खरंच आयुष्य इतकं सुंदर असू शकतं? शीतलला विचारलं मी.
ती गाण्याच्या तालावर ठेका धरून टाळ्या वाजवण्यात गुंग होती, तिला ते नीट ऐकूही आलं नाही.
तिने "काय?" म्हणून विचारलं मी फक्त नकारार्थी मान हलवली, ती पुन्हा गाण्यात गुंगून गेली.
आमचा शाळेचा स्काऊट-गाईडचा कॅम्प भोरला गेला होता. गावकऱ्यांचे गोबर गॅस आणि शेतीविषयक प्रयोग यांचा अभ्यास करण्यासाठी शाळेने आमच्या इयत्ता नववीच्या वर्गाची निवड केली होती. दिवसभर गाव अभ्यासून झाल्यानंतर संध्याकाळ सरून जेवणाची वेळ होत आली होती. आमच्या मनोरंजनासाठी गावकऱ्यांनी आमचा मुक्काम असलेल्या शाळेच्या मैदानावर गाण्या-बजावण्याची सोय केलेली होती, हॅलोजनचे दिवे लावलेले होते.
आमच्यातले काही गट त्या उडत्या चालींच्या गाण्यांचीही श्रवणभक्ती करत होते, काही गट टाळ्या वाजवून ठेका धरत होते. तर गौरी, तेजल, अस्मिता अशा शॉर्टस्कर्ट घातलेल्या त्या दोघी-तिघी 'ले-गई ले-गई' गाण्यावर बेभान नाचत होत्या.
"विनीता, चल ना आपण पण जाऊयात तिकडे" शीतल आणि मनीषाच्या आग्रहाला पुन्हा फक्त नकारार्थी मान हलवून उत्तर देत मी विचारात गढून गेले.
'खरंच एखाद्याचं आयुष्य इतकं सुंदर असू शकतं? काय नाही यांच्याकडे? उंची कपडे, महागडे मेकअप, श्रीमंतीला साजेसा रुबाब आणि मनासारखं जगण्याची मुभा. देव सौंदर्यसुद्धा श्रीमंतांनाच देतो बहुतेक.' फार हेवा वाटला मला त्यांचा त्या क्षणी. एरवी शाळेत एकाच गणवेशात असताना जो फरक लक्षात यायचा नाही, तो 'क्लास'चा फरक प्रकर्षाने जाणवला.
कॅम्प संपून एका दिवसाच्या सुटीनंतर शाळा परत सुरु झाली. तीन किलोमीटरवर असलेल्या शाळेत बसचे पैसे वाचावेत म्हणून पायपीट आणि गृहपाठ-अभ्यास-परीक्षा यांच्या चक्रात तो प्रसंग आणि त्या वेळचे विचार मनाच्या कोणत्यातरी मागच्या कप्प्यात सारले गेले. वार्षिक परीक्षा संपून निकाल हाती आले. अपेक्षेप्रमाणे मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले होते.
आता पुढचं दहावीचं महत्त्वाचं वर्ष होतं. खाजगी शिकवणी लावणं अर्थातच परवडणारं नव्हतं. शाळेतले सगळेच शिक्षक चांगलं शिकवणारे होते, त्यामुळे वर्गातच नीट लक्ष दिलं तर खाजगी शिकवणीची तशी फारशी गरजसुद्धा नव्हती. तरीही शीतल, मनीषा, अश्विनी यांच्यासारख्या शिकवण्यांच्या नोट्स देणाऱ्या चांगल्या मैत्रिणीही होत्या. त्या एकमेकींच्या घरी एकत्र अभ्यासालासुद्धा जमायच्या खूप वेळा. मलाही या वेळी मनीषाच्या घरी येण्यासाठी त्यांनी आग्रह केला. कधीतरीच कोणाकडे जाणारी मी या वेळेस तयार झाले. शीतलमुळे माझी मनीषा आणि अश्विनी दोघींशी ओळख झाली होती. नाहीतर स्वत:होऊन मैत्री करण्याचा माझा फारसा स्वभावच नव्हता.
या चाचणी परीक्षेसाठी आम्ही मनीषाच्या घरी जमलो होतो. पंधरा दिवस कसून अभ्यास केला होता. स्वयंपाकघरातून मनीषाच्या आईने हसतमुखाने सर्वांसाठी सरबताचा ट्रे आणला होता. सगळ्यांची जुजबी चौकशी करून त्या पुन्हा त्यांच्या कामात व्यग्र झाल्या. श्रीमंत नसलं तरी सुखवस्तू घर होतं मनीषाचं.
