येने जन्मलेले नाहीत. साहसवीर म्हणून प्रसिद्धी मिळालेले बरेचसे लोक एखाद्या गोष्टीच्या मागावर होते. उदा. सोनेरी केस, प्रेयसी, खजिना, मुकुट, प्रसिद्धी वगैरे. खरा साहसवीर निरुद्देश पुढे जात राहतो. अज्ञात प्राक्तनाची गाठभेट घेताना तो कसलीच गणितं मांडत नाही.
अर्धवट साहसी लोक भरपूर सापडतात. त्यांनी इतिहास आणि वाङ्मयकला समृद्ध केली. ऐतिहासिक दंतकथांचा खप वाढवला. पण त्यापैकी काहींना बक्षीस मिळवायचं होतं, ध्येय गाठायचं होतं, कार्य पार पाडायचं होतं, शर्यतीत भाग घ्यायचा होता, नाव कमवायचं होतं, वाद जिंकायचा होता, वगैरे वगैरे. म्हणजे एकंदरीत काय, तर ते केवळ साहसाकरता साहस करत नव्हते.
मोठ्या शहरांमध्ये शृंगार आणि साहस ही जोडगोळी नेहमीच सावजाच्या शोधात असते. आपण रस्त्यावरून हिंडू लागलो, की ही दोन्ही भुतं लबाड नजरेने आपल्याला हेरतात आणि निरनिराळी छप्पन रूपं घेऊन खुणावतात. नकळत वर बघावं, तर आपल्या हृदयात कोरलेल्या प्रियतम चेहऱ्यांच्या मालिकेतल्या एखाद्या चेहऱ्यासारखा चेहरा अचानक एखाद्या खिडकीतून डोकावताना दिसतो. एखाद्या सुनसान चौकातल्या ओसाड बंद घरातून वेदनेची, भीतीची किंकाळी ऐकू येते. टॅक्सी ड्रायव्हर आपल्या ओळखीच्या कोपऱ्याऐवजी एखाद्या अनोळखी दारासमोर आपल्याला नेऊन सोडतो. त्या दारात आनंदाने हसून आपलं स्वागत होतं. कुठूनतरी उंच कुंपणावरून एखादी चिठ्ठी आपल्या पायाशी येऊन पडते. भोवतालच्या गर्दीत घाईघाईने जाणाऱ्या अनोळखी लोकांना आपण कधी तिरस्काराने, कधी प्रेमाने तर कधी भीतीने पाहतो. अचानक पावसाची झड येते आणि आपल्या छत्रीखाली कोणी अप्सरा आसऱ्याला येते. कोपऱ्याकोपऱ्यावर हातरुमाल टाकले जातात, बोटं खुणावतात, डोळे नजरबंदी करतात. साहसाचे उसळते, गूढ, रम्य, सतत रूप बदलणारे इशारे आपल्यासमोर येत राहतात. पण ते ओळखून, त्यांच्या मागून जाण्याचं साहस आपल्यापैकी फार थोड्या जणांकडे असतं. जगरहाटीचा कडक रट्टा पाठीवर बसल्यामुळे आपला घाण्याचा बैल झालेला असतो. आपण तसेच पुढे जातो. शेवटी, आपल्या अत्यंत नीरस आयुष्याच्या अखेरीस आपल्या ध्यानात येतं की लग्न, बँकेत लॉकरमध्ये ठेवलेले दागिने आणि जन्मभर एका वाफेच्या इंजिनाशी केलेली वादावादी हाच आपल्या वाटणीचा फिकटसा शृंगार.
