बालपण आणि भीती

सस्नेह's picture
सस्नेह in काथ्याकूट
3 Nov 2022 - 5:31 pm
गाभा: 

मिपाकर मंडळी , आपण सगळे ज्याकडे डोळे लावून बसलोत तो दिवाळी अंक काही अजून अवतरला नाही. तोवर काही हलकेफुलके टीपी करावे म्हटले.
प्रत्येकाच्या बालपणात कसली ना कसली भीतीची आठवण असते. आमच्या बालपणी आजूबाजूला परिसरात झाडझाडोरा भरपूर असे. गल्ली ओलांडली की झाडी, नदीकाठ, दलदल, गवत, चिखल , पायवाटा यांची रेलचेल. एकटेदुकटे मूल त्यातून जायची पाळी आली तर दबकूनच असे. रात्री चंद्राच्या छायाप्रकाशाबरोबर भुताखेतांच्या गोष्टी रंगत. त्या सगळ्या झाडांमधून जाताना आठवत आणि हलणाऱ्या प्रत्येक झाडावर मुंजा, खविस, झोटिंग, हडळ इ. भुतावळ दबा धरून बसली आहे, असे वाटत राही.
आठवीत होते मी. शाळेच्या रस्त्यावर बक्कळ झाडी. त्यात एक पिंपळाचे भले थोरले झाड होते. त्यावर मुंजा नावाचे नामांकित भूत राहते असे एका भाबड्या शाळूसोबत्याने एकदा सांगितलेले. तेव्हा पासून मी शक्यतो एकटी शाळेचा रस्ता तुडवणे लागू नये असे कटाक्षाने बघत असे.
एकदा मात्र अगदी नाईलाज झाला. दोघीही मैत्रिणी सुट्टीवर. शनिवार म्हणून सकाळची शाळा साडेअकरा सुटलेली. भर बाराच्या सुमारास मी एकटीच घरचा रस्ता तुडवू लागले. रस्त्यावर चिटपाखरूही नाही. ऊन मी म्हणत असलेले. मनात मुंजा. ही भुतावळ शनिवारी आणि रात्री किंवा दिवसा बारा वाजता भलती अॅक्टिव्ह होत असते, असे कुणीतरी केव्हातरी सांगितलेले. रामरक्षा म्हणत म्हणत मी रस्ता कापत होते. पिंपळ जवळ आला. सळसळ आवाज ऐकत मी पिंपळाकडे न बघता खाली मान घालून पुढे सरकले. इतक्यात मागून धप्पकन आवाज आला. मी दचकून भराभरा चालू लागले. तर मागून 'अगं, थांब थांब...मी येणार आहे...'
झालं. मी दप्तर गळ्यात मारले आणि जी धावत सुटले ती थेट कॉलनीच्या गेट पाशीच येऊन थांबले. जोरजोरात श्वास घेत कट्ट्यावर बसले. तर माझ्या मागून धावणारा प्राणी थेट माझ्या शेजारीच येऊन बसला !
अरे हा तर कुलकर्ण्यांचा समीर !
' अगं ताई, किती वेगात पळतेस ! जरा थांबशील की नाही माझ्यासाठी ? मला त्या पिंपळावरच्या मुंजाची भीती वाटते, म्हणून तुझ्याबरोबर यायला निघालो तर तू पुढेच ! दमलो ना तुझ्याबरोबर धावून.' समीर लालेलाल चेहरा आणि पाणावलेल्या डोळ्यांनी बोलला.
मी कपाळावर हात मारला आणि सगळं सांगितल्यावर दोघेही हसत सुटलो !!
तुमच्याही बालपणीच्या भीतीची गोष्ट ईथे शेअर करा !

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

3 Nov 2022 - 7:47 pm | मुक्त विहारि

माझ्या दृष्टीने, गणित आणि शास्त्र आणि जोडीला चित्रकला, ही खरी भुतावळ होती

आणि शाळा म्हणजे, ह्या भुतांचे निवासस्थान असलेले ठिकाण....

त्यामुळे, इतर भुतांची किंवा ते रहात असलेल्या ठिकाणांची कधीच भिती वाटली नाही ....