मनीषा काय, शीतल काय.. त्यांच्या घरी अभ्यासाला जाणं मला खरंच आवडायचं. चांगली म्हणावी अशी खाजगी किंवा सरकारी नोकरी असलेले वडील, गृहिणी असणारी किंवा नोकरी करणारी आई, फार फापटपसारा नसला तरी आवश्यक वस्तूंनी नीटनेटकं सजवलेलं घर या सगळ्याचं मला अप्रूप वाटायचं. यांच्याइतकंच तरी द्यायचं होतं ना देवाने मला? माझे ड्रायव्हर वडील, राबणारी आई आणि एका खोलीचं घर माझ्या डोळ्यापुढे यायचं.
चाचणी परीक्षा झाली, निकालही आले. आता सहामाही परीक्षा येऊन ठेपली. या वेळी परीक्षेआधी कोणाकडे अभ्यास करायचा, याचं त्यांचं नियोजन सुरु झालं.
"विनीता, आम्ही तुझ्या घरी येऊ अभ्यासाला? तुझं घर लांब आहे, म्हणून तुझं घरच पाहिलं नाहीये आम्ही. पण आता आमच्या तिघींकडेही सायकल आहे." मनीषा उत्साहाने म्हणाली आणि मला क्षणभर काय बोलावं तेच सुचेना.
"अगं, भेटलो असतो माझ्याच घरी, पण आजीची तब्येत बरी नसते, आईला तिच्यासाठी अचानक धावपळ करावी लागते, आपल्या अभ्यासात व्यत्यय नको यायला. घर पाहायला नक्कीच बोलावेन मी तुम्हाला निवांत." - मी.
"ओह, काही हरकत नाही, माझ्या घरी अभ्यास करू या वेळी." अश्विनीच म्हणाली आणि सगळ्या तयार झाल्या.
'नशीब देवा, आजीचं कारण तरी सुचलं.' खरंच मागच्या आठवड्यात तिला आजिबात बरं नव्हतं. अचानक डॉक्टरांना बोलवायला लागलं होतं. डॉक्टर 'बीपी हाय होतंय, लक्ष ठेवा' म्हणून सांगून गेले होते. तेच आत्ता आठवलं, इतकंच.
इतके दिवस माझं घर लांब आहे म्हणून कोणाला घरीच नेलं नव्हतं कधी! आणि आपल्याकडे कोणाला बोलवायला नको, म्हणून मीही टाळायचे त्यांच्याकडे अभ्यासाला जाणं. खरं तर मला त्यांना माझ्या घरी बोलवायची लाज वाटायची. एका खोलीत संसार असलेलं आमचं घर बघून त्यांचा माझ्याबद्दल काय ग्रह होईल, याची मला चिंता असायची.
तसं शीतल यायची अधूनमधून, पण ती माझी खास मैत्रीण होती, तिच्या वागण्याबोलण्यातून ती मला माझ्या परिस्थितीमुळे कमी समजते असं कधीच वाटलं नाही. बाकीच्याही नाही समजणार कदाचित, पण शाळेत माझी एक छबी तयार झाली होती हुशार मुलगी म्हणून, नाही म्हटलं तरी एक आदर येतोच त्यामागे. त्याला या सगळ्याने तडा जाऊ नये, असंच वाटायचं. मला आयुष्यात माझा स्वाभिमान दुखावला जाईल अशी कोणतीच गोष्ट नको होती.
दहावीच्या निकालासाठी सगळे शाळेत जमलो होतो. शाळेत येताना पूर्ण रस्ताभर छातीत धडधडत होतं. चांगल्या कॉलेजला सायन्सला प्रवेश मिळावा इतक्याच गुणांची अपेक्षा होती आणि निकाल हाती आल्यावर हायसं वाटलं. या गुणांवर मी नाव भरेन त्या कॉलेजला मला नक्कीच प्रवेश मिळाला असता. निकालाचा तणाव निवळल्यावर सगळ्यांच्या गप्पा सुरु झाल्या.
"विनीता, तुझ्या घरी यायचं राहिलंच आहे बरं अजून!" मनीषाने आठवण करून दिली. मीसुद्धा "या कधीही" म्हणून वेळ मारून नेली.