रुडॉल्फ स्टायनर हा खराखुरा साहसवीर होता. काहीतरी जबरदस्त, अनपेक्षित सापडावं अशा हेतूने तो संध्याकाळी घरातून निघाला नाही, असं क्वचितच होत असे. पुढच्याच चौकात आढळलेली एखादी गोष्ट त्याला आयुष्यातली सर्वात दिलखेचक गोष्ट वाटू लागायची! नशीब अजमावून पाहायच्या वृत्तीमुळे कधीकधी तो भलत्यासलत्या मार्गांवर पोहोचायचा. दोनदा त्याने पोलीस चौकीवर रात्र काढली होती. कितीतरी वेळा तो धूर्त ठकांच्या कारस्थानांचा बळी ठरला होता. स्तुतिसुमनं उधळणाऱ्या एका मोहमय प्रकरणाची किंमत त्याने आपलं घड्याळ आणि पैसे या रूपात चुकवली होती. इतकं असूनही, समोर आलेला प्रत्येक डाव उचलून साहसांच्या माळेत आणखी एक मणी गुंफण्याचा त्याचा उत्साह कधीच मावळला नाही.
एका संध्याकाळी रुडॉल्फ शहराच्या जुन्या भागात भटकत होता. फुटपाथवरून लोकांचे दोन प्रवाह चालले होते... घाईने घराकडे जाणारे, आणि पाहुणचाराच्या ओढीने रेस्टोरंटच्या दिशेने जाणारे. आपला हा तरुण साहसवीर शांतपणे, सावधपणे चालला होता. दिवसा तो एका पियानोच्या दुकानात नोकरी करत असे. गळ्यातल्या टायला पिन लावण्याऐवजी निळ्या पुष्कराज खड्याची अंगठी लावत असे. एकदा त्याने एका मासिकाच्या संपादकाला पत्र लिहून, मिस लिबी या लेखिकेच्या 'ज्यूनीज लव्ह टेस्ट' या पुस्तकाचा आपल्या आयुष्यावर सर्वात मोठा प्रभाव पडल्याचं कळवलं होतं.
रुडॉल्फचा फेरफटका चालू असताना, दातावर दात आपटल्याचा जोरदार आवाज आला. (तसं संशयास्पदच होतं ते.) ते दात एका रेस्टोरंटच्या समोर, काचेच्या पेटीत ठेवलेले असल्यामुळे साहजिकच त्याचं लक्ष त्या रेस्टोरंटकडे गेलं. पण तिकडे दुसरी नजर टाकताच, पुढच्या दारावर एका दंतवैद्याची पाटी दिसली. तिथे एक धिप्पाड माणूस उभा होता. भरतकाम केलेला लाल कोट, पिवळी पॅन्ट आणि सैनिकी टोपी असा त्याचा विलक्षण अवतार होता. गर्दीत येणाऱ्या जाणाऱ्यांपैकी, जो घेईल त्याला तो शांतपणे हातातलं एक एक कार्ड वाटत होता.
दंतवैद्याच्या जाहिरातीचा हा प्रकार रुडॉल्फ नेहमीच पाहत असे आणि कार्ड वाटणाऱ्याचा भार हलका न करता पुढे जात असे. पण आज मात्र त्या धिप्पाड माणसाने एक कार्ड चपळाईने रुडॉल्फच्या हातात कोंबलं. त्याची हातचलाखी सफल झालेली पाहून हसत रुडॉल्फने ते तसंच राहू दिलं.
काही यार्ड पुढे गेल्यानंतर रुडॉल्फने त्या कार्डाकडे अलिप्तपणे पाहिलं. आश्चर्य वाटून त्याने ते उलट फिरवलं, आणि पुन्हा लक्षपूर्वक पाहिलं. कार्डाची एक बाजू कोरी होती. दुसऱ्या बाजूला शाईने लिहिलं होतं, 'हिरवा दरवाजा.'
तेवढ्यात रुडॉल्फच्या तीन पावलं पुढे चालणाऱ्या माणसाने, त्याला मिळालेलं तसलंच कार्ड खाली टाकलं. रुडॉल्फने ते उचललं. त्या कार्डावर दंतवैद्याचं नाव आणि पत्ता छापला होता. दातकामाची यादी होती. 'अजिबात न दुखवता' दातकाम करण्याची हमी दिली होती.