तर्कवादी's picture

3 Nov 2022 - 8:00 pm | तर्कवादी

भुतांची नाही वाटली फारशी कधी .. नाही म्हणायला किलेका रहस्य ही मालिका बघितल्यावर दुसरे दिवशी थोडी भिती वाटायची (नेमका दुसरे दिवशी मी घरी दुपारी थोडा वेळ एकटा असायचो) पण तेव्हा मी फक्त ८-९ वर्षांचा होतो.
भटक्या कुत्र्यांची भिती मात्र नेहमीच वाटायची, आताही वाटते

नचिकेत जवखेडकर's picture

4 Nov 2022 - 7:34 am | नचिकेत जवखेडकर

एक नंबर किस्सा :D

कधीपासून आठवत नाही पण मला सापांची प्रचंड भीती वाटते. म्हणजे अगदी एखाद्या झाडाखालून जाताना सुद्धा असा वाटतं की वरून साप पडला आणि चावला तर काय. किंवा कुठे जाताना छान रान दिसलं तरी पहिला विचार हाच येतो मनात की यात केवढे साप असतील. स्वप्न पण, साप अंगावर येतोय वगैरे अशीच पडतात बऱ्याचदा :(

मुक्त विहारि's picture

4 Nov 2022 - 7:54 am | मुक्त विहारि

साप नैसर्गिक रित्या माणसांवर आक्रमण करत नाही. शिवाय सापांचा कळप नसतो.

आक्रमक कळप, हे सापापेक्षा जास्त धोकादायक.

तीन वेळा नाग, समोरून गेला. मला बघताच, त्याने फणा काढला, पण मी प्रतिकार केला नाही. त्यामुळे, परत फिरला. एकदा मण्यार अंगावर पडली होती.

आक्रमकांची मानसिकता उलट असते. जोरदार प्रतिकार केला की, आक्रमक पळून जातात. उदा. शाहिस्तेखान आणि बहलोलखान...

नचिकेत जवखेडकर's picture

4 Nov 2022 - 1:25 pm | नचिकेत जवखेडकर

बाप रे! मण्यार अंगावर पडणे म्हणजे डेंजरच की. सस्नेह आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणेच मलादेखील साप किंवा नाग हे छान देखणे वाटतात पण फक्त चित्रांमध्ये किंवा विडिओ क्लिप मध्ये :). कदाचित एक प्रकारचा फोबिया आहे असं वाटायला लागलंय. बघू नक्की प्रयत्न करीन भीती घालवायचा :)

मुक्त विहारि's picture

4 Nov 2022 - 4:43 pm | मुक्त विहारि

त्यापेक्षा मण्यार जास्त घाबरली असावी किंवा अचंबीत झाली असावी, कारण ती लगेच पळून गेली ....

सापाला घाबरणे, हा फोबिया नाही ...

एकाच जागी स्थिर न राहणार्या प्राण्याला काही माणसे घाबरतात, उदाहरणार्थ, झूरळ, उंदीर...

आधी भीती वाटायची सापांची.
पण 17 वर्षांपूर्वी घर बाधताना आणि बांधल्यावर वरचेवर साप निघायचे. काही करत नसत, आपल्या वाटेने जातात. आता नाही वाटत त्यांची भीती. देखणं जनावर ! उन्हात सळसळ करतात तेव्हा बघून मंत्रमुग्ध व्हायला होतं.

सहमत आहे.

फणा काढलेल्या नागाला बघून पण, असेच झाले होते.

त्यातला एक एपिसोड पाहून खूप घाबरले होते. त्यात घरातील खूर्ची आपोआप पुढे मागे वगैरे व्हयची ते पाहून खूप घाबरले होते. त्याच्या मगचे कारण इतके फूटकळ होते कि त्या खू्रचीला खाली लोखंडी खिळे लावलेले व आरोपी खालच्या मजल्यावरील फ्लॅटच्या सिलिंगला चुंबकाने स्पर्ष करुन ते पुढे मागे करायचा व त्या मुलीला घाबरवायचा.असे डिटेक्टीव शोधून काढतो :)))) आज हे खूपच हास्यास्पद वाटले तरी त्यावेळी मी दुसरीत वगैरे असेन. मला ते सगळं खूप खरं वाटलं होतं.

श्वेता व्यास's picture

4 Nov 2022 - 11:51 am | श्वेता व्यास

+१ मी सुद्धा खूप घाबरले होते ते बघून. पार्श्वसंगीताचा परिणाम असेल.