तितक्यात अश्विनी म्हणाली की "तेजलचं समजलं का तुम्हाला?"
तेजल निकाल घ्यायला आलेली दिसत तर नव्हती, पण माझ्या इतका वेळ लक्षातही आलं नव्हतं. अश्विनीनेच पुढे सांगितलं की सुट्टीत ती शाळेच्याच अकरावीच्या मुलाबरोबर कुठेतरी परमिट रूममध्ये गेली होती. त्यांना बाहेर येताना वर्गातल्या कोणत्यातरी मुलाने पाहिलं, म्हणून बातमी सगळीकडे पसरली होती. तेजल पुण्यात तिच्या भाऊ-वहिनीबरोबर आलिशान बंगल्यात राहायची. तिची एकटीची मोठा बेड असलेली वेगळी खोली होती म्हणे! हे सगळं झाल्यावर भावाने तिला परत गावी पाठवून दिलं होतं. निकाल न्यायलाही भाऊच नंतर येणार होता. अश्विनी तिच्या घराजवळ राहायची म्हणून सगळं माहीत झालं. गॉसिप म्हणावं अशी चर्चा संपल्यावर मोठ्या लोकांचे मोठे उद्योग म्हणून ती गोष्ट विसरून गेले मी.
अकरावीच्या प्रवेशासाठी नाव दिलेल्या पहिल्याच कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळत होता. पण त्या कॉलेजची फी भरायच्या मुदतीमध्ये पैशाची सोय झाली नाही. असंच करत जवळ जवळ सगळेच प्रवेश बंद होत गेले. मग ओळखीने एका कॉलेजच्या शेवटच्या फेरीत प्रवेश करून घेतला, अशा कॉलेजमध्ये, जिथे जायची माझी कधीच इच्छा नव्हती. योगायोगाने शीतलला ते कॉलेज जवळ असल्याने आणि तिच्या टक्केवारीनुसार त्याच कॉलेजला प्रवेश मिळाला होता. तीन महिने उशिरा माझं कॉलेज सुरू झालं होतं. तिथे वर्गात कधी काही शिकवलंच जायचं नाही. सुरुवातीचे एक-दोन महिने वर्ग भरायचा, हे शीतलकडून समजलं. नंतर नंतर वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थितीच नसायची. शीतलची भिस्त सगळी खाजगी शिकवणीवर होती. कॉलेजला आल्यावर तर तिथली रंगीबेरंगी मुलंमुली पाहून शाळा खूपच बरी होती असंच वाटायला लागलं. त्यांचे कपडे, राहणीमान आणि माझे कपडे यांची नकळत तुलना व्हायची. न्यूनगंडाचा आणखी एक अंक सुरू झाला होता. देवा, मलाच का असं ठेवलंस तू?
असंच एक दिवस शीतलमुळे अमृता-प्रशांतबद्दल समजलं. प्रशांतने वर्गाच्या भिंती 'लव्ह यू अमृता'ने भरून टाकल्या होत्या. प्रकरण बरंच गाजलं, पण सगळं प्रशांतकडून एकतर्फीच होतं. एक दिवस घोळक्यात गप्पा चालू होत्या, तिथे शीतलपण होती म्हणून गेले, तर अमृता कोण हे पहिल्यांदाच समजलं. "त्याच्यामध्ये गट्स नाहीत म्हणून असले उद्योग करतो" अमृता म्हणत होती. खरंच खूप सुंदर होती ती, उंचीपुरी, बांधेसूद! कोणालाही आवडेल अशीच. देवाने लाखात एकच बनवलं होतं तिला. प्रशांत कोण हे नंतर कधीतरी समजलं, खरंच काही जोडच नव्हता त्यांचा. शीतल म्हणाली, "कॉलेजमध्ये असं होत राहतं. अमृता खमकी आहे म्हणून निभावून नेलं." खरंच होतं तिचं.
एक संस्कृतचा तास तेवढा नियमित व्हायचा, कदाचित बाहेर त्याचे खाजगी क्लास नव्हते, म्हणून असेल. प्रॅक्टिकल्स आणि संस्कृतच्या तासासाठी रोज कॉलेजला येणं व्हायचं. अकरावीत तर प्रत्येकच विषयात जवळजवळ काठावरच पास झाले मी. घरी आईचा खूप ओरडा खाल्ला.