आपल्या या साहसी पियानो विक्रेत्याने कोपऱ्यावर थांबून विचार केला. रस्ता ओलांडून तो मागच्या चौकापर्यंत गेला. मग त्याने पुन्हा रस्ता ओलांडला आणि पुन्हा पहिल्या चौकाकडे येणाऱ्या गर्दीत घुसला. त्या धिप्पाड माणसाकडे दुर्लक्ष केल्यासारखं दाखवत, हातात ठेवलं गेलेलं कार्ड त्याने बेफिकिरीने घेतलं. दहा पावलं पुढे गेल्यावर त्याने ते कार्ड नीट निरखून पाहिलं. त्या कार्डावरसुद्धा 'हिरवा दरवाजा' असंच लिहिलं होतं. हस्ताक्षरसुद्धा तेच.
फुटपाथवर मागच्या पुढच्या वाटसरूंनी तीन चार कार्डं फेकलेली त्याला दिसली. त्यांच्या कोऱ्या बाजू वर दिसत होत्या. रुडॉल्फने जाऊन ती उलटली. त्यापैकी प्रत्येक कार्डावर दंतवैद्याची तीच छापील जाहिरात होती.
रुडॉल्फ म्हणजे साहसाचा सच्चा भक्त. सहसा त्याला एकच इशारा पुरेसा असे. पण आता दोन इशारे झाले होते. आता शोध घ्यायलाच हवा होता, नव्हे सुरू झाला होता.
रुडॉल्फ संथपणे पुन्हा मागे गेला. पुन्हा एकदा कडकडणाऱ्या दातांच्या पेटीजवळ, त्या धिप्पाड माणसाजवळ गेला. पण या वेळी त्याला कार्ड मिळालं नाही. तो माणूस येणाऱ्या जाणाऱ्यांपैकी काही जणांना नाटकी थाटात कार्ड देत होता, आणि उरलेल्यांना त्रास न देता तसाच जाऊ देत होता. दर अर्ध्या मिनिटानंतर तो काही अगम्य, कर्कश घोषणा करत होता. या वेळी रुडॉल्फला कार्ड तर मिळालं नाहीच, पण त्याऐवजी एक थंड, जवळजवळ तिरस्कारयुक्त कटाक्ष मात्र त्याच्याकडे फेकला गेला.
तो कटाक्ष रुडॉल्फच्या जिव्हारी लागला. ती अबोल नजर त्याला तुच्छ ठरवत होती. कार्डावर लिहिलेल्या गूढ शब्दांचा अर्थ काही का असेना, ती कार्डं देण्यासाठी त्याने रुडॉल्फला दोनदा गर्दीतून निवडून काढलं होतं. आणि आता मात्र, त्या साहसाचा माग काढण्याइतपत हुशारी आणि धमक तुझ्यात नाही, असं ती नजर सुचवत होती.
आपला हा तरुण साहसवीर गर्दीतून जरा बाजूला झाला. हे साहसाचं प्रकरण शेजारच्या इमारतीत असेल अशा अंदाजाने, त्याने झट्कन त्या इमारतीचा अंदाज घेतला. पाच मजले, तळमजल्यावर छोटंसं रेस्टोरंट.
पहिला मजला बंद दिसत होता. तिथे स्त्रियांच्या हॅट्स किंवा फर कोट विकणारं दुकान असावं. दुसरा मजला, विजेची चमकती अक्षरं लावलेल्या दंतवैद्याचा. त्यावरच्या मजल्यावर होता हस्तसामुद्रिक, शिंपी, संगीतकार, डॉक्टर अशा अनेक पाट्यांचा सावळा गोंधळ. त्याहीवरच्या मजल्यांवर ओढलेले पडदे, खिडकीच्या चौकटीतून डोकावणाऱ्या दुधाच्या बाटल्या, म्हणजे इथे कुटुंबं राहत असावीत हे उघड होतं.
निरीक्षण करून झाल्यावर रुडॉल्फ भराभर इमारतीच्या दगडी पायऱ्या चढू लागला. दोन मजले चढल्यानंतर तो जरा थांबला. तिथल्या पॅसेजमध्ये दोन मिणमिणते दिवे होते. उजवीकडचा दिवा त्याच्यापासून लांब होता, डावीकडचा त्याच्या जवळ. त्याने जवळच्या दिव्याकडे पाहिलं.