श्वेता व्यास's picture

4 Nov 2022 - 11:43 am | श्वेता व्यास

मला लहानपणी अंधाराची भीती वाटायची आणि अजून पण वाटते. :)
एखादं भूत असेलच आणि ते मला उजेडात दिसलं तर मी आजिबात घाबरणार नाही, पण अंधारात काहीच नसेल तरी भीती वाटते.

कर्नलतपस्वी's picture

4 Nov 2022 - 1:10 pm | कर्नलतपस्वी

लहानपणी गावात विज नाही ग्रामपंचायत चे कंदिल संध्याकाळी थोडावेळ टिमटिमायचे. वस्ती कमी असल्याने आसपास झाडझाडोरा भरपुर.
नदीचा किनार,खंडोबाचा माळ त्या मुळे पिशीमावशी आणी तीची भुतावळ यांची संख्या भरपुर. रातकिड्यांचा आवाज,मधूनच उडत जाणारी टिटवी ,चेटकीणीच्या लांब केसांत सारख्या वडाच्या पारंब्या वडाच्या झाडाला उलटी लटकलेली काळ्या तोंडाची वटवाघळे आणी नदीच्या साती आसरा व साती चिंचेच्या झाडावरच्या हडळी.

फुल टु रामसेंच्या हाॅरर भयपटाकरता पोषक वातावरण.आंगात येणे, भानामती, एकधारी ,तिनधारी लिबं, तीठ्यावरचा आमोशाचा उतारा,काळी बाहुली,नारळ.

असे मस्त वातावरण मग काय किस्सेच किस्से.

सांगा की आठवतील ते किस्से आम्हाला :)

कर्नलतपस्वी's picture

5 Nov 2022 - 10:49 am | कर्नलतपस्वी

लहानपणापासूनच भिती नावाची गोष्ट माहीत नाही. सात आठ वर्षाचा होतो. मे महिना,परीक्षा झाल्यावर धुडगूस घालण्या साठी हक्काची सुट्टी.

एक दिवस पाच सहा मित्रांनी ठरवले संध्याकाळी डबे घेऊन मित्राच्या शेतावर जायचे ठरले. राजापुरी (वेडा अंबा)आंबे झाडावर पिकून पिवळे होऊ लागले होते.
मित्राचे कुटुंब शेतावर रहात असल्याने घरून सहज परवानगी मिळाली.

शेत नदी काठी ,मे महिन्यात नदीपात्र कोरडे पडलेले व मधोमध असलेली पाण्याची टाकी वर दिसू लागली होती. सभोवती गुडघाभर पाणी.

कुणाच्यातरी डोक्यात भन्नाट आयडिया आली की टाकीवर बसुन जेवू आणी मग झोपायला शेतावर जाऊ.

रात्री सर्वत्र गुफ्फ अंधार आणी भयाण शांतता. मित्र मित्र असल्यामुळे या गोष्टीवर लक्षच गेले नाही. टाकीवर भरपुर मस्ती केली ,जेवलो वेळ कसा गेला कळलेच नाही.

रात्री नदीतून काही लोक पलिकडच्या गावात चालले होते. बहुतेक सिनेमा बघून चालले असावे.

एक मित्र म्हणाला यांची गम्मत करू. आम्ही सर्व वेडेवाकडे नाचत ओरडू लागलो. भुक लागलीय जेवण द्या. ते त्या टोळक्याने ऐकले आणी मग जी काही त्यांची भंबेरी उडाली ते बघून आम्हाला मजा आली.

आमचा दुधवाला त्याच गावातनं यायचा. त्याने आमच्या घरी सांगीतलं की त्याच्या गावातल्या लोकांनी रात्री नदीत भुतांचा नाच बघीतला अन आता तापाने फणफणलीयेत.
दुधवाला गेल्यावर मी आईला सगळी स्टोरी सांगीतली अन मग माझी वडिलांनी यथेच्छ धुलाई केली.

गेले ते दिन गेले.

मुक्त विहारि's picture

5 Nov 2022 - 11:06 am | मुक्त विहारि

आवडला....

म्हणजे बालपणीपासूनच मिलिटरी मॅन होतात म्हणायचे :)
( कृपया मला स्नेहाताई म्हणा. )

कर्नलतपस्वी's picture

15 Nov 2022 - 12:11 pm | कर्नलतपस्वी

स्नेहाताई म्हणायला आनंदच होईल.