दोन वर्षं असंच चालढकल करत कॉलेज कसंतरी संपलं. सुट्टीत घराला हातभार म्हणून मॉलमध्ये सेल्सचं काम केलं. बारावीत शीतलच्या मदतीने बरे गुण मिळाले. पुढे काय करायचं काहीच माहीत नव्हतं, पण शीतलच मदतीला आली. इंजीनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेसाठी तिनेच माझ्याकडून फॉर्म भरून घेतला. सुदैवाने त्यामध्ये मला एकदम चांगले गुण मिळाले. प्रवेशावेळी पुन्हा फीचा प्रश्न होताच. वडिलांनी त्यांच्या मालकांच्या ओळखीने खाजगी बँकेतून शैक्षणिक कर्ज पास करून घेतलं आणि फीचा प्रश्न मिटला.
कॉलेजच्या रंगीबेरंगी दुनियेची अकरावीतच ओळख झाल्याने इंजीनिअरिंगला मला त्याचं फारसं काही वाटलं नाही. एकच वाईट वाटलं की शीतलला आणि मला एकाच कॉलेजला प्रवेश मिळाला नाही. पण इथे पहिल्याच दिवशी पल्लवी भेटली. काहीतरी ओळखून ती माझ्याशी बोलायला आली, असंच वाटलं मला. हळूहळू मैत्री होत गेली. मी आता जरा माझं मन मोकळं करायला शिकले होते आणि त्यासाठी पल्लवी माझी हक्काची मैत्रीण होती. माझ्या सगळ्या प्रोजेक्ट्सना तीच पार्टनर होती. इंजीनिअरिंगला मात्र शिक्षकांवर अवलंबून न राहता आपला आपणच अभ्यास करायला पाहिजे, हे मी शिकले. पहिल्या वर्षाला केटी राहिली नाही, हीच खूप मोठी गोष्ट होती. पल्लवीबरोबर सुखदुःखाच्या गोष्टी, अभ्यास, कॉलेज सगळं करत चार वर्षं कशी संपली समजलंच नाही. सुट्टीत परत एका ठिकाणी डेटा एंट्री ऑपरेटरचं काम सुरु केलं. निकाल यायच्या आधीच पल्लवीने आणि मी नोकरीच्या साइटवर आमचा बायोडेटा टाकला होता. एक दिवस एका सॉफ्टवेअर कंपनीतून दोघींना कॉल आला. ठरलेल्या दिवशी मुलाखत देऊन आलो. मी शेजाऱ्यांचा फोन नंबर त्यांच्या परवानगीने बायोडेटावर टाकला होता.
मुलाखत देऊन आल्यावर तीन दिवसांनी शेजारून काकूंची हाक ऐकू आली, "विनीता, फोन आहे तुझ्यासाठी."
मी विसरूनच गेले होते की मुलाखत दिली होती. मुलाखत दिलेल्या ठिकाणी नोकरीसाठी माझी निवड झाली होती, त्यांचाच फोन होता. फोन ठेवला आणि घरी आले, तर डोळ्यातलं पाणीच थांबेना. ज्यासाठी केला होता अट्टहास, ते आज झालं होतं. चांगल्या नोकरीचं माझं स्वप्न पूर्ण झालं होतं. पण पल्लवीची निवड नव्हती झाली, म्हणून मला वाईट वाटलं. आता नोकरी सुरू झाली होती. इथेही माझी चांगली छाप पाडण्यात मी यशस्वी झाले. पण मिसळत नव्हतेच कोणामध्ये. आपलं कामाशी काम. माझ्या आयुष्याचं बंद पुस्तक मला कोणाजवळच उघडायचं नव्हतं. आपल्या कामाने कमावलेला आदर घरची पार्श्वभूमी कोणाला कळू देऊन मला घालवायचा नव्हता. आयुष्यात एकच शीतल किंवा पल्लवी असू शकते, नाहीतर परिस्थितीचा गैरफायदाच घेणारे लोक जास्त सापडतात, असं का कोण जाणे सारखं वाटायचं. असेच नोकरीतले दिवस चालले होते. हळूहळू मीही शाळेत होते तितकी आता अलूफ नक्कीच राहिले नव्हते. ऑफिसच्या सहलींना जायचे. फार उंची नसले तरी थोडे चांगले कपडे आता मी वापरू शकत होते. साधाच का होईना, माझ्याकडे मोबाइल फोन होता. एक वन बीएचके फ्लॅट मी विकत घेतला होता. माझ्या शब्दाला, विचारांना मान मिळेल असं काम मला करता येत होतं. कधी मनातही आलं नव्हतं मी परदेशात जाऊ शकेन, पण नोकरीमध्ये दोन महिन्यांसाठी ती संधी मला मिळाली होती. नोकरी करता करता 'आयुष्य फार सुंदर नसेल पण थोडं तरी आहे' असं मला आता वाटू लागलं होतं.