त्या मंद प्रकाशात त्याला दिसला.. एक हिरवा दरवाजा.
तो क्षणभर गोंधळला. मग त्याला खालच्या कार्डवाल्याची ती हेटाळणीची नजर आठवली असावी. त्याने सरळ पुढे जाऊन त्या दरवाजावर थाप मारली.
थापेला उत्तर मिळण्यापूर्वीचे काही क्षण म्हणजे खऱ्याखुऱ्या साहसाची झलक. त्या हिरव्या दरवाजामागे काय असेल.. कोणी सांगावं! कोणी जुगारी जुगार खेळत असतील. कोणी लबाड मवाली आपल्या सावजाभोवती बेमालूम जाळं टाकत असतील. कोणी सुंदरी एखाद्या वीराच्या बाहुपाशात विसावली असेल. त्या उतावळ्या थापेला उत्तर म्हणून धोका, मृत्यू, प्रेम, निराशा, उपहास यातलं काहीही समोर शकलं असतं.
आतून हलकीशी चाहूल लागली, आणि हळूच दरवाजा उघडला. आत एक मुलगी उभी होती. वयाने विशीचीही नसेल. तिचा चेहरा पांढराफटक पडला होता. पाय लटपटत होते. दरवाजाची कडी सोडल्याबरोबर तिचं अशक्त शरीर हेलकावू लागलं. ती एका हाताने चाचपडू लागली. रुडॉल्फने तिला धरून, भिंतीजवळच्या विटक्या कोचावर झोपवलं. मग त्याने दरवाजा लावला आणि अंधुक प्रकाशात खोलीतून भर्रकन नजर फिरवली. खोली नीटनेटकी होती. पण रुडॉल्फला त्यात कमालीच्या दारिद्र्याची कहाणी स्पष्ट वाचता आली.
मुलगी निपचित पडून राहिली होती. शुद्ध हरपली असावी तिची. रुडॉल्फने उत्साहाने खोलीत पिंप दिसतं का ते पाहिलं. अशा लोकांना पिंपावर घालून गोल फिरवलं पाहिजे.. छे छे बेशुद्ध लोकांना नव्हे ते.. पाण्यात बुडलेल्या लोकांना. तो तिला आपल्या टोपीने वारा घालू लागला. हा उपाय लागू पडला. कारण त्याच्या डर्बी हॅटची कड मुलीच्या नाकावर आपटली आणि तिने डोळे उघडले. तिला पाहताक्षणीच, आपल्या हृदयात कोरलेल्या प्रियतम चेहऱ्यांच्या मालिकेत गुंफायचा राहिलेला चेहरा तो हाच, अशी रुडॉल्फची खातरी पटली. ते करडे धीट डोळे, अपरं नाक, वेलीच्या लतातंतूंसारखे कुरळे भुरे केस.. आपल्या साहसाचा शेवट अगदी योग्य प्रकारे झाला असून त्याबद्दल आपल्याला हे सुंदर बक्षीस मिळालं आहे, असं त्याला वाटू लागलं. पण दुर्दैवाने तो चेहरा अतिशय कृश आणि फिकट होता.
मुलगी त्याच्याकडे पाहून मंदशी हसली. "बेशुद्ध होते ना मी?" तिने क्षीणपणे विचारलं. "अशा अवस्थेत कोण बेशुद्ध पडणार नाही? अन्नाशिवाय तीन दिवस काढून पहा."
"अरे देवा!" रुडॉल्फ उद्गारला आणि उडी मारून उठला. "थांब, आलोच मी."