सस्नेह's picture

15 Nov 2022 - 1:17 pm | सस्नेह

:)
इथे सगळे मला याच नावाने ओळखतात.

तिमा's picture

5 Nov 2022 - 7:07 am | तिमा

लहानपणी चाळीत रहायचो. घराच्या मागच्या दरवाजाने बाहेर पडून अरुंद रस्त्याने १००-२०० मीटर गेल्यावर कॉमन संडास होते. तर भलं मोठं टमरेल घेऊन घरामागच्या, एका बाजुला पूर्ण झाडी असलेल्या रस्त्याने जायला भीति वाटे. कारण त्या झाडीत एक घोरपड रहायची आणि तिने एकदा एका कुत्र्याचा पाय असा धरला होता की पाय तुटूनच ते कुत्रं मोकळं झालं आणि विव्हळत पळालं.

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Nov 2022 - 11:55 am | राजेंद्र मेहेंदळे

लहानपणी अंधाराची थोडी भिती वाटायची. पण ट्रेकिंग करायला लागल्यावर ईतक्या भलभलत्या ठिकाणी किल्ल्यांवर्,गुहांमध्ये, देवळात, शाळेच्या पडवीत राहिलोय की अंधाराची आणि भुताखेतांची भिती वाटलीच नाही.

पण एकदा मी उशिरा बाहेरुन घरी परत आलो तर दार उघडेच होते. तेव्हा घरात रात्री चोर शिरले होते आणि मी आत घुसलो तर कोणीतरी मला हाणेल अशी भिती मनात बसली. तसेच एकदा बाईकवरुन रात्री घरी येताना हायवेला ३ चोरट्यांनी मला अडवुन लुटायचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ती भिती मनात बसली आहे. भितीपेक्षा सावधगिरी बाळगतो म्हणा.

प्रचेतस's picture

10 Nov 2022 - 12:17 pm | प्रचेतस

>>>पण एकदा मी उशिरा बाहेरुन घरी परत आलो तर दार उघडेच होते. तेव्हा घरात रात्री चोर शिरले होते आणि मी आत घुसलो तर कोणीतरी मला हाणेल अशी भिती मनात बसली. तसेच एकदा बाईकवरुन रात्री घरी येताना हायवेला ३ चोरट्यांनी मला अडवुन लुटायचा प्रयत्न केला होता

तुम्ही यातून कसे सुटलात ते अवश्य लिहा. पहिल्या घटनेत दाराला बाहेरुन कडी लावून शेजार्‍यांना, पोलीसांना बोलावून चोरट्यांना पकडलेत काय?

सस्नेह's picture

10 Nov 2022 - 4:18 pm | सस्नेह

चोर आहेत हे तुम्हाला कसे समजले ?
आणि मग पुढे काय झाले ते सांगा ना.

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Nov 2022 - 7:42 pm | राजेंद्र मेहेंदळे

उन्हाळ्याच्या दिवसात मी आणि एक मित्र बिल्डिंगच्या गच्चीवर झोपायला गेलो होतो. पण रात्री फार डास चावायला लागले त्यामुळे रात्री २ च्या सुमारास खाली आलो. दारापाशी आलो तर दार अर्धवट उघडे होते. गच्चीवर जाताना दाराला कुलूप लावुन गेलो होतो, त्यामुळे चोर शिरल्याचा संशय आला. पण आत जायला धीर होईना. हातात बॅटरी वगैरे नव्हती, शेवटी धीर करुन आत शिरलो आणि आरडाओरडा केला, पण आत कोणीच नव्हते, काही वस्तू चोरीला गेल्याचेही दिसले नाही. कदाचित चोर आधीच येउन गेले असावेत किवा आमची चाहुल लागल्याने चोरी न करताच पळाले असावेत. पोलिस तक्रार केली नाही.