"विने, काय करतेस? भेटू की शनिवारी." असाच कधीतरी पल्लवीचा फोन आला. तिलाही माझ्यानंतर एकाच महिन्यात दुसऱ्या कंपनीत नोकरी मिळाली होती. खूप दिवस झाले, दिवस का, दोनेक वर्षं झाली असतील आमची भेटच झाली नव्हती. त्या शनिवारी सारस बागेत आम्ही भेटलो. पल्लवीने परागशी तिच्या लग्नाची गोड बातमी दिली. प्रेमविवाह होता. पराग आवडायचा ते तिने सांगितलं होतं फोनवर, त्यानेच तिला प्रपोज केलं होतं. मला खूप छान वाटलं तिच्याबद्दल. लहानपणी कोणाचाही वाटायचा तसा हेवा नाही वाटला.
"तुला नाही आवडत कोणी?" तिने मला विचारलं.
"मला आवडून काय उपयोग, मी कोणाला आवडणार?" - मी
"वेडी आहेस तू, काहीही विचार करतेस. तू चारचौघींसारखीच आहेस. उगीच स्वतःला कमी का समजतेस?" - पल्लवी
"तसं नाही गं पल्लू. माझ्या प्रायॉरिटीज वेगळ्या आहेत. माझ्या घरचं कोणाला समजलं तर ते नाही म्हणतील असं वाटतं मला" - मी
"पण ज्याला तू आवडशील तो तुझ्या घरचा का विचार करेल, तो तुझ्यासाठी लग्न करेल ना तुझ्याशी." - पल्लवी
"हो, पण लग्नापर्यंत जायचं म्हटलं तर मला घरच्यांबद्दल सांगावंच लागेल ना. तेव्हा त्याचा माझ्याबद्दलचा आदर कमी झाला तर? मला वाटत नाही मी लव्ह मॅरेज करू शकेन. तसंही मला आजपर्यंत काहीच सहजासहजी मिळालं नाहीये. जाऊ देत ना तो विषय, लेट्स पार्टी.." - मी
"तुला काय मला पार्टी मागायची गरज आहे का, तुझ्यासाठी काहीपण" असं पल्लवीने म्हणून नंतर खूप वेळ आम्ही हसत, गप्पा मारत राहिलो. गणपतीचं दर्शन घेऊन निघालो. रात्री झोपताना तेच विचार येत राहिले. शीतल, मनीषा, अश्विनी सगळ्यांची लग्नं झाली. त्या तेजलचं काय झालं असेल? तिचंही झालं असेल का लग्न? असेना का, काय घेणं आहे आपल्याला. पण मी स्वतःहोऊन कोणामध्ये रस दाखवणार नाही, हे नक्की. अशाच विचारात कधीतरी झोप लागली.
"विनी, हे दहावं स्थळ आहे आता, या वेळी तरी हो म्हण." आई.
"आई, तुला माहीत आहे नातेवाईक कसली कसली स्थळं आणतात, कोणालाही हो म्हणू का?" मी
"जी थोडीफार बरी स्थळं आहेत, ते आपल्याला नाही म्हणतात. ओळखीतले चांगले लोक आहेत ते त्यांच्या तोलामोलाचीच स्थळं बघणार ना? वय वाढत चाललंय, मला तर काळजीच लागून राहिलीये तुझ्या लग्नाची." आई
नेहमीप्रमाणे कार्यक्रम पार पडला. 'चांगला होता मुलगा, होकार येईल असं नाही वाटत काही. जेव्हा वय लहान होतं तेव्हाच येत होती खरं तर बरी स्थळं, पण पैसेच कुठे होते लग्न करायला. त्यासाठी पुन्हा कोण कर्ज देणार होतं? आणि आज शिक्षणाने नोकरीने जे मिळालंय ते लवकर लग्न करून गृहिणी होऊन मिळालं असतं? नक्कीच नाही.' अशाच विचारात झोप लागून गेली.
घरच्यांच्या स्थळांचे फोन, चौकशा चालूच होत्या.
आणि आज परत एकदा,
"तुझं नाव नोंदवलंय, तिथून एक स्थळ येणार आहे आज. माहितीवरून चांगलं वाटतंय." आई.
मी सोपस्कार म्हणून तयार झाले. त्यांच्या घरातले सगळेच जण आले होते, मुलगा, आई, बाबा आणि आजी.
खूप चांगली माणसं वाटली. नचिकेत तर आजीच्या जवळ जाऊन बोलला तिच्याशी. बघू आता काय होतंय.
दुसऱ्या दिवशी ऑफिसातून घरी आले, तर आई म्हणाली "त्यांचा होकार आहे म्हणून फोन आला होता. तुझं काय सांगायचं? मी तुला विचारून कळवते असं सांगितलंय."
"आई, मी फ्रेश होऊन येते." मी.
'काय सांगू मी? मला अपेक्षाच नव्हती होकार येईल म्हणून. नकारांची इतकी सवय झाली की हे पण नाहीच म्हणणार अशी खातरीच होती जणू! का हो म्हणाला असेल तो मला? तो तर दिसायला चांगला आहे, नोकरी पण चांगली आहे. घरच्यांनी जबरदस्ती हो म्हणायला लावलं नसेल? कुठे काही घरच्यांना मान्य नसलेलं अफेअर असेल म्हणून करायचं म्हणून लग्न करायचं असेल का त्याला? गे तर नसेल? आणि काहीच नसेल तर मला कसं पसंत केलं त्याने? अजिबातच कोणाची ओळख नाही, संस्थेतून आलेल्या स्थळावर कसा विश्वास ठेवायचा?'
दोन दिवस असेच गेले, शेवटी आईला हो म्हणून सांगितलं. मार्चमध्ये घरगुती साखरपुडा आणि मेमध्ये लग्न ठरलं. मला काहीच खरं वाटत नव्हतं. सगळं जणू एका अनामिक शक्तीने ताब्यात घेऊन जे व्हायचं ते होत होतं. मी काहीच करत नव्हते. शीतल आणि पल्लवीलासुद्धा खूप आनंद झाला.
अधूनमधून नचिकेतचा फोन यायचा. चांगला वाटायचा बोलायला तो. उगीच चीझीचीझी बोलायचा नाही. पण ते एक बरंच झालं, नाहीतर असं कोणी बोललं तर काय उत्तर द्यायचं, ते कुठे मला माहीत होतं. लग्नाचा दिवस येऊन ठेपला. आदल्या दिवशी सीमांतपूजनाची माझी सगळी तयारी शीतल आणि पल्लवीने केली. सारख्या म्हणत होत्या, "आम्ही तुला म्हणायचो नाही सगळं छान होईल म्हणून?" मी हसले फक्त. पण भीती तर होतीच, नक्की सगळं चांगलंच होणारे का याची. लग्न पार पडलं. आईबाबांच्या डोळ्यात समाधान दिसत होतं. लग्न होऊन सासरी आले. नोकरी करणाऱ्या सुनेकडून अपेक्षांबाबत नचिकेत, सासू, सासरे सगळेच समजूतदार होते. कधी उगीच टोमणे नाहीत, सून म्हणून काही पूर्वग्रह नाहीत, नशीबवानच होते मी. आणि नचिकेत? असा मुलगा खरंच शोधून सापडला नसता मला. बायकोला समजून घेणारा, शांत आणि तिला तिची स्पेसही देणारा. आणि हो.. तो गे नाहीये!
फेसबुकवर शाळेच्या बॅचचा ग्रूप केला होता. जवळजवळ सगळेच जण सापडले तिथे. शाळेतच गेटटुगेदर झालं. सगळे काही ना काही चांगलंच करत होते. तेजलचं हिऱ्यांच्या व्यापाऱ्याच्या मुलाशी लग्न झालं होतं, एक मुलगीही होती तिला, स्वतःचं बुटिक चालवते ती. अर्थात ती पुण्यात नव्हती, पण फेसबुकवर अपडेट्स असायचे. मनीषा नवऱ्यासोबत अमेरिकेत असते, दोघांचाही जॉब तिकडेच आहे. तिने व्हर्चुअल हजेरी लावली होती, पण पुढच्या आठवड्यात पुण्यात येणार आहे. अश्विनी डॉक्टर झालीये, प्रॅक्टिस जोरात असते तिची. सगळ्यांचं छान चाललंय. अश्विनीला आवर्जून घरचा पत्ता देऊन आलेय, मनीषालासुद्धा पाठवलाय, पुढच्या वीकेंडला घरी याच म्हणून. आधीची मी असते, तर या गेटटुगेदरलाही गेले नसते, पण आता आयुष्य सुंदर आहे.
काशिदच्या त्या निवांत किनाऱ्यावर आमचा शर्विल वाळूमध्ये खेळत होता. अस्ताला जाणाऱ्या सूर्याचा लालिमा समुद्रभर पसरलेला बघून त्याला खूप आनंद झाला होता. इतकं काही भव्यदिव्य सुंदर तो पहिल्यांदाच पाहत होता. त्याचं पाण्यात, वाळूत खेळणं चालूच होतं. तो जास्त लांब जाणार नाही याकडे लक्ष ठेवून आम्ही दोघे निवांत बसलो होतो.
"तू का मला हो म्हणालास?" मी
"तू का मला हो म्हणालीस? बरं, तेही अख्खे दोन दिवस लावलेस विचार करायला? इतका वाईट दिसतो का मी?" तो.
"अरे, पण मी तर अॅव्हरेज आहे, तुला आणखी चांगली मिळाली असती की." मी
"मग मी कुठे ब्रॅड पिट लागून गेलोय." तो
"ई.. मला आवडतच नाही पण ब्रॅड पिट." मी
एकमेकांना काहीच कारणं न देता असेच आमचे संवाद चालू राहतात.
आणि मी मनातच देवाला विचारते, 'खरंच आयुष्य इतकं सुंदर असू शकतं?'
प्रतिक्रिया
7 Nov 2022 - 9:13 am | ॲबसेंट माइंडेड ...
छान कथा. आवडली.
7 Nov 2022 - 11:55 am | कर्नलतपस्वी
आयुष्यात एकच शीतल किंवा पल्लवी असू शकते
खरयं.
सुधीर मोघे यांची कवीता आठवली.
मन काळोखाची गुंफा,
मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात,
मन देवाचे पाऊल
दुबळया गळक्या झोळीत
हा सूर्य कसा झेलावा
मनाचा गोफ चांगला गुफंलाय.
ध्यास मजला नव्हता चंद्रमाधवीचा
वादळात सावरणारा एक विश्वास असावा
कधी न वाटले मजला भेटावा चंद्र पौर्णीमेचा
छान लिहिलय, लिहीत रहा.
7 Nov 2022 - 6:47 pm | पॉइंट ब्लँक
बदलत गेलेल्या परिस्थितितील बारकावे, मनस्थिती छान टिपलिये.
7 Nov 2022 - 8:06 pm | Bhakti
मस्त! मुलींचं सुंदर विश्व :)
7 Nov 2022 - 9:21 pm | मुक्त विहारि
सकारात्मक लेख ...
7 Nov 2022 - 9:30 pm | सरिता बांदेकर
मस्त लिहीलं आहे.
‘खरंच’
छान लिहीता तुम्ही
9 Nov 2022 - 10:03 pm | टर्मीनेटर
आवडली कथा 👍
वाचायला सुरुवात केल्यावर आधीची तुमची एक कथा वाचली होती तिचे एक्स्टेंशन आहे की काय असे वाटले होते. पण नाही त्या कथेतल्या मुलीच्या कौटुंबिक/आर्थिक परिस्थितीशी थोडे साम्य असले तरी कथा वेगळी वाटली. मांडणी छान जमली आहे.
पुढील लेखनास शुभेच्छा!
10 Nov 2022 - 11:36 am | श्वेता२४
मुलींचे भावविश्व परफेक्ट उभे केलेय. आवडली.
11 Nov 2022 - 11:37 am | सौंदाळा
साधी सोपी कथा आवडली.
या वयात मिळणार्या मित्र-मैत्रिणींचा कोणते विषय घ्यायचे, कुठे अॅड्मिशन घ्यायची, कँपस मधे कुठल्या कंपन्या निवडायच्या, दोन ठिकाणी सिलेक्शन झाले तर कुठे जॉईन करायचे वगैरे निर्णयांवर खूपच प्रभाव पडतो.
मुलीच्या भावविश्वातून लिहिली असली तरी बर्याच मध्यम्वर्गीय मुलांचे पण असेच असते.
अर्थात शेवटच्या काही ओळींमधून त्याचीच प्रचिती आली.
14 Nov 2022 - 11:39 am | श्वेता व्यास
@ॲबसेंट माइंडेड ... प्रोत्साहनपर प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)
@कर्नलतपस्वी - खूप छान कविता आहे, प्रोत्साहन आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद :)
@पॉइंट ब्लँक
@Bhakti
@सौंदाळा
मुविकाका
तुमच्या प्रोत्साहनपर प्रतिसाद आणि विश्लेषणासाठी धन्यवाद :)
@सरिता बांदेकर
@टर्मीनेटर
'खरंच' मनापासून धन्यवाद, मला फक्त श्वेता म्हणा, तुम्ही वगैरे नको :)
@श्वेता२४ - प्रोत्साहन आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद :)
आणि माझा हा प्रयत्न दिवाळी अंकामध्ये समाविष्ट करून घेतल्याबद्दल @संपादक मंडळ यांचे विशेष आभार.
14 Nov 2022 - 11:44 am | विवेकपटाईत
मस्त आवडली
15 Nov 2022 - 12:16 am | श्रीगुरुजी
मध्यमवर्गीय मुलीचे भावविश्व खूप छान मांडलंय!
15 Nov 2022 - 8:29 am | सुजित जाधव
कथा आवडली. फारच छान. आणि हो आपण जर आयुष्याकडे वेगळ्या दृ्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य सुंदर असु शकत, खरंच
15 Nov 2022 - 1:49 pm | सस्नेह
छान हळुवार कथा..!
15 Nov 2022 - 10:14 pm | स्मिताके
सकारात्मक, आशावादी आणि प्रयत्नवादी विनिताचं चित्रण आवडलं.
19 Nov 2022 - 4:03 pm | श्वेता व्यास
@विवेकपटाईत - धन्यवाद :)
@सुजित जाधव - धन्यवाद! खरं आहे, दृष्टिकोनाचा फरक असतो :)
@श्रीगुरुजी
@स्मिताके
स्नेहाताई
तुमच्या उत्साहवर्धक प्रतिसादासाठी आभारी आहे :)
19 Nov 2022 - 7:08 pm | विजुभाऊ
खूप छान वाटले कथा वाचून. सोपी साधी फार वळणे नसलेली.त्यामुलेच की काय खूप आवडली.
20 Nov 2022 - 10:16 am | तुषार काळभोर
सरळमार्गी असल्याने जास्त आवडली.
प्रत्येक गोष्टीत ट्विस्ट असायलाच हवा असं काही नाही.
20 Nov 2022 - 10:22 am | प्रचेतस
साधी सरळ कथा फार आवडली.
21 Nov 2022 - 2:13 pm | सुरिया
छान लिहिलेय. आवडले
4 Dec 2022 - 5:21 am | पर्णिका
गोड आहे कथा... छान लिहिली आहे.
पण, मला आवडतच नाही पण ब्रॅड पिट, याबद्दल निषेध ! 😉
4 Dec 2022 - 4:17 pm | चौथा कोनाडा
खुप छान कथा, ओघवती, सुंदर !
काही वेळा रिलेट करत गेलो स्वत:ला कथेतल्या परिस्थितीशी !
अगदी आवडली !
9 Dec 2022 - 11:09 am | श्वेता व्यास
@विजुभाऊ
@तुषार काळभोर
@प्रचेतस
@सुरिया
ही साधी सोपी कथा तुम्हा सर्वांना आवडली आणि ते आवर्जून कळवल्याबद्दल सर्वांचे आभार :)
@पर्णिका -
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद आणि
जनात : ब्रॅड पिटसाठी क्षमस्व, चाहत्यांना दुखावण्याचा हेतू नाही :)
मनात : मी विचारच करत होते ब्रॅड पिट बद्दल अजून कोणी बोललं नाही :)
@चौथा कोनाडा
तुम्हाला कथा आपलीशी वाटली हे कळवल्याबद्दल धन्यवाद :)
9 Dec 2022 - 11:38 am | ज्ञानोबाचे पैजार
पहिल्यांदा वाचली तेव्हा एका दमात वाचली होती आणि आवडली होती
आज पुन्हा एकदा वाचली आणि परत तेवढीच आवडली
लिहित रहा
पैजारबुवा,