हिरव्या दरवाजातून तिरासारखा बाहेर पडून तो जिने उतरू लागला. विसाव्या मिनिटाला परत येऊन त्याने पायाच्या अंगठ्याने दार ढकललं. अनेक प्रकारच्या खाण्यापिण्याच्या पदार्थांचा ढीग त्याने दोन्ही हातांनी कवेत धरला होता. त्याने सगळे पदार्थ टेबलावर ठेवले. पाव, लोणी, केक्स, खारवलेली काकडी, भाजलेलं चिकन, दुधाची बाटली, आणि वाफाळता लालभडक चहा.
"काय हे.. " रुडॉल्फ म्हणाला, "असं उपास काढणं बरं नव्हे. यापुढे असले धोके अजिबात पत्करायचे नाहीत. ये, जेवण तयार आहे."
त्याने तिला आधार देत टेबलाजवळच्या खुर्चीवर नेऊन बसवलं, आणि विचारलं, "चहासाठी कप आहे का?"
"हो, खिडकीजवळच्या शेल्फवर." तिने उत्तर दिलं. कप घेऊन वळताना त्याने तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे अत्यानंदाने चमकत होते. सामानाच्या पिशव्यांमधून खारवलेली काकडी शोधून ती खाऊ लागली होती. त्याने हसत तिच्या हातातून काकडी काढून घेतली आणि तिला कपभर दूध ओतून दिलं.
"आधी दूध घे" त्याने फर्मान सोडलं, "चहा पी, चिकन खा. उद्या तुला बरं वाटलं की मग काकडी खा. आणि मला तुझा पाहुणा म्हणून स्वीकारलंस, तर आता आपण जेवून घेऊ."
तो दुसऱ्या खुर्चीत बसला. चहा प्यायल्यानंतर मुलीच्या डोळ्यांत तेज दिसू लागलं. पांढुरक्या चेहऱ्यावर रंग दिसू लागला. ती एखाद्या भुकेल्या प्राण्यासारखी बकाबका जेवू लागली. खोलीतला तो तरुण आणि त्याने केलेली मदत या गोष्टी तिने सहज स्वीकारल्या. म्हणजे त्यांची किंमत कमी ठरवली असं नव्हे. पण तिच्यावर ओढवलेल्या संकटामुळे तिला कृत्रिम शिष्टाचार बाजूला ठेवण्याचा अधिकार मिळाल्यासारखा झाला होता. हळूहळू तिची ताकद परत येऊ लागली, बरं वाटू लागलं,तेव्हा तिला शिष्टाचाराची थोडीशी आठवण झाली. मग तिने त्याला तिची छोटीशी कहाणी सांगायला सुरुवात केली. त्या शहरात रोज अशा हजार कहाण्या लोक ऐकत असतील आणि कंटाळून जांभया देत असतील. दुकानात नोकरी करणारी मुलगी.. अपुरा पगार, त्यातून कापला गेलेला, मालकाच्या नफ्यात भर घालणारा दंड, आजारपणामुळे झालेले खाडे, त्यामुळे गेलेली नोकरी.. निराशा.. आणि मग, आपल्या साहसवीराची दरवाजावर पडलेली थाप.
तिचा भूतकाळ रुडॉल्फला एखाद्या करूण महाकाव्यासारखा भासला. "किती सहन केलंस तू!" तो उद्गारला.
"हो, कठीण काळ होता खरा." ती गंभीरपणे म्हणाली.
"या शहरात तुझे कोणी नातेवाईक, मित्रमैत्रिणी?"
"कोणीच नाही."
"मीसुद्धा जगात अगदी एकटा आहे. " जरा थांबून रुडॉल्फ म्हणाला.
"हो का? बरं." ती लगेच म्हणाली. का कोणास ठाऊक, आपली दुर्दैवी अवस्था तिने स्वीकारल्याचं ऐकून त्याला आनंद झाला.
अचानक तिचे डोळे मिटू लागले. तिने एक मोठा सुस्कारा सोडला.
"मला खूप खूप झोप येतेय, आणि अगदी छान वाटतंय." ती म्हणाली.
मग रुडॉल्फ उठला. त्याने आपली टोपी उचलली. "गुड नाइट. रात्रभर गाढ झोप लागली की बरं वाटेल तुला."
त्याने हात पुढे केला. तिने तो हातात घेऊन "गुड नाइट" म्हटलं. पण तिच्या बोलक्या डोळ्यांनी विचारलेला प्रश्न इतका स्पष्ट आणि आर्जवी होता, की त्याने शब्दांनी उत्तर दिलं, "होय, मी उद्या येणार आहे, तुझी तब्येत कशी सुधारते ते पाहायला. तू अशी मला सहज कटवू शकणार नाहीस! "
मग तो दाराशी गेल्यावर तिने विचारलं, "पण तुम्ही माझ्या दरवाजावर कशी काय थाप मारलीत?"
त्याने क्षणभर तिच्याकडे पाहिलं. त्याला ती कार्डं आठवली आणि मत्सराची कळ जाणवली. त्याच्याऐवजी त्याच्यासारख्या दुसऱ्या एखाद्या साहसी तरुणाच्या हातात ते कार्ड पडतं तर? लगेच त्याने निर्णय घेतला, तिला सत्य कळता कामा नये. ती बिचारी दुर्दैवाने या प्रसंगात सापडली होती. पण कार्डाने पूर्वसूचना दिल्यामुळे त्याला एक विचित्रसा फायदा मिळाला होता, हे तो तिला कधीच कळू देणार नव्हता.
"आमचे पियानो सुरात लावून देणारा एक जण या इमारतीत राहतो," तो म्हणाला, "चुकून मी तुझ्या दरवाजावर थाप मारली."
हिरवा दरवाजा बंद होण्यापूर्वी तिच्या चेहऱ्यावरचं हास्य त्याने एकदा शेवटचं पाहून घेतलं.
जाताना जिन्याजवळ थांबून त्याने कुतूहलाने सभोवती पाहिलं. मग तो पॅसेजच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन परत आला. जिन्याने वरच्या मजल्यावर जाऊन तिथेही त्याने शोधक नजरेने पाहिलं.
त्या इमारतीतला प्रत्येक दरवाजा हिरवा होता.
आश्चर्यचकित होऊन तो खाली उतरला. फुटपाथवरून चालू लागला. तो धिप्पाड माणूस अजूनही तिथे होता. रुडॉल्फने हातातली दोन्ही कार्डं त्याच्यासमोर नाचवली. "काय रे, ही कार्डं का दिलीस मला? काय अर्थ काय या कार्डांचा?" त्याने विचारलं.
तो माणूस अगदी मनापासून, तोंडभर हसला. जणू त्याच्या मालकाच्या व्यवसायाची जाहिरात!
"ते बघा साहेब," त्याने रस्त्याच्या दुसऱ्या टोकाकडे बोट दाखवलं, "पण जरा उशीर केलात.. पहिला अंक सुरू झाला असेल."
रुडॉल्फने त्या दिशेला पाहिलं. एका नाट्यगृहासमोर नाटकाची झगमगीत पाटी होती, 'हिरवा दरवाजा.'
"जबरदस्त नाटक आहे साहेब! नाटकवाल्याने एक अख्खा डॉलर दिला मला. तुझ्या डॉक्टरची कार्डं देतोस ना लोकांना, त्याबरोबर नाटकाचीसुद्धा दे, म्हणाला. डॉक्टरांचं एक कार्ड देऊ तुम्हाला?"
आपल्या घराजवळच्या चौकात पोहोचल्यावर रुडॉल्फ बियर आणि सिगार घ्यायला थांबला. शिलगावलेला सिगार घेऊन बाहेर पडताना, कोटाची बटणं लावत, टोपी मागे सरकवत, रस्त्यावरच्या दिव्याला त्याने ठणकावून सांगितलं, "काही का असेना, मला वाटतं, ती मला भेटावी म्हणून नशिबाने हा डाव रचला होता."
अशा परिस्थितीत, हा निष्कर्ष पाहता रुडॉल्फ स्टायनर याला शृंगाराचा आणि साहसाचा सच्चा भक्त म्हणायला काहीच हरकत नाही!
मूळ कथा - The Green Door by O. Henry
मिस लिबी - Laura Jean Libbey. स्त्रीजीवनाचं चित्रण करणाऱ्या लेखिका. त्यांच्या कादंबऱ्या फॅक्टरीत काम करणाऱ्या स्त्रियांपुढच्या अडचणी, घरचा पाठिंबा नसणं, योग्य जोडीदार मिळवण्याची धडपड अशा विषयांवर आधारित होत्या.
प्रताधिकारमुक्त मूळ कथा आणि प्रकाशचित्र आंतरजालावरून साभार.
कुमार१ लिखित O. Henry परिचय
प्रतिक्रिया
10 Nov 2022 - 3:48 pm | बाजीगर
छान वाटलं भाषांतरीत कथा वाचतांना.
तुम्ही पूर्वी 'दक्षता' पोलीसांच्या मासिकातल्या शेरलाॅक होम्स च्या कथा, कुणीतरी मंगला डडाडडाडडा त्या कथा लिहायच्या (आडनाव विसरलो), नतर दक्षता मधे कथा येणं बंद झालं,
त्यावरुन आम्ही 'त्या' मंगलाचं शुभमंगल झालं असावं हा detective कयास बांधला.
ह्या कथेत त्या रहस्यमय "रेक्ट्ँगल" म्हणणा-या बाईच्या मागं तुम्ही गेला नाहित कारण तुम्हाला अर्धवट साहस नकोय.
डिटेलींग वर्णन फार रंजक आहेत पूर्ण कल्पनाचित्र डोळ्यापुढं उभ रहातं.अशक्य अतर्क्य शक्यतांमधून हिरौ तरुणीला जाऊन भेटतो.
आपलं काही मिस तर.केले नाहीना म्हणत तुम्ही गुगल वर
https://litpriest.com/short-stories/the-green-door-summary/ वाचता.
तुम्ही तुम्ही म्हटत मी वाचक घोळात येतो, सायकोलाॅजीक हॅक आहे.
आवडलं भाषांतर हं, अभिनंदन.
11 Nov 2022 - 9:35 pm | स्मिताके
प्रतिसादाबद्द्ल आभार. अनुवाद आवडला हे वाचून आनंद झाला.
मंगलाचं शुभमंगल :) :)
सायकोलाॅजीक हॅक... व्वा!
10 Nov 2022 - 3:48 pm | बाजीगर
छान वाटलं भाषांतरीत कथा वाचतांना.
तुम्ही पूर्वी 'दक्षता' पोलीसांच्या मासिकातल्या शेरलाॅक होम्स च्या कथा, कुणीतरी मंगला डडाडडाडडा त्या कथा लिहायच्या (आडनाव विसरलो), नतर दक्षता मधे कथा येणं बंद झालं,
त्यावरुन आम्ही 'त्या' मंगलाचं शुभमंगल झालं असावं हा detective कयास बांधला.
ह्या कथेत त्या रहस्यमय "रेक्ट्ँगल" म्हणणा-या बाईच्या मागं तुम्ही गेला नाहित कारण तुम्हाला अर्धवट साहस नकोय.
डिटेलींग वर्णन फार रंजक आहेत पूर्ण कल्पनाचित्र डोळ्यापुढं उभ रहातं.अशक्य अतर्क्य शक्यतांमधून हिरौ तरुणीला जाऊन भेटतो.
आपलं काही मिस तर.केले नाहीना म्हणत तुम्ही गुगल वर
https://litpriest.com/short-stories/the-green-door-summary/ वाचता.
तुम्ही तुम्ही म्हटत मी वाचक घोळात येतो, सायकोलाॅजीक हॅक आहे.
आवडलं भाषांतर हं, अभिनंदन.
10 Nov 2022 - 4:22 pm | सस्नेह
उत्तम कथा!
रुपांतरही चांगलं जमलंय.
10 Nov 2022 - 5:52 pm | कर्नलतपस्वी
अनुवाद आवडला.
बाजीगर भौ चे आभार. लिंक टिकलली आणी गोष्टीचा हिरवा दरवाजा उघडला.
दोघांचेही आभार.
11 Nov 2022 - 9:42 pm | स्मिताके
सस्नेह, कर्नलतपस्वी
प्रतिसादाबद्द्ल अनेक आभार.
बाजीगर - डिटेलींग वर्णन >> हो, त्यामुळे ओ. हेन्री कथांना समर्पक प्रकाशचित्रं मिळवणं मला तरी अशक्य वाटतं. आपण आपोआप कल्पनाचित्रं पाहू लागतो.
12 Nov 2022 - 2:59 pm | सरिता बांदेकर
छान. आवडली कथा.
12 Nov 2022 - 5:00 pm | टर्मीनेटर
इतका सुरेख अनुवाद वाचल्यावर मुळ कथा वाचायची गरजच उरली नाही 👍
निखळ मनोरंजन करणारी ही अनुवादित कथा खुप आवडली, शेवट तर लैच भारी 😀
12 Nov 2022 - 5:12 pm | टर्मीनेटर
आणि हो, तुम्हाला एक विनंती...
तुमचे लेखन दिवाळी अंकापुरते मर्यादित नं ठेवता दर आठवड्याला एक किंवा पंधरवड्याला एक, अगदी तेही शक्य नसल्यास गेला बाजार महिन्याला एक तरी अशी छानशी अनुवादीत कथा लिहीत चला, वाचायला नक्कीच आवडेल!
13 Nov 2022 - 10:48 pm | विनिता००२
छान :)
अनुवाद आवडला. नियती आणि वास्तव याची सुरेख सांगड वाटली कथेत..
लिहीत रहा :)
14 Nov 2022 - 11:52 am | विवेकपटाईत
कथा मस्त वाटली.
14 Nov 2022 - 10:55 pm | स्मिताके
सरिता बांदेकर, टर्मीनेटर, विनिता००२, विवेकपटाईत
कथा आवडल्याचे आवर्जून कळवल्याबद्द्ल अनेक आभार.
टर्मीनेटर : हो, नक्की लिहीन. पण एक दोन आठवड्यांत एक कथा हे माझ्यासाठी अशक्य टारगेट आहे! दोनेक महिन्यांत एखादी कथा असा वेग जमतो का पहायला हवं.
14 Nov 2022 - 11:47 pm | श्रीगुरुजी
छान कथा आहे. शेवटपर्यंत उत्सुकता ताणली गेली होती. अजून लिहा.
15 Nov 2022 - 9:11 am | मुक्त विहारि
धन्यवाद
15 Nov 2022 - 10:57 am | अथांग आकाश
सुरवातीला हे वाचल्यावर हसू आले व पुढची ष्टोरी मजेदार असेल याचा अंदाज आला!!
शेवट अगदीच अनपेक्षित आणि गमतीदार :)
17 Nov 2022 - 5:16 pm | स्मिताके
नेहमीप्रमाणे मस्त चित्रात्मक प्रतिसाद. बेल वाजवण्याऐवजी थाप मारणारा हात असता तर शीर्षकचित्र म्हणून वापरता आला असता, असा विचार मनात आला.
16 Nov 2022 - 12:59 pm | श्वेता व्यास
छान झाला आहे अनुवाद, खरंच मूळ गोष्ट वाचायची गरजच पडली नाही.
गोष्ट आणि अनुवाद या दोन्हींनी गुंतवून ठेवलं.
17 Nov 2022 - 5:14 pm | स्मिताके
श्रीगुरुजी, मुक्त विहारि, अथांग आकाश, श्वेता व्यास
प्रतिसादाबद्द्ल आभारी आहे.
18 Nov 2022 - 5:16 pm | श्वेता२४
वाचून मजा आली.
21 Nov 2022 - 12:25 pm | गोरगावलेकर
अनुवाद छानच
24 Nov 2022 - 2:19 am | स्मिताके
श्वेता२४, गोरगावलेकर
आपल्याला कथा आवडल्याचं वाचून आनंद झाला.