दुसर्‍या प्रसंगात हिंजवडीहुन रात्री १२.३० च्या सुमारास बाइकने येत असतान सुस पुलाजवळ बाइक थांबवुन लघवीला उतरलो(ही माझी चूक). त्याच वेळी ३ चोरटे बाईकवरुन राँग साईडने येत होते ते मला बघुन लगेच थांबले. कदाचित त्यांचा हा नेहमीचा उद्योग असावा आणि या भागात सावज मिळते हे माहित असेल. एक जण माझ्याजवळ येउन फालतु चौकशा करु लागला, नाव काय, कुठुन आला, कुठे चालला वगैरे आणि दोघेजण बाइकवरच थांबले. मला काय होतेय त्याचा अंदाज आलाच आणि मी एक्दम हायवेच्या मध्यावर येउन येणार्‍या वाहनांना हात दाखवुन थांबवु लागलो. त्यामुळे हा माणुस बिचकला आणि मागे हटला. पण रात्रीचे हायवेला कोण गाडी थांबवणार ते ही अशी भानगड चालु असताना? मात्र तो मागे हटल्याने मला थोडी उसंत मिळाली आणि मी झटकन बाईकवर बसुन स्टार्ट मारला आणि निघालो. मला वाटले बला टळली, पण नाही. त्यांना या गोष्टीचा राग आला आणि त्यांनी पाठलाग करुन मला पुन्हा पाषाण तलावाजवळ गाठले, म्हणजे बाईक मधेच घातली आणि मला रस्ता सोडुन खाली उतरणे भाग पाडले. तो तिसरा माणुस पुन्हा बाईकवरुन उतरला आणि जवळ येउन माझ्या डोक्यावर कशानेतरी वार केला, अंधारात समजले नाही पण हेल्मेटमुळे वाचलो. पण देवाच्या कृपेने बाइक ऑन होती आणि याही वेळी मला सटकायला चान्स मिळाला. तिथुन जो सटकलो तो ७०-८० च्या स्पीडने बाईक हाणली आणि सरळ कोथरुड पोलिस ठाण्यात येउनच श्वास घेतला. पोलिस कम्प्लेंट केली. नंतर हायवेला ,वाकड, बालेवाडी स्टेडियम, वारजे, कात्रज अशा बर्‍याच ठिकाणच्या रात्री लुटण्याच्या घटना कानावर किवा वाचनात आल्या आहेत. त्यामुळे आता रात्री उशीर होणार असेल तर बाईक टाळतो.

सस्नेह's picture

15 Nov 2022 - 9:04 pm | सस्नेह

बापरे ! जिवावरचेच की संकट .
देवाची कृपाच म्हणायची, बचावलात.

योगी९००'s picture

15 Nov 2022 - 10:22 am | योगी९००

अगदी बालपण नाही पण तरूणपणातील भितीचा अनुभव...

बडोद्याला कंपनी कामानिमित्त गेलो होतो. संध्याकाळी वेळ होता म्ह्रणून राम गोपाल वर्माचा भूत चित्रपट थेटरात पाहिला.

त्यात एक प्रसंग आहे की उर्मिलाला रात्री झोप येत नसते व ती उठून हॉलमध्ये टीव्ही पहात बसते. टीव्हीच्या बाजूला आरसा असतो व त्यात तिला तीच दिसत असते. अचानक तिला तिच्या मागे भूत आहे हे आरश्यात दिसते. ती घाबरून उठून तिच्यामागे बघते तर कोणी नाही. (इतर चित्रपटात भूतं आरश्यात दिसत नाहीत पण रामूच्या चित्रपटात मात्र उलटे). तसा साधाच सिन होता पण एकदम परिणामकारक शुटींग केले आहे ज्यामुळे भिती वाटावी.

हे पाहून मी हॉटेलात परतलो. रात्री टीव्ही पहात होतो व रूम मध्ये टीव्हीच्याच बाजूला आरसा होता. माझे सारखे लक्ष आरश्यात जायला लागले. काही नव्हते पण अचानक खूप भिती वाटली. सरळ टीव्ही बंद केला व डोक्यावर पांघरूण घेऊन झोपलो. काहीही आवाज (बाहेरून जरी आला तरी) आला तर भिती वाढायची. केव्हा झोप लागली ते कळलेच नाही.

सस्नेह's picture

15 Nov 2022 - 11:21 am | सस्नेह

वास्तुशास्त्र आणि राज हे चित्रपट संपूर्ण बघायचे धाडस केले नाही अजून मी. मलापण हॉरर चित्रपट झेपत नाहीत.
म्हणजे जेन्युईन हॉरर हां ! उगी आपलं कंचना वैग्रे कॉमेडी कम हिडिस नव्हे